--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Tuesday, February 10, 2015

केरळ ट्रीप - काही अनुभव - भाग ३ - गुरुवायूर ते कालडी ते मुन्नार

भाग १, --- भाग २
पुढे -

     दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी पहिल्या इमारतीतल्या डायनिंग हॉलमध्ये गेलो. आदल्या दिवसाप्रमाणेच सगळा हॉल रिकामा होता. एका बसमधले प्रवासी नुकतेच चेकआऊट करून बाहेर पडले होते. त्यांचा ब्रेकफास्ट झाला होता, की या हॉटेलची स्थिती पाहून त्यांनी दुसरीकडे कुठेतरी ब्रेकफास्ट करण्याचा निर्णय घेतला होता, ते कळलं नाही.

     ब्रेकफास्टसाठी सगळे पदार्थ मांडलेले होते, त्यात कालच्या त्याच टेबलवर ब्रेड, बटर, जाम ठेवलेले होते. कालची स्थिती आठवून आम्ही त्या टेबलकडे फिरकलोही नाही. पुढचं टेबल रिकामं होतं, त्यापुढे इडली, चटणी, सांबार, छोटे डोसे, छोले, पुऱ्या, कॉर्नफ्लेक्स, दूध, साखर, चहा, कॉफी हे सगळं मांडून ठेवलेलं होतं. डीश गोळा करणारा वेटर कालच्यासारखाच एका कोपऱ्यात उभा होता, वाढपी वेटर अधूनमधून नावापुरते डोकवून जात होते. त्यावेळी कोणी काही मागितलं, तर तेवढं तत्परतेने आणून देत होते, पण स्वतःहून काही विचारण्याच्या भानगडीत पडत नव्हते. फक्त आदल्या दिवशीचं जेवण आणि ब्रेकफास्ट यांची चव ठीक होती इतकीच काय ती समाधानाची गोष्ट होती.

     ब्रेकफास्टनंतर आम्ही चेकआऊटचे सोपस्कार पार पाडले. आदल्या दिवशी ज्याने आमचं सामान खोलीपर्यंत नेलं होतं, तोच माणूस सामान गाडीत ठेवण्याकरता आला होता. तोच एकटा असा माणूस होता, जो आमच्याशी व्यवस्थित बोलला होता. आमचं सामान गाडीत ठेवलं जात होतं, तोपर्यंत आम्ही रिसेप्शन रूममधल्या सजीव भासणाऱ्या कथकली नर्तकासोबत आमचे फोटो काढले. उंच पितळी समईचेही फोटो काढले. आणि मग गाडीत बसून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात केली.

उंच पितळी समई
  
कथकली नर्तकाचा पुतळा
  
मुन्नारच्या दिशेने प्रवासाला सुरुवात
   
     मुन्नारला जातांना वाटेत आम्ही कालडी इथे शंकराचार्यांचा कीर्तिस्तंभ पाहण्यासाठी थांबलो. कीर्तिस्तंभाची इमारत आठ मजली उंच आहे. सुरूवातीला आठ मजले चढून जायच्या विचारानेच आमच्या पोटात गोळा आला होता, पण काऊंटरवरच्या तिकिट देणाऱ्या बाईने 'छोट्या छोट्या पायऱ्या आहेत,' असं सांगत आम्हांला दिलासा दिला. कीर्तिस्तंभाच्या इमारतीतल्या गोलाकार वळसा घालत जाणाऱ्या त्या पायऱ्या खरोखरच आरामदायक होत्या. प्रत्येक तीन पायऱ्यांनंतर पुढे एक मोठी पसरट पायरी होती आणि त्या प्रत्येक पसरट पायरीपाशी असलेल्या आतल्या बाजूच्या भिंतीवर शंकराचार्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग चित्रित केलेले होते, तिथे त्या प्रसंगांबद्दलची माहितीही लिहिलेली होती. मध्येच एखाद्या पसरट पायरीवर आतल्या बाजूच्या भिंतीत गाभाऱ्याचा दरवाजा उघडलेला होता आणि तिथे ठेवलेली मूर्ती दिसत होती. त्यामुळे तीन पायऱ्या चढून मग भिंतीवर दिसणारं चित्र बघायचं, त्याची माहिती वाचायची असं करत रेंगाळत वर चढल्यामुळे आम्हांला आठ मजले चढून जाण्याचे श्रम जाणवले नाहीत. आम्ही वरती जात असतांना चांगलाच पाऊस सुरू झाला होता, आम्हांला वाटेत असणाऱ्या खिडक्यांमधून पाऊस पडतांना दिसत होता. आम्ही खाली आलो, तेव्हा आमचे चपलाबूट पावसात चांगलेच भिजलेले दिसत होते.

कीर्तिस्तंभ - इमारतीचा तळमजला फोटोत दिसत नाहीये.
  
     तिथून पुढे आम्ही शृंगेरी इथे शंकराचार्यांचा मठ बघण्यासाठी थांबलो. मठ पाहून आम्ही पुढे मुन्नारच्या दिशेने निघालो. गुरूवायूर ते मुन्नार या प्रवासाला किमान पाचसहा तास लागतील असं आम्हांला आमच्या मैत्रिणीने आधीच सांगितलं होतं. शृंगेरीला पाऊस थांबला होता, पण मुन्नारला जातांना वाटेतल्या घाटात धुकं लागेल याची ड्रायव्हरला धास्ती वाटत होती.

     दुपारी दोन अडीचच्या सुमाराला आम्ही वाटेतल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. एका मोठ्या रबर प्लांटेशनच्या शेजारी असणाऱ्या आणि लांबून एखाद्या छोट्याश्या कॉटेजसारख्या दिसणाऱ्या त्या हॉटेलमध्ये शिरल्यावर तिथल्या रंग उडालेल्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या आणि टेबलं पाहिल्यावर तिथलं जेवण कसं असेल याची शंका मनात डोकवून गेली. तिथला मेनू मात्र सुटसुटीत आखलेला होता, ज्यांना पूर्ण थाळी घ्यायची नाही, त्यांच्यासाठी तीन पोळ्या आणि एक भाजी किंवा जिरा राईस आणि एक भाजी किंवा भात आणि एक भाजी असा पर्याय निवडून त्याच्याबरोबर कोशिंबीर, लोणचं, पापड, दही, ताक, सॅलड अशी थाळी घेता येणार होती. ते पाहून आमच्यापैकी काही जणांनी जिरा राईस आणि भाजीची थाळी मागवली, तर काही जणांनी तीन पोळ्या आणि भाजीची थाळी मागवली. या दोन्ही प्रकारच्या थाळ्यांबरोबरच्या पंजाबी पद्धतीच्या भाज्या मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ग्रेव्ही असलेल्या होत्या. मग जास्तीच्या पोळ्या, भाजी आणि भात एकमेकांबरोबर वाटून घेत आम्हांला सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता आला आणि अन्नही वाया गेलं नाही. इथलं जेवण चांगलंच रूचकर होतं, इथला मसाला डोसाही चांगला कुरकुरीत आणि रुचकर होता. जेवण झाल्यावर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे चहा, कॉफी, अननसाचा ज्यूस वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली.

हॉटेलजवळचं रबर प्लांटेशन
 
     थोड्याच वेळात ड्रायव्हरने एसी बंद करून खिडकीच्या काचा उघडून दिल्या. आता हवेत गारवा जाणवत होता. जसंजसं आम्ही पुढे जात होतो, तसं आजूबाजूच्या हिरवाईचंही प्रमाण वाढलेलं दिसत होतं. आम्ही मुन्नार या हिल स्टेशनला जात होतो, हे वातावरणातल्या बदलातून जाणवत होतं, वाटेत घाटरस्ते लागत होते, आम्ही एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जात होतो.

बदललेलं वातावरण - अधिक हिरवाई
 
     वाटेत एका ठिकाणी मसाले विकत घेण्यासाठी 'हिंदुस्तान स्पायसेस'  या मसाल्यांच्या दुकानासमोर ड्रायव्हरने गाडी थांबवली. तिथे 'हिंदुस्तान स्पायसेसच्या' मसाल्यांच्या दुकानापाठीमागे त्यांचं मसाल्याच्या वनस्पतींचं आणि औषधी वनस्पतींचं गार्डन होतं. या गार्डनला व्हिजिट देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शंभर रुपयांचं तिकीट काढावं लागणार होतं. केरळमधल्या इतर ठिकाणी असलेल्या तिकीटदरापेक्षा इथल्या तिकीटाची किंमत मला फारच जास्त वाटली. तिथे येणारा पर्यटकांचा ग्रुप जेवढा मोठा, तेवढा मसाल्यांच्या विक्रीपेक्षा नुसत्या गार्डनच्या तिकीटांच्या विक्रीतून 'हिंदुस्तान स्पायसेसला' मिळणारा नफा जास्त, असं गणित मला सरळसरळ दिसत होतं.

     मी अनेकवेळा कोकणात मसाल्याची झाडं पाहिलेली असल्याने, मला त्या गार्डनमध्ये फार काही नवीन बघायला मिळणार नव्हतं, त्यामुळे मला त्या गार्डनमध्ये जाण्याची उत्सुकता नव्हती. पण आमच्या ग्रुपमधले सगळेच गार्डनमध्ये जाणार होते, म्हणून मग मीही त्यांच्याबरोबर गेले. गार्डन म्हंटल्यावर त्यात आखीवरेखीव पद्धतीने लावलेली शोभेची झाडं, बहरलेली फुलझाडं असं काहीतरी  बघायची सवय झालेल्या बाकीच्यांची ते गार्डन पाहून काहीशी निराशा झाली, कारण त्या गार्डनमधली झाडं खरंतर प्लांटेशनसाठी लावलेली होती आणि आमच्यापैकी बहुतेकांनी त्यातल्या बऱ्याचशा मसाल्यांची झाडं आधी कोकणात पाहिलेली होती.

      ते गार्डन (खरंतर प्लांटेशन) दाखवण्यासाठी दुकानात माहितगार विक्रेते ठेवलेले होते. ते विक्रेते गार्डन दाखवत तिथल्या झाडांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देत होते, आणि त्या झाडांचे कोणते भाग कोणत्या आजारांवरच्या औषधांसाठी वापरले जातात याची जास्तीची माहितीही देत होते. (ग्राहकांनी दुकानात येऊन मसाल्यांव्यतिरिक्त तिथली इतर हर्बल प्रॉडक्ट्स  विकत घ्यावी यासाठीची ही मार्केटींग स्ट्रॅटेजी होती.) त्या गार्डनमध्ये आम्हांला व्हॅनिला, ओवा, नागवेल - विड्याच्या पानांचा वेल, मिरे, जायफळ, तमालपत्र, लवंग, वेलची, स्टार अॅनिस, हळद, आंबेहळद, कोकोची दोन प्रकारची झाडं, अडुळसा, नीरब्राम्ही, आकाराने लहान पण चवीला अतिशय तिखट असणाऱ्या मिरचीचं झाड, अंजीर इत्यादी झाडं दाखवली गेली, त्यापैकी कोको आणि वेलचीची झाडं सोडली, तर बाकीची बहुतेक झाडं मी आधी पाहिलेली होती. त्या गार्डनचं स्वरूप बघता तिथल्या झाडांपासून मिळणारे मसाले वगैरे तिथल्या दुकानात विकले जात असावेत, असं वाटत होतं.

व्हॅनिलाचा वेल
  
स्टार अॅनिस
 
नीरब्राम्ही
  
अंजीराचं झाड
  
कोकोचं फळ - प्रकार १
  
मिऱ्याचा वेल
  
कोकोचं फळ - प्रकार २
  
जायफळ
  
वेलचीची फळं
  
छोटुकली मिरची पण चवीला अती तिखट!
    
     मच्या सोबत असलेल्या विक्रेतीने दुकानात गेल्यानंतर आम्हांला मसाल्यांबरोबरच इतर हर्बल प्रॉडक्ट्स दाखवायला सुरूवात केली. त्यापैकी चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या घालवण्यासाठी असलेल्या एका हर्बल प्रॉडक्टची बाटली इतकी मोठी होती, की ते हर्बल प्रॉडक्ट नियमित वापरलं असतं, तरी ते किमान तीन ते पाच वर्षं तरी पुरलं असतं. अर्थात या क्षेत्राची मला माहिती असल्यामुळे, हे मला लगेच जाणवलं. ज्यांना याची माहिती नसते, असे लोक विक्रेत्यांच्या दाव्यांना भुलून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असलेली, अव्वाच्या सव्वा किंमतीची प्रॉडक्ट्स सहज विकत घेतात.

     आम्ही त्या विक्रेतीला फक्त मसालेच दाखवायला सांगितले. मसाल्यांचं त्यांच्या आकारमानानुसार व्यवस्थित ग्रेडेशन केलेलं दिसत होतं आणि त्याप्रमाणे त्यांची किंमत आकारलेली होती. मसाल्यांच्या गिफ्ट पॅकेटमध्ये काही मोठ्या आकाराच्या मसाल्यांसोबत लहान आकाराचे मसाले मिसळलेले होते. त्या दुकानात सगळीकडे मसाल्यांचा वास घमघमत होता. आम्ही आम्हांला हवे असलेले मसाले घेतले. (घरी आल्यानंतर ती पाकीटं उघडून पाहिल्यावर जाणवलं, की त्या लोकांनी सांगितल्यानुसार त्या मसाल्यांमधलं तेल काढून घेतलेलं नव्हतं. लवंग नुसती हातात घेतली, तरी त्या लवंगेतल्या तेलाचा ओलावा हाताला जाणवत होता.) त्याशिवाय तिथे मी लेमन ग्रास आॅईल विकत घेतलं, ते इन्सेक्ट रिपेलंट म्हणून वापरतात. (तेही अतिशय परिणामकारक निघालं. पाण्याच्या बादलीत काही थेंब तेल टाकून त्या पाण्याने जमीन पुसली, की मुंग्या, डास इत्यादी कीटक काही काळ तरी तिथे येत नाहीत. पण हे तेल पाण्यात चुकून थोडं जास्त पडलं, तर त्याच्या वासाने डोकं दुखायला लागतं, एखाद्याला अस्वस्थही वाटू शकतं, अशा वेळी खोलीतला पंखा चालू करून खोलीची दारं खिडक्या उघडून द्यावीत किंवा त्या खोलीबाहेर मोकळ्या हवेत जावं.) ह्याशिवाय त्या दुकानात काजू, चहा, होममेड चाॅकलेट्स, साबण, नारळाचं खाद्यतेल इत्यादी गोष्टीही विक्रीला ठेवलेल्या होत्या.

     केरळमध्ये मसाले, काजू इत्यादी पदार्थांची खरेदी करतांना ते पदार्थ शासकीय परवाना मिळवलेल्या दुकानांमधूनच खरेदी करावेत. काही ठिकाणी मसाले, काजू इत्यादी पदार्थ रस्त्यावर विकले जातात, किंवा छोट्या टपऱ्यांमधून विकले जातात, त्यांची किंमत स्वस्त वाटली, तरी अशा खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता असते.   

     दुकानातून खरेदी करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. वाटेत एक धबधबा लागला. तिथे बऱ्याच लोकांची गर्दी होती. आम्हांला तिथे थांबून फक्त त्या धबधब्याचा फोटो काढायचा होता. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, "येतांना आपण याच रस्त्याने येऊ, तेव्हा तुम्ही फोटो काढा," असं सांगत त्याने गाडी पुढे काढली. मुन्नारचा प्रवास लांबचा आहे, त्याला वेळ लागणार आहे, याची आम्हांला जाणीव होती, त्यामुळे फक्त फोटो काढून आम्ही लगेच गाडीत बसणार होतो, त्याला पाचसात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नसता, पण ड्रायव्हरने आम्हांला तेवढंही थांबू दिलं नाही. त्या प्रवासात अधूनमधून पावसाचे हलके थेंब पडत होते, पण ड्रायव्हरने शक्यता वर्तवल्याप्रमाणे धुकं काही लागलं नव्हतं. मग ड्रायव्हर असं का वागला असावा? कदाचित त्यांच्या कंपनीचा नियम असावा की शक्यतो दिवसाच सगळा प्रवास करायचा, रात्रीचा प्रवास टाळायचा, पण हा फक्त माझा अंदाज होता.

     धबधब्यापासून आम्ही पुढे निघालो, तेव्हा हळूहळू अंधारायला लागलं होतं. मी बुकींग केलेलं हॉटेल हे मुन्नारजवळच्या पळ्ळीवासल नावाच्या गावात होतं. आम्ही त्या गावापर्यंत जाईपर्यंत पूर्ण अंधारलं होतं. अंधारातच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सांगितलं, की हॉटेलला जाण्याचा रस्ता छोटा असल्याने, त्याची गाडी आता इथेच थांबेल, त्यापुढे आम्हांला हॉटेलपर्यंत न्यायला हॉटेलची गाडी येईल. त्यासाठी मला हॉटेलच्या फोननंबरवर फोन लावावा लागणार होता. मी फोन लावला आणि ड्रायव्हरकडे दिला. ड्रायव्हरने त्या माणसाला आमची गाडी नेमकी कुठे उभी आहे, ते सांगितलं. ड्रायव्हरला त्याच्या नियमित प्रवासामुळे ह्या हॉटेलच्या रस्त्याची माहिती होती, म्हणून ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या ड्रायव्हरसोबत आम्ही त्या रस्त्याने गेलो असतो, तर आमची पंचाईत झाली असती.

     हॉटेलच्या गाडीची वाट बघत आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि झोंबऱ्या गार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो, तो रस्ता डोंगरातून जात होता. त्या रस्त्याच्या खालच्या बाजूने असणाऱ्या डोंगरउतारावर 'ग्लेनमोअर' हॉटेल वसलेलं होतं. वेबसाईटवर दाखवलेली हॉटेलची पार्किंगची जागा म्हणजे आम्ही उभे असलेल्या रस्त्याच्या कडेची हॉटेलला पार्किंगसाठी दिलेली जागा होती. तिथे वरच्या बाजूच्या डोंगरावरून लग्नसमारंभानिमित्त लाऊडस्पीकरवर लावलेल्या गाण्याचे दणदणाटी सूर ऐकू येत होते. गाणं एवढं जोरात चालू होतं, की आम्ही  एकमेकांशी काय बोलत होतो, ते आम्हांला नीट ऐकू येत नव्हतं. अशा स्थितीत ड्रायव्हरला तिथेच गाडीमध्ये रात्र काढावी लागणार होती आणि सकाळी त्या उतारावरून उतरून हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी यावं लागणार होतं. ड्रायव्हरची इतकी गैरसोय होईल याची कल्पना असती, तर हे हॉटेल मी निवडलंच नसतं.

     हॉटेलची गाडी येईपर्यंत ड्रायव्हरने आम्हांला विचारलं, की आम्ही उभे होतो, तिथून थोडं वरती असलेल्या जागी पर्यटकांसाठी कथकली नृत्य आणि मार्शल आर्टचं कौशल्य दाखवणारा शो असतो, तो शो बघायचा आहे का?

     मी म्हणाले, की "आम्ही आधी हॉटेलवर जातो आणि मग शो बघायला जायचं, की नाही ते ठरवतो." तोपर्यंत हॉटेलची जीप आली होती. त्या लोकांनी आमचं सामान जीपमध्ये भरलं आणि आम्ही जीपमध्ये बसलो. आमच्या पुढे थोड्या अंतरावर असलेल्या इतर लोकांना, "मी ह्यांना हॉटेलवर सोडून, मग तुम्हांला न्यायला वरती येतो." असं सांगत ड्रायव्हरने जीप चालू केली.

     आमची जीप मुख्य रस्त्याला फुटणाऱ्या एका छोट्या फाट्यावरून खालच्या उताराकडे निघाली. पुढे तो उतार इतका तीव्र होता, की जीपच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यावर पडतच नव्हता. रस्त्यापेक्षा थोड्या वरच्या पातळीवर प्रकाशाचा झोत पडत असल्याने, रस्त्याच्या जागी अंधार दिसून पुढे रस्ता संपला आहे असं वाटत होतं आणि ड्रायव्हर गाडी नेमकी कुठे नेतोय या विचाराने धडकी भरत होती. रस्त्यात लागणारं प्रत्येक वळण नवीन तीव्र उतारासहीत सामोरं येत होतं आणि आम्ही श्वास रोखत ड्रायव्हर नीट गाडी चालवतोय ना, याचा विचार करत होतो. ड्रायव्हर मात्र नेहमीच्या सराईतपणे गाडी चालवत होता. त्या डोंगरउतारावर लोकांची घरं वसलेली होती. मध्येच बाजूला एखादं घर दिसलं, की आम्हांला हॉटेलपर्यंत पोहोचल्यासारखं वाटायचं, पण गाडी पुढे निघाली की, हॉटेल अजून यायचं आहे, हे जाणवायचं.

     अखेर एकदाचा तो अंधारातला धडकी भरवणारा प्रवास संपवत जीप हॉटेलपाशी पोहोचली. हॉटेलच्या दिव्यांच्या प्रकाशात तिथलं लॅॅंडस्केप गार्डन फारच सुंदर बनवलेलं दिसत होतं. समोरच असलेल्या डायनिंग हॉलच्या काचेच्या दरवाजातून तिथे जेवायला बसलेली माणसं आणि त्यांच्या आसपास खेळणारी लहान मुलं दिसत होती. डायनिंग हॉलच्या शेजारीच रिसेप्शन रूम होती. तिथे जाऊन चेक इन करून आम्ही आमच्या खोल्यांकडे निघालो.

     कॉटेज सारख्या दिसणाऱ्या हॉटेलच्या खोल्या एकमेकींना लागून ओळीने बांधलेल्या होत्या आणि ती ओळ पुढे आतल्या दिशेने वळली होती. प्रत्येक खोलीपुढे एका लहानसा व्हरांडा होता आणि त्यात बसण्यासाठी बांबूच्या दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या. व्हरांड्यापुढे पायरी नसल्याने व्हरांडा चढतांना एखादी उंच पायरी चढल्यासारखं वाटत होतं. व्हरांड्याच्या बाजूच्या खोलीच्या दर्शनी भिंतीला फ्रेंच विंडो पद्धतीची काचेची मोठी खिडकी आणि काचेचाच दरवाजा होता.  खिडकी आणि दरवाजाच्या काचेला मध्येमध्ये लाकडी फ्रेमचा आधार दिलेला होता. तरीही अगदी जमिनीलगत असलेल्या त्या खोलीला अशी काचेची खिडकी आणि काचेचाच दरवाजा असणं, हे मला फारसं प्रशस्त वाटलं नाही. पण त्यावेळी हॉटेलमध्ये वर्दळ असल्याने ते तसं असुरक्षितही वाटत नव्हतं. काचेमुळे आणि काचेपाठीमागे लावलेल्या पडद्यांमुळे खोलीच्या बाह्य सौंदर्यात मात्र  भर पडली होती.

     त्या हॉटेलमध्ये 'प्लांटेशन व्ह्यू' आणि 'व्हॅली व्ह्यू' या दोन प्रकारच्या खोल्या होत्या आणि आमच्या ग्रुपचं त्या दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये बुकींग केलेलं होतं. व्हॅली व्ह्यूवाल्या खोलीचं भाडं तुलनेनं जास्त होतं. पण मला त्या दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये बसवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्सव्यतिरिक्त इतर कोणताही फरक दिसून आला नाही. दोन्ही प्रकारच्या खोल्यांमध्ये सारख्याच सुविधा होत्या. आमच्या खोलीत जातांना मला व्हरांड्याच्या दगडांमधल्या फटीत सावकाश शिरत असलेली एक फुगलेली जळू दिसली. ते पाहून इथे जरा जपून वावरावं लागेल याची मी मनाशी खूणगाठ बांधली.

     तिथल्या खोल्या प्रशस्त होत्या, स्वच्छ दिसत होत्या. खोलीतल्या बेडवर स्वच्छ चादरी घातलेल्या दिसत होत्या, मात्र तिथल्या गाद्या आणि उशांना ऊन देण्याची आवश्यकता होती. खोलीत इतर फर्निचरव्यतिरिक्त टीव्ही आणि फोनची सोय होती. खोलीत पंख्याची आवश्यकता वाटत नव्हती, पण पंखा लावलेला होता. एसी अर्थातच नव्हता. फ्रीजही नव्हता. तिथे हॉटेलच्या आसपास असलेल्या झाडांमुळे आमच्या प्रत्येकाच्या खोलीत पतंगांचा आणि पाकोळ्यांचा मुक्त संचार चाललेला दिसत होता. खोलीतलं टाॅयलेट तुलनेने लहान होतं, तिथली फरशी जरा घसरडी वाटत होती. आमच्या कोणाच्याच  टाॅयलेटमधल्या कमोड शेजारी टिश्यू पेपरचा रोल ठेवण्याची दक्षता घेतलेली नव्हती. चांगली गोष्ट इतकीच होती, की तिथल्या थंड वातावरणात टाॅयलेटमध्ये चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं. त्याशिवाय तिथे टाॅवेल, साबण आणि शांपू ठेवलेले होते. एका खोलीतल्या टाॅयलेटच्या छतातून पाणी गळत होतं. एका खोलीतल्या टाॅयलेटमधल्या आरशापाठीमागून एक मोठा बीटल कीडा हळूच डोकावून त्याचं अस्तित्व दाखवून देत होता.

     सगळ्या खोल्या पाहून आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये स्थिरस्थावर झालो. आमच्या खोलीत बेडजवळ असलेल्या दोन नाइटलॅॅम्पपैकी एक नाईटलॅॅम्प लागत नव्हता. पण त्या दिव्याची तशी आवश्यकता भासत नसल्याने आम्ही रिसेप्शनवर त्याबाबतीत काही कळवलं नाही, सगळ्यांच्या टाॅयलेटमध्ये ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचे रोल मात्र मागून घेतले.

     जीपमधून हॉटेलमध्ये येतांना आलेल्या त्या रस्त्याच्या धडकी भरवणाऱ्या अनुभवामुळे आता परत वरती जाऊन तिथला नृत्याचा आणि मार्शल आर्टचा शो बघायला जायची कोणाचीच तयारी नव्हती. तिथल्या थंड आणि पावसाळी सर्द हवेमुळे गारठा चांगलाच जाणवत होता. रात्रीच्या जेवणासाठी कोणताही फिक्स मेनू नसल्याने, आम्हांला मेनूकार्ड बघून ऑर्डर द्यायची होती. आम्ही आमच्यासाठी गरम गरम दालखिचडीची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत लोकांचा वेळ जावा म्हणूनच बहुधा तिथे डायनिंग हॉलच्या काचेच्या खिडकीला लागून लव्ह बर्ड्सचा पिंजरा ठेवलेला होता. थोड्या वेळाने आम्ही मागवलेली दालखिचडी आली. गरम खिचडीची चव चांगली होती, फक्त त्या खिचडीत कांदा घातलेला होता. हात धुतांना आमच्या लक्षात आलं, की तिथे बेसिनपाशी भरपूर टिश्यू पेपर ठेवलेले होते, पण ते डायनिंग टेबलवर ठेवण्याची तसदी कोणी घेतली नव्हती. बहुधा लोकांनी तिथून स्वतः टिश्यू पेपर घ्यावेत अशी त्यांची अपेक्षा असावी.

     जेवण झाल्यावर मी तिथल्या गार्डनमध्ये थोडावेळ थांबले. ते दगडांनी व्यवस्थित बांधून काढलेलं होतं. गार्डनच्या कडेने आकर्षक फुलझाडांच्या कुंड्या रचलेल्या होत्या. गार्डनमध्ये काही मोठी झाडं होती आणि त्याभोवती ड्युरांटाची झाडं वापरून आकर्षक कडा तयार केल्या होत्या. मध्ये एका ठिकाणी लाॅॅॅन होतं, त्याच्या मध्यभागी एक छत्रमंडप होता, त्याच्या एका बाजूला एक तलाव होता, त्याशिवाय लाकडी ओंडके वापरून तयार केलेले छोटे पूल गार्डनच्या एकूण सौंदर्यात भर घालत होते. बाकी दिव्यांच्या प्रकाशापलिकडचं डोंगरउतारावरचं दृश्य काही अंधारात दिसत नव्हतं. पण तो नजारा देखील बघण्यासारखा असेल, हे जाणवत होतं.

Friday, February 6, 2015

केरळ ट्रीप - काही अनुभव - भाग २ - कोचीन ते गुरुवायूर

भाग १
पुढे - 

     रात्री उशिरा आम्हांला विजांच्या कडकडाटासारखा आणि ढगांच्या गडगडाटासारखा आवाज ऐकू आला, कोचीनमध्ये तेव्हा हलकासा पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलतर्फे आमच्या खोलीच्या दाराच्या फटीतून पेपर आत सरकवलेला दिसला. एकीकडे पेपरवर नजर टाकत आम्ही आवरायला लागलो.

     सकाळी हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून आम्हांला पुढे निघायचं होतं. ब्रेकफास्टसाठी इथल्या टेबल्सवर भरपूर पदार्थ मांडलेले होते. इडल्या, जाड छोटे डोसे, चटणी, उपमा, छोटी केळं, अननसाचे काप, काळी द्राक्षं, मोठ्या केळ्याचे वाफवलेले तुकडे, ब्रेड, बटर, जाम, कॉर्नफ्लेक्स, दूध, साखर, मध, चहा, कॉफी, अननसाचा ज्यूस असं सगळं मांडून ठेवलेलं होतं. आम्ही ब्रेकफास्ट आटोपला आणि चेक आऊट करून पुढच्या गुरुवायूरच्या प्रवासाला सुरूवात केली.

     गुरुवायूरला जात असतांना आम्हांला वाटेत अनेक चर्च उभारलेली दिसली, केरळमध्ये ख्रिश्चन लोक बहुसंख्य असल्याने चर्चची संख्याही तुलनेने जास्त होती. शिवाय रस्त्याच्या कडेने बांधलेले देखणे बंगले दिसत होते. प्रत्येक बंगल्याची वास्तू वेगळ्या पद्धतीने सजवलेली दिसत होती आणि प्रत्येक बंगल्याभोवती बाग दिसत होती. बागेत सुपारीची, नारळाची झाडं दिसत होती, त्यावर मिऱ्याचे वेल चढवलेले दिसत होते. वाटेतल्या बाजारांमध्ये फळांची भरपूर दुकानं दिसत होती आणि त्या दुकानांमध्ये डाळींब, संत्री, अननस, केळी, पपई, रामफळ, सफरचंद, कैऱ्या अशी विविध फळं दिसत होती.   

     दुपारी एकच्या सुमारास आम्ही पुन्नातूर कोटा इथल्या हत्ती प्रशिक्षण केंद्रापाशी आलो. गुरुवायूर मंदिरात अर्पण केलेले हत्ती इथे ठेवलेले असतात. आमची गाडी ज्या मैदानात पार्क केली होती, तिथेच एका हत्तीला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालला होता. तो हत्ती त्या मैदानात आडवा झाला होता, दोनतीन माणसं त्याला आंघोळ घालत होती, एकजण नळीने त्याच्या अंगावर पाणी सोडत होता आणि बाकीचे ब्रशने त्या हत्तीचं शरीर चोळत होते. ते दृश्य पाहत मैदान ओलांडून आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथलं प्रवेशशुल्क आणि कॅमेऱ्याने फोटो काढण्याचं शुल्क भरून आम्ही तिकीटं काढली आणि त्या केंद्रात शिरलो.

     आत गेल्यानंतर अगदी समोर बांधलेला जो पहिलाच हत्ती दिसला, त्याच्या इथे अशा अर्थाची पाटी लावलेली होती, की 'हा हत्ती मस्त झालेला आहे. तो केव्हाही हिंसक होऊ शकतो, तरी त्याच्या समोर फार वेळ उभं राहू नये किंवा त्याच्या समोर उभं राहून त्याला कोणत्याही प्रकारे डिवचू नये.' ती पाटी पाहिल्यावर मी काहीसं बिचकतच एका बाजूला जाऊन कडेने त्याचा फोटो काढला. मी पहिल्यांदाच असा मस्त झालेला हत्ती बघत होते. तो हत्ती मात्र इतर मस्त न झालेल्या हत्तींच्या तुलनेत शांत उभा होता.

मस्त झालेला हत्ती
 
     तिथून पुढे इतर काही हत्ती आणि हत्तीणींना बांधून ठेवलेलं होतं. त्यातले काही हत्ती वयस्कर होते, काही मध्यमवयाचे होते, तर काही हत्तीची पिल्लं नुकतीच वयात आलेली दिसत होती. बहुतेक हत्तींपुढे खाण्यासाठी झाडपाला टाकलेला दिसत होता. काही हत्ती शांतपणे तो झाडपाला खात होते, काही हत्ती नुसतेच स्वतःच्या शरीरावर धूळ उडवत धूलिस्नान करत होते. एक हत्तीण तिच्या माहूतावर सोंडेने धूळ उडवत होती आणि तो माहूत तिला तसं न करण्याबाबत दटावत होता.

शांतपणे झाडपाला खाणारा हत्ती
  
निवांतपणे झाडपाला खात स्वतःतच मग्न असणारी हत्तीण
   
धूलिस्नान
  
पूर्ण वाढ होत आलेला हत्ती - ह्याचा उंच पायांचा आणि लांब दातांचा दिमाख बघण्यासारखाच!
 
     एक कुत्रा तिथून जात असतांना शाॅर्टकट घेत एका हत्तीच्या अगदी जवळून गेल्याने आपल्या क्षेत्रात घुसखोरी झाल्याच्या भावनेने तो हत्ती संतापला. त्याने सोंडेने त्या कुत्र्यावर धूळ उडवत, पाय आपटत, जोरात आवाज काढत स्वतःचा संताप व्यक्त केला. पण हत्तीच्या संतापाला न जुमानता, आपल्याला काही अपाय होणार नाही, याची काळजी घेत त्या कुत्र्याने पुन्हा एकदा तिथूनच शाॅर्टकट घेतला आणि हत्तीचा संताप पुन्हा व्यक्त झाला. त्या हत्तीच्या पुढच्या भागात काही मस्त झालेले हत्ती उभे होते, ते मात्र शांतपणे उभे होते. काही एकर जागा असलेल्या त्या परिसरात त्यावेळी चाळीस-पन्नास हत्ती ठिकठिकाणी उभे असलेले दिसत होते. बहुतेक हत्तींच्या आसपास मोठी झाडं होती. त्या झाडांवरून काही खारी आणि काही बगळे खाली येऊन त्यांचं अन्न शोधत होते.

हत्तीच हत्ती चहूकडे - सगळे हत्ती एका फोटोत मावणं अशक्यच!
 
     तिथून अजून थोडं पुढे गेल्यावर एक काळ्या कुळकुळीत रंगाचा वयात येत असलेला हत्ती दिसला. त्याचा माहूत त्याला प्रशिक्षण देत होता. माहूत हत्तीला आज्ञा देत होता आणि त्याप्रमाणे तो हत्ती पाय पुढे करून दाखवणे आणि मग तो मागे घेणे, सोंडेने नमस्कार करत दिलेली वस्तू घेणे इत्यादी कसरती करून दाखवत होता. थोड्या वेळाने माहूताने आज्ञा देणं थांबवलं आणि तो इतर कामात गुंतला, मग तो जिज्ञासू हत्ती स्वतःहून त्या सगळ्या कसरती करून बघायला लागला.

माहूताच्या आज्ञेप्रमाणे कसरती करणारा हत्ती
  
माहूत निघून गेल्यावर स्वतःहून कसरती करून बघणारा जिज्ञासू हत्ती
   
     तिथून थोड्या अंतरावर एका लाकडी पिंजऱ्यात एकमेकांकडे पाठ केलेल्या स्थितीत दोन हत्ती ठेवलेले होते. ते बहुधा परराज्यातून पकडून आणून मंदिराला अर्पण केले होते. त्यांचा तिथल्या भाषेशी नीट परिचय होऊन त्यांना त्या भाषेतल्या आज्ञा नीट समजेपर्यंत त्यांना तिथेच ठेवलं जाणार होतं, असं आमच्या ड्रायव्हरने नंतर आम्हांला सांगितलं. तिथून दुसऱ्या रस्त्याने परत येतांना अजून काही हत्ती दिसले, त्यातल्या काही हत्तींच्या मानेला टेकवून काठ्या उभ्या केलेल्या दिसत होत्या, त्याचं कारण कळलं नाही.

लाकडी पिंजऱ्यात ठेवलेले हत्ती
 
या हत्तीणीच्या मानेला काठी टेकवून का बरं उभी केली असावी?
  
     हे हत्ती बघतांना आमचा तासाभराचा वेळ तरी सहज निघून गेला होता. तिथून बाहेर पडून आम्ही गुरुवायूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं. पुढे काही किलोमीटर अंतरावर गुरुवायूरचं मंदिर होतं आणि मंदिराच्या जवळच्या परिसरातच आमचं बुकींग केलेलं हॉटेल होतं. अर्ध्यापाऊण तासातच आम्ही 'सोपानम हेरिटेज' नावाच्या त्या  हॉटेलच्या भव्य इमारतीपाशी पोहोचलो. तिथल्या स्वागतकक्षात एक सहा फुटांपेक्षाही जास्त उंच असलेली पितळेची भव्य समई ठेवलेली होती. समईपासून थोड्या अंतरावर कथकली नृत्य करणाऱ्या एका नर्तकाचा पुतळा उभा होता. त्या पुतळ्याला पाहून तिथे खरोखरच एखादा माणूस उभा असल्याचा भास होत होता.

     तिथल्या स्वागतिकेकडे आवश्यक ते कागदपत्र सोपवून आम्ही तिने दिलेले फॉर्म भरून दिले आणि तिला दुपारच्या जेवणाची सोय होईल का ते विचारलं. पण आम्ही अस्तित्वातच नसल्यासारख्या अविर्भावात, ती आम्ही दिलेल्या माहितीची संगणकावर नोंद करत, आमचं सामान नेणाऱ्या माणसाशी मल्याळी भाषेत बोलत राहिली. नंतर दोनतीनदा इंग्लीशमध्ये विचारूनही तिने आमच्याकडे लक्षच दिलं नाही. मग शेवटी सामान नेणाऱ्या माणसाला आमची दया येऊन, त्याने डायनिंग हॉलच्या दिशेने बोट दाखवत आम्हांला तिथे चौकशी करायला लागेल, असं सांगितलं आणि आम्ही त्याच्यापाठोपाठ आमच्या खोल्यांकडे निघालो.

     तो माणूस त्या इमारतीतून बाहेर पडून आम्हांला समोरच्या इमारतीकडे घेऊन गेला. तिथल्या लिफ्टपाशी गेलो, तर तिथे लिफ्टसमोरच काहीतरी सुतारकाम चालू असलेलं दिसत होतं. सुतारकाम करणाऱ्या माणसाने ती लिफ्ट बंद आहे, असं सांगितलं म्हणून आम्ही पहिल्या इमारतीत परत आलो आणि तिथल्या लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेलो. चौथ्या मजल्यावर दोन्ही इमारतींना जोडणारा पूल होता, त्या पुलावरून समोरच्या इमारतीतल्या हॉलमध्ये प्रवेश करून आम्ही तिथल्या जिन्यापाशी आलो आणि तो जिना उतरून खाली तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या खोल्यांमध्ये आलो.

     खोलीत शिरताच सगळ्यात पहिल्यांदा जाणवला तो ओल आल्यामुळे येणारा कुबट वास. खोली स्वच्छ झाडलेली होती, पण जिथे पडदे लावलेले होते, तिथल्या भिंतीवर ओल आल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. ओलाव्यामुळे तिथे एका बाजूचं प्लॅस्टर निखळून खाली पडल्याच्या खुणा दिसत होत्या. खालच्या सोफ्यावर प्लॅस्टर पडल्याच्या खुणा आणि काहीतरी सांडल्याचे डाग पडलेले स्पष्ट दिसत होते. सोफ्याचं कव्हर आणि त्याच रंगाचं बेडवर टाकलेलं कव्हर या दोघांचे रंग अगदीच जुनाट झालेले आणि मळखाऊ दिसत होते. बेडकव्हरच्या खाली असलेल्या चादरी मात्र स्वच्छ दिसत होत्या.

     खोलीतल्या एका भिंतीला सतत ओल येऊन त्याचं पाणी पडद्यांमध्ये मुरलं होतं आणि सतत खोलीतला एसी चालू ठेवल्याने कोंदट हवा तयार होऊन त्या पडद्यांना कुबट वास येत होता. पडद्यांच्या पाठीमागे गॅलरीत उघडणारी एक खिडकी आणि गॅलरीचा दरवाजा होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोली झाडतांना तो दरवाजा किंवा खिडकी उघडण्याची तसदी न घेतल्याने, तिथे कोंदट हवा तशीच राहून कुबट वास येत होता. आम्ही पडदे बाजूला सारून खिडकी आणि दरवाजा दोन्ही उघडून दिले आणि खोलीतला पंखा लावला. गॅलरी झाडलेली नव्हती, कोणीतरी टाकलेलं सिगरेटचं थोटूक तिथे तसंच पडलेलं होतं. पण गॅलरीतून बऱ्यापैकी हवा येत होती, त्यामुळे खोलीत मोकळी हवा खेळायला लागली आणि थोड्या वेळाने पडद्यांचा कुबट वास नाहीसा झाला. पण नेमका आमच्या गॅलरीच्या खालच्या बाजूला हॉटेलमधला कचरा जाळला जात होता, त्याच्या धुरामुळे तासाभराने आम्हांला दरवाजा आणि खिडकी बंद करून घ्यावी लागली.

     आमच्या सगळ्यांच्याच खोल्यांमध्ये पडद्यांना असाच कुबट वास येत होता आणि सगळीकडे असेच खिडक्या दरवाजे उघडून द्यावे लागले होते. बाकी खोलीत फर्निचरव्यतिरिक्त एसी, टीव्ही, फोन आणि चहाकॉफीच्या साहित्यासह इलेक्ट्रीक किटली ठेवलेली होती. टाॅयलेटमध्ये चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल्स, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं.

     आम्ही दुपारी अडीचच्या नंतर हॉटेलमध्ये आलो होतो. सकाळी ब्रेकफास्ट करतांना तिथे असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव बघण्याच्या नादात आमचा सगळ्यांचा हेवी ब्रेकफास्ट करून झाला होता, त्यामुळे बहुतेकांनी दुपारचं जेवण न घेता त्याऐवजी सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरच्या दुपारच्या जेवणाची सोय करून, मग आम्ही निवांतपणे एका खोलीत बसलो. टीव्ही लावल्यावर मात्र आमचा अपेक्षाभंग झाला. टीव्हीवर बहुतेक सगळे दाक्षिणात्य चॅनेल्सच दिसत होते, अगदीच नियम आहे म्हणून एकदोन हिंदी चॅनेल्स आणि इतर काही भारतीय भाषांचे प्रत्येकी एकदोन चॅनेल्स दिसत होते. मराठी चॅनेल एकही नव्हता. हिंदी चॅनेल्सवर बातम्या लागल्याने थोडावेळ बातम्या पाहून आम्ही टीव्ही बंद केला.

     गुरुवायूर मंदिरात दुपारी चारसाडेचार वाजता गेलात, तर व्यवस्थित दर्शन होईल असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. पण त्या दिवशी इतर काहीच बघायचं नसल्याने, आम्ही जरा उशीरा मंदिरात जायचा निर्णय घेतला. साडेचारनंतर सगळेजण तयार व्हायला लागले. तोपर्यंत खोलीतल्या इलेक्ट्रीक किटलीचा वापर करून आम्ही चहा केला आणि चहा घेऊन मग आम्ही दर्शनासाठी निघालो.

     आम्ही निघेपर्यंत पावणेसहा झाले होते, अंधार पडायला सुरूवात झाली होती. लिफ्टने जाण्यासाठी आम्ही सगळेजण चौथ्या मजल्यावर गेलो. चौथ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये एकही दिवा न लावल्याने अंधार पडलेला होता. त्या अंधारातच तिथे वाटेत असणारी टेबलं चुकवत आम्ही पुलावरून पलिकडच्या इमारतीत गेलो आणि लिफ्टची प्रतिक्षा करू लागलो. लिफ्ट आली. लिफ्टची क्षमता सहा माणसांना नेण्याएवढी होती. त्यामुळे साधारणपणे सहा माणसांना लिफ्टमध्ये शिरण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ लिफ्टचे दरवाजे उघडे रहावेत अशी आमची अपेक्षा होती. आम्ही एकेकजण लिफ्टमध्ये शिरत असतांनाच अचानक लिफ्टचे दरवाजे बंद व्हायला लागले. लिफ्टमध्ये येणारी व्यक्ती वेळीच मागे सरकल्याने ती दरवाजात चेंगरली गेली नाही. लिफ्टचे दरवाजेही हलके आणि पुढे रबर लावलेले होते, म्हणून ठीक, नाहीतर एखादी दुर्घटना सहज घडली असती. लिफ्ट खाली आल्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडतांनाही तोच प्रकार झाला.

     तिथून थोडं पुढे आल्यावर आम्हांला आमचं सामान खोलीत नेणारा माणूस भेटला, त्याने सांगितलं, की दुसऱ्या इमारतीतली लिफ्ट आता चालू झाली आहे. वास्तविक रिसेप्शनवरून फोन करून आम्हांला ही सूचना देणं सहज शक्य होतं. पण तिथल्या स्वागतिकेने तेवढे कष्ट घेतले नव्हते. या माणसाने आम्हांला हे सांगितलं नसतं, तर आम्ही पहिल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जायचा द्राविडी प्राणायाम करत राहिलो असतो.

     तिथून गुरुवायूर मंदिर अगदी जवळ असल्याने आम्ही मंदिराकडे पायी चालत निघालो. मंदिराजवळ असलेल्या दुकानांमधल्या वस्तू पाहून, परत येतांना त्यातल्या काही वस्तू खरेदी करायच्या असं मी ठरवलं होतं. मंदिराजवळ गेल्यावर तिथे दर्शनासाठी असलेल्या पाचसहा रांगा दिसल्या. त्यात स्त्रियांसाठी एक वेगळी रांग होती. मंदिरात पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या स्त्रियांना प्रवेश होता. पुरुषांसाठी मात्र धोतर किंवा लुंगी नेसून मंदिरात जाणं अनिवार्य होतं. रांगेतल्या लहान मुलांनाही छोट्या लुंग्या नेसवलेल्या दिसत होत्या.

     वेगवेगळ्या रांगेत उभं राहिलं, तर आमच्यापैकी काहींना तरी लवकर दर्शन घ्यायची संधी मिळेल, असं वाटल्याने आम्ही वेगवेगळ्या रांगांमध्ये दर्शनासाठी उभे राहिलो होतो, पण एकाचीही रांग पुढे सरकेना. केरळमध्ये देवाच्या झोपण्याच्या, जेवण्याच्या इत्यादी वेळांना मंदिर बंद ठेवतात आणि त्यातल्या मधल्या वेळात लोकांना दर्शन घ्यायची संधी मिळते. अशाप्रकारे दिवसातून चारपाच वेळा तरी मंदिर बंद असतं.

     आमच्यादेखत काही रांगांमधल्या लोकांना मंदिरात सोडलं गेलं आणि मग साखळ्या लावून रांगेचा मार्ग बंद केला गेला. उरलेले लोक बराचवेळ रांगेत एकाचजागी तिष्ठत उभे होते. अजून अर्ध्यापाऊण तासाने पुन्हा काही रांगांमधल्या लोकांना आत सोडलं गेलं आणि थोडावेळ दर्शन बंद झालं. तिथे सतत एकाच जागी उभं राहून राहून आमच्या पायांना रग लागायला लागली होती. रांगेतल्या काही लहान मुलांना गर्दीची सवय नसल्याने ती मोठ्याने भोकाड पसरून रडत होती. साधारण तासभर असा काढल्यानंतर मग आम्हांला दर्शनाची संधी मिळाली. आम्ही ज्या वेगवेगळ्या रांगेत उभे होतो, त्या सर्व रांगांमधल्या लोकांना एकाचवेळी आत सोडलं होतं.

     आत गेल्यानंतर आम्हांला स्त्रियांसाठी असलेली वेगळी रांग, पुरुषांसाठी असलेली वेगळी रांग या सगळ्या रांगांची ऐशीतैशी झालेली दिसली. आत सगळ्या रांगा एकत्र होत होत्या. दर्शनमार्ग रुंद असल्याने लोक आत रेटारेटी करून घुसत होते आणि त्यात एकाऐवजी नवीन तीन रांगा तयार झाल्या होत्या. या रांगामध्ये स्त्रीपुरुष सगळे एकत्र मिसळलेले होते, बहुतेक सगळेजण एकमेकांना ढकलत होते, तिथे मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये असावी तशी गर्दी झाली होती. त्यातच लहान मुलं जीव तोडून रडत होती. मंदिरांबाहेर दर्शनासाठी टीव्ही स्क्रीन लावला असता, तर रांगेत उभं राहण्याची इच्छा नसलेल्यांना त्या स्क्रीनवर देवाचं दर्शन घेऊन परस्पर जाता आलं असतं. पण तशी सोय तिथे नव्हती.

     या सगळ्या गर्दीतून अखेर आम्ही गुरुवायूर कृष्णाच्या अंदाजे फूटभर उंचीच्या छोट्याशा मूर्तीचं दर्शन घेतलं. कृष्णाच्या मूर्तीचा बहुतेक भाग कपड्यांनी आणि फुलांनी झाकलेला होता पण चंदनाने माखलेला चेहरा तेवढा दिसत होता. दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याबाहेर असलेल्या प्रदक्षिणामार्गावरून आम्ही बाहेर पडलो. तिथे बाहेरच्या मोठ्या प्रदक्षिणामार्गावर एक हत्ती उभा होता. तिथल्या एका दरवाजातून अजून एक हत्ती आत येत होता. त्याच दरवाजातून आम्ही बाहेर आलो.

     तिथून आम्ही मंदिराबाहेर असलेल्या मंडपाकडे आलो. भजन, प्रवचन इत्यादींसाठी तो मंडप बांधलेला होता. मंडपात स्टेजसमोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. काही लोक त्या खुर्च्यांवर बसून चक्क झोप काढत होते. काहीजण मंदिरातर्फे प्रसाद म्हणून मिळणाऱ्या जेवणासाठी तिथे थांबलेले होते. त्या मंडपात बसून आम्ही मंदिरासमोरचा परिसर न्याहाळू लागलो. आता दर्शनासाठी आलेल्या लोकांची गर्दीही कमी झाली होती. लोकांच्या रांगा पटापट पुढे सरकत होत्या. थोड्या वेळाने रांगेतले सगळे लोक आत गेले आणि मंदिराचे दरवाजेही बंद झालेले दिसले.

     रात्रीचे नऊ वाजले होते, आमच्याबरोबरची एक व्यक्ती अजून बाहेर आली नव्हती, ती का आली नाही हे बघण्यासाठी मी मंदिरातून बाहेर पडायच्या मार्गाने आत गेले, तेव्हा मला तिथे व्यवस्थित शृंगारलेले एकूण तीन हत्ती उभे असलेले दिसले. दर्शनासाठी आत गेलेल्या लोकांची तिथे गर्दी जमली होती, काहीजणांनी मोकळ्या जागांमध्ये बसून घेतलं होतं. गाभाऱ्यासमोरच्या उंच दीपमाळा पेटवलेल्या दिसत होत्या. थोड्या वेळात शृंगारलेल्या तिन्ही हत्तींना पुढे आणून गाभाऱ्यासमोर उभं केलं होतं आणि पोलिसांनी बाहेर पडण्याचा रस्ता बंद केला होता. मोठे दिवे ओवाळत पुजाऱ्यांनी (बहुधा) ते तीन हत्ती देवाला अर्पण करण्याचा विधी सुरू केला. तो विधी फार सुंदर वाटत होता. मला थोडा वेळ तिथेच उभं राहून तो विधी पहायला आवडलं असतं, पण हॉटेलवर रात्रीच्या जेवणासाठी वेळेत जाणं आवश्यक होतं. त्यामुळे नाईलाजाने मी तिथून निघाले आणि एका मधल्या दरवाजाने बाहेर आले.

     आम्ही हॉटेलकडे परत निघालो, त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस चालू झाला होता. आता परततांना दुकानात खरेदी करत बसलो असतो, तर अजून वेळ गेला असता आणि रात्रीच्या जेवणाला उशीर झाला असता, म्हणून फक्त प्रसाद खरेदी करून आम्ही हॉटेलवर परतलो आणि थेट डायनिंग हॉलमध्येच गेलो.

     हॉटेलचा डायनिंग हॉल पूर्ण रिकामा होता, तिथे फक्त आम्हीच होतो, बाजूला एक वेटर उभा होता. जेवणासाठी काय आहे, हे मी पहायला गेले, तर पहिल्याच टेबलवर ब्रेड, बटर, जाम वेगवेगळ्या डिशमध्ये ठेवलेले होते आणि त्या डिशच्या बाजूने तीनचार छोट्या आकाराची झुरळं फिरत होती. डिशमधले पदार्थ झाकून ठेवायला हवे होते. मी तिथे झुरळं फिरताहेत हे बोलून दाखवलं, पण तिथल्या वेटरला त्याच्याशी काही देणंघेणं नसल्यासारखा तो शांत उभा होता. ते पाहून शिसारी येऊन मी पुढच्या टेबलाकडे वळले, ते रिकामं होतं. त्याच्यापुढच्या टेबलावर सुदैवाने सगळे पदार्थ भांड्यात झाकून ठेवलेले होते आणि तिथे ती छोटी झुरळंही दिसत नव्हती, ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. तिथे इडली, चटणी, सांबार, दाल, भात, एक रस्साभाजी आणि पुऱ्या भांड्यात झाकून ठेवलेल्या होत्या. पण भांड्यांमधले बहुतेक सगळे पदार्थ संपत आलेले दिसत होते. नॉनव्हेज पदार्थही त्याच्याजवळच ठेवलेले होते. त्याच्यापलीकडे एका आईसक्रीमच्या बॉक्समध्ये जवळजवळ तळ गाठलेल्या स्थितीत थोडसं आईसक्रीम उरलेलं दिसत होतं.

     मला तो एकंदर प्रकार काही फार बरा वाटला नाही, त्यामुळे झाकलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ नावापुरते डिशमध्ये वाढून घेऊन मी इतरांबरोबर जेवायला बसले. आम्ही जेवत असतांना जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि विजांच्या कडकडाटाबरोबर एकदम हॉटेलमधले सगळे लाईट गेले. आम्ही अंधारात तसेच बसलो होतो. दोन मिनिटांनी बहुतेक जनरेटरचे लाईट चालू झाले. पाच मिनिटांनी वीजप्रवाह सुरळीत झाला आणि परत थोड्याच वेळात लाईट गेले, पुन्हा एकदा जनरेटरचे लाईट चालू होईपर्यंत आम्हांला अंधारात बसावं लागलं. पण असे सारखे लाईट जात होते आणि येत होते.

     थोड्या वेळाने तिथल्या भांड्यात ठेवलेले काही पदार्थ संपले. तिथे उभ्या असलेल्या वेटरला त्यापैकी एक पदार्थ आणायला सांगितला, तर त्याने अगदी नाईलाजाने आत जाऊन तो मोजकाच पदार्थ आणला. काही मिनिटांनी अजून काही वेटर तिथे आले, ते आपापसात बोलण्यातच गुंग होते, त्यांना दुसरा पदार्थ आणायला सांगितल्यावर त्यांनी तो लगेच आणून दिला आणि ते परत एकमेकांशी बोलण्यात गुंग होत, काही मिनिटांत तिथून निघून गेले. भांड्यातल्या संपलेल्या पदार्थांपैकी अजून एखादा पदार्थ किंवा आईसक्रीम यातलं काही आम्हांला हवं आहे का हे विचारण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. आमचं जेवण होत आल्यावर मघाशी एका कोपऱ्यात स्थितप्रज्ञाप्रमाणे उभा असणारा तो वेटर जवळ आला आणि आमच्या डीश गोळा करायला लागला, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की त्याला फक्त रिकाम्या झालेल्या डीश गोळा करून नेण्याचं काम सांगितलेलं होतं.

     जेवण झाल्यावर तिथून आम्ही दुसऱ्या इमारतीतल्या लिफ्टपाशी आलो. या लिफ्टचे दरवाजेही पहिल्या इमारतीतल्या दरवाजांसारखे लवकर बंद होत होते. काही दुर्घटना घडू नये, म्हणून लिफ्टमधलं पॉज बटण दाबून ठेवून आम्ही लिफ्टमध्ये शिरलो. खोलीत गेल्यावर टीव्हीवर बघण्यासारखं काहीच नव्हतं. लाईट कधी जातील याचा नेम नव्हता. कधी एकदा या हॉटेलमधला मुक्काम संपतोय असं आम्हांला झालं होतं.

Monday, February 2, 2015

केरळ ट्रीप - काही अनुभव - भाग १ - मुंबई ते कोची

     १० नोव्हेंबर २०१४ ते १७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आम्ही काही मोजके लोक केरळला जाणार होतो. या ट्रीपची आखणी ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या आमच्या एका मैत्रिणीने केली होती. खरंतर मला दुसऱ्याच ठिकाणी ट्रीपला जायचं होतं, पण ती ठिकाणं रद्द करून आमच्या मैत्रिणीने ही केरळ ट्रीप आखून दिली होती. ट्रीपला येणाऱ्या काही जणांची वयं आणि प्रकृती याचा विचार करून, 'प्रवासात फारशी ठिकाणं पहायला मिळाली नाहीत तरी चालेल, पण प्रवास आरामशीर व्हायला हवा,' असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे आमच्या मैत्रिणीने, काही मोजकीच ठिकाणं ट्रीपसाठी निवडली होती.

     प्रवासाशी संबंधित असलेल्या एका वेबसाईटतर्फे मला एक डिस्काऊंट व्हाऊचर मिळालं होतं, त्याचा वापर करून या ट्रीपसाठी मुंबईहून कोचीला जाणाऱ्या आणि त्रिवेंद्रमहून मुंबईत येणाऱ्या विमानाच्या तिकिटांचं बुकींग मी केलं होतं. तसंच मुन्नारमधल्या एका हॉटेलचं बुकिंगही मीच केलं होतं. या हॉटेलच्या पॅकेजमध्ये फक्त सकाळच्या ब्रेकफास्टचा समावेश होता.

     इतर सर्व ठिकाणचं बुकींग आमच्या मैत्रिणीने केलं होतं. तिने बुक केलेल्या हॉटेलच्या पॅकेजमध्ये रात्रीच्या जेवणाचा आणि सकाळच्या ब्रेकफास्टचा समावेश होता. त्याशिवाय तिने केरळच्या पूर्ण प्रवासात फिरण्यासाठी 'कोको केरला' या ट्रॅव्हल कंपनीची एक गाडी आमच्यासाठी बुक केलेली होती. त्या गाडीचा ड्रायव्हर आम्हांला नेण्यासाठी कोचीच्या विमानतळावर येणार होता.

     या प्रवासासाठी आम्हांला आमच्या मैत्रिणीने काही सूचना केल्या होत्या, 'मंदिरात जातांना लुंगी किंवा धोतर नेसून वरती उपरणं घेतल्याशिवाय पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. तसंच स्त्रियांनाही साडी किंवा मुंडू परिधान केल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिरात मोबाईल किंवा पैशाचं चामड्याचं पाकीट, कंबरेचे चामड्याचे बेल्ट इत्यादी घेऊन जाता येणार नाही. केरळला तुम्हांला थंडी जाणवेल, म्हणून पुरेसे स्वेटर आणि शाली जवळ बाळगा. हाऊसबोटीतल्या मुक्कामात डासांचा त्रास जाणवतो, म्हणून तुमच्या बरोबर डासांसाठीच्या मॅट्स आणि मशीन  घेऊन   जा.  हाऊसबोटीतलं जेवण ठीक नसल्याच्या कधीकधी तक्रारी येतात, तरी तिथे खाण्यासाठी काही पदार्थ सोबत ठेवा.' इत्यादी इत्यादी. आम्ही तिच्या सूचनांप्रमाणे प्रवासाची  सगळी तयारी केली.

     या ट्रीपसाठी आम्हांला १० नोव्हेंबरला सकाळी मुंबईहून कोचीला जाणारं विमान पकडायचं होतं. आमचं विमान सकाळी ज्या वेळेला निघणार होतं, त्यापेक्षा थोडं उशीरा जाणारं विमान आम्ही निवडलं असतं, तरी चाललं असतं, पण असं थोडं उशीरा निघणारं कोणतंच विमान नसल्याने आम्हांला लवकर निघणारं हे विमान निवडावं लागलं होतं. त्यामुळे विमान पकडण्यासाठी आम्हांला पहाटे पाच वाजताच घराबाहेर पडावं लागलं होतं. त्यात काही कारणामुळे सामान पॅक करतांना आदल्या रात्री उशीरापर्यंत जागावं लागल्यामुळे, आदल्या रात्री आमची नीट झोप झाली नव्हती. टॅक्सीने विमानतळावर जातांना वाटेतला रस्ता अतिशय खराब असल्याने आम्हांला सारखे धक्के बसत होते आणि टॅक्सीत झोप काढण्याच्या आमच्या बेताला सुरुंग लागला होता. विमानतळावर गेल्यावर तिथल्या वातावरणातली एकंदर गजबज पाहून, तिथे आम्हांला झोप येणं शक्य नव्हतं, त्यामुळे विमानतळावर इकडेतिकडे फिरण्यात आम्ही सगळा वेळ घालवला.

विमानतळावरचा गांधीजींचा पुतळा
   
     आमचं स्पाईसजेटचं विमान अगदी वेळेत होतं आणि त्याची वेळ झाल्याबरोबर प्रवाशांना विमानात सोडायला सुरूवात झाली होती. आमच्या सीट्स आम्ही वेब चेक इन करून आधीच आरक्षित केलेल्या होत्या, पण आमच्याआधी विमानात शिरलेल्या एका वृद्ध गुजराती महिलेने आमच्यापैकी एकाच्या खिडकीजवळच्या सीटवर बसून घेतलं होतं. ती सीट आमच्यापैकी एकाची आहे हे बोर्डींग पास दाखवून सांगितल्यावर त्या महिलेच्या शेजारी बसलेला तिचा नवरा पटकन उठून स्वतःच्या सीटवर जाऊन बसला, मात्र ती महिला काही त्या सीटवरून उठली नाही आणि स्वतःच्या सीटकडे बोट दाखवत, "बेसी जावो," असं म्हणत ती त्या सीटवर जाणीवपूर्वक बसून राहिली. ज्याची सीट होती, त्याला समोर महिला आहे आणि त्यात ती वयाने वृद्ध आहे हे पाहून वाद न घालता, स्त्रीदाक्षिण्य दाखवत नाईलाजाने दुसऱ्या सीटवर बसायला लागलं. नंतर ती महिला त्याला स्वतःचं कार्ड देत, "मलबार हिलला आमचा बंगला आहे, कधी तिथे आलास तर चहा प्यायला ये आमच्या बंगल्यावर." असं तोंडदेखलं आमंत्रण द्यायला विसरली नाही. त्या महिलेच्या परिवाराचा केरळमध्ये बिझनेस होता आणि तिचा जवळचा नातेवाईक एका राजकीय पक्षाशी संबंधित होता, हे आम्हांला नंतर कळलं. ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये सीटवर दुसरीच व्यक्ती बसण्याचे असे प्रकार होतात हे आमच्या सवयीचं होतं, पण विमानातही असा अनुभव यावा हे अनपेक्षित होतं. त्यामुळे विमानात ब्रेकफास्टसाठी आधी निवडलेल्या खाद्यपदार्थांऐवजी दुसरेच खाद्यपदार्थ ज्याची सीट बदललेली होती, त्याच्या वाट्याला आले.

  
     या सगळ्या गोंधळानंतर अखेर एकदाचं आमचं विमान कोचीला पोहोचलं आणि तेही वेळेआधी. विमानातून उतरून सामान घेण्यासाठी आम्ही सरकत्या बेल्टपाशी आलो. बऱ्याच वेळाने त्यावर आमचं सामान आलं. आमचं सामान घेऊन आम्ही विमानतळाबाहेर आलो, त्यावेळी दुपारी अकरा साडेअकराची वेळ असली, तरी तिथलं ऊन आणि हवेतला उकाडा चांगलाच जाणवत होता. विमानतळाबाहेर आमच्या गाडीचा ड्रायव्हर आमच्या नावाचा बोर्ड हातात घेऊन उभा होता.

     ड्रायव्हरने आमचं सामान गाडीत ठेवलं आणि आम्ही गाडीत बसलो. गाडीत एसी चालू केलेला होता, गाडीतल्या सीट्स आरामदायक होत्या. गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली आणि आम्ही खिडकीतून आजूबाजूची हिरवाई बघू लागलो. रस्त्याच्या कडेला सुपारीची झाडं लावलेली दिसत होती, काही शोभेच्या झाडांची फुलं लक्ष वेधून घेत होती. अधूनमधून रस्त्यावरून जाणारे लुंगीधारी पुरुष दिसत होते, आता पुढच्या संपूर्ण प्रवासात आम्हांला असे लुंगी किंवा मुंडू नेसलेले पुरुष वारंवार दिसणार होते. स्त्रिया मात्र बहुतेक करून पंजाबी ड्रेसमध्ये वावरतांना दिसत होत्या. मधूनच आमच्या गाडीच्या बाजूने एखादी एस्टी बस जातांना दिसत होती. या बसच्या खिडकीला वरखाली करता येतील अशी झापं होती, ऊन असल्याने काही खिडक्यांची झापं खाली ओढलेली दिसत होती. काही रिक्षांनाही दरवाजे लावलेले दिसले.

     दुपारी एकच्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. ड्रायव्हरने आम्हांला सांगितलं, की "तुम्ही हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन, जेवण करून घ्या. मी अडीच वाजता तुम्हांला साईट्स बघण्याकरता घेऊन जाईन."

     'द क्लासिक फोर्ट' नावाच्या त्या बिझनेस क्लास हॉटेलची इमारत बाहेरून अतिशय छान दिसत होती. चेक इनचे सोपस्कार पार पाडून आम्ही लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथून 'सी' आकाराच्या कॉरीडॉरमधून आमच्या खोल्यापर्यंत जातांना, कॉरीडॉरमधल्या मंद दिव्यांमुळे कॉरीडॉर काहीसं अंधारं वाटत होतं आणि तिथल्या लेमनग्रासच्या वासाच्या रूम फ्रेशनरचा तीव्र वास एकदम नाकात घुसत होता. खोल्या मात्र स्वच्छ आणि प्रशस्त होत्या, खोलीत बेड आणि इतर फर्निचरव्यतिरिक्त एक छोटा फ्रीज, टीव्ही, फोन आणि एसीची सोय होती. टाॅयलेट प्रशस्त होतं, त्यात चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं. 

     खोलीच्या खिडकीचा पडदा ओढून बाहेर पाहिल्यावर मात्र आमचा अपेक्षाभंग झाला, तिथून हॉटेलच्या स्टाफला येजा करण्यासाठी ठेवलेला जिना आणि एका कौलारु घराची मागची बाजू दिसत होती. एसीचा तीव्र ब्लास्ट आणि पंखा दोन्ही चालू असल्याने खोलीत थंडी वाजत होती. पण एसीचा ब्लास्ट कमी केला, तर एसीच्या झोताबाहेर गेल्यावर उकाडा जाणवत होता. त्यामुळे खोलीतला एसी चालू ठेवून शाल किंवा स्वेटरचा वापर करावा लागणार होता.

     खोलीत सामान ठेवून, फ्रेश होऊन आम्ही जेवायला खालच्या डायनिंग हॉलमध्ये गेलो आणि आमच्यासाठी व्हेजमीलच्या थाळ्या मागवल्या. जेवण यायला जरा वेळ लागला, पटकन कामं व्हायला ती काही मुंबई नव्हती, तिथली कामं तिकडच्या संथ गतीप्रमाणे चालत होती. थोड्या वेळाने आमच्या थाळ्या आल्या, त्यात तीनचार प्रकारच्या भाज्या, दाल, सार, दही, पोळी आणि (केरळमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाड तांदळाचा) भात असे पदार्थ होते. बहुतेक भाज्या, सार इत्यादी पदार्थ खोबरेल तेलाचा वापर करून बनवलेले होते आणि भाज्यांमध्ये मुक्त हस्ताने ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला होता, त्यामुळे पदार्थांना एक वेगळीच चव आली होती.

     जेवण झाल्यावर तिथल्या वेटरने आम्हांला व्हेजमीलच्या थाळीऐवजी दुसऱ्या कोणाचं तरी फीशमीलच्या थाळीचं बिल आणून दिलं, तेवढं सोडलं तर बाकी स्टाफची सर्व्हीस चांगली होती. बिलाचा गोंधळ निस्तरून व्हेजमीलचं नवं बिल घेऊन ते पेड करण्यात अजून वेळ गेला. अडीच वाजून गेले होते, साईटसीईंगला जाण्याची वेळ झाली होती, पण आमच्यापैकी कोणाचीच नीट झोप झाली नसल्याने कोणालाच साईटसीईंगला जायचा उत्साह नव्हता. म्हणून आम्ही 'अडीचच्या ऐवजी साडेतीनला निघून एखादंच  महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ बघायचं,' असं ठरवलं आणि त्याप्रमाणे ड्रायव्हरला फोन केला, पण ड्रायव्हर आधीच तयार होऊन आलेला होता. तो म्हणाला की, "एकदीड तासात तुमची इथली सगळी ठिकाणं बघून होतील, फार वेळ लागणार नाही. तुम्ही उशीरा निघालात तर पाचच्या नंतर इथली ठिकाणं बंद होतात, त्यामुळे तुम्हांला काही बघायला मिळणार नाही." ड्रायव्हरच्या आग्रहामुळे थोड्या नाईलाजानेच आम्ही साईटसीईंगला निघालो.

     ड्रायव्हरने आम्हांला आधी ज्युईश सिनेगाॅगजवळ असलेल्या अँटीक शाॅपच्या बाजाराजवळ सोडलं. त्याने आम्हांला बजावलं, "इथल्या अँटीक शाॅपमध्ये सगळ्या वस्तू महाग मिळतात. त्यामुळे इथे काही खरेदी करू नका." मग आम्ही अँटीक शाॅपच्या त्या बाजारातून फिरत फिरत ज्युईश सिनेगाॅगमध्ये पोहोचलो. तिथे आत जाण्यासाठी प्रवेशशुल्क भरावं लागत होतं. आत एका बाजूच्या लहानशा खोलीत त्यांचा इतिहास दर्शवणारी चित्रं रंगवलेली होती आणि त्याच्या पुढे त्यांचं मुख्य प्रार्थनास्थान होतं. त्या दिवशी तिथे काही शाळांच्या ट्रीप्स आलेल्या असल्याने चित्रांच्या खोलीत मुलांची इतकी गर्दी होती, की आम्हांला ती चित्रंही नीट बघायला मिळाली नाहीत. प्रार्थनेच्या खोलीत गाभारासदृश असं जे काही होतं, ते पडद्याने झाकून ठेवलेलं होतं, त्याच्यावरचा पडदा आठवड्यातल्या काही ठराविक दिवशीच उघडतो असं आम्हांला कळलं. त्यामुळे हे ज्युईश सिनेगाॅग पाहिलं नसतं, तरी चाललं असतं, असं आम्हांला वाटून गेलं.

अँटीक शॉपमधला गणपती - १
 
अँटीक शॉपमधला गणपती - २
  
     तिथून थोड्याच अंतरावर डच पॅलेस होता. त्या राजवाड्यात एक छोटं म्युझियम होतं, त्याचं प्रवेश शुल्क भरून आम्ही ते म्युझियम पाहिलं. तिथून आम्हांला ड्रायव्हरने तिथल्या सांता क्रूझ बॅसिलिका चर्चकडे नेलं, पण तिथली शाळा सुटण्याची वेळ झालेली असल्याने, तिथे गाडी न थांबवता त्याने आम्हांला चायनिज फिशिंग नेट्स बघण्यासाठी समुद्रकिनाऱ्याजवळ नेलं. आम्ही सगळेच शाकाहारी असल्याने आम्हांला माशांचा वास सहन होत नव्हता म्हणून केरळातली ती पारंपारिक पद्धतीने जाळी वापरून केली जाणारी मासेमारी बघण्यात रस वाटत नव्हता. पण ड्रायव्हरने खूपच आग्रह केल्याने आम्ही गाडीतून उतरून तिकडे गेलो. आमच्या प्रवासाच्या यादीत दिलेली सगळी ठिकाणं आम्ही बघितलीच पाहिजेत यावर त्या ड्रायव्हरचा कटाक्ष होता. माशांचा वास सहन होत नसल्याने आम्ही लांबूनच ती जाळी पाहिली आणि आमचा मोर्चा तिथे जवळच असलेल्या एका साडीविक्रीकेंद्राकडे वळवला.

चायनिज फिशिंग नेट्स
   
फिशिंग नेट्सच्या किनाऱ्यावरच्या झाडाच्या खोडावरची चित्रकला

    
     दुकानात खरेदी करून काही मिनिटांत आम्ही तिथून बाहेर पडलो. आता आम्हांला दुपारचा चहा घेण्याची आवश्यकता भासत होती. गाडीने समुद्रकिनाऱ्याजवळ येतांना आम्हांला वाटेत चहाकॉफी विकणाऱ्या छोट्या टपऱ्या दिसल्या होत्या, त्यांच्यासमोर बाकं मांडून बसण्याची सोयही केलेली होती. तिथेच चहा घेऊ असं ठरवून ड्रायव्हरला तसं सांगितल्यावर तो म्हणाला, "तुम्हांला बीचवर चांगला चहा मिळेल. आपण तिथे जाऊ."

     ड्रायव्हरने गाडी बीचजवळ नेऊन उभी केली. आम्ही फक्त चहा पिण्यासाठी म्हणून गाडीतून खाली उतरलो. पण तिथे समुद्रावरून छान वारा येत होता, त्यामुळे जरा तरतरी येऊन आम्ही थोडं पुढे जाऊन पाहिलं, तर बीचवर लोकांची फारशी गर्दी नव्हती. चहाची किंवा इतर कोणतीच दुकानं तिथे दिसत नव्हती. फक्त बासऱ्या, फुगे आणि शहाळे विकणारे काही फेरीवाले तिथे दिसत होते. तेवढ्यात सायकलवरून एक चहावाला तिथे आला. त्याच्याकडचा चहा कसा बनवलेला असेल, या विचाराने आम्हांला त्याच्याकडचा चहा घ्यावासा वाटत नव्हता. पण दुसरीकडे कुठेच चहा प्यायची सोय दिसत नसल्याने, आम्ही त्याच्याकडचा चहा घेतला. चहावाल्याने, 'कुठून आलात? कुठे जाणार?' वगैरे प्रश्न विचारत आमची चौकशी केली. त्याच्या बोलण्यात मात्र अगत्य जाणवत होतं. चहा पिऊन झाल्यावर थोडा वेळ बीचवर घालवून आम्ही परत गाडीकडे आलो.

कोची बीच - इतके कसले कागद तिथे पडलेले दिसत होते कोणास ठाऊक?
  
बीचवर निवांतपणे जिव्हाळ्याच्या गप्पा मारणारे बासरीविक्रेते

  
बीचपलिकडचं हिरवाईत लपलेलं घर

बीचवरून दिसणारा मावळतीचा सूर्य
  
दगडांनी बांधून काढलेला बीचचा काही भाग
 
     तिथून ड्रायव्हरने गाडी परत सांता क्रूझ बॅसिलिका चर्चकडे नेल्यावर मात्र आम्ही कोणीच खाली उतरायला तयार नव्हतो. सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप होती. मग ड्रायव्हरने गाडी आमच्या हॉटेलकडे वळवली. गाडी हॉटेलपर्यंत जाण्याआधी गाडीतच आमचे डोळे झोपेने मिटायला लागले होते. आम्ही हॉटेलवर गेल्यावर, सरळ आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन जेवणाच्या वेळेपर्यंत झोप काढली.

     रात्री जेवणासाठी आम्ही मिक्स भाजी आणि रोटी (दोन्ही पंजाबी पद्धतीचे), कॅबेज फ्राय, पुलाव इत्यादी पदार्थ मागवले. त्यापैकी कॅबेज फ्राय ही भाजी असेल, असं आम्हांला वाटलं होतं, पण प्रत्यक्षात ती कोबीची आणि कांद्याची तांदुळाच्या पिठात केलेली भजी होती. या सगळ्या पदार्थांची चवही दुपारप्रमाणेच थोडीशी वेगळी पण ठीक होती. जेवण झाल्यावर तिथल्या वेटरने आम्हांला कोणत्या फ्लेवरचं आईसक्रीम हवं आहे, ते विचारून त्याप्रमाणे प्रत्येकाला हवं ते आईसक्रीम आणून दिलं.