आधीचे भाग -
पुढे -
नाश्ता आटोपल्यावर थोड्याच वेळात आम्ही बसने बोटीच्या धक्क्याकडे निघालो. मॅक क्रूझ बोटीचा हा धक्का जवळच होता. तिथल्या प्रवेशद्वारावर आमच्या सगळ्यांच्या ओळखपत्रांची तपासणी होऊन मग आम्हांला सगळ्यांना आत सोडण्यात आलं. आमची तिकीटं देण्यात आली. आमची बोट धक्क्याला लागेपर्यंत आम्ही काही मिनिटं तिथल्या प्रतिक्षालयात बसलो. पावणेनऊच्या सुमारास बोट आल्यावर आम्ही तिकडे निघालो आणि तिथे जातांना समोर दिसणाऱ्या हिरव्यानिळ्या समुद्राच्या पाण्याच्या दर्शनाने माझं मन प्रसन्न झालं.
बोटीच्या दाराशी उभे असलेले दोन क्रू मेंबर्स लोकांना बोटीत चढायला मदत करत होते. आमच्यापैकी बहुतेकांना बोटीच्या वरच्या मजल्यावरच्या डीलक्स क्लासमध्ये सीट मिळालेल्या होत्या. तिथे आमच्या ग्रुपचेच लोक जास्त असल्याने, "इथे आहेत त्या रिकाम्या सीटवर बसून घ्या, नंतर त्या सीटवर (सीट नंबर प्रमाणे) बसणारं कोणी आलं, तर नंतर सीट बदलता येतील." असं आम्हांला सांगितलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे कोणी कुठेही बसले होते. नंतर काही इतर प्रवासी आल्यामुळे आम्हां दोघातिघाजणांना जागा बदलाव्या लागल्या. माझा भाऊ एका परदेशी बाईच्या सीटवर बसलेला होता, पण त्या सीटजवळच ए.सी. होता. ए.सी. जवळची सीट नको म्हणून त्या बाईला त्याऐवजी माझ्या भावाला सीट नंबर प्रमाणे मिळालेल्या सीटवर बसायचं होतं, पण त्याची सीट नेमकी कुठे आहे ते त्याने पाहिलेलंच नसल्याने त्याला ते काही सांगता येईना. (ते पाहून नक्कीच त्या बाईने मनातल्या मनात भारतीय लोकांच्या बेशिस्तीला नावं ठेवली असणार.) मग दुसऱ्या कोणीतरी उठून त्यांची सीट त्या बाईला देऊ केली आणि गोंधळ संपवला.
मला खिडकीजवळची जागा मिळाली होती, पण खिडकीच्या काचेला गडद रंगाची फिल्म लावलेली असल्याने, बाहेरचं दृश्य काही खास दिसत नव्हतं. बोट चालू झाल्यावर ती पाण्यात चांगलीच हलत होती, हे आमच्या आरामशीर सीटवर बसूनही जाणवत होतं. बोटीच्या मधल्या भागात बसलेल्या लोकांना, कडेला बसलेल्या लोकांच्या तुलनेत कमी हेलकावे जाणवत होते. आता हॅवलॉक बेटापर्यंतचा दोन तासांचा बोटीचा प्रवास असाच होणार होता. त्या दरम्यान कोणाला बोट लागली तर त्यासाठी तिथे व्होमिटींग बॅग्जही ठेवलेल्या होत्या.
मग समोरच्या भिंतीवर असलेले दोन टी.व्ही. चालू झाले आणि त्यावरून 'संकटसमयी सीटखाली असलेलं लाइफ जॅकेट कसं वापरायचं, इतर काय खबरदारी घ्यायची' याच्या सूचना देण्यात आल्या. मग अंदमानची थोडी माहिती दिली गेली, सी वॉकचा एक व्हिडिओ दाखवला गेला. तोपर्यंत बोटीवरच्या क्रू मेंबर्सनी डीलक्स क्लासमधल्या लोकांना खाद्यपेयांची पाकीटं वाटली होती. (प्रीमियम क्लासवाल्यांना खाद्यपेयांची पाकीटं दिली जात नाहीत, मात्र तिथल्या दुकानातून त्यांना हवे ते पदार्थ विकत घेता येतात.)
एव्हाना क्रू मेंबर्स प्रमाणे काही प्रवासीही काहीतरी कारण काढून बोटीत इकडेतिकडे जायला लागले होते. समोरचं दार उघडून आत जाणारे क्रू मेंबर्स पाहून आमच्या ग्रुपमधल्या कोणीतरी विचारलं, की "आम्ही इथे आत काय आहे, ते पाहू शकतो का?" त्यांना आत जायची परवानगी मिळाली आणि ते तिथे आत काय आहे ते पाहून आले. मग ते बाहेर आल्यावर उगीचच इतरांना तिथे काय आहे, ते बघावंसं वाटलं. मग एकेक करत सगळे उठायला लागले आणि आत काय आहे, ते बघून यायला लागले. नंतर तिथे लोकांची रांगच लागली, क्रू मेंबर्स बिचारे एका वेळी तीनचार लोकांना आत सोडत होते. एव्हाना आमचा टी.व्ही. बघण्यातला इंटरेस्ट संपला होता. अर्ध्याहून अधिक लोक आत जाऊन आल्यानंतर शेवटचे आम्ही उरलेले काहीजण रांगेत उभे राहिलो.
दारातून आत गेलं, की पुढे मोकळ्या डेकवरून समुद्र दिसेल अशी आमची कल्पना होती, प्रत्यक्षात तिथे आतमध्ये बोटीची कंट्रोल रुम होती. कंट्रोल रूममधल्या काचा फारच उंचावर होत्या आणि त्यातून समोरचा समुद्र जेमतेम दिसत होता. तिथे कप्तान आणि इतर क्रू मेंबर्स उंच खुर्च्यांवर बसून समोरच्या अत्याधुनिक मशिन्सच्या सहाय्याने बोट चालवत होते. रडार आणि समुद्रातले अडथळे टिपणाऱ्या इतर आधुनिक मशिन्समुळे त्यांना काचेतून बाहेर बघण्याची फारशी गरज वाटत नव्हती. अशा प्रकारे आमचा थोडा अपेक्षाभंग झाला, तरी त्यानिमित्ताने कंट्रोल रुम बघण्याचा एक वेगळा अनुभव मिळाला होता.
पावणेअकराच्या सुमारास आमची बोट हॅवलॉक बेटावर पोहोचली आणि बोटीतून बाहेर आल्यावर पुन्हा आम्हांला समुद्राचं हिरवंनिळं सुंदर पाणी दिसलं. इथला धक्क्याभोवतालचा समुद्र मला सकाळी पाहिलेल्या पोर्ट ब्लेअरच्या समुद्रापेक्षाही जास्त सुंदर वाटला. अगदी धक्क्यालगत असूनही किनाऱ्याजवळचं समुद्राचं हिरवट पाणी अगदी स्वच्छ, नितळ दिसत होतं. त्या पाण्याखालचे प्रवाळ, मासे, शैवाल इत्यादी अगदी स्पष्ट दिसत होते. धक्क्याबाहेर येतांना पुन्हा सगळ्यांची ओळखपत्रं तपासली गेली. तिथून आम्ही बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीने हॉटेल किंग्डमकडे निघालो.
![]() |
हॅवलॉक बेटावरचा धक्का |
![]() |
इथल्या समुद्राचं हिरवट निळसर पाणी पाहून मन एकदम प्रफुल्लित झालं. |
![]() |
समुद्राचं पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ होतं, की पाण्याखालचे थेट किनाऱ्यापर्यंत वाढलेले प्रवाळही स्पष्ट दिसत होते. |
हॉटेल किंग्डममध्ये गेल्यावर लगेच समोर वेलकम ड्रिंक आलं, मग सगळ्यांना खोल्यांचं वाटप करण्यात थोडा वेळ गेला. हॉटेलच्या त्याच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यांवर सगळ्यांना खोल्या दिल्या गेल्या होत्या. ज्यांच्या खोल्यांमध्ये तिसरी जास्तीची व्यक्ती असणार होती, त्यांना हॉटेलमधल्या पॅसेजच्या एका बाजूला असलेल्या प्रशस्त खोल्या दिल्या होत्या आणि ज्यांच्या खोलीत दोनच व्यक्ती असणार होत्या, त्यांना समोरच्या लहान खोल्या दिलेल्या होत्या. या हॉटेलमध्ये तिसरा जास्तीचा बेड देतांना त्याच्यासोबत कॉटही आणून दिली जात होती. (सहसा इतर हॉटेल्समध्ये जास्तीचा बेड जमिनीवर टाकला जातो, असा माझा अनुभव होता.)
आमच्या ए.सी. खोलीत बेडच्या बाजूला असलेली साईड टेबल्स, रॉट आयर्नच्या खुर्च्या, एका छोटा टीपॉय आणि भिंतीत असलेलं दाराजवळचं कपाट असं फर्निचर होतं. कपाटापुढे भिंतीत एक ग्रॅनाईटची पट्टी बसवून टेबलसारखी सोय केली होती. खोलीतला आरसा मात्र काहीसा दाराजवळ होता. इथेही डासांसाठी मॉस्किटो रिपेलंट ठेवलेलं होतं. खोलीत फोन होता, त्याच्या जोडीला फ्रीजही होता. मात्र फ्रीजमधल्या वस्तू वापरल्यास त्यांचा वेगळा चार्ज भरावा लागणार होता. टी.व्ही. वर मोजकेच चॅनेल्स लागत होते आणि त्यात एकही मराठी चॅनेल नव्हता. खोलीच्या खिडक्यांवरचा पडदा बाजूला केल्यावर समोर फक्त झाडं दिसत असल्याने मोकळं वाटत होतं. आमच्या प्रशस्त खोलीच्या तुलनेत टॉयलेट अगदीच लहान होतं. तिथे कमोड आणि गिझरचा नळ अगदी जवळ असल्याने ते काहीसं अडचणीचं होत होतं, नळाला फक्त सकाळी गरम पाणी येत होतं आणि तेही सहा वाजता येत असल्याने त्या विशिष्ट वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत आंघोळ करणाऱ्यांना गार पाण्याने आंघोळ करावी लागत होती, कपडे ठेवण्यासाठी असलेला स्टँड फार उंचावर होता आणि तो स्कूबा डायव्हिंग करून येणाऱ्यांचे कपडे वाळत घालण्याच्या दृष्टीने अपुरा होता (त्यासाठी रॉट आयर्नच्या खुर्च्यांचा उपयोग करावा लागत होता), बेसिनजवळ जास्तीचं सामान ठेवायला फारशी जागा नव्हती. आमच्या खोलीत टॉवेलव्यतिरिक्त दोन साबणाच्या वड्या आणि दोन शाम्पूची पाकीटं दिलेली होती.
No comments:
Post a Comment