आधीचे भाग -
भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, --- भाग १२, --- भाग १३, --- भाग १४, --- भाग १५,
पुढे -
तिथून हॉटेलवर येऊन जेवण करून, थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. मग आम्ही समुद्रिका म्युझियमला भेट देऊन तिथले मोठमोठाले प्रवाळ, पूर्ण वाढ झालेले भलेमोठे शंख, शिंपले आणि जोडशिंपले इत्यादी पाहिले. त्या म्युझियमच्या आवारात एक व्हेल माशाचा सांगाडा ठेवलेला आहे. त्या सांगाड्यामुळे आणि म्युझियममधल्या मोठ्या आकाराच्या फुलपाखरांमुळे आणि शिंपल्यांमुळे ते म्युझियम आम्हांला चांगलंच लक्षात रहायला हवं होतं, पण ते म्युझियम फारच लहान होतं, आम्ही म्युझियमच्या आत शिरलो आणि तिथले प्राण्यांचे नमुने बघत पुढे जायला लागलो, तेवढ्यात तिथून बाहेर पडायचं दार समोर आलं सुद्धा! त्यामुळेच आम्ही त्या म्युझियमला भेट दिल्याचं मला अंधुकसं आठवतंय.
नंतर तिथल्या अॅन्थ्रॉपॉलॉजिकल म्युझियमला भेट देऊन आम्ही अंदमानमधल्या आदिवासी जमाती आणि त्यांच्या जीवनपद्धतीची माहिती करून घेतली. म्युझियम पाहून आम्ही काहीजण तिथल्या खालच्या दालनात बसलो होतो, दालनाजवळच म्युझियममधलं एक दुकान आहे. त्या दुकानात ठेवलेल्या वस्तू बघाव्यात म्हणून मी तिकडे जात होते, तेवढ्यात आमच्या बसच्या क्लीनरने बाहेरून मला हाक मारत विनंती केली, की "सगळ्यांना लवकर निघायला सांगा, नाहीतर नंतर सेल्युलर जेलच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जायला आपल्याला उशीर होईल." वास्तविक आमच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार आम्ही वेळेत सगळी ठिकाणं बघत होतो, त्यामुळे आम्हांला तसा काही उशीर वगैरे झालेला नव्हता. पण तिथून आम्ही आधी सागरिका एम्पोरियममध्ये जाणार होतो आणि त्यानंतर सेल्युलर जेलमध्ये जाणार होतो. जेलपाशी वाहनांच्या गर्दीत बस पार्क करण्यासाठी योग्य जागा मिळावी म्हणून लवकर निघून तिथे वेळेआधी पोहोचण्याची त्याची घाई चालली होती. त्याच्या घाईमुळे मी तिथल्या दुकानात वस्तू विकत घेण्याचा बेत रद्द केला आणि दालनात बसलेल्या बाकीच्यांना तो निरोप सांगितला. मग आम्ही घाईने बाहेर पडलो. मात्र म्युझियमच्या वरच्या मजल्यावर असलेले लोक खाली यायला वेळ लागणार होता, तोपर्यंत उन्हामुळे तहानलेल्या आम्ही तिथल्या शहाळेवाल्याकडून शहाळी घेतली आणि मगच बसमध्ये बसलो. पण म्युझियममध्ये असलेले बाकीचे सगळे लोक येईपर्यंत मध्ये इतका वेळ गेला, की तेवढ्या वेळात माझी म्युझियममधल्या दुकानातली खरेदीही आटोपली असती.
तिथून आम्ही सागरिका एम्पोरियम या शासकीय दुकानात गेलो. या दुकानात आल्यावर मात्र माझी काहीशी निराशा झाली, कारण नॉर्थ बे कोरल बीचवरच्या दुकानात मी जशा मोत्यांच्या आणि पोवळ्यांच्या माळा पाहिल्या होत्या, तशा प्रकारच्या माळा इथे उपलब्ध नव्हत्या. इथे संवर्धित (कल्चर्ड) मोत्यांचे दागिने विकायला होते, पण त्यात विविधता कमी होती. त्यामुळे पाहिलेल्या वस्तू पटकन मनास येईनात. तसंच इथल्या काही वस्तू नॉर्थ बे कोरल बीचवरच्या दुकानातल्या वस्तूंपेक्षा जास्त महाग होत्या. काही स्वस्त वस्तूही होत्या, पण त्यांच्या किंमतीत पंधरावीस रुपयांचाच फरक होता. या दुकानात मोठ्या शिंपल्यांचे सुंदर नाईटलॅम्प विकायला होते, पण घरात आधीच कुठूनकुठून विकत घेतलेले वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर नाईटलॅम्प असल्याने, मी ते मोठ्या शिंपल्यांचे नाईटलॅम्प विकत घेण्याचा बेत टाळला. बाकी दुकानात मोती आणि पोवळ्यांच्या दागिन्यांव्यतिरिक्त, शंखशिंपल्यांच्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वस्तू, शुद्ध खोबरेल तेल, पिशव्या, हॅण्डलूमची जाकीटं आणि इतर कपडे, लाकडी शोभेच्या वस्तू, लाकडी चमचे, लाटणी अशा वेगवेगळ्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. शेवटी ते सगळं बघत, तिथे फिरत हळूहळू एकेक वस्तू विकत घेत मी आणि माझ्या कुटुंबियांनी तिथे खरेदी केलीच.
आमची खरेदी आटोपली, तेव्हाच नेमके तिथले लाईट गेले. बाकीचे काहीजण त्यांच्या विकत घ्यायच्या वस्तू घेऊन काऊंटरपाशी उभे होते, त्यांची बिलं तयार व्हायला वेळ लागणार होता. तितक्या अवधीत आम्ही काहीजण जवळच्या एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊन आलो. आम्ही परत दुकानापाशी आलो, तेव्हा तिथे वीणा वर्ल्डचे पर्यटक आलेले दिसले. आमच्या ग्रुपच्या सगळ्या लोकांची खरेदी आटोपल्यावर आम्ही तिथून निघून सेल्युलर जेलपाशी आलो. आमची बस जेलजवळ थांबली आणि आम्ही उतरल्यावर पार्किंगकरता लांब निघून गेली. जेलच्या समोर असलेल्या उद्यानात काही स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे बसवलेले आहेत. संध्याकाळी त्यांच्यावर रंगीत प्रकाशझोत सोडलेले असतात. उद्यानाजवळच असलेला एक चहावाला पाहिल्यावर आमच्या सगळ्या ग्रुपचा तिथे चहा घेऊन झाला. मग आम्ही काहीजण जेलपाशी रांगेत अगदी पुढे उभे राहिलो. आमच्या ग्रुपमधले काहीजण मात्र समोरच्या उद्यानात नीट फिरून आले. शो चालू व्हायला अजून वेळ होता. तोपर्यंत तिथे वीणा वर्ल्डचे पर्यटक त्यांची दुकानातली खरेदी आटपून यायला लागले होते.
![]() |
संध्याकाळच्या वेळी सेल्युलर जेलचा परिसर हळूहळू दिव्यांनी उजळायला लागला होता. |
अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या साऊंड अॅण्ड लाईट शो साठी आम्हांला एकापाठोपाठ एक आतमध्ये सोडायला सुरूवात झाली. सावरकरांना ज्या इमारतीत ठेवलं होतं, त्या इमारतीसमोरच्या प्रांगणात हा शो होतो. त्यासाठी तिथल्या स्वातंत्र्यज्योतीपासून काही अंतरावर लोकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. खुर्च्यांवर बसल्यावर समोरच्या प्रांगणातली सकाळी पाहिलेली एका कैद्याची शिक्षा भोगण्यासाठी उभी असलेली पाठमोरी प्रतिकृती समोर दिसत होती. ती खास या शो करताच उभी करण्यात आलेली आहे. त्या प्रतिकृतीशेजारी ब्रिटिश न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी एका रिकामी खुर्ची ठेवण्यात आलेली होती. ती प्रतिकृती, तिच्याशेजारची खुर्ची, प्रांगणाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या जेलच्या भिंती आणि प्रांगणातला एका जुनापुराणा वृक्ष हेच त्या शो मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार होते. सगळे लोक आसनस्थ झाल्यावर 'वंदे मातरम्' या गीताचं संगीत ऐकू यायला लागलं आणि लोक आदराने उभे राहिले. काही वेळातच एकजण 'खाली बसून घ्या' असं सांगण्यासाठी आला आणि लोक खाली बसले. 'वंदे मातरम्' चं ते संगीत शो चालू होईपर्यंत वाजतच राहणार होतं. संध्याकाळच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर प्रांगणातले दिवे हळूहळू उजळत होते. सावरकरांच्या कोठडीतलाही दिवा चालू झाला होता. लोक उत्साहाने शो चालू होण्याची वाट पाहत होते. एकेकाळी अनेक कैद्यांनी जिथे प्राणांतिक छळ सोसत, मातृभूमीसाठी रक्त सांडत, पराकोटीच्या वेदना अनुभवल्या होत्या आणि त्यांचा आक्रोश जिथे घुमला होता, तो सेल्युलर जेलचा सध्या सजलेला परिसर आता उत्साही, आनंदी लोकांनी भरून गेलेला होता. काळाची किमया ही अशी अगाध असते. अखेर ठरलेल्या वेळेवर शो चालू झाला. फक्त ध्वनी आणि प्रकाश यांचा वापर करून, काळाचा पट उलगडून दाखवणारा तो शो अप्रतिम, अविस्मरणीय असाच होता. त्याचं शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे. तो अनुभव प्रत्येकाने स्वतःच घ्यायला हवा.
![]() |
शो मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा पुतळा |
![]() |
जेलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या (सर्वात वरच्या) कडेच्या (उजव्या बाजूला असलेल्या) कोठडीतला दिवा लागलेला दिसतोय - हीच ती सावरकरांची कोठडी! |
शो संपल्यावर आम्ही भारावलेल्या मनाने जेलबाहेर पडलो, तेव्हा रात्रीच्या अंधारात समोरच्या उद्यानातले पुतळे प्रकाशाच्या झोतात न्हाऊन निघालेले दिसत होते. लांबवर उभ्या असलेल्या बसपाशी जातांना रस्त्याच्या एका बाजूने खाली खोलवर वसलेल्या घरांमधले दिवे ताऱ्यांसारखे लुकलुकतांना दिसत होते. आता अंदमानमधलं आमचं सगळं स्थळदर्शन आटोपलेलं होतं.पुढे चालत असलेल्या लोकांच्या निळ्या टोप्या शोधत आम्ही बसच्या दिशेने निघालो होतो.
![]() |
शो संपल्यावर आम्ही सेल्युलर जेलबाहेर पडलो, तेव्हा जेलचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात पूर्णपणे नाहून निघाला होता. |
![]() |
जेलसमोरच्या उद्यानातले स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे रंगीत प्रकाशझोतात उजळून निघाले होते, त्यात हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा समोरच होता. |
![]() |
स्वातंत्र्यसेनानी - इंदु भूषण रॉय |
![]() |
स्वातंत्र्यसेनानी - बाबा भान सिंह |
![]() |
रात्रीच्या वेळी जेलसमोरच्या सखल भागात लागलेले दिवे लुकलुकतांना दिसत होते, ते दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं. |
आता हॉटेलवर गेल्यावर थोडी विश्रांती घेऊन मग पार्टीसाठी हॉटेलच्या टेरेसवर जमायचं होतं. टेरेसवर सगळ्यांना बसण्यासाठी गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. बाजूला टेबलं मांडलेली होती. आमच्या पुढ्यात येणाऱ्या वेफर्स, स्टार्टर्स, ज्यूस इत्यादींचा आस्वाद घेत, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी भरलेल्या मोकळ्या आभाळाखाली मोकळ्या टेरेसवर आमच्या ग्रुपचे खेळ रंगले होते. त्यातले काही खेळ देवकुळ्यांनी घेतले, तर काही खेळ गंद्र्यांनी घेतले. मध्येच देवकुळ्यांनी गंद्रे दांपत्याची एक मुलाखतही घेतली. मग पुन्हा खेळ चालू झाले. ट्रीपमधले हे खेळ सगळ्यांना सहज खेळता येतील आणि सगळ्यांनाच खेळावेसे वाटतील असे असले, की खेळांमुळे लोकांचा आनंद अजून वाढतो. पण जर खेळ खेळतांना खेळासाठी एखाद्या व्यक्तीला आवडत नसलेली गोष्ट मनाविरूद्ध करावी लागली, तर त्यामुळे त्या व्यक्तीला ट्रीपमुळे झालेल्या आनंदावर तिच्या खेळातल्या नाराजीचं विरजण पडू शकतं. काळजीपूर्वक निवडलेल्या खेळांमुळे मात्र लोकांच्या आनंदात अजून भरच पडते. खेळाचा आमचा हा शेवटचा दिवस असल्याने आज खेळ जास्त रंगले होते आणि रोजच्यापेक्षा उशीरा संपले होते. त्यानंतर खेळात जिंकलेल्या व्यक्तींना बक्षिसांचं वाटप झालं आणि मग टेरेसवरच आमचं जेवण झालं. काहीजण तिथे रात्री उशीरापर्यंत थांबले होते, पण आम्ही मात्र लवकर खाली आलो होतो.
आम्ही खरेदी केलेल्या वस्तू आणि माझ्या कुटुबियांना खेळात बक्षिसं म्हणून मिळालेल्या वस्तू अशा सगळ्या वस्तू त्यातल्या शंखशिंपले, मोती, पोवळे इत्यादींमुळे आम्हांला एका वेगळ्या बॅगेत भराव्या लागणार होत्या आणि ती बॅग केबिन लगेज म्हणून सोबत बाळगावी लागणार होती. मात्र इतके दिवस तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरून आम्ही जे सगळे मोठमोठे प्रवाळांचे तुकडे गोळा केले होते, ते सगळे आम्हांला हॉटेलमध्येच ठेवून द्यावे लागणार होते. काहीशा जड मनानेच आम्ही ते सामानातून बाहेर काढले. हॉटेलच्या आवारातल्या झाडांच्या आळ्यात काही सुंदर प्रवाळ ठेवलेले मी पाहिले होते, तेही असेच इतर पर्यटकांनी हॉटेलमध्येच ठेवून दिलेले असावेत. सामानाची बांधाबांध करुन झाल्यावर आम्ही निश्चिंत झालो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्यापेक्षा थोडं उशीरा म्हणजे साडेसातला तयार होऊन नाश्त्यासाठी खाली जमायचं होतं.
शेवटच्या दिवशी सकाळी आम्ही रोजच्याप्रमाणे तयार होऊन सांगितलेल्या वेळेच्या आधीच खाली आलो. बहुतेक सगळेजण तिथे स्वागतकक्षात जमल्यावर बर्वेकाकांनी सगळ्यांना योगाबद्दलच्या काही सोप्या टीप्स दिल्या. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो, तर तिथल्या टेबलावरचे तीन ट्रे आम्हांला चक्क रिकामे दिसले. त्या ट्रेमध्ये ठेवायचे पदार्थ तयार होऊन येत आहेत, असं काऊंटरवरच्या माणसाने सांगितलं. पण काहीजणांनी 'तिथे आहेत ते पदार्थ घेऊन खायला सुरूवात करू या' असा विचार करून डिशमध्ये वाढून घ्यायला सुरूवात केल्यावर, सर्वच जण रांगेत उभे राहिले. थोड्या वेळाने तिथे छोले आणि मेथीच्या पुऱ्या आणण्यात आल्या. मेथीच्या पुऱ्या चविष्ट होत्या, पण आधीच बाकीच्या पदार्थांनी पोट भरत आलेलं असल्याने आम्ही फक्त त्या पुऱ्यांची चव पाहण्यापुरती एखादी पुरी घेतली. तेवढ्यात देवेंद्र गंद्र्यांनी घोषणा केली, की "आजच्या शेवटच्या दिवशी देवकुळ्यांनी स्वतः सगळ्यांसाठी साखरभात बनवलेला आहे." हे ऐकल्यावर काहीजणांना असं वाटलं, की 'हे आधी माहिती असतं, तर आम्ही नाश्ता करण्याची एवढी घाई केली नसती.' मी साखरभात खाऊन पाहिला आणि देवकुळ्यांच्या पाककौशल्याला दाद दिली.
नाश्ता आटोपल्यावर आम्ही हॉटेलच्या आवारात थांबलो होतो. तिथे येऊन रूपाली गंद्रेंनी सगळ्या स्त्रियांना मोगऱ्याचे गजरे दिले. एखाद्या समारंभाला जावं, तशा गजरे लावून बहुतेकजणी विमानप्रवासासाठी सज्ज झालेल्या होत्या. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आम्हांला विमानतळावर पोहोचायचं होतं. आमचं गो एअरचं विमान अकरा वाजता सुटून मुंबईला दुपारी तीन वाजता पोहोचणार होतं. पण आमचं विमानातलं दुपारचं जेवण बुक केलेलं नव्हतं. गो एअरच्या आधीच्या अनुभवामुळे विमानातलं जेवण घेण्यासाठी आम्ही कोणी विशेष उत्सुकही नव्हतो. त्यात नुकताच आमचा पोटभर नाश्ता झालेला होता. तेवढ्यात देवेंद्र गंद्र्यांनी पाण्याच्या बाटल्यांबरोबर सगळ्यांच्या हातात खाद्यपदार्थांच्या पिशव्या दिल्या. त्यात पॅक केलेलं सॅण्डविच, टोमॅटो केचपचा एक छोटा पॅक, बिस्कीटांचा एक पुडा आणि अॅपी ज्यूसचा एक पॅक हे सगळं दिलेलं होतं. त्यामुळे विमानातले पदार्थ खाण्याचा काही प्रश्न उरला नव्हता. मग हॉटेल सोडण्याची आमची तयारी चालू झाली. हॉटेलमधल्या कर्मचारी स्त्रिया आमचं सामान खाली आणून ते विमानतळावर घेऊन जाणाऱ्या गाडीत भरत होत्या.
निघण्याची वेळ झाल्यावर आम्ही बसमधून शेवटचा प्रवास करत पोर्ट ब्लेअरच्या 'वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर' पोहोचलो. विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था कडक होती, याची चुणूक आम्हांला लगेच मिळाली. आमचं सामान स्कॅन झाल्यावर त्यातली नेमकी माझी बॅगच अडवली गेली. माझ्या बॅगेत प्रवाळ, शंखशिंपले असं काहीही नव्हतं, तरी माझी बॅग का अडवली गेली असावी याचा मला प्रश्न पडला होता. स्कॅनरवर त्या बॅगेतला कॅमेऱ्याच्या सेलचा चार्जर पाहून तिथल्या अधिकाऱ्याने बॅग अडवली होती. त्या बॅगेत कॅमेऱ्याच्या सेलचा चार्जर आहे याचा खुलासा केल्यावर माझी बॅग पुढे जाऊ देण्यात आली. सामानाची तपासणी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने आमच्या पुढे असलेल्या कोणाची तरी बॅग अडवून त्यांच्या बॅगेतली समुद्रकिनाऱ्यावरून गोळा केलेल्या शंखशिंपल्यांची प्लॅस्टिकची पिशवी त्यांना तिथेच बाहेर काढून ठेवायला लावली होती.
चेक इन झाल्यावर थोड्या वेळाने आमच्या विमानाची उद्घोषणा झाली. आम्हांला विमानापाशी सोडण्यासाठी बाहेर बस उभी होती. आम्हांला रांगेने बसमध्ये सोडलं गेलं. बसमधून उतरल्यानंतर विमानात चढतांना प्रत्येकाच्या जवळच्या केबिन लगेजचे टॅग्ज काळजीपूर्वक तपासण्यात आले. विमानात शिरल्यावर जणू तिथे आत कसला तरी धूर सोडला असावा असा आभास होणाऱ्या हवेच्या वाफा दिसत होत्या. अंदमानमधल्या उष्ण वातावरणामुळे विमानातली ए.सी.ची हवा गरम होत होती आणि त्यामुळे विमानात धूर सोडला असावा, असा आभास होत होता. यावेळेलाही आम्हांला विमानात पंखांच्या मागच्या बाजूलाच जागा मिळाली होती. विमानाने हवेत उड्डाण केल्यावर खिडकीतून दिसेल तेवढं अंदमान आम्ही डोळाभरून साठवून ठेवत होतो. या परतीच्या प्रवासात गो एअरच्या विमानातल्या वस्तू विक्रीच्या उपक्रमाला उदार आश्रय देत काहीजणांनी विमानात वस्तू विकत घेतल्या. विमान चेन्नईला थांबलं, तेव्हा कानडे कुटुंबिय सगळ्यांचा निरोप घेत चेन्नईलाच उतरले. पुढच्या काही दिवसांत ते चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसराची सफर करणार होते. चेन्नईत पुन्हा एकदा विमानातल्या सर्व प्रवाशांच्या बोर्डींग पासचं आणि वरच्या कप्प्यांमध्ये ठेवलेल्या सामानाचं व्यवस्थित चेकींग झालं. तिथून उड्डाण करून विमान मुंबईला पोहोचलं आणि विमानातून उतरल्यावर सगळ्यांना सरकत्या पट्ट्यावरून येणारं आपलं सामान घेण्याची घाई झाली. आता घरी परतण्याचे वेध लागलेल्या सगळ्यांनी पटापट एकमेकांचा निरोप घेत टॅक्सी ठरवण्यासाठी धाव घेतली. टॅक्सीतून थेट घराच्या दारापाशी येतांना ही अविस्मरणीय ट्रीप संपल्याची जाणीव होत होती, तशीच घरी परतण्याची ओढही लागली होती.
नंतर ट्रीपचे फोटो पाहिल्यावर सगळ्यांकडून फोटो अणि फोटोत दिसणारा अंदमानचा परिसर आवडल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या. ज्यांची मला या ट्रीपमध्ये आठवण झाली होती, त्यांच्याही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्यावर, अंदमानचं सौंदर्य त्यांना माझ्या फोटोतून का होईना पण अनुभवता आलं, याचं मला समाधान वाटलं. आता जर त्यांच्यापैकी कोणाला अंदमानला जावंसं वाटलं, तर मला अंदमान जेवढं सुंदर आणि स्वच्छ दिसलं होतं, त्यापेक्षाही जास्त नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं, स्वच्छ आणि आवश्यक त्या सुविधांनी युक्त अंदमान त्यांना दिसावं, हीच माझी इच्छा आहे. अंदमानचा प्रदेश म्हणजे द्वीपसमूह असल्याने तिथे विमानाने आणि बोटीने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादेत राहते, तसंच तिथे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा नियमांमुळे कोणत्याही ठिकाणी लोकांची खूप गर्दी होत नाही, त्यामुळे तिथे स्वच्छताही राखली जाते आणि त्या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्यही बऱ्यापैकी अबाधित राहतं. यापुढेही अंदमानचा विकास करतांना तिथलं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहील आणि पर्यटकांची संख्या मर्यादित राहील याची काळजी घेतल्यास अंदमान अधिकच सुंदर आणि सुरम्य बनेल, याबद्दल मला काहीही शंका नाही.
अंदमानच्या ट्रीपनंतर हिमश्रीचा फीडबॅक मागणारा मेसेज आला अणि एकदोन सूचनांचा समावेश असलेला माझा फीडबॅक दिल्यावर लगेच त्याचं उत्तरही आलं. मी आधी कधी इतर ट्रॅव्हल कंपन्यांसोबत प्रवास केला नसल्याने हिमश्रीची इतर कोणाबरोबर तुलना करू शकणार नाही, मात्र इतकं निश्चित सांगू शकेन, की आमचा प्रवास तसा चांगला झाला. आम्हांला प्रवासात कोणतीही अडचण आली नाही आणि कशाचीही कमतरता जाणवली नाही. आमच्या ग्रुपमधले सगळे लोक हळूहळू का होईना पण सगळ्यांमध्ये मिसळत गेले. एकमेकांशी मिळूनमिसळून वागणाऱ्या सगळ्या लोकांमुळे ही ट्रीप घरगुती ट्रीपसारखीच वाटत होती. ट्रीपमध्ये रेंगाळत फिरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही अंदमानमधली बहुतेक ठिकाणं बघतांना कुठे घाई झाली नाही आणि ती ठिकाणं व्यवस्थित पाहिल्याचं समाधान मिळालं. या ट्रीपमध्ये देवेंद्र गंद्रे आणि रूपाली गंद्रे हे दोघेहीजण सगळ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवत होते. या लहानशा ट्रीपमध्ये आम्हांला अंदमानच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता आला, तिथल्या प्रवाळांचं सौंदर्य अनुभवता आलं, तसंच सेल्युलर जेलची संपूर्ण सफर करायला मिळाली आणि हे सुरम्य अंदमान त्याच्या सुंदर आठवणींसहित कायमचं माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ठाण मांडून बसलं.
खरंतर मी ट्रीपहून परत आल्यावर शक्य तितक्या लवकर हे प्रवासवर्णन लिहायला घेतलं होतं, पण काही अपरिहार्य कारणांमुळे या प्रवासवर्णनाचे भाग एकापाठोपाठ एक प्रकाशित करतांना अधिकाधिक उशीर होत गेला. यातला तपशील लिहितांना अनावधानाने एखादी गोष्ट राहून गेली असण्याचीही शक्यता आहे, पण ट्रीपला आलेले कोणी त्याचा राग मानून घेणार नाहीत, ही अपेक्षा! तसंच वाचकांनाही माझ्या प्रवासवर्णनाचा उपयोग व्हावा म्हणून काही ठिकाणी मुद्दाम तपशीलवार वर्णन केलं आहे. या माझ्या प्रवासवर्णनाचा कोणाला प्रवासासाठी उपयोग झाल्यास, मला निश्चितच त्याचा आनंद वाटेल, हे सांगून या प्रवासवर्णनाची इथे सांगता करते आहे.
No comments:
Post a Comment