--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Tuesday, April 22, 2014

मतदार याद्या आणि ओळखपत्रांचा घोळ

     काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पुण्यातल्या जुन्या मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाल्याचा प्रकार निदर्शनाला आला होता. ते ऐकून मला फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण निवडणूक आयोगातर्फे नेमण्यात आलेले मतदारांची माहिती गोळा करणारे काही शैक्षणिक कर्मचारी माझ्या परिचयाचे होते आणि त्यांच्यामुळे मला मतदार याद्या आणि ओळखपत्रं बनवण्याचं काम कसं चालतं याची थोडी माहिती मिळालेली होती.

     मी त्यावेळी म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडून जे काही ऐकलं होतं, त्याप्रमाणे मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सरकारी, निमसरकारी कर्मचारी नेमले जातात. त्यापैकी शैक्षणिक संस्थांमधले कर्मचारी नेमत असतांना बरेचदा शैक्षणिक संस्थेत नेमके किती कर्मचारी आहेत आणि त्या शैक्षणिक संस्थेचं किमान दैनंदिन काम चालू राहण्यासाठी तिथे किती कर्मचारी राहणे आवश्यक आहे, याचाही विचार केला जात नाही. त्यामुळे कधीकधी एखाद्या शैक्षणिक संस्थेमधले  बहुतेक सर्व लिपिक, शिपाईही निवडणुकीच्या कामासाठी नेमले गेल्यामुळे त्या संस्थेची कार्यालयीन कामं काही महिन्यांसाठी प्रलंबित राहण्याचे प्रकारही घडलेले मी ऐकले आहेत. पण जर त्या कर्मचार्‍यांनी निवडणूक आयोगाचं हे काम नाकारलं तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाते, त्यामुळे कार्यालयीन कामं बाजूला टाकून त्या कर्मचार्‍यांना निवडणुकीचं काम करावंच लागतं.

     या कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी विशिष्ट विभाग नेमून दिलेले असतात. यातल्या काही विभागांमध्ये या कर्मचार्‍यांना थेट मतदारांच्या घरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करावी लागते आणि मतदारयाद्यांमधली माहिती अद्ययावत करण्याचे काम करावे लागते. माझ्या परिचयातले हे काम करणारे कर्मचारी काही वर्षांपूर्वी निवडणुकीचं काम करत होते आणि त्यांच्या विभागात लागोपाठ काही कालावधीनंतर वेगवेगळ्या स्तरावरच्या तीन निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे एका निवडणुकीचं काम संपलं, की त्यांना दुसर्‍या निवडणुकीसाठी पुन्हा मतदारयाद्यांची माहिती अद्ययावत करण्याचं काम करावं लागत होतं. यापैकी काहीजणांची निवृत्ती जवळ आली होती, त्यांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे विविध शारीरिक व्याधींना तोंड द्यावं लागत होतं, पण तरीही त्यांच्या विभागातल्या चारपाच मजली सर्व इमारतींचे जिने चढून जाऊन, प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्याची माहिती गोळा करणं हे त्यांच्यासाठी अनिवार्य होतं.

     त्यांना ही माहिती गोळा करतांना अनेक बरेवाईट अनुभव येत होते. कधीकधी लोक तोंडावर दार आपटून घेऊन लावत असत. तसंच एका फेरीत एका इमारतीतले सगळे लोक कधीच भेटत नसत. त्यामुळे सगळ्यांना भेटून त्यांची माहिती गोळा करण्यासाठी एका इमारतीत किमान चारपाच वेळा तरी जावं लागत असे. प्रत्येकाच्या घरी पुन्हा वेगवेगळे अनुभव येत असत. काही घरी लोक पटकन पाणी प्यायलाही देत नसत, त्यामुळे त्यांना स्वतःची पाण्याची बाटली जवळ बाळगावी लागत असे. काही ठिकाणी लोक आधीच्या मतदारयादीतल्या त्यांच्या नावाचा घोळ झाल्यामुळे या निवडणूक कर्मचार्‍यांशी वाद घालत त्यांना सहकार्य करण्याचे नाकारत असत. एका घरात तर एक वेडसर दिसणारी, बहुधा डोक्यावर परिणाम झालेली एक वृद्ध महिला घरात एकटीच होती, तिने या कर्मचार्‍यांना घरात बोलावले, पण ते घरात आल्यावर तिने विचित्र हातवारे करत, ओरडत हातात काहीतरी उचलून घेतले आणि ती ते फेकून मारेल या भीतीने निवडणूक कर्मचार्‍यांना तिच्या घरातून पळ काढून बाहेर पडावं लागलं.

     असे बरेवाईट अनुभव घेऊन या निवडणूक कर्मचार्‍यांनी त्यांचे काम पूर्ण करून ते प्रत्यक्ष मतदारयाद्या आणि ओळखपत्रे बनवण्यासाठी नेमलेल्या एजन्सीकडे सुपूर्त केले. पण जेव्हा पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना काम करायची वेळ आली, तेव्हा त्यांनी आधी गोळा केलेल्या अद्ययावत माहितीप्रमाणे मतदारयाद्यांमधल्या आणि ओळखपत्रांमधल्या सगळ्या चुका दुरुस्त झालेल्या नाहीत असे त्यांच्या निदर्शनाला आले. जिथे चुका दुरुस्त केलेल्या होत्या, तिथे दुसर्‍या प्रकारच्या नवीन चुका झालेल्या दिसत होत्या. पुढच्या निवडणुकीच्या वेळीही त्यांना असाच अनुभव आला. अर्थात हे सारे मी त्यांच्याकडून ऐकलेले होते. आमच्या विभागात असे निवडणूक कर्मचारी कधीच माहिती गोळा करण्यासाठी घरी आलेले नव्हते.

     मात्र यावेळी आमच्या विभागात निवडणूक कर्मचारी म्हणून काम करणार्‍या एक शिक्षिका मतदारयाद्यांची माहिती घेण्यासाठी आमच्या घरी आल्या. त्यांनी नवीन निवडणूक ओळखपत्र बनवण्यासाठी प्रत्येकाचे दोन फोटो मागितले. तेव्हा सगळ्यांचे फोटो उपलब्ध नव्हते. त्यावर त्या बाईंनी, ’त्या फोटो घेण्यासाठी आठदहा दिवसांनी येतील,’ असं सांगून ठेवलं. पुढच्या वेळीही त्या आल्या तेव्हा काहीजणांचे फोटो काढून आणलेले नव्हते. त्या बाई आधी आल्या होत्या, तेव्हा काहीजणांच्या दाराला कुलूप लावलेलं होतं, नंतरही त्या आल्या तेव्हाही ते लोक कामावर गेलेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्या बाईंनी आम्हांला विचारलं, की ’त्या परत येतील, तेव्हा बाकीच्यांचे फोटो आणि  आधीच्या निवडणूक ओळखपत्रातल्या चुकांची दुरुस्ती केलेले कागदपत्र आम्ही आमच्या घरी ठेवून घेऊन, त्या आल्यावर त्यांना देऊ शकू का?’ आम्ही होकार दिल्यानंतर त्या बाई माहिती घेण्यासाठी पाचसहा वेळी आमच्या घरी आल्या आणि आमच्या इमारतीत राहणार्‍या बर्‍याचशा लोकांची अद्ययावत केलेली माहिती त्यांनी आमच्यादेखतच त्यांच्याकडच्या फॉर्ममध्ये लिहून घेतली. प्रत्येकाच्या फोटोपाठीमागे त्याचे नाव लिहून घेतले. त्याशिवाय आमच्या सोसायटीतल्या इतर इमारतींमध्ये राहणार्‍या ज्या इतर लोकांची माहिती त्यांना मिळू शकली नव्हती, त्याबद्दलही त्यांनी आमच्याकडे चौकशी केली. त्या बाईंनी अनेक फेर्‍या मारून अतिशय मेहनत करून मतदारयादीतल्या माहितीत त्यांच्याकडून काही चूक राहू नये याची दक्षता घेत त्यांचं काम केलं.

     काल त्या बाई पुन्हा आमच्या घरी आल्या. आम्हांला नवीन निवडणूक ओळखपत्रं मिळाली का, याची त्यांनी चौकशी केली. आमची नवीन निवडणूक ओळखपत्रं अजून आम्हांला मिळालेली नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. मग त्यांनी आमच्या सोसायटीतल्या सगळ्यांच्याच निवडणूक आयोगातर्फे जारी केलेल्या, फोटो असलेल्या निवडणूक ओळखपत्रांच्या फोटोप्रती आमच्याकडे दिल्या. त्या फोटोप्रती पाहून, निवडणूक ओळखपत्रं तयार करणार्‍या एजन्सीने (किंवा संस्थेने) त्या बाईंच्या सगळ्या मेहेनतीवरती पाणी फिरवलेलं आहे, हे अगदी स्पष्ट दिसत होतं. त्या बाईंचं काम प्रत्यक्ष पाहिल्यामुळे चूक एजन्सीचीच (किंवा संस्थेचीच) आहे, हे आम्हांला वेगळं सांगायची गरज नव्हती. एकाच घरातल्या तीन व्यक्तींची आडनावं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेली असणं आणि त्यातलं एकही बरोबर नसणं, सुनेच्या ओळखपत्रावर सासर्‍याचा फोटो लावणं, पुरुषाच्या ओळखपत्रावर स्त्रीचा फोटो लावणं, नावं आणि पत्ते चुकीचे लिहिलेले असणं अशा सर्व प्रकारच्या चुका केलेल्या त्या फोटोप्रतींमध्ये दिसत आहेत. ओळखपत्रावर स्त्री किंवा पुरूष असा स्पष्ट उल्लेख असतांनाही, स्त्रीच्या ओळखपत्रावर पुरूषाचा फोटो आणि पुरूषाच्या ओळखपत्रावर स्त्रीचा फोटो ह्या चुका मुद्दाम जाणूनबुजून केल्यासारख्या वाटत आहेत.

     आधी ऐकलेला आणि आता प्रत्यक्ष हा प्रकार घडलेला अनुभवल्यानंतर असा प्रश्न मनात उभा राहिला आहे, की निवडणूक ओळखपत्रांचं आणि मतदारयाद्या अद्ययावत करण्याचं काम कधी कमी होऊच नये या उद्देशानेच या चुका घडवून आणल्या जात असाव्यात की काय आणि त्यासाठी प्रत्यक्ष माहिती गोळा करणार्‍या कर्मचार्‍यांची सगळी मेहेनत फुकट घालवली जात असावी की काय? तसं असेल, तर हा वेळेचा आणि पैशाचा सरळसरळ अपव्यय आहे आणि प्रत्यक्ष गोळा केलेल्या माहितीपेक्षा जर तयार केलेल्या मतदारयाद्यांमध्ये आणि निवडणूक ओळखपत्रांमध्ये काही विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त चुका आढळल्यास ते तयार करणार्‍या एजन्सीवर किंवा संस्थेवर सरकारने कारवाई करून त्यांना चुकींच्या प्रमाणात दंड आकारावा म्हणजे ह्या अपप्रकारांना आळा बसेल.       

Monday, April 21, 2014

काळा मसाला

     मसाले पदार्थांना चव आणतात, पण मसाले तयार करतांना त्यात वापरले जाणारे पदार्थ आणि त्यांचे प्रमाण प्रत्येक घरागणिक बदलतात. म्हणून आमच्या घरी केल्या जाणार्‍या काळ्या मसाल्याची कृती आणि प्रमाण खाली देत आहे. ह्या काळ्या मसाल्यातला प्रमुख घटक धणे असून हा काळा मसाला कमी तिखट असतो. हा मसाला करतांना मसाल्यातले घटक पदार्थ भाजले जातात आणि त्यामुळे ह्या मसाल्याला काळपट रंग येतो, म्हणून ह्या मसाल्याला काळा मसाला म्हंटले जाते. गोडा मसाला हा काळ्या मसाल्यापेक्षा वेगळा असतो, कारण गोडा मसाला करतांना त्यातले घटक पदार्थ न भाजता, ते एकत्र करून तसेच दळले जातात.   

साहित्य -
१. धणे - १/२ किलो
२. बेडगी / ब्याडगी मिरच्या - १/४ किलो
३. जिरे - एक वाटी भरून (२५० मिली आकाराची वाटी)
४. शहाजिरे - २० ग्रॅम
५. दगडफूल - २० ग्रॅम
६. नागकेशर - २० ग्रॅम
७. चक्रीफूल / बादयान - २० ग्रॅम
८. जायपत्री / जावित्री - २० ग्रॅम
९. मिरे - २० ग्रॅम
१०. लवंगा - २० ग्रॅम
११. मसाल्याची मोठी वेलची - २० ग्रॅम
१२. तमालपत्र - २० ग्रॅम
१३. खडा हिंग पावडर - १ टीस्पून (५ ग्रॅम)
१४. सुक्या खोबर्‍याचा कीस - दोन वाट्या भरून (२५० मिली आकाराची वाटी) - ऐच्छिक
१५. तीळ - एक वाटी भरून (२५० मिली आकाराची वाटी) - ऐच्छिक
१६. मीठ - अर्धी वाटी भरून (२५० मिली आकाराची वाटीमसाल्यासाठी आणि अधिक एक चमचाभर मीठ बरणीच्या तळाशी घालण्यासाठी
१७. तेल - अर्धी वाटी भरून (२५० मिली आकाराची वाटी)

दगडफूल, धणे (प्रमाणानुसार नाहीत), जिरे, शहाजिरे, जायपत्री, लवंगा
   
तमालपत्र, दालचिनी, मसाल्याची मोठी वेलची, चक्रीफूल, मिरे, नागकेशर
   
बेडगी / ब्याडगी मिरच्या (प्रमाणानुसार नाहीत)
  
कृती -
१. मसाल्याचे पदार्थ कडकडीत उन्हात चांगले वाळवून घ्यावेत.
२. मसाल्याचे पदार्थ नीट निवडून घ्यावेत.
३. सुक्या खोबर्‍याचा कीस, तीळ आणि जिरे हे स्वतंत्रपणे कढईत कोरडे भाजून घ्यावे.
४. तापलेल्या कढईत थोडे तेल घालून त्यात खडा हिंगाची पावडर घालून लगेच गॅस बंद करावा आणि ते मिश्रण एका भांड्यात वेगळे काढून ठेवावे.
५. मग लहान चमचाभर तेल कढईत टाकून त्यात बाकीचे मसाल्याचे पदार्थ स्वतंत्रपणे भाजून घ्यावेत. मिरच्यांचा ठसका बसत असल्याने त्या सगळ्यात शेवटी थोडे थोडे तेल घालून भाजून घ्याव्या. 
६. भाजलेले सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून दळून घ्यावेत आणि दळलेले मसाले कणीक चाळायच्या चाळणीतून चाळून घ्यावेत.
७. चाळणीत मसाल्याचे मोठे तुकडे उरलेले असतील तर ते पुन्हा थोडे भाजून घ्यावे. (मसाला नीट भाजला न गेल्यास असे मोठे तुकडे राहतात.)
८. भाजलेले मोठे तुकडे आणि चाळणीत उरलेली भरड पुन्हा मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यावी.
९. दळलेला सगळा मसाला आणि मीठ एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे.
१०. मसाला व्यवस्थित गार झाल्यावर मसाला भरण्यासाठी बरणी घेऊन तिच्या तळाशी मीठाचा थर पसरावा आणि त्यावर सगळा मसाला भरावा. (मसाला खराब होऊ नये म्हणून हा मीठाचा थर तळाशी घालतात. मसाला संपत येईल त्यावेळी हा मीठाचा थर हलवून मसाल्यात मिक्स करून टाकावा.)

अर्धवट तयार झालेला मसाला
   
टीपा -
१. ज्यांना तिखट चवीचा मसाला करायचा असेल, त्यांनी इथे दिलेल्या प्रमाणापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात मिरच्या वापराव्यात आणि त्या मिरच्यांमध्ये तिखट मिरच्यांचा वापर करावा.  उदा. १/४ किलो बेडगी / ब्याडगी मिरच्या + १/४ किलो तिखट मिरच्या. जास्तीच्या मिरच्यांच्या प्रमाणात मसाल्यातील मिठाचे प्रमाण वाढवावे.
२. सुक्या खोबर्‍याचा कीस आणि तीळ मसाल्यात घातल्यानंतर तो मसाला दमट हवेत पुढे खवट होऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ वगळून मसाला केला तरी चालू शकतो. भाजीत हे दोन्ही पदार्थ वरून घालता येतात. मात्र कोरड्या हवेतला मसाला लवकर खवट होत नाही.
३. जे गिरणीतून मसाला दळून घेतात त्यांना ह्या मसाल्यात तेलावर भाजलेली एकदोन हळकुंडेही घालता येतील.
४. ह्या मसाल्यात घालण्यासाठी खडा हिंग उपलब्ध नसल्याने खडा हिंगाची पावडर वापरलेली आहे. पण पावडरीऐवजी खडा हिंग उपलब्ध असल्यास, खडा हिंग किंचित तेलात भाजून घ्यावे आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. 
५. ह्या मसाल्यात मीठ प्रिझर्व्हेटीव म्हणून वापरले आहे. जे मसाल्यात मीठ घालत नाहीत त्यांनी मसाल्यात मीठ घातले नाही, तरी चालेल, मात्र बरणीच्या तळाशी मीठाचा थर अवश्य द्यावा.
   

Sunday, April 20, 2014

सातूचे पीठ

साहित्य -
गहू - १ किलो
डाळ्या ( पंढरपुरी डाळ्या) - १/२ किलो
वेलदोडे - १५ ते २०
(काहीजण वेलदोड्यांऐवजी जिरे आणि सुंठ पूड वापरतात)

कृती -
१. गहू आणि डाळ्या निवडून घ्याव्या.
२. गहू पचायला हलके व्हावेत म्हणून त्यांचा वरवरचा कोंडा काढून घ्यावा लागतो. त्यासाठी गहू ताटात काढून त्याला पाण्याचा हात लावून ते ओले करून घ्यावेत आणि दहापंधरा मिनिटांकरता तसेच ठेवून द्यावेत. कोंडा दोन प्रकारे काढता येतो.
३. पारंपारिक पद्धतीने कोंडा काढण्यासाठी गहू खलबत्त्यात घालून थोडा कोंडा सुटेल, पण गव्हाचा दाणा तुटणार नाही अशाप्रकारे कांडून घ्यावेत आणि ताटात किंवा सुपात काढावेत. त्याऐवजी दुसर्‍या पद्धतीने कोंडा काढण्यासाठी फूड प्रोसेसरमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढण्यासाठी वापरण्यात येणारे ब्लेड लावावे आणि त्यात गहू टाकून ते फिरवून घ्यावेत. त्यात आवश्यकतेप्रमाणे किंचित पाणी घालावे. गव्हाचा दाणा मोडणार नाही इतपत पण भांड्यात सुटलेला कोंडा दिसायला लागेपर्यंत गहू फिरवून घ्यावेत आणि ताटात किंवा सुपात काढावेत.
४. ताटात किंवा सुपात काढलेले गहू कोरडे होऊ द्यावेत, मग ते पाखडून त्यातला कोंडा फटकारून काढून टाकावा.
५. गहू कढईत भाजून घ्यावेत. गहू किंचित तडतडायला सुरूवात झाली की ते एका भांड्यात काढून घ्यावेत.
६. डाळ्याही खमंग होण्यासाठी किंचित भाजून घ्याव्या.
७. वेलदोडे त्यांची सालं काळसर होईपर्यंत भाजून घ्यावेत.
८. भाजलेले गहू, डाळ्या आणि वेलदोडे एकत्र करून ते मिक्सरमधून दळून घ्यावेत. हे दळलेलं सातूचं पीठ नीट एकत्र करून घ्यावं.

  
सातूचं पीठ खायला देतांना दुधात किंवा पाण्यात कालवून देतात.
एक वाटी दूध किंवा पाण्यात दोन ते तीन लहान चमचे गूळ आणि दोन ते तीन लहान चमचे सातूचं पीठ घालून ते कालवून घ्यावे आणि खाण्यासाठी द्यावे.
यात गुळाऐवजी साखरही वापरता येते.
सातूच्या पीठाचे लाडूही करतात.
ज्यांना गोड सातूचं पीठ आवडत नाही त्यांच्यासाठी सातूच्या पीठात तीळ, तिखट, मीठ, जिरेपूड, ओवा, हळद, हिंगतेल इत्यादी घालून, ते भिजवून त्याच्या थालिपीठासारख्या छोट्या आकाराच्या चाणक्या तव्यावर परतून घेता येतात.
सातूचं पीठ हे पौष्टीक आणि थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत न्याहारी म्हणून आवर्जून खाल्लं जातं.

Saturday, April 19, 2014

चोरी? आणि काही प्रश्न

     काही दिवसांपूर्वी मी ब्लॉगवर "जलधारक जेलीविषयी" एक पोस्ट लिहिली होती. कुंडीतल्या मातीत झाडांभोवती ही जेली घातल्याने कुंडीतली माती उन्हाळ्यातही ओली राहते आणि झाडांना वारंवार पाणी घालावं लागत नाही म्हणून मला समाधान वाटत होतं, पण त्याच वेळी आमच्या इमारतीच्या आवारातल्या झाडांना पाणी घालता येत नाही ह्याची खंतही वाटत होती. इमारतीच्या आवारात असलेला पाण्याचा नळ गळायला लागल्याने आमच्या शेजार्‍यांनी तो नळ काढून तिथल्या पाईपला बूच मारून त्याचं तोंड बंद करून टाकलं होतं. त्यामुळे आवारात पाठीमागच्या बाजूला असलेल्या नळावरून कोणी बादल्या भरून ते पाणी आमच्या बाजूच्या झाडांना टाकेल, तेव्हाच त्या झाडांना पाणी मिळतं, इतर वेळी तिथली माती कोरडीच राहते. पण आवारातल्या त्या झाडांना पाणी घालायला मला अजिबात वेळ नव्हता.

     आधी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी रहायला आलेले पाहुणे, नंतर खास उन्हाळ्याच्या दिवसांत केल्या जाणार्‍या कामांची केलेली तयारी आणि नेमक्या त्याच वेळी मोलकरणीने घेतलेली प्रदीर्घ सुट्टी ह्यामुळे मला आवारातल्याच काय पण घरातल्या झाडांकडेही बघायला वेळ नव्हता. त्यामुळे घरातली जी व्यक्ती मोकळी दिसेल, तिला मी घरातल्या झाडांना पाणी घालण्याबद्दल सांगत होते. फक्त आठ दिवसांपूर्वी एकदा वेळ काढून मी कुंडीतल्या झाडांना खत घातलं होतं. त्यानंतर पाचसहा दिवसांनी सहज घरातल्या (म्हणजे गॅलरीच्या बॉक्स ग्रीलमधल्या) झाडांकडे माझं लक्ष गेलं, तर झाडांभोवतालची माती कोरडी पडलेली दिसत होती, जेलीचे स्फटीकही बहुधा पाणी झिरपून गेल्याने बारीक होऊन मातीत दिसेनासे झालेले होते. मी घरात चौकशी केली, तर झाडांना वेळच्यावेळी पाणी घातल्याचं मला सांगण्यात आलं. मग मी झाडांना दिवसातून दोनदा पाणी घालण्याची सूचना केली.

     शेवटी काल मला जरा उसंत मिळाली, तेव्हा मी गॅलरीत उभी राहिले आणि झाडांचं निरिक्षण केलं. स्पॅथीफायलमच्या पांढर्‍या तुर्‍यांनी माना टाकल्या होत्या, पुरेसं पाणी न मिळाल्याने काही झाडांची पानंही गळून गेल्यासारखी झाली होती. एकूण एक सगळ्या कुंड्यांची माती कोरडी पडलेली दिसत होती आणि त्यातले जेलीचे स्फटीकही कुठे दिसत नव्हते. काही झाडांची मुळं जेलीच्या स्फटीकातलं पाणी शोषून घेण्यासाठी मातीवर आलेली होती, ती आता उघडी पडलेली दिसत होती. ते पाहून मी वैतागाने झाडांना पाणी घालण्यासाठी पाणी भरून आणलं आणि आधी प्रत्येक झाडाला थोडंथोडं पाणी घातलं, मग पुन्हा एकदा व्यवस्थित पाणी घातलं, पण कोणत्याच कुंडीतले जेलीचे स्फटीक फुगून वरती आले नाहीत. मी वैतागून झाडांना अजून पाणी घातलं, पण जेली कुठे दिसेना. फक्त दोन कुंड्यांमध्ये एका बाजूला जेलीचे काही स्फटीक फुगलेले दिसले. मग बाकीची जेली गेली कुठे?

     अति पाणी घातल्याने जेली कुंडीबाहेर वाहून गेली असती, तरी कुंडीतली सगळी जेली नाहीशी झाली नसती. शिवाय खालच्या आवारातल्या जमिनीवर त्याचे गोळे पडलेले दिसले असते. मी पुन्हा एकदा घरातल्या सगळ्यांना विचारलं, तर त्यांनी मला हेच सांगितलं, की जेली वाहून जाऊ नये म्हणून झाडांना पाणी घालतांना ते सगळेजण काळजीपूर्वकच पाणी घालत होते. मग सगळ्या वीसबावीस लहानमोठ्या कुंड्यांमधली जेली गेली कुठे? इमारतीच्या आवारात उभं राहून आमच्या गॅलरीच्या बॉक्स ग्रीलमध्ये सहज हात घालता येत असला, तरी कोणी असे उद्योग सहज करू शकणार नाही. ग्रीलच्या किचकट नक्षीमुळे त्यात हात घालून कुंडीतली सगळी जेली बाहेर काढणं कोणत्याही व्यक्तीला सहज शक्य होणार नाही, त्यासाठी खूप वेळ लागेल, कोणी तसं करायचा प्रयत्न केला असता, तर ते सहज लक्षात आलं असतं, शिवाय सगळी जेली इतक्या सफाईने काढता येणं शक्यच नव्हतं, ती मध्येच कुठेतरी ग्रीलला चिकटलेली दिसली असती. म्हणजे हे कोणा माणसाचं काम नक्कीच नव्हतं.

     हे मुंग्यांचं काम असतं, तर जेलीचे गोळे नेणार्‍या मुग्यांची रांग सहज दिसली असती आणि सगळी जेली न्यायला मुग्यांना इतका कमी वेळ पुरला नसता. मग मनात विचार आला,’हे उंदराचं काम तर नव्हे?’ हे मात्र शक्य होतं. आमच्या इमारतीच्या आवारात झाडांच्या एका वाफ्यात उंदराचं (की घुशीचं?) बीळ आहे. बिळातले उंदीर चांगले मोठे आहेत, बहुधा त्या घुशीच असाव्यात. ह्या घुशींना पकडण्यासाठी काही मांजरी नियमितपणे आवारात हजेरी लावत असतात, पण मांजरींनी घुशींना पकडून बीळ साफ केलं, तरी काही दिवसांनी नवीन घुशी त्या बिळात वास्तव्याला आलेल्या दिसतात. संध्याकाळी सहाच्या सुमाराला घरात डास येऊ नयेत म्हणून गॅलरीच्या ग्रीलच्या आतल्या बाजूला असलेल्या सरकत्या काचा आणि जाळ्या आम्ही लावून घेतो. जेव्हा क्वचित कधीतरी उंदरांचा सुळसुळाट झालेला असतो, तेव्हा एखादा उंदीर किंवा बिळातली एखादी घूस संध्याकाळी बंद केलेल्या काचांपलिकडच्या बाजूने बाहेरच्या बॉक्स ग्रीलमधल्या कुंड्यांमध्ये बागडतांना दिसतात, पण क्वचितच!

     आत्ताही उंदीर किंवा घुशी संख्येने फार नाहीत, पण आवारातल्या झाडांना हल्ली पाणी घातले जात नसल्याने तहानेले होऊन त्यांच्यापैकी कोणी बॉक्स ग्रीलमधल्या कुंड्यांकडे मोर्चा वळवला असावा आणि ओली लुसलुशीत जेली दिसल्यावर ती खाऊन टाकली असावी किंवा पिल्लांसाठी बिळात नेली असावी, म्हणूनच कुंड्यांमध्ये नावाला सुद्धा जेली शिल्लक राहिली नाही. झाडांना जेली घालून जेमतेम पंधरा दिवस सुद्धा झाले नाहीत, तेवढ्यात जेली नाहीशी झाली. आता नव्याने जेली घातली, तरी ती अशीच नाहीशी होणार नाही याची काय खात्री आहे? घरातल्या झाडांची काळजी इतर काही उपायाने घेता येईल, पण जर उंदरांनी किंवा घुशींनी ही जेली खाल्ली असेल, तर त्याचे त्यांच्यावर काय परिणाम होतील? त्या उंदीरघुशींना खाणार्‍या कावळे, कुत्री, मांजरे इत्यादी प्राण्यांवर त्याचा काय परिणाम होईल? ह्या जेलीचे काही दुष्परिणाम जैवसाखळीवर होणार नाहीत याचा संशोधकांनी काही अभ्यास केला असेल, तर ठीक आहे, नाहीतर डीडीटीप्रमाणे ह्या जेलीच्या दुष्परिणामांनाही आपल्याला सामोरं जावं लागेल!
         

Thursday, April 3, 2014

उन्हाळ्यात कुंडीतल्या झाडांसाठी उपयुक्त - जलधारक जेली

     मी जिथे माझ्या झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत, तिथे फार सूर्यप्रकाश येत नसल्याने, पूर्वी झाडांना दिवसातून एकदा पाणी घातलं तरी ते पुरेसं व्हायचं. पण सध्या मी लावलेली जास्वंदाची झाडं चांगलीच फोफावून गॅलरीच्या ग्रीलबाहेर वाढल्याने, त्यांना भरपूर ऊन मिळतं आणि वाढीच्या प्रमाणात आता त्या झाडांना पाणीही भरपूर लागतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्या झाडांना दिवसातून दोनदा पुरेसं पाणी घातलं नाही, तर लगेच कुंडीतली माती कोरडी पडून झाडांच्या फांद्या आणि पानं मलूल झालेली दिसायची.

     उन्हाळ्यात झाडांना पुरेसं पाणी मिळावं म्हणून काहीजण छिद्रं पाडलेल्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या कुंड्यांमध्ये रोवून ठेवतात, म्हणजे त्या बाटल्यांमधून कुंडीतल्या मातीत थोडंथोडं पाणी झिरपत राहतं. पण माझ्याकडे भरपूर कुंड्या असल्याने प्रत्येक कुंडीत अशी बाटली ठेवायची झाली, तर रोज त्या बाटल्यांमध्ये पाणी भरणं हा एक वेळखाऊ उद्योग होऊन बसेल, म्हणून मी तो पर्याय बाद केला. 

     मला माहिती असलेला दुसरा पर्याय म्हणजे पाणी शोषून, ते धरून ठेवणारी आणि आवश्यकतेप्रमाणे ते मातीत झिरपू देणारी जलधारक जेल. या जेलचा / जेलीचा वापर मी आधीही काही वर्षांपूर्वी केला होता आणि तिचा वापर उपयुक्त ठरला होता. आताही या वर्षी झाडांसाठीची जेल वापरायची असं मी ठरवलं होतं. पण आजूबाजूच्या परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार्‍या झाडं, फुलं, फळांच्या तीनचार प्रदर्शनांपैकी एकाही प्रदर्शनाला मला जाता आलं नव्हतं, त्यामुळे दूरच्या नर्सरीत जाऊन जेल आणावी लागणार होती. पण सुदैवाने मला हवी होती तेवढी जेलची पाकीटं मला घरपोच आणून दिली गेली आणि काही दिवसांपूर्वी मी सर्व कुंड्यांमध्ये जेल घातली. आता कुंड्यांना दिवसातून एकदाच भरपूर पाणी घातलं, तरी ते झाडांना पुरेसं ठरतंय.

आधी आकाराने युरीयाच्या दाण्यांपेक्षाही छोटे असलेले स्फटीक पाण्याने फुगून असे मोठे होतात आणि मातीवर येतात. जास्वंदाची नवीन पालवी आणि जेलचा आकार यांची तुलना केल्यास स्फटीक कितीपट फुगले आहेत, ते लक्षात येईल.

     ही झाडांसाठीची जेल मला उपयुक्त वाटली, तसंच आत्तापर्यंत तिचा जेवढा वापर केला आहे, त्या कालावधीत तिचा काही वाईट साईड इफेक्ट दिसून आला नाही. ही जेल नर्सरीमध्ये कोरड्या स्फटीक स्वरुपात मिळते किंवा पाणी घातलेल्या रंगीत जेलीच्या स्वरुपातही मिळते. मोठ्या प्रमाणात या जेलचा वापर करायचा असेल, तर ती स्फटीक स्वरुपात (जेल क्रिस्टल) घेणे योग्य ठरते. उन्हाळ्यात कुंडीतल्या मातीत ओलावा रहावा म्हणून ही जेल वापरायची असेल, तर त्यासाठी कुंडीतली माती प्रथम खुरप्याने भुसभुशीत करून घ्यावी. मग त्या मातीवर झाडाभोवती जेलचे स्फटीक घालावेत. (जेलचे स्फटीक थोडे थोडे घालावेत, पाणी घातल्यानंतर ते अनेकपटींनी फुगून मोठे होतात.) मग या स्फटीकांवर थोडी माती टाकून ते मातीने झाकावेत. (मातीने झाकलेले असले, तरीही कधीकधी हे स्फटीक पाण्याने फुगून मातीच्या वरती येतात.) स्फटीक घातल्यानंतर मातीवर पहिल्यांदा पाणी ओततांना काळजीपूर्वक हळूहळू पाणी ओतावे. (जास्त पाणी घातल्यास त्याने स्फटीक मातीवर येऊन कुंडीबाहेर जाण्याची शक्यता असते.) हे स्फटीक पाणी शोषून घेतात व अनेकपटींनी मोठे होतात, हे स्फटीक दीर्घकाळ पाणी धारण करून ठेवतात आणि माती कोरडी पडायला लागली, की त्यातले पाणी हळूहळू मातीत झिरपून माती ओली राहते. झाडांना रोज पाणी घातल्यामुळे, हे स्फटीक रोज नव्याने पाणी शोषून घेतात व रोज ते नव्याने मातीत झिरपू देतात, त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर ह्या स्फटीकांची जलधारण क्षमता (काही वर्षं) संपते, तेव्हा मातीत नव्याने जेलचे स्फटीक घालावे लागतात.