पुढे -
रात्रीच्या शांत झोपेमुळे सकाळी उठल्यावर एकदम प्रसन्न वाटत होतं आणि माझं पित्तही शमलं होतं. आम्ही ब्रेकफास्टसाठी डायनिंग हॉलमध्ये आलो तेव्हा तिथे ब्रेड, बटर, जाम, इडली, चटणी, सांबार, जाड छोटे डोसे, पुऱ्या, भाजी, कॉर्नफ्लेक्स, साखर, दूध, चहा, कॉफी, काळ्या द्राक्षांचा ज्यूस असे पदार्थ मांडलेले दिसले. वेटर प्रत्येकाच्या टेबलापाशी जाऊन प्रत्येकाला काय हवं, ते विचारत होते. टेबलावरच्या भांड्यात डोसे, इडली, टोस्ट केलेले ब्रेड असतांनाही ते गरम गरम पदार्थ तयार करून आणून ते प्रत्येकाच्या डीशमध्ये वाढत होते. भांड्यातला एखादा पदार्थ संपलेला दिसला, की ते तो पदार्थ पुन्हा भांड्यात आणून ठेवत होते.
 |
सकाळच्या वेळी हॉटेलच्या गॅलरीतून दिसणारं एका बाजूचं दृश्य |
 |
हॉटेलच्या मागच्या बाजूच्या गॅलरीच्या काचा अशा चित्रांनी सजवलेल्या होत्या. |
 |
हॉटेलकडून थेट निळ्याशार समुद्राच्या दिशेने जाणारा रस्ता |
आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही ड्रायव्हरला फोन केला आणि टेकडीच्या रस्त्यात काही किरकोळ दुरूस्तीचं काम चालू असल्याने आम्हीच खाली गाडी पार्क केली होती तिथे गेलो. त्यादिवशी आम्ही पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्याच्याजवळचं म्युझियम बघणार होतो. (तिथली आर्ट गॅलरी बहुतेक त्या दिवशी बंद होती.) त्याशिवाय मला त्या दिवशी वेब चेक इन करायचं असल्याने आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर असलेल्या सायबर कॅफेमध्येही जायचं होतं. आमच्यापैकी बहुतेकांना विमानात शक्यतो स्वतःच्या सोयीचीच सीट पाहिजे होती (वेब चेक इन न करता हव्या तशा सीट्स मिळणं शक्य नव्हतं), म्हणून सीट्सचं आरक्षण करण्यासाठी आणि (विमानाची वेळ बदलल्याने) आम्हांला विमानात दुपारचं जेवण मिळणार आहे की नाही याची खात्री करून घेऊन हव्या त्या प्रकारचं जेवण निवडण्यासाठी वेब चेक इन करणं आवश्यक होतं. म्हणून मी ड्रायव्हरला सांगितलं, की "इथून मंदिरात जातांना वाटेतल्या सायबर कॅफेपाशी गाडी थांबवा, मला वेब चेक इन करायचं आहे. त्यात जास्त उशीर झाला, तर आम्ही फक्त पद्मनाभस्वामी मंदिर बघू, म्युझियम बघणार नाही, म्हणजे तुम्हांलाही उशीर होणार नाही." ड्रायव्हरने होकार दिला.
प्रत्यक्षात ड्रायव्हरने गाडी चालू केल्यावर, सायबर कॅफेच्या इथे गाडी थांबवलीच नाही. तो म्हणाला, "पद्मनाभस्वामी मंदिराच्या परिसरात भरपूर सायबर कॅफे आहेत, तिथे तुमचं काम होऊन जाईल." मी त्याला म्हणाले, की "वेब चेक इन केलं, की बाकीचे जास्त सोपस्कार करावे लागत नाहीत, म्हणून मला ते करणं आवश्यक आहे." त्यावर तो बेफिकीरीने म्हणाला, की "इथे तुम्हांला त्याची काही जरूरी नाही." माझ्या दृष्टीने ते काम किती महत्त्वाचं आहे, हे त्याला समजतच नव्हतं.
आम्ही पद्मनाभस्वामी मंदिरापाशी पोहोचलो. तिथे मंदिरात प्रवेश करतांना पुरुषांना धोतर किंवा लुंगी परिधान करणं आवश्यक होतं, तसंच स्त्रियांनाही साडी नेसणं किंवा पंजाबी ड्रेसवर लुंगीसारखा पंचा - मुंडू नेसणं अनिवार्य होतं, त्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नव्हता. आमच्या ग्रुपमधल्या पुरुषमंडळींची धोतरं गुंडाळून होईपर्यंत स्त्रियांनी दर्शन करून यावं असा विचार करून आम्ही मंदिरात निघालो.
मंदिरात गेल्यावर तिथे दर्शनासाठी रांग लागलेली दिसली, त्या रांगेत उभं रहायचं म्हणून आम्ही रांग कुठे संपते, ते पाहत पुढे निघालो. मंदिराला मोठा वळसा घालून गेलेली ती भलीमोठी रांग खूप आतवर संपत होती. आम्ही बराचवेळ रांगेत उभं राहिलो. साडेदहाच्या सुमाराला लोकांना दर्शनासाठी सोडायला सुरूवात झाली, आमची रांग हळूहळू पुढे सरकत होती. मात्र त्यामुळे मंदिरात कोरलेली शिल्पं आम्हांला व्यवस्थित बघता आली. मंदिरातली शिल्पं आणि मंदिराची वास्तू हे दोन्ही अगदी बघण्यासारखं आहे. (पद्मनाभस्वामीची मूर्तीही बघण्यासारखी आहे.)
रांगेतून पुढे सरकत असतांना, जिथे साखळी लावून रांग बंद केली जाते, त्या साखळीपासून आम्ही सातआठ फूट अंतरावर असतांना दर्शन बंद झालं. आता थेट पाऊण वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं होणार होतं. तेवढा वेळ तिथे एका जागी उभं राहून आमचे पाय दुखायला लागले. एव्हाना रांगेतली लहान मुलं रडायला लागली होती, काही लहान मुलांचे पालक रांग सोडून आपल्या लहान मुलांना घेऊन मंदिरातून तसेच दर्शनाविना परतू लागले होते.
तेवढ्यात देव मिरवून आणण्याचा सोहळा सुरू झाला. पुढे हातात दिवे घेतलेले पुजारी, त्यांच्यामागे देव डोक्यावर घेतलेले तिघे पुजारी, त्यांच्यामागे वाजंत्री अशा क्रमाने काहीजण तीनवेळा प्रदक्षिणा घालून गेले. मंदिरासमोर असलेल्या स्तंभाजवळ दहीभात आणि कमळाच्या पाकळ्या ओवाळून टाकल्या गेल्या. त्याचवेळी एक हत्तीही मंदिरात आला होता, तो देवाला प्रदक्षिणा घालून जातांना दिसला. मंदिरात हत्ती कुठून आला असेल याचं मला नवल वाटत होतं. मंदिराच्या दर्शनी भागात असलेल्या पायऱ्यांवरून हत्ती आणणं शक्यच नव्हतं. त्याशिवाय मंदिराच्या अंगणात असलेल्या वाळूचंही मला नवल वाटत होतं. मी रांगेतल्या एका बाईला विचारलं, की इथे जवळ समुद्र आहे का? त्यावर ती म्हणाली, की 'अशी श्रद्धा आहे, की जसा विष्णू क्षीरसागरात शयन करत असतो, तसंच इथल्या विष्णूच्या मूर्तीखालीही देवळाच्या खालच्या भागात गुप्त समुद्र आहे.' या मंदिराच्या बाबतीत अशा अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. त्याशिवाय असंही कळलं, की या मंदिरात देवाचं पहिलं दर्शन घ्यायचा मान त्रावणकोरच्या राजाचा आहे, शेजारच्या राजवाड्यातून या मंदिरात थेट येणारा एक दरवाजा आहे, त्या दरवाजाने येऊन राजा रोज देवाचं दर्शन घेतो.
अखेर पाऊण वाजेपर्यंत तिथे उभं राहिल्यावर पुन्हा एकदा लोकांना दर्शनासाठी आत सोडायला सुरूवात झाली होती. आतमध्ये रांग मोडून सगळ्या लोकांची एकत्र रेटारेटी होत होती. थोड्या वेळाने शेवटी एकदाचे आम्ही गाभाऱ्यासमोर आलो, तिथे पुजारी लोकांना लगेच बाहेर घालवत होते. गाभाऱ्यात खूप निरखून पाहूनही मला तिथे विनाशाचं सूचन करणाऱ्या, शंकराच्या पिंडीवर टेकलेल्या विष्णूच्या हाताच्या सोन्याच्या पंजाशिवाय काहीही दिसू शकलं नाही. (हा दोष गर्दीचा नसून माझाच होता.) तिथल्या गर्दीत ज्यांना देवासमोरच्या हुंडीत पैसे टाकायचे होते, त्यांना ते टाकायलाही जमत नव्हते. अफाट संपत्तीचा मालक असलेल्या पद्मनाभस्वामीला त्या पैशांची गरजच नव्हती. तिथले पुजारी त्या सर्व गर्दीला बाहेर काढण्यात गुंतलेले होते. नीट दर्शन न झाल्याने काहीशी बेचैन झालेली मी तिथून बाहेर आले. एव्हाना मंदिरातलं प्रसादाचं काऊंटरही बंद झालं होतं.
उन्हात तापलेल्या पायऱ्यांवरून उतरतांना पाय पोळू नये म्हणून चटचट उतरत आम्ही चपला घालण्यासाठी घाईने निघालो, तर समोर आमच्या ग्रुपमधले पुरुष उभे होते. ते आमच्या पाठीमागून दर्शनासाठी आले होते आणि मंदिरात सरळ समोर चालत गेले होते, (आम्ही थांबलो होतो त्या साखळीजवळ आमच्यापुढे असलेल्या लोकांना आत सोडलं जात होतं आणि बाहेरून सरळ पुढे येणारे काही लोक त्या रांगेत शिरत होते, त्या रांगेने) आत जाऊन त्यांनी आमच्याआधी दर्शन घेतलं होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मंदिराशेजारचं म्युझियमही पाहिलं होतं आणि तरी आम्ही बाहेर आलो नाही, म्हणून आम्ही आत कुठे अडकलो याची काळजी करत ते बाहेर उभे होते. तेवढ्या वेळात आमच्या ड्रायव्हरचं जेवणही झालं होतं.
आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन ज्यूस घेतलं, तीन वाजून गेले होते, जेवायची वेळ होऊन गेल्याने आता कोणाला जेवायची इच्छा नव्हती. शेजारचं म्युझियम बघण्यासारखं होतं, पण ते आता दुपारचं बंद झालं होतं, चार वाजता ते पुन्हा उघडणार होतं. तेव्हा आता वेब चेक इनचं काम करून घ्यावं म्हणून मी तिथल्या बाजारात सायबर कॅफे शोधायला लागले. तिथे एकही सायबर कॅफे नव्हता. त्यामुळे हॉटेलच्या इथे जाऊन वेब चेक इनचं काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हेच काम सकाळी झालं असतं, तर चार वाजता म्युझियम उघडल्यावर आम्हांला निवांतपणे म्युझियम बघता आलं असतं, पण आमच्या ड्रायव्हरच्या विचित्र स्वभावाला औषध नव्हतं. आमची गाडी मंदिरापासून लांबवर असलेल्या पार्किंगच्या मैदानात पार्क केलेली होती. वाटेत कुठे सायबर कॅफे दिसतोय का हे पाहत आम्ही गाडीकडे चालत निघालो. मी वाटेत दिसणाऱ्या सर्व दुकानांच्या नावाच्या पाट्या (इंग्लिशमधल्या) वाचत होते, पण त्यात एकही सायबर कॅफेची पाटी आढळत नव्हती. शिवाय मंदिराजवळचा बाजार सोडला, तर बाकीच्या परिसरातली बरीचशी दुकानं बंद दिसत होती. आम्हांला वाटेत काही मॉल दिसले, पण आम्ही त्या मॉलच्या आत जाऊन सायबर कॅफे शोधले नाहीत. शेवटी गाडीपर्यंत जाईपर्यंत मला एकही सायबर कॅफे दिसला नाही. त्यामुळे तिथल्या तिथेच वेब चेक इन करून मग म्युझियम बघण्याच्या माझ्या बेताला सुरुंग लागला.
गाडीत बसतांना झालेली माझी चीडचीड आणि नाराजी पाहून ड्रायव्हर म्हणाला, की "काल या भागात काही दुकानांना आग लागून ती दुकानं जळून खाक झाली, म्हणून आज इथली बहुतेक दुकानं बंद ठेवलेली आहेत." तो खरं बोलत असेलही, पण तो निव्वळ कारणं देत होता. सकाळी त्याने वर्णन केलेले मंदिराच्या परिसरातले जे पुष्कळ सायबर कॅफे होते, त्यातला एकही मला प्रत्यक्षात दिसलेला नव्हता. तिथून आम्ही त्याला गाडी थेट हॉटेलवर घ्यायला सांगितली. हॉटेलच्या दरवाजापाशी उतरल्यावर आम्ही वरती आमच्या खोल्यांमध्ये न जाता, आधी वेब चेक इनचं काम करून घेतलं. प्रत्येकाला हवी तशी सीट मिळाल्यावर आणि आम्हांला विमानात आम्ही निवडलेल्या प्रकारचं दुपारचं जेवण मिळणार आहे, याची खात्री झाल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. मग थोडावेळ आराम करावा, म्हणून आम्ही हॉटेलमधल्या आमच्या खोल्यांमध्ये गेलो.
 |
हॉटेलच्या रस्त्यावरून पार्किंगच्या जागेचं दिसणारं दृश्य - पुढे पसरलेला समुद्र |
 |
समुद्रकिनाऱ्यावर मनमुराद वेळ घालवतांना |
थोड्यावेळाने फ्रेश होऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो. आता पुढे काय करायचं याचा कोणताही प्रोग्रॅम नसल्याने आम्ही आम्हांला हवं तिथे स्वच्छंद फिरायला मोकळे होतो. आम्ही समोरच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तो स्वच्छ समुद्रकिनारा आणि समुद्राचं निळंशार स्वच्छ पाणी पाहून आमचे डोळे निवले. समुद्राच्या सातआठ लहान लाटांनंतर मध्येच एक मोठी लाट येत होती. आम्ही किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांमध्ये उभे राहून समुद्राच्या पाण्याचा मनसोक्त आनंद घेत होतो. मधूनच मोठी लाट आली, की मागे सरत होतो. थोड्या वेळाने सूर्यास्त झाला, हलका पाऊस पडायला लागला, तरी आम्ही पाण्यातच खेळत होतो. किनाऱ्यावर अंधार पडायला लागला, तरी बरेचजण तिथे मनसोक्त भिजत होते. आजूबाजूला भरपूर माणसं असल्याने आम्हीही तिथेच थांबलो होतो. थोड्यावेळाने तिथले सुरक्षारक्षक शिट्या वाजवून लोकांना समुद्राच्या पाण्यात जास्त आत जाऊ नका, म्हणून सूचना द्यायला लागले. पाऊसही जरा वाढला, मग मात्र आम्ही तिथून निघून किनाऱ्यावरच्या दुकानांच्या आडोशाला उभे राहिलो. तिथल्या दुकांनांमधल्या शंखशिंपल्यांच्या काही वस्तू विकत घेऊन आम्ही तिथून निघालो.
तिथून पुढे चालत आम्ही काल आमच्या ग्रुपने ज्या दुकानातून डाळीचे वडे विकत घेतले होते, त्या दुकानापर्यंत गेलो. पण आम्ही तिथे जाईपर्यंत त्या दुकानातले डाळीचे वडे संपत आले होते. तिथे शिल्लक असलेले सगळे वडे आम्ही विकत घेतले, तरी प्रत्येकाच्या वाट्याला अर्धा अर्धा वडा आला. तिथल्या स्टूलांवर आम्ही निवांतपणे बसलो आणि थोड्या वेळाने स्लाईस पिऊन तिथून हॉटेलकडे परत निघालो. आम्ही हॉटेलमध्ये जाईपर्यंत तिथल्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मग आम्ही सरळ जेवायलाच गेलो.
आम्ही जेवणासाठी त्या दिवशीही नवरतन कुर्मा, पोळ्या आणि काश्मिरी पुलाव मागवला होता. वेटर आदल्या दिवसाप्रमाणेच आम्हांला काय हवं, त्याची विचारपूस करून वाढत होते. पण नेमकी माझ्या डीशमधल्या नवरतन कुर्म्यात चुकून आलेली तिखटजाळ मिरची खाल्ली गेल्याने परत माझं तोंड आलं आणि ट्रीपनंतर मला त्याचा चांगलाच त्रास झाला. जेवणानंतर आम्ही आईसक्रीम खात असतांना महाराष्ट्रीयन स्त्रियांचा मोठा घोळका तिथे जेवायला आला होता, त्यांच्यापैकी बऱ्याचशा स्त्रिया या ज्येष्ठ नागरीक वयोगटातल्या होत्या, त्यांच्यात एकच मध्यमवयीन स्त्री दिसत होती. काल आमच्यापैकी जे संध्याकाळी हॉटेलबाहेर फिरायला गेले होते, त्यांचं त्याच स्त्रीशी म्हणजे मिसेस ठाकूरशी बोलणं झालं होतं. मिसेस ठाकूर आमच्या सगळ्यांशी ओळख करून घ्यायला आल्या.
जेवणानंतर आम्ही सगळे एका खोलीत बसून नवीन विकत घेतलेलं सामान पॅक करत असतांना पुन्हा मिसेस ठाकूर आमच्याशी चर्चा करायला आल्या. आमच्या प्रफुल्लित चेहऱ्यांवरून आमची ट्रीप चांगली झाली असल्याचं त्यांनी ताडलं होतं. त्यामानाने त्यांची ट्रीप त्यांच्या दीरांनी स्वतः आखली असूनही त्यांच्या मनाजोगती झाली नव्हती. एकतर बऱ्याच वयस्कर बायका सोबत असल्याने, त्यांच्या ट्रीपवर काहीशा मर्यादा पडल्या होत्या आणि काही ठिकाणी चुकीच्या वेळेत गेल्याने, मंदिरं बंद असल्याने त्यांना देवदर्शन मिळू शकलं नव्हतं. आमच्या ग्रुपमधले ज्येष्ठ नागरिक तुलनेने समाधानी असल्याने, त्या आमच्या ट्रीपच्या एकंदर प्लॅनबाबत आमच्याशी चर्चा करायला आल्या होत्या. त्या निघून गेल्यावर आम्ही नवीन विकत घेतलेलं सामान नीट पॅक केलं आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. आमच्या खोलीतला एसी आज बंद होता, पण एसीची तशी गरज नसल्याने आम्ही त्याची तक्रार केली नाही.
आता आम्हांला परतीचे वेध लागले होते, पण या ट्रीपमधल्या एकूण हॉटेल्सपैकी या हॉटेलचं आमचं वास्तव्य एकदम सुखावह झालं होतं. इतर कोणत्याही हॉटेलमध्ये असतात तशा या हॉटेलच्या व्यवस्थापनातही काही त्रुटी होत्या, पण तरीही या हॉटेलच्या वास्तूमध्ये आम्हांला विलक्षण प्रसन्नता अनुभवाला आली होती. पुन्हा कधी केरळला यायचं झालं, तर केरळमधल्या बाकी कुठल्याही ठिकाणी न जाता फक्त कोवलमला यायचं आणि या हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम करून इथल्या परिसरात निवांत फिरायचं, असं आमच्यापैकी प्रत्येकाने बोलून दाखवलं होतं.