भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८,
पुढे -
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी खाली येतांना हॉटेलमधून चेक आऊट करण्याच्या तयारीनेच खाली आलो. ब्रेकफास्टसाठी टेबलवर कालच्यासारखेच ब्रेड, बटर, जाम, इडली, चटणी, सांबार, जाड छोटे डोसे, पुऱ्या, भाजी, कॉर्नफ्लेक्स, साखर, दूध, चहा, कॉफी, काळ्या द्राक्षांचा ज्यूस असे पदार्थ मांडलेले होते. आम्हांला पदार्थ वाढतांना वेटरने त्या दिवशी आम्ही तिथून निघणार का याची चौकशी केली. विमानाच्या बदललेल्या वेळेप्रमाणे आमचं विमान तासभर उशीरा सुटणार होतं, पण आम्ही मात्र विमानाच्या आधीच्या वेळेप्रमाणे विमानतळावर चेक इन करण्यासाठी जाणार होतो. ब्रेकफास्टनंतर चेक आऊट करून आम्ही गाडीत बसलो. ड्रायव्हरने काही मिनिटांत आम्हांला विमानतळावर सोडलं. आमचं सामान घेऊन आम्ही ड्रायव्हरचा निरोप घेतला.
पुढे -
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी खाली येतांना हॉटेलमधून चेक आऊट करण्याच्या तयारीनेच खाली आलो. ब्रेकफास्टसाठी टेबलवर कालच्यासारखेच ब्रेड, बटर, जाम, इडली, चटणी, सांबार, जाड छोटे डोसे, पुऱ्या, भाजी, कॉर्नफ्लेक्स, साखर, दूध, चहा, कॉफी, काळ्या द्राक्षांचा ज्यूस असे पदार्थ मांडलेले होते. आम्हांला पदार्थ वाढतांना वेटरने त्या दिवशी आम्ही तिथून निघणार का याची चौकशी केली. विमानाच्या बदललेल्या वेळेप्रमाणे आमचं विमान तासभर उशीरा सुटणार होतं, पण आम्ही मात्र विमानाच्या आधीच्या वेळेप्रमाणे विमानतळावर चेक इन करण्यासाठी जाणार होतो. ब्रेकफास्टनंतर चेक आऊट करून आम्ही गाडीत बसलो. ड्रायव्हरने काही मिनिटांत आम्हांला विमानतळावर सोडलं. आमचं सामान घेऊन आम्ही ड्रायव्हरचा निरोप घेतला.
तिथल्या ट्राॅलीवर आम्ही आमचं सामान ठेवत असतांना समोरून विमानतळावरचा एक माणूस आला. "मी तुमचं सामान आतमध्ये घेऊन जातो," असं म्हणत त्याने एका बॅगेला हात घातला. "आम्हांला कोणाची मदत नकोय, आम्ही आमचं सामान घेऊन जाऊ." असं आम्ही सांगूनही तो ऐकेना आणि तो आमची बॅग हातात धरून बसला, ती सोडेचना. एकीकडे तो दुसऱ्या ट्राॅलीवर आमचं बाकीचं सामानही ठेवायला लागला. आम्ही त्याला वारंवार आम्हांला त्याची मदत नकोय म्हणून सांगत असतांना त्याने आमचं सामान घट्ट धरून ठेवलं आणि "शंभर रुपयांसाठी मला नको काय म्हणताय," असा हेका धरला. त्याच्या हातातून सामान ओढून घेण्याचा प्रयत्न करूनही त्याने ट्राॅली आणि बॅग दोन्ही सोडलं नाही. शेवटी वाद नको, म्हणून आमच्यातल्या एका व्यक्तीने त्याला परवानगी दिली. पण विमानतळावरच्या कर्मचाऱ्याकडून अशी अव्यावसायिक वागणूक आम्हांला अपेक्षित नव्हती.
पुढचे चेक इनचे सोपस्कार काही मिनिटांत पार पाडून आम्ही गेटपाशी असलेल्या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झालो. या खुर्च्या मुंबई विमानतळावरच्या खुर्च्यांपेक्षा जास्त आरामशीर होत्या. बोर्डिंगच्या दिलेल्या वेळेपेक्षा थोड्या उशीरा बोर्डिंगसाठी गेट उघडलं गेलं. जेट एअरवेज आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक करत असल्याने, त्यांच्या विमानात बारा नंबरच्या सीटच्या रांगेनंतर (तेरा नंबर टाळून) थेट चौदा नंबरच्या सीटची रांग होती, हे पाहून गंमत वाटली. विमानात मागच्या वेळेसारखा सीटचा किंवा खाण्याचा काही गोंधळ झाला नाही. त्यादिवशीची हवाही स्वच्छ असल्याने विमानाच्या खिडकीतून समुद्र आणि जमीन दोन्ही स्पष्ट दिसत होते. विमानाचा पायलट मात्र विलक्षण वेगाने विमान हाकत असावा, कारण आमच्या कानाला सारखे दडे बसत होते. बहुधा या वेगामुळेच आम्ही वेळेआधीच मुंबई विमानतळावर येऊन पोहोचलो.
विमानातून बाहेर पडून आम्ही सरकत्या बेल्टवरचं आमचं सामान घेतलं आणि घरी जाण्यासाठी टॅक्सी केली. टॅक्सीतून जातांना दिसणारी मुंबईतली बकाल वस्ती आणि केरळमध्ये आमच्या डोळ्यांना सतत दिसणारी हिरवाई यांच्यातला फरक स्पष्ट जाणवण्याजोगा होता. पुढच्या प्रवासात रस्त्यात लागणारे खड्डे आम्हांला आम्ही घरी परततोय याची परखड जाणीव करून देत होते.
बाकीच्यांच्या दृष्टीने तशी ही आमची एकंदर ट्रीप चांगली झाली, माझ्यासाठी मात्र ही ट्रीप थोडी चांगली, थोडी वाईट असा संमिश्र अनुभव देणारी ठरली. एकतर आयपॉड हरवल्याने झालेली थोडीशी हळहळ आणि ड्रायव्हरचं काही बाबतीतलं हेकेखोर वागणं याने माझी चीडचीड झाली. ड्रायव्हरने आमच्या सूचना लक्षात घेऊन, काही बाबतीत आमचं ऐकलं असतं, तर माझी ट्रीप अजून जास्त चांगली झाली असती. असो. (बाकी आयपॉड हरवल्यामुळे तेव्हा वाटणारी हळहळ मात्र आता कमी होऊन आयपॉड हरवला, ते चांगलंच झालं असं आता वाटायला लागलं आहे.)
केरळ ट्रीपमधल्या माझ्या अनुभवांचा इतरांना काही उपयोग व्हावा या हेतूने या ट्रीपबद्दल मी मुद्दामच जास्त तपशील देत लिहिलंय. केरळचं जसं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे मला तरी या ट्रीपमध्ये केरळ "गाॅॅड्स ओन कंट्री" वगैरे काही वाटलं नाही. एकतर सतत एसी गाडीमध्ये किंवा एसी हॉटेलमध्ये असल्याने तिथल्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेण्याचा पुरेसा अनुभव आम्हांला मिळाला नाही, त्यामुळे प्रवासात काचेपलिकडून सतत दिसणारी तिथली हिरवाई मनात झिरपून प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्यासारखी वाटली नाही. कोचीच्या मुक्कामात आणि कोवलमला जातांना वाटेतल्या प्रवासात जितका उकाडा जाणवला, तितका इतर ठिकाणी जाणवला नाही, त्यामुळे तिथे आम्ही एसीशिवायही सहज वावरू शकलो असतो, असं वाटत राहिलं, पण कदाचित त्यामुळे डासांचा त्रास जाणवला असता.
![]() |
केरळची आठवण - मोरपिसांचा पंखा |
केरळमध्ये मंदिरात जायचं असेल तर व्यवस्थित देवदर्शन होण्यासाठी पुढचा तीनचार तासांचा वेळ मोकळा ठेवणं आवश्यक आहे, विशेषकरून या काळात रेल्वेचा प्रवास, बसप्रवास, विमानप्रवास करण्याचा बेत ठेवू नये, नाहीतर एखादेवेळी रांगेत अडकून पडल्यामुळे दर्शनाविना परतावं लागण्याची शक्यता असते. केरळमधली मला खटकलेली एक गोष्ट म्हणजे तिथल्या मंदिरांमध्ये जशी स्वच्छता राखलेली जाणवत होती, तसाच अनेक ठिकाणी सार्वजनिक जागी असलेला (मुंबईच्या तुलनेत थोडा असलेला) कचरा डोळ्यांना खुपत होता, तशीच ठिकठिकाणी कालव्यांमध्ये वाढलेली जलपर्णी कालव्यांच्या सौंदर्यामध्ये बाधा आणत होती.
केरळमधलं खूप गाजावाजा केलेलं हाऊसबोटीतलं वास्तव्यही मला फारसं आवडलं नाही. हाऊसबोटीतला दिवसभराचा प्रवास अतिशय नयनरम्य असूनही, हाऊसबोटीवरची संध्याकाळ काहीशी कंटाळवाणी झाली आणि तेव्हाचा डासांचा अनुभवही किळसवाणा वाटला. त्यामुळे हाऊसबोटीत मुक्काम करायच्या ऐवजी सहासात तासांची बोट राईड आणि नंतर एखाद्या हॉटेलमध्ये केलेला मुक्काम जास्त सुखदायक ठरला असता असं वाटत राहिलं.
तसंच इतक्या दिवसांचा सततचा लांबचा प्रवास आणि प्रवासात सतत बसून राहणं यामुळे पाठीला रग लागून शेवटीशेवटी आम्हांला प्रवासाचा कंटाळा यायला लागला होता. मात्र आम्ही बाकीच्यांचे जेवणाविषयीचे जे अनुभव ऐकले होते, त्याप्रमाणे आमचे जेवणाचे फारसे हाल झाले नाहीत, एकदोन अपवाद वगळता, बाकी सगळीकडे आम्हांला व्यवस्थित जेवण मिळालं होतं.
केरळमध्ये मसाले आणि काजू खरेदी करतांना ते शासकीय परवाना मिळालेल्या दुकानांमधूनच खरेदी करावेत. रस्त्यावर किंवा छोट्या टपऱ्यांमधून स्वस्तात मसाले, काजू विकायला ठेवलेले दिसले, तरी घेऊ नयेत, कारण अशा खरेदीत हमखास फसवणूक होण्याचा अनुभव बऱ्याच जणांना येतो. केरळमध्ये उत्तम प्रतीचे आणि मऊ कॉटनचे कपडे मिळतात, (फक्त त्यातले बरेचसे पांढऱ्या रंगाचे असतात,) त्यामुळे ज्यांना तिथून साड्या, धोतरं / लुंगी, उपरणं इत्यादी कपडे खरेदी करायचे असतील त्यांनी अवश्य खरेदी करावेत. आम्ही ज्या दुकानात कपड्यांची खरेदी केली तिथे (विशेषकरून) धोतर, उपरणे इत्यादी कपड्यांची किंमत मुंबईतल्या किंमतीपेक्षा निश्चितच कमी होती.
या ट्रीपचा एकंदर संमिश्र अनुभव पाहता या ट्रीपऐवजी मी आधी प्लॅन केलेली तीनचार दिवसांची आणि फक्त एकदोन ठिकाणांचीच ट्रीप केली असती आणि आम्ही तिथे निवांतपणे राहिलो असतो, तर जास्त बरं झालं असतं, असं मला आजही वाटतं. दुर्दैवाने मला ट्रीपमध्ये नेमकं काय हवंय ते समजण्यात आमची ट्रॅव्हल एजन्सी चालवणारी मैत्रिण जरा कमी पडली आणि मला ट्रीपचा हा संमिश्र अनुभव मिळाला. ही ट्रीप चांगली झाली, पण ह्या ट्रीपला माझी संस्मरणीय ट्रीपही म्हणता येणार नाही हे निश्चित! यापुढे ट्रीप आखायची झाली तर अशी जास्त दिवसांची ट्रीप पुन्हा आखायची नाही, हेही मी आता पक्कं ठरवलं आहे.
तुम्ही असा साचे बद्ध प्रवास केल्यावर तुम्हला काहीच वाटणार नाही कारण तुम्हला हवं ते मिळणार आहे आणि एवढा प्रवास वर्णन लिहून बऱ्याच गोष्टी लिहायच्या राहिल्यात उदा कुठल्या हॉटेल ला थांबलात बोटीचे पैसे गाडीचे पैसे म्युझियम, फोर्ट,पॅलेस याची एन्ट्री फी त्याचा लोकांना उपयोग होईल ना
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteट्रीपमध्ये सहभागी होणाऱ्या सहप्रवाशांपैकी कोणाच्या प्रकृतीच्या काही तक्रारी असतील, तर अशांसाठी साचेबद्ध प्रवास जास्त चांगला असतो. आणि प्रवासाबद्दल काहीच न वाटायला काय झालं, मी लिहिलं आहे, की "बाकीच्यांच्या दृष्टीने तशी ही आमची एकंदर ट्रीप चांगली झाली, माझ्यासाठी मात्र ही ट्रीप थोडी चांगली, थोडी वाईट असा संमिश्र अनुभव देणारी ठरली." त्याची कारणंही लिहिली आहेत की याच पोस्टमध्ये!
तुम्ही सगळ्या पोस्ट्स नीट वाचल्या असत्या, तर तुम्हांला हॉटेलची नावंही लिहिलेली दिसली असती. ट्रॅव्हल एजन्सीतर्फे परस्पर बुकींग केल्यामुळे आम्हांला हॉटेल, बोट, गाडी यांचे वेगवेगळे पैसे द्यावे लागले नाहीत. सर्व ट्रीपच्या पॅकेजचे पैसे आम्ही भरले होते.
त्याशिवाय मी एका पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे, की "'हिंदुस्तान स्पायसेसच्या' मसाल्यांच्या दुकानापाठीमागे त्यांचं मसाल्याच्या वनस्पतींचं आणि औषधी वनस्पतींचं गार्डन होतं. या गार्डनला व्हिजिट देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शंभर रुपयांचं तिकीट काढावं लागणार होतं. केरळमधल्या इतर ठिकाणी असलेल्या तिकीटदरापेक्षा इथल्या तिकीटाची किंमत मला फारच जास्त वाटली."
यावरून म्युझियम, पॅलेस इत्यादीचे तिकीटदर शंभर रुपयांच्या तुलनेत खूपच कमी होते, हे साधारण लक्षात यायला हरकत नाही.
तरीही अधिक माहिती हवी असेल, तर वेगवेगळ्या वेबसाईटवर मी उल्लेख केलेल्या बहुतेक हॉटेलांचे दर, इतर ठिकाणाचे तिकीटदर याची ताजी माहिती मिळेल.