गेल्या पूर्ण वर्षात मला अनेकदा प्रवासासाठी रेल्वेचं किंवा बसचं तिकीट आरक्षित करायची वेळ आली, तसंच त्या प्रवासाच्या दरम्यान हॉटेलमध्ये राहण्यासाठीही जागा आरक्षित करावी लागली. हॉटेलमध्ये राहण्यासाठी ज्या कंपनीकडून आरक्षण केलं जात होतं, त्या कंपनीकडून मला प्रत्येक आरक्षणावर बोनस पॉईंट्स मिळत होते. असे पुष्कळ पॉईंट्स साठल्यानंतर त्या कंपनीकडून मला त्या पॉईंट्सच्या बदल्यात काही कूपन्स घेण्याबद्दल सुचवणी करण्यात आली.
वारंवार पॉईंट्सच्या बदल्यात कूपन्स घेण्याबद्दल सुचवणी करण्यात आल्याने, मी उत्सुकतेने कोणती कूपन्स आहेत, ते पाहिलं आणि कूपन्स घेण्याचा विचार सोडून दिला, त्याला कारणंही तशीच होती. त्या कूपन्समध्ये पिझ्झा आणि तत्सम फास्ट फूडची मागणीनुसार थेट घरी येऊन सुपूर्तता करणाऱ्या काही दुकानांची कूपन्स होती, पण माझ्या परिसरात ती दुकानं सेवा देत नव्हती. त्याशिवाय ज्यांच्याकडून मी भाड्याने गाडी चालवायला नेणार नाही अशा किंवा ज्यांच्याकंडून निव्वळ चांगल्या दर्जाचे आहेत, म्हणून गरज नसतांना महागडे चष्मे आणि गॉगल्स विकत घेणार नाही अशा किंवा इतर काही सेवादाते ज्यांच्या कूपन्सचा मला विशेष उपयोग होणार नाही, अशा विविध सेवादात्यांची कूपन्स तिथे उपलब्ध होती. त्यातल्या त्यात एकच कूपन मला जरा उपयोगी वाटलं.
आपण नोंदणी केल्यास त्यानुसार आपल्या वतीने, वाढदिवस किंवा इतर काही विशेष दिवसाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला थेट तिच्या घरी पुष्पगुच्छ किंवा केक किंवा इतर भेटवस्तू पाठवणाऱ्या कंपनीचं ते कूपन होतं. कोणाला असा थेट घरी पुष्पगुच्छ किंवा केक पाठवण्याची कल्पनाच रम्य असल्याने मी उत्सुकतेने त्या कंपनीची सूची पाहिली. पण घरपोच सेवा देत असल्याने त्या कंपनीच्या तर्फे पाठवल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छ आणि केक इत्यादी वस्तूंसाठी मोजावं लागणारं शुल्कही तसंच जास्त होतं. ते पाहून त्या कंपनीचं कूपन घेण्याचा माझा विचार बारगळला. एकतर यापेक्षा कमी किंमतीत चांगले पुष्पगुच्छ किंवा केक मिळू शकतात, शिवाय आपण जेव्हा स्वतः कोणाच्या घरी जाऊन, स्वतः विकत घेतलेल्या पुष्पगुच्छ किंवा केकसहीत शुभेच्छा देतो, त्याची सर या परस्पर घरपोच दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छ आणि केकला नाही. शिवाय पाठवायचेच झाले, तर असे पुष्पगुच्छ आणि केक पाठवायचे कोणाला, याचा विचार करण्यातच माझा वेळ निघून गेला आणि पॉईंट्सच्या बदल्यात कूपन्स घेण्यासाठीची मुदत टळून गेली. माझे तेव्हढे जास्तीचे पॉईंट्स वाया गेले, पण मला काही त्याची हळहळ वगैरे वाटली नाही.
त्यानंतर परत माझे जास्तीचे पॉईंट्स साठले. आता मात्र त्या हॉटेलमध्ये आरक्षण करणाऱ्या कंपनीने मला काही सुचवणी वगैरे केली नाही, तर थेट दोन कूपन्स मला पाठवून दिली. त्यातलं एक अर्थातच ज्यांच्या सेवेचा मला काहीही उपयोग नाही, अशा एका सेवादात्याचं कूपन होतं आणि दुसरं कूपन होतं, ते थेट घरपोच पुष्पगुच्छ आणि केक पाठवणाऱ्या कंपनीचं. आता मिळालंच आहे, हे कूपन तर कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्ताने त्या व्यक्तिला पाठवावा एखादा पुष्पगुच्छ, असा विचार मी केला. पण जेव्हा ते कूपन वापरण्यासाठी दिलेल्या अटी पाहिल्या, तेव्हा मी विचारात पडले.
कूपन वापरण्यासाठी कमीत कमी जितक्या रकमेची खरेदी करावी लागणार होती, ती रक्कम तशी जास्त होती आणि एकाच खरेदीसाठी ते कूपन वापरायचं होतं. ते कूपन वापरण्यासाठी जेवढी मुदत दिलेली होती, त्या मुदतीदरम्यान ज्यांचे कोणाचे वाढदिवस होते, त्यापैकी कोणालाही मी कूपन वापरून पुष्पगुच्छ आणि त्याबरोबर केक किंवा इतर काही भेटवस्तू पाठवल्या असत्या, तरी ते सगळं पाहिल्यावर ज्या व्यक्तिला ते पाठवलं आहे, त्या व्यक्तिला त्याने उगीचच कानकोंडं झालं असतं, कारण इतर वेळी शक्यतो शुभेच्छाच दिल्या जातात, क्वचित विशेष काही निमित्ताने पुष्पगुच्छ दिला जातो. आता अचानक कोणाला असं सगळं एकत्र घरपोच पाठवलं असतं, तर ते विचित्र वाटलं असतं. त्यामुळे इतर कोणासाठी ते कूपन वापरायचा विचार रद्द झाला. मग आता त्या कूपनचं करायचं काय?
विचार करता करता मला आठवलं, की त्या मुदतीदरम्यान माझाही वाढदिवस आहे. कदाचित म्हणूनच त्या कंपनीने मला काही न विचारता, थेट ते कूपनच मला पाठवून दिलं असावं. आता मी ते असंही दुसऱ्या कोणाकरता वापरू शकत नाही, तर ते वाया न घालवता माझ्याकरता का वापरू नये. तसंही गेली काही वर्षे माझा वाढदिवस घरातच साजरा होत असतो, वाढदिवसाच्या दिवशी हल्ली ठरवूनही बाहेर फिरायला जाणं होत नाही किंवा हॉटेलमध्येही जाणं होत नाही आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा, नाटक बघणे हे गेल्या काही वर्षात अगदीच कमी झालं आहे, हल्ली सिनेमे घरीच पाहिले जातात. त्यामुळे आपणच आपल्या वाढदिवसाला हवा तो केक मागवावा आणि आपला वाढदिवस साजरा करावा, तसंही त्यानंतर लगेच पुढे असणाऱ्या एका लग्नाच्या निमित्ताने काही नातेवाईक घरी आलेले असतील, तर त्यांनाही त्या केकची चव बघायला मिळेल, असा विचार तर केला आहे. पुढे काय होतं ते बघू.
एरवी रम्य वाटणाऱ्या कल्पना जेव्हा वास्तवात उतरतात त्या ह्या अशा वास्तवाचं खडबडीत लेणं लेवून!
No comments:
Post a Comment