साहित्य -
गहू - १ किलो
डाळ्या ( पंढरपुरी डाळ्या) - १/२ किलो
वेलदोडे - १५ ते २०
(काहीजण वेलदोड्यांऐवजी जिरे आणि सुंठ पूड वापरतात)
कृती -
१. गहू आणि डाळ्या निवडून घ्याव्या.
२. गहू पचायला हलके व्हावेत म्हणून त्यांचा वरवरचा कोंडा काढून घ्यावा लागतो. त्यासाठी गहू ताटात काढून त्याला पाण्याचा हात लावून ते ओले करून घ्यावेत आणि दहापंधरा मिनिटांकरता तसेच ठेवून द्यावेत. कोंडा दोन प्रकारे काढता येतो.
३. पारंपारिक पद्धतीने कोंडा काढण्यासाठी गहू खलबत्त्यात घालून थोडा कोंडा सुटेल, पण गव्हाचा दाणा तुटणार नाही अशाप्रकारे कांडून घ्यावेत आणि ताटात किंवा सुपात काढावेत. त्याऐवजी दुसर्या पद्धतीने कोंडा काढण्यासाठी फूड प्रोसेसरमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढण्यासाठी वापरण्यात येणारे ब्लेड लावावे आणि त्यात गहू टाकून ते फिरवून घ्यावेत. त्यात आवश्यकतेप्रमाणे किंचित पाणी घालावे. गव्हाचा दाणा मोडणार नाही इतपत पण भांड्यात सुटलेला कोंडा दिसायला लागेपर्यंत गहू फिरवून घ्यावेत आणि ताटात किंवा सुपात काढावेत.
४. ताटात किंवा सुपात काढलेले गहू कोरडे होऊ द्यावेत, मग ते पाखडून त्यातला कोंडा फटकारून काढून टाकावा.
५. गहू कढईत भाजून घ्यावेत. गहू किंचित तडतडायला सुरूवात झाली की ते एका भांड्यात काढून घ्यावेत.
६. डाळ्याही खमंग होण्यासाठी किंचित भाजून घ्याव्या.
७. वेलदोडे त्यांची सालं काळसर होईपर्यंत भाजून घ्यावेत.
८. भाजलेले गहू, डाळ्या आणि वेलदोडे एकत्र करून ते मिक्सरमधून दळून घ्यावेत. हे दळलेलं सातूचं पीठ नीट एकत्र करून घ्यावं.
सातूचं पीठ खायला देतांना दुधात किंवा पाण्यात कालवून देतात.
एक वाटी दूध किंवा पाण्यात दोन ते तीन लहान चमचे गूळ आणि दोन ते तीन लहान चमचे सातूचं पीठ घालून ते कालवून घ्यावे आणि खाण्यासाठी द्यावे.
यात गुळाऐवजी साखरही वापरता येते.
सातूच्या पीठाचे लाडूही करतात.
ज्यांना गोड सातूचं पीठ आवडत नाही त्यांच्यासाठी सातूच्या पीठात तीळ, तिखट, मीठ, जिरेपूड, ओवा, हळद, हिंग, तेल इत्यादी घालून, ते भिजवून त्याच्या थालिपीठासारख्या छोट्या आकाराच्या चाणक्या तव्यावर परतून घेता येतात.
सातूचं पीठ हे पौष्टीक आणि थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत न्याहारी म्हणून आवर्जून खाल्लं जातं.
No comments:
Post a Comment