आधीचे भाग -
पुढे -
टेकाडासारख्या उंचवट्यावर वसलेल्या हॉटेल 'एन्. के. इंटरनॅशनल' च्या मुख्य इमारतीत शिरल्याबरोबर सर्वांच्या समोर थंडगार वेलकम ड्रिंक आलं. मुंबईपेक्षा जरा जास्त उष्ण पण काहीशा कमी दमट अशा अंदमानच्या वातावरणात त्या थंड पेयाची आवश्यकता होतीच. आमच्या चाळीस जणांच्या ग्रुपला खोल्यांचं वाटप करायचं असल्याने, प्रत्येकाला खोलीच्या किल्ल्या द्यायला जरा वेळ लागत होता. आमच्या खोलीच्या किल्ल्या मिळाल्या, पण काही खोल्यांची साफसफाई होत असल्याने तोपर्यंत चहा घेऊन मग आम्ही आमच्या खोल्यांकडे निघालो. हॉटेलचे कर्मचारी मागून आमचं सामान घेऊन येत होते.
हॉटेलच्या मुख्य इमारतीच्या बाजूला लागून असलेल्या छोट्या टेकाडावरच्या इमारतीत आमच्या खोल्या होत्या. टेकाडाच्या दहाबारा पायऱ्या चढून गेल्यावर पुढे अंगणासारखी छोटीशी सपाट जागा होती. त्या अंगणासमोर असलेल्या इमारतीत आमच्या खोल्या होत्या. खोल्यांसमोर कॉमन गॅलरी होती, त्यातून समोरचं अंगण दिसत होतं. अंगणाशेजारी एक लिंबाचं आणि एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाला हिरव्या रंगाचे मोठेमोठे आंबे लागले होते. त्या झाडांना पाहून अंदमानच्या समृद्ध वनस्पतीजीवनाची जाणीव होत होती. (हॉटेलच्या मुख्य इमारतीपाशीही एक नोनीचं झाड होतं.)
आमच्या ए.सी.ची सोय असलेल्या खोल्या (जास्तीचा बेड लावण्याच्या दृष्टीने) फार प्रशस्त नव्हत्या, पण स्वच्छ होत्या. खोलीत बेडच्या बाजूला असलेली साईड टेबल्स, सोफा, टीपॉय, एक कपाट असं मोजकंच फर्निचर होतं. मात्र आरशाच्या आणि टी.व्ही.च्या खाली भिंतींमध्ये ग्रॅनाईटच्या पट्ट्या बसवून त्याच्याखाली सामानासाठी कप्पे तयार केलेले होते. खोलीत फोन होता, तसंच डासांसाठी मॉस्किटो रिपेलंटचीही सोय होती. खोलीच्या तुलनेत टॉयलेट प्रशस्त होतं, तिथे कमोड आणि विरूद्ध बाजूच्या बाथटबमध्ये पुरेसं अंतर होतं, नळाला चोवीस तास गरम पाणी येत होतं, कपडे ठेवण्यासाठी असलेला चार दांड्यांचा स्टँड थोडेसे कपडे वाळत घालण्याच्या दृष्टीनेही उपयोगी होता, बेसिनजवळ जास्तीचं सामान ठेवायला जागा होती. ट्रीपमधल्या एका दिवसाचा अपवाद वगळता याच हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असल्याने हॉटेलतर्फे आमच्या खोल्यांमध्ये रोज दोन साबणाच्या वड्या, दोन शाम्पूची पाकीटं ठेवली जात होती, तसंच रोज दिलेले टॉवेलही बदलले जात होते. (केरळमधल्या हॉटेलमध्ये दोन दिवसांचा मुक्काम असतांना हॉटेलतर्फे दिलेले टॉवेल दुसऱ्या दिवशी न बदलता तसेच गॅलरीतल्या उन्हात वाळण्याकरता टाकून दिलेले पाहिले होते, त्यापेक्षा इथला हा अनुभव निश्चितच चांगला होता.)
आम्हांला एक वाजता जेवायला जायचं असल्याने फ्रेश होण्यासाठी मध्ये थोडा वेळ होता. इथल्या टी.व्ही. वर बंगाली, तामिळी, हिंदी इत्यादी चॅनेल्सप्रमाणे मराठी चॅनेल्सही लागत असल्याने ज्यांना मराठी मालिका पाहिल्याशिवाय करमत नाही, त्यांचीही चांगली सोय झाली होती. मोबाईलच्या बाबतीत मात्र रिलायन्स सारख्या कंपन्यांचं नेटवर्कच मिळत नव्हतं, तर इतर काही कंपन्यांचे डेटा पॅक घेतलेले असूनही मोबाईलवर त्यांचं इंटरनेट चालू होत नव्हतं. अंदमानला येतांना विमानप्रवासामुळे की काय पण अजून एक गडबड झाली होती, जी आमच्या नंतर लक्षात आली; ट्रीपचे फोटो काढण्यासाठी आम्ही आमचे जे दोन कॅमेरे आणि दोन मोबाईल वापरले होते, त्यातल्या काही उपकरणांत वेगवेगळी वेळ दाखवली जात होती. दोन उपकरणं वापरुन एकाच ठिकाणच्या, साधारण एकाच वेळी पण वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या फोटोंमध्ये जी वेळ दाखवली जात होती, त्यात चक्क एका तासाचा फरक होता. पण हे आधी लक्षात न आल्याने तिथे काढलेल्या काही फोटोंमध्ये वेगवेगळी वेळ दिसतेय. असो. आमच्या खोलीत थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही जेवणासाठी खाली आलो.
अंदमान हे कोलकाता आणि चेन्नईच्या जवळ असल्याने इथे बंगाली आणि तामिळी भाषिक मोठ्या प्रमाणावर दिसतात. हॉटेलच्या कर्मचारी वर्गातही तामिळी लोकांचा समावेश जास्त असल्याने जेवणातल्या (आणि नंतर नाश्त्यातल्याही) काही पदार्थांवर दक्षिणी शैलीचा असलेला प्रभाव जाणवत होता. इथल्या रोजच्या जेवणात सॅलड, लोणचं, पापड, दोन प्रकारच्या भाज्या (ह्यात अधूनमधून एखादी पनीरची भाजी किंवा मश्रुमची भाजी हटकून असायचीच), भाताचा / पुलावचा एखादा प्रकार, नुसती दाल किंवा दाल माखनी अशा एखाद्या प्रकारची दाल, साधी पोळी / कणकेची जाड रोटी असा रोटीचा एखादा प्रकार, एक गोड पदार्थ (हा बरेचदा तांदुळाचा बनवलेला असायचा), नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी एखादा नॉनव्हेज पदार्थ ह्या सगळ्याचा समावेश असायचा. ह्यातला क्वचित एखाददुसऱ्या पदार्थाचा अपवाद सोडला तर इथले पदार्थ फार सणसणीत तिखट नव्हते.
इथल्या हॉटेलमधले पदार्थ काहीसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले असल्याने समोरचा पदार्थ नेमका काय आहे, हा प्रश्न कधीकधी पडायचा. एकदा हिरव्या भाजीवर भरपूर लाल तेलाचा तवंग बघून मी, 'हे नेमकं काय आहे?' म्हणून विचारलं आणि 'पालक पनीर' हे अनपेक्षित उत्तर आलं. मुंबईत अगदी बेताची फोडणी घातलेली आणि पनीरचे तुकडे दिसणारी हिरवीगार पालक पनीरची भाजी बघायची सवय झाल्याने, ती तेलाचा लाल तवंग असलेली भाजी मला ओळखताच आली नाही. असो. इथल्या जेवणात जरी सर्व पदार्थांचा समावेश असला, तरी अंदमानमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची कमतरता असल्याने, ते पदार्थ, तसंच काही फळं इत्यादी बेटावर बाहेरून यायचे अशी माहिती आम्हांला नंतर मिळाली. हिमश्रीकडून आम्हांला प्रत्येकाला रोज एक मिनरल वॉटरची बाटली देण्यात येत होती, मात्र मी या हॉटेलमधलंही पाणी पिऊन पाहिलं, अर्थातच पाण्याची चव काहीशी मचूळ लागत होती. ट्रीपच्या पहिल्या दिवशी आमचं जेवण आटोपल्यावर बाहेर पडायला आम्हांला अजून थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही पुन्हा खोलीवर परतलो.
No comments:
Post a Comment