भाग १
पुढे -
रात्री उशिरा आम्हांला विजांच्या कडकडाटासारखा आणि ढगांच्या गडगडाटासारखा आवाज ऐकू आला, कोचीनमध्ये तेव्हा हलकासा पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलतर्फे आमच्या खोलीच्या दाराच्या फटीतून पेपर आत सरकवलेला दिसला. एकीकडे पेपरवर नजर टाकत आम्ही आवरायला लागलो.
पुढे -
रात्री उशिरा आम्हांला विजांच्या कडकडाटासारखा आणि ढगांच्या गडगडाटासारखा आवाज ऐकू आला, कोचीनमध्ये तेव्हा हलकासा पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलतर्फे आमच्या खोलीच्या दाराच्या फटीतून पेपर आत सरकवलेला दिसला. एकीकडे पेपरवर नजर टाकत आम्ही आवरायला लागलो.
सकाळी हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून आम्हांला पुढे निघायचं होतं. ब्रेकफास्टसाठी इथल्या टेबल्सवर भरपूर पदार्थ मांडलेले होते. इडल्या, जाड छोटे डोसे, चटणी, उपमा, छोटी केळं, अननसाचे काप, काळी द्राक्षं, मोठ्या केळ्याचे वाफवलेले तुकडे, ब्रेड, बटर, जाम, कॉर्नफ्लेक्स, दूध, साखर, मध, चहा, कॉफी, अननसाचा ज्यूस असं सगळं मांडून ठेवलेलं होतं. आम्ही ब्रेकफास्ट आटोपला आणि चेक आऊट करून पुढच्या गुरुवायूरच्या प्रवासाला सुरूवात केली.
गुरुवायूरला जात असतांना आम्हांला वाटेत अनेक चर्च उभारलेली दिसली, केरळमध्ये ख्रिश्चन लोक बहुसंख्य असल्याने चर्चची संख्याही तुलनेने जास्त होती. शिवाय रस्त्याच्या कडेने बांधलेले देखणे बंगले दिसत होते. प्रत्येक बंगल्याची वास्तू वेगळ्या पद्धतीने सजवलेली दिसत होती आणि प्रत्येक बंगल्याभोवती बाग दिसत होती. बागेत सुपारीची, नारळाची झाडं दिसत होती, त्यावर मिऱ्याचे वेल चढवलेले दिसत होते. वाटेतल्या बाजारांमध्ये फळांची भरपूर दुकानं दिसत होती आणि त्या दुकानांमध्ये डाळींब, संत्री, अननस, केळी, पपई, रामफळ, सफरचंद, कैऱ्या अशी विविध फळं दिसत होती.
दुपारी एकच्या सुमारास आम्ही पुन्नातूर कोटा इथल्या हत्ती प्रशिक्षण केंद्रापाशी आलो. गुरुवायूर मंदिरात अर्पण केलेले हत्ती इथे ठेवलेले असतात. आमची गाडी ज्या मैदानात पार्क केली होती, तिथेच एका हत्तीला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालला होता. तो हत्ती त्या मैदानात आडवा झाला होता, दोनतीन माणसं त्याला आंघोळ घालत होती, एकजण नळीने त्याच्या अंगावर पाणी सोडत होता आणि बाकीचे ब्रशने त्या हत्तीचं शरीर चोळत होते. ते दृश्य पाहत मैदान ओलांडून आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथलं प्रवेशशुल्क आणि कॅमेऱ्याने फोटो काढण्याचं शुल्क भरून आम्ही तिकीटं काढली आणि त्या केंद्रात शिरलो.
आत गेल्यानंतर अगदी समोर बांधलेला जो पहिलाच हत्ती दिसला, त्याच्या इथे अशा अर्थाची पाटी लावलेली होती, की 'हा हत्ती मस्त झालेला आहे. तो केव्हाही हिंसक होऊ शकतो, तरी त्याच्या समोर फार वेळ उभं राहू नये किंवा त्याच्या समोर उभं राहून त्याला कोणत्याही प्रकारे डिवचू नये.' ती पाटी पाहिल्यावर मी काहीसं बिचकतच एका बाजूला जाऊन कडेने त्याचा फोटो काढला. मी पहिल्यांदाच असा मस्त झालेला हत्ती बघत होते. तो हत्ती मात्र इतर मस्त न झालेल्या हत्तींच्या तुलनेत शांत उभा होता.
![]() |
मस्त झालेला हत्ती |
तिथून पुढे इतर काही हत्ती आणि हत्तीणींना बांधून ठेवलेलं होतं. त्यातले काही हत्ती वयस्कर होते, काही मध्यमवयाचे होते, तर काही हत्तीची पिल्लं नुकतीच वयात आलेली दिसत होती. बहुतेक हत्तींपुढे खाण्यासाठी झाडपाला टाकलेला दिसत होता. काही हत्ती शांतपणे तो झाडपाला खात होते, काही हत्ती नुसतेच स्वतःच्या शरीरावर धूळ उडवत धूलिस्नान करत होते. एक हत्तीण तिच्या माहूतावर सोंडेने धूळ उडवत होती आणि तो माहूत तिला तसं न करण्याबाबत दटावत होता.
![]() |
शांतपणे झाडपाला खाणारा हत्ती |
![]() |
निवांतपणे झाडपाला खात स्वतःतच मग्न असणारी हत्तीण |
![]() |
धूलिस्नान |
![]() |
पूर्ण वाढ होत आलेला हत्ती - ह्याचा उंच पायांचा आणि लांब दातांचा दिमाख बघण्यासारखाच! |
एक कुत्रा तिथून जात असतांना शाॅर्टकट घेत एका हत्तीच्या अगदी जवळून गेल्याने आपल्या क्षेत्रात घुसखोरी झाल्याच्या भावनेने तो हत्ती संतापला. त्याने सोंडेने त्या कुत्र्यावर धूळ उडवत, पाय आपटत, जोरात आवाज काढत स्वतःचा संताप व्यक्त केला. पण हत्तीच्या संतापाला न जुमानता, आपल्याला काही अपाय होणार नाही, याची काळजी घेत त्या कुत्र्याने पुन्हा एकदा तिथूनच शाॅर्टकट घेतला आणि हत्तीचा संताप पुन्हा व्यक्त झाला. त्या हत्तीच्या पुढच्या भागात काही मस्त झालेले हत्ती उभे होते, ते मात्र शांतपणे उभे होते. काही एकर जागा असलेल्या त्या परिसरात त्यावेळी चाळीस-पन्नास हत्ती ठिकठिकाणी उभे असलेले दिसत होते. बहुतेक हत्तींच्या आसपास मोठी झाडं होती. त्या झाडांवरून काही खारी आणि काही बगळे खाली येऊन त्यांचं अन्न शोधत होते.
![]() |
हत्तीच हत्ती चहूकडे - सगळे हत्ती एका फोटोत मावणं अशक्यच! |
तिथून अजून थोडं पुढे गेल्यावर एक काळ्या कुळकुळीत रंगाचा वयात येत असलेला हत्ती दिसला. त्याचा माहूत त्याला प्रशिक्षण देत होता. माहूत हत्तीला आज्ञा देत होता आणि त्याप्रमाणे तो हत्ती पाय पुढे करून दाखवणे आणि मग तो मागे घेणे, सोंडेने नमस्कार करत दिलेली वस्तू घेणे इत्यादी कसरती करून दाखवत होता. थोड्या वेळाने माहूताने आज्ञा देणं थांबवलं आणि तो इतर कामात गुंतला, मग तो जिज्ञासू हत्ती स्वतःहून त्या सगळ्या कसरती करून बघायला लागला.
![]() |
माहूताच्या आज्ञेप्रमाणे कसरती करणारा हत्ती |
![]() |
माहूत निघून गेल्यावर स्वतःहून कसरती करून बघणारा जिज्ञासू हत्ती |
तिथून थोड्या अंतरावर एका लाकडी पिंजऱ्यात एकमेकांकडे पाठ केलेल्या स्थितीत दोन हत्ती ठेवलेले होते. ते बहुधा परराज्यातून पकडून आणून मंदिराला अर्पण केले होते. त्यांचा तिथल्या भाषेशी नीट परिचय होऊन त्यांना त्या भाषेतल्या आज्ञा नीट समजेपर्यंत त्यांना तिथेच ठेवलं जाणार होतं, असं आमच्या ड्रायव्हरने नंतर आम्हांला सांगितलं. तिथून दुसऱ्या रस्त्याने परत येतांना अजून काही हत्ती दिसले, त्यातल्या काही हत्तींच्या मानेला टेकवून काठ्या उभ्या केलेल्या दिसत होत्या, त्याचं कारण कळलं नाही.
![]() |
लाकडी पिंजऱ्यात ठेवलेले हत्ती |
हे हत्ती बघतांना आमचा तासाभराचा वेळ तरी सहज निघून गेला होता. तिथून बाहेर पडून आम्ही गुरुवायूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं. पुढे काही किलोमीटर अंतरावर गुरुवायूरचं मंदिर होतं आणि मंदिराच्या जवळच्या परिसरातच आमचं बुकींग केलेलं हॉटेल होतं. अर्ध्यापाऊण तासातच आम्ही 'सोपानम हेरिटेज' नावाच्या त्या हॉटेलच्या भव्य इमारतीपाशी पोहोचलो. तिथल्या स्वागतकक्षात एक सहा फुटांपेक्षाही जास्त उंच असलेली पितळेची भव्य समई ठेवलेली होती. समईपासून थोड्या अंतरावर कथकली नृत्य करणाऱ्या एका नर्तकाचा पुतळा उभा होता. त्या पुतळ्याला पाहून तिथे खरोखरच एखादा माणूस उभा असल्याचा भास होत होता.
तिथल्या स्वागतिकेकडे आवश्यक ते कागदपत्र सोपवून आम्ही तिने दिलेले फॉर्म भरून दिले आणि तिला दुपारच्या जेवणाची सोय होईल का ते विचारलं. पण आम्ही अस्तित्वातच नसल्यासारख्या अविर्भावात, ती आम्ही दिलेल्या माहितीची संगणकावर नोंद करत, आमचं सामान नेणाऱ्या माणसाशी मल्याळी भाषेत बोलत राहिली. नंतर दोनतीनदा इंग्लीशमध्ये विचारूनही तिने आमच्याकडे लक्षच दिलं नाही. मग शेवटी सामान नेणाऱ्या माणसाला आमची दया येऊन, त्याने डायनिंग हॉलच्या दिशेने बोट दाखवत आम्हांला तिथे चौकशी करायला लागेल, असं सांगितलं आणि आम्ही त्याच्यापाठोपाठ आमच्या खोल्यांकडे निघालो.
तो माणूस त्या इमारतीतून बाहेर पडून आम्हांला समोरच्या इमारतीकडे घेऊन गेला. तिथल्या लिफ्टपाशी गेलो, तर तिथे लिफ्टसमोरच काहीतरी सुतारकाम चालू असलेलं दिसत होतं. सुतारकाम करणाऱ्या माणसाने ती लिफ्ट बंद आहे, असं सांगितलं म्हणून आम्ही पहिल्या इमारतीत परत आलो आणि तिथल्या लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेलो. चौथ्या मजल्यावर दोन्ही इमारतींना जोडणारा पूल होता, त्या पुलावरून समोरच्या इमारतीतल्या हॉलमध्ये प्रवेश करून आम्ही तिथल्या जिन्यापाशी आलो आणि तो जिना उतरून खाली तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या खोल्यांमध्ये आलो.
खोलीत शिरताच सगळ्यात पहिल्यांदा जाणवला तो ओल आल्यामुळे येणारा कुबट वास. खोली स्वच्छ झाडलेली होती, पण जिथे पडदे लावलेले होते, तिथल्या भिंतीवर ओल आल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. ओलाव्यामुळे तिथे एका बाजूचं प्लॅस्टर निखळून खाली पडल्याच्या खुणा दिसत होत्या. खालच्या सोफ्यावर प्लॅस्टर पडल्याच्या खुणा आणि काहीतरी सांडल्याचे डाग पडलेले स्पष्ट दिसत होते. सोफ्याचं कव्हर आणि त्याच रंगाचं बेडवर टाकलेलं कव्हर या दोघांचे रंग अगदीच जुनाट झालेले आणि मळखाऊ दिसत होते. बेडकव्हरच्या खाली असलेल्या चादरी मात्र स्वच्छ दिसत होत्या.
खोलीतल्या एका भिंतीला सतत ओल येऊन त्याचं पाणी पडद्यांमध्ये मुरलं होतं आणि सतत खोलीतला एसी चालू ठेवल्याने कोंदट हवा तयार होऊन त्या पडद्यांना कुबट वास येत होता. पडद्यांच्या पाठीमागे गॅलरीत उघडणारी एक खिडकी आणि गॅलरीचा दरवाजा होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोली झाडतांना तो दरवाजा किंवा खिडकी उघडण्याची तसदी न घेतल्याने, तिथे कोंदट हवा तशीच राहून कुबट वास येत होता. आम्ही पडदे बाजूला सारून खिडकी आणि दरवाजा दोन्ही उघडून दिले आणि खोलीतला पंखा लावला. गॅलरी झाडलेली नव्हती, कोणीतरी टाकलेलं सिगरेटचं थोटूक तिथे तसंच पडलेलं होतं. पण गॅलरीतून बऱ्यापैकी हवा येत होती, त्यामुळे खोलीत मोकळी हवा खेळायला लागली आणि थोड्या वेळाने पडद्यांचा कुबट वास नाहीसा झाला. पण नेमका आमच्या गॅलरीच्या खालच्या बाजूला हॉटेलमधला कचरा जाळला जात होता, त्याच्या धुरामुळे तासाभराने आम्हांला दरवाजा आणि खिडकी बंद करून घ्यावी लागली.
आमच्या सगळ्यांच्याच खोल्यांमध्ये पडद्यांना असाच कुबट वास येत होता आणि सगळीकडे असेच खिडक्या दरवाजे उघडून द्यावे लागले होते. बाकी खोलीत फर्निचरव्यतिरिक्त एसी, टीव्ही, फोन आणि चहाकॉफीच्या साहित्यासह इलेक्ट्रीक किटली ठेवलेली होती. टाॅयलेटमध्ये चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल्स, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं.
आम्ही दुपारी अडीचच्या नंतर हॉटेलमध्ये आलो होतो. सकाळी ब्रेकफास्ट करतांना तिथे असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव बघण्याच्या नादात आमचा सगळ्यांचा हेवी ब्रेकफास्ट करून झाला होता, त्यामुळे बहुतेकांनी दुपारचं जेवण न घेता त्याऐवजी सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरच्या दुपारच्या जेवणाची सोय करून, मग आम्ही निवांतपणे एका खोलीत बसलो. टीव्ही लावल्यावर मात्र आमचा अपेक्षाभंग झाला. टीव्हीवर बहुतेक सगळे दाक्षिणात्य चॅनेल्सच दिसत होते, अगदीच नियम आहे म्हणून एकदोन हिंदी चॅनेल्स आणि इतर काही भारतीय भाषांचे प्रत्येकी एकदोन चॅनेल्स दिसत होते. मराठी चॅनेल एकही नव्हता. हिंदी चॅनेल्सवर बातम्या लागल्याने थोडावेळ बातम्या पाहून आम्ही टीव्ही बंद केला.
गुरुवायूर मंदिरात दुपारी चारसाडेचार वाजता गेलात, तर व्यवस्थित दर्शन होईल असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. पण त्या दिवशी इतर काहीच बघायचं नसल्याने, आम्ही जरा उशीरा मंदिरात जायचा निर्णय घेतला. साडेचारनंतर सगळेजण तयार व्हायला लागले. तोपर्यंत खोलीतल्या इलेक्ट्रीक किटलीचा वापर करून आम्ही चहा केला आणि चहा घेऊन मग आम्ही दर्शनासाठी निघालो.
आम्ही निघेपर्यंत पावणेसहा झाले होते, अंधार पडायला सुरूवात झाली होती. लिफ्टने जाण्यासाठी आम्ही सगळेजण चौथ्या मजल्यावर गेलो. चौथ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये एकही दिवा न लावल्याने अंधार पडलेला होता. त्या अंधारातच तिथे वाटेत असणारी टेबलं चुकवत आम्ही पुलावरून पलिकडच्या इमारतीत गेलो आणि लिफ्टची प्रतिक्षा करू लागलो. लिफ्ट आली. लिफ्टची क्षमता सहा माणसांना नेण्याएवढी होती. त्यामुळे साधारणपणे सहा माणसांना लिफ्टमध्ये शिरण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ लिफ्टचे दरवाजे उघडे रहावेत अशी आमची अपेक्षा होती. आम्ही एकेकजण लिफ्टमध्ये शिरत असतांनाच अचानक लिफ्टचे दरवाजे बंद व्हायला लागले. लिफ्टमध्ये येणारी व्यक्ती वेळीच मागे सरकल्याने ती दरवाजात चेंगरली गेली नाही. लिफ्टचे दरवाजेही हलके आणि पुढे रबर लावलेले होते, म्हणून ठीक, नाहीतर एखादी दुर्घटना सहज घडली असती. लिफ्ट खाली आल्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडतांनाही तोच प्रकार झाला.
तिथून थोडं पुढे आल्यावर आम्हांला आमचं सामान खोलीत नेणारा माणूस भेटला, त्याने सांगितलं, की दुसऱ्या इमारतीतली लिफ्ट आता चालू झाली आहे. वास्तविक रिसेप्शनवरून फोन करून आम्हांला ही सूचना देणं सहज शक्य होतं. पण तिथल्या स्वागतिकेने तेवढे कष्ट घेतले नव्हते. या माणसाने आम्हांला हे सांगितलं नसतं, तर आम्ही पहिल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जायचा द्राविडी प्राणायाम करत राहिलो असतो.
तिथून गुरुवायूर मंदिर अगदी जवळ असल्याने आम्ही मंदिराकडे पायी चालत निघालो. मंदिराजवळ असलेल्या दुकानांमधल्या वस्तू पाहून, परत येतांना त्यातल्या काही वस्तू खरेदी करायच्या असं मी ठरवलं होतं. मंदिराजवळ गेल्यावर तिथे दर्शनासाठी असलेल्या पाचसहा रांगा दिसल्या. त्यात स्त्रियांसाठी एक वेगळी रांग होती. मंदिरात पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या स्त्रियांना प्रवेश होता. पुरुषांसाठी मात्र धोतर किंवा लुंगी नेसून मंदिरात जाणं अनिवार्य होतं. रांगेतल्या लहान मुलांनाही छोट्या लुंग्या नेसवलेल्या दिसत होत्या.
वेगवेगळ्या रांगेत उभं राहिलं, तर आमच्यापैकी काहींना तरी लवकर दर्शन घ्यायची संधी मिळेल, असं वाटल्याने आम्ही वेगवेगळ्या रांगांमध्ये दर्शनासाठी उभे राहिलो होतो, पण एकाचीही रांग पुढे सरकेना. केरळमध्ये देवाच्या झोपण्याच्या, जेवण्याच्या इत्यादी वेळांना मंदिर बंद ठेवतात आणि त्यातल्या मधल्या वेळात लोकांना दर्शन घ्यायची संधी मिळते. अशाप्रकारे दिवसातून चारपाच वेळा तरी मंदिर बंद असतं.
आमच्यादेखत काही रांगांमधल्या लोकांना मंदिरात सोडलं गेलं आणि मग साखळ्या लावून रांगेचा मार्ग बंद केला गेला. उरलेले लोक बराचवेळ रांगेत एकाचजागी तिष्ठत उभे होते. अजून अर्ध्यापाऊण तासाने पुन्हा काही रांगांमधल्या लोकांना आत सोडलं गेलं आणि थोडावेळ दर्शन बंद झालं. तिथे सतत एकाच जागी उभं राहून राहून आमच्या पायांना रग लागायला लागली होती. रांगेतल्या काही लहान मुलांना गर्दीची सवय नसल्याने ती मोठ्याने भोकाड पसरून रडत होती. साधारण तासभर असा काढल्यानंतर मग आम्हांला दर्शनाची संधी मिळाली. आम्ही ज्या वेगवेगळ्या रांगेत उभे होतो, त्या सर्व रांगांमधल्या लोकांना एकाचवेळी आत सोडलं होतं.
आत गेल्यानंतर आम्हांला स्त्रियांसाठी असलेली वेगळी रांग, पुरुषांसाठी असलेली वेगळी रांग या सगळ्या रांगांची ऐशीतैशी झालेली दिसली. आत सगळ्या रांगा एकत्र होत होत्या. दर्शनमार्ग रुंद असल्याने लोक आत रेटारेटी करून घुसत होते आणि त्यात एकाऐवजी नवीन तीन रांगा तयार झाल्या होत्या. या रांगामध्ये स्त्रीपुरुष सगळे एकत्र मिसळलेले होते, बहुतेक सगळेजण एकमेकांना ढकलत होते, तिथे मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये असावी तशी गर्दी झाली होती. त्यातच लहान मुलं जीव तोडून रडत होती. मंदिरांबाहेर दर्शनासाठी टीव्ही स्क्रीन लावला असता, तर रांगेत उभं राहण्याची इच्छा नसलेल्यांना त्या स्क्रीनवर देवाचं दर्शन घेऊन परस्पर जाता आलं असतं. पण तशी सोय तिथे नव्हती.
या सगळ्या गर्दीतून अखेर आम्ही गुरुवायूर कृष्णाच्या अंदाजे फूटभर उंचीच्या छोट्याशा मूर्तीचं दर्शन घेतलं. कृष्णाच्या मूर्तीचा बहुतेक भाग कपड्यांनी आणि फुलांनी झाकलेला होता पण चंदनाने माखलेला चेहरा तेवढा दिसत होता. दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याबाहेर असलेल्या प्रदक्षिणामार्गावरून आम्ही बाहेर पडलो. तिथे बाहेरच्या मोठ्या प्रदक्षिणामार्गावर एक हत्ती उभा होता. तिथल्या एका दरवाजातून अजून एक हत्ती आत येत होता. त्याच दरवाजातून आम्ही बाहेर आलो.
तिथून आम्ही मंदिराबाहेर असलेल्या मंडपाकडे आलो. भजन, प्रवचन इत्यादींसाठी तो मंडप बांधलेला होता. मंडपात स्टेजसमोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. काही लोक त्या खुर्च्यांवर बसून चक्क झोप काढत होते. काहीजण मंदिरातर्फे प्रसाद म्हणून मिळणाऱ्या जेवणासाठी तिथे थांबलेले होते. त्या मंडपात बसून आम्ही मंदिरासमोरचा परिसर न्याहाळू लागलो. आता दर्शनासाठी आलेल्या लोकांची गर्दीही कमी झाली होती. लोकांच्या रांगा पटापट पुढे सरकत होत्या. थोड्या वेळाने रांगेतले सगळे लोक आत गेले आणि मंदिराचे दरवाजेही बंद झालेले दिसले.
रात्रीचे नऊ वाजले होते, आमच्याबरोबरची एक व्यक्ती अजून बाहेर आली नव्हती, ती का आली नाही हे बघण्यासाठी मी मंदिरातून बाहेर पडायच्या मार्गाने आत गेले, तेव्हा मला तिथे व्यवस्थित शृंगारलेले एकूण तीन हत्ती उभे असलेले दिसले. दर्शनासाठी आत गेलेल्या लोकांची तिथे गर्दी जमली होती, काहीजणांनी मोकळ्या जागांमध्ये बसून घेतलं होतं. गाभाऱ्यासमोरच्या उंच दीपमाळा पेटवलेल्या दिसत होत्या. थोड्या वेळात शृंगारलेल्या तिन्ही हत्तींना पुढे आणून गाभाऱ्यासमोर उभं केलं होतं आणि पोलिसांनी बाहेर पडण्याचा रस्ता बंद केला होता. मोठे दिवे ओवाळत पुजाऱ्यांनी (बहुधा) ते तीन हत्ती देवाला अर्पण करण्याचा विधी सुरू केला. तो विधी फार सुंदर वाटत होता. मला थोडा वेळ तिथेच उभं राहून तो विधी पहायला आवडलं असतं, पण हॉटेलवर रात्रीच्या जेवणासाठी वेळेत जाणं आवश्यक होतं. त्यामुळे नाईलाजाने मी तिथून निघाले आणि एका मधल्या दरवाजाने बाहेर आले.
आम्ही हॉटेलकडे परत निघालो, त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस चालू झाला होता. आता परततांना दुकानात खरेदी करत बसलो असतो, तर अजून वेळ गेला असता आणि रात्रीच्या जेवणाला उशीर झाला असता, म्हणून फक्त प्रसाद खरेदी करून आम्ही हॉटेलवर परतलो आणि थेट डायनिंग हॉलमध्येच गेलो.
हॉटेलचा डायनिंग हॉल पूर्ण रिकामा होता, तिथे फक्त आम्हीच होतो, बाजूला एक वेटर उभा होता. जेवणासाठी काय आहे, हे मी पहायला गेले, तर पहिल्याच टेबलवर ब्रेड, बटर, जाम वेगवेगळ्या डिशमध्ये ठेवलेले होते आणि त्या डिशच्या बाजूने तीनचार छोट्या आकाराची झुरळं फिरत होती. डिशमधले पदार्थ झाकून ठेवायला हवे होते. मी तिथे झुरळं फिरताहेत हे बोलून दाखवलं, पण तिथल्या वेटरला त्याच्याशी काही देणंघेणं नसल्यासारखा तो शांत उभा होता. ते पाहून शिसारी येऊन मी पुढच्या टेबलाकडे वळले, ते रिकामं होतं. त्याच्यापुढच्या टेबलावर सुदैवाने सगळे पदार्थ भांड्यात झाकून ठेवलेले होते आणि तिथे ती छोटी झुरळंही दिसत नव्हती, ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. तिथे इडली, चटणी, सांबार, दाल, भात, एक रस्साभाजी आणि पुऱ्या भांड्यात झाकून ठेवलेल्या होत्या. पण भांड्यांमधले बहुतेक सगळे पदार्थ संपत आलेले दिसत होते. नॉनव्हेज पदार्थही त्याच्याजवळच ठेवलेले होते. त्याच्यापलीकडे एका आईसक्रीमच्या बॉक्समध्ये जवळजवळ तळ गाठलेल्या स्थितीत थोडसं आईसक्रीम उरलेलं दिसत होतं.
मला तो एकंदर प्रकार काही फार बरा वाटला नाही, त्यामुळे झाकलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ नावापुरते डिशमध्ये वाढून घेऊन मी इतरांबरोबर जेवायला बसले. आम्ही जेवत असतांना जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि विजांच्या कडकडाटाबरोबर एकदम हॉटेलमधले सगळे लाईट गेले. आम्ही अंधारात तसेच बसलो होतो. दोन मिनिटांनी बहुतेक जनरेटरचे लाईट चालू झाले. पाच मिनिटांनी वीजप्रवाह सुरळीत झाला आणि परत थोड्याच वेळात लाईट गेले, पुन्हा एकदा जनरेटरचे लाईट चालू होईपर्यंत आम्हांला अंधारात बसावं लागलं. पण असे सारखे लाईट जात होते आणि येत होते.
थोड्या वेळाने तिथल्या भांड्यात ठेवलेले काही पदार्थ संपले. तिथे उभ्या असलेल्या वेटरला त्यापैकी एक पदार्थ आणायला सांगितला, तर त्याने अगदी नाईलाजाने आत जाऊन तो मोजकाच पदार्थ आणला. काही मिनिटांनी अजून काही वेटर तिथे आले, ते आपापसात बोलण्यातच गुंग होते, त्यांना दुसरा पदार्थ आणायला सांगितल्यावर त्यांनी तो लगेच आणून दिला आणि ते परत एकमेकांशी बोलण्यात गुंग होत, काही मिनिटांत तिथून निघून गेले. भांड्यातल्या संपलेल्या पदार्थांपैकी अजून एखादा पदार्थ किंवा आईसक्रीम यातलं काही आम्हांला हवं आहे का हे विचारण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. आमचं जेवण होत आल्यावर मघाशी एका कोपऱ्यात स्थितप्रज्ञाप्रमाणे उभा असणारा तो वेटर जवळ आला आणि आमच्या डीश गोळा करायला लागला, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की त्याला फक्त रिकाम्या झालेल्या डीश गोळा करून नेण्याचं काम सांगितलेलं होतं.
जेवण झाल्यावर तिथून आम्ही दुसऱ्या इमारतीतल्या लिफ्टपाशी आलो. या लिफ्टचे दरवाजेही पहिल्या इमारतीतल्या दरवाजांसारखे लवकर बंद होत होते. काही दुर्घटना घडू नये, म्हणून लिफ्टमधलं पॉज बटण दाबून ठेवून आम्ही लिफ्टमध्ये शिरलो. खोलीत गेल्यावर टीव्हीवर बघण्यासारखं काहीच नव्हतं. लाईट कधी जातील याचा नेम नव्हता. कधी एकदा या हॉटेलमधला मुक्काम संपतोय असं आम्हांला झालं होतं.
No comments:
Post a Comment