साहित्य -
ओल्या नारळाचा चव - ४ वाट्या भरून (१५० मि.ली.ची वाटी)
काळ्या द्राक्षांचा (सालीसकट) रस - २ वाट्या
मिल्क पावडर - २ वाट्या
साखर - ३ वाट्या
पिठी साखर - २ टेबलस्पून
तूप - ताटाला लावण्यासाठी
सजावटीसाठी - बदाम - ५/६ बदाम किसलेले किंवा बारीक काप केलेले
कृती -
१. नारळ खवून त्याचा चव मिक्सरमधून जरा बारीक करून घ्यावा किंवा नारळाचे लहान तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
२. काळी द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यावी आणि ती सालीसकटच मिक्सरमध्ये टाकावी. मिक्सरमधून त्यांचा २ वाट्या रस करून घ्यावा.
३. एक कढईत नारळाचा चव, काळ्या द्राक्षांचा रस, मिल्क पावडर आणि साखर हे साहित्य एकत्र करून घ्यावे आणि मध्यम आचेवर गरम करावे. ह्या मिश्रणाला लांब दांडीच्या चमच्याने हलवत राहावे. सुरूवातीला ह्या रसदार मिश्रणाला पाणी सुटून निळसर जांभळ्या रंगाचे हे मिश्रण उकळायला लागते व हळूहळू ते आटायला लागल्यावर त्याचा रंग तांबडट जांभळा होतो.
४. हे मिश्रण जरा घट्ट होऊन कढईच्या पृष्ठभागापासून सुटे व्हायला लागले, की त्यात पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण हलवत राहावे, म्हणजे ते लवकर आळते (घट्ट होते).
५. मिश्रण अजून घट्ट व्हायला लागले, की एका ताटाला तूप लावून घ्यावे.
६. मिश्रण पुरेसे घट्ट झाले झाले, की आच बंद करून कढईतले मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढून घेऊन ताटात सारखे पसरून घ्यावे.
७. ह्या मिश्रणावर किसलेल्या बदामाची पूड किंवा बदामाचे काप टाकून ते तूप लावलेल्या हाताने मिश्रणावर अलगद थापून घ्यावे.
८. २५ - ३० मिनिटांनी मिश्रण जरा थंड व्हायला लागले, की सुरीने वड्यांचे काप पाडून घ्यावेत.
९. मिश्रण पूर्ण थंड झाले, की मगच वड्या वेगळ्या करून काढाव्यात.
१०. ह्या वड्यांना आतून मनुकांच्या गरासारखा किंचित चिकटपणा असतो, म्हणून ह्या वड्या एका डब्यात घालून, त्या डब्याचे झाकण लावून तो डबा ३-४ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावा. डबा फ्रीजमधून बाहेर काढल्यावर वड्या सामान्य तापमानाला आल्या की खाण्यासाठी तयार होतात.
टीप - ह्या वड्या नेहमीसाठी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमधून काढलेल्या थंड वड्या लगेच खाल्या तर त्या चिवट लागतात. ह्या वड्या सामान्य तापमानाला असतांना खाल्या तर त्यांचा स्वाद अधिक वाढतो.
नोंद - "मेजवानी २०१२" - मिष्ठान्ने विशेषांकांत प्रकाशित.
नोंद - "मेजवानी २०१२" - मिष्ठान्ने विशेषांकांत प्रकाशित.
No comments:
Post a Comment