आधीचे भाग -
भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११,
पुढे -
आम्ही त्या दिवशी हॉटेल किंग्डम सोडणार असल्याने, आमच्या खोल्यांच्या चाव्या सकाळीच हॉटेलच्या काऊंटरवर जमा केलेल्या होत्या. पण आता एलिफंटा बीचवरुन हॉटेलमध्ये परत आल्यावर, आमच्या ग्रुपच्या बऱ्याचशा लोकांना आंघोळी करायच्या असल्याने त्यासाठी काही खोल्या उघडून दिल्या होत्या. फ्रेश झाल्यावर सगळ्यांची जेवणं झाली आणि मग परतीच्या मॅक क्रूझ बोटीची वेळ होईपर्यंत बरेचजण स्वागतकक्षात आणि हॉटेलच्या बगिच्यात गप्पा मारत थांबले. आदल्या दिवशीच्या सी.डी.च्या अनुभवामुळे पुन्हा काहीजण त्यांच्या नवीन सी. डी. काऊंटरवरच्या कॉम्प्युटरवर चेक करून घेत होते. मग हॉटेलमध्ये वायफायची सोय आहे, का याची सहज चौकशी केल्यावर तिथल्या मॅनेजरने सांगितलं, की "वायफायची सोय आहे. पण आम्ही कोणाला वायफायचा पासवर्ड देत नाही. ज्यांना वायफाय वापरायचं आहे, त्यांनी त्यांचा मोबाईल आमच्याकडे द्यावा, मग आम्ही त्यात पासवर्ड टाकून देऊ." मी भारतातल्या इतर ठिकाणच्या हॉटेलमध्ये लोकांना सहजपणे वायफायचा पासवर्ड दिला जात असलेला पाहिलेला असल्यामुळे, मॅनेजरचं हे बोलणं मला थोडं विचित्र वाटलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं, की बेटाची सुरक्षा लक्षात घेऊन हे असे नियम केलेले असावेत. (नंतर पोर्ट ब्लेअरवरच्या आमच्या हॉटेलमध्येही आम्हांला असंच सांगितलं गेलं.)
दुपारी मॅक क्रूझ बोटीची वेळ होत आल्यावर आम्ही टॅक्सीने धक्क्यावर आलो. तिथे पुन्हा ओळखपत्रांची तपासणी होऊन आम्हांला तिकीटं दिली गेली. यावेळी आमची तिकीटं खालच्या मजल्यावरच्या प्रीमियम क्लासची होती. तिथल्या सीट डिलक्स क्लाससारख्याच आरामशीर होत्या, फक्त तिथे खाद्यपेयांची पाकीटं पुरवली जात नव्हती. आमची नुकतीच जेवणं झालेली असल्याने, आम्हांला त्याची गरजही नव्हती. यावेळी मी कमी हेलकावे जाणवणाऱ्या बोटीच्या मधल्या भागात बसले होते. परतीच्या प्रवासात, बोटीवरच्या टी.व्ही.वर संकटसमयी लाइफ जॅकेट कसं वापरायचं याच्या प्राथमिक सूचना दिल्यानंतर, आठवणीने आदल्या दिवशीचा दाखवलेला कार्यक्रम न दाखवता दुसरा कार्यक्रम दाखवण्यात आला. आमचा प्रवास संपून आम्ही धक्क्यावर उतरलो, तेव्हा अंधार पडला होता. तिथून बाहेर पडतांना वाटेत समुद्राला येऊन मिळणाऱ्या एका जलप्रवाहाचा घाणेरडा वास आला, मानवनिर्मित घाण त्या प्रवाहात मिसळली होती, हे निश्चित जाणवत होतं. पण मुंबईच्या तुलनेत ती घाण खूपच कमी प्रमाणात होती. आत्तापर्यंत आम्ही अंदमानची सुंदरता फक्त पाहिली होती, आता तिथली जलप्रदूषण करणारी घाण अनुभवण्याची ती पहिली आणि शेवटचीच वेळ होती.
धक्क्याबाहेर संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही जवळच उभ्या असलेल्या आमच्या बसमधून पोर्ट ब्लेअरच्या हॉटेल एन्. के. इंटरनॅशनलमध्ये परत आलो. यावेळी सगळ्यांना आधीच्याच खोल्या परत दिल्या गेल्या होत्या. हॉटेलच्या एका खोलीत लावून ठेवलेलं आमचं सामान तिथले कर्मचारी कधी घेऊन येतात याची आम्ही वाट पाहत होतो, पण रूपाली गंद्रेंनी आम्हांला आश्वस्त केलं, की "सामानासाठी तुम्ही इथे थांबायची गरज नाही. हॉटेलचे कर्मचारी तुमचं सामान घेऊन तुमच्या खोलीवर येतील." त्याप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांनी आमचं सामान अचूकपणे आमच्या खोल्यांमध्ये आणून दिलं. तसंच आम्हांला हेही सांगितलं गेलं, की "ज्या कोणाला त्यांचे कपडे धुवून वाळत टाकायचे आहेत, ते त्यांचे कपडे गॅलरीच्या कठड्यांवर वाळत घालू शकतात." त्यामुळे मोठीच सोय झाली आणि त्यादिवशी बहुतेकांच्या खोल्यांसमोरच्या गॅलरीच्या कठड्यांवर कपडे वाळत पडले.
त्यादिवशी रात्री सगळ्यांना थोडं आधीच भोजनकक्षात बोलावलं गेलं होतं. गंद्रेंचे मित्र देवकुळे आणि बनसोडे यांनी सगळ्यांसाठी काही खेळांचं आयोजन केलं होतं. खेळ खेळण्यात वेळ कसा निघून गेला, ते कळलंच नाही. खेळात जिंकलेल्या लोकांना बक्षिसं म्हणून ज्या वस्तू देण्यात आल्या, त्या शंखशिंपल्यांच्या आणि बाकीच्या सुंदर वस्तू काळजीपूर्वक निवडून आणलेल्या होत्या. त्याशिवाय अंदमानचा नकाशा असलेला एक टीशर्टही बक्षीस म्हणून दिला गेला. (हा अंदमानच्या नकाशाचा टीशर्ट तिथे फारच प्रचलित होता. आमची ट्रीप संपेपर्यंत बऱ्याच जणांनी असे अंदमानच्या नकाशाचे टीशर्ट विकत घेऊन लगेच वापरलेही होते.) त्या दिवशीच्या खेळामध्ये माझ्या काही नातेवाईंकांसहित माझ्या घरच्या दोन सदस्यांनाही बक्षिसं मिळाली होती. त्यांना बक्षिसं म्हणून मिळालेल्या वस्तू सुंदर होत्याच, पण माझ्या घरच्यांना गेल्या कित्येक वर्षांत अशी कोणत्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवण्याची संधी मिळालेली नसल्याने, त्यांच्या दृष्टीने त्या मिळालेल्या बक्षिसांची अपूर्वाई मोठी होती.
खेळ संपल्यावर जोशीमॅडमनी सर्वांसमोर एक छान कल्पना मांडली, की "सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी जाणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण त्या दिवशी सर्वांनी मिळून सावरकरांचे 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत तिथे म्हणू या." त्यांच्या त्या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिलं. नंतर असं ठरलं, की जे चांगलं गातात त्यांनी आधी या गीताच्या ओळी गायच्या आणि मग बाकीच्यांनी त्यांना कोरसमध्ये साथ द्यायची. त्याप्रमाणे गाणारे लोक गाणं म्हणण्याची तयारी करण्यासाठी पुढे झाले.
जेवण आटोपून आम्ही बाहेर आलो, तेव्हा हॉटेलच्या स्वागतकक्षात प्रभुदेसाई एकटेच 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचं कडवं म्हणून बघत होते. त्यांचाही आवाज चांगला होता. बाकीचे मुख्य गाणारे हॉटेलच्या आवारात जमून 'जयोस्तुते श्री महन्मंगले' या गाण्याचा सराव करत होते. त्यांचा सराव चालू असतांना आम्ही तिथे जमून ते ऐकत होतो. गाणाऱ्यांमध्ये आनंदकाकांचा आवाज चांगला असल्याने, ते बाकीच्यांना सूर लावण्याबद्दल मार्गदर्शन करत होते. ते चांगलं गातात, हे मला माहिती होतं, पण या निमित्ताने त्यांनी ते पूर्ण गाणं म्हणून दाखवलं, तेव्हा इतक्या वर्षांत मी पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला. याला म्हणतात दिव्याखाली अंधार! असो. एव्हाना प्रभुदेसाई बाहेर आवारात आले होते. ते 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचं पहिलं कडवं म्हणणार होते. त्यांनी ते कडवं म्हणून दाखवलं. मग सगळ्यांनी मिळून व्यवस्थित बसवलेलं 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गाणं म्हंटलं.
हा गाण्याचा सराव चालू असतांना मोटारसायकलवरून दोघे जण आले, हॉटेलच्या आवारात त्यांची गाडी उभी केल्यावर ते गाण्याचा सराव पाहत उभे राहिले. दोन्ही गाणी शेवटी व्यवस्थित सुरात म्हंटली गेली, त्यावेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. गाणं संपल्यावर त्यांच्यातल्या एकाशी बोलणं झालं. त्या माणसाचे पूर्वज अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये बंदी होते, सुटकेनंतर ते तिथेच अंदमानमध्ये स्थायिक झाले होते. पण आता त्यांच्या वंशजांना म्हणजे आम्हांला भेटलेल्या माणसाला (आणि त्याच्या इतर भाऊबंदांना) त्यांचे पूर्वज भारतातल्या मूळच्या कोणत्या राज्यातले होते, त्यांची जात कोणती होती हे काहीच माहिती नव्हतं. आता हिंदी हीच त्यांची भाषा होती आणि अंदमान हेच त्यांचं वसतीस्थान! आता एक भारतीय हीच त्या सगळयांची ओळख होती. आमच्याशी संवाद साधणारा तो माणूस इंजिनियर होता. जलशुद्धीकरण तंत्रावर त्याचा अभ्यास चालू होता. त्यानिमित्ताने त्या माणसाने नुकतीच मुंबईत येऊन आय.आय.टी.ला भेट दिली होती. आमच्या ग्रुपच्या गाण्याच्या निमित्ताने आमच्याशी बोलतांना त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे भाव आले होते, त्यांचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. पण त्याच्यामुळे आजपर्यंत वाचलेल्या इतिहासाचा धागा आमच्याशी असा थेटपणे जोडला गेला होता.
मग खोलीवर जाऊन, खेळात मिळालेली बक्षिसं तिथे ठेवून आम्ही बाहेर फिरून येण्याचा आमचा शिरस्ता न मोडता, परत खाली उतरून झोपण्यापूर्वी एक चक्कर मारून आलो. पण आज फिरतांनाही मनात सारखे ऐकलेल्या गाण्यांचेच बोल घुमत होते.
No comments:
Post a Comment