भाग १, --- भाग २
पुढे -
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी पहिल्या इमारतीतल्या डायनिंग हॉलमध्ये गेलो. आदल्या दिवसाप्रमाणेच सगळा हॉल रिकामा होता. एका बसमधले प्रवासी नुकतेच चेकआऊट करून बाहेर पडले होते. त्यांचा ब्रेकफास्ट झाला होता, की या हॉटेलची स्थिती पाहून त्यांनी दुसरीकडे कुठेतरी ब्रेकफास्ट करण्याचा निर्णय घेतला होता, ते कळलं नाही.
पुढे -
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी पहिल्या इमारतीतल्या डायनिंग हॉलमध्ये गेलो. आदल्या दिवसाप्रमाणेच सगळा हॉल रिकामा होता. एका बसमधले प्रवासी नुकतेच चेकआऊट करून बाहेर पडले होते. त्यांचा ब्रेकफास्ट झाला होता, की या हॉटेलची स्थिती पाहून त्यांनी दुसरीकडे कुठेतरी ब्रेकफास्ट करण्याचा निर्णय घेतला होता, ते कळलं नाही.
ब्रेकफास्टसाठी सगळे पदार्थ मांडलेले होते, त्यात कालच्या त्याच टेबलवर ब्रेड, बटर, जाम ठेवलेले होते. कालची स्थिती आठवून आम्ही त्या टेबलकडे फिरकलोही नाही. पुढचं टेबल रिकामं होतं, त्यापुढे इडली, चटणी, सांबार, छोटे डोसे, छोले, पुऱ्या, कॉर्नफ्लेक्स, दूध, साखर, चहा, कॉफी हे सगळं मांडून ठेवलेलं होतं. डीश गोळा करणारा वेटर कालच्यासारखाच एका कोपऱ्यात उभा होता, वाढपी वेटर अधूनमधून नावापुरते डोकवून जात होते. त्यावेळी कोणी काही मागितलं, तर तेवढं तत्परतेने आणून देत होते, पण स्वतःहून काही विचारण्याच्या भानगडीत पडत नव्हते. फक्त आदल्या दिवशीचं जेवण आणि ब्रेकफास्ट यांची चव ठीक होती इतकीच काय ती समाधानाची गोष्ट होती.
ब्रेकफास्टनंतर आम्ही चेकआऊटचे सोपस्कार पार पाडले. आदल्या दिवशी ज्याने आमचं सामान खोलीपर्यंत नेलं होतं, तोच माणूस सामान गाडीत ठेवण्याकरता आला होता. तोच एकटा असा माणूस होता, जो आमच्याशी व्यवस्थित बोलला होता. आमचं सामान गाडीत ठेवलं जात होतं, तोपर्यंत आम्ही रिसेप्शन रूममधल्या सजीव भासणाऱ्या कथकली नर्तकासोबत आमचे फोटो काढले. उंच पितळी समईचेही फोटो काढले. आणि मग गाडीत बसून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात केली.
![]() |
उंच पितळी समई |
![]() |
कथकली नर्तकाचा पुतळा |
![]() |
मुन्नारच्या दिशेने प्रवासाला सुरुवात |
मुन्नारला जातांना वाटेत आम्ही कालडी इथे शंकराचार्यांचा कीर्तिस्तंभ पाहण्यासाठी थांबलो. कीर्तिस्तंभाची इमारत आठ मजली उंच आहे. सुरूवातीला आठ मजले चढून जायच्या विचारानेच आमच्या पोटात गोळा आला होता, पण काऊंटरवरच्या तिकिट देणाऱ्या बाईने 'छोट्या छोट्या पायऱ्या आहेत,' असं सांगत आम्हांला दिलासा दिला. कीर्तिस्तंभाच्या इमारतीतल्या गोलाकार वळसा घालत जाणाऱ्या त्या पायऱ्या खरोखरच आरामदायक होत्या. प्रत्येक तीन पायऱ्यांनंतर पुढे एक मोठी पसरट पायरी होती आणि त्या प्रत्येक पसरट पायरीपाशी असलेल्या आतल्या बाजूच्या भिंतीवर शंकराचार्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग चित्रित केलेले होते, तिथे त्या प्रसंगांबद्दलची माहितीही लिहिलेली होती. मध्येच एखाद्या पसरट पायरीवर आतल्या बाजूच्या भिंतीत गाभाऱ्याचा दरवाजा उघडलेला होता आणि तिथे ठेवलेली मूर्ती दिसत होती. त्यामुळे तीन पायऱ्या चढून मग भिंतीवर दिसणारं चित्र बघायचं, त्याची माहिती वाचायची असं करत रेंगाळत वर चढल्यामुळे आम्हांला आठ मजले चढून जाण्याचे श्रम जाणवले नाहीत. आम्ही वरती जात असतांना चांगलाच पाऊस सुरू झाला होता, आम्हांला वाटेत असणाऱ्या खिडक्यांमधून पाऊस पडतांना दिसत होता. आम्ही खाली आलो, तेव्हा आमचे चपलाबूट पावसात चांगलेच भिजलेले दिसत होते.
![]() |
कीर्तिस्तंभ - इमारतीचा तळमजला फोटोत दिसत नाहीये. |
तिथून पुढे आम्ही शृंगेरी इथे शंकराचार्यांचा मठ बघण्यासाठी थांबलो. मठ पाहून आम्ही पुढे मुन्नारच्या दिशेने निघालो. गुरूवायूर ते मुन्नार या प्रवासाला किमान पाचसहा तास लागतील असं आम्हांला आमच्या मैत्रिणीने आधीच सांगितलं होतं. शृंगेरीला पाऊस थांबला होता, पण मुन्नारला जातांना वाटेतल्या घाटात धुकं लागेल याची ड्रायव्हरला धास्ती वाटत होती.
दुपारी दोन अडीचच्या सुमाराला आम्ही वाटेतल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. एका मोठ्या रबर प्लांटेशनच्या शेजारी असणाऱ्या आणि लांबून एखाद्या छोट्याश्या कॉटेजसारख्या दिसणाऱ्या त्या हॉटेलमध्ये शिरल्यावर तिथल्या रंग उडालेल्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या आणि टेबलं पाहिल्यावर तिथलं जेवण कसं असेल याची शंका मनात डोकवून गेली. तिथला मेनू मात्र सुटसुटीत आखलेला होता, ज्यांना पूर्ण थाळी घ्यायची नाही, त्यांच्यासाठी तीन पोळ्या आणि एक भाजी किंवा जिरा राईस आणि एक भाजी किंवा भात आणि एक भाजी असा पर्याय निवडून त्याच्याबरोबर कोशिंबीर, लोणचं, पापड, दही, ताक, सॅलड अशी थाळी घेता येणार होती. ते पाहून आमच्यापैकी काही जणांनी जिरा राईस आणि भाजीची थाळी मागवली, तर काही जणांनी तीन पोळ्या आणि भाजीची थाळी मागवली. या दोन्ही प्रकारच्या थाळ्यांबरोबरच्या पंजाबी पद्धतीच्या भाज्या मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ग्रेव्ही असलेल्या होत्या. मग जास्तीच्या पोळ्या, भाजी आणि भात एकमेकांबरोबर वाटून घेत आम्हांला सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता आला आणि अन्नही वाया गेलं नाही. इथलं जेवण चांगलंच रूचकर होतं, इथला मसाला डोसाही चांगला कुरकुरीत आणि रुचकर होता. जेवण झाल्यावर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे चहा, कॉफी, अननसाचा ज्यूस वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली.
![]() |
हॉटेलजवळचं रबर प्लांटेशन |
थोड्याच वेळात ड्रायव्हरने एसी बंद करून खिडकीच्या काचा उघडून दिल्या. आता हवेत गारवा जाणवत होता. जसंजसं आम्ही पुढे जात होतो, तसं आजूबाजूच्या हिरवाईचंही प्रमाण वाढलेलं दिसत होतं. आम्ही मुन्नार या हिल स्टेशनला जात होतो, हे वातावरणातल्या बदलातून जाणवत होतं, वाटेत घाटरस्ते लागत होते, आम्ही एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जात होतो.
![]() |
बदललेलं वातावरण - अधिक हिरवाई |
वाटेत एका ठिकाणी मसाले विकत घेण्यासाठी 'हिंदुस्तान स्पायसेस' या मसाल्यांच्या दुकानासमोर ड्रायव्हरने गाडी थांबवली. तिथे 'हिंदुस्तान स्पायसेसच्या' मसाल्यांच्या दुकानापाठीमागे त्यांचं मसाल्याच्या वनस्पतींचं आणि औषधी वनस्पतींचं गार्डन होतं. या गार्डनला व्हिजिट देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शंभर रुपयांचं तिकीट काढावं लागणार होतं. केरळमधल्या इतर ठिकाणी असलेल्या तिकीटदरापेक्षा इथल्या तिकीटाची किंमत मला फारच जास्त वाटली. तिथे येणारा पर्यटकांचा ग्रुप जेवढा मोठा, तेवढा मसाल्यांच्या विक्रीपेक्षा नुसत्या गार्डनच्या तिकीटांच्या विक्रीतून 'हिंदुस्तान स्पायसेसला' मिळणारा नफा जास्त, असं गणित मला सरळसरळ दिसत होतं.
मी अनेकवेळा कोकणात मसाल्याची झाडं पाहिलेली असल्याने, मला त्या गार्डनमध्ये फार काही नवीन बघायला मिळणार नव्हतं, त्यामुळे मला त्या गार्डनमध्ये जाण्याची उत्सुकता नव्हती. पण आमच्या ग्रुपमधले सगळेच गार्डनमध्ये जाणार होते, म्हणून मग मीही त्यांच्याबरोबर गेले. गार्डन म्हंटल्यावर त्यात आखीवरेखीव पद्धतीने लावलेली शोभेची झाडं, बहरलेली फुलझाडं असं काहीतरी बघायची सवय झालेल्या बाकीच्यांची ते गार्डन पाहून काहीशी निराशा झाली, कारण त्या गार्डनमधली झाडं खरंतर प्लांटेशनसाठी लावलेली होती आणि आमच्यापैकी बहुतेकांनी त्यातल्या बऱ्याचशा मसाल्यांची झाडं आधी कोकणात पाहिलेली होती.
ते गार्डन (खरंतर प्लांटेशन) दाखवण्यासाठी दुकानात माहितगार विक्रेते ठेवलेले होते. ते विक्रेते गार्डन दाखवत तिथल्या झाडांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देत होते, आणि त्या झाडांचे कोणते भाग कोणत्या आजारांवरच्या औषधांसाठी वापरले जातात याची जास्तीची माहितीही देत होते. (ग्राहकांनी दुकानात येऊन मसाल्यांव्यतिरिक्त तिथली इतर हर्बल प्रॉडक्ट्स विकत घ्यावी यासाठीची ही मार्केटींग स्ट्रॅटेजी होती.) त्या गार्डनमध्ये आम्हांला व्हॅनिला, ओवा, नागवेल - विड्याच्या पानांचा वेल, मिरे, जायफळ, तमालपत्र, लवंग, वेलची, स्टार अॅनिस, हळद, आंबेहळद, कोकोची दोन प्रकारची झाडं, अडुळसा, नीरब्राम्ही, आकाराने लहान पण चवीला अतिशय तिखट असणाऱ्या मिरचीचं झाड, अंजीर इत्यादी झाडं दाखवली गेली, त्यापैकी कोको आणि वेलचीची झाडं सोडली, तर बाकीची बहुतेक झाडं मी आधी पाहिलेली होती. त्या गार्डनचं स्वरूप बघता तिथल्या झाडांपासून मिळणारे मसाले वगैरे तिथल्या दुकानात विकले जात असावेत, असं वाटत होतं.
![]() |
व्हॅनिलाचा वेल |
![]() |
स्टार अॅनिस |
![]() |
नीरब्राम्ही |
![]() |
अंजीराचं झाड |
![]() |
कोकोचं फळ - प्रकार १ |
![]() |
मिऱ्याचा वेल |
![]() |
कोकोचं फळ - प्रकार २ |
![]() |
जायफळ |
![]() |
वेलचीची फळं |
![]() |
छोटुकली मिरची पण चवीला अती तिखट! |
आमच्या सोबत असलेल्या विक्रेतीने दुकानात गेल्यानंतर आम्हांला मसाल्यांबरोबरच इतर हर्बल प्रॉडक्ट्स दाखवायला सुरूवात केली. त्यापैकी चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या घालवण्यासाठी असलेल्या एका हर्बल प्रॉडक्टची बाटली इतकी मोठी होती, की ते हर्बल प्रॉडक्ट नियमित वापरलं असतं, तरी ते किमान तीन ते पाच वर्षं तरी पुरलं असतं. अर्थात या क्षेत्राची मला माहिती असल्यामुळे, हे मला लगेच जाणवलं. ज्यांना याची माहिती नसते, असे लोक विक्रेत्यांच्या दाव्यांना भुलून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असलेली, अव्वाच्या सव्वा किंमतीची प्रॉडक्ट्स सहज विकत घेतात.
आम्ही त्या विक्रेतीला फक्त मसालेच दाखवायला सांगितले. मसाल्यांचं त्यांच्या आकारमानानुसार व्यवस्थित ग्रेडेशन केलेलं दिसत होतं आणि त्याप्रमाणे त्यांची किंमत आकारलेली होती. मसाल्यांच्या गिफ्ट पॅकेटमध्ये काही मोठ्या आकाराच्या मसाल्यांसोबत लहान आकाराचे मसाले मिसळलेले होते. त्या दुकानात सगळीकडे मसाल्यांचा वास घमघमत होता. आम्ही आम्हांला हवे असलेले मसाले घेतले. (घरी आल्यानंतर ती पाकीटं उघडून पाहिल्यावर जाणवलं, की त्या लोकांनी सांगितल्यानुसार त्या मसाल्यांमधलं तेल काढून घेतलेलं नव्हतं. लवंग नुसती हातात घेतली, तरी त्या लवंगेतल्या तेलाचा ओलावा हाताला जाणवत होता.) त्याशिवाय तिथे मी लेमन ग्रास आॅईल विकत घेतलं, ते इन्सेक्ट रिपेलंट म्हणून वापरतात. (तेही अतिशय परिणामकारक निघालं. पाण्याच्या बादलीत काही थेंब तेल टाकून त्या पाण्याने जमीन पुसली, की मुंग्या, डास इत्यादी कीटक काही काळ तरी तिथे येत नाहीत. पण हे तेल पाण्यात चुकून थोडं जास्त पडलं, तर त्याच्या वासाने डोकं दुखायला लागतं, एखाद्याला अस्वस्थही वाटू शकतं, अशा वेळी खोलीतला पंखा चालू करून खोलीची दारं खिडक्या उघडून द्यावीत किंवा त्या खोलीबाहेर मोकळ्या हवेत जावं.) ह्याशिवाय त्या दुकानात काजू, चहा, होममेड चाॅकलेट्स, साबण, नारळाचं खाद्यतेल इत्यादी गोष्टीही विक्रीला ठेवलेल्या होत्या.
केरळमध्ये मसाले, काजू इत्यादी पदार्थांची खरेदी करतांना ते पदार्थ शासकीय परवाना मिळवलेल्या दुकानांमधूनच खरेदी करावेत. काही ठिकाणी मसाले, काजू इत्यादी पदार्थ रस्त्यावर विकले जातात, किंवा छोट्या टपऱ्यांमधून विकले जातात, त्यांची किंमत स्वस्त वाटली, तरी अशा खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता असते.
दुकानातून खरेदी करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. वाटेत एक धबधबा लागला. तिथे बऱ्याच लोकांची गर्दी होती. आम्हांला तिथे थांबून फक्त त्या धबधब्याचा फोटो काढायचा होता. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, "येतांना आपण याच रस्त्याने येऊ, तेव्हा तुम्ही फोटो काढा," असं सांगत त्याने गाडी पुढे काढली. मुन्नारचा प्रवास लांबचा आहे, त्याला वेळ लागणार आहे, याची आम्हांला जाणीव होती, त्यामुळे फक्त फोटो काढून आम्ही लगेच गाडीत बसणार होतो, त्याला पाचसात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नसता, पण ड्रायव्हरने आम्हांला तेवढंही थांबू दिलं नाही. त्या प्रवासात अधूनमधून पावसाचे हलके थेंब पडत होते, पण ड्रायव्हरने शक्यता वर्तवल्याप्रमाणे धुकं काही लागलं नव्हतं. मग ड्रायव्हर असं का वागला असावा? कदाचित त्यांच्या कंपनीचा नियम असावा की शक्यतो दिवसाच सगळा प्रवास करायचा, रात्रीचा प्रवास टाळायचा, पण हा फक्त माझा अंदाज होता.
धबधब्यापासून आम्ही पुढे निघालो, तेव्हा हळूहळू अंधारायला लागलं होतं. मी बुकींग केलेलं हॉटेल हे मुन्नारजवळच्या पळ्ळीवासल नावाच्या गावात होतं. आम्ही त्या गावापर्यंत जाईपर्यंत पूर्ण अंधारलं होतं. अंधारातच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सांगितलं, की हॉटेलला जाण्याचा रस्ता छोटा असल्याने, त्याची गाडी आता इथेच थांबेल, त्यापुढे आम्हांला हॉटेलपर्यंत न्यायला हॉटेलची गाडी येईल. त्यासाठी मला हॉटेलच्या फोननंबरवर फोन लावावा लागणार होता. मी फोन लावला आणि ड्रायव्हरकडे दिला. ड्रायव्हरने त्या माणसाला आमची गाडी नेमकी कुठे उभी आहे, ते सांगितलं. ड्रायव्हरला त्याच्या नियमित प्रवासामुळे ह्या हॉटेलच्या रस्त्याची माहिती होती, म्हणून ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या ड्रायव्हरसोबत आम्ही त्या रस्त्याने गेलो असतो, तर आमची पंचाईत झाली असती.
हॉटेलच्या गाडीची वाट बघत आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि झोंबऱ्या गार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो, तो रस्ता डोंगरातून जात होता. त्या रस्त्याच्या खालच्या बाजूने असणाऱ्या डोंगरउतारावर 'ग्लेनमोअर' हॉटेल वसलेलं होतं. वेबसाईटवर दाखवलेली हॉटेलची पार्किंगची जागा म्हणजे आम्ही उभे असलेल्या रस्त्याच्या कडेची हॉटेलला पार्किंगसाठी दिलेली जागा होती. तिथे वरच्या बाजूच्या डोंगरावरून लग्नसमारंभानिमित्त लाऊडस्पीकरवर लावलेल्या गाण्याचे दणदणाटी सूर ऐकू येत होते. गाणं एवढं जोरात चालू होतं, की आम्ही एकमेकांशी काय बोलत होतो, ते आम्हांला नीट ऐकू येत नव्हतं. अशा स्थितीत ड्रायव्हरला तिथेच गाडीमध्ये रात्र काढावी लागणार होती आणि सकाळी त्या उतारावरून उतरून हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी यावं लागणार होतं. ड्रायव्हरची इतकी गैरसोय होईल याची कल्पना असती, तर हे हॉटेल मी निवडलंच नसतं.
हॉटेलची गाडी येईपर्यंत ड्रायव्हरने आम्हांला विचारलं, की आम्ही उभे होतो, तिथून थोडं वरती असलेल्या जागी पर्यटकांसाठी कथकली नृत्य आणि मार्शल आर्टचं कौशल्य दाखवणारा शो असतो, तो शो बघायचा आहे का?
मी म्हणाले, की "आम्ही आधी हॉटेलवर जातो आणि मग शो बघायला जायचं, की नाही ते ठरवतो." तोपर्यंत हॉटेलची जीप आली होती. त्या लोकांनी आमचं सामान जीपमध्ये भरलं आणि आम्ही जीपमध्ये बसलो. आमच्या पुढे थोड्या अंतरावर असलेल्या इतर लोकांना, "मी ह्यांना हॉटेलवर सोडून, मग तुम्हांला न्यायला वरती येतो." असं सांगत ड्रायव्हरने जीप चालू केली.
आमची जीप मुख्य रस्त्याला फुटणाऱ्या एका छोट्या फाट्यावरून खालच्या उताराकडे निघाली. पुढे तो उतार इतका तीव्र होता, की जीपच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यावर पडतच नव्हता. रस्त्यापेक्षा थोड्या वरच्या पातळीवर प्रकाशाचा झोत पडत असल्याने, रस्त्याच्या जागी अंधार दिसून पुढे रस्ता संपला आहे असं वाटत होतं आणि ड्रायव्हर गाडी नेमकी कुठे नेतोय या विचाराने धडकी भरत होती. रस्त्यात लागणारं प्रत्येक वळण नवीन तीव्र उतारासहीत सामोरं येत होतं आणि आम्ही श्वास रोखत ड्रायव्हर नीट गाडी चालवतोय ना, याचा विचार करत होतो. ड्रायव्हर मात्र नेहमीच्या सराईतपणे गाडी चालवत होता. त्या डोंगरउतारावर लोकांची घरं वसलेली होती. मध्येच बाजूला एखादं घर दिसलं, की आम्हांला हॉटेलपर्यंत पोहोचल्यासारखं वाटायचं, पण गाडी पुढे निघाली की, हॉटेल अजून यायचं आहे, हे जाणवायचं.
अखेर एकदाचा तो अंधारातला धडकी भरवणारा प्रवास संपवत जीप हॉटेलपाशी पोहोचली. हॉटेलच्या दिव्यांच्या प्रकाशात तिथलं लॅॅंडस्केप गार्डन फारच सुंदर बनवलेलं दिसत होतं. समोरच असलेल्या डायनिंग हॉलच्या काचेच्या दरवाजातून तिथे जेवायला बसलेली माणसं आणि त्यांच्या आसपास खेळणारी लहान मुलं दिसत होती. डायनिंग हॉलच्या शेजारीच रिसेप्शन रूम होती. तिथे जाऊन चेक इन करून आम्ही आमच्या खोल्यांकडे निघालो.
कॉटेज सारख्या दिसणाऱ्या हॉटेलच्या खोल्या एकमेकींना लागून ओळीने बांधलेल्या होत्या आणि ती ओळ पुढे आतल्या दिशेने वळली होती. प्रत्येक खोलीपुढे एका लहानसा व्हरांडा होता आणि त्यात बसण्यासाठी बांबूच्या दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या. व्हरांड्यापुढे पायरी नसल्याने व्हरांडा चढतांना एखादी उंच पायरी चढल्यासारखं वाटत होतं. व्हरांड्याच्या बाजूच्या खोलीच्या दर्शनी भिंतीला फ्रेंच विंडो पद्धतीची काचेची मोठी खिडकी आणि काचेचाच दरवाजा होता. खिडकी आणि दरवाजाच्या काचेला मध्येमध्ये लाकडी फ्रेमचा आधार दिलेला होता. तरीही अगदी जमिनीलगत असलेल्या त्या खोलीला अशी काचेची खिडकी आणि काचेचाच दरवाजा असणं, हे मला फारसं प्रशस्त वाटलं नाही. पण त्यावेळी हॉटेलमध्ये वर्दळ असल्याने ते तसं असुरक्षितही वाटत नव्हतं. काचेमुळे आणि काचेपाठीमागे लावलेल्या पडद्यांमुळे खोलीच्या बाह्य सौंदर्यात मात्र भर पडली होती.
त्या हॉटेलमध्ये 'प्लांटेशन व्ह्यू' आणि 'व्हॅली व्ह्यू' या दोन प्रकारच्या खोल्या होत्या आणि आमच्या ग्रुपचं त्या दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये बुकींग केलेलं होतं. व्हॅली व्ह्यूवाल्या खोलीचं भाडं तुलनेनं जास्त होतं. पण मला त्या दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये बसवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्सव्यतिरिक्त इतर कोणताही फरक दिसून आला नाही. दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये सारख्याच सुविधा होत्या. आमच्या खोलीत जातांना मला व्हरांड्याच्या दगडांमधल्या फटीत सावकाश शिरत असलेली एक फुगलेली जळू दिसली. ते पाहून इथे जरा जपून वावरावं लागेल याची मी मनाशी खूणगाठ बांधली.
तिथल्या खोल्या प्रशस्त होत्या, स्वच्छ दिसत होत्या. खोलीतल्या बेडवर स्वच्छ चादरी घातलेल्या दिसत होत्या, मात्र तिथल्या गाद्या आणि उशांना ऊन देण्याची आवश्यकता होती. खोलीत इतर फर्निचरव्यतिरिक्त टीव्ही आणि फोनची सोय होती. खोलीत पंख्याची आवश्यकता वाटत नव्हती, पण पंखा लावलेला होता. एसी अर्थातच नव्हता. फ्रीजही नव्हता. तिथे हॉटेलच्या आसपास असलेल्या झाडांमुळे आमच्या प्रत्येकाच्या खोलीत पतंगांचा आणि पाकोळ्यांचा मुक्त संचार चाललेला दिसत होता. खोलीतलं टाॅयलेट तुलनेने लहान होतं, तिथली फरशी जरा घसरडी वाटत होती. आमच्या कोणाच्याच टाॅयलेटमधल्या कमोड शेजारी टिश्यू पेपरचा रोल ठेवण्याची दक्षता घेतलेली नव्हती. चांगली गोष्ट इतकीच होती, की तिथल्या थंड वातावरणात टाॅयलेटमध्ये चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं. त्याशिवाय तिथे टाॅवेल, साबण आणि शांपू ठेवलेले होते. एका खोलीतल्या टाॅयलेटच्या छतातून पाणी गळत होतं. एका खोलीतल्या टाॅयलेटमधल्या आरशापाठीमागून एक मोठा बीटल कीडा हळूच डोकावून त्याचं अस्तित्व दाखवून देत होता.
सगळ्या खोल्या पाहून आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये स्थिरस्थावर झालो. आमच्या खोलीत बेडजवळ असलेल्या दोन नाइटलॅॅम्पपैकी एक नाईटलॅॅम्प लागत नव्हता. पण त्या दिव्याची तशी आवश्यकता भासत नसल्याने आम्ही रिसेप्शनवर त्याबाबतीत काही कळवलं नाही, सगळ्यांच्या टाॅयलेटमध्ये ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचे रोल मात्र मागून घेतले.
जीपमधून हॉटेलमध्ये येतांना आलेल्या त्या रस्त्याच्या धडकी भरवणाऱ्या अनुभवामुळे आता परत वरती जाऊन तिथला नृत्याचा आणि मार्शल आर्टचा शो बघायला जायची कोणाचीच तयारी नव्हती. तिथल्या थंड आणि पावसाळी सर्द हवेमुळे गारठा चांगलाच जाणवत होता. रात्रीच्या जेवणासाठी कोणताही फिक्स मेनू नसल्याने, आम्हांला मेनूकार्ड बघून ऑर्डर द्यायची होती. आम्ही आमच्यासाठी गरम गरम दालखिचडीची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत लोकांचा वेळ जावा म्हणूनच बहुधा तिथे डायनिंग हॉलच्या काचेच्या खिडकीला लागून लव्ह बर्ड्सचा पिंजरा ठेवलेला होता. थोड्या वेळाने आम्ही मागवलेली दालखिचडी आली. गरम खिचडीची चव चांगली होती, फक्त त्या खिचडीत कांदा घातलेला होता. हात धुतांना आमच्या लक्षात आलं, की तिथे बेसिनपाशी भरपूर टिश्यू पेपर ठेवलेले होते, पण ते डायनिंग टेबलवर ठेवण्याची तसदी कोणी घेतली नव्हती. बहुधा लोकांनी तिथून स्वतः टिश्यू पेपर घ्यावेत अशी त्यांची अपेक्षा असावी.
जेवण झाल्यावर मी तिथल्या गार्डनमध्ये थोडावेळ थांबले. ते दगडांनी व्यवस्थित बांधून काढलेलं होतं. गार्डनच्या कडेने आकर्षक फुलझाडांच्या कुंड्या रचलेल्या होत्या. गार्डनमध्ये काही मोठी झाडं होती आणि त्याभोवती ड्युरांटाची झाडं वापरून आकर्षक कडा तयार केल्या होत्या. मध्ये एका ठिकाणी लाॅॅॅन होतं, त्याच्या मध्यभागी एक छत्रमंडप होता, त्याच्या एका बाजूला एक तलाव होता, त्याशिवाय लाकडी ओंडके वापरून तयार केलेले छोटे पूल गार्डनच्या एकूण सौंदर्यात भर घालत होते. बाकी दिव्यांच्या प्रकाशापलिकडचं डोंगरउतारावरचं दृश्य काही अंधारात दिसत नव्हतं. पण तो नजारा देखील बघण्यासारखा असेल, हे जाणवत होतं.
No comments:
Post a Comment