आधीचा भाग - भाग १,
पुढे -
शेवटी साडेतीनच्या सुमाराला 'गो एअरच्या' चेक इन काऊंटरपाशी देवेंद्र गंद्रे, रूपाली गंद्रे आणि ट्रीपला येणारे अजून काही जण आल्याचं कळलं आणि आम्ही सगळेजण तिकडे गेलो. देवेंद्र गंद्रेंच्या सूचनेनुसार आम्ही तिथे लगेच चेक इनच्या रांगेत उभं राहून आमचं सामान चेक इन केलं. आता आम्हांला पहिल्या मजल्यावरच्या गेट नंबर ६ पाशी जायचं होतं. वरती गेल्यावर आम्ही आमचं केबिन लगेज तपासणीसाठी स्कॅनरच्या सरकत्या पट्ट्यावर टाकलं आणि आमची एकेकाची सुरक्षा तपासणी चालू असतांनाच अचानक आमच्या एका पर्समधला मोबाईल वाजायला लागला. 'इतक्या पहाटे कोणी फोन केला असेल?' या विचाराने आम्ही हैराण झालो आणि सरकत्या पट्ट्यावरून येणाऱ्या केबिन लगेजची वाट बघायला लागलो. पण नेमका त्या सरकत्या पट्ट्यात काहीतरी बिघाड झालेला होता, त्यामुळे तिथली स्त्री सुरक्षा कर्मचारी हातानेच हळूहळू त्या पट्ट्याला पुढे सरकवत होती आणि फोन न थांबता वाजतच होता. काही मिनिटांनी शेवटी एकदाची ती पर्स आमच्या ताब्यात आली. आम्हांला प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या एका परिचितांनी भल्या पहाटे उठून आठवणीने आम्हांला फोन केला होता.
आमच्यापाठोपाठ आमच्या ग्रुपचे सगळे चाळीसजण चेक इन करून येत होते. गेट नंबर ६ पाशी विमानाची वाट बघत गप्पा मारण्यात आणि इकडेतिकडे फिरण्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. थोड्याच वेळात प्रवाशांना विमानात सोडायला सुरूवात झाली. मला विमानाच्या पंखाच्या मागच्या बाजूच्या जागेत बसायला आवडतं आणि आमच्या ग्रुपलाही विमानाच्या शेपटाकडच्याच बाजूला जागा मिळाली होती. विमानाने उड्डाण केल्यावर बहुतेकांना झोप लागली होती, मी मात्र जागीच होते. जरा उजाडायला लागल्यावर विरूद्ध बाजूच्या खिडकीतून आकाशात उषःप्रभेचा सुंदर लालिमा पसरलेला दिसायला लागला. नंतर सूर्योदय बघायलाही मला आवडलं असतं, पण माझी सीट खिडकीजवळ नसल्याने सूर्योदय बघणं शक्य नव्हतं.
जरा वेळाने पुढच्या बाजूच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाशाचे हलके हलके कवडसे पसरायला लागले. विमानातल्या हवाई सुंदऱ्या खाद्य पदार्थ आणि पेयं घेऊन आल्या. सकाळची वेळ असल्याने आम्ही चहा घेतला खरा, पण तो चहा प्यायल्यावर काहीजणांच्या, "हा चहा आहे, की चहाचं भांडं विसळलेलं पाणी? चहासाठी आम्ही एवढे शंभर रुपये मोजतोय, तर चहा तरी जरा बऱ्या क्वालिटीचा द्या ना!" अशा संतप्त प्रतिक्रिया ऐकू आल्या. विमानातल्या खानपानसेवेचा अनुभव असल्याने हिमश्रीने विमानात आमचा नाश्ता बुक न करता, फक्त आमच्या विमानप्रवासाची तिकीटं काढली होती आणि आम्हांला, 'विमानप्रवासात सकाळी खाण्यासाठी काही कोरडे पदार्थ आणि सीलबंद नसलेली पाण्याची बाटली जवळ ठेवा.' अशी सूचना दिली होती. त्याप्रमाणे आम्ही खाण्याचे पदार्थ आणि पाणी जवळ ठेवलंही होतं, पण सकाळी उठल्यावर चहा घेण्याची सवय असलेल्यांना विमानात चहा घ्यावासा वाटणं साहजिक होतं.
खाद्यपेयविक्री आटोपल्यावर आणि काहीजणांना दिलेले फीडबॅकचे फॉर्म गोळा केल्यावर, हवाई सुंदऱ्या वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी घेऊन आल्या, त्या वस्तूंमध्ये पर्स, घड्याळं, ज्वेलरी इत्यादींचा समावेश होता. तोट्यात चालणाऱ्या विमानसेवा नफ्यात आणण्यासाठी त्यांच्या कंपन्यांना काय काय करावं लागतं आणि त्यासाठी त्यांच्या हवाई सुंदऱ्यांना चक्क एखाद्या दुकानातल्या सेल्सगर्ल्सप्रमाणे वस्तू विकायला लागतात, हे एकाचवेळी विनोदी आणि कारुण्यपूर्ण दोन्ही वाटत होतं.
थोड्या वेळाने विमानाने चेन्नईचा थांबा घेतला. तिथे काही प्रवासी उतरले, काही नवीन प्रवासी विमानात चढले. तेवढ्या वेळात आम्ही आमच्याजवळचे खाद्यपदार्थ बाहेर काढून खाणं आटोपून घेतलं. चेन्नईचे सर्व प्रवासी विमानात चढल्यावर विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने विमानातल्या सर्व प्रवाशांचे बोर्डींग पास तपासले आणि वरच्या कप्प्यांमध्ये ठेवलेलं सामान नक्की कोणत्या प्रवाशांचं आहे, हेही व्यवस्थित चेक केलं.
विमानाचं उड्डाण झाल्यावर पुन्हा एकदा विमानात हवाईसुंदऱ्यांच्या फेऱ्या चालू झाल्या. त्यावेळी अचानक पुढे बसलेल्या कोणाला तरी श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला. (ती व्यक्ती आमच्या ग्रुपमधली नव्हती.) मग त्या व्यक्तीसाठी 'विमानात कोणी डॉक्टर आहेत का?' याची विचारणा करणारी उद्घोषणा झाली. सुदैवाने विमानात डॉक्टर होते आणि त्या व्यक्तीला होणारा त्रास गंभीर प्रकारचा नव्हता. ए. सी. वाढवल्यावर आणि थोडं गोड पेय घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा त्रास कमी झाला. पण तोपर्यंत सर्व प्रवाशांचं लक्ष तिकडेच वेधलं गेलं होतं.
आता विमान अंदमान द्वीपसमूहाजवळ आलं होतं आणि खाली निळ्या समुद्रात पाचूसारखी विखुरलेली अंदमानची सुंदर बेटं दिसायला लागली होती. खिडकीजवळ बसलेले लोक पुन्हा पुन्हा खिडकीतून डोकावून ते दृश्य पाहत होते. बाकीचे लोकही विमान वळेल त्याप्रमाणे एकदा या खिडकीतून आणि एकदा त्या खिडकीतून लांबूनच का होईना, पण काही दिसतंय का, ते माना वेळावून पाहत होते. विमान एका बाजूला झुकलं आणि मलाही विरूद्ध बाजूच्या खिडकीतून नीलसमुद्रातलं, पाचूच्या खड्याची आठवण करून देणारं, एक छोटंसं बेट दिसलं. ते पाहून नकळत माझ्या तोंडातून, "वॉव, सुंदर!" म्हणून उद्गार निघाले. आता आम्ही अंदमानच्या बेटांचं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी उत्सुक झालो होतो.
अखेर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आमचं विमान पोर्ट ब्लेअरच्या 'वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर' उतरलं. विमानाचे जिने उतरून आम्ही बाहेर आलो. विमानतळाची इमारत अगदी जवळच होती, पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे जाण्यासाठी बस ठेवलेली होती. बसमधून जेमतेम मिनिटभराचा प्रवास करून आम्ही विमानतळाच्या इमारतीत शिरलो आणि तिथे आमचं सामान ताब्यात घेतलं. आमचं सामान हॉटेलवर नेण्यासाठी आलेल्या गाडीतल्या माणसांकडे आम्ही सामान सोपवलं आणि आमच्यासाठी आलेल्या ए.सी. बसमधून काही अंतरावर असलेल्या हॉटेल 'एन्. के. इंटरनॅशनल' कडे निघालो. नंतर ह्याच बसने आम्ही अंदमानच्या मुख्य बेटावर हिंडणार होतो.
No comments:
Post a Comment