--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Friday, March 13, 2015

केरळ ट्रीप - काही अनुभव - भाग ४ - मुन्नार - स्थळदर्शन

भाग १, --- भाग २, --- भाग ३,
पुढे - 

     दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करायला जाण्याआधी मी हॉटेलच्या परिसरात एक चक्कर टाकली. या हॉटेलचा परिसर खरोखर सुंदर होता. 'व्हॅली व्ह्यू' प्रकारच्या खोल्यांसमोरच्या डोंगरउतारावर घनदाट झुडपं आणि त्यामधून वरती आलेल्या उंच सरळसोट झाडांचं जंगल पसरलेलं दिसत होतं आणि 'प्लांटेशन व्ह्यू' प्रकारच्या खोल्यांसमोरच्या डोंगरउतारावर चहाच्या झाडांचा मळा पसरलेला दिसत होता. या भरपूर वनसंपदेमुळे तिथे विविध प्रकारचे पतंग, पाकोळ्या, इतर कीटक, पक्षी इत्यादी वावरत होते. त्या सगळ्यांबरोबर तिथल्या तलावातलं बदकही सकाळी कोणी काही खायला देत आहे का याचा शोध घेत तिथल्या खोल्यांसमोरून फिरत होतं.

'व्हॅली व्ह्यू'
  
हॉटेलच्या परिसरातल्या गार्डनमध्ये जाणारा लाकडी पूल
  
  
   
  
     ब्रेकफास्टसाठी आम्ही डायनिंग हॉलमध्ये गेलो, तेव्हा तिथल्या माणसाने चहा बरोबर ब्रेड, बटर, जाम, इडली, चटणी हे पदार्थ आणून दिले. थोड्या वेळाने तो अजून काही हवं आहे का, म्हणून विचारायला परत आला आणि आमच्यासाठी अजून ब्रेड, गरम इडल्या आणि चटणी घेऊन आला.

     ब्रेकफास्ट आटोपल्यानंतर आम्ही जीपने वरती निघालो. प्रत्येक वळणावर समोर चढ दिसला, की ही गाडी हा चढ चढून पुढे जाईल ना अशी थोडी शंका येत होती. पण आता दिवसाउजेडी आजूबाजूचा परिसर दिसत असल्याने पहिल्याइतकी धास्ती वाटत नव्हती. तिथल्या डोंगरउतारावर राहणारे लोक तो चढाचा रस्ता पायीच चढून जातांना दिसत होते. अखेर जीप मुख्य रस्त्यावर पोहोचली. तिथे आमच्या गाडीचा ड्रायव्हर आमची वाट बघत उभा होता.

     आमच्या गाडीत बसून आम्ही मुन्नारमधली प्रेक्षणीय स्थळं बघण्यासाठी निघालो, तो सगळा रस्ता डोंगरातून जात होता. तिथली हवा एकदम स्वच्छ होती. वरती निळंशार आकाश होतं, आकाशात तरंगणारे पांढरेशुभ्र ढग होते. त्या निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिरवेगार चहाचे मळे लावलेले डोंगरउतार आणि मळ्यात रांगेने लावलेली उंच सरळसोट हिरवीगार झाडं शोभून दिसत होती. ते दृश्य पाहून मला मनालीची आठवण येत होती, फरक इतकाच होता, की मुन्नारमध्ये बर्फ पडलेला नव्हता.

  
चहाचे मळे
   
     मध्येच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली, तिथून पुढे रस्त्याला दोन फाटे फुटत होते. त्यापैकी एक रस्ता एर्वीकुलम नॅशनल फाॅरेस्टच्या दिशेने जात होता. त्या नॅशनल फाॅरेस्टमध्ये फक्त मुन्नारलाच आढळणारा 'माऊंटन गोट' हा शेळीसारखा प्राणी होता. ड्रायव्हरने आम्हांला विचारलं, की 'तो प्राणी पाहण्यासाठी एर्वीकुलम नॅशनल फाॅरेस्टमध्ये जायचं, की दुसऱ्या रस्त्याने टाॅप स्टेशन पाॅईंटच्या दिशेने जायचं?' आमच्या मैत्रिणीने आम्हांला आखून दिलेल्या प्रोग्रॅममध्ये 'माऊंटन गोट' हा प्राणी बघण्याचा समावेश नव्हता. शिवाय कधीकधी जंगलात जाऊन प्राणी बघणाऱ्यांना वाट बघूनही तो प्राणी न बघायला मिळाल्यामुळे निराश होऊन परतावं लागतं, याचा विचार करून आम्ही टाॅप स्टेशन पाॅईंटच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला.

     टाॅप स्टेशन पाॅईंटच्या दिशेने जातांना मध्ये एका पाॅईंटवर आमची गाडी थांबली. त्या पाॅईंटवरून खालच्या डोंगरउतांरांवरच्या चहाच्या मळ्यांचं सुंदर दृश्य दिसत होतं. त्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे फोटो काढण्यासाठी तिथे फोटोग्राफर तयारच होते. तिथे आलेल्या पर्यटकांपैकी काही मुली डोक्याला रुमाल बांधून पाठीवर चहाची पानं गोळा करण्याची टोपली घेऊन हातातलं चहाचं पान टोपलीत टाकण्याची अॅॅक्शन करत फोटोसाठी पोज देत होत्या. त्याशिवाय तिथे काही विक्रेते लाकडी वस्तू, खेळणी, टोप्या इत्यादी विकत होते. काही फेरीवाले मक्याचे मसालेदार दाणे, साखरेचे कापूसगोळे विकत होते. आम्ही तिथे काही वस्तू विकत घेतल्या. त्यापैकी मी विकत घेतलेल्या टोपीवर कापडी फुलं लावलेली होती. एक भुंगा त्या कापडी फुलांकडे आकर्षित होऊन सारखा माझ्या डोक्याभोवती घिरट्या घालत होता, शेवटी त्या भुंग्याला फटका मारून हाकलंवावं लागलं. आमच्यापैकी कोणाला तिथे चहाची टोपली घेऊन फोटो काढायचा नव्हता, पण फोटो काढणारे मागे लागल्यामुळे आम्ही तिथे साध्या वेषातच आमचा ग्रुप फोटो काढून घेतला.

पाॅईंटवरून दिसणारं चहाच्या मळ्यांचं दृश्य
  
  
चहाचं झाड
   
     तिथून पुढे आम्ही मट्टुपेट्टी डॅमच्या इथे गेलो. त्या जलाशयाच्या एका बाजूला सगळ्या विक्रेत्यांची दुकानं होती आणि दुसऱ्या बाजूला स्पीड बोटींगची सोय होती. त्या दोन्ही टोकांना जोडणारा पूल मधून गेला होता. तिथे आम्ही त्या विस्तीर्ण जलाशयाच्या पार्श्वभूमीवर आमचे फोटो काढले, दुकानांमध्ये थोडीफार खरेदी केली, शहाळ्याचं पाणी प्यायलो, लालचुटूक गाजरं खरेदी केली, मला हवा असलेला मोरपिसांचा पंखा खरेदी केला आणि मग पुलावरून हळूहळू चालत पुढे निघालो. दुसऱ्या दिवशी आमचा मुक्काम हाऊसबोटीतच असणार होता, त्यामुळे आम्ही स्पीड बोटींग केलं नाही. बाकी तिथे चरणारा एकमेव घोडा सोडला, तर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी तिथे इतर काही अॅक्टिव्हिटीजची सोय दिसली नाही.

जलाशयाच्या बाजूला बहरलेले गुलाब
  
मट्टुपेट्टी जलाशय
  
जलाशयावर दाटून आलेले ढग
  

     तिथून पुढे ड्रायव्हरने आम्हांला एको पाॅईंटच्या इथे नेलं. शक्यतो एको पाॅईंट डोंगरावर असतो, पण इथे मात्र जलाशय होता आणि त्याच्यापुढे काही अंतरावर डोंगररांगा दिसत होत्या. एको पाॅईंटच्या वरच्या बाजूला सगळी दुकानं होती आणि जलाशयाकडे जाण्यासाठी एका बाजूने पायऱ्या उतरून खाली जावं लागत होतं.  त्या पायऱ्यांवर आणि खालीही बराच कचरा आणि घाण पसरलेली होती. त्या घाणीतच फोटोग्राफर पर्यटकांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या मागे लागत होते. तिथेच पाण्यात काही पेडल बोटी उभ्या केलेल्या होत्या, पण बोटींग करणारे फारसे कोणी नव्हते. तिथे काही विदेशी पर्यटक आलेले दिसले. तिथली घाण बघून त्यांच्या मनात भारताविषयी प्रतिकूल मत तयार झालं, तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं.

एको पाॅईंट - रिकाम्या पेडल बोटी
   
     एको पाॅईंटच्या प्रत्यक्ष जागेवर घाण आणि कचरा असला, तरी तिथे वरच्या बाजूला बांधलेली इंडियन पद्धतीची टाॅयलेट्स मात्र स्वच्छ होती. तिथे पाणीही भरपूर होतं. एको पाॅईंटच्या इथे असलेल्या दुकानांमध्ये इतर वस्तूंबरोबर होममेड चाॅकलेट्स, होममेड साबणही मोठ्या प्रमाणात विक्रीला ठेवलेले दिसत होते. ते पाहून मुन्नारमध्ये चाॅकलेट्स आणि साबण बनवायचा गृहउद्योग मोठ्या प्रमाणात चालत असावा असं वाटत होतं. तिथल्या दुकांनामध्ये आम्ही काही वस्तू खरेदी केल्या. मुन्नारमध्ये आमची नुसती खरेदीच चालू होती. एव्हाना पावणेबारा वाजले होते आणि तिथल्या थंड हवेत आम्हांला भूक लागली होती. आता वाटेत कुठेतरी चांगलं हॉटेल बघून जेवून घेऊ या, असं ठरवत आम्ही एका ज्यूस सेंटरपाशी थांबलो. तिथे काही फळं नुसती विकायला ठेवली होती. त्या दुकानात मला पॅशनफ्रूट बघायला मिळालं. मी कधी पॅशनफ्रूट बघितलं नव्हतं, त्यामुळे मी उत्सुकतेने पॅशनफ्रूट विकत घेतलं. ते दोनतीन दिवसांनी तयार होणार होतं. नंतर त्या दुकानात आम्ही फ्रूट ज्यूस विकत घेतलं आणि तात्पुरती त्यावरच आमची भूक भागवली.

     तिथून निघून आम्ही गाडीत बसलो आणि ड्रायव्हरला वाटेतल्या एखाद्या चांगल्या हॉटेलपाशी जेवणासाठी गाडी थांबवायला सांगितली. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, की "इथे जवळपास चांगली हॉटेल्स नाहीत. जेवायला दोनअडीच झाले, तर चालेल का?" दुसरा काही पर्याय नसल्याने आम्हीही होकार दिला. मग आम्ही टाॅप स्टेशन पाॅईंटच्या दिशेने निघालो. वाटेत धुकं लागल्याने आमच्या गाडीचा स्पीड मंदावला होता. मधूनच हलकासा पाऊसही पडत होता.

     आम्ही टाॅप स्टेशन पाॅईंटच्या जवळ पोहोचलो. ड्रायव्हरने गाडी थांबवली होती, तिथून पुढचं अंतर आम्हांला चालत जायचं होतं. तिथे धुकंही होतं आणि हलकासा पाऊसही पडत होता. ते ठिकाण उंचावर असल्याने तिथे जास्त थंडी होती. टाॅप स्टेशन पाॅईंटवरून खाली असलेल्या शेजारच्या तामिळनाडू राज्याचं विहंगम दृश्य दिसतं. आता धुकं असल्याने आम्हांला ते दृश्य बघायला मिळेलच, याची खात्री नव्हती. टाॅप स्टेशन पाॅईंटच्या दिशेने चालत जातांना थंडीमुळे धाप लागत होती. त्यामुळे लोक भाजलेली मक्याची कणसं, चहा, कॉफी, गरम मॅगी, ऑम्लेट यांचा आस्वाद घेतांना दिसत होते. काही विक्रेते मसाला लावलेल्या कैरी आणि इतर फळांच्या फोडी विकत होते.

     आम्ही टाॅप स्टेशन पाॅईंटच्या अगदी जवळ म्हणजे त्यापासून पंधरावीस फूट अंतरावर पोहोचलो होतो, पण आमच्यापैकी एका व्यक्तीने आम्ही पोहोचलो होतो, तिथेच थांबायचं ठरवलं. मग आम्ही पण तिथेच थांबून एका स्टाॅलवर चहाची ऑर्डर दिली. चहा होईपर्यंत त्या स्टाॅलच्या पाठीमागे असणाऱ्या झाडावरच्या पक्ष्यांच्या किलबिलीने माझं लक्ष वेधलं गेलं. तिथे 'चष्मेवाला' नावाच्या पक्ष्यांचा थवा आला होता. त्या पक्ष्यांचा फोटो काढणं काही मला जमलं नाही, पण माझ्यापासून फूटभर अंतरावर उडत असलेली एक पाकोळी एका चष्मेवाल्याने उडत येऊन हवेत अलगद पकडली. माझ्यासमोर, माझ्यापासून अगदी जवळ केल्या गेलेल्या त्या शिकारीचे दृश्य पाहण्याचा अनुभव केवळ अवर्णनीय होता. त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा पक्षी समोरच्या झाडावर येऊन बसला, तो बहुधा गोल्डन ओरिओल असावा.

     चहाच्या स्टाॅलवर चहा पिण्यासाठी मलेशियातलं भारतीय वंशाचं एक जोडपं त्यांच्या दोन लहान मुलींसोबत थांबलं होतं. त्या जोडप्यातला पुरुष मलेशियात जन्माला आला होता. त्याचे खापर पणजोबा मलेशियाला गेले होते आणि मलेशियात कायमचे स्थायिक झाले होते. त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या मलेशियातच जन्माला आल्या होत्या, पण तामिळनाडूत असलेल्या त्यांच्या मूळ गावातल्या नातेवाईंकांबरोबरचे संबंध पिढ्यानुपिढ्या तसेच जपले गेले होते. त्यामुळे तो पुरुष त्याच्या कुटुंबाला घेऊन भारतातल्या त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. नंतर त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन करून, त्याच्या लहान मुलींना आसपासची स्थळं दाखवण्यासाठी तो त्यांना मुन्नारला घेऊन आला होता.

     त्या कुटुंबासोबत गप्पा मारत आम्ही चहा घेतला आणि मग पुढे टाॅप स्टेशन पाॅईंटपर्यंत चालत गेलो. पण तिथे असलेली धुक्याची चादर हटायलाच तयार नसल्याने आम्हांला तामिळनाडूचं विहंगम दृश्य काही बघायला मिळलं नाही. आम्ही तसेच पाठीमागे फिरलो.

     गाडीपाशी येऊन ड्रायव्हरला तिथल्या एखाद्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबण्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, की तिथल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळत नाही. टाॅप स्टेशनच्या त्या परिसरात खूप थंड वातावरण होतं आणि आसपास कुठे टाॅयलेटची सोय दिसत नव्हती, म्हणून आम्ही तिथून निघतांना ड्रायव्हरला परतीच्या रस्त्यावर टाॅयलेट ब्रेकसाठी एको पाॅईंटच्या इथे गाडी थांबवायला सांगितली, पण एको पाॅईंटपर्यंत आल्यावर ड्रायव्हर म्हणाला, की "आपण जेवणासाठी जाणार असलेल्या हॉटेलवर दहा मिनिटात पोहोचू," आणि त्याने गाडी तशीच पुढे काढली. प्रत्यक्षात दहा मिनिटंच काय एक तास गेला, तरी त्याचं ते हॉटेल आलं नव्हतं. शेवटी सव्वा तासाने आम्ही मुन्नार शहरामध्ये असलेल्या त्या हॉटेलमध्ये पोहोचलो. तोपर्यंत घाटरस्त्याचा प्रवास आणि बराच वेळ झाला तरी पोटात काही गेलेलं नाही म्हणून काही जणांना मळमळायला लागलं होतं, त्यात टाॅयलेट ब्रेकसाठी मध्ये कुठेही न थांबल्याने त्याचाही त्रास झाला होता. आम्हांला जेवायला आधीच इतका उशीर झाला होता, त्यात टाॅयलेट ब्रेकसाठी गाडी थांबवली असती, तर फारतर अजून दहा मिनिटांचा उशीर झाला असता आणि त्याने काही विशेष फरक पडला नसता, पण ड्रायव्हरने स्वतःचाच हेका चालवला होता. त्यामुळे जेवणाची ऑर्डर देण्याआधी हॉटेलमधल्या एकुलत्या एका टाॅयलेटपुढे रांगा लावून सगळेजण ड्रायव्हरच्या नावाने खडे फोडत होते.

     त्यानंतर आम्ही टेबलापाशी बसून मेनूकार्ड बघायला लागलो, पण काहीजणांना मळमळण्याचा त्रास होत होता आणि नेमक्या त्या दिवशी कोणी लवंगा जवळ ठेवलेल्या नव्हत्या. मग मी सरळ हॉटेलच्या मालकाला विचारलं, की "आमच्यापैकी काही जणांना मळमळण्याचा त्रास होतोय, तर लवंगा मिळतील का?" त्या भल्या गुजराती माणसाने आम्हा सगळ्यांसाठी लवंगा आणून दिल्या. लवंग चघळून जरा बरं वाटल्यावर आम्ही सगळ्यांसाठी थाळीची ऑर्डर दिली तेव्हा दुपारचे साडेचार वाजले होते. साडेचार ही काही जेवायची वेळ नव्हे, त्यामुळे आम्हांला धड भूकही राहिली नव्हती, पण काहीतरी खाणं आवश्यक होतं. त्यावेळी तिथे थाळीव्यतिरिक्त दुसरं काही मागवण्यासारखं नव्हतं. थाळीत दोन भाज्या, उसळ, सार, तीन पोळ्या, दाल, भात,  दही, ताक, शिरा या पदार्थांचा समावेश होता. शिऱ्याला रंग आणि इसेन्स घातल्याने, तो शिरा आहे, हे नुसतं पाहून लक्षात येत नव्हतं, पण खाल्ल्यावर शिऱ्याची चव जाणवत होती. तसं एकूण जेवण छान होतं, फक्त आम्ही अवेळी जेवत होतो.

     ड्रायव्हरने सकाळी निघतांनाच आम्हांला मुन्नार शहरात जेवणासाठी यावं लागणार आहे, याची कल्पना दिली असती, तर आम्ही वेगवेगळ्या पाॅईंटवर रेंगाळत न राहता तिथून पटकन खरेदी करून निघालो असतो, तसंही खरेदी करण्याव्यतिरिक्त आणि तिथलं निसर्ग सौंदर्य पाहण्याव्यतिरिक्त आम्हांला करण्याजोगं तिथे काहीच नव्हतं. त्याशिवाय दुसरा पर्यायही होता, रात्रीच्या जेवणासाठी थोडं लवकर आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊ शकलो असतो, तसाही ग्लेनमोअर हॉटेलच्या आमच्या पॅकेजमध्ये रात्रीच्या जेवणाचा समावेश नव्हता आणि त्यासंबंधित कागदपत्रांची एक कॉपी मी ड्रायव्हरला आधीच दिलेली होती, त्यामुळे त्याला या गोष्टीची कल्पना होती. पण ड्रायव्हरने आमच्याशी याबाबतीत काहीच चर्चा न केल्याने आमच्यावर अशी अवेळी जेवायची वेळ आली होती.