आधीचे भाग -
पुढे -
मंदिराचा शोध थांबवून आम्ही बीचवर जिथे परतलो होतो, तिथे जवळच काही अंतरावर आमच्या ग्रुपमधले काहीजण थांबलेले होते. ती जागा मुख्य बीचपासून थोडी दूर होती. आम्हीही तिथेच थांबायचं ठरवलं. तिथे अजिबात गर्दी नव्हती. झाडांजवळून तिथे येतांना वाळूत आम्हांला एक भलामोठा प्रवाळ सापडला. हाताच्या पंज्यापेक्षाही मोठ्या असणाऱ्या त्या प्रवाळाचं मानवी चेहऱ्याशी असणारं साधर्म्य जाणवत होतं. मग कोणाकोणाला असे प्रवाळाचे सुंदर नक्षी असलेले तुकडे गोळा करतांना पाहून मलाही प्रवाळाचे तुकडे गोळा करण्याचा मोह आवरला नाही. अर्थात नंतर ते प्रवाळ आम्हांला तिथेच हॉटेलवर सोडून द्यावे लागणार होते. मग एकीकडे समुद्राच्या निळ्या फेसाळ पाण्यात भिजत, अधूनमधून सगळ्यांचे फोटो काढत, रत्नाकर नाव सार्थ करणाऱ्या समुद्राच्या लाटांबरोबर येणारे प्रवाळांचे तुकडे गोळा करत आम्ही तिथल्या समुद्राचा मनसोक्त आनंद घेत होतो. मला मध्येच वाळूत पसरलेली एक शिंपल्याची जोडी दिसली. खेकड्यांनी तर वाळूत ठिकठिकाणी नक्षी उमटवून ठेवलेली होती. आमच्यातले काहीजण पाण्यात अजून थोडे पुढे गेले आणि पोहायला लागले. कीरकाकांनी पोहोतांना त्यांना सापडलेले प्रवाळांचे तुकडे मला आणून दिले.
 |
हाताच्या पंज्यापेक्षाही मोठ्या असणाऱ्या या प्रवाळाच्या तुकड्याचं मानवी चेहऱ्याशी असणारं साधर्म्य! |
 |
हा एक छोटुकला नक्षीदार प्रवाळ! |
 |
वाळूतली नक्षी! |
 |
संपूर्ण किनाऱ्यावर जणू या नक्षीची रांगोळी घालून ठेवलेली होती. |
 |
फुलपाखरासारखी वाळूत पसरून बसलेली शिंपल्याची जोडी! |
 |
बालपणाची आठवण करून देणारा वाळूतला किल्ला |
समुद्राच्या पाण्यात भिजतांना राधानगरचा तो आकाशी निळा समुद्र पाहून मन प्रसन्न होत होतं. थेट क्षितिजापर्यंत पसरलेला आकाशी निळ्या रंगाचा अथांग समुद्र, समुद्रात दूरवर तरंगणाऱ्या दोनतीन बोटी, आमच्या दोन्ही बाजूंना दूरपर्यंत पसरलेला पांढऱ्या वाळूचा स्वच्छ समुद्रकिनारा, त्यात पांढराशुभ्र फेस घेऊन पायावर येणाऱ्या आकाशी निळ्या लाटा, आमच्या बाजूला अजिबात गर्दी नसल्याने पाण्याचा घेता येणारा मनसोक्त आनंद आणि पश्चिमेला कलणाऱ्या सूर्यामुळे आकाशात उधळले गेलेले सुंदर संध्यारंग निरखतांना वेळेचं हरवलेलं भान यामुळे आमचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही.
 |
आधी कलत्या दुपारच्या वेळी सूर्याच्या सूर्यप्रकाशाने समुद्र असा तेजाने झळाळून उठला होता. |
 |
समुद्राकडे पाठ करून समुद्राच्या पाण्यात उभं राहिलं, तर मात्र किनाऱ्यावरची ही सुंदर हिरवाई दिसत होती. |
 |
किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटेचा शुभ्रधवल फेस फोटोत टिपण्याचा हा एक प्रयत्न! |
 |
दूरपर्यंत पसरलेला स्वच्छ समुद्रकिनारा |
 |
दूरवर समुद्राच्या पाण्यात संथपणे तरंगणारी ही दोन होडकी! |
थोड्या वेळाने सूर्यास्ताची वेळ जवळ आली, तसे किनाऱ्यावरचे सुरक्षारक्षक पाण्यातल्या लोकांना पाण्यातून बाहेर यायची सूचना द्यायला लागले. आम्हीही पाण्यातून बाहेर येऊन सूर्यास्त पाहत होतो. क्षितिजापाशी असलेल्या ढगांमुळे थेट सूर्यास्त पाहता आला नाही, तरी सूर्य त्या ढगांआड जाईपर्यंत मी सूर्यास्ताचे फोटो काढतच होते. सूर्य दिसेनासा झाल्यावर मात्र आम्ही भराभर चालत तिथून बाहेर पडलो.
 |
मावळणाऱ्या सूर्याला दोन बोटांच्या चिमटीत पकडायचा एक असफल प्रयत्न |
 |
सूर्याला हातात घेणंही काही सोपं नसतं! |
 |
सूर्य ढगांआड गेला आणि बीचवरून परतण्यासाठी लोकांची घाई सुरू झाली. |
बीचच्या प्रवेशद्वाराबाहेर काहीजण शहाळे विकत होते. दुपारी येतांना काहीजणांनी तिथे शहाळी विकत घेतली होती. मी तेव्हा तिथे नसल्याने, आता परततांना शहाळं विकत घेतलं. शहाळ्याच्या पाण्याला फार गोडी नव्हती, पण शहाळ्यात पाणी भरपूर होतं. मग आमचा सगळ्यांचा संध्याकाळचा चहा झाला. तिथून परत हॉटेलवर येऊन सगळेजण फ्रेश झाले. आमच्या खोलीत समुद्राच्या वाळूमुळे पायाला कचकच लागत होती, म्हणून "रुम क्लीनिंगसाठी कोणाला तरी पाठवा," असा काऊंटरवर फोन केल्यावर, चहाचे कप नेण्यासाठी हॉटेलचा एक कर्मचारी हजर झाला. त्याला रुम क्लीनिंग म्हणजे खोली झाडून घेण्यासाठी फोन केला होता, हे सांगितल्यावर तो गायब झाला. मग खोली झाडून घ्यायला नंतर कोणी आलंच नाही. त्याची वाट बघता बघता रात्रीची जेवायची वेळ होऊन गेली.
रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही बाहेर चक्कर मारण्यासाठी निघालो, त्यावेळेपर्यंत तिथली सगळी दुकानं बंद झालेली होती, रस्त्यावरही एखादं दुसरं वाहन सोडल्यास कोणीही नव्हतं. तिथे रस्त्याशेजारी उंच फूटपाथ न बांधता, रस्त्याच्या कडेच्या भागात, रस्त्यालगत छोटे कठडे बसवून तो भाग पादचाऱ्यांना फूटपाथ म्हणून वापरता यावा, अशी सोय केली होती. वाटेत एका ठिकाणी आम्हांला बंगाली अक्षरात असलेली एक पाटी दिसली. त्या पाटीवर नेमकं काय लिहिलेलं आहे, याबद्दल आमची चर्चा झाली आणि शेवटी कोणा बंगाली वाचता येणाऱ्या व्यक्तीला ते विचारावं म्हणून आम्ही त्या पाटीचा फोटो काढून घेतला. नंतर आम्हांला कळलं, की नातूंच्या मुलीने अंदाज केला होता, त्याप्रमाणे त्या पाटीवर "हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे" (হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ, কৃষ্ণ কৃষ্ণ হরে হরে, হরে রাম হরে রাম, রাম রাম হরে হরে) असं लिहिलेलं होतं.
 |
बंगालीत लिहिलेली ही पाटी - "हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे" (হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ, কৃষ্ণ কৃষ্ণ হরে হরে, হরে রাম হরে রাম, রাম রাম হরে হরে) |
आम्ही बाहेरून चक्कर मारून आलो. तोपर्यंत आमच्या ग्रुपमधले बहुतेकजण हॉटेलच्या स्वागतकक्षातच बसलेले होते. कानड्यांच्या मुलीला तिची स्कूबा डायव्हिंगची सी.डी. बघायची होती. त्यासाठी तिने हॉटेलच्या मॅनेजरकडे काऊंटरवरच्या कॉम्प्युटरवर सी.डी. बघायची परवानगी मागितली होती. मॅनेजरने परवानगी दिल्यामुळे आम्ही सगळेजण तिची सी.डी. बघायला थांबलो होतो. सी.डी. लावल्यावर लक्षात आलं, की त्या सी.डी.त तिच्याऐवजी दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो आणि व्हिडिओ आहेत. अजून एका सीडी.ची अशीच गडबड झालेली होती. हा गोंधळ पाहिल्यावर मग सगळ्यांच्या स्कूबा डायव्हिंगच्या सी.डी. चेक केल्या गेल्या. काही जणांच्या सी.डी. बरोबर होत्या, तर काहींच्या सी.डी.त फोटो आणि व्हिडिओची गडबड झालेली होती. मग देवेंद्र गंद्रेंनी स्कूबा डायव्हिंग सेंटरच्या लोकांना फोन केल्यावर त्यांनी नव्याने सी.डी. राईट करून देण्याची हमी दिली.
No comments:
Post a Comment