--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Sunday, July 24, 2016

अंदमान ट्रीप - भाग १४ - नॉर्थ बे कोरल बीच - प्रवाळविश्वाची सफर, खरेदीपर्व

आधीचे भाग -
पुढे -

     मॅक मरीना बोटीत येऊन, पुन्हा एकदा फुगलेली लाईफ जॅकेट्स घालून आम्ही नॉर्थ बे कोरल बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. या बोटीतही सकाळी पोर्ट ब्लेअरहून निघतांना जे प्रवासी बसलेले होते, फक्त तेच प्रवासी बोटीतून पुढे नॉर्थ बे कोरल बीचला जाऊन तिथून परत पोर्ट ब्लेअरला येणार होते. मध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रवाशाला या बोटीत प्रवेश मिळणार नव्हता. आम्ही सगळे बोटीत परत आल्यावर तिथे पुन्हा एकदा विचारणा झाली, की "कोणकोण स्कूबा डायव्हिंग करणार आहे?" ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं होतं, त्यांना बोटीमध्येच आगाऊ पैसे भरावे लागणार होते. मग ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं होतं, त्यांनी तिथेच बोटीत त्याचे पैसे भरले. इथे मात्र स्कूबा डायव्हिंगसाठी माणशी ३००० रुपये भरावे लागले. आधीच्या तुलनेत इथे दरात कसलीही घासाघीस होऊ शकली नाही.

     नॉर्थ बे कोरल बीचच्या अगदी किनाऱ्यापर्यंत मोठमोठे प्रवाळ वाढलेले असल्याने, तिथला किनारा खडकाळ आहे. त्यामुळे त्या किनाऱ्यापासून पुढे थेट खोल पाण्यापर्यंत तरंगणारे ठोकळे (फ्लोटर्स) टाकून, ते एकमेकांशी जोडून त्यांचा पूल तयार केलेला आहे. आमची बोट त्या पुलाच्या एका टोकाजवळ येऊन खोल पाण्यात उभी राहिली आणि आम्ही त्या तरत्या पुलावर उतरलो. तिथून ठोकळे जोडून बनवलेल्या, जरा जास्तच उंच असलेल्या दोन पायऱ्या उतरून आम्ही त्या पुलाच्या मुख्य भागावरून किनाऱ्याकडे निघालो. पुलाच्या ज्या भागानजिक छोट्या बोटी उभ्या राहतात, तिथे त्या पुलाला कठडे नाहीत. कठडे नसलेल्या भागातून एकदम जास्त माणसं चालत गेली, तर तिथले तरंगते ठोकळे जरा हलायला लागतात. त्यामुळे तिथे तोल सांभाळत, एकापाठोपाठ एक असं पुलाच्या मधल्या भागातून चालत जावं लागतं. अर्थात झुलत्या पुलाचा तो भाग चारसहा फुटांचाच आहे आणि तिथला समुद्रही उथळ असल्याने तशी त्याची फारशी भीती वाटून घेण्याची गरज नाही. असो. इथल्या किनाऱ्यावर बांबू आणि झावळ्या वापरून एक प्रवेशद्वार उभं केलेलं आहे आणि लोकांच्या जवळच्या प्रवेश पावत्या तपासूनच इथेही लोकांना बीचच्या अंतर्भागात प्रवेश दिला जातो.

     प्रवेशद्वार म्हणून उभारलेल्या नारळाच्या झावळयांच्या मंडपातून आत शिरल्यावर आम्हांला सगळ्यात प्रथम जाणवल्या त्या उष्ण हवेच्या झळा! या बीचवर झाडं अजिबात नसल्याने, तसंच बीचच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरच्या काळ्या कातळामुळे तिथे वातावरणातली उष्णता चांगलीच जाणवत होती. मंडपापासून काही फूट अंतरावर असलेल्या एका टपरीमध्ये लाकडी बाकं टाकून स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सोय केली होती. (या बीचवर सी वॉकही केला जातो.) स्कूबा डायव्हिंगच्या टपरीसमोर एक कुल्फी विकणारा माणूस बसला होता. तिथल्या उष्ण वातावरणात त्याच्याकडच्या त्या थंडगार कुल्फीचा आस्वाद घेत आम्ही उभे होतो, तेवढ्यात 'ग्लास बॉटम बोटीतून आमच्या ग्रुपमधले कोणकोण येणार आहेत?', याची चौकशी करण्यासाठी तिथे एक माणूस आला.


स्कूबा डायव्हिंग
                                                    
     त्या दिवशी आमच्या ग्रुपमधले सगळेजण ग्लास बॉटम बोटीतून सफर करणार होते. त्यातले स्कूबा डायव्हिंगला जाणारे लोक मात्र त्यांचं स्कूबा डायव्हिंग झाल्यावर ग्लास बॉटम बोटीतून फिरणार होते. इथेही ग्लास बॉटम बोटीतून सफर करण्यासाठी माणशी ३०० रुपये दर होता. आम्ही आठजण आमच्या ग्लास बॉटम बोटीची वाट पाहत प्रवेशद्वाराजवळच्या मंडपात उभे राहिलो. बोट आल्यावर आम्ही तरंगत्या, झुलत्या पुलावरून चालत तिकडे गेलो. ही बोट लहान असल्याने जरा उथळ पाण्यात उभी होती. बोटीत बसल्यावर इथेही आम्हांला घालण्यासाठी फुगलेली लाईफ जॅकेट्स दिली गेली. या बोटीवर कोणतंही आच्छादन नव्हतं, त्यामुळे इथे आम्हांला एक काळ्या रंगाची प्लॅस्टिकची शीट दिली गेली. बोट चालवणारे दोघेजण सोडून, बाकी आम्ही सर्वांनी मिळून ती प्लॅस्टिकची शीट आमच्या डोक्यावरून ओढून घेतली आणि आमच्या पायाजवळची काच झाकली गेली. त्या प्लॅस्टिकच्या शीटखाली आम्हांला प्रचंड उकडत होतं, पण काही इलाज नव्हता.

     काचेवर येणारा प्रकाश बंद झाल्याबरोबर आम्हांला काचेखालचं दृश्य लख्ख दिसायला लागलं. काही मोठे मासे आमच्या बोटीच्या काचेच्या खालच्या भागाला अगदी लगटूनच फिरत होते आणि काही शैवालं त्यांच्या आसपास तरंगत होती. आमची चाहूल लागल्यावर ते मासे थोडे दूर झाले आणि बोट चालू झाली. एलिफंटा बीचवरच्या आमच्या सफरीत आम्ही मोठ्या माशांचे विविध प्रकार पाहिले होते. इथे नॉर्थ बे कोरल बीचवर मात्र माशांचे प्रकार कमी होते. त्यामानाने रंगीबेरंगी प्रवाळांचे भरपूर प्रकार समुद्राखाली दिसत होते आणि तेही संख्येने विपुल होते. तसंच रंगीबेरंगी प्रवाळांवर विसावलेले समुद्र काकडी (सी कुकुंबर), सी अर्चिन, तारामासा (स्टारफिश) असे वेगवेगळे जलजीव वारंवार दिसत होते. काही ईल मासेही दिसले. चारपाच प्रकारचे छोटे मासे कळपाने फिरत होते. तसंच प्रवाळांमध्ये 'ब्रेन कोरल्स' या प्रकारचे प्रवाळ तर इतके भरपूर होते, की बोट काही सेकंद फक्त ब्रेन कोरल्सच्या भागातूनच फिरत होती. समुद्राखालचं हे दृश्य बघण्यात आम्ही इतके गुंग झालो होतो, की वाऱ्याने सगळ्यांच्या हातातली प्लॅस्टिकची शीट उडतेय, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही. काचेखालचं दृश्य दिसणं एकदम बंद झालं आणि आम्हांला जाणवलं की आमच्या डोक्यावरून प्लॅस्टिकची शीट उडून चालली आहे. मी ती शीट झटकन पकडली आणि आम्ही सर्वांनी मिळून ती पुन्हा एकदा आमच्या डोक्यावरून ओढून घेतली. यावेळी आम्ही ती घट्ट धरून ठेवली होती. त्यानंतर परत प्रवाळ, मासे, शैवालं, समुद्र काकडी (सी कुकुंबर), सी अर्चिन, तारामासा (स्टारफिश) असे समुद्राखालचे विविध जलजीव पाहत आम्ही आमची आनंददायी सफर पूर्ण केली आणि बीचवर परतलो.
  

आमच्या आठजणांच्या ग्रुपनंतरच्या ग्लास बॉटम बोटीच्या सफरीत घेतलेल्या व्हिडिओचा हा काही भाग!
  
     बीचवर पर्यटकांना बसण्यासाठी नारळाच्या वाळलेल्या झावळ्या वापरून अजून एक मोठा मंडप उभा केला होता. त्या मंडपात एका वेळी पुष्कळ लोकांना बसता यावं म्हणून बांबू वापरून चारपाच रांगांमध्ये बांबूची लांबलचक बाकं तयार केलेली होती. आम्ही त्या मंडपात विसावलो खरे, पण तिथल्या उष्णतेने आम्ही हैराण झालो होतो आणि त्यामुळे सारखं पाणी पीत होतो. त्या दिवशी आमचं दुपारचं जेवण म्हणून आम्हांला पॅक्ड लंच देण्यात येणार होता. या लंचमध्ये पुलाव, रायतं आणि रसगुल्ला अशा मोजक्याच पदार्थांचा समावेश होता. पण त्या पॅकमधला पुलाव पोटभर जेवण होईल असा भरपूर दिलेला होता. या पुलावातही बाकीच्या भाज्यांसोबत फरसबी (फ्रेंच बीन्स) आणि फरसबी सारखेच दिसणारे मिरचीचे तुकडे घातलेले असल्याने, पुलाव नीट बघून खावा लागत होता. पर्यटकांच्या जवळच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा टाकण्यासाठी तिथे मंडपातच दोनतीन कचराकुंड्या ठेवलेल्या होत्या.

     नॉर्थ बे कोरल बीचवरची टॉयलेट्स एलिफंटा बीचवरच्या टॉयलेट्स प्रमाणेच सिमेंटच्या कोब्यावर, पत्रे उभारून बनवलेली होती. इथेही बाहेर ठेवलेल्या पिंपातलं पाणी भरून आतमध्ये न्यावं लागत होतं. एका टोकाला बांधलेल्या या टॉयलेट्स जवळ आवश्यक असणारी कचराकुंडी मात्र तिथे नव्हती. त्यामुळे टॉयलेट्सच्या शेजारच्या खडकाळ किनाऱ्यावर काहीजणांनी फेकलेल्या तीनचार मिनरल वॉटरच्या बाटल्या, कागद, खाद्यपदार्थांची काही वेष्टनं पडलेली दिसत होती. तिथेही एक कचराकुंडी ठेवली असती, तर हा कचरा दिसला नसता आणि समुद्रकिनारा स्वच्छ राहिला असता.

     आमची मॅक मरीना बोट आम्हांला नेण्यासाठी तीन वाजता येणार होती. पण आमच्यापैकी बहुतेकांचं स्कूबा डायव्हिंग आणि ग्लास बॉटम बोटीतली सफर दोन्हीही करून झालं होतं आणि नंतर जेवणही झालं होतं. त्यानंतर काहीजण समुद्रावर पोहायला गेले होते. पण किनाऱ्यापर्यंत अगदी जवळ आलेल्या प्रवाळांच्या खडकाळ रांगांमुळे पोहोण्यासाठी पुरेसं पाणीच नाही, म्हणून ते परत आले होते. आता आमच्यापाशी भरपूर वेळ होता. आमच्या मंडपाच्या मागच्या बाजूला रांगेने विक्रेत्यांची दुकानं होती. त्यातले काहीजण कपडे विकत होते, तर काहींच्या दुकानात शोभेच्या वस्तू, मोती आणि पोवळ्यांचे दागिने विक्रीला ठेवलेले होते.

     "अंदमानमध्ये 'सागरिका एम्पोरियम' या शासकीय दुकानातून खात्रीशीर मोती आणि पोवळ्यांच्या दागिन्यांची खरेदी करता येईल, तिथे ते थोडे महाग असतील, पण बाहेरच्या खाजगी दुकानातून केलेल्या मोती आणि पोवळ्यांच्या खरेपणाची खात्री देता येणार नाही," असं आम्हांला गंद्र्यांनी आधीच सांगितलेलं असल्याने, आम्ही तोपर्यंत अशी कोणतीच खरेदी केलेली नव्हती. पण आता भरपूर वेळ हाताशी असल्याने जरा चक्कर मारून दुकानात काय काय आहे, हे तरी बघू या, अशा विचाराने आम्ही तिकडे वळलो.

     सुरूवातीला काही कपड्यांच्या दुकानात डोकवून मग आम्ही इतर दुकानांकडे वळलो. तिथे शंखशिंपल्यांच्या शोभेच्या वस्तूंबरोबरच मोत्यांचे दागिनेही विकायला ठेवलेले होते. आम्हांला मोत्यांच्या माळा न्याहाळतांना पाहून लगेच तिथले विक्रेते मोत्यांच्या अस्सलपणची खात्री पटवण्याकरता फ्लेम टेस्ट, आरशाच्या काचेवर मोती रगडून दाखवणे इत्यादी परिक्षणं करून दाखवायला लागले. तुलनेसाठी त्यांच्याकडे मोत्यांसारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या मोत्यांच्या माळाही ठेवलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या माळांमधले मोती आणि अस्सल म्हणून दाखवत असलेले मोती अशा दोन्ही प्रकारांवर ते परिक्षणं करून दाखवत होते. फ्लेम टेस्टमध्ये मोत्यांच्या माळेजवळून सिगारेट लायटरची जळती ज्योत नेल्यावर कृत्रिम मोत्यांवरचं आवरण काही सेकंदातच जळायला लागतं, तर अस्सल मोत्यांना तेवढ्या अवधीत काही होत नाही. अस्सल मोत्यांना आरशावर रगडलं तर त्यांचा बारीक चुरा निघालेला दिसतो, मात्र कृत्रिम मोत्यांना आरशावर रगडलं, तर त्यांचा असा चुरा निघत नाही. धारदार पात्याने मोत्यांच्या माळेवर घासलं, तर कृत्रिम मोत्यांची सालं निघतात, मात्र अस्सल मोत्यांची अशी सालं निघू शकत नाहीत. अशा प्रकारची ती परीक्षणं होती. त्यावेळी मी तिथली आठदहा दुकानं नुसती तिथल्या वस्तू बघण्यासाठी म्हणून पालथी घातली. प्रत्येक दुकानात आम्हांला ती परिक्षणं दाखवली गेली. मला मोती हाताळण्याचा जेवढा अनुभव होता, त्या अनुभवावरून तिथले विक्रेते अस्सल म्हणून जे मोती दाखवत होते, ते अस्सलच पण संवर्धित (कल्चर्ड) मोती असावेत असं मला वाटत होतं.

     एका दुकानात तिथला दुकानदार आम्हांला मोती दाखवत असतांना एक बाई तिथे आली आणि फटकन त्या दुकानदाराला म्हणाली, की "हे काही अस्सल मोती नाहीत." त्यावर त्या दुकानदाराने लगेच तिला, "तुमच्या कानातल्याचे मोती खरे आहेत, ते कानातलं माझ्या हातात द्या, मी ते कोणते मोती आहेत, ते सांगतो." असं सुनावल्यावर ती बाई गप्प झाली. मग मी तिला मुद्दाम, "तुम्हांला मोत्यांमधलं खरंखोटं कळतं का?" असं विचारल्यावर तिने, "इथल्या मोत्यांबद्दल मला काही सांगता येणार नाही." असं सांगितलं, पण तिला त्या मोत्यांबद्दल शंका वाटत असावी असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. मला मात्र दुकानदाराने दाखवलेले मोती संवर्धित (कल्चर्ड) प्रकारचे आहेत, असं निश्चित वाटत होतं.

     मग मी त्या दुकानदाराला प्रश्न विचारला, की "माझ्या हातात दिलेले मोती कोणत्या प्रकारचे आहेत?" त्यावर त्याने उत्तर दिलं, की "हे अस्सलच मोती आहेत." मी त्याला म्हंटलं, की "मोत्यांमध्ये प्रकार असतात, जसे की, बसरा मोती वगैरे. तसे हे कोणत्या प्रकारचे मोती आहेत?" मी हे विचारतांना, मला पटकन आठवलं म्हणून बसरा मोत्यांचं नाव घेतलं होतं. पण दुकानदाराने तोच धागा पकडून मला लगेच बसरा मोत्यांसारखे पसरट गोल आकाराचे तीन मोती बसवलेलं एक ब्रेसलेट दाखवलं. मघाशी शंका घेणारी ती बाई तिची खरेदी आटपून निघाली होती. पण साडेचारशे रुपयांचं ते बसरा मोत्यांचं ब्रेसलेट पाहून ती लगेच मागे फिरली. त्या दुकानदाराकडे तो ब्रेसलेटचा एकच पीस शिल्लक होता. त्या बाईने आम्हांला ते ब्रेसलेट घ्यायचं आहे का, याची चौकशी केली. आम्ही ते ब्रेसलेट घेत नाही, हे पाहून लगेच तिने ते ब्रेसलेट खरेदी केलं आणि हातात चढवलं. मघाशी मोत्यांच्या खरेपणाबद्दल शंका घेणाऱ्या त्या बाईचे विचार इतक्या उत्स्फूर्तपणे बदललेले पाहून मी अवाक झाले.

     तोपर्यंत दुकानात आलेल्या अजून एका बाईने पोवळ्यांबद्दल विचारलं होतं आणि दुकानातली विक्रेती तिला मंगळसूत्रातली पोवळी दाखवत होती. या दुकानात पोवळी विकली जातात, हे पाहून मुद्दाम मी त्या दुकानाचं रजिस्टर्ड सर्टिफिकेट बघायला मागितलं आणि दुकानदाराने ते मला बघायलाही दिलं. मग त्याने मोत्यांच्या माळांबरोबर त्याच्या म्हणण्यानुसार लाल पोवळ्याच्या असलेल्या माळाही दाखवल्या. मोत्यांच्या बाबतीत मी निश्चिंत होते, मात्र त्या पोवळ्यांच्या माळांकडे बघून मला त्यांच्या खरेखोटेपणाबद्दल कोणतंही अनुमान बांधणं शक्य नव्हतं. पण माळांची किंमत फार नसल्याने, त्या माळा खऱ्या पोवळ्याच्या नसतील, तरी नुसत्या शोभेच्या माळा म्हणून विकत घेण्यासारख्या होत्या. मग मी त्या दुकानदाराला, "ह्या पोवळ्याच्या माळा विकत घेतल्या, तर आम्हांला विमानतळावर अडवलं जाऊन काही अडचण येणार नाही, ना?" हे विचारून घेतलं. त्यावर त्याने, "मी तुम्हांला पावती देईन, ती तिथे दाखवण्यासाठी तुमच्याजवळच्या सामानात वरती ठेवा. तशी तुम्हांला काही अडचण येणार नाही, पण कोणी अडवलंच तर सोबत दिलेल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डवरच्या नंबरवर फोन करा." असं सांगून आम्हांला आश्वस्त केलं. मग एकदाची आमची खरेदी पार पडली. (तिथे खरेदी केलेल्या मोत्यांना आणि पोवळ्यांना अजून एखाद्या ओळखीच्या जवाहिऱ्याकडून पारखून घ्यायचं आहे. पण नेहेमी नवरत्नं पाहण्यात असणाऱ्या एक व्यक्तीने मला, ते खरेदी केलेले मोती अस्सलच पण संवर्धित (कल्चर्ड) प्रकारचे असून, लाल पोवळीही अस्सल आहेत, असं खात्रीने सांगितलं आणि माझी खरेदी वाया गेली नाही, याची ग्वाही दिली.) 

     अशा प्रकारे चांगला तासभर तरी आम्ही तिथल्या दुकानांमध्ये फिरून खरेदी करण्यात घालवला होता. आम्ही मंडपात आलो, तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या बाकीच्या लोकांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. मग सगळेजण तिथे आहेत, हे पाहून देवेंद्र गंद्रेंनी सगळ्यांना पुन्हा एकदा आपापला परिचय करून द्यायला सांगितला. एव्हाना ग्रुपमधल्या बऱ्याच जणांशी आमची ओळख झालेली होती. पण ज्यांच्याशी जास्त बोलण्याची संधी मिळाली नव्हती, त्या झुनझुनवाला, (अजून एक) कुलकर्णी, प्रधान, क्षीरसागर कुटुंबियांचीही या निमित्ताने नीट ओळख झाली. शेवटच्या राहिलेल्या सातआठजणांची ओळख करून देण्याच्या आधीच आमची बोट आली असल्याची उद्घोषणा झाली आणि आम्हांला बीचच्या प्रवेशद्वारापाशी बोलावलं गेलं.

     मग पुन्हा एकदा तिथल्या तरंगत्या, झुलत्या पुलावरून जात, तिथल्या ठोकळ्यांच्या दोन उंच पायऱ्या चढून आम्ही मॅक मरीना बोटीत शिरलो आणि फुगलेली लाईफ जॅकेट्स घालून सीटवर दाटीने बसलो. आमचा प्रवास संपवून आम्ही जेव्हा पोर्ट ब्लेअरमधल्या जेट्टीवर उतरलो तेव्हा तिथून बाहेर पडतांना, तिथल्या समुद्राच्या किनाऱ्याजवळच्या पाण्यात सी अर्चिन आणि समुद्र काकडी (सी कुकुंबर) या जलजीवांना पाहून मला आश्चर्य वाटलं. थोडं पुढे गेल्यावर तिथला वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिसला. त्या कॉम्प्लेक्सच्या पाण्यातही ते जलजीव होते. आजचं स्थळदर्शन संपलं, या विचाराने आधीच आम्ही काहीजण मागे रेंगाळलो होतो, त्यात त्या कॉम्प्लेक्समधल्या जलजीवांना न्याहाळत असलेल्या आम्हांला पाहून, मागून येणाऱ्या रूपाली गंद्रेंनी, "चला. चला." अशी घाई सुरू केली, कारण त्या दिवशीच्या कार्यक्रमपत्रिकेत नसलेलं अजून एक ठिकाण म्हणजे 'फिशरीज म्युझियम' आम्हांला आता बघायचं होतं. आम्ही तिथे जायच्या आत ते म्युझियम बंद होईल, की काय याची त्यांना धास्ती वाटत होती.

     मग आम्ही म्युझियममध्ये गेलो. तिथे अंदमानच्या समुद्रात आढळणारे विविध प्रकारचे मासे, प्रवाळ, इतर जलजीव, त्यांचे शंखशिंपले हे सगळं निवांतपणे बघत आमची म्युझियमची सफर आटोपली, तरी म्युझियम बंद व्हायची वेळ झालेली नव्हती. म्युझियमच्या बाहेर एक चहावाला आम्हांला चहा देण्यासाठी त्याची सायकल लावून थांबलेला होता. चहा घेऊन मग आमच्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या बसने आम्ही हॉटेलकडे निघालो.

     संध्याकाळी थोडी विश्रांती घेऊन, खेळ खेळण्यासाठी आम्ही रात्री लवकर खाली आलो. काही मिनिटांनी देवकुळे चक्क रेशमी सोवळं (कद) नेसून आणि झब्बा घालून तिथे अवतरले आणि त्यांनी सर्वांची दाद मिळवली. त्या दिवशीच्या खेळाचं आयोजन करण्यासाठी देवकुळे आणि बनसोडे यांना काहीजणांच्या मदतीची आवश्यकता होती. तेव्हा त्यांना मदत करण्यात माझ्या आत्यानेही सहभाग घेतला होता आणि एका नव्या खेळाचं आयोजन केलं होतं. नंतर आदल्या दिवशीप्रमाणे देवकुळे आणि बनसोडे या दोघांनी मिळून सगळ्यांचे खेळ घेतले होते. या वेळी निवडलेला पत्त्यांचा खेळ जास्त इर्ष्यापूर्ण होता. या खेळातही माझ्या काही नातेवाईकांना आणि घरातल्या एका व्यक्तीला बक्षिसं मिळाली. ही बक्षिसंही आधीच्या बक्षिसांप्रमाणेच विचारपूर्वक निवडून आणलेली होती. त्यानंतर नातूकाकांनी सगळ्यांना एक कोडं घातलं. त्या कोड्याचं उत्तर देणाऱ्या व्यक्तिलाही हिमश्रीतर्फे बक्षीस देण्यात येणार होतं. अशाप्रकारे आमचे खेळ जरा जास्तच रंगले होते आणि रात्रीच्या जेवणाला उशीर होत होता. मग खेळ आवरता घेत, आमची जेवणं झाली आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही बाहेर एक चक्कर मारून आलो.
       

Sunday, July 17, 2016

अंदमान ट्रीप - भाग १३ - रॉस बेटावर

आधीचे भाग -
पुढे -

     दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही तयार होऊन खाली आलो आणि नाश्ता आटोपून बसने एका धक्क्यापाशी आलो. 'मॅक मरीना' बोटीचा हा धक्का होता. (नंतर काही उत्साही लोकांनी तिचं नामकरण गंमतीने मार्च मरिना असं करून टाकलं.) या बोटीने आम्ही रॉस बेटावर आणि नॉर्थ बे कोरल बीचवर जाणार होतो. बोट यायला अजून थोडा वेळ असल्याने, तिथल्या प्रवेशद्वारापाशी दोघेजण नॉर्थ बे कोरल बीचवर चालवल्या जाणाऱ्या स्कूबा डायव्हिंगची माहिती द्यायला लागले. त्यांचं असं म्हणणं होतं, की ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं आहे, त्यांनी इथेच आधी आगाऊ पैसे भरावेत. पण झुनझुनवालांनी त्याला आक्षेप घेत विचारलं, की 'आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन तिथली स्थिती बघू आणि मग स्कूबा डायव्हिंग करायचं की नाही ते ठरवू. एखाद्याने आधी पैसे भरले नाहीत, पण तिथे गेल्यावर त्याला स्कूबा डायव्हिंग करावंसं वाटलं, तर?' त्यामुळे तिथे पैसे भरण्याचा बेत रद्द झाला.

     मग पुन्हा एकदा सगळ्यांच्या ओळखपत्रांची तपासणी होऊन सगळेजण बोटीपाशी आले. इथेही लोकांना बोटीत चढायला मदत करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स दारापाशी उभे होते. आदल्या दिवसाच्या मॅक क्रूझच्या तुलनेत ही काहीशी लहान असलेली ए.सी. क्रूझ होती. या बोटीतल्या सीटही जरा लहान होत्या आणि सीटच्या दोन रांगांमधलं अंतर तुलनेनं कमी होतं. त्यात या बोटीवर पुन्हा सगळ्यांना घालायला लाईफ जॅकेट्स दिली गेली. ती फुगलेली लाईफ जॅकेट्स घातल्यावर हातात एखादी लहानशी बॅग किंवा पर्स ठेवून खुर्चीवर बसणं अडचणीचं होत होतं. पण आता प्रवासाला फार वेळ लागणार नव्हता, त्यामुळे तेवढी गैरसोय चालून गेली.

     आमची बोट रॉस बेटानजिक पोहोचली आणि बेटावर असलेलं दीपगृह दिसायला लागलं. भारताच्या सध्या चलनात असलेल्या २० रुपयांच्या नोटेवर मागच्या बाजूला या दीपगृहाचं चित्र छापलेलं आहे. रॉस बेटाचं ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन, या दीपगृहाचं चित्र नोटेवर छापलं गेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात रॉस बेटावर ब्रिटीशांचा तळ होता. नंतर काही काळ हे बेट नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या ताब्यात होतं. नंतर ते पुन्हा ब्रिटीशांच्या ताब्यात गेलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आलं. पूर्वी या बेटावर लोकांची वस्ती होती. पण २००४ सालच्या त्सुनामीमुळे या बेटाचा बराचसा भाग समुद्राच्या पाण्याखाली गेल्यानंतर, इथे राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे हलवलं गेलं आणि आता हे बेट भारतीय नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या बेटावर पर्यटकांना फक्त दुपारी तीन वाजेपर्यंतच थांबता येतं.

रॉस बेटावरचं दीपगृह - सध्या चलनात असलेल्या भारतीय २० रुपयांच्या नोटेवर मागच्या बाजूला या दीपगृहाचं चित्र छापलेलं आहे.
  
     इतर बेटांप्रमाणेच या बेटावरही सगळ्या पर्यटकांच्या ओळखपत्रांची तपासणी झाली. या बेटावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क होतं. त्याशिवाय बेटावर कॅमेऱ्याने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी वेगळं शुल्क भरावं लागत होतं. मात्र मोबाईलने फोटो काढायचे असल्यास, त्यासाठी कसलंही शुल्क नव्हतं. नियमाप्रमाणे बेटाच्या प्रवेशद्वारावर आवश्यक ते शुल्क भरून प्रत्येक पर्यटकाला एक कूपन घ्यावं लागत होतं. हे कूपन दाखवून मगच बेटावर प्रवेश मिळत होता. हे कूपन बेटावरून परत जातांना प्रवेशद्वारावर परत जमा करावं लागणार होतं. कूपन हरवल्यास २०० रुपयांचा दंड होता.

     आम्ही रॉस बेटावर आलो आणि समोर दिसणाऱ्या हरणांनी आमचं स्वागत केलं. येणाऱ्या पर्यटकांच्या जवळ जाऊन त्यांच्याजवळ काही खाद्यपदार्थ आहेत का, याचा वास घेणारी ती हरणं कसलीही भीती न बाळगता त्या बेटावर मुक्तपणे हिंडत होती. ज्यांच्याजवळ काही खाद्यपदार्थ होते, त्यांच्याजवळ ती हरणं खाद्यपदार्थांच्या आशेने धिटाईने जात होती. त्यातल्या 'बाबा' नावाच्या दृष्टीहीन हरणाची शिंगं लागतील, या भीतीने पर्यटक त्या हरणापासून दूर जात होते. पण नंतर त्या हरणाला नीट दिसत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांची भीती कमी झाली. लोकांच्या जवळ येणाऱ्या हरणांना त्यांनी स्पर्श करायचा प्रयत्न केल्यावर, ती हरणंही त्यांना खुशाल स्पर्श करू देत होती. त्या हरणांना आणि इतर प्राण्यांना पर्यटकांनी स्वतःजवळचे कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नये, अशी स्पष्ट सूचना तिथे लिहिलेली होती. (यीस्ट घातलेल्या पावासारखे पदार्थ हरणांना चालत नाहीत, तसंच तिथल्या प्राण्यांना अपाय होऊ शकेल असे घटक काही खाद्यपदार्थात असू शकतात, म्हणून मुद्दाम ही सूचना तिथे लिहिलेली होती.)

पर्यटक कुतूहलाने हरणांना स्पर्श करत होते आणि ती हरणंही खुशाल त्यांना स्पर्श करू देत होती.
  
     बेटावर असलेल्या शहाळेवाल्याकडून शहाळी विकत घेऊन ती आमच्या ग्रुपमधल्या सदस्यांना दिली जात होती, तेव्हा तहानलेल्या एका धीट हरणाने सरळ नातूकाकूंच्या हातातल्या शहाळ्याला तोंड लावत त्यातलं पाणी पिण्याचा प्रयत्न केला. हरणाने तोंड लावलेलं ते शहाळं त्यांनी तसंच हातात ठेवलेलं पाहून, त्या हरणाने धिटाईने त्यातलं उरलेलं पाणीही लपलप जीभ हलवत स्वाहा केलं. तोपर्यंत बाकीची हरणंही तिथे जमा झाली होती. मलईसाठी शहाळेवाल्याने फोडून टाकून दिलेल्या शहाळ्यांमधून पाणी आणि मलई मिळतेय का याचा ती हरणं शोध घेत होती आणि त्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न करत होती. शहाळेवालाही हरणांना तिथल्या ढकलगाडीत फेकलेल्या शहाळ्यातलं उरलेलं पाणी आणि मलई खायला प्रतिबंध करत नव्हता. ते पाहून काहीजणांनी आपल्या शहाळ्यातली मलई न खाता ती हरणांना खाण्यासाठी तशीच ठेवली आणि हरणंही ती मलई खायला धिटाईने पुढे सरसावली.

शहाळेवाला शहाळे फोडत असतांना खाली पडणाऱ्या शहाळ्यांच्या खापांमधली मलई खाऊन हरणं तहान भागवण्याचा प्रयत्न करत होती. ढकलगाडीत टाकून दिलेल्या शहाळ्यांमधलं पाणी शोधणाऱ्या हरणांकडून ती शहाळी खाली जमिनीवरही पडत होती.
                                        
नातूकाकूंच्या हातातल्या शहाळ्याला अचानक तोंड लावून, मग त्यांच्याकडून शहाळ्यातलं सगळं पाणी वसूल करणारं धीट हरीण!
      
     शहाळ्याचं पाणी पिऊन झाल्यावर आम्ही काहीजण  तिथे समोरच असलेल्या रस्त्यावरून थोडे पुढे गेलो, तर तिथे रस्त्याच्या कडेला व्यवस्थित बांधलेली टॉयलेट्स दिसली. टॉयलेट्स स्वच्छ होती, तिथे वॉश बेसिनचीही सोय होती, मात्र तिथल्या एकाही नळाला पाणी येत नव्हतं, तिथेही पाणी पिंपात भरून ठेवलेलं होतं. पण इतर ठिकाणच्या तुलनेत रॉस बेटावरची टॉयलेट्स फार सुव्यवस्थित वाटली. पुढच्या काही वर्षांत तिथे नक्कीच अजून जास्त सोयी झालेल्या दिसतील.

रॉस बेटावर पर्यटकांसाठी व्यवस्थित मार्गिका बांधलेल्या आहेत. या बेटावरून जवळच असलेल्या मुख्य बेटाचा भाग समोर दिसत होता.
                 
बेटावरच्या स्थानिक गाईड - अनुराधा राव येईपर्यंत आम्ही या बेटावर असेच इकडेतिकडे फिरून फोटो काढत होतो.
      
     रॉस बेटावर हिंडून लोकांना बेटाचा इतिहास सांगणाऱ्या आणि तिथल्या महत्त्वाच्या वास्तू दाखवणाऱ्या अनुराधा राव या स्थानिक गाईड त्या दिवशी बेटावर वेळेत पोहोचू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्या येईपर्यंत आम्ही त्या बेटावर असेच इकडेतिकडे हिंडून बेटाचा परिसर पाहत होतो. तिथे बेटाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि राजकीय माहिती देणारे फलक लावलेले होते. एका बाजूला वॉच टॉवर सारखी दिसणारी एक इमारत होती. त्या इमारतीत जाण्यासाठी तिथे एक शिडी लावलेली होती. मात्र त्या इमारतीला, तुरुंगाच्या दरवाजाला असतात तसे गज बसवलेले जाळीचे दरवाजे होते. ते दरवाजे उघडे होते आणि तिथे आत कोणी दिसत नव्हतं. त्यामुळे धोंडांच्या मुलीला, त्या इमारतीत नक्की काय आहे हे बघण्याची उत्सुकता लागली होती. ती तिथे वरती गेली आणि तिची उत्सुकता शमल्यावर तिने इमारतीच्या गजांआड असलेल्या तिचा फोटो काढून घेतला. मग तिच्यामागोमाग आम्ही अजून काही लोक तिथे वरती गेलो. त्या इमारतीच्या खिडक्यांमधून समुद्र दिसत होता. मात्र तिथे आमच्या पायांखाली पक्की जमीन नसून भोकं पडलेले, जास्त वजनाने फाटू शकतील असे पत्रे आहेत, हे लक्षात आल्यावर रूपाली गंद्रेंनी सगळ्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. तेवढ्या अवधीत आमच्या काही जणांचं फोटोसेशन झालं. काहीजणांनी गजांआड उभं राहून फोटो काढून घेतले, तर काहीजणांनी तिथलं दार बंद करून जणू कोणाला तिथे आत बंद करून ठेवत असल्याच्या भूमिकेतला फोटो काढून घेतला. क्षणभर तिथल्या गजांआड उभी असतांना मला काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांची आठवण झाली. आमचे सगळयांचे फोटो काढून झाले तेवढ्यात अनुराधा राव आल्या आहेत, अशी सूचना मिळाली आणि आम्ही त्यांच्यापाशी जमा झालो.

आमचं कुतूहल चाळवणारी इमारत!
                                       
पर्यटकांसाठी केलेली आसनव्यवस्था
          
     अनुराधा राव यांनी सगळ्यात आधी नावांसकट ओळख करून दिली, ती बेटावरच्या हरणांची! त्या हरणांना खायला घालण्यासाठी त्यांनी यीस्ट न घालता बनवलेला पाव आणला होता. त्या पावाचे तुकडे कधी स्वतः हरणांना खायला घालत, कधी इतर पर्यटकांना हरणांना भरवण्यासाठी वाटत, अनुराधा राव आम्हांला बेटाची सैर घडवून आणत होत्या. एका ठिकाणी एका झाडाखाली थांबून त्यांनी तिथल्या बुलबुल पक्ष्यांना त्यांच्या नावाने हाक मारत साद घातली आणि त्यांच्यासाठी आणलेलं खाद्य तिथे खाली जमिनीवर ठेवलं. काही क्षणांत तिथे बुलबुल पक्षी हजर झाले. २००४ सालची त्सुनामी आली, तेव्हा त्सुनामीपूर्वी ह्या बेटावरच्या हरणांनी, बुलबुल पक्ष्यांनी आणि मोरांनी रात्री अनुराधा राव यांच्या घरापाशी येऊन, काचेवर टकटक करत, आवाज करत त्यांना सावध केलं होतं. त्सुनामीची चाहूल त्या सगळ्यांना माणसांआधीच लागली होती. त्या त्सुनामीमुळे समुद्राच्या पाण्याखाली कायमचा गेलेला बेटाचा काही भाग आम्हांला अस्पष्टपणे समुद्राच्या नितळ पाण्याखाली दिसत होता.

     अनुराधा राव त्यांच्या प्रभावी भाषाशैलीत आम्हांला बेटाबद्दल माहिती देत होत्या. ह्या बेटावर ब्रिटीशांचा तळ असतांना, त्यांनी ज्या काही वास्तू उभारलेल्या होत्या, त्यांच्याकडे नंतर भारत सरकारचं दुर्लक्ष झालं होतं. स्वातंत्र्यानंतर पुढची काही वर्षं या वास्तू अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडून होत्या, हे पाहून चोरट्यांनी त्या वास्तुंमधले आधारासाठी ठोकलेले लोखंडाचे खिळे, कांबी इत्यादी लोखंडी सामान भंगारात विकण्यासाठी चोरून नेलं होतं. त्या दुर्लक्षित काळात त्या वास्तूंवर झाडं वाढली होती. त्या झाडांच्या पसरलेल्या फांद्या आणि मुळांनीच नंतर त्या वास्तूंना आधार दिला होता. आता जर त्या पसरलेल्या फांद्या आणि मुळांना तिथून छाटून टाकलं, तर त्यांच्या आधाराशिवाय त्या वास्तू तिथे उभ्याही राहू शकणार नाहीत.

अनुराधा रावांबरोबर आम्ही बेटाच्या सफरीसाठी निघालो आणि पुढे गेल्यावर आम्हांला ठिकठिकाणी असे झाडांच्या खोडांनी आणि मुळांनी वेढलेल्या इमारतींचे भग्नावशेष दिसायला लागले.
         
या भग्न इमारती आम्हांला भूतकाळाची आठवण करून देत होत्या.
          
ज्या वृक्षांच्या शीतल छायेत आम्ही चालत होतो, ते वृक्ष तिथल्या भग्न अवशेषांवर वाढलेले होते.
   
हरणांना यीस्ट नसलेला पाव खायला घालत, बुलबुल पक्ष्यांना साद घालणाऱ्या अनुराधा राव
       
अनुराधा रावांनी दिलेला, यीस्ट नसलेला पाव हरणांना भरवणारे पर्यटक
     
आपल्या ओघवत्या शैलीत बेटाचा इतिहास सांगण्यात मग्न असलेल्या अनुराधा राव
           
वाटेतली प्रत्येक भग्न इमारत आमचं लक्ष वेधून घेत होती.
      
विस्तारलेल्या झाडांमुळे मूळची ही इमारत अजून काही काळाने त्या झाडांमध्ये दिसेनाशी होईल.
        
या भग्न इमारतीच्या खांबांमधून समोरचा निळा समुद्र उठून दिसत होता.
       
इथे झाडाच्या मुळांनीच खांब बनून भग्नावशेषांना आधार दिला होता.
      
     या बेटावर ब्रिटीशांनी तळ उभारला खरा, पण इथल्या डासांमुळे आणि खराब पाण्यामुळे रोगराई पसरेल अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी बेटावर, पाणी शुद्ध करणारा भारतातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प (बिसलरी प्लांट) उभारला. आता त्याचेही केवळ अवशेषच शिल्लक आहेत. बेटावरची सर्वात उंचावर असलेली वास्तू पाहण्यासाठी आम्ही तिथली टेकडी चढून जात असतांना अचानक समोर मोर आले. अनुराधा रावांनी त्यांनाही नावाने पुकारत त्यांचं खाद्य खायला घातलं. नातूकाकांनी त्यांची परवानगी घेऊन समोर आलेल्या मोराला त्यांच्या हातातले चणे खायला घातले अणि तो क्षण माझ्या कॅमेऱ्यात अगदी जवळून टिपण्याची संधी मला मिळाली.

इंग्रजांनी उभारलेला भारतातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प (बिसलरी प्लांट) - आता त्याचेही केवळ अवशेषच शिल्लक आहेत.
     
२००४ सालच्या त्सुनामीमुळे रॉस बेटाचा काही भाग कायमचा समुद्राच्या पाण्याखाली गेला. या फोटोत समुद्राच्या हिरव्यानिळ्या नितळ पाण्याखाली असलेला बेटाचा बुडालेला भाग दिसतोय.
       
अचानक समोर आलेले मोर आणि लांडोर
                  
बेटाच्या टेकडीवरची सर्वोच्च स्थानी असलेली ही भग्न वास्तू. २००४ सालच्या त्सुनामीत इथे आश्रय घेणाऱ्या प्राण्यांचे आणि माणसांचे जीव वाचले.
        
वाऱ्याबरोबर उडून आलेली आणि अलगद हातावर विसावलेली ही कापसाची म्हातारी!
          
अनुराधा राव यांच्याकडून खाद्य घेणारा मोर
         
अजिबात स्थिर उभा न राहणारा मोर अगदी जवळ आल्याने, मी त्याला कॅमेऱ्यात टिपू शकले.
        
नातूंकाकांच्या हाताला चोचीचा स्पर्शही होणार नाही याची काळजी घेत, त्यांच्या हातातले चणे टिपणारा हा मोर अगदी जवळून कॅमेऱ्यात बद्ध करण्याची संधी मला मिळाली.
     
रॉस बेटावरच्या तलावात फुललेली कमळं!
    
     अशाप्रकारे प्राण्यांचे सान्निध्य अनुभवत, झाडांच्या खोडांनी आणि मुळांनी वेढलेल्या इमारतींचे भग्नावशेष पाहत आणि अनुराधा रावांचं ओघवत्या शैलीतलं, लोकांना खिळवून ठेवणारं निवेदन ऐकत रॉस बेटाची सफर करण्याचा आमचा हा अनुभव सर्वस्वी आगळा होता. ही सफर पूर्ण करून आम्ही पुन्हा आधीच्याच जागी आलो. तिथे अनुराधा राव यांच्याबरोबर फोटो काढून, त्यांच्या कार्याला यथाशक्ति मदत करत आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या सफरीसाठी मॅक मरीना बोटीत परतलो.
    

Saturday, July 2, 2016

अंदमान ट्रीप - भाग १२ - पुन्हा पोर्ट ब्लेअरमध्ये - गीतगायनाची तयारी

आधीचे भाग -
पुढे -

     आम्ही त्या दिवशी हॉटेल किंग्डम सोडणार असल्याने, आमच्या खोल्यांच्या चाव्या सकाळीच हॉटेलच्या काऊंटरवर जमा केलेल्या होत्या. पण आता एलिफंटा बीचवरुन हॉटेलमध्ये परत आल्यावर, आमच्या ग्रुपच्या बऱ्याचशा लोकांना आंघोळी करायच्या असल्याने त्यासाठी काही खोल्या उघडून दिल्या होत्या. फ्रेश झाल्यावर सगळ्यांची जेवणं झाली आणि मग परतीच्या मॅक क्रूझ बोटीची वेळ होईपर्यंत बरेचजण स्वागतकक्षात आणि हॉटेलच्या बगिच्यात गप्पा मारत थांबले. आदल्या दिवशीच्या सी.डी.च्या अनुभवामुळे पुन्हा काहीजण त्यांच्या नवीन सी. डी. काऊंटरवरच्या कॉम्प्युटरवर चेक करून घेत होते. मग हॉटेलमध्ये वायफायची सोय आहे, का याची सहज चौकशी केल्यावर तिथल्या मॅनेजरने सांगितलं, की "वायफायची सोय आहे. पण आम्ही कोणाला वायफायचा पासवर्ड देत नाही. ज्यांना वायफाय वापरायचं आहे, त्यांनी त्यांचा मोबाईल आमच्याकडे द्यावा, मग आम्ही त्यात पासवर्ड टाकून देऊ." मी भारतातल्या इतर ठिकाणच्या हॉटेलमध्ये लोकांना सहजपणे वायफायचा पासवर्ड दिला जात असलेला पाहिलेला असल्यामुळे, मॅनेजरचं हे बोलणं मला थोडं विचित्र वाटलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं, की बेटाची सुरक्षा लक्षात घेऊन हे असे नियम केलेले असावेत. (नंतर पोर्ट ब्लेअरवरच्या आमच्या हॉटेलमध्येही आम्हांला असंच सांगितलं गेलं.)

     दुपारी मॅक क्रूझ बोटीची वेळ होत आल्यावर आम्ही टॅक्सीने धक्क्यावर आलो. तिथे पुन्हा ओळखपत्रांची तपासणी होऊन आम्हांला तिकीटं दिली गेली. यावेळी आमची तिकीटं खालच्या मजल्यावरच्या प्रीमियम क्लासची होती. तिथल्या सीट डिलक्स क्लाससारख्याच आरामशीर होत्या, फक्त तिथे खाद्यपेयांची पाकीटं पुरवली जात नव्हती. आमची नुकतीच जेवणं झालेली असल्याने, आम्हांला त्याची गरजही नव्हती. यावेळी मी कमी हेलकावे जाणवणाऱ्या बोटीच्या मधल्या भागात बसले होते. परतीच्या प्रवासात, बोटीवरच्या टी.व्ही.वर संकटसमयी लाइफ जॅकेट कसं वापरायचं याच्या प्राथमिक सूचना दिल्यानंतर, आठवणीने आदल्या दिवशीचा दाखवलेला कार्यक्रम न दाखवता दुसरा कार्यक्रम दाखवण्यात आला. आमचा प्रवास संपून आम्ही धक्क्यावर उतरलो, तेव्हा अंधार पडला होता. तिथून बाहेर पडतांना वाटेत समुद्राला येऊन मिळणाऱ्या एका जलप्रवाहाचा घाणेरडा वास आला, मानवनिर्मित घाण त्या प्रवाहात मिसळली होती, हे निश्चित जाणवत होतं. पण मुंबईच्या तुलनेत ती घाण खूपच कमी प्रमाणात होती. आत्तापर्यंत आम्ही अंदमानची सुंदरता फक्त पाहिली होती, आता तिथली जलप्रदूषण करणारी घाण अनुभवण्याची ती पहिली आणि शेवटचीच वेळ होती.

     धक्क्याबाहेर संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही जवळच उभ्या असलेल्या आमच्या बसमधून पोर्ट ब्लेअरच्या हॉटेल एन्. के. इंटरनॅशनलमध्ये परत आलो. यावेळी सगळ्यांना आधीच्याच खोल्या परत दिल्या गेल्या होत्या. हॉटेलच्या एका खोलीत लावून ठेवलेलं आमचं सामान तिथले कर्मचारी कधी घेऊन येतात याची आम्ही वाट पाहत होतो, पण रूपाली गंद्रेंनी आम्हांला आश्वस्त केलं, की "सामानासाठी तुम्ही इथे थांबायची गरज नाही. हॉटेलचे कर्मचारी तुमचं सामान घेऊन तुमच्या खोलीवर येतील." त्याप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांनी आमचं सामान अचूकपणे आमच्या खोल्यांमध्ये आणून दिलं. तसंच आम्हांला हेही सांगितलं गेलं, की "ज्या कोणाला त्यांचे कपडे धुवून वाळत टाकायचे आहेत, ते त्यांचे कपडे गॅलरीच्या कठड्यांवर वाळत घालू शकतात." त्यामुळे मोठीच सोय झाली आणि त्यादिवशी बहुतेकांच्या खोल्यांसमोरच्या गॅलरीच्या कठड्यांवर कपडे वाळत पडले.

     त्यादिवशी रात्री सगळ्यांना थोडं आधीच भोजनकक्षात बोलावलं गेलं होतं. गंद्रेंचे मित्र देवकुळे आणि बनसोडे यांनी सगळ्यांसाठी काही खेळांचं आयोजन केलं होतं. खेळ खेळण्यात वेळ कसा निघून गेला, ते कळलंच नाही. खेळात जिंकलेल्या लोकांना बक्षिसं म्हणून ज्या वस्तू देण्यात आल्या, त्या शंखशिंपल्यांच्या आणि बाकीच्या सुंदर वस्तू काळजीपूर्वक निवडून आणलेल्या होत्या. त्याशिवाय अंदमानचा नकाशा असलेला एक टीशर्टही बक्षीस म्हणून दिला गेला. (हा अंदमानच्या नकाशाचा टीशर्ट तिथे फारच प्रचलित होता. आमची ट्रीप संपेपर्यंत बऱ्याच जणांनी असे अंदमानच्या नकाशाचे टीशर्ट विकत घेऊन लगेच वापरलेही होते.) त्या दिवशीच्या खेळामध्ये माझ्या काही नातेवाईंकांसहित माझ्या घरच्या दोन सदस्यांनाही बक्षिसं मिळाली होती. त्यांना बक्षिसं म्हणून मिळालेल्या वस्तू सुंदर होत्याच, पण माझ्या घरच्यांना गेल्या कित्येक वर्षांत अशी कोणत्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवण्याची संधी मिळालेली नसल्याने, त्यांच्या दृष्टीने त्या मिळालेल्या बक्षिसांची अपूर्वाई मोठी होती.

     खेळ संपल्यावर जोशीमॅडमनी सर्वांसमोर एक छान कल्पना मांडली, की "सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी जाणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण त्या दिवशी सर्वांनी मिळून सावरकरांचे 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत तिथे म्हणू या." त्यांच्या त्या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिलं. नंतर असं ठरलं, की जे चांगलं गातात त्यांनी आधी या गीताच्या ओळी गायच्या आणि मग बाकीच्यांनी त्यांना कोरसमध्ये साथ द्यायची. त्याप्रमाणे गाणारे लोक गाणं म्हणण्याची तयारी करण्यासाठी पुढे झाले.

     जेवण आटोपून आम्ही बाहेर आलो, तेव्हा हॉटेलच्या स्वागतकक्षात प्रभुदेसाई एकटेच 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचं कडवं म्हणून बघत होते. त्यांचाही आवाज चांगला होता. बाकीचे मुख्य गाणारे हॉटेलच्या आवारात जमून 'जयोस्तुते श्री महन्मंगले' या गाण्याचा सराव करत होते. त्यांचा सराव चालू असतांना आम्ही तिथे जमून ते ऐकत होतो. गाणाऱ्यांमध्ये आनंदकाकांचा आवाज चांगला असल्याने, ते बाकीच्यांना सूर लावण्याबद्दल मार्गदर्शन करत होते. ते चांगलं गातात, हे मला माहिती होतं, पण या निमित्ताने त्यांनी ते पूर्ण गाणं म्हणून दाखवलं, तेव्हा इतक्या वर्षांत मी पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला. याला म्हणतात दिव्याखाली अंधार! असो. एव्हाना प्रभुदेसाई बाहेर आवारात आले होते. ते 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचं पहिलं कडवं म्हणणार होते. त्यांनी ते कडवं म्हणून दाखवलं. मग सगळ्यांनी मिळून व्यवस्थित बसवलेलं 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गाणं म्हंटलं.

     हा गाण्याचा सराव चालू असतांना मोटारसायकलवरून दोघे जण आले, हॉटेलच्या आवारात त्यांची गाडी उभी केल्यावर ते गाण्याचा सराव पाहत उभे राहिले. दोन्ही गाणी शेवटी व्यवस्थित सुरात म्हंटली गेली, त्यावेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. गाणं संपल्यावर त्यांच्यातल्या एकाशी बोलणं झालं. त्या माणसाचे पूर्वज अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये बंदी होते, सुटकेनंतर ते तिथेच अंदमानमध्ये स्थायिक झाले होते. पण आता त्यांच्या वंशजांना म्हणजे आम्हांला भेटलेल्या माणसाला (आणि त्याच्या इतर भाऊबंदांना) त्यांचे पूर्वज भारतातल्या मूळच्या कोणत्या राज्यातले होते, त्यांची जात कोणती होती हे काहीच माहिती नव्हतं. आता हिंदी हीच त्यांची भाषा होती आणि अंदमान हेच त्यांचं वसतीस्थान! आता एक भारतीय हीच त्या सगळयांची ओळख होती. आमच्याशी संवाद साधणारा तो माणूस इंजिनियर होता. जलशुद्धीकरण तंत्रावर त्याचा अभ्यास चालू होता. त्यानिमित्ताने त्या माणसाने नुकतीच मुंबईत येऊन आय.आय.टी.ला भेट दिली होती. आमच्या ग्रुपच्या गाण्याच्या निमित्ताने आमच्याशी बोलतांना त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे भाव आले होते, त्यांचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. पण त्याच्यामुळे आजपर्यंत वाचलेल्या इतिहासाचा धागा आमच्याशी असा थेटपणे जोडला गेला होता.

     मग खोलीवर जाऊन, खेळात मिळालेली बक्षिसं तिथे ठेवून आम्ही बाहेर फिरून येण्याचा आमचा शिरस्ता न मोडता, परत खाली उतरून झोपण्यापूर्वी एक चक्कर मारून आलो. पण आज फिरतांनाही मनात सारखे ऐकलेल्या गाण्यांचेच बोल घुमत होते.