चिरोट्याच्या उंड्यासाठी -
३ वाट्या मैदा (१५० मि. ली. मापाची वाटी)
३ वाट्या मैदा (१५० मि. ली. मापाची वाटी)
१/४ टीस्पून मीठ
३ टेबलस्पून कडकडीत गरम केलेले साजूक तूप किंवा तेल
पाणी
साट्यासाठी -
दीड टीस्पून साजूक तूप
३ टीस्पून कॉर्न फ्लोअर
पाक करण्यासाठी -
२५० मि. ली. मापाच्या भांड्यात मावेल एवढी साखर
२५० मि. ली. पाणी
स्वादासाठी केशर किंवा केशर सिरप (ऐच्छिक)
स्वादासाठी वेलचीपूड किंवा वेलची सिरप (ऐच्छिक)
तळण्यासाठी -
साजूक तूप किंवा तेल
कृती -
- मैद्यामध्ये चवीसाठी मीठ घालावे, कडकडीत गरम केलेले साजूक तूप किंवा तेल घालावे आणि पाणी घालून मैदा घट्ट भिजवावा. हा भिजवलेला मैद्याचा उंडा किमान तासभर चांगला मुरू द्यावा.
- साट्यासाठी साजूक तूप आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून चांगले फेटून घ्यावे.
- पाकासाठी जेवढी साखर तेवढेच पाणी त्यात घालून भांडे आचेवर ठेवावे आणि दोन तारी पाक करावा. (हा पाक नंतर त्यात चिरोटे घातल्यावर घट्ट होत जातो.) आच बंद केल्यावर पाकात स्वादासाठी किंचित केशर आणि वेलचीपूड घालावी.
- मग चांगला भिजलेला मैद्याचा उंडा घेऊन त्याचे सारख्या आकाराचे लहान लहान गोळे करून घ्यावे.
- मग त्यातला एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी आणि ती एका ताटात ठेवून त्या पोळीवर साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा.
- दुसऱ्या गोळ्याचीही अशीच पातळ पोळी लाटून, ती आधी ताटात ठेवलेल्या पोळीवर ठेवावी आणि त्या दुसऱ्या पोळीलाही साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा.
- अशाप्रकारे साटा लावलेल्या एकूण पाच पोळ्या एकावर एक ठेवाव्या आणि पाचव्या पोळीच्या वरच्या बाजूलाही साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा.
- मग त्या पाच पोळ्यांची गुंडाळी करावी. गुंडाळी करतांना गुंडाळीच्या प्रत्येक घडीबरोबर पोळीच्या खालच्या साटा न लावलेल्या बाजूलाही थोडा साटा लावत जावा आणि गुंडाळीचं शेवटचं टोक साटा लावून नीट बंद करून घ्यावं.
- मग त्या गुंडाळीचे सुरीने लहान लहान काप करून घ्यावे.
- कापातल्या गुंडाळ्यांचा चक्राकार भाग खालच्या आणि वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे तो काप पोळपाटावर ठेवावा आणि लाटण्याने हलक्या हाताने दाब देऊन तो काप लाटून घ्यावा.
- सगळे काप लाटून होत आले की मग कढईत साजूक तूप किंवा तेल घेऊन ते मंद आचेवर गरम होऊ द्यावं. तूप किंवा तेल नीट तापल्यावर त्यात लाटलेले काप सोडून चिरोटे तळून घ्यावे.
- चिरोटे मंद आचेवर तळून घ्यावे. तळतांना चिरोट्यावर झाऱ्याने तूप / तेल उडवावे म्हणजे चिरोटे नीट तळले जाऊन छान फुलतात. (काप तेलात सोडल्यावर तो जेव्हा वरती येतो, तेव्हा झाऱ्याने त्याला एखादं मिनिटभर अलगद दाबून त्याला कढईचा स्पर्श होणार नाही पण काप तुपाखाली / तेलाखाली संपूर्ण बुडेल असा राहू दिला तरी तो काप नीट तळला जाऊन चिरोटा चांगला फुलतो.) चिरोटा तळतांना त्याची एक बाजू नीट तळली गेली, की तो उलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घ्यावा. अशाप्रकारे किंचित गुलाबी रंगावर चिरोटे तळून घ्यावे.
- तळलेल्या चिरोट्याचे तूप / तेल निथळवून घेऊन तो गरम चिरोटा लगेच साखरेच्या पाकात टाकावा आणि लगेच पाकातल्या झाऱ्याने त्याची बाजू उलटवून घ्यावी म्हणजे त्यात सगळीकडून व्यवस्थित पाक शिरतो.
- पहिला चिरोटा पाकात टाकल्यावर दुसरा चिरोटा तळून होईपर्यंत पहिला चिरोटा पाकातच ठेवावा. दुसरा चिरोटा तळून पाकात टाकला, की पहिला चिरोटा पाकातून काढून चाळणीवर उभा निथळत ठेवावा. याप्रमाणे सगळे चिरोटे तळून, मग पाकातून काढून चाळणीत उभे करून, निथळू द्यावे.
- गार झालेले चिरोटे खायला द्यावे.
टीप - चिरोटे करतांना मदतीला अजून एखादी व्यक्ती असेल, तर चिरोटे झटपट करून होतात.
No comments:
Post a Comment