राजू खूपच बारीक मुलगा होता. सगळे त्याला काडीपहिलवान
म्हणून चिडवत असत. त्याला नेहमी वाटायचं की चांगलं जाडंजुडं व्हावं. त्याकरता तो रोज
डॉक्टरांनी दिलेल्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायचा. ’गोळ्यांबरोबर पोळीभाजी पण खायला हवी.’ असं डॉक्टर सांगायचे. राजूला
भाज्या खायला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे गोळ्या घेऊनही राजू बारीकच राहिला होता.
आज तो शाळेत गेला असताना जाड्याजुड्या चिंटूने
त्याला काडीपहिलवान म्हणून चिडवलं होतं आणि एक जोरदार ठोसा पण ठेवून दिला होता. त्या
ठोशाने त्याचं सगळं अंग ठणकत होतं. पण बारीकसा राजू चिंटूला काहीच करू शकला नव्हता.
शाळेतून घरी आल्यावर चिंटूला कशी अद्दल घडवावी याचाच तो विचार करत होता.
जेवण झाल्यावर त्याला दुपारच्या वेळी झोप यायला
लागली. तेवढ्यात आई त्याला म्हणाली, "राजू,
हे शंभर रुपये ठेव. थोड्या वेळाने
आपला दूधवाला येईल त्याला दे. मी तुझ्याकरता चिवडा करुन ठेवते. मला माझ्या कामातून
उठवू नकोस." राजूने पैसे खिशात ठेवले आणि तो झोपला.
ठक्ठक्, ठक्ठक् दाराची कडी वाजत
होती. राजू उठला. दूधवाला आला असणार म्हणून त्यानं दार उघडलं. दारात कोणीतरी वेगळाच
माणूस उभा होता. तो राजूला म्हणाला, “मी मेडिसन कंपनीमधून आलोय. आमच्या कंपनीने काही गोळ्या तयार
केल्या आहेत. लाल बाटलीतल्या गोळ्या घेतल्यावर माणूस उंच आणि जाडा होतो. निळ्या बाटलीतल्या
गोळ्या घेतल्यावर माणूस बुटका आणि बारीक होतो. तुझ्यासारख्या मुलाला या गोळ्या घ्यायलाच
हव्यात.”
“काय? खरंच का या गोळ्या घेतल्यावर माणूस जाड होतो आणि तेही पोळीभाजी
खाल्ल्याशिवाय?” राजूने
आश्चर्याने विचारलं. “होय. एक वर्षाची गॅरंटी आहे.” “मग मला ह्या गोळ्या घेतल्याच पाहिजेत. पण आई रागवेल. ह्याची
किंमत पण जास्त असेल.” राजू म्हणाला. “तुझ्यासारख्या मुलाने ह्या गोळ्या घेतल्या तर आई अजिबात रागवणार
नाही. दोन्ही बाटल्यांची किंमत फक्त दहा रुपये आणि चुकून एखाद्या बाटलीतला गोळ्यांचा
डोस जास्त झाला तर दुसर्या बाटलीतल्या गोळ्या खायच्या.” त्या माणसानं सांगितलं.
राजूने उत्सुकतेनं दूधवाल्याच्या पैशांतून
दहा रु. देऊन त्या बाटल्या विकत घेतल्या. आईला अचानक आश्चर्यचकित करायचं ठरवून त्याने
लाल बाटलीतल्या पाच-सात गोळ्या भराभर खाऊन टाकल्या. आणि हे काय? एकदम त्याचं डोकं ठणकन् कशाला
तरी आपटलं. त्याने इकडेतिकडे पाहिलं, त्याचं डोकं छताला टेकलं होतं. त्याचा आकार अजूनही
वाढत होता. राजू आता त्या खोलीत मावत नसल्याने त्याच्या धक्क्याने घराची एक भिंत कोसळून
खाली पडली. तो आवाज ऐकून राजूची आई धावत बाहेर आली. राजूला बघून, “भूत, भूऽऽत धावा, वाचवा,” असं ओरडायला लागली.
“अगं आई, मी आहे तुझा राजू.” असं त्याने सांगायचा प्रयत्न केल्यावर भूत बोलतंय हे बघून तिला
चक्कर आली आणि ती सोफ्यावर कोसळली. तेवढ्यात शेजारच्या काकू आणि दोघंतिघंजण आपल्या
घराकडे येत आहेत हे बघून राजू तिथून बाहेर पडला. त्याला बघून सगळे घाबरले. राक्षस समजून
काही लोक त्याला दगड मारायला लागले. ते दगड राजूला फुलासारखे वाटत होते. “आता बघतो त्या चिंटूला. शाळेत
मला मारतो काय? पहा आता.” असं म्हणून राजू चिंटूच्या घराच्या दिशेने चालायला लागला.
चिंटू गॅलरीत चित्र काढत बसला होता.
राजू त्याच्या घराजवळ आला. त्याने आपले लांब हात गॅलरीत घालून चिंटूला उचललं. चिंटू
घाबरला, “सोड मला.
कोण आहेस तू? मला खाऊ नको.” असं ओरडायला लागला. “यापुढे शाळेतल्या राजूला त्रास देशील? मारशील त्याला?” राजूने रागाने विचारलं.
“नाही, नाही, सोड मला. चुकलं
माझं.” चिंटू त्याला विनवायला लागला.
राजूने चिंटूला अलगद चेंडूसारखं उडवलं. तो त्याला झेलणार इतक्यात एका हत्तीने चिंटूला
सोंडेत पकडलं. तो गावात आलेल्या सर्कसचा हत्ती होता. राजूने चिंटूला तिथून उचलून त्याच्या
घराच्या गच्चीवर ठेवून दिलं.
त्या हत्तीने समोरच्या एका दुकानातून
भलं मोठं आईस्क्रिमचं भांडं उचललं आणि राजूच्या हातात दिलं. आईस्क्रिम खात खात राजू
हत्तीवर बसला आणि घरी यायला निघाला. उंदरावर बसलेल्या गणपतीसारखा तो दिसत होता. घरासमोर
आल्यावर त्याच्या लक्षात आलं की, आई त्याला आता ओळखणार नाही. पुन्हा पूर्वीसारखं व्हायला
हवं. बागेत उभं राहून त्याने निळ्या बाटलीतल्या पाच-सात गोळ्या काढल्या आणि पटकन खाऊन
टाकल्या. पण डोस जरा जास्तच झाला होता. आता राजू एकदम छोटा झाला होता. इतका छोटा की
त्याला बागेतली गवताची पाती मोठ्या झाडांसारखी वाटत होती. त्याचं घर तिथून खूप दूर
होतं. एखाद्या भल्यामोठ्या पर्वतासारखं ते वाटत होतं. राजूला आता खूप भीती वाटू लागली.
त्याच्या हातातल्या बाटल्या पण खूप मोठ्या झाल्या होत्या. तो त्यांच्याखाली चेंगरलाच
असता. त्याने कशाबशा त्या बाटल्या त्याच्यापासून दूर जमिनीला टेकवल्या. आता त्या बाटल्यांमधल्या
गोळ्यांपर्यंत तो कधीच पोचू शकणार नव्हता आणि नेहमीसारखा होऊ शकणार नव्हता.
आईला न सांगता त्या गोळ्या विकत घेतल्याचा
राजूला आता पश्चाताप होत होता. एवढ्यात त्याला एक जेटविमान आणि एक हेलिकॉप्टर त्याच्या
दिशेने येताना दिसले. ते जवळ आल्यावर त्याला कळलं की जेटविमान म्हणजे एक फुलपाखरु आणि
हेलिकॉप्टर म्हणजे एक मधमाशी होती. “मला जरा मदत कराल का?” राजूने त्यांना विचारलं. “कोण बरं हा प्राणी? पूर्वी कधी पाहिला नव्हता इथे.” मधमाशी फुलपाखराला म्हणाली.
तिने सगळ्या प्राण्यांना हा नवीन प्राणी बघायला बोलावले. तिथे उंदीर, झुरळ, सरडा, पाल,
मुंग्या, माशा, फुलपाखरं आणि वेगवेगळे पक्षी जमा झाले. ते सगळे राजूपेक्षा मोठे आणि
भयानक दिसत होते. ह्या नवीन प्राण्याला निरखून पाहत होते.
“मी काही प्राणी नाही. मी त्या समोरच्या घरातला राजू आहे.” राजूने सांगितलं. “हाच नेहमी आम्हांला पकडतो.” फुलपाखरु म्हणालं. “हाच नेहमी आम्हांला दगड मारतो.” पक्षी म्हणाले. “मारा त्याला.” सगळे ओरडले. “मला मारु नका. मी चुकलो.
पुन्हा असं करणार नाही.” राजू ओरडला. पण सगळेजण त्याला मारायला येतच होते. तो गोळ्यांच्या
बाटल्यांकडे धावला. पण त्याचे हात गोळ्यांपर्यंत पोचत नव्हते. “वाचवा” तो जोरात ओरडला.
“काय झालं राजू? स्वप्न पडलं की काय?” आई त्याला विचारत होती.
तो घरातच होता. शंभर रुपये त्याच्या खिशात व्यवस्थित होते. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं
तर! “आता यापुढे मी कधीही नुसत्या
गोळ्या खाणार नाही. त्याऐवजी सगळ्या भाज्या खाईन. रोजचं सगळं जेवण जेवेन.” राजूने मनाशी निश्चय केला.
नोंद - (“ढिश्यांव
ढिश्यांव” – ’कल्पनारम्य विशेषांक’ १९९८
मध्ये प्रकाशित झालेली माझी ही बालकथा.)
No comments:
Post a Comment