--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Wednesday, December 21, 2016

स्पष्टीकरण

      मी या ब्लॉगवर आत्तापर्यंत जे काही लिहिलं आहे, त्यात काही प्रवासवर्णनांचाही समावेश आहे. त्यातलं अगदी अलीकडचं प्रवासवर्णन होतं अंदमानच्या ट्रीपचं. अंदमानच्या आधी मी ज्या एका जास्त कालावधीच्या ट्रीपला गेले होते, त्या केरळच्या ट्रीपमध्ये मनाला खिन्न करणारे काही अनुभव आल्यानंतर, त्या ट्रीपच्या पार्श्वभूमीवर अंदमानच्या सुरळीत ट्रीपचा अनुभव मला आनंददायी वाटणं साहजिकच होतं. शिवाय अंदमानचं नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता, तिथल्या पर्यावरणाची काळजी घेत तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आणि मुख्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी असणारा सेल्युलर जेल, रॉस बेट यांचा संबंध आणि तिथे देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेलं योगदान या कारणांमुळेही मी या ट्रीपचं विस्तृत प्रवासवर्णन लिहिलं आणि त्यासोबत अनेक फोटोही पोस्ट केले. माझी ही ट्रीप एका मोठ्या ग्रुपबरोबर झालेली असल्याने या ट्रीपच्या प्रवासवर्णनात त्यातल्या काही जणांचे किस्से येणं अपरिहार्य होतं. अशावेळी त्या सहप्रवाशांबद्दल लिहितांना, ही ट्रीप आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचा उल्लेखही न करता हे प्रवासवर्णन लिहिणं सर्वस्वी अनुचित ठरलं असतं, त्यामुळे साहजिकच त्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचाही मी आवश्यक तिथे, इतर सहप्रवाशांप्रमाणेच उल्लेख केला. (त्याआधीही अगदी मोजक्या लोकांसोबत केलेल्या माझ्या केरळ ट्रीपच्या प्रवासवर्णनात, केरळमध्ये आम्हांला ट्रीपची सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा मी उल्लेख केलाच होता, पण एक ड्रायव्हर सोडला, तर त्या कंपनीशी आमचा थेट संबंध आला नसल्याने, तो उल्लेख अगदी त्रोटक होता.) अंदमानच्या ट्रीपचं प्रवासवर्णन लिहितांना त्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या वाहतुकीच्या सोयी, राहण्याच्या सोयी, तिथल्या विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आणि इतर सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क, तिथे विकत मिळणाऱ्या काही विशेष गोष्टी, तसंच ट्रॅव्हल कंपनीच्या दिल्या जाणाऱ्या सोयी, इत्यादी गोष्टींचा या प्रवासवर्णनात उल्लेख करण्याचं एकमेव कारण हेच होतं, की तिथे ट्रीपला जाणार असलेल्या वाचकांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा. (माझ्या आधीच्या प्रवासवर्णनातही मी ठिकठिकाणी असे उल्लेख केलेले आहेत.) मात्र मी इथे हे स्पष्ट करते, की 'अंदमानच्या ट्रीपचे हे प्रवासवर्णन म्हणजे कोणाचीही जाहिरात नसून, माझं वैयक्तिक मत व्यक्त करणारं लेखन आहे आणि मी इथे हे प्रवासवर्णन लिहिल्याबद्दल अंदमानचा पर्यटन विभाग, अंदमानची ट्रीप आयोजित करणारी ट्रॅव्हल कंपनी आणि तिचे संचालक, प्रवासवर्णनात उल्लेख आलेली विमान कंपनी आणि तिचे व्यवस्थापन, हॉटेल्स आणि हॉटेल्सचे व्यवस्थापन, विक्रेते, पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन इत्यादींपैकी कोणीही मला वस्तू अथवा मूल्यस्वरूपात कोणतंही मानधन दिलेलं नाही, अथवा मी हे प्रवासवर्णन लिहावं अशी सूचनाही केलेली नाही. तसंच मी हे प्रवासवर्णन लिहिलेलं आहे, याची कल्पनाही मी उपरोल्लेखित व्यक्तींना दिलेली नाही. तरी सदर प्रवासवर्णन हे कोणाचीही जाहिरात म्हणून लिहिलेलं नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.'

     हे सर्व स्पष्ट करण्याचं कारण म्हणजे एका फेसबुक ग्रुपमधला मला आलेला अनुभव! मी फेसबुकवरच्या 'वाचा, लिहा.. वाचा.' या ग्रुपचं सदस्यत्व घेतलेलं होतं. तेव्हा या ग्रुपच्या पेजवर, या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत याबद्दल काहीही लिहिलेलं नव्हतं. ग्रुपमधल्या बऱ्याचशा पोस्ट्स ह्या पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल मतं व्यक्त करणाऱ्या होत्या, पण काही ब्लॉगलेखकांनी त्यांच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्सही तिथे दिलेल्या होत्या. ते पाहून, इतर ग्रुपप्रमाणे याही ग्रुपमध्ये ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स दिल्या तर चालतील, असा माझा समज झाला. त्यामुळे माझ्या अंदमानच्या ट्रीपबद्दलच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स मी इतर ग्रुपबरोबर, त्याही ग्रुपमध्ये देत गेले. प्रवासवर्णनाचे मोठे लेख त्यांच्या फोटोसकट ग्रुपमध्ये टाकण्याऐवजी ब्लॉगची लिंक देणं मला जास्त सोयिस्कर होतं. 

     एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या कालावधीत मी त्या पोस्ट्स लिहिल्या आणि पोस्ट्स लिहिल्यावर त्यांच्या लिंक्स ग्रुपमध्ये दिल्या. त्या दरम्यान बहुधा त्याच ग्रुपमध्ये एका वाचकाने मला उपरोल्लेखित ट्रॅव्हल कंपनीच्या फोन नंबरची विचारणा केली आणि मी त्या वाचकाला त्या ट्रॅव्हल कंपनीच्या फेसबुक पेजची लिंक देऊन तिथे फोन नंबरची विचारणा करायला सांगितली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रवासवर्णनातली माझ्या शेवटच्या पोस्टची लिंक तिथे दिल्यानंतर, दुसऱ्या एका वाचकाने "या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत?" अशी शंका विचारली.  ग्रुपच्या एक ऍडमिन 'प्रीति आपटे उमा निजसुरे' यांनी त्याचं उत्तर देतांना सांगितलं, की "इथे फक्त आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे. कथा, लेख चालतील. कविता नको." त्यावेळी त्यांनी त्याच पोस्टच्या खाली असलेल्या माझ्या ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट चालेल की नाही यावर कोणतंही भाष्य केलं नाही किंवा माझ्यासकट इतर कोणाचीही ब्लॉगची लिंक असलेली पोस्ट काढून टाकली नाही. त्यामुळे ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट ऍडमिननी 'लेख' या प्रकारात गृहीत धरली असावी, असा माझा समज झाला. त्यावेळी त्यांनी तशी काही सूचना केली असती, तर मी ताबडतोब माझ्या ब्लॉगच्या लिंक्स काढून टाकल्या असत्या.  
     
     नंतर अचानक चार महिन्यांपेक्षाही जास्त काळ उलटून गेल्यानंतर, २० डिसेंबरला दुसऱ्या एक ऍडमिन 'Yogini Nene' यांनी त्या वाचकाच्या शंकेचं उत्तर देत स्पष्ट केलं, की "इथे वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे." अचानक ती जुनी पोस्ट वर आलेली पाहून मी ग्रुपचं पेज ओपन केलं आणि सहज खाली स्क्रोल करत गेले, तेव्हा तिथे माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कथेच्या ब्लॉगपोस्टची लिंक सोडून इतर सर्व म्हणजे अंदमानच्या ट्रीपच्या ब्लॉगपोस्ट्स दिसेनाशा झालेल्या होत्या. सर्चमध्ये शब्द देऊनही त्या पोस्ट्स दिसेनात, तेव्हा त्या पोस्ट्स डिलीट केलेल्या असाव्यात, असा मी अंदाज बांधला. मात्र इतर ब्लॉगलेखकांच्या, लेख म्हणता येईल अशा ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक ग्रुपमध्ये तशाच दिसत होत्या. मग ऍडमीननी ग्रुपचे नियम बदलले आहेत का, हे पाहण्यासाठी मी साईडबारमध्ये दिलेल्या ग्रुपच्या वर्णनावर नजर टाकली, तर तिथे काही बदल झालेले दिसले. ग्रुपच्या वर्णनात लिहिलेलं होतं, की "पुस्तकं वाचा, त्यांच्याबद्दल परिचयवजा पोस्टस् लिहा.. आणि इतरांच्या वाचा. (इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)"

     ऍडमिननी त्यांच्या अधिकारात ग्रुपचे नियम बदलून पोस्ट्स डिलीट करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता, परस्पर माझ्या पोस्ट्स डिलीट झाल्या, त्याचवेळी ग्रुपच्या नियमात खास कंसात सूचना दिली गेली, की "(इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)" हे पाहून ती कंसातली सूचना माझ्यासारख्यांसाठीच आहे, हे मला अगदी स्पष्ट जाणवलं. ऍडमिन 'Yogini Nene', "माझं लिखाण म्हणजे उत्तम साहित्य आहे, असा माझा दावा कधीच नव्हता, मात्र माझ्या प्रवासवर्णनाच्या लेखातला प्रवासवर्णन नावाचा साहित्यप्रकार साहित्य म्हणून तुम्हांला दिसूच नये आणि त्यात फक्त (मी एक पैसाही न घेतलेली) जाहिरात तुम्हांला दिसावी याचं मला सखेद आश्चर्य वाटतं. यावरून मी एक बोध घेतला, की मला साहित्यातलं ओ की ठो काही कळत नाही आणि साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी मला अजून बराच अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळे अपुऱ्या अभ्यासानिशी लिहिलेलय माझ्या 'नाळ' या कथेची लिंकही मी या अभ्यासू ग्रुपमधून डिलीट करत आहे, उगीच माझ्या या कथेचं ठिगळ तुमच्या उत्तम साहित्याविषयी गप्पा मारणाऱ्या ग्रुपमध्ये नको. तुम्ही मला कोणतीही पूर्वसूचना न देता माझ्या पोस्ट्स डिलीट केल्या, त्यामुळे मीही तुम्हांला कोणतीही पूर्वसूचना न देता, तुमच्या ग्रुपमधली महत्त्वाची जागा माझं फालतू मतप्रदर्शन करण्यासाठी वाया न घालवता, या ग्रुपमधून बाहेर पडले आहे आणि मला जे काही मत मांडायचं आहे, ते या ब्लॉगवर मांडलं आहे. आजपर्यंत माझा असा समज होता, की फक्त पेड पोस्टच्याच शेवटी ती जाहिरात आहे, असं स्पष्ट करायचं असतं, पण आता तुमच्यामुळे हेही नव्याने कळलं, की जाहिरात म्हणून जी पोस्ट लिहिलेली नाही, अशाही पोस्टच्या शेवटी, 'ही पोस्ट म्हणजे जाहिरात नाही' हे स्पष्ट लिहायचं असतं. माझ्या अपुऱ्या ज्ञानात ही अमूल्य भर घातल्याबद्दल धन्यवाद! याबद्दल तुमचे कसे आभार मानावे हेच कळत नाही."

- जाहिरात नसूनही जाहिरातवजा पोस्ट्स टाकणारी माजी सदस्य.   
                           

Saturday, December 3, 2016

नाळ

     'साद' २०१६ या दिवाळी अंकात माझी "नाळ" ही कथा प्रकाशित झाली आहे, ती कथा आता इथे ब्लॉगवर देत आहे.

नोंद - ही कथा ब्लॉगवर टाकतांना अंकासाठी पाठवलेल्या पीडीएफ प्रतीतला कथेव्यतिरिक्त असलेला अनावश्यक मजकूर वगळून मग ही पीडीएफ प्रत तयार केली आहे.

महत्त्वाची नोंद - वाचकांना ह्या कथेची कॉपी - पेस्ट करण्याची परवानगी दिलेली नाही, मात्र कथा शेअर करता येईल, ही कथा शेअर करतांना तिच्या स्वरूपात कोणतेही बदल करण्याची परवानगी नाही, तसेच कथा शेअर करतांना लेखिकेला आणि अंकाला कथेचे श्रेय द्यायला विसरू नये, त्यासाठी कथेखाली लेखिकेचे नाव आणि अंकाचे नाव देऊन मगच कथा शेअर करावी, ह्याची कृपया नोंद घ्यावी. 
  

Tuesday, November 15, 2016

माझ्या कॅमेऱ्यातून टिपलेला अतिवर्धित चंद्र / Super moon captured in my camera

     १४ नोव्हेंबरच्या रात्री माझ्या कॅमेऱ्यातून टिपलेला अतिवर्धित चंद्र / Super moon captured in my camera on the night of 14th November

  
२०१६ सालचा अतिवर्धित चंद्र / Super moon Year 2016 

Wednesday, November 9, 2016

माझी प्रकाशित कथा - नाळ

     गोरेगाव पूर्व इथे ’मराठी विचारधारा प्रतिष्ठान’ तर्फे प्रकाशित झालेल्या "साद" - २०१६ च्या दिवाळी अंकात माझी "नाळ" ही दीर्घ विज्ञानकथा प्रकाशित झाली आहे. या अंकात माझी कथा असेल, याचा मला अंदाज होताच, पण आज "साद"चा अंक प्रत्यक्ष माझ्या हातात आल्यानंतरच मी ही पोस्ट प्रकाशित करत आहे. इतर दिवाळी अंकांपेक्षा साद दिवाळी अंकाचं वेगळेपण हे होतं, की ’साद’ साठी माझी कथा पाठवल्यानंतर साद परिवाराकडून प्रत्येक टप्प्यावर माझ्याशी आवर्जून संवाद साधण्यात आला, त्याबद्दल साद परिवाराचे मनःपूर्वक आभार!   

Monday, October 31, 2016

Freehand Rangoli And Rangoli Of Peacock

     Due to unavailability of space I get opportunity to draw Rangoli only in Diwali every year. This year I got a nice, little black granite stone and a tile laid freely for drawing Rangoli. So I decided to use both of the things for Rangoli.

     On granite I made free hand Rangoli. On some places I have mixed two or three colours or shades of colours for drawing curved lines in Rangoli and thus made those curved lines.

  
  
     After drawing free hand Rangoli, I decided to draw Rangoli of peacock because I had some time in my hand. Though I was not able to draw a perfect proportionate peacock because I had not that much enough time. Though while feeling colours in Rangoli I painted that peacock by using different shades of colours.

     
  
     I have made both these Rangolis on day of Laxmipujan in Diwali.
   

मुक्तहस्त रांगोळी आणि मोराची रांगोळी

     जागेच्या अभावी दरवर्षी फक्त दिवाळीतच मला रांगोळी काढायची संधी मिळते. यावर्षी रांगोळी काढण्यासाठी मला एक छान, छोटासा काळा ग्रॅनाईटचा दगड आणि एक मोकळी पडलेली टाइल मिळाली. त्यामुळे मी त्या दोन्ही वस्तूंचा रांगोळीसाठी वापर करायचा ठरवला.

     ग्रॅनाईटवर मी मुक्तहस्त रांगोळी काढली. रांगोळीतल्या वक्र रेषा काढतांना काही ठिकाणी दोनतीन रंग किंवा रंगांच्या छटा एकत्र करून त्या वक्र रेषा काढल्या आहेत. 

    
  
     मुक्तहस्त रांगोळी काढल्यावर हाताशी अजून थोडा वेळ असल्याने मी मोराची रांगोळी काढायची ठरवली. पण फार वेळ नसल्याने, मला अगदी प्रमाणबद्ध मोर काढता आला नाही. मात्र रांगोळीत रंग भरतांना मी विविध रंगछटा वापरून मोर रंगवला.

   
  
     दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी या दोन्ही रांगोळ्या काढल्या आहेत.

Friday, October 28, 2016

चकलीची भाजणी

चकलीची भाजणी 

साहित्य -
 • तांदूळ - २ कप (२५० मि.ली. आकाराचा मेजरिंग कप)
 • चणाडाळ - १ कप 
 • बिनसालीची उडीदडाळ - १/२ कप 
 • बिनसालीची मूगडाळ - १/४ कप 
 • पोहे (पातळ किंवा जाड पोहे) - १ वाटी (१५० मि.ली. आकाराची वाटी)
 • साबुदाणा - १/२ वाटी 
 • धणे - १/२ वाटी 
 • जिरे - १/४ वाटी 


कृती - 

 • तांदूळ आणि डाळी हे सगळे स्वतंत्रपणे धुवून सावलीत वाळवून घ्यावेत. (पुरेसा वेळ नसेल, तर आम्ही हे साहित्य न धुता तसेच भाजणीसाठी वापरतो.)
 • तांदूळ, डाळी, साबुदाणे आणि धणे, जिरे हे सगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजतांना धान्य, साबुदाणे आणि डाळींचा रंग जरासा बदलतो. तांदूळ पांढरेशुभ्र होतात, साबुदाणा जरा पारदर्शक होतो, डाळींचा रंग जरा बदलून त्यातले काही दाणे लालसर होतात इतपतच हे साहित्य भाजावे. त्यापेक्षा जास्त भाजल्यास चकल्या जास्त तेल पितात.
 • भाजल्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले गार होऊ द्यावे. 
 • गार झालेले हे चकलीच्या भाजणीचे साहित्य दळून घ्यावे आणि चकली करण्यासाठी वापरावे. 
  

Wednesday, September 21, 2016

ती आणि तू

द्रौपदी 
एक ती होती द्रौपदी महाभारतातली, प्राचीन काळची
आणि एक तू आधुनिक युगातली आधुनिक "द्रौपदी"
हो, हो, "द्रौपदीच!"
तिला होते पाच पती - पांडव
तुझं मात्र तसं नाही,
तू आहेस स्वतंत्र नेहमीच तुझा निर्णय घेण्यासाठी 
आधुनिक युगातली निवड तुझी, एकच जोडीदार तुझ्यासाठी 
तरीही तू  "द्रौपदी," हो, हो, "द्रौपदीच!"
ती प्राचीन काळची अग्निकन्यका, कामिनी, कोमलिका, 
तरीही तहानलेली रक्तासाठी, धगधगणारी अंगारकलिका द्रौपदी!
ती होती अभिमानी, अतीव सुंदर, म्हणूनच होती तिची अभिलाषा साऱ्यांना. 
तूही अभिमानी, आकर्षक, पण आत्ममग्न तू, चूर स्वतःच्या प्रतिमेत.  
आरशात निरखतांना सौंदर्य तुझं, तू विसरत नाहीस
इतरांच्या नजरेत आकर्षक दिसायला, आणि तुला आवडतं 
त्यांच्या मनातली तुझ्याबद्दलची अभिलाषा टिपायला! 
त्याच धुंदीत तुला आवडतं, सहज अपमान करायला नको असलेल्या व्यक्तींचा 
नको तिथे नको ते बोलून आणि त्यावरून कलह निर्माण करायला,
थेट अगदी त्या प्राचीन द्रौपदीसारखाच! 
कलह ज्यामुळे होतो धगधगत्या भावनांचा अविष्कार,  
अंतहीन कलह जो सोडून जातो त्याच्या पाऊलखुणा व्यक्ती संपल्यानंतरही. 
कलह, जसा प्राचीन द्रौपदीने निर्माण केला होता कौरवांत आणि पांडवांत! तसाच!
म्हणून तू "द्रौपदी," हो, हो, आधुनिक युगातली आधुनिक "द्रौपदीच!"
आणि तू "द्रौपदी" म्हणून तुझ्या निवडीचं संबोधन "पांडव" - आधुनिक युगातले "पांडव" 
नाव अनेकवचनी, तरी नावापाठीमागचा चेहरा एकवचनीच!
हे आधुनिक युगातल्या "द्रौपदी" तू उतावीळच फार,
तुझ्यासाठी खेळला नव्हता "पांडवांनी" "कौरवांशी" जुगार, 
आणि तुला लावलं नव्हतं पणालाही त्यात, कारण नव्हताच तिथे जुगार, 
तर तू स्वतःच जाऊन उत्साहाने खेळलीस "आंधळ्या धृतराष्ट्राबरोबर" जुगार,
देत संधी त्याच्या "लाडक्या पुत्रांना" तुझा अपमान करण्याची,
कारण नव्हतं झालं तुझं समाधान, आधीच नुसता जीवघेणा कलह पेटवून,
म्हणून आगीत तेल ओतत, तू खेळलीस "आंधळ्या धृतराष्ट्राबरोबर" जुगार, 
तेव्हा तुला पक्की खात्री होती, की शेवटी तूच जिंकणार
म्हणून लावून स्वतःला पणात, तू खेळलीस तो डाव 
पण अघटित ते घडलं आणि शेवटी हरलीस तू तो जुगार!
तुला सभेत ओढून आणणारा "दुःशासन" तिथे नव्हता, 
म्हणून तू स्वतःच जाऊन उभी राहिलीस "दुर्योधन" आणि "दुःशासनादी कौरवांपाशी"
आणि उन्मादाने हसत "त्यांना" चेतवू लागलीस आधुनिक "वस्त्रहरणासाठी"
मग "त्यांनीही" हात घातला तुझ्या वस्त्राला, तरीही तू होती निश्चिंतच!
कारण तुला खात्री होती, की येईलच कोणीतरी आधुनिक "कृष्ण" आणि 
वाचवेल तुला, तुझे शीलहरण होण्यापासून. पण इथे दिसत नव्हता कोणी "कृष्ण,"  
आता "पांडवांनाच" व्हावं लागणार होतं "कृष्ण" तुझ्यासाठी.  
ते पाहून "कौरव" अधिकच चेकाळले आणि करू लागले "तुझ्यासहित" अपमान "पांडवांचा", 
त्यात त्यांना साथ लाभली काही "मित्र मित्र म्हणवणाऱ्या छद्मावरणातल्या द्वेष्टयांची!"
हे "मित्र" कोणाचे होते? "कौरवांचे" की "पांडवांचे" की "द्रौपदीचे" हाही एक प्रश्नच!
सोयीनुसार हवा तो पक्ष निवडणारे ते "छद्मावरणातले मित्र" सामील "कौरवांना" त्या वस्त्रहरणात!  
हे सारं सारं पाहणारे बाकीचे "नातेवाईक, सुहृद?, मित्र? आदी" होते सारे गप्प गप्प  
"त्यांना" दिसत असूनही दिसत नसल्यासारखे, माना खाली घालून बसलेले ते काही संबंधच नसल्यासारखे. 
प्राचीन काळातल्या द्रौपदीची बाजू घेण्यासाठी निदान त्या सभेत होते काही कारण, 
पण हे आधुनिक युगातल्या "द्रौपदी" तुझी बाजू तरी कोण आणि कशी घेणार होते?
"तूच" तर हे सारं स्वतःच्या हाताने ओढवून घेतले होतेस.  
प्राचीन काळच्या द्रौपदीपाशी होते निदान कारण कलह निर्माण करण्याचे,
तिला मागून घेतलं होतं द्रुपदाने खास 'कलहाचं कारण बनण्यासाठी, कौरव पांडवांमधल्या वैरासाठी   
आणि त्यातून संधी साधत तिच्या भावंडांचे युद्धहेतू आणि वधसंकल्प पूर्ण करण्यासाठी!'
हे जाणून होता युधिष्ठीर, हे जाणून होते भीष्मद्रोण म्हणूनच तत्कालीन प्रथेच्या विरुद्ध 
भरसभेत न्याय मागणाऱ्या द्रौपदीला, दोष नव्हता दिला त्यापैकी कोणी, 
कारण ती तिचं कर्तव्य पूर्ण करत होती, त्यासाठी होऊ देत अपमान स्वतःचा!
कदाचित तिची कर्तव्यपूर्ती व्हावी म्हणूनच युधिष्ठिराने नसतील ना लावल्या 
एकापेक्षा एक वरचढ वस्तू जुगारात आणि हरत गेला भराभर 
कौरवांना विजयाचा आनंदही धड साजरा न करू देता!
आपल्या अपेक्षेपेक्षाही झटपट सारे काही हातात आले, कसलेच विशेष परिश्रम न करता,
म्हणून अपेक्षाभंग झालेल्या कौरवांच्या बाजूकडून का शकुनीने मागणी केली,
द्रौपदीला पणात लावण्याची आणि त्यातून बेरंग खेळात रंग भरण्याची?
द्रौपदीला आणि पांडवांना अपमानित करायला चटावलेल्या 
कौरवांना आणि त्यांच्या साथीदारांना नव्हती जाणीव, की 
हा खेळ त्यांच्या मृत्यूचे कारण बनणार आहे. तशीच जाणीव नव्हती 
पांडवांनाही, की ज्या द्रौपदीची त्यांनी धरली अभिलाषा आणि दिलं तिला स्थान पत्नीचं,
ती द्रौपदी बनणार आहे कारण त्यांच्या संपूर्ण कुलविनाशाचं त्यांच्या पुत्रांसहित, त्यांच्या 
मित्रांसहित, त्यांच्या नातेवाईकांसहित आणि इतर अनेक राजांसहित, त्या सर्वांच्या सैन्यासहित!
लोटून त्या सर्वांना विनाशाच्या खाईत, दुःखाचं आणि वैराग्याचं साम्राज्य पसरवत अनिर्बंध!
भविष्यकाळाची जाणीव नसलेल्या पांडवांना इतकंच माहीत होतं, की द्रौपदीपाशी होतं एक ठोस कारण कलह निर्माण करण्याचं! 
हे आधुनिक युगातल्या "द्रौपदी" तूच सांग आता, नेमकं कोणतं कारण होतं तुझ्याकडे कलह निर्माण करण्याचं?,
 "आंधळ्या धृतराष्ट्राबरोबर" जुगार खेळत, स्वतःच स्वतःला पणात लावण्याचं? आणि
स्वतःच स्वतःवर ओढवून घेतलेल्या आधुनिक "वस्त्रहरणाचं"?
केलंस काय तू साध्य यातून? हे आधुनिक "धृतराष्ट्र आणि कौरव इत्यादी" नव्हेत 
"तुझे" किंवा आधुनिक "पांडवांचे" नातेवाईक, नव्हेत ते मित्रही "पांडवांचे"!
"त्यांची" ओळख फक्त इतकीच, की 'अ' ला 'ब', 'ब' ला 'क', तो 'क' ला 'त' आणि 'त' ला 'ट'!
तेवढीच ओळख "पांडवांची" आणि "कौरव इत्यादींची". 
मग तूच सांग "द्रौपदी" आता आधुनिक "पांडवांनी" नेमकं काय करायचं?
संतापाने चिडून उठत भीमपराक्रम दाखवायचा? की आधुनिक युगातल्या "तू"
स्वतःचा निर्णय घेऊन स्वतःच स्वतःवर हा प्रसंग आणलास म्हणून "तुझा" मान राखत तुझा त्याग करायचा?
आधुनिक "पांडव" करतील तुझा त्याग, अशी शंका जरी मनी आली, तरी "तू" आधुनिक "द्रौपदी"
तुझा मुखवटा बदलून टाकतेस आणि टाकतेस दीनवाणे नेत्रकटाक्ष "पांडवांकडे",
मदतीची व्याकुळ याचना करत फक्त हावभावांनी, घायाळ करत त्यांना पार अंतःकरणापासून!
आणि "पांडवांनी" आवेश दाखवत केला आवरण घालण्याचा प्रयत्न तुझे शील जपण्यासाठी, की 
"तू" पुन्हा हसत चेतवतेस "कौरवांना" तुझ्या वस्त्रहरणासाठी!
"कौरवही" आता निर्ढावलेत, मजा वाटते त्यांना "तुझ्याद्वारे" होणाऱ्या "पांडवांच्या" अपमानाची!
हे सारं तू का करतेस "द्रौपदी"? आहे काय कारण नेमके तुझ्याकडे? 
करायचं आहे काय साध्य तुला यातून नेमकं "द्रौपदी"? जरा "पांडवांना" तरी नीट समजू दे, 
का चाललाय हा खेळ आधुनिक वस्त्रहरणाचा? 
"पांडव" तुला नको होते का "द्रौपदी"?, मग वरलंस का तू "पांडवांना"
तुझाच होता निर्णय त्यांना वरण्याचा, मग त्यांचा मान नको का तुला राखायला?
"कौरव" जर तुला नको आहेत, तर का चेतवतेस तू "त्यांना" आणि देतेस संधी "पांडवांच्या" अपमानाची? 
"द्रौपदी" आहेस तू कामिनी, पण निवडता येईल कोणाला तरी एकालाच, तुला या आधुनिक युगात
जरी तू असलीस कितीही स्वतंत्र, स्वतःचे स्वतः निर्णय घेणारी, तरी राहीलंच हे बंधन तुझ्यावर कायम! 
या दोघांव्यतिरिक्त आहे एक तिसरा पर्यायही, त्याग करण्याचा, 
त्याग "कौरवांचाही आणि पांडवांचाही"!  मग जगायचं जीवन स्वतंत्र,
स्वतःचे स्वतः निर्णय घेत, विसरून जात भूतकाळ!
अखेर आपण घेतलेल्या निर्णयांची आणि आपण केलेल्या कृत्यांची जबाबदारी आपल्यावरच असते, नाही का गं "द्रौपदी"?
मग आगीत तेल ओतत, दुसऱ्याच्या खांद्यावरून तिसऱ्यावर नेम धरून तू नेमकं काय साध्य करतेस "द्रौपदी"? 
कशाला निर्माण करतेस तो अंतहीन कलह, जो सोडून जातो त्याच्या पाऊलखुणा व्यक्ती संपल्यावरही?
प्राचीन काळच्या द्रौपदीला तरी कुठे माहिती होतं, ती नेमकं काय गमावणार आहे तिच्या कर्तव्यपूर्तीसाठी?
तिच्या रक्ताभिलाषी कर्तव्यपूर्तीने शोषून घेतलं तिचं समाधान सारं आणि हरवला तिचा अभिमान कायमचा!
कोणास ठाऊक नियतीच्या पोटात दडलंय काय, हे आधुनिक "द्रौपदी",  
घडलंच काही वेगळं तुझ्या कल्पनेपेक्षा, तर तू माफ करू शकशील का स्वतःला? 
तुझ्याभोवती जमली आहे सारी "कौरवांची मांदियाळी", भविष्याबद्दल अज्ञानी ते सारे
तुला छेडण्यात मश्गुल! परिणामांची नाही त्यांना पर्वा, नाही कशाची चिंता!
उगीच कोणाचे तळतळाट घेऊ नयेत, हे नाही कधी त्यांना कळले.
पुढे काय होणार हे माहीत नसलेले, आगीला स्पर्श करायला उत्सुक ते सगळे! 
प्राचीन काळच्या कौरवांना काय किंवा पांडवांना काय किंवा द्रौपदीला काय शेवटी एकटेच जायचे होते सामोरे,  
स्वतःच्या अंताला! नव्हती तेव्हा त्यांना सोबत कोणाची, शेवटच्या काही क्षणांत, जरी कितीही मोठे 
राजे, महाराजे, महाराणीपद असले जरी त्यांचे, यात अपवाद फक्त युधिष्ठिराचा, त्यानेच एकट्याने केला 
निकराचा प्रयत्न युद्ध रोखण्याचा, कारण मिळवूनही हवे ते, गमवावे लागेल त्यापेक्षाही जास्त काही, याची 
होती स्पष्ट जाणीव त्याला!
ती जाणीव नसलेली द्रौपदी मात्र तडफडली कायम सूडासाठी, तहानलेली कौरवांच्या रक्तासाठी!
यात तिने काय कमावले? काय गमावले? याचा हिशोब होता फक्त तिच्यापाशी आणि कृष्णापाशी!
कारण त्या अंगारकालिकेलाही पांडवांपलिकडे जाऊन मदत घ्यावी लागली कृष्णाची!
हे आधुनिक युगातल्या "द्रौपदी" तू कमावलंस काय, गमावलंस काय हे माहीत नाही, आधुनिक "पांडवांनाही"
कारण शेवटी हा हिशोब करायचा असतो ज्याचा त्याने, स्वतःचा स्वतःच! 
तिथे नसते इतर कोणाची मदत! आपापला शेवटही आपला आपणच भोगायचा असतो आपल्या स्वतःच्या सुखदुःखांसहित!
कारण प्रत्येकासाठीच धावून येत नसतो कोणी कृष्ण, ते भाग्य लाभते एखाद्या प्राचीन द्रौपदीलाच! 
हे आधुनिक "द्रौपदी" तू मुक्त हो या द्रौपदीपणाच्या पाशातून आणि कर 
"पांडवांनाही" मुक्त या पांडवपणाच्या पाशातून, शेवटी 
आपली खरी ओळख आपली आपणच जपायची असते,
आणि पुराणातली वांगी पुराणातच ठेवायची असतात!

नोंद - ही रूपकाचा वापर केलेली दीर्घकविता दीर्घकाळापासून माझ्या मनात घोळत होती, अखेरीस आज एकदाची ती पूर्णपणे ब्लॉगवर शब्दबद्ध झाली.   
         

Sunday, August 7, 2016

अंदमान ट्रीप - भाग १६ - पोर्ट ब्लेअर - स्थळदर्शन, परतीचा प्रवास आणि समारोप

आधीचे भाग -
पुढे -

     तिथून हॉटेलवर येऊन जेवण करून, थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. मग आम्ही समुद्रिका म्युझियमला भेट देऊन तिथले मोठमोठाले प्रवाळ, पूर्ण वाढ झालेले भलेमोठे शंख, शिंपले आणि जोडशिंपले इत्यादी पाहिले. त्या म्युझियमच्या आवारात एक व्हेल माशाचा सांगाडा ठेवलेला आहे. त्या सांगाड्यामुळे आणि म्युझियममधल्या मोठ्या आकाराच्या फुलपाखरांमुळे आणि शिंपल्यांमुळे ते म्युझियम आम्हांला चांगलंच लक्षात रहायला हवं होतं, पण ते म्युझियम फारच लहान होतं, आम्ही म्युझियमच्या आत शिरलो आणि तिथले प्राण्यांचे नमुने बघत पुढे जायला लागलो, तेवढ्यात तिथून बाहेर पडायचं दार समोर आलं सुद्धा! त्यामुळेच आम्ही त्या म्युझियमला भेट दिल्याचं मला अंधुकसं आठवतंय.

   नंतर तिथल्या अॅन्थ्रॉपॉलॉजिकल म्युझियमला भेट देऊन आम्ही अंदमानमधल्या आदिवासी जमाती आणि त्यांच्या जीवनपद्धतीची माहिती करून घेतली. म्युझियम पाहून आम्ही काहीजण तिथल्या खालच्या दालनात बसलो होतो, दालनाजवळच म्युझियममधलं एक दुकान आहे. त्या दुकानात ठेवलेल्या वस्तू बघाव्यात म्हणून मी तिकडे जात होते, तेवढ्यात आमच्या बसच्या क्लीनरने बाहेरून मला हाक मारत विनंती केली, की "सगळ्यांना लवकर निघायला सांगा, नाहीतर नंतर सेल्युलर जेलच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जायला आपल्याला उशीर होईल." वास्तविक आमच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार आम्ही वेळेत सगळी ठिकाणं बघत होतो, त्यामुळे आम्हांला तसा काही उशीर वगैरे झालेला नव्हता. पण तिथून आम्ही आधी सागरिका एम्पोरियममध्ये जाणार होतो आणि त्यानंतर सेल्युलर जेलमध्ये जाणार होतो. जेलपाशी वाहनांच्या गर्दीत बस पार्क करण्यासाठी योग्य जागा मिळावी म्हणून लवकर निघून तिथे वेळेआधी पोहोचण्याची त्याची घाई चालली होती. त्याच्या घाईमुळे मी तिथल्या दुकानात वस्तू विकत घेण्याचा बेत रद्द केला आणि दालनात बसलेल्या बाकीच्यांना तो निरोप सांगितला. मग आम्ही घाईने बाहेर पडलो. मात्र म्युझियमच्या वरच्या मजल्यावर असलेले लोक खाली यायला वेळ लागणार होता, तोपर्यंत उन्हामुळे तहानलेल्या आम्ही तिथल्या शहाळेवाल्याकडून शहाळी घेतली आणि मगच बसमध्ये बसलो. पण म्युझियममध्ये असलेले बाकीचे सगळे लोक येईपर्यंत मध्ये इतका वेळ गेला, की तेवढ्या वेळात माझी म्युझियममधल्या दुकानातली खरेदीही आटोपली असती.

     तिथून आम्ही सागरिका एम्पोरियम या शासकीय दुकानात गेलो. या दुकानात आल्यावर मात्र माझी काहीशी निराशा झाली, कारण नॉर्थ बे कोरल बीचवरच्या दुकानात मी जशा मोत्यांच्या आणि पोवळ्यांच्या माळा पाहिल्या होत्या, तशा प्रकारच्या माळा इथे उपलब्ध नव्हत्या. इथे संवर्धित (कल्चर्ड) मोत्यांचे दागिने विकायला होते, पण त्यात विविधता कमी होती. त्यामुळे पाहिलेल्या वस्तू पटकन मनास येईनात. तसंच इथल्या काही वस्तू नॉर्थ बे कोरल बीचवरच्या दुकानातल्या वस्तूंपेक्षा जास्त महाग होत्या. काही स्वस्त वस्तूही होत्या, पण त्यांच्या किंमतीत पंधरावीस रुपयांचाच फरक होता. या दुकानात मोठ्या शिंपल्यांचे सुंदर नाईटलॅम्प विकायला होते, पण घरात आधीच कुठूनकुठून विकत घेतलेले वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर नाईटलॅम्प असल्याने, मी ते मोठ्या शिंपल्यांचे नाईटलॅम्प विकत घेण्याचा बेत टाळला. बाकी दुकानात मोती आणि पोवळ्यांच्या दागिन्यांव्यतिरिक्त, शंखशिंपल्यांच्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वस्तू, शुद्ध खोबरेल तेल, पिशव्या, हॅण्डलूमची जाकीटं आणि इतर कपडे, लाकडी शोभेच्या वस्तू, लाकडी चमचे, लाटणी अशा वेगवेगळ्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. शेवटी ते सगळं बघत, तिथे फिरत हळूहळू एकेक वस्तू विकत घेत मी आणि माझ्या कुटुंबियांनी तिथे खरेदी केलीच.

     आमची खरेदी आटोपली, तेव्हाच नेमके तिथले लाईट गेले. बाकीचे काहीजण त्यांच्या विकत घ्यायच्या वस्तू घेऊन काऊंटरपाशी उभे होते, त्यांची बिलं तयार व्हायला वेळ लागणार होता. तितक्या अवधीत आम्ही काहीजण जवळच्या एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊन आलो. आम्ही परत दुकानापाशी आलो, तेव्हा तिथे वीणा वर्ल्डचे पर्यटक आलेले दिसले. आमच्या ग्रुपच्या सगळ्या लोकांची खरेदी आटोपल्यावर आम्ही तिथून निघून सेल्युलर जेलपाशी आलो. आमची बस जेलजवळ थांबली आणि आम्ही उतरल्यावर पार्किंगकरता लांब निघून गेली. जेलच्या समोर असलेल्या उद्यानात काही स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे बसवलेले आहेत. संध्याकाळी त्यांच्यावर रंगीत प्रकाशझोत सोडलेले असतात. उद्यानाजवळच असलेला एक चहावाला पाहिल्यावर आमच्या सगळ्या ग्रुपचा तिथे चहा घेऊन झाला. मग आम्ही काहीजण जेलपाशी रांगेत अगदी पुढे उभे राहिलो. आमच्या ग्रुपमधले काहीजण मात्र समोरच्या उद्यानात नीट फिरून आले. शो चालू व्हायला अजून वेळ होता. तोपर्यंत तिथे वीणा वर्ल्डचे पर्यटक त्यांची दुकानातली खरेदी आटपून यायला लागले होते.

संध्याकाळच्या वेळी सेल्युलर जेलचा परिसर हळूहळू दिव्यांनी उजळायला लागला होता.
     
     अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या साऊंड अॅण्ड लाईट शो साठी आम्हांला एकापाठोपाठ एक आतमध्ये सोडायला सुरूवात झाली. सावरकरांना ज्या इमारतीत ठेवलं होतं, त्या इमारतीसमोरच्या प्रांगणात हा शो होतो. त्यासाठी तिथल्या स्वातंत्र्यज्योतीपासून काही अंतरावर लोकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. खुर्च्यांवर बसल्यावर समोरच्या प्रांगणातली सकाळी पाहिलेली एका कैद्याची शिक्षा भोगण्यासाठी उभी असलेली पाठमोरी प्रतिकृती समोर दिसत होती. ती खास या शो करताच उभी करण्यात आलेली आहे. त्या प्रतिकृतीशेजारी ब्रिटिश न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी एका रिकामी खुर्ची ठेवण्यात आलेली होती. ती प्रतिकृती, तिच्याशेजारची खुर्ची, प्रांगणाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या जेलच्या भिंती आणि प्रांगणातला एका जुनापुराणा वृक्ष हेच त्या शो मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार होते. सगळे लोक आसनस्थ झाल्यावर 'वंदे मातरम्' या गीताचं संगीत ऐकू यायला लागलं आणि लोक आदराने उभे राहिले. काही वेळातच एकजण 'खाली बसून घ्या' असं सांगण्यासाठी आला आणि लोक खाली बसले. 'वंदे मातरम्' चं ते संगीत शो चालू होईपर्यंत वाजतच राहणार होतं. संध्याकाळच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर प्रांगणातले दिवे हळूहळू उजळत होते. सावरकरांच्या कोठडीतलाही दिवा चालू झाला होता. लोक उत्साहाने शो चालू होण्याची वाट पाहत होते. एकेकाळी अनेक कैद्यांनी जिथे प्राणांतिक छळ सोसत, मातृभूमीसाठी रक्त सांडत, पराकोटीच्या वेदना अनुभवल्या होत्या आणि त्यांचा आक्रोश जिथे घुमला होता, तो सेल्युलर जेलचा सध्या सजलेला परिसर आता उत्साही, आनंदी लोकांनी भरून गेलेला होता. काळाची किमया ही अशी अगाध असते. अखेर ठरलेल्या वेळेवर शो चालू झाला. फक्त ध्वनी आणि प्रकाश यांचा वापर करून, काळाचा पट उलगडून दाखवणारा तो शो अप्रतिम, अविस्मरणीय असाच होता. त्याचं शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे. तो अनुभव प्रत्येकाने स्वतःच घ्यायला हवा.

शो मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा पुतळा
     
जेलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या (सर्वात वरच्या) कडेच्या (उजव्या बाजूला असलेल्या) कोठडीतला दिवा लागलेला दिसतोय - हीच ती सावरकरांची कोठडी!
 
     शो संपल्यावर आम्ही भारावलेल्या मनाने जेलबाहेर पडलो, तेव्हा रात्रीच्या अंधारात समोरच्या उद्यानातले पुतळे प्रकाशाच्या झोतात न्हाऊन निघालेले दिसत होते. लांबवर उभ्या असलेल्या बसपाशी जातांना रस्त्याच्या एका बाजूने खाली खोलवर वसलेल्या घरांमधले दिवे ताऱ्यांसारखे लुकलुकतांना दिसत होते. आता अंदमानमधलं आमचं सगळं स्थळदर्शन आटोपलेलं होतं.पुढे चालत असलेल्या लोकांच्या निळ्या टोप्या शोधत आम्ही बसच्या दिशेने निघालो होतो.

शो संपल्यावर आम्ही सेल्युलर जेलबाहेर पडलो, तेव्हा जेलचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात पूर्णपणे नाहून निघाला होता. 
   
जेलसमोरच्या उद्यानातले स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे रंगीत प्रकाशझोतात उजळून निघाले होते, त्यात हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा समोरच होता.

स्वातंत्र्यसेनानी - इंदु भूषण रॉय
  
स्वातंत्र्यसेनानी - बाबा भान सिंह
  
रात्रीच्या वेळी जेलसमोरच्या सखल भागात लागलेले दिवे लुकलुकतांना दिसत होते, ते दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं. 
    
     आता हॉटेलवर गेल्यावर थोडी विश्रांती घेऊन मग पार्टीसाठी हॉटेलच्या टेरेसवर जमायचं होतं. टेरेसवर सगळ्यांना बसण्यासाठी गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. बाजूला टेबलं मांडलेली होती. आमच्या पुढ्यात येणाऱ्या वेफर्स, स्टार्टर्स, ज्यूस इत्यादींचा आस्वाद घेत, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी भरलेल्या मोकळ्या आभाळाखाली मोकळ्या टेरेसवर आमच्या ग्रुपचे खेळ रंगले होते. त्यातले काही खेळ देवकुळ्यांनी घेतले, तर काही खेळ गंद्र्यांनी घेतले. मध्येच देवकुळ्यांनी गंद्रे दांपत्याची एक मुलाखतही घेतली. मग पुन्हा खेळ चालू झाले. ट्रीपमधले हे खेळ सगळ्यांना सहज खेळता येतील आणि सगळ्यांनाच खेळावेसे वाटतील असे असले, की खेळांमुळे लोकांचा आनंद अजून वाढतो. पण जर खेळ खेळतांना खेळासाठी एखाद्या व्यक्तीला आवडत नसलेली गोष्ट मनाविरूद्ध करावी लागली, तर त्यामुळे त्या व्यक्तीला ट्रीपमुळे झालेल्या आनंदावर तिच्या खेळातल्या नाराजीचं विरजण पडू शकतं. काळजीपूर्वक निवडलेल्या खेळांमुळे मात्र लोकांच्या आनंदात अजून भरच पडते. खेळाचा आमचा हा शेवटचा दिवस असल्याने आज खेळ जास्त रंगले होते आणि रोजच्यापेक्षा उशीरा संपले होते. त्यानंतर खेळात जिंकलेल्या व्यक्तींना बक्षिसांचं वाटप झालं आणि मग टेरेसवरच आमचं जेवण झालं. काहीजण तिथे रात्री उशीरापर्यंत थांबले होते, पण आम्ही मात्र लवकर खाली आलो होतो.

     आम्ही खरेदी केलेल्या वस्तू आणि माझ्या कुटुबियांना खेळात बक्षिसं म्हणून मिळालेल्या वस्तू अशा सगळ्या वस्तू त्यातल्या शंखशिंपले, मोती, पोवळे इत्यादींमुळे आम्हांला एका वेगळ्या बॅगेत भराव्या लागणार होत्या आणि ती बॅग केबिन लगेज म्हणून सोबत बाळगावी लागणार होती. मात्र इतके दिवस तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरून आम्ही जे सगळे मोठमोठे प्रवाळांचे तुकडे गोळा केले होते, ते सगळे आम्हांला हॉटेलमध्येच ठेवून द्यावे लागणार होते. काहीशा जड मनानेच आम्ही ते सामानातून बाहेर काढले. हॉटेलच्या आवारातल्या झाडांच्या आळ्यात काही सुंदर प्रवाळ ठेवलेले मी पाहिले होते, तेही असेच इतर पर्यटकांनी हॉटेलमध्येच ठेवून दिलेले असावेत. सामानाची बांधाबांध करुन झाल्यावर आम्ही निश्चिंत झालो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्यापेक्षा थोडं उशीरा म्हणजे साडेसातला तयार होऊन नाश्त्यासाठी खाली जमायचं होतं.

     शेवटच्या दिवशी सकाळी आम्ही रोजच्याप्रमाणे तयार होऊन सांगितलेल्या वेळेच्या आधीच खाली आलो. बहुतेक सगळेजण तिथे स्वागतकक्षात जमल्यावर बर्वेकाकांनी सगळ्यांना योगाबद्दलच्या काही सोप्या टीप्स दिल्या. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो, तर तिथल्या टेबलावरचे तीन ट्रे आम्हांला चक्क रिकामे दिसले. त्या ट्रेमध्ये ठेवायचे पदार्थ तयार होऊन येत आहेत, असं काऊंटरवरच्या माणसाने सांगितलं. पण काहीजणांनी 'तिथे आहेत ते पदार्थ घेऊन खायला सुरूवात करू या' असा विचार करून डिशमध्ये वाढून घ्यायला सुरूवात केल्यावर, सर्वच जण रांगेत उभे राहिले. थोड्या वेळाने तिथे छोले आणि मेथीच्या पुऱ्या आणण्यात आल्या. मेथीच्या पुऱ्या चविष्ट होत्या, पण आधीच बाकीच्या पदार्थांनी पोट भरत आलेलं असल्याने आम्ही फक्त त्या पुऱ्यांची चव पाहण्यापुरती एखादी पुरी घेतली. तेवढ्यात देवेंद्र गंद्र्यांनी घोषणा केली, की "आजच्या शेवटच्या दिवशी देवकुळ्यांनी स्वतः सगळ्यांसाठी साखरभात बनवलेला आहे." हे ऐकल्यावर काहीजणांना असं वाटलं, की 'हे आधी माहिती असतं, तर आम्ही नाश्ता करण्याची एवढी घाई केली नसती.' मी साखरभात खाऊन पाहिला आणि देवकुळ्यांच्या पाककौशल्याला दाद दिली.

     नाश्ता आटोपल्यावर आम्ही हॉटेलच्या आवारात थांबलो होतो. तिथे येऊन रूपाली गंद्रेंनी सगळ्या स्त्रियांना मोगऱ्याचे गजरे दिले. एखाद्या समारंभाला जावं, तशा गजरे लावून बहुतेकजणी विमानप्रवासासाठी सज्ज झालेल्या होत्या. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आम्हांला विमानतळावर पोहोचायचं होतं. आमचं गो एअरचं विमान अकरा वाजता सुटून मुंबईला दुपारी तीन वाजता पोहोचणार होतं. पण आमचं विमानातलं दुपारचं जेवण बुक केलेलं नव्हतं. गो एअरच्या आधीच्या अनुभवामुळे विमानातलं जेवण घेण्यासाठी आम्ही कोणी विशेष उत्सुकही नव्हतो. त्यात नुकताच आमचा पोटभर नाश्ता झालेला होता. तेवढ्यात देवेंद्र गंद्र्यांनी पाण्याच्या बाटल्यांबरोबर सगळ्यांच्या हातात खाद्यपदार्थांच्या पिशव्या दिल्या. त्यात पॅक केलेलं सॅण्डविच, टोमॅटो केचपचा एक छोटा पॅक, बिस्कीटांचा एक पुडा आणि अॅपी ज्यूसचा एक पॅक हे सगळं दिलेलं होतं. त्यामुळे विमानातले पदार्थ खाण्याचा काही प्रश्न उरला नव्हता. मग हॉटेल सोडण्याची आमची तयारी चालू झाली. हॉटेलमधल्या कर्मचारी स्त्रिया आमचं सामान खाली आणून ते विमानतळावर घेऊन जाणाऱ्या गाडीत भरत होत्या.

     निघण्याची वेळ झाल्यावर आम्ही बसमधून शेवटचा प्रवास करत पोर्ट ब्लेअरच्या 'वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर' पोहोचलो. विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था कडक होती, याची चुणूक आम्हांला लगेच मिळाली. आमचं सामान स्कॅन झाल्यावर त्यातली नेमकी माझी बॅगच अडवली गेली. माझ्या बॅगेत प्रवाळ, शंखशिंपले असं काहीही नव्हतं, तरी माझी बॅग का अडवली गेली असावी याचा मला प्रश्न पडला होता. स्कॅनरवर त्या बॅगेतला कॅमेऱ्याच्या सेलचा चार्जर पाहून तिथल्या अधिकाऱ्याने बॅग अडवली होती. त्या बॅगेत कॅमेऱ्याच्या सेलचा चार्जर आहे याचा खुलासा केल्यावर माझी बॅग पुढे जाऊ देण्यात आली. सामानाची तपासणी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने आमच्या पुढे असलेल्या कोणाची तरी बॅग अडवून त्यांच्या बॅगेतली समुद्रकिनाऱ्यावरून गोळा केलेल्या शंखशिंपल्यांची प्लॅस्टिकची पिशवी त्यांना तिथेच बाहेर काढून ठेवायला लावली होती.

     चेक इन झाल्यावर थोड्या वेळाने आमच्या विमानाची उद्घोषणा झाली. आम्हांला विमानापाशी सोडण्यासाठी बाहेर बस उभी होती. आम्हांला रांगेने बसमध्ये सोडलं गेलं. बसमधून उतरल्यानंतर विमानात चढतांना प्रत्येकाच्या जवळच्या केबिन लगेजचे टॅग्ज काळजीपूर्वक तपासण्यात आले. विमानात शिरल्यावर जणू तिथे आत कसला तरी धूर सोडला असावा असा आभास होणाऱ्या हवेच्या वाफा दिसत होत्या. अंदमानमधल्या उष्ण वातावरणामुळे विमानातली ए.सी.ची हवा गरम होत होती आणि त्यामुळे विमानात धूर सोडला असावा, असा आभास होत होता. यावेळेलाही आम्हांला विमानात पंखांच्या मागच्या बाजूलाच जागा मिळाली होती. विमानाने हवेत उड्डाण केल्यावर खिडकीतून दिसेल तेवढं अंदमान आम्ही डोळाभरून साठवून ठेवत होतो. या परतीच्या प्रवासात गो एअरच्या विमानातल्या वस्तू विक्रीच्या उपक्रमाला उदार आश्रय देत काहीजणांनी विमानात वस्तू विकत घेतल्या. विमान चेन्नईला थांबलं, तेव्हा कानडे कुटुंबिय सगळ्यांचा निरोप घेत चेन्नईलाच उतरले. पुढच्या काही दिवसांत ते चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसराची सफर करणार होते. चेन्नईत पुन्हा एकदा विमानातल्या सर्व प्रवाशांच्या बोर्डींग पासचं आणि वरच्या कप्प्यांमध्ये ठेवलेल्या सामानाचं व्यवस्थित चेकींग झालं. तिथून उड्डाण करून विमान मुंबईला पोहोचलं आणि विमानातून उतरल्यावर सगळ्यांना सरकत्या पट्ट्यावरून येणारं आपलं सामान घेण्याची घाई झाली. आता घरी परतण्याचे वेध लागलेल्या सगळ्यांनी पटापट एकमेकांचा निरोप घेत टॅक्सी ठरवण्यासाठी धाव घेतली. टॅक्सीतून थेट घराच्या दारापाशी येतांना ही अविस्मरणीय ट्रीप संपल्याची जाणीव होत होती, तशीच घरी परतण्याची ओढही लागली होती.

     नंतर ट्रीपचे फोटो पाहिल्यावर सगळ्यांकडून फोटो अणि फोटोत दिसणारा अंदमानचा परिसर आवडल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या. ज्यांची मला या ट्रीपमध्ये आठवण झाली होती, त्यांच्याही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्यावर, अंदमानचं सौंदर्य त्यांना माझ्या फोटोतून का होईना पण अनुभवता आलं, याचं मला समाधान वाटलं. आता जर त्यांच्यापैकी कोणाला अंदमानला जावंसं वाटलं, तर मला अंदमान जेवढं सुंदर आणि स्वच्छ दिसलं होतं, त्यापेक्षाही जास्त नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं, स्वच्छ आणि आवश्यक त्या सुविधांनी युक्त अंदमान त्यांना दिसावं, हीच माझी इच्छा आहे. अंदमानचा प्रदेश म्हणजे द्वीपसमूह असल्याने तिथे विमानाने आणि बोटीने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादेत राहते, तसंच तिथे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा नियमांमुळे कोणत्याही ठिकाणी लोकांची खूप गर्दी होत नाही, त्यामुळे तिथे स्वच्छताही राखली जाते आणि त्या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्यही बऱ्यापैकी अबाधित राहतं. यापुढेही अंदमानचा विकास करतांना तिथलं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहील आणि पर्यटकांची संख्या मर्यादित राहील याची काळजी घेतल्यास अंदमान अधिकच सुंदर आणि सुरम्य बनेल, याबद्दल मला काहीही शंका नाही.

     अंदमानच्या ट्रीपनंतर हिमश्रीचा फीडबॅक मागणारा मेसेज आला अणि एकदोन सूचनांचा समावेश असलेला माझा फीडबॅक दिल्यावर लगेच त्याचं उत्तरही आलं. मी आधी कधी इतर ट्रॅव्हल कंपन्यांसोबत प्रवास केला नसल्याने हिमश्रीची इतर कोणाबरोबर तुलना करू शकणार नाही, मात्र इतकं निश्चित सांगू शकेन, की आमचा प्रवास तसा चांगला झाला. आम्हांला प्रवासात कोणतीही अडचण आली नाही आणि कशाचीही कमतरता जाणवली नाही. आमच्या ग्रुपमधले सगळे लोक हळूहळू का होईना पण सगळ्यांमध्ये मिसळत गेले. एकमेकांशी मिळूनमिसळून वागणाऱ्या सगळ्या लोकांमुळे ही ट्रीप घरगुती ट्रीपसारखीच वाटत होती. ट्रीपमध्ये रेंगाळत फिरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही अंदमानमधली बहुतेक ठिकाणं बघतांना कुठे घाई झाली नाही आणि ती ठिकाणं व्यवस्थित पाहिल्याचं समाधान मिळालं. या ट्रीपमध्ये देवेंद्र गंद्रे आणि रूपाली गंद्रे हे दोघेहीजण सगळ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवत होते. या लहानशा ट्रीपमध्ये आम्हांला अंदमानच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता आला, तिथल्या प्रवाळांचं सौंदर्य अनुभवता आलं, तसंच सेल्युलर जेलची संपूर्ण सफर करायला मिळाली आणि हे सुरम्य अंदमान त्याच्या सुंदर आठवणींसहित कायमचं माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ठाण मांडून बसलं.

     खरंतर मी ट्रीपहून परत आल्यावर शक्य तितक्या लवकर हे प्रवासवर्णन लिहायला घेतलं होतं, पण काही अपरिहार्य कारणांमुळे या प्रवासवर्णनाचे भाग एकापाठोपाठ एक प्रकाशित करतांना अधिकाधिक उशीर होत गेला. यातला तपशील लिहितांना अनावधानाने एखादी गोष्ट राहून गेली असण्याचीही शक्यता आहे, पण ट्रीपला आलेले कोणी त्याचा राग मानून घेणार नाहीत, ही अपेक्षा! तसंच वाचकांनाही माझ्या प्रवासवर्णनाचा उपयोग व्हावा म्हणून काही ठिकाणी मुद्दाम तपशीलवार वर्णन केलं आहे. या माझ्या प्रवासवर्णनाचा कोणाला प्रवासासाठी उपयोग झाल्यास, मला निश्चितच त्याचा आनंद वाटेल, हे सांगून या प्रवासवर्णनाची इथे सांगता करते आहे.
                  

Tuesday, August 2, 2016

अंदमान ट्रीप - भाग १५ - पोर्ट ब्लेअर - सॉ मिल आणि सेल्युलर जेल

आधीचे भाग -
पुढे -

     दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही तयार होऊन नाश्ता करण्यासाठी खाली आलो. देवकुळे आजही झब्बा, खादीचं जाकीट असा लक्षवेधक पोशाख परिधान करून आले होते. नाश्ता आटोपल्यावर आम्ही स्थळदर्शनाकरता निघालो. आता आम्ही आधी आशिया खंडातली सर्वात मोठी असलेली चातम सॉ मिल बघणार होतो. अंदमानच्या मुख्य बेटालगत असलेल्या छोट्याशा चातम बेटाच्या संपूर्ण भूभागावर ही चातम सॉ मिल उभारलेली आहे. चातम बेट मुख्य बेटाशी एका पुलाने जोडलेलं आहे. खरंतर आम्ही ही मिल शेवटच्या दिवशी बघणार होतो, पण आदल्या दिवशीच फिशरीज म्युझियम पाहिल्यामुळे शिल्लक असलेला वेळ सत्कारणी लावत आम्ही आधीच मिलला भेट देण्यासाठी निघालो होतो. चातम सॉ मिलमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या नेण्यावर बंदी आहे. त्यामुळे काही जणांकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या तिथल्या काऊंटरवर जमा करून आम्ही मिलमध्ये शिरलो. मिलमध्ये फोटो काढायला परवानगी होती. तिथे आमचे दोन गट करून आम्हांला मिल दाखवण्यात आली.

     आम्हांला सर्वप्रथम एका संग्रहालयात नेण्यात आलं, मिलमध्ये बनवण्यात आलेल्या काही लाकडी वस्तू तिथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवण्यात आल्या होत्या. तिथे सुरूवातीलाच एक फलक लावलेला होता, त्यावर वेगवेगळ्या झाडांच्या खोडांचं वर्गीकरण करून त्यांचे उपयोग कशाकरता केले जातात, ते दिलेलं होतं. एका प्रचंड घेर असलेल्या झाडाच्या बुंध्याचा आडवा काप घेऊन, त्यापासून तयार केलेलं टेबल पुढे मांडलेलं होतं. दोन जुळ्या झाडांच्या खोडांचा पॉलिश केलेला कापही तिथे ठेवलेला होता. फक्त अंदमानमध्येच आढळणाऱ्या पडॉक वृक्षाच्या खोडापासून तयार केलेल्या वस्तू, काही वाद्यं, निकोबारी झोपडी, काही बोटी इत्यादींची मॉडेल्स तिथे ठेवण्यात आलेली होती. त्याव्यतिरिक्त फर्निचर, सुंदर कोरीव काम केलेले पुतळे, देव्हारे, एक तोल साधणारी बाहुली, काही जतन केलेले मृत प्राणी इत्यादी तिथे मांडून ठेवलेले होते. त्या दालनाबाहेर दालनालगतच एक लाकडी वस्तूंचं दुकानही होतं.

निकोबारी झोपडी
    
विविध लाकडी वस्तू
  
तोल साधणारी बाहुली
  
बोटीची प्रतिकृती
     
जुळ्या खोडांचा काप
    
लाकडी देव्हाऱ्यातल्या या गणपतीला कोणीतरी फूल वाहून, त्याच्यापुढे उदबत्ती लावून पूजाही केली आहे आणि भाविकपणे समोरच्या करंड्यात पैसेही वाहिलेले दिसताहेत.
     
कुठूनही पाहिलं, तरी हा पक्षी सारखा आपल्याकडे पाहत असल्याचंच जाणवतं.
   
सॉ मिलमधल्या यंत्राची प्रतिकृती - मिलमधल्या रूळांवरून लाकडाचे ओंडके वाहून नेणाऱ्या ट्रॉल्या - त्यांच्यापुढे असलेल्या हिरव्या लाल यंत्राच्या धारदार पात्याने ओंडक्याचे विशिष्ट जाडीचे काप कापले जातात आणि यंत्रापुढे असलेल्या सरकत्या पट्टयांवरून पुढे पाठवले जातात. मिलमध्ये ठिकठिकाणी अशी कापणीयंत्रे बसवलेली आहेत.
   
सॉ मिलच्या आवारातली प्रतिकृती
    
     तिथून आम्ही प्रत्यक्ष लाकडं कापली जातात, त्या विभागाला भेट दिली. तिथे लाकडाचे ओंडके आणून ते समुद्राच्या पाण्यात पंधरा दिवस भिजत ठेवतात. त्यानंतर ते ओंडके बाहेर काढून रचून ठेवले जातात आणि त्यांच्या वर्गीकरणानुसार त्या ओंडक्यांवर खुणा केल्या जातात. त्यानंतर ते ओंडके कापण्यासाठी मशिनपाशी आणले जातात आणि आवश्यकतेनुसार विविध आकारांमध्ये कापले जातात. कापलेले लाकडांचे तुकडे पुन्हा दुसरीकडे नीट रचून ठेवले जातात.

मिलच्या आवारात आणलेले मोठमोठे लाकडी ओंडके
       
विशिष्ट आकारात कापलेल्या लाकडी पट्ट्या बाजूला व्यवस्थित रचून ठेवल्या जातात, मिलमधली जागा पूर्ण भरल्याने बहुधा या पट्ट्या बाहेर आवारात रचून ठेवल्या होत्या.
      
इथून ओंडके समुद्राच्या पाण्यात टाकून भिजवले जातात, तसंच पूर्ण भिजवलेले ओंडके पाण्याबाहेर काढून ते पुढे मिलमध्ये ठिकठिकाणी पाठवले जातात.
  
हिरव्या रंगाच्या या यंत्रावर लाकूड कापलं जातं आणि यंत्रापुढे असलेल्या काळ्या रोलरवरून लाकडाचे काप पुढे पाठवले जातात.
     
     त्या विभागातून बाहेर येऊन आम्ही तिथल्या बॉम्ब पिटला भेट दिली. दुसऱ्या महायुद्धात चातम बेट जपान्यांच्या ताब्यात असतांना ब्रिटिशांनी तिथे बॉम्ब टाकला होता. त्या बॉम्बमुळे तिथे एक मोठा खड्डा पडला होता. आता इतक्या वर्षांत आजूबाजूच्या झाडांच्या गळणाऱ्या पानांमुळे आणि पावसामुळे येणाऱ्या मातीमुळे तो खड्डा काहीसा भरला गेला आहे, तरीही त्या खड्ड्याचा खोलवर असलेला विस्तार जाणवत होता. त्या खड्ड्यावरून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी तिथे एक छोटासा झुलता पुलही बांधलेला आहे. हा खड्डा बघत असतांना अंदमानमधल्या मड व्होल्कॅनोचा विषय निघाला. आमच्या ग्रुपमधल्या वयस्क व्यक्तींचा विचार करून गंद्रेंनी मड व्होल्कॅनो हे ठिकाण ट्रीपच्या स्थळदर्शनात समाविष्ट केलेलं नव्हतं. मिलमधून बाहेर पडल्यावर तिथल्या प्रवेशद्वारापाशी आमच्या सर्वाचं एक फोटोसेशन झालं आणि मग आम्ही बसमधून सेल्युलर जेलकडे निघालो.

बॉम्ब पिट आणि झुलता पूल
  
सॉ मिलच्या प्रवेशद्वारातून दिसणारा समुद्राचा नजारा!
   
     सेल्युलर जेलच्या त्या थंड, दगडी इमारतीतून आत शिरल्यावर तिथे आमचे गाईड 'तिरूपती' यांच्याशी आमचा परिचय करून देण्यात आला. तिथल्या स्वातंत्र्य ज्योतीचं दर्शन घडवून मग तिरूपतींनी आम्हांला सगळ्यात आधी नेलं, ते कैद्यांना फाशी दिलं जात होतं, त्या ठिकाणी. आता त्या जागेवर विटांचं बांधकाम करून ते ठिकाण बंदिस्त केलेलं आहे, पण सावरकर तिथे असतांना, त्या ठिकाणी उघड्यावर फाशी दिली जात असे. एका वेळी तीन जणांना फाशी देण्यासाठी तिथे तीन दोर उभारलेले होते. त्या फाशीच्या जागेच्या अगदी समोरच सावरकरांची कोठडी होती. तिथे फाशी दिली जात असतांना सावरकरांना ते दृश्य सहज दिसावं, म्हणून मुद्दाम त्यांना फाशीच्या जागेच्या समोर असलेल्या सर्वात कडेच्या कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं.

सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करतांना
      
फाशीचं ठिकाण - पूर्वी इथे उघड्यावरच कैदयांना फाशी दिलं जायचं - या जागेच्या समोरच सावरकरांची कोठडी होती.
      
सेल्युलर जेलच्या याच इमारतीत सावरकरांची कोठडी आहे. आता सेल्युलर जेलचा सगळा परिसर सुशोभित केलेला आहे, पण एकेकाळी इथे असंख्य कैदी नरकयातना भोगत होते.
    
     सेल्युलर जेलची इमारत आणि तिच्यासमोरचं प्रांगण आता व्यवस्थित सुशोभित केलेलं आहे, पण एकेकाळी अनेक कैद्यांनी तिथे प्राणांतिक छळ सोसला होता. सेल्युलर जेलमध्ये अनेक कैदी काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी येत असत. काळं पाणी म्हणजे काळ (काल / समय) आणि समुद्राचं पाणी यामुळे स्वजनांपासून ताटातूट होऊन तुरुंगात एकाकी पडलेले कैदी सश्रम कारावास भोगत असत, त्या कारावासाला अंदमानमधल्या उष्ण हवामानाची, डासांची आणि रोगराई पसरवणाऱ्या अशुद्ध पाण्याचीही भक्कम साथ असायची. या सश्रम कारावासामध्ये कैदी नुसतेच त्यांच्या शारिरिक क्षमतेपेक्षा अधिक काम करत नसत, तर त्याच्या जोडीने त्यांचा भरपूर शारिरिक, मानसिक छळही होत असे. कैद्यांना दिलेलं काम त्यांनी वेळेत पूर्ण केलं नाही, तर त्यांना त्याची शिक्षा व्हायचीच, पण त्याबरोबरच कैद्यांना मूत्रविसर्जनाकरता जे मातीचं मडकं दिलं जायचं, ते जर चोवीस तासांत भरून वाहिलं, तर त्यासाठीही शिक्षा व्हायची. ही शिक्षा टाळण्यासाठी कित्येक कैदी कमीत कमी पाणी पिण्याचा मार्ग अवलंबायचे. कमीत कमी पाणी पिऊन श्रम करतांना ते त्यांचा मृत्युलेखच लिहित असायचे.

जेलमधल्या कैदयांना सश्रम कारावास म्हणून कोणत्या शिक्षा दिल्या जात होत्या, ते या दालनात बघायला मिळते.
    
     तिरूपतींकडून माहिती ऐकता ऐकता आम्ही आलो ते कोल्हूची शिक्षा दिली जात असलेल्या जागी. तिथे पूर्वी वापरात असलेलं एक कोल्हूचं भलंमोठं भांडं ठेवलेलं होतं. त्याच्यापुढे कोल्हू फिरवून तेल काढणाऱ्या एका पुतळ्याची प्रतिकृती आणि असोला नारळ लोखंडी बत्त्यावर सोलणाऱ्या पुतळ्याची प्रतिकृती ठेवलेली होती. पूर्वी तिथल्या कैद्यांना शिक्षा म्हणून दररोज त्यांच्या शारिरिक क्षमतेपेक्षा अधिक तेल कोल्हूवर काढावं लागायचं किंवा नारळ सोलावे लागायचे किंवा काथ्या तयार करावा लागायचा. निर्धारित काम पूर्ण झालं नाही, तर त्यासाठी कोड्यांचा दंड दिला जात असे. एका कैद्याला कोडे लगावणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिकृतीही तिथे उभारलेली आहे. तिथल्या कैद्यांना शिक्षा म्हणून अशा प्रकारच्या बेड्या घातल्या जात असत, की त्या बेड्यांमुळे त्या कैद्यांना खाली बसता येणं अशक्य व्हावं. वेगवेगळ्या तीन प्रकारच्या बेड्या घातलेल्या कैद्यांच्या प्रतिकृतीही तिथे उभारलेल्या आहेत.

तुरुंगात पूर्वी वापरला जात असलेला खरा कोल्हू
      
कोल्हूवर तेल काढत असलेला कैदी आणि बत्त्यावर असोले नारळ सोलणारा कैदी यांच्या प्रतिकृती
    
कैदयांना शिक्षा म्हणून दिलेले रोजचे निर्धारित काम ते पूर्ण न करू शकल्यास त्यांना कोडे लगावले जात असत.

कैद्यांना शिक्षा म्हणून अशा प्रकारच्या बेड्या घातल्या जात असत, की त्या बेड्यांमुळे त्या कैद्यांना खाली बसता येणं अशक्य व्हावं.
      
     त्यानंतर आम्ही सावरकरांच्या कोठडीकडे निघालो. एका गोलाकार मनोऱ्याच्या सात दिशांना पसरलेल्या सात इमारतींमध्ये तिथल्या कैद्यांना ठेवलं जात असे. (आता त्यातल्या फक्त तीन इमारती शिल्लक आहेत, उरलेल्या इमारतींच्या जागी हॉस्पिटल आहे.) या सेल्युलर जेलमधल्या छोट्या आकाराच्या कोठड्या कैद्यांना एकाकीपणाचा पुरेपुर भास होईल अशा पद्धतीने उभारलेल्या आहेत. तिथे एका खिडकीतून जेमतेम प्रकाश येणाऱ्या, लहान कोठड्यांमध्ये कैद्यांना अतिशय कडक सुरक्षेत ठेवलेलं असायचं. त्यासाठी प्रत्येक कोठडीची भलीमोठी, जडशीळ लोखंडी कडी कोणालाही सहजासहजी काढता येऊ नये अशी भिंतीच्या खळग्यात बसवलेली असायची. सावरकरांना ज्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर, सर्वात शेवटच्या टोकाला ठेवलं होतं, तिथे त्यांच्या कोठडीला अजून एक जास्तीचा दरवाजा बसवलेला आहे. इंग्रज सावरकरांना अतिशय धोकादायक बंदी मानत होते, म्हणून ही खास सुरक्षाव्यवस्था केलेली होती. आम्ही सावरकरांच्या कोठडीत गेलो, तेव्हा तिथे समोर त्यांचा फोटो ठेवलेला दिसला. फोटोसमोर त्यांना तुरुंगात देण्यात आलेली भांडीही ठेवली होती. कोठडीत गेल्यावर आम्ही क्षणभर स्तब्ध झालो. मग आमच्या ग्रुपमधल्या वयाने सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या कोप्पीकर आजोबांनी सावरकरांच्या फोटोला हार घातला. नेमके त्याच वेळी माझ्या कॅमेऱ्यातले सेल संपले. सेल बदलेपर्यंत तो क्षण निसटून गेला होता.

जेलमधली एक अंधारकोठडी
     
जेलमधल्या प्रत्येक कोठडीची भलीमोठी, जडशीळ लोखंडी कडी कोणालाही सहजासहजी काढता येऊ नये अशी भिंतीच्या खळग्यात बसवलेली होती.
      
दोन दरवाजे बसवलेली सावरकरांची कोठडी! इंग्रज सावरकरांना अतिशय धोकादायक बंदी मानत होते, म्हणून ही खास सुरक्षाव्यवस्था केलेली होती.
       
अंदमानच्या या जेलमध्ये सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेची दहा वर्षं काढली.
      
सश्रम कारावासातही स्फुरलेले काव्य तुरुंगाच्या भिंतीवर कोरणारे कविहृदयाचे सावरकर आणि त्यांचे ते कमला नावाचे काव्य, दोन्हीही अद्भुतच!
    
सावरकरांच्या कोठडीत ठेवलेली सावरकरांची प्रतिमा आणि त्यापुढे त्यांना जेलमध्ये वापरण्यासाठी दिलेली भांडी.
   
     मग तिथून आम्ही मुख्य मनोऱ्यात आलो. मनोऱ्यात लावलेली हुतात्म्यांच्या नावाची यादी वाचत आम्ही मनोऱ्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर गेलो. तिथून समोर निळा समुद्र पसरलेला दिसत होता. त्यावेळी तिथे सगळे जण जमलेले पाहून देवेंद्र गंद्रेंनी आमचे गाईड तिरूपती यांचे आभार मानत, त्यांना सावरकर विषयक पुस्तकं देत त्यांचा सत्कार केला. नंतर तिथून लवकर खाली जाण्यासाठी रूपाली गंद्रेंनी आम्हांला घाई केली खरी, पण आम्ही काहीजणच तिथून लवकर खाली आलो. आम्ही खालच्या प्रांगणात असलेल्या एका दालनातलं स्वातंत्र्यसेनानींच्या फोटोंचं आणि तिथे लिहिलेल्या ऐतिहासिक माहितीचं प्रदर्शन बघून बाहेर पडलो, तरी बाकीचे अजून मनोऱ्याच्या वरच्या मजल्यावरच रेंगाळलेले होते.

जेलच्या मनोऱ्यातून दिसणारा समुद्र
      
जेलच्या प्रांगणातली शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची प्रतिकृती - इथेच जेलमधला संध्याकाळचा साऊंड अॅण्ड लाईट शो रंगतो.
     
स्वातंत्र्यज्योत - इथेच आमचा गीतगायनाचा कार्यक्रम झाला.
    
एका दालनातली सेल्युलर जेलची प्रतिकृती तिच्या मागच्या बाजूने कॅमेऱ्यात टिपली आहे. मध्यवर्ती मनोऱ्यापुढे सात दिशांना उभारलेल्या सात इमारतीच्या कोठडयांची रचना अशी होती, की कैदयांना एकमेकांशी सहजपणे संपर्क साधता येऊ नये.
      
     तिथे असलेलं अजून एका दालन पाहत आम्ही स्वातंत्र्य ज्योतीकडे निघालो. तिथे सावरकरांनी लिहिलेली गीतं गायली जाणार होती. माझ्या मागून प्रभुदेसाई आणि देवेंद्र गंद्रे येत होते. अचानक पाठीमागून 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. ते गाणं प्रभुदेसाई म्हणणार होते, पण पाठीमागून ऐकू येणाऱ्या सुरांचा पोत देवेंद्र गंद्रेंच्या आवाजासारखा वाटत होता. सेल्युलर जेलच्या त्या वातावरणात कोण गातंय हे पाहण्यासाठी मुद्दाम मागे वळून गाणाऱ्या व्यक्तीला विचलित करावं, असं मला वाटलं नाही. त्यामुळे मागे नेमकं कोण गाणं गात होतं हे मला समजलं नाही.

     स्वातंत्र्यज्योतीपाशी सगळेजण जमल्यावर सेल्युलर जेलच्या अधीक्षक खान मॅडम तिथे आल्या. मग सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून तिथे सगळ्यांनी 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गाणं गायलं. त्यानंतर प्रभुदेसाईंनी 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या गाण्याचं पहिलं कडवं म्हंटलं. गीतगायनानंतर आमच्यासमोर खान मॅडमनी एक छोटं पण समयोचित भाषण केलं. त्या छोट्याशा भाषणानंतर देवेंद्र गंद्रेंनी खान मॅडमना पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले. मग प्रवेशद्वाराजवळच्या दोन दालनांमधलं प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. तिथे दालनांच्या वर असलेल्या आर्ट गॅलरीलाही काही जणांनी भेट दिली. एव्हाना माझे पाय दुखायला लागलेले असल्याने, मी आर्ट गॅलरीत न जाता थेट बसमध्ये जाणंच पसंत केलं.