आधीचे भाग -
भाग १, --- भाग २, --- भाग ३,
पुढे -
अंदमानमधल्या स्थळदर्शनासाठी आम्ही दुपारी अडीचच्या सुमाराला तयार होऊन खाली बसपाशी आलो. बसमध्ये बसल्यावर मला खिडकीतून समोरच्या झाडावर असलेले दोन पक्षी दिसले, अंदमानच्या जैववैविध्याची ही किंचितशी झलक होती, मात्र ते पक्षी फोटो काढण्याच्या दृष्टीने फार लांब असल्याने त्यांचा फोटो काढण्याचा विचार मी सोडून दिला. आमच्या ग्रुपमधले सगळेजण बसमध्ये चढल्यावर आम्हां सगळ्यांना हिमश्रीतर्फे टोप्या देण्यात आल्या. अंदमानच्या उन्हात त्या टोप्यांचा चांगलाच उपयोग झाला. नंतर हिंडण्याच्या नादात सगळेजण इकडेतिकडे विखुरले जायचे, तेव्हा त्या निळ्या टोप्या बघून आमच्या ग्रुपच्या सदस्यांना ओळखणंही सोपं व्हायचं.
हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडून आमची बस पोर्ट ब्लेअरच्या कॉर्बिन्स कोव्ह बीचकडे निघाली. काही मिनिटांतच खालच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक झोकदार वळण घेऊन बस पुढे धावायला लागली आणि रस्त्याच्या एका बाजूला प्रवाळांमुळे काहीसा खडकाळ भासणारा किनारा असलेला अंदमानचा निळा समुद्र दिसायला लागला. त्या स्वच्छ निळ्या समुद्राच्या दर्शनानेच माझं मन उल्हसित झालं. समुद्राच्या काठाकाठाने उगवलेली काही झाडंही दिसायला लागली, त्यात नारळाची झाडं प्रामुख्याने होती. पुढे काही अंतरावर समुद्राकाठी काही नवीन झाडं लावलेली दिसली. पर्यावरणाचा विचार करून त्या झाडांभोवताली, बांबूच्या पट्ट्या विणून तयार केलेले संरक्षक पिंजरे लावलेले होते. एका नारळाच्या बनापाशी येऊन आमची बस थांबली, इथे कॉर्बिन्स कोव्ह बीचचं प्रवेशद्वार होतं.
प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आम्ही बीचकडे निघालो. इथे नारळाच्या बनातली हिरवळ थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत आलेली होती, त्यापुढे समुद्राची पांढरी वाळू पसरलेली होती, त्या पांढऱ्या वाळूत प्रवाळाचे वाहून आलेले तुकडे, शंख, शिंपले विखुरलेले दिसत होते आणि पांढरी वाळू संपली की पुढे चित्रातल्यासारखं दिसणारं समुद्राचं किनाऱ्याजवळचं फिकट हिरवट निळसर पाणी, त्यापुढे पसरलेलं गडद निळं पाणी, त्यातला लाटांमुळे येणारा पांढरा फेस अशा तिथल्या पाण्याच्या विविध रंगछटा दिसत होत्या. किनाऱ्यापाशी समुद्राच्या लाटांवर हेलकावणाऱ्या काही रिकाम्या स्पीडबोटी दिसत होत्या. निळ्या समुद्रात बोटींच्यापुढे समोरच काही अंतरावर असलेल्या छोटुकल्या बेटावरून नजर हटत नव्हती.
 |
समुद्राच्या सुंदर रंगछटांच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी पर्यटक सहज मिळालेला शंख फुंकून बघण्याचा प्रयत्न करत असतांना! |
 |
समुद्रात समोरच असलेलं छोटुकलं बेट |
दुपारची वेळ असल्याने लोकांची फारशी गर्दी नसलेला तो स्वच्छ अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा पाहून मला तिथल्या समुद्रात पाय भिजवण्याची अनावर इच्छा झाली. मी पाण्यात जाऊन काही वेळ उभी राहिलेही, पण आमच्या ग्रुपमधले बरेचसे लोक सुरुवातीला समुद्रापासून लांबच उभे होते. "आपल्याला इथे फार वेळ थांबायचं नाहीये, लगेच निघायचंय," अशी सूचना मिळालेली असल्याने मीही पाण्यात जास्त वेळ थांबले नाही. पण तिथून लवकर निघायचंय, म्हणून कोणी घाई करतांनाही दिसत नव्हतं, त्यामुळे मी जरा गोंधळले होते.


पाण्यातून बाहेर येतांना मला किनाऱ्यावरच्या वाळूत खेकड्यांमुळे उमटलेली सुंदर नक्षी दिसली. थोडं पुढे आल्यावर एक शंख (शंखातला प्राणी त्याचा शंख घेऊन) ओल्या वाळूतून तुरुतुरु चालतांना दिसला, मी तो बाकीच्यांना दाखवेपर्यंत माझी चाहूल लागून तो एका ठिकाणी स्तब्ध थांबून राहिला. त्या समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स चालत असूनही, तिथली जलचरसृष्टी अशी अबाधित राहिली आहे हे पाहून मला बरं वाटलं. समुद्रकिनाऱ्यावर आलेले प्रवाळ आणि शंखशिंपले पाहून काही पर्यटक ते गोळा करत होते, मात्र अंदमानच्या बेटांवरून अशाप्रकारे प्रवाळ आणि शंखशिंपले गोळा करून घेऊन जाण्यावर बंदी आहे, हे माहिती असल्याने मी तेव्हा ते गोळा करण्याचा मोह टाळला.
 |
वाळूत खेकड्यांमुळे उमटलेली सुंदर नक्षी! |
 |
अर्धचंद्राकृती समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूमध्ये ठिकठिकाणी आढळणारे शंखशिंपले आणि प्रवाळ गोळा करणारे पर्यटक |
मग मी पाठीमागे थांबलेल्या आमच्या ग्रुपपाशी आले आणि आमच्या ग्रुपमधल्या पाटील काका काकूंनी स्पीडबोटीतून चक्कर मारून येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला 'अजून थोडावेळ पाण्यात थांबले असते, तरी चाललं असतं,' असं वाटायला लागलं, पण मी पुन्हा पाण्यात जायचा कंटाळा केला. मग आम्ही काहीजण बीचच्या मागे असलेल्या झाडांच्या सावलीत बसलो. आम्ही बीचच्या प्रवेशद्वारापासून फार पुढे आलो नव्हतो, पण बीचवर अजून थोडं पुढे समुद्राच्या पाण्यात लोकांना सुरक्षितपणे पोहोता यावं म्हणून लावलेली संरक्षक जाळी दिसत होती. तिथल्या किनाऱ्यावर लोकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केलेली दिसत होती.
 |
बीचच्या प्रवेशद्वारापाशी समुद्रकिनाऱ्याच्या काठाने असलेली हिरव्यागार झाडांची राई |
 |
वाळूत असे ठिकठिकाणी समुद्रातून आलेले प्रवाळ पडलेले दिसत होते. |
 |
समुद्रात पोहोण्यासाठी लावलेली संरक्षक जाळी! |
थोड्या वेळाने कोणीतरी आम्हांला, 'आता निघायचंय,' म्हणून हाक मारल्यावर आम्ही निघालो, तोपर्यंत आमच्यापैकी काहीजण झपझप चालत पुढे गेले होते. आम्ही मागून रमतगमत चालत येत होतो. बीचच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दाराजवळ आमची बस उभी केलेली होती. तिथे जातांना वाटेत 'मगरीपासून सावधान' असा फलक लावलेला दिसला. (अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यांवर / खाडीकिनाऱ्यांवर अधूनमधून मगरी आढळतात आणि त्यामुळे ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी असे फलक लावलेलेही दिसतात.) बीचवर पुढे असलेल्या दुकांनांमधल्या शंखशिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी आमच्यातले काहीजण थांबले. आम्ही बसपाशी गेलो तर आमच्या पुढे झपझप चालत गेलेले कोणीही अजून तिथे आलेलेच नव्हते, ते बहुधा वाटेतल्या एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये शिरले असावेत. आता मला हळूहळू ग्रुपमधल्या लोकांच्या हिंडण्याच्या वेळेचा अंदाज येत होता. आम्ही जिथे जास्त वेळ थांबणार नव्हतो, त्या कॉर्बिन्स कोव्ह बीचवर आम्ही जवळजवळ एक तास घालवला होता.
No comments:
Post a Comment