--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Saturday, April 16, 2016

अंदमान ट्रीप - भाग १ - पूर्वतयारी आणि प्रस्थान

     डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला मी जवळच्या नात्यातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेले असतांना माझ्या वडिलांनी त्यांच्या हातातले कागद दाखवत मला विचारलं, की "फेब्रुवारी महिन्यात अंदमानच्या ट्रीपला येणार का?" त्यावेळी कसलाही मागचापुढचा विचार न करता मी सरळ त्यांना "हो, येणार." म्हणून होकार देऊन टाकला. त्यावेळच्या घाईगडबडीत मला इतकंच समजलं होतं, की आमच्या एका नातेवाईकांनी त्या ट्रीपचं माहितीपत्रक आणलं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण स्मृतिदिनानिमित्ताने अंदमानला भेट देण्यासाठी ती ट्रीप आयोजित केलेली होती आणि दादरच्या सावरकर स्मारकाचा त्या ट्रीपशी काहीतरी संबंध होता.

     त्या थोडक्या माहितीच्या आधारावर थोडीफार चर्चा होऊन मी आणि माझे काही नातेवाईक वगैरे सगळे मिळून आम्ही नऊ जण ट्रीपला यायला तयार झालो होतो. फार विचार न करता या ट्रीपला जाण्यासाठी मी लगेच होकार दिला खरा, पण या माझ्या बेतात कोणताही अडथळा न येता, माझी ही ट्रीप व्यवस्थित पार पडेल ना, याची मनात थोडी धाकधूक होती. त्यात बऱ्याचशा अनोळखी लोकांबरोबर ग्रुपने ट्रीपला जायची ही माझी पहिलीच वेळ होती. तोपर्यंत मी केलेल्या सर्व ट्रीप्स या ओळखीच्या व्यक्तींबरोबर केलेल्या होत्या आणि त्या ट्रीप्सचं नियोजनही (एखाददोन अपवाद वगळता) आमचं आम्हीच केलेलं असायचं. त्यामुळे या ट्रीपचा अनुभव अगदी वेगळा असणार होता.

     ट्रीपच्या आयोजकांनी ट्रीपला येणाऱ्या सर्व सदस्यांना ७ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बोलावलं होतं, तिथे ट्रीपबद्दल चर्चा होणार होती, कोणाच्या काही शंका असतील तर त्या विचारता येणार होत्या. तोपर्यंत आमच्या नऊजणांपैकी बहुतेकांची आयोजकांशी प्रत्यक्ष भेटही झालेली नव्हती. ट्रीपसाठी आमचे भरलेले फॉर्म्स आणि चेक्स नेऊन देण्याची कामं परस्परच झालेली होती.

     ७ फेब्रुवारीला आम्ही दादरला निघालो. दादरला जायचं म्हंटल्यानंतर मनातल्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जुन्या ओळखीच्या रस्त्यांवरून जात, आठवणीतल्या दादरचं बदललेलं नवं रुपडं पाहत आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पोहोचलो. ती रविवारची एक शांत सकाळ होती, स्मारकाच्या मुख्य सभागृहात मात्र कसलासा कार्यक्रम असल्याने, तिथे येणाऱ्या लोकांची जरा गर्दी दिसत होती. आमची चर्चा जिथे होणार होती, तिथे पोहोचल्यावर मी तिथे आलेल्या लोकांवरून एक नजर फिरवली, पण त्यापैकी कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं.

     आमची ट्रीप १९ फेब्रुवारी २०१६ ते २४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत अंदमानला जाणार होती. 'हिमश्री ट्रेक्स अँड टूर्स' तर्फे या ट्रीपचं आयोजन देवेंद्र गंद्रे आणि रूपाली गंद्रे यांनी केलं होतं. ट्रीपबद्दल काही माहिती सांगण्याआधी त्यांनी स्वतःची आणि हिमश्रीच्या इतर पदाधिकाऱ्यांची ओळख करून देत एक घोषणा केली, की सावरकर स्मारकातर्फे आयोजित एका ट्रेकमध्ये सहभागी होऊन देवेंद्र गंद्रे आणि त्यांच्याबरोबरच्या टीमने हिमालयातले एक शिखर (जे आत्तापर्यंत कोणीही सर केलेले नव्हते, ते शिखर) सर करून त्याला सावरकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव पाठवला होता आणि आवश्यक ते सोपस्कार पूर्ण झाल्यावर त्या शिखराला सावरकरांचं नाव देण्यात येणार होतं.

     नंतर ट्रीपबद्दल माहिती दिली गेली. फेब्रुवारी महिन्यात ट्रीप असल्याने ट्रीपला येणाऱ्यांमध्ये अर्थातच वयस्क लोकांचा भरणा जास्त होता, त्यांचा विचार करून या ट्रीपमध्ये मोजक्याच स्थळांचा समावेश केलेला होता. मात्र सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण स्मृतिदिनाच्या निमित्ताने सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी आणि तिथला संध्याकाळचा साऊंड अँड लाईट शो बघण्यासाठी एका संपूर्ण दिवसाचा वेळ राखून ठेवलेला होता. ट्रीपला येणाऱ्यांमध्ये पार्लेकरांचा मोठा सहभाग होता, प्रत्यक्ष दादरमधले लोक फारच थोडे होते, तर काहीजण नगरहून आणि पुण्याहून ट्रीपसाठी येणार होते.

     ट्रीपचा एकंदर तपशील ऐकल्यावर आलेल्या सदस्यांनी त्यांच्या शंका विचारल्या, त्यातल्या बऱ्याचशा शंका अंदमानमधल्या वॉटर स्पोर्ट्सबद्दल होत्या. मग हिमश्रीबरोबर आधी अंदमानच्या ट्रीपला जाऊन आलेल्या काहीजणांनी त्यांचे अनुभव सांगितले. चर्चेनंतर सदस्यांसाठी ठेवलेल्या रूचकर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर आम्ही स्मारकातल्या शूटींग रेंजला भेट दिली आणि घरी निघालो.

     घरी जातांना दादरच्या परिसराच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याने माहीमच्या शीतलादेवीच्या रस्त्यावरून गाडी नेण्याची कल्पना पुढे आली. पण मी वैतागून, "कशाला? काय गरज आहे?" असं नाराजीच्या सुरात विचारल्याने, गाडी शीतलादेवी बसस्टॉप जवळूनच परस्पर वळली. एकूण त्या दिवशी शीतलादेवीच्या परिसराच्या नशिबात माझ्या दर्शनाचा योग नव्हता हेच खरं! पण त्या गडबडीत आम्ही रस्ता चुकलो, मग अतिशय गर्दीच्या रस्त्यावरून खूप लांबचं वळण घेत, आम्ही कसेतरी आमच्या मार्गाला लागलो. एकेकाळी परिचयाचा असणारा तो सगळाच परिसर आता आम्हांला अपरिचित असल्यासारखा वाटायला लागला होता. पण मला आता अंदमानला जाण्याचे वेध लागलेले असल्याने त्या परिसराचं नवं रूप बघण्यात काहीच रस उरला नव्हता.

     आमच्या त्या दिवशीच्या चर्चेनंतर ट्रीपचा तपशील बराच स्पष्ट झाला होता, पण मी इंटरनेटवरूनही काही माहिती काढली होती. फेब्रुवारी महिना म्हणजे अंदमानला भेट देण्याची उत्तम वेळ! स्वच्छ हवामानामुळे या काळात तिथे वॉटर स्पोर्ट्सचा चांगला आनंद घेता येतो. त्यानुसार आमची ट्रीपला जायची तयारी जोरात चालू झाली होती. ट्रीपसंदर्भात हिमश्रीकडून फोन आणि मेसेज यायला लागले होते.

     आमचं मुंबईहून पोर्ट ब्लेअरला जाणारं विमान १९ तारखेला पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी निघणार होतं, त्यामुळे पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास चेक इन करण्यासाठी आम्हांला रात्रीच निघावं लागणार होतं. आम्ही १९ तारखेला रात्री अधल्यामधल्या वेळेला घरून निघण्याऐवजी १८ तारखेलाच रात्री साडेअकरा पावणेबाराच्या सुमारास घरून निघालो, तर विमानतळावर जरा सलग विश्रांती घेता येईल असं मला वाटत होतं. नेहेमी विमानप्रवास करणाऱ्या माझ्या आतेभावालाही ते पटलं आणि त्याप्रमाणे त्याने आम्हां नऊजणांसाठी तीन टॅक्स्या बुक करून ठेवल्या.

     आमची ट्रीपची तयारी खूप आधी चालू झालेली होती, तरी अगदी ट्रीपला निघायच्या दिवसापर्यंत काही ना काही लहानमोठ्या अडचणी आमच्यासमोर येतच होत्या आणि आम्ही आमच्यापरीने त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होतो. मग त्यात ट्रीपसाठी नेमक्या आम्हांला हव्या असणाऱ्या छोट्याछोट्या वस्तू दुकानात उपलब्ध नसण्यापासून, ते नेमकी ट्रीपच्या वेळेपर्यंत काहीतरी नवीन कामं समोर उपटण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता. अर्थात हे सगळं काही प्रमाणात अपेक्षित होतंच. शेवटी १८ तारखेला अगदी रात्री जेवणाची वेळ होईपर्यंत आमची निघायची तयारी पूर्ण झाली होती. काहीशा अनपेक्षितपणे रात्री जेवणाचा सुंदर बेत समोर आल्यावर आमचा ट्रीपला जायचा उत्साह पूर्ण भराला आला होता.

     रात्री उशीरा ठरल्याप्रमाणे टॅक्स्या आल्या, आम्ही विमानतळाकडे निघालो. आमचा टॅक्सी ड्रायव्हर वेगाने टॅक्सी चालवत असल्याने आमची टॅक्सी सर्वात पुढे होती, मात्र मधूनच आमच्या मागच्या टॅक्सीतून आमची टॅक्सी थांबवण्याबाबत फोन येत होते, कारण सर्वात मागच्या टॅक्सीत आमचे जे नातेवाईक बसलेले होते, त्यांना आमच्या परिसराची फारशी माहिती नव्हती आणि त्यांच्या टॅक्सीचा ड्रायव्हरही नवखा होता. एकदोनदा मध्ये थांबून, मागची टॅक्सी आलेली पाहून आमची टॅक्सी पुढे जात होती; रस्ता मात्र एकदम मोकळा होता. मध्येच एकदा संधी साधून आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने टॅक्सी सुसाट पुढे काढली. आम्ही तासाभरातच विमानतळावर पोहोचलो, मागच्या दोन टॅक्स्या यायला मात्र जरा वेळ लागला.

No comments:

Post a Comment