मी जिथे माझ्या झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत, तिथे फार सूर्यप्रकाश येत नसल्याने, पूर्वी झाडांना दिवसातून एकदा पाणी घातलं तरी ते पुरेसं व्हायचं. पण सध्या मी लावलेली जास्वंदाची झाडं चांगलीच फोफावून गॅलरीच्या ग्रीलबाहेर वाढल्याने, त्यांना भरपूर ऊन मिळतं आणि वाढीच्या प्रमाणात आता त्या झाडांना पाणीही भरपूर लागतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्या झाडांना दिवसातून दोनदा पुरेसं पाणी घातलं नाही, तर लगेच कुंडीतली माती कोरडी पडून झाडांच्या फांद्या आणि पानं मलूल झालेली दिसायची.
उन्हाळ्यात झाडांना पुरेसं पाणी मिळावं म्हणून काहीजण छिद्रं पाडलेल्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या कुंड्यांमध्ये रोवून ठेवतात, म्हणजे त्या बाटल्यांमधून कुंडीतल्या मातीत थोडंथोडं पाणी झिरपत राहतं. पण माझ्याकडे भरपूर कुंड्या असल्याने प्रत्येक कुंडीत अशी बाटली ठेवायची झाली, तर रोज त्या बाटल्यांमध्ये पाणी भरणं हा एक वेळखाऊ उद्योग होऊन बसेल, म्हणून मी तो पर्याय बाद केला.
मला माहिती असलेला दुसरा पर्याय म्हणजे पाणी शोषून, ते धरून ठेवणारी आणि आवश्यकतेप्रमाणे ते मातीत झिरपू देणारी जलधारक जेल. या जेलचा / जेलीचा वापर मी आधीही काही वर्षांपूर्वी केला होता आणि तिचा वापर उपयुक्त ठरला होता. आताही या वर्षी झाडांसाठीची जेल वापरायची असं मी ठरवलं होतं. पण आजूबाजूच्या परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार्या झाडं, फुलं, फळांच्या तीनचार प्रदर्शनांपैकी एकाही प्रदर्शनाला मला जाता आलं नव्हतं, त्यामुळे दूरच्या नर्सरीत जाऊन जेल आणावी लागणार होती. पण सुदैवाने मला हवी होती तेवढी जेलची पाकीटं मला घरपोच आणून दिली गेली आणि काही दिवसांपूर्वी मी सर्व कुंड्यांमध्ये जेल घातली. आता कुंड्यांना दिवसातून एकदाच भरपूर पाणी घातलं, तरी ते झाडांना पुरेसं ठरतंय.
ही झाडांसाठीची जेल मला उपयुक्त वाटली, तसंच आत्तापर्यंत तिचा जेवढा वापर केला आहे, त्या कालावधीत तिचा काही वाईट साईड इफेक्ट दिसून आला नाही. ही जेल नर्सरीमध्ये कोरड्या स्फटीक स्वरुपात मिळते किंवा पाणी घातलेल्या रंगीत जेलीच्या स्वरुपातही मिळते. मोठ्या प्रमाणात या जेलचा वापर करायचा असेल, तर ती स्फटीक स्वरुपात (जेल क्रिस्टल) घेणे योग्य ठरते. उन्हाळ्यात कुंडीतल्या मातीत ओलावा रहावा म्हणून ही जेल वापरायची असेल, तर त्यासाठी कुंडीतली माती प्रथम खुरप्याने भुसभुशीत करून घ्यावी. मग त्या मातीवर झाडाभोवती जेलचे स्फटीक घालावेत. (जेलचे स्फटीक थोडे थोडे घालावेत, पाणी घातल्यानंतर ते अनेकपटींनी फुगून मोठे होतात.) मग या स्फटीकांवर थोडी माती टाकून ते मातीने झाकावेत. (मातीने झाकलेले असले, तरीही कधीकधी हे स्फटीक पाण्याने फुगून मातीच्या वरती येतात.) स्फटीक घातल्यानंतर मातीवर पहिल्यांदा पाणी ओततांना काळजीपूर्वक हळूहळू पाणी ओतावे. (जास्त पाणी घातल्यास त्याने स्फटीक मातीवर येऊन कुंडीबाहेर जाण्याची शक्यता असते.) हे स्फटीक पाणी शोषून घेतात व अनेकपटींनी मोठे होतात, हे स्फटीक दीर्घकाळ पाणी धारण करून ठेवतात आणि माती कोरडी पडायला लागली, की त्यातले पाणी हळूहळू मातीत झिरपून माती ओली राहते. झाडांना रोज पाणी घातल्यामुळे, हे स्फटीक रोज नव्याने पाणी शोषून घेतात व रोज ते नव्याने मातीत झिरपू देतात, त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर ह्या स्फटीकांची जलधारण क्षमता (काही वर्षं) संपते, तेव्हा मातीत नव्याने जेलचे स्फटीक घालावे लागतात.
No comments:
Post a Comment