खडवली स्टेशनजवळच्या उशीद गावात राहणारे एक परिचित काल घरी आले होते. त्यांनी येतांना आमच्यासाठी दोन प्रकारच्या रानभाज्यांच्या जुड्या आणल्या होत्या. ह्या रानभाज्या आम्ही याआधी कधी पाहिलेल्या नव्हत्या. रानभाज्यांची नावे विचारल्यावर त्या परिचित व्यक्तीने त्यांच्या स्थानिक भाषेतली रानभाज्यांची नावे सांगितली. ती नावंही आम्ही कधी ऐकलेली नव्हती. मग मी त्या नावांवरून इंटरनेटवर शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्या भाज्यांची काही माहिती मिळाली नाही.
त्या दोन भाज्यांपैकी एकीची पानं हिरव्या रंगाची आणि मोठ्या आकाराची होती आणि त्या पानांचे देठ जाड रसदार होते. तर दुसरी भाजी ही भाजीपेक्षा लाल काड्यांची जुडी असल्यासारखीच वाटत होती. त्या जुडीतल्या लांब लालसर हिरव्या रंगाच्या काडीसारख्या खोडांवर अधूनमधून बारिकशी हिरवी पानं डोकावत होती. ती काड्यांसारखी जुडी पाहून, ती नक्की एखादी भाजी आहे ना याबद्दलच शंका वाटत होती. या दोन्ही भाज्यांबद्दल बाकी काही माहिती नसल्याने त्या जुड्यांची भाजी करू नये असंच वाटत होतं. ज्यांना ह्याबद्दल माहिती असेल असं वाटलं होतं, त्यांना त्या भाज्या दाखवल्या, पण त्यांनाही काही सांगता आलं नाही.
आज सकाळी शेजारच्या काकूंशी बोलतांना ह्या भाज्यांचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की ’त्यांची सून त्या स्थानिक परिसरातच वाढलेली आहे आणि तिने पूर्वी शेतावर कामही केलेलं आहे.’ तिला भाज्यांबद्दल विचारलं, तेव्हा तिला मोठ्या आकाराची हिरवी पानं असलेल्या भाजीबद्दल काही सांगता आलं नाही, पण लाल काड्यांच्या जुडीसारख्या दिसणार्या भाजीला ’घोळाची भाजी’ म्हणतात असं तिने सांगितलं. मग तिने सांगितलेल्या पद्धतीने घोळाची भाजी केली.
त्या जुडीतल्या शेवटी उरलेल्या काही काड्यांचे मी मोबाइलने फोटो काढले. त्यामुळे फोटो फारसे व्यवस्थित आलेले नाहीत. पण ऑफिस टाईमसारखी पाने असलेल्या दुसर्याही एका भाजीला घोळाची भाजी म्हणूनच ओळखलं जात असल्याने गोंधळ नको म्हणून मुद्दाम या घोळाच्या भाजीच्या काड्यांचे फोटो देत आहे. फोटोतल्या काही देठांचा रंग हिरवा दिसत असला, तरी जुडीतले बरेचसे देठ लाल रंगाचेच होते.
घोळाची भाजी -
साहित्य - घोळाची भाजी, तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लसूण, कांदा, तिखट, मीठ, मसाला, गूळ, दाण्याचं कूट.
कृती - घोळाचे कोवळे देठही भाजीत वापरतात, त्यामुळे कोवळ्या देठांचा खालचा भाग काढून टाकावा. निबर असलेले देठ काढून त्याची नुसतीच पाने घ्यावीत. घेतलेले कोवळे देठ व पाने नीट निवडून घेऊन, स्वच्छ धुवून घ्यावीत आणि चिरावीत. कांदा चिरून घ्यावा. लसूण ठेचून घ्यावा. मग फोडणीसाठी तेल घेऊन त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, ठेचलेला लसूण आणि कांदा घालून ते नीट परतून घ्यावे. कांदा परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालून परतून घ्यावी. भाजीला वाफ आली की त्यात तिखट, मीठ, मसाला, गूळ घालून ते सारखं करून घ्यावं. भाजी तयार झाली की त्यात वरून दाण्याचं कूट घालून भाजी हलवून घ्यावी.