मी या ब्लॉगवर आत्तापर्यंत जे काही लिहिलं आहे, त्यात काही प्रवासवर्णनांचाही समावेश आहे. त्यातलं अगदी अलीकडचं प्रवासवर्णन होतं अंदमानच्या ट्रीपचं. अंदमानच्या आधी मी ज्या एका जास्त कालावधीच्या ट्रीपला गेले होते, त्या केरळच्या ट्रीपमध्ये मनाला खिन्न करणारे काही अनुभव आल्यानंतर, त्या ट्रीपच्या पार्श्वभूमीवर अंदमानच्या सुरळीत ट्रीपचा अनुभव मला आनंददायी वाटणं साहजिकच होतं. शिवाय अंदमानचं नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता, तिथल्या पर्यावरणाची काळजी घेत तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आणि मुख्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी असणारा सेल्युलर जेल, रॉस बेट यांचा संबंध आणि तिथे देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेलं योगदान या कारणांमुळेही मी या ट्रीपचं विस्तृत प्रवासवर्णन लिहिलं आणि त्यासोबत अनेक फोटोही पोस्ट केले. माझी ही ट्रीप एका मोठ्या ग्रुपबरोबर झालेली असल्याने या ट्रीपच्या प्रवासवर्णनात त्यातल्या काही जणांचे किस्से येणं अपरिहार्य होतं. अशावेळी त्या सहप्रवाशांबद्दल लिहितांना, ही ट्रीप आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचा उल्लेखही न करता हे प्रवासवर्णन लिहिणं सर्वस्वी अनुचित ठरलं असतं, त्यामुळे साहजिकच त्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचाही मी आवश्यक तिथे, इतर सहप्रवाशांप्रमाणेच उल्लेख केला. (त्याआधीही अगदी मोजक्या लोकांसोबत केलेल्या माझ्या केरळ ट्रीपच्या प्रवासवर्णनात, केरळमध्ये आम्हांला ट्रीपची सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा मी उल्लेख केलाच होता, पण एक ड्रायव्हर सोडला, तर त्या कंपनीशी आमचा थेट संबंध आला नसल्याने, तो उल्लेख अगदी त्रोटक होता.) अंदमानच्या ट्रीपचं प्रवासवर्णन लिहितांना त्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या वाहतुकीच्या सोयी, राहण्याच्या सोयी, तिथल्या विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आणि इतर सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क, तिथे विकत मिळणाऱ्या काही विशेष गोष्टी, तसंच ट्रॅव्हल कंपनीच्या दिल्या जाणाऱ्या सोयी, इत्यादी गोष्टींचा या प्रवासवर्णनात उल्लेख करण्याचं एकमेव कारण हेच होतं, की तिथे ट्रीपला जाणार असलेल्या वाचकांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा. (माझ्या आधीच्या प्रवासवर्णनातही मी ठिकठिकाणी असे उल्लेख केलेले आहेत.) मात्र मी इथे हे स्पष्ट करते, की 'अंदमानच्या ट्रीपचे हे प्रवासवर्णन म्हणजे कोणाचीही जाहिरात नसून, माझं वैयक्तिक मत व्यक्त करणारं लेखन आहे आणि मी इथे हे प्रवासवर्णन लिहिल्याबद्दल अंदमानचा पर्यटन विभाग, अंदमानची ट्रीप आयोजित करणारी ट्रॅव्हल कंपनी आणि तिचे संचालक, प्रवासवर्णनात उल्लेख आलेली विमान कंपनी आणि तिचे व्यवस्थापन, हॉटेल्स आणि हॉटेल्सचे व्यवस्थापन, विक्रेते, पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन इत्यादींपैकी कोणीही मला वस्तू अथवा मूल्यस्वरूपात कोणतंही मानधन दिलेलं नाही, अथवा मी हे प्रवासवर्णन लिहावं अशी सूचनाही केलेली नाही. तसंच मी हे प्रवासवर्णन लिहिलेलं आहे, याची कल्पनाही मी उपरोल्लेखित व्यक्तींना दिलेली नाही. तरी सदर प्रवासवर्णन हे कोणाचीही जाहिरात म्हणून लिहिलेलं नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.'
हे सर्व स्पष्ट करण्याचं कारण म्हणजे एका फेसबुक ग्रुपमधला मला आलेला अनुभव! मी फेसबुकवरच्या 'वाचा, लिहा.. वाचा.' या ग्रुपचं सदस्यत्व घेतलेलं होतं. तेव्हा या ग्रुपच्या पेजवर, या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत याबद्दल काहीही लिहिलेलं नव्हतं. ग्रुपमधल्या बऱ्याचशा पोस्ट्स ह्या पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल मतं व्यक्त करणाऱ्या होत्या, पण काही ब्लॉगलेखकांनी त्यांच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्सही तिथे दिलेल्या होत्या. ते पाहून, इतर ग्रुपप्रमाणे याही ग्रुपमध्ये ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स दिल्या तर चालतील, असा माझा समज झाला. त्यामुळे माझ्या अंदमानच्या ट्रीपबद्दलच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स मी इतर ग्रुपबरोबर, त्याही ग्रुपमध्ये देत गेले. प्रवासवर्णनाचे मोठे लेख त्यांच्या फोटोसकट ग्रुपमध्ये टाकण्याऐवजी ब्लॉगची लिंक देणं मला जास्त सोयिस्कर होतं.
एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या कालावधीत मी त्या पोस्ट्स लिहिल्या आणि पोस्ट्स लिहिल्यावर त्यांच्या लिंक्स ग्रुपमध्ये दिल्या. त्या दरम्यान बहुधा त्याच ग्रुपमध्ये एका वाचकाने मला उपरोल्लेखित ट्रॅव्हल कंपनीच्या फोन नंबरची विचारणा केली आणि मी त्या वाचकाला त्या ट्रॅव्हल कंपनीच्या फेसबुक पेजची लिंक देऊन तिथे फोन नंबरची विचारणा करायला सांगितली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रवासवर्णनातली माझ्या शेवटच्या पोस्टची लिंक तिथे दिल्यानंतर, दुसऱ्या एका वाचकाने "या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत?" अशी शंका विचारली. ग्रुपच्या एक ऍडमिन 'प्रीति आपटे उमा निजसुरे' यांनी त्याचं उत्तर देतांना सांगितलं, की "इथे फक्त आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे. कथा, लेख चालतील. कविता नको." त्यावेळी त्यांनी त्याच पोस्टच्या खाली असलेल्या माझ्या ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट चालेल की नाही यावर कोणतंही भाष्य केलं नाही किंवा माझ्यासकट इतर कोणाचीही ब्लॉगची लिंक असलेली पोस्ट काढून टाकली नाही. त्यामुळे ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट ऍडमिननी 'लेख' या प्रकारात गृहीत धरली असावी, असा माझा समज झाला. त्यावेळी त्यांनी तशी काही सूचना केली असती, तर मी ताबडतोब माझ्या ब्लॉगच्या लिंक्स काढून टाकल्या असत्या.
नंतर अचानक चार महिन्यांपेक्षाही जास्त काळ उलटून गेल्यानंतर, २० डिसेंबरला दुसऱ्या एक ऍडमिन 'Yogini Nene' यांनी त्या वाचकाच्या शंकेचं उत्तर देत स्पष्ट केलं, की "इथे वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे." अचानक ती जुनी पोस्ट वर आलेली पाहून मी ग्रुपचं पेज ओपन केलं आणि सहज खाली स्क्रोल करत गेले, तेव्हा तिथे माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कथेच्या ब्लॉगपोस्टची लिंक सोडून इतर सर्व म्हणजे अंदमानच्या ट्रीपच्या ब्लॉगपोस्ट्स दिसेनाशा झालेल्या होत्या. सर्चमध्ये शब्द देऊनही त्या पोस्ट्स दिसेनात, तेव्हा त्या पोस्ट्स डिलीट केलेल्या असाव्यात, असा मी अंदाज बांधला. मात्र इतर ब्लॉगलेखकांच्या, लेख म्हणता येईल अशा ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक ग्रुपमध्ये तशाच दिसत होत्या. मग ऍडमीननी ग्रुपचे नियम बदलले आहेत का, हे पाहण्यासाठी मी साईडबारमध्ये दिलेल्या ग्रुपच्या वर्णनावर नजर टाकली, तर तिथे काही बदल झालेले दिसले. ग्रुपच्या वर्णनात लिहिलेलं होतं, की "पुस्तकं वाचा, त्यांच्याबद्दल परिचयवजा पोस्टस् लिहा.. आणि इतरांच्या वाचा. (इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)"
ऍडमिननी त्यांच्या अधिकारात ग्रुपचे नियम बदलून पोस्ट्स डिलीट करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता, परस्पर माझ्या पोस्ट्स डिलीट झाल्या, त्याचवेळी ग्रुपच्या नियमात खास कंसात सूचना दिली गेली, की "(इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)" हे पाहून ती कंसातली सूचना माझ्यासारख्यांसाठीच आहे, हे मला अगदी स्पष्ट जाणवलं. ऍडमिन 'Yogini Nene', "माझं लिखाण म्हणजे उत्तम साहित्य आहे, असा माझा दावा कधीच नव्हता, मात्र माझ्या प्रवासवर्णनाच्या लेखातला प्रवासवर्णन नावाचा साहित्यप्रकार साहित्य म्हणून तुम्हांला दिसूच नये आणि त्यात फक्त (मी एक पैसाही न घेतलेली) जाहिरात तुम्हांला दिसावी याचं मला सखेद आश्चर्य वाटतं. यावरून मी एक बोध घेतला, की मला साहित्यातलं ओ की ठो काही कळत नाही आणि साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी मला अजून बराच अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळे अपुऱ्या अभ्यासानिशी लिहिलेलय माझ्या 'नाळ' या कथेची लिंकही मी या अभ्यासू ग्रुपमधून डिलीट करत आहे, उगीच माझ्या या कथेचं ठिगळ तुमच्या उत्तम साहित्याविषयी गप्पा मारणाऱ्या ग्रुपमध्ये नको. तुम्ही मला कोणतीही पूर्वसूचना न देता माझ्या पोस्ट्स डिलीट केल्या, त्यामुळे मीही तुम्हांला कोणतीही पूर्वसूचना न देता, तुमच्या ग्रुपमधली महत्त्वाची जागा माझं फालतू मतप्रदर्शन करण्यासाठी वाया न घालवता, या ग्रुपमधून बाहेर पडले आहे आणि मला जे काही मत मांडायचं आहे, ते या ब्लॉगवर मांडलं आहे. आजपर्यंत माझा असा समज होता, की फक्त पेड पोस्टच्याच शेवटी ती जाहिरात आहे, असं स्पष्ट करायचं असतं, पण आता तुमच्यामुळे हेही नव्याने कळलं, की जाहिरात म्हणून जी पोस्ट लिहिलेली नाही, अशाही पोस्टच्या शेवटी, 'ही पोस्ट म्हणजे जाहिरात नाही' हे स्पष्ट लिहायचं असतं. माझ्या अपुऱ्या ज्ञानात ही अमूल्य भर घातल्याबद्दल धन्यवाद! याबद्दल तुमचे कसे आभार मानावे हेच कळत नाही."
- जाहिरात नसूनही जाहिरातवजा पोस्ट्स टाकणारी माजी सदस्य.
No comments:
Post a Comment