आधीचे भाग -
भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०,
पुढे -
ज्यांना सी वॉकची आणि स्कूबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी या बीचवर स्नॉर्केलिंगची सुविधाही उपलब्ध होती. यात टायरच्या सहाय्याने फार खोल नसलेल्या पाण्यावर तरंगता येतं आणि तोंडाला लावलेल्या ट्यूबच्या सहाय्याने श्वास घेऊन मग पाण्याखाली काही सेकंद डोकं घालून पाण्याखालचे प्रवाळ आणि मासे पाहता येतात. आमच्या बोटीचे जे पैसे भरलेले होते, त्यानुसार आम्हांला एलिफंटा बीचवरचं स्नॉर्केलिंग मोफत करता येणार होतं. बीचच्या एका बाजूला जेमतेम कंबरभर उंचीच्या हिरव्यानिळ्या नितळ पाण्यात स्नॉर्केलिंग चालू होतं.
या ट्रीपचे बेत आखत असतांना मी सी वॉक करण्यासाठी खूप उत्सुक होते, पण नेमकं ट्रीपला येण्याआधीच मी यापैकी कोणत्याही प्रकारच्या वॉटर स्पोर्टमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, हे निश्चित झालं होतं. त्यामुळे आधी या सुंदर बीचवर नुसतीच चक्कर मारत, मी या बेटावरच्या प्रसिद्ध असलेल्या फ्रुट डिशचा आस्वाद घेतला. १०० रुपयांना मिळणाऱ्या या फ्रुट डिशमध्ये काकडी, अननस, पपई, कलिंगड, आंबा, केळ, द्राक्षं, पेर, सफरचंद, संत्र, गाजर या सगळ्या फळांमुळांच्या फोडींचा समावेश होता. यातली एखाददुसरा अपवाद वगळता, बहुतेक सगळी फळं इथे बाहेरून आणली गेली होती. फ्रुट डिश तयार करणाऱ्या विक्रेतीशी गप्पा मारतांना मला समजलं, की पर्यटकांप्रमाणेच इथल्या विक्रेत्यांनाही या बीचवर दुपारी तीन नंतर थांबता येत नाही. तयार झालेली फ्रुट डिश पाहिल्यावर जाणवलं, की इतक्या सगळ्या फळांचा समावेश असणारी ही पोटभरीची पूर्ण फ्रुट डिश खाणं माझ्यासाठी अवघडच होतं.
फ्रुट डिश खाऊन झाल्यावर मी या निसर्गसुंदर बीचचं सौंदर्य कॅमेराबद्ध करत हिंडत होते. अंदमानमध्ये राधानगरचा समुद्रकिनारा हा सर्वात स्वच्छ म्हणून प्रसिद्ध असला, तरी त्यापेक्षाही नैसर्गिक सौदर्याने परिपूर्ण असलेला हा एलिफंटा बीच मला सर्वात जास्त आवडला. बीचवर असलेल्या झाडांमुळे बीचवर अजिबात गरम होत नव्हतं. वाळूवर पडलेल्या झाडांच्या वाळक्या पानांचा अपवाद सोडला, तर बीचवर स्वच्छता राखलेली होती. ठिकठिकाणी बांबूच्या विणलेल्या कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. २००४ सालच्या त्सुनामीत इथलीही झाडं पडली होती, ती बीचवर तशीच ठेवल्याने बीचच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भरच पडलेली होती. झाडांच्या सावलीतून बीचकडे बघतांना अर्धवट किनाऱ्यावर, अर्धवट पाण्यात कोसळलेल्या, आडव्यातिडव्या पसरलेल्या झाडांचे पांढरट सुंदर आकार, त्यावर काही ठिकाणी वाढलेलं तपकिरी रंगछटेचं मॉस, पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यापासून पुढे असलेलं समुद्राचं आधी पारदर्शक, मग हिरवट आणि पुढे गडद निळं होत गेलेलं, तीन रंगछटांमधलं स्फटिकासारखं स्वच्छ दिसणारं, नितळ पाणी, समोरच्या उन्हामध्ये पाण्यावर हेलकावणाऱ्या रंगीबेरंगी रिकाम्या स्पीडबोटी, वॉटर स्कूटर्स आणि एका बाजूला स्नॉर्केलिंग करणाऱ्यांचे रंगीत पोशाख, बीचवर मर्यादित लोकं असल्याने जाणवणारा निवांतपणा हे सगळं पाहून आपण एखादं चित्र बघतो आहोत की काय, असा भास होत होता. समुद्राच्या पाण्यात गेल्यावर तिथल्या स्फटिकस्वच्छ अशा नितळ पाण्यात खालच्या वाळूवरचे प्रवाळ, शंख इत्यादी अगदी स्पष्ट दिसत होते. तिथे अगदी घोटाभर उंचीच्या पाण्यात पारदर्शक छोटे मासे माझ्या अगदी जवळ फिरत होते. पाण्यात दुसरं कोणी आलं, की ते मासे सुळ्ळकन दूर पळून जायचे आणि थोड्या वेळाने परत यायचे.
 |
समुद्राचं नितळ, स्फटिकासारखं स्वछ पाणी आणि त्याच्या सोबतीने खुलणाऱ्या रंगछटा! |
 |
पायाच्या घोट्याएवढ्या उंचीच्या समुद्राच्या स्फटिकस्वच्छ, नितळ पाण्यात उभं राहिल्यावर खालच्या वाळूतले प्रवाळ, शंख इत्यादी अगदी स्पष्ट दिसत होते. |
 |
समुद्राच्या एका लाटेबरोबर आलेले पारदर्शक मासे माझ्याजवळ हिंडत होते. फोटोतले मासे कोणते आणि त्यांच्या सावल्या कोणत्या, हे पटकन सांगता येणं जरा कठीणच! |
 |
जरा स्थिर असणाऱ्या पाण्यात टिपलेले हे पारदर्शक मासे |
 |
स्नॉर्केलिंग |
 |
लाटांवर रंगलेला सूर्यप्रकाशाचा खेळ! |
 |
या फोटोतल्या वाळूवर समुद्राचं पाणीही आहे, हे फक्त एका बाजूने परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामुळेच लक्षात येतंय. |
 |
झाडांवर वाढलेलं मॉस |
 |
किनाऱ्यावर पडलेल्या झाडांच्या साथीने ठिकठिकाणी असं फोटोसेशन रंगलं होतं. झाडांच्या खोडांपलिकडे ग्लास बॉटम बोट दिसतेय, त्याच्या पलिकडे स्नॉर्केलिंग चालू होतं. |
 |
झाडांच्या घनगर्द सावलीतून टिपलेलं बीचवरचं दृश्य! |
पाण्यातल्या त्या पारदर्शक माशांचे मॅक्रो लेन्सने फोटो काढावे म्हणून मी लेन्स घेण्यासाठी किनाऱ्यावर आले, तेवढ्यात जोशींनी मला, "ग्लास बॉटम बोटीतून चक्कर मारायला येणार का?" म्हणून विचारलं आणि आम्ही तिकडे गेलो. ग्लास बॉटम बोटीतून चक्कर मारण्यासाठी माणशी ३०० रुपये दर होता. पैसे घेणाऱ्या माणसाने सांगितलं, की "आज पाणी अगदी स्वच्छ, नितळ आहे आणि दुपारची वेळ आहे, त्यामुळे तुम्हांला पाण्याखालचं सगळं दृश्य स्पष्ट बघायला मिळेल." बोटीच्या कडेच्या भागात लोकांना बसण्यासाठी लाकडी फळ्या ठोकलेल्या होत्या आणि मधल्या रिकाम्या भागात, बोटीच्या तळाला काच लावलेली होती. आम्ही सहाजण त्या काचेच्या कडेला असलेल्या फळ्यांवर बसलो. आम्हांला घालण्यासाठी फुगलेली लाईफ जॅकेट्स देण्यात आली. लाईफ जॅकेट्स चढवून आम्ही खालच्या काचेकडे बघत होतो. खालच्या काचेवर ऊन येणार नाही असं आच्छादन बोटीवर घातलेलं होतं, त्यामुळे पाण्याखालचं दृश्य स्पष्ट दिसत होतं.
बोट चालू झाली आणि आम्हांला काचेतून पाण्याखालचे विविध आकारांचे, प्रकारांचे प्रवाळ आणि शैवालं, लहानमोठ्या आकारांचे झुंडीने किंवा एकट्याने फिरणारे रंगीबेरंगी मासे, तारामासा (स्टारफिश) असे वेगवेगळे जलजीव दिसायला लागले. जशा जमिनीवर डोंगररांगा पसरलेल्या दिसतात, तशाच प्रकारे कमीजास्त उंचीचे प्रवाळ समुद्राच्या पाण्याखाली पसरलेले दिसत होते. पंख्यासारखे पसरलेले, फांद्यांप्रमाणे वाढलेले, कपासारखे खोलगट आकाराचे, दगडांसारखे गोलाकार दिसणारे असे वेगवेगळ्या रंगांचे प्रवाळ इकडेतिकडे पसरलेले दिसत होते. त्यातल्या काही प्रवाळांच्या हलणाऱ्या शुंडंकांमधून लहान केशरी मासे, काळे मासे, मध्यम आकाराचे काळे पिवळे पट्टेरी मासे, विदूषक मासे, मोठा काळपट मासा, मोरपिसासारखे जांभळट रंग असलेला मोठा मासा असे विविध प्रकारचे मासे त्यांचे अन्न शोधत फिरत असलेले दिसत होते. हे सगळं दृश्य बघण्याचा आनंद काही वेगळाच होता. मी त्या समुद्राखालच्या दृश्याचे फोटो घ्यायचा प्रयत्न केला, पण एकतर बोट हळू वेगात का होईना, पण चालू असल्याने प्रत्येक वेळी पाण्याखालच्या प्रवाळांची उंची कमीजास्त झालेली असायची आणि ग्लास बॉटम बोटीच्या काचेतून फोटो घ्यावे लागत असल्याने, ते फोटो धूसर येत होते, पण आम्हांला मात्र समुद्रतळाचं ते सगळं मनोवेधक दृश्य सुस्पष्ट दिसत होतं. ग्लास बॉटम बोट लोकांना साधारण दहा मिनिटं फिरवून आणत असल्याने, सी वॉक किंवा स्कूबा डायव्हिंगमध्ये समुद्राखालचे जेवढे जलजीव बघायला मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रातले जलजीव ह्या बोटीतून आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जे लोक सी वॉक किंवा स्कूबा डायव्हिंग करू शकत नाहीत, त्यांनी ग्लास बॉटम बोटीतून अवश्य चक्कर मारावी आणि हा आनंददायी अनुभव घ्यावा.
 |
ग्लास बॉटम बोटीतून सफर करतांना फोटोत प्रवाळ टिपण्याचा केलेला एक प्रयत्न! फोटोत प्रवाळ अस्पष्ट दिसत असला, तरी आम्हांला मात्र पाण्याखालचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं. |
 |
काही ठिकाणी पाण्यात वरपर्यंत वाढलेले प्रवाळ अगदी बोटीच्या काचेलगत आल्यासारखे दिसत होते. |
आम्ही काहीजण बोटीतून फिरून आलो, पण धोंडकाकू मात्र कशातही भाग न घेता आमच्या सगळ्यांचं सामान सांभाळत बसल्या होत्या. या बीचवर बरेचसे लोक वॉटर स्पोर्ट्सवाल्या लोकांच्या काऊंटरसमोर त्यांचं सामान सोडून वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासाठी जात होते आणि त्यांचं सामानही सुरक्षित राहिलेलं दिसत होतं. मात्र या सुंदर बीचवरची टॉयलेट्स दिसली तेव्हा, सिमेंटच्या कोब्यावर पत्र्यांचा आडोसा वापरून तयार केलेली टॉयलेट्स पाहून मला सखेद आश्चर्य वाटलं. टॉयलेट्स स्वच्छ होती, पण तिथे बाहेर पिंपात भरून ठेवलेलं पाणी आत घेऊन जावं लागत होतं. तसंच वॉटर स्पोर्ट्समध्ये सहभागी झालेल्या लोकांना तिथे आंघोळ करण्यासाठीही पिंपातून पाणी घ्यावं लागत होतं, ज्यांना शॉवर घ्यायचा होता, त्यांच्यासाठी एक रबरी नळी लावून शॉवरची सोय केली होती आणि या दोन्हीसाठीही असाच जेमतेम आडोसा तयार केलेला होता. टॉयलेट वापरण्यासाठी दहा रुपये शुल्क होतं. लोकांकडून पैसे घेऊन का होईना, पण तिथे व्यवस्थित बांधलेली टॉयलेट्स असायला हवीत असं वाटून गेलं. अजून काही दिवसांनी या सोयी तिथे झालेल्या दिसतील अशी माझी अपेक्षा आहे. या सुंदर बीचवरची एवढी एकच खटकण्यासारखी गोष्ट सोडली, तर बाकी आम्ही या बीचच्या सौंदर्याने मोहून गेलो होतो.
अचानक जोशींनी आम्हांला, "आपण आता निघायचं का?" म्हणून विचारलं. आम्हांला परत जाणं भागच होतं, तरी या सुंदर बीचवरून इतक्या लवकर परत जावं असं मला वाटत नव्हतं. मात्र तिथून निघण्यापूर्वी सी वॉक करून आलेल्या माझ्या कुटुंबियांसाठी मी मुद्दाम फ्रुट डिशचं पार्सल विकत घेतलं आणि मगच आम्ही आमच्या 'सी क्वीन' बोटीकडे निघालो. या सुरम्य बीचचा निरोप घेत, आम्ही आठजण सगळयात आधी बोटीतून परत निघालो होतो. या परतीच्या प्रवासात तिथला निळाशार समुद्र मी पुन्हा एकदा डोळेभरून पाहून मनातल्या मनात साठवून घेतला.
 |
सुरम्य एलिफंटा बीचचा निरोप घेतांना |
 |
फ्रुट डिशचं पार्सल |
बोटीतला हा प्रवास संपवून, सकाळच्या समुद्रकिनाऱ्यावर परत आल्यावर तिथेच रेंगाळत किनाऱ्यावरचे प्रवाळ गोळा करणाऱ्या आम्हांला हॉटेलवर नेण्यासाठी लगेच टॅक्सी आली. हॉटेलच्या पोर्चमध्ये एका बाजूला लोकांना हातपाय धुण्यासाठी एका बादलीत पाणी आणून ठेवलेलं होतं. आम्ही हातपाय धुतले, तरी आत येणाऱ्या लोकांबरोबर थोडी तरी समुद्राची वाळू हॉटेलच्या फरशीवर येत होती. आदल्या दिवशी याच हॉटेलमधली आमची खोली झाडण्यासाठी कोणी फिरकलं नव्हतं, पण आता मात्र लगेच हॉटेलचा एक कर्मचारी येऊन स्वागतकक्ष झाडून घेत होता. आम्ही स्वागतकक्षात विसावलो, तोच पुन्हा एकदा सगळ्यांसमोर थंडगार वेलकम ड्रिंक आलं.
No comments:
Post a Comment