आधीचे भाग -
भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, --- भाग १२, --- भाग १३,
पुढे -
मॅक मरीना बोटीत येऊन, पुन्हा एकदा फुगलेली लाईफ जॅकेट्स घालून आम्ही नॉर्थ बे कोरल बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. या बोटीतही सकाळी पोर्ट ब्लेअरहून निघतांना जे प्रवासी बसलेले होते, फक्त तेच प्रवासी बोटीतून पुढे नॉर्थ बे कोरल बीचला जाऊन तिथून परत पोर्ट ब्लेअरला येणार होते. मध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रवाशाला या बोटीत प्रवेश मिळणार नव्हता. आम्ही सगळे बोटीत परत आल्यावर तिथे पुन्हा एकदा विचारणा झाली, की "कोणकोण स्कूबा डायव्हिंग करणार आहे?" ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं होतं, त्यांना बोटीमध्येच आगाऊ पैसे भरावे लागणार होते. मग ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं होतं, त्यांनी तिथेच बोटीत त्याचे पैसे भरले. इथे मात्र स्कूबा डायव्हिंगसाठी माणशी ३००० रुपये भरावे लागले. आधीच्या तुलनेत इथे दरात कसलीही घासाघीस होऊ शकली नाही.
नॉर्थ बे कोरल बीचच्या अगदी किनाऱ्यापर्यंत मोठमोठे प्रवाळ वाढलेले असल्याने, तिथला किनारा खडकाळ आहे. त्यामुळे त्या किनाऱ्यापासून पुढे थेट खोल पाण्यापर्यंत तरंगणारे ठोकळे (फ्लोटर्स) टाकून, ते एकमेकांशी जोडून त्यांचा पूल तयार केलेला आहे. आमची बोट त्या पुलाच्या एका टोकाजवळ येऊन खोल पाण्यात उभी राहिली आणि आम्ही त्या तरत्या पुलावर उतरलो. तिथून ठोकळे जोडून बनवलेल्या, जरा जास्तच उंच असलेल्या दोन पायऱ्या उतरून आम्ही त्या पुलाच्या मुख्य भागावरून किनाऱ्याकडे निघालो. पुलाच्या ज्या भागानजिक छोट्या बोटी उभ्या राहतात, तिथे त्या पुलाला कठडे नाहीत. कठडे नसलेल्या भागातून एकदम जास्त माणसं चालत गेली, तर तिथले तरंगते ठोकळे जरा हलायला लागतात. त्यामुळे तिथे तोल सांभाळत, एकापाठोपाठ एक असं पुलाच्या मधल्या भागातून चालत जावं लागतं. अर्थात झुलत्या पुलाचा तो भाग चारसहा फुटांचाच आहे आणि तिथला समुद्रही उथळ असल्याने तशी त्याची फारशी भीती वाटून घेण्याची गरज नाही. असो. इथल्या किनाऱ्यावर बांबू आणि झावळ्या वापरून एक प्रवेशद्वार उभं केलेलं आहे आणि लोकांच्या जवळच्या प्रवेश पावत्या तपासूनच इथेही लोकांना बीचच्या अंतर्भागात प्रवेश दिला जातो.
प्रवेशद्वार म्हणून उभारलेल्या नारळाच्या झावळयांच्या मंडपातून आत शिरल्यावर आम्हांला सगळ्यात प्रथम जाणवल्या त्या उष्ण हवेच्या झळा! या बीचवर झाडं अजिबात नसल्याने, तसंच बीचच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरच्या काळ्या कातळामुळे तिथे वातावरणातली उष्णता चांगलीच जाणवत होती. मंडपापासून काही फूट अंतरावर असलेल्या एका टपरीमध्ये लाकडी बाकं टाकून स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सोय केली होती. (या बीचवर सी वॉकही केला जातो.) स्कूबा डायव्हिंगच्या टपरीसमोर एक कुल्फी विकणारा माणूस बसला होता. तिथल्या उष्ण वातावरणात त्याच्याकडच्या त्या थंडगार कुल्फीचा आस्वाद घेत आम्ही उभे होतो, तेवढ्यात 'ग्लास बॉटम बोटीतून आमच्या ग्रुपमधले कोणकोण येणार आहेत?', याची चौकशी करण्यासाठी तिथे एक माणूस आला.
![]() |
स्कूबा डायव्हिंग |
त्या दिवशी आमच्या ग्रुपमधले सगळेजण ग्लास बॉटम बोटीतून सफर करणार होते. त्यातले स्कूबा डायव्हिंगला जाणारे लोक मात्र त्यांचं स्कूबा डायव्हिंग झाल्यावर ग्लास बॉटम बोटीतून फिरणार होते. इथेही ग्लास बॉटम बोटीतून सफर करण्यासाठी माणशी ३०० रुपये दर होता. आम्ही आठजण आमच्या ग्लास बॉटम बोटीची वाट पाहत प्रवेशद्वाराजवळच्या मंडपात उभे राहिलो. बोट आल्यावर आम्ही तरंगत्या, झुलत्या पुलावरून चालत तिकडे गेलो. ही बोट लहान असल्याने जरा उथळ पाण्यात उभी होती. बोटीत बसल्यावर इथेही आम्हांला घालण्यासाठी फुगलेली लाईफ जॅकेट्स दिली गेली. या बोटीवर कोणतंही आच्छादन नव्हतं, त्यामुळे इथे आम्हांला एक काळ्या रंगाची प्लॅस्टिकची शीट दिली गेली. बोट चालवणारे दोघेजण सोडून, बाकी आम्ही सर्वांनी मिळून ती प्लॅस्टिकची शीट आमच्या डोक्यावरून ओढून घेतली आणि आमच्या पायाजवळची काच झाकली गेली. त्या प्लॅस्टिकच्या शीटखाली आम्हांला प्रचंड उकडत होतं, पण काही इलाज नव्हता.
काचेवर येणारा प्रकाश बंद झाल्याबरोबर आम्हांला काचेखालचं दृश्य लख्ख दिसायला लागलं. काही मोठे मासे आमच्या बोटीच्या काचेच्या खालच्या भागाला अगदी लगटूनच फिरत होते आणि काही शैवालं त्यांच्या आसपास तरंगत होती. आमची चाहूल लागल्यावर ते मासे थोडे दूर झाले आणि बोट चालू झाली. एलिफंटा बीचवरच्या आमच्या सफरीत आम्ही मोठ्या माशांचे विविध प्रकार पाहिले होते. इथे नॉर्थ बे कोरल बीचवर मात्र माशांचे प्रकार कमी होते. त्यामानाने रंगीबेरंगी प्रवाळांचे भरपूर प्रकार समुद्राखाली दिसत होते आणि तेही संख्येने विपुल होते. तसंच रंगीबेरंगी प्रवाळांवर विसावलेले समुद्र काकडी (सी कुकुंबर), सी अर्चिन, तारामासा (स्टारफिश) असे वेगवेगळे जलजीव वारंवार दिसत होते. काही ईल मासेही दिसले. चारपाच प्रकारचे छोटे मासे कळपाने फिरत होते. तसंच प्रवाळांमध्ये 'ब्रेन कोरल्स' या प्रकारचे प्रवाळ तर इतके भरपूर होते, की बोट काही सेकंद फक्त ब्रेन कोरल्सच्या भागातूनच फिरत होती. समुद्राखालचं हे दृश्य बघण्यात आम्ही इतके गुंग झालो होतो, की वाऱ्याने सगळ्यांच्या हातातली प्लॅस्टिकची शीट उडतेय, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही. काचेखालचं दृश्य दिसणं एकदम बंद झालं आणि आम्हांला जाणवलं की आमच्या डोक्यावरून प्लॅस्टिकची शीट उडून चालली आहे. मी ती शीट झटकन पकडली आणि आम्ही सर्वांनी मिळून ती पुन्हा एकदा आमच्या डोक्यावरून ओढून घेतली. यावेळी आम्ही ती घट्ट धरून ठेवली होती. त्यानंतर परत प्रवाळ, मासे, शैवालं, समुद्र काकडी (सी कुकुंबर), सी अर्चिन, तारामासा (स्टारफिश) असे समुद्राखालचे विविध जलजीव पाहत आम्ही आमची आनंददायी सफर पूर्ण केली आणि बीचवर परतलो.
आमच्या आठजणांच्या ग्रुपनंतरच्या ग्लास बॉटम बोटीच्या सफरीत घेतलेल्या व्हिडिओचा हा काही भाग!
बीचवर पर्यटकांना बसण्यासाठी नारळाच्या वाळलेल्या झावळ्या वापरून अजून एक मोठा मंडप उभा केला होता. त्या मंडपात एका वेळी पुष्कळ लोकांना बसता यावं म्हणून बांबू वापरून चारपाच रांगांमध्ये बांबूची लांबलचक बाकं तयार केलेली होती. आम्ही त्या मंडपात विसावलो खरे, पण तिथल्या उष्णतेने आम्ही हैराण झालो होतो आणि त्यामुळे सारखं पाणी पीत होतो. त्या दिवशी आमचं दुपारचं जेवण म्हणून आम्हांला पॅक्ड लंच देण्यात येणार होता. या लंचमध्ये पुलाव, रायतं आणि रसगुल्ला अशा मोजक्याच पदार्थांचा समावेश होता. पण त्या पॅकमधला पुलाव पोटभर जेवण होईल असा भरपूर दिलेला होता. या पुलावातही बाकीच्या भाज्यांसोबत फरसबी (फ्रेंच बीन्स) आणि फरसबी सारखेच दिसणारे मिरचीचे तुकडे घातलेले असल्याने, पुलाव नीट बघून खावा लागत होता. पर्यटकांच्या जवळच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा टाकण्यासाठी तिथे मंडपातच दोनतीन कचराकुंड्या ठेवलेल्या होत्या.
नॉर्थ बे कोरल बीचवरची टॉयलेट्स एलिफंटा बीचवरच्या टॉयलेट्स प्रमाणेच सिमेंटच्या कोब्यावर, पत्रे उभारून बनवलेली होती. इथेही बाहेर ठेवलेल्या पिंपातलं पाणी भरून आतमध्ये न्यावं लागत होतं. एका टोकाला बांधलेल्या या टॉयलेट्स जवळ आवश्यक असणारी कचराकुंडी मात्र तिथे नव्हती. त्यामुळे टॉयलेट्सच्या शेजारच्या खडकाळ किनाऱ्यावर काहीजणांनी फेकलेल्या तीनचार मिनरल वॉटरच्या बाटल्या, कागद, खाद्यपदार्थांची काही वेष्टनं पडलेली दिसत होती. तिथेही एक कचराकुंडी ठेवली असती, तर हा कचरा दिसला नसता आणि समुद्रकिनारा स्वच्छ राहिला असता.
आमची मॅक मरीना बोट आम्हांला नेण्यासाठी तीन वाजता येणार होती. पण आमच्यापैकी बहुतेकांचं स्कूबा डायव्हिंग आणि ग्लास बॉटम बोटीतली सफर दोन्हीही करून झालं होतं आणि नंतर जेवणही झालं होतं. त्यानंतर काहीजण समुद्रावर पोहायला गेले होते. पण किनाऱ्यापर्यंत अगदी जवळ आलेल्या प्रवाळांच्या खडकाळ रांगांमुळे पोहोण्यासाठी पुरेसं पाणीच नाही, म्हणून ते परत आले होते. आता आमच्यापाशी भरपूर वेळ होता. आमच्या मंडपाच्या मागच्या बाजूला रांगेने विक्रेत्यांची दुकानं होती. त्यातले काहीजण कपडे विकत होते, तर काहींच्या दुकानात शोभेच्या वस्तू, मोती आणि पोवळ्यांचे दागिने विक्रीला ठेवलेले होते.
"अंदमानमध्ये 'सागरिका एम्पोरियम' या शासकीय दुकानातून खात्रीशीर मोती आणि पोवळ्यांच्या दागिन्यांची खरेदी करता येईल, तिथे ते थोडे महाग असतील, पण बाहेरच्या खाजगी दुकानातून केलेल्या मोती आणि पोवळ्यांच्या खरेपणाची खात्री देता येणार नाही," असं आम्हांला गंद्र्यांनी आधीच सांगितलेलं असल्याने, आम्ही तोपर्यंत अशी कोणतीच खरेदी केलेली नव्हती. पण आता भरपूर वेळ हाताशी असल्याने जरा चक्कर मारून दुकानात काय काय आहे, हे तरी बघू या, अशा विचाराने आम्ही तिकडे वळलो.
सुरूवातीला काही कपड्यांच्या दुकानात डोकवून मग आम्ही इतर दुकानांकडे वळलो. तिथे शंखशिंपल्यांच्या शोभेच्या वस्तूंबरोबरच मोत्यांचे दागिनेही विकायला ठेवलेले होते. आम्हांला मोत्यांच्या माळा न्याहाळतांना पाहून लगेच तिथले विक्रेते मोत्यांच्या अस्सलपणची खात्री पटवण्याकरता फ्लेम टेस्ट, आरशाच्या काचेवर मोती रगडून दाखवणे इत्यादी परिक्षणं करून दाखवायला लागले. तुलनेसाठी त्यांच्याकडे मोत्यांसारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या मोत्यांच्या माळाही ठेवलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या माळांमधले मोती आणि अस्सल म्हणून दाखवत असलेले मोती अशा दोन्ही प्रकारांवर ते परिक्षणं करून दाखवत होते. फ्लेम टेस्टमध्ये मोत्यांच्या माळेजवळून सिगारेट लायटरची जळती ज्योत नेल्यावर कृत्रिम मोत्यांवरचं आवरण काही सेकंदातच जळायला लागतं, तर अस्सल मोत्यांना तेवढ्या अवधीत काही होत नाही. अस्सल मोत्यांना आरशावर रगडलं तर त्यांचा बारीक चुरा निघालेला दिसतो, मात्र कृत्रिम मोत्यांना आरशावर रगडलं, तर त्यांचा असा चुरा निघत नाही. धारदार पात्याने मोत्यांच्या माळेवर घासलं, तर कृत्रिम मोत्यांची सालं निघतात, मात्र अस्सल मोत्यांची अशी सालं निघू शकत नाहीत. अशा प्रकारची ती परीक्षणं होती. त्यावेळी मी तिथली आठदहा दुकानं नुसती तिथल्या वस्तू बघण्यासाठी म्हणून पालथी घातली. प्रत्येक दुकानात आम्हांला ती परिक्षणं दाखवली गेली. मला मोती हाताळण्याचा जेवढा अनुभव होता, त्या अनुभवावरून तिथले विक्रेते अस्सल म्हणून जे मोती दाखवत होते, ते अस्सलच पण संवर्धित (कल्चर्ड) मोती असावेत असं मला वाटत होतं.
एका दुकानात तिथला दुकानदार आम्हांला मोती दाखवत असतांना एक बाई तिथे आली आणि फटकन त्या दुकानदाराला म्हणाली, की "हे काही अस्सल मोती नाहीत." त्यावर त्या दुकानदाराने लगेच तिला, "तुमच्या कानातल्याचे मोती खरे आहेत, ते कानातलं माझ्या हातात द्या, मी ते कोणते मोती आहेत, ते सांगतो." असं सुनावल्यावर ती बाई गप्प झाली. मग मी तिला मुद्दाम, "तुम्हांला मोत्यांमधलं खरंखोटं कळतं का?" असं विचारल्यावर तिने, "इथल्या मोत्यांबद्दल मला काही सांगता येणार नाही." असं सांगितलं, पण तिला त्या मोत्यांबद्दल शंका वाटत असावी असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. मला मात्र दुकानदाराने दाखवलेले मोती संवर्धित (कल्चर्ड) प्रकारचे आहेत, असं निश्चित वाटत होतं.
मग मी त्या दुकानदाराला प्रश्न विचारला, की "माझ्या हातात दिलेले मोती कोणत्या प्रकारचे आहेत?" त्यावर त्याने उत्तर दिलं, की "हे अस्सलच मोती आहेत." मी त्याला म्हंटलं, की "मोत्यांमध्ये प्रकार असतात, जसे की, बसरा मोती वगैरे. तसे हे कोणत्या प्रकारचे मोती आहेत?" मी हे विचारतांना, मला पटकन आठवलं म्हणून बसरा मोत्यांचं नाव घेतलं होतं. पण दुकानदाराने तोच धागा पकडून मला लगेच बसरा मोत्यांसारखे पसरट गोल आकाराचे तीन मोती बसवलेलं एक ब्रेसलेट दाखवलं. मघाशी शंका घेणारी ती बाई तिची खरेदी आटपून निघाली होती. पण साडेचारशे रुपयांचं ते बसरा मोत्यांचं ब्रेसलेट पाहून ती लगेच मागे फिरली. त्या दुकानदाराकडे तो ब्रेसलेटचा एकच पीस शिल्लक होता. त्या बाईने आम्हांला ते ब्रेसलेट घ्यायचं आहे का, याची चौकशी केली. आम्ही ते ब्रेसलेट घेत नाही, हे पाहून लगेच तिने ते ब्रेसलेट खरेदी केलं आणि हातात चढवलं. मघाशी मोत्यांच्या खरेपणाबद्दल शंका घेणाऱ्या त्या बाईचे विचार इतक्या उत्स्फूर्तपणे बदललेले पाहून मी अवाक झाले.
तोपर्यंत दुकानात आलेल्या अजून एका बाईने पोवळ्यांबद्दल विचारलं होतं आणि दुकानातली विक्रेती तिला मंगळसूत्रातली पोवळी दाखवत होती. या दुकानात पोवळी विकली जातात, हे पाहून मुद्दाम मी त्या दुकानाचं रजिस्टर्ड सर्टिफिकेट बघायला मागितलं आणि दुकानदाराने ते मला बघायलाही दिलं. मग त्याने मोत्यांच्या माळांबरोबर त्याच्या म्हणण्यानुसार लाल पोवळ्याच्या असलेल्या माळाही दाखवल्या. मोत्यांच्या बाबतीत मी निश्चिंत होते, मात्र त्या पोवळ्यांच्या माळांकडे बघून मला त्यांच्या खरेखोटेपणाबद्दल कोणतंही अनुमान बांधणं शक्य नव्हतं. पण माळांची किंमत फार नसल्याने, त्या माळा खऱ्या पोवळ्याच्या नसतील, तरी नुसत्या शोभेच्या माळा म्हणून विकत घेण्यासारख्या होत्या. मग मी त्या दुकानदाराला, "ह्या पोवळ्याच्या माळा विकत घेतल्या, तर आम्हांला विमानतळावर अडवलं जाऊन काही अडचण येणार नाही, ना?" हे विचारून घेतलं. त्यावर त्याने, "मी तुम्हांला पावती देईन, ती तिथे दाखवण्यासाठी तुमच्याजवळच्या सामानात वरती ठेवा. तशी तुम्हांला काही अडचण येणार नाही, पण कोणी अडवलंच तर सोबत दिलेल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डवरच्या नंबरवर फोन करा." असं सांगून आम्हांला आश्वस्त केलं. मग एकदाची आमची खरेदी पार पडली. (तिथे खरेदी केलेल्या मोत्यांना आणि पोवळ्यांना अजून एखाद्या ओळखीच्या जवाहिऱ्याकडून पारखून घ्यायचं आहे. पण नेहेमी नवरत्नं पाहण्यात असणाऱ्या एक व्यक्तीने मला, ते खरेदी केलेले मोती अस्सलच पण संवर्धित (कल्चर्ड) प्रकारचे असून, लाल पोवळीही अस्सल आहेत, असं खात्रीने सांगितलं आणि माझी खरेदी वाया गेली नाही, याची ग्वाही दिली.)
अशा प्रकारे चांगला तासभर तरी आम्ही तिथल्या दुकानांमध्ये फिरून खरेदी करण्यात घालवला होता. आम्ही मंडपात आलो, तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या बाकीच्या लोकांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. मग सगळेजण तिथे आहेत, हे पाहून देवेंद्र गंद्रेंनी सगळ्यांना पुन्हा एकदा आपापला परिचय करून द्यायला सांगितला. एव्हाना ग्रुपमधल्या बऱ्याच जणांशी आमची ओळख झालेली होती. पण ज्यांच्याशी जास्त बोलण्याची संधी मिळाली नव्हती, त्या झुनझुनवाला, (अजून एक) कुलकर्णी, प्रधान, क्षीरसागर कुटुंबियांचीही या निमित्ताने नीट ओळख झाली. शेवटच्या राहिलेल्या सातआठजणांची ओळख करून देण्याच्या आधीच आमची बोट आली असल्याची उद्घोषणा झाली आणि आम्हांला बीचच्या प्रवेशद्वारापाशी बोलावलं गेलं.
मग पुन्हा एकदा तिथल्या तरंगत्या, झुलत्या पुलावरून जात, तिथल्या ठोकळ्यांच्या दोन उंच पायऱ्या चढून आम्ही मॅक मरीना बोटीत शिरलो आणि फुगलेली लाईफ जॅकेट्स घालून सीटवर दाटीने बसलो. आमचा प्रवास संपवून आम्ही जेव्हा पोर्ट ब्लेअरमधल्या जेट्टीवर उतरलो तेव्हा तिथून बाहेर पडतांना, तिथल्या समुद्राच्या किनाऱ्याजवळच्या पाण्यात सी अर्चिन आणि समुद्र काकडी (सी कुकुंबर) या जलजीवांना पाहून मला आश्चर्य वाटलं. थोडं पुढे गेल्यावर तिथला वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिसला. त्या कॉम्प्लेक्सच्या पाण्यातही ते जलजीव होते. आजचं स्थळदर्शन संपलं, या विचाराने आधीच आम्ही काहीजण मागे रेंगाळलो होतो, त्यात त्या कॉम्प्लेक्समधल्या जलजीवांना न्याहाळत असलेल्या आम्हांला पाहून, मागून येणाऱ्या रूपाली गंद्रेंनी, "चला. चला." अशी घाई सुरू केली, कारण त्या दिवशीच्या कार्यक्रमपत्रिकेत नसलेलं अजून एक ठिकाण म्हणजे 'फिशरीज म्युझियम' आम्हांला आता बघायचं होतं. आम्ही तिथे जायच्या आत ते म्युझियम बंद होईल, की काय याची त्यांना धास्ती वाटत होती.
मग आम्ही म्युझियममध्ये गेलो. तिथे अंदमानच्या समुद्रात आढळणारे विविध प्रकारचे मासे, प्रवाळ, इतर जलजीव, त्यांचे शंखशिंपले हे सगळं निवांतपणे बघत आमची म्युझियमची सफर आटोपली, तरी म्युझियम बंद व्हायची वेळ झालेली नव्हती. म्युझियमच्या बाहेर एक चहावाला आम्हांला चहा देण्यासाठी त्याची सायकल लावून थांबलेला होता. चहा घेऊन मग आमच्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या बसने आम्ही हॉटेलकडे निघालो.
संध्याकाळी थोडी विश्रांती घेऊन, खेळ खेळण्यासाठी आम्ही रात्री लवकर खाली आलो. काही मिनिटांनी देवकुळे चक्क रेशमी सोवळं (कद) नेसून आणि झब्बा घालून तिथे अवतरले आणि त्यांनी सर्वांची दाद मिळवली. त्या दिवशीच्या खेळाचं आयोजन करण्यासाठी देवकुळे आणि बनसोडे यांना काहीजणांच्या मदतीची आवश्यकता होती. तेव्हा त्यांना मदत करण्यात माझ्या आत्यानेही सहभाग घेतला होता आणि एका नव्या खेळाचं आयोजन केलं होतं. नंतर आदल्या दिवशीप्रमाणे देवकुळे आणि बनसोडे या दोघांनी मिळून सगळ्यांचे खेळ घेतले होते. या वेळी निवडलेला पत्त्यांचा खेळ जास्त इर्ष्यापूर्ण होता. या खेळातही माझ्या काही नातेवाईकांना आणि घरातल्या एका व्यक्तीला बक्षिसं मिळाली. ही बक्षिसंही आधीच्या बक्षिसांप्रमाणेच विचारपूर्वक निवडून आणलेली होती. त्यानंतर नातूकाकांनी सगळ्यांना एक कोडं घातलं. त्या कोड्याचं उत्तर देणाऱ्या व्यक्तिलाही हिमश्रीतर्फे बक्षीस देण्यात येणार होतं. अशाप्रकारे आमचे खेळ जरा जास्तच रंगले होते आणि रात्रीच्या जेवणाला उशीर होत होता. मग खेळ आवरता घेत, आमची जेवणं झाली आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही बाहेर एक चक्कर मारून आलो.
No comments:
Post a Comment