आधीचे भाग -
पुढे -
दुपारी साडेतीनच्या सुमाराला आम्ही पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार होऊन खाली आलो. आता आम्हांला जगातला सातव्या क्रमांकाचा बीच म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरच्या बीचवर जायचं होतं. हा बीच हॉटेलपासून जरा लांब अंतरावर होता. बीचवर जातांना मी कानडे आणि कुलकर्णी कुटुंबियांबरोबर एका टॅक्सीतून पुढे गेले. माझ्या कुटुंबातले बाकीचे सगळे मागच्या टॅक्सीतून येत होते.
आमच्या टॅक्सीच्या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी सुपारीची आणि नारळाची झाडं दिसत होती. ती झाडं पाहून कानड्यांच्या मुलीने ड्रायव्हरला एकापाठोपाठ एक वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरूवात केली. त्याने दिलेल्या उत्तरातून जे समजलं, ते असं, 'या बेटावर नारळ, सुपारी, तांदूळ इत्यादी पीकं घेतली जातात. आमच्या टॅक्सीचा ड्रायव्हर बंगाली होता. बेटावर काम करतांना दिसणारे बहुतेक लोक बाहेरून म्हणजे पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडू मधून आलेले होते. बेटावरची व्यवस्था पाहणारा अधिकारी म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर. बेटावरच्या मूळ आदिवासी लोकांमध्ये काही तंटा झाला, तर ते लेफ्टनंट गव्हर्नरकडे न जाता, त्यांच्या मुखियाकडे जाऊन तो तंटा सोडवतात. इथल्या नोकऱ्यांमध्ये इथल्या मूळ लोकांकरता ज्या राखीव जागा ठेवलेल्या असतात, त्या जागांसाठी पुरेशी शैक्षणिक पात्रता असलेले मूळ लोक उपलब्ध झाले नाहीत, तरी इथल्या मूळ लोकांच्या संघटनेच्या दबावामुळे त्या जागांवर थोड्या कमी शैक्षणिक पात्रतेचे मूळ लोक भरावे लागतात. त्या जागांवर बाहेरून आलेल्या लोकांची भरती करता येत नाही.' ड्रायव्हरच्या ह्या तक्रारीत किती तथ्य आहे, हे मला माहित नाही. त्याशिवाय पोर्ट ब्लेअरप्रमाणे या बेटावरही प्रवाशांना फिरण्यासाठी भाड्याने बाईक घेता येतात, ही माहितीही ड्रायव्हरने दिली होती.
आम्ही बीचवर पोहोचलो. आकाशी निळ्या रंगाचा समुद्र आणि किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू असलेला हा स्वच्छ समुद्रकिनारा दूरपर्यंत पसरलेला दिसला. ह्या समुद्रकिनाऱ्याच्या मुख्य भागात एका बाजूला लाकडाचे ओंडके कोरून लोकांना बसण्यासाठी सोय केली आहे, तसंच झावळ्यांचं छप्पर असलेले एकदोन मंडपही आहेत. बीचच्या बाहेरच्या बाजूला बसलेले फळविक्रेते सोडले, तर बीचवर कोणतेही इतर विक्रेते मला दिसले नाहीत. कलत्या दुपारच्या या वेळीही काही लोक तिथे पोहत होते, पण बीचवर फार गर्दी नव्हती. काही परदेशी लोकंही तिथे होते. त्यांच्याबरोबरच्या बिकीनी घातलेल्या परदेशी ललना कंबरेभोवती रिंग फिरवण्याचा खेळ खेळत होत्या, पण त्यांचे कपडे अगदीच तोकडे आहेत, हे पाहून बाजूला बसलेल्या पंधरावीस महाराष्ट्रीयन स्त्रीपुरुष लोकांचा घोळका मराठीत मोठ्याने अप्रत्यक्ष शेरेबाजी करत होता. त्या परदेशी ललनांनाही हे जाणवलं असणार, की ती शेरेबाजी त्यांनाच उद्देशून चालली आहे, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आपल्या शेरेबाजीचा कोणता प्रतिकूल परिणाम होतो, याचं भान त्या सुशिक्षित दिसणाऱ्या स्त्रीपुरुषांना नव्हतं आणि समजावून सांगितल्यावर ते ऐकतील असंही वाटत नव्हतं.
तेवढ्यात मला पाठीमागून येणारे माझे कुटुंबिय आणि त्यांच्या बरोबर येणारे ग्रुपमधले काहीजण बीचच्या दुसऱ्या बाजूकडे जातांना दिसले, म्हणून मीही तिकडे वळले. तिकडच्या बाजूला शंकराचं मंदिर असल्याची पाटी लावलेली होती, म्हणून ते सगळेजण मंदिरात जायला निघाले होते. मग मीही त्यांच्याबरोबर तिकडेच निघाले. आम्ही झाडाझुडुपांमधून जाणाऱ्या एका रस्त्याने निघालो आणि परत बीचवरच येऊन पोहोचलो. त्याचवेळी आम्हांला समोरच्या झाडीतल्या रस्त्याने एक हत्ती त्याच्या माहूतांसोबत येत असलेला दिसला.
![]() |
बीचवर हत्तीचं आगमन! |
बीचच्या त्या भागात वाळूपाठीमागच्या झाडांमधून पाण्याचा एक लहानसा प्रवाह येऊन त्याचं छोटंसं तळं तयार झालेलं होतं आणि त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवर खारफुटीच्या वेली आणि वनस्पती पसरलेल्या दिसत होत्या. हत्तीचा माहूत त्याच्या मदतनीसासोबत हत्तीला त्या तळ्याकडे घेऊन गेला आणि त्याने हत्तीला आंघोळ घातली. त्या माहुताला, "इथे शंकराचं मंदिर कुठे आहे?" म्हणून विचारल्यावर त्याने, "इथे जवळच आहे." म्हणून उत्तर दिलं. मग तो माहूत ज्या रस्त्याने आला होता त्याच रस्त्याने परत निघाला. तिथेच मंदिर असावं ह्या अंदाजाने आम्ही सगळेजणही त्याच रस्त्याने निघालो.
![]() |
किनाऱ्यालगतच्या झाडांमधून वाहत आलेला पाण्याचा प्रवाह आणि त्यातून पुढे आलेल्या खारफुटीच्या वेली |
![]() |
जगातला सातव्या क्रमांकाचा हा पांढऱ्या वाळूचा स्वच्छ समुद्रकिनारा आणि समुद्राचं निळसर पाणी |
![]() |
मदमस्त हत्तीची आंघोळ - स्वच्छ समुद्रकिनाऱ्यालगतच्या ह्या तळ्याजवळ मात्र जवळच झालेल्या कुठल्यातरी बांधकामाची रिकामी सिमेंटची पोती आणि काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा पडलेला होता. |
आम्ही मंदिराच्या शोधात ज्या रस्त्यावरून जात होतो, त्या रस्त्याच्या नव्हे पायवाटेच्या दोन्ही बाजूंना भरपूर झाडंझुडपं होती. पुन्हा एकदा मोठमोठाल्या मुळ्या पसरलेले, उंचउंच खोडांचे जणू आकाशाला स्पर्श करू पाहणारे वृक्ष आणि त्यांच्याभोवती वाढलेली झुडपं अशी अंदमानची अनोखी वनस्पतिसंपदा पाहत आम्ही निघालो. ह्या झाडांकडे पाहिल्यावर अस्पर्शित अशा अंदमानच्या भूभागाचं निसर्गवैभव किती अफाट असेल ह्याची कल्पना येत होती. मध्येच झाडांवरचे वेगवेगळे पक्षी दिसत होते. मी त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला, पण ते अजिबात स्थिर बसत नसल्याने, त्यांचे फोटो नीट येऊ शकले नाहीत.
![]() |
पायवाटेवरून जातांना आजूबाजूला दिसणारी अजस्र झाडं! फोटोच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातली व्यक्ती आणि तिच्यासमोरचं झाड यावरून झाडांच्या आकाराचा अंदाज येऊ शकेल. इथून पुढे कसलंतरी बांधकाम चालू होतं. |
![]() |
Scaevola taccada flower - एका खारफुटीच्या झाडाचं लक्षवेधक फूल |
![]() |
Scaevola taccada fruits - खारफुटीची फळं |
![]() |
अखेर झाडाच्या निष्पर्ण फांद्यांवर बसलेले दोन पक्षी मी दुरून का होईना फोटोत टिपलेच! |
आम्ही त्या पायवाटेने पुढची तीनचार वळणं पार करत पुढेपुढे जात होतो, पण ते शंकराचं मंदिर काही दिसेना. मघाचा हत्तीही आता कुठे गायब झाला होता, तोही दिसत नव्हता. एका बाजूला झाडं तोडून कसलंसं बांधकाम चालू असलेलं दिसत होतं. आता असेच पुढे चालत राहिलो, तर बीचवर असलेल्या आपल्या ग्रुपमधल्या बाकीच्या लोकांबरोबर आपली चुकामुक होईल, या विचाराने आम्ही मागे फिरून बीचवर आलो. मात्र आता बीचवर सरळ पुढे चालत गेलं, तर तिथे शंकराचं मंदिर असेल, असा विचार करून नातूकाका पुढे निघाले होते, पण त्यांच्या कुटुंबातले बाकीचे (आमच्याप्रमाणेच) पुढे यायला तयार नसल्याने, नाईलाजाने त्यांनाही थांबावं लागलं. बीचवरून सरळ पुढे गेलेल्या धोंड कुटुंबियांना मात्र शंकराचं दर्शन घडलं.
No comments:
Post a Comment