टेरॅरियम म्हणजे बरणीतला बगिचा किंवा बंदिस्त काचपात्रातील वाढवलेली झाडे.
लंडनमधील एक आरोग्यचिकित्सक डॉ. नॅथनील वॉर्ड यांच्या हातून अपघातानेच या काचपात्रातील बगिचाचा शोध लावला गेला. डॉ. वॉर्ड यांच्या परसबागेत नेच्यांची खडकबाग (रॉकरी) होती, पण प्रदूषित हवेमुळे ते नेचे मरत होते. डॉ. वॉर्ड फुलपाखरं आणि त्यांचे कोष यांचा अभ्यास करत होते आणि एकदा प्रयोग करतांना त्यांनी थोड्या ओल्या मातीसकट एक फुलपाखराचा कोष, एका काचेच्या बंदिस्त बरणीमध्ये ठेवला. त्यांनी त्याचे नियमित निरिक्षण केले आणि त्यांना आढळून आले, की काही दिवसांनी त्या मातीतून एक नेचा आणि एक गवताचे रोपटे उगवले होते. त्यावेळी त्यांच्या परसबागेतील अनेक झाडे प्रदूषणामुळे मरत असतांना, ही बंदिस्त अवस्थेतली झाडे मात्र चांगलीच तरारली होती. त्यानंतर त्यांनी बंदिस्त काचपात्रांमधल्या नेच्यांवर अनेक यशस्वी प्रयोग केले आणि ते नेचे वाढवले. ही बंदिस्त काचपात्रे नंतर चांगलीच लोकप्रिय झाली आणि वॉर्डियन केसेस म्हणून ओळखली जाऊ लागली, हेच ते पहिले टेरॅरियम म्हणजेच काचपात्रातली बाग.
काचपात्रातल्या बगिच्याचे स्वतःचे असे एक स्वयंपूर्ण वातावरण असते. नीट जम बसलेल्या काचपात्रातल्या बगिचाला फक्त रोजच्या अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाची (उजेडाची / छायाप्रकाशाची) आवश्यकता असते. त्याला खूप काळापर्यंत पाण्याचीही आवश्यकता नसते. झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत निर्माण झालेला प्राणवायू (ऑक्सिजन) हा त्यांच्या श्वसनप्रक्रियेत शोषला जातो आणि श्वसनप्रक्रियेत निर्माण झालेला कर्बद्विप्राणिल वायू (कार्बन डायऑक्साइड) हा झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत वापरला जातो. त्याचप्रमाणे पानातून बाहेर पडणारी पाण्याची वाफ आणि मातीतील पाण्याची तयार होणारी वाफ काचपात्राच्या भिंतींवर व छतावर साचते व थंड होते. हे साचून थंड झालेले पाणी खाली ओघळते आणि पुन्हा माती ओली होते. ही एक सतत चालणारी साखळी पद्धतीची पुनरावर्ती क्रिया आहे. जोपर्यंत पात्राचे तोंड बंद आहे, तोपर्यंत ही क्रिया महिनोंमहिने चालूच राहते. श्वसन व प्रकाशसंश्लेषण क्रियेत निर्माण होणार्या पाणी, प्राणवायू आणि कर्बद्विप्राणिल वायूच्या पुनर्वापराच्या तत्वावर आधारलेला हा काचपात्रातला बंदिस्त बगिचा म्हणजे जणू काही पृथ्वीची छोटी प्रतिकृतीच असतो.
आता काचपात्रातला बगिचा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारची झाडे आणि काचपात्रे, इतर साहित्य आणि उपकरणे आवश्यक आहेत, ते पाहू -
काचपात्रातल्या बगिचासाठी वापरली जाणारी झाडे -
हवेतली आर्द्रता आवडणारी झाडे किंवा सावलीत (अर्धवट छायाप्रकाशात) वाढणारी झाडे, टांगत्या कुंड्यांमधली झाडे, आकर्षक विविधरंगी पानांची झाडे, मांसल, जाड, पण रसदार खोडाची झाडे (सक्युलंट), जमिनीलगत वाढणारी झाडे इत्यादी झाडे काचपात्रातल्या बगिचासाठी वापरली जातात. कमी ते मध्यम प्रकाशात (उजेडात / छायाप्रकाशात) वाढणारी झाडे उदा. नेचे (फर्न), बर्ड्स नेस्ट फर्न, अॅस्परॅगस फर्न, सिलॅजिनेला, भू-आवरणासारखे वाढणारे मॉसचे प्रकार, बर्ड नेस्ट सॅन्सिव्हिएरिआ, पिलिआ (पायलिआ) मायक्रोफायला, पिलिआ (पायलिआ) मुस्कोसा (मस्कोसा), पिलिआ (पायलिआ) कॅडीएरी उर्फ अॅल्युमिनिअम प्लांट, बेबीज टीअर्स उर्फ बाळाचे अश्रू, बिगोनिआ, पेप्रोमिआच्या विविध प्रजाती ही झाडे काचपात्रातल्या बगिचासाठी वापरली जातात. तसेच भरपूर प्रकाशात (उजेडात / छायाप्रकाशात) चांगली वाढणारी फिटोनिया (नर्व्ह प्लांट), बटन नेचा (बटन फर्न), अॅडीअॅंटम (मेडनहेअर फर्न), पार्लर पाम, बुटके वाढणारे पाम, ड्रॅसीना, मिनी आफ्रीकन व्हायोलेट्स, एपिसिया प्लांट, ब्रोमेलियाचे प्रकार (ब्रोमेलियाड्स), फॉल्स अरॅलिआ, गोल्डन मनी प्लांट (गोल्डन पोथॉज), स्वीडीश आयव्ही, वॉटरमेलॉन पेप्रोमिआ, ऑक्झॅलिस, क्लोरोफायटम (स्पायडर प्लांट) इत्यादी झाडेही काचपात्रातल्या बगिच्यात उत्तम वाढतात.
त्याचप्रमाणे कॅल्थिआ (पिकॉक प्लांट), मरांटा (प्रेअर प्लांट), इंग्लिश आयव्ही, जॅपॅनीज स्वीट फ्लॅग, अल्टर्नन्थेराच्या लाल आणि पांढर्या रंगाच्या प्रजाती (उदा. जॅकोब्ज कोट प्लांट), क्रोटन्स, लकी बांबू, अॅस्पिडिस्ट्रा इलॅटिऑर (कास्ट - आयर्न प्लांट), अरॅलिआ, डिफेनबॅकीया, अॅग्लोनिमा, सिंगोनियम प्लांट, फिलोडेन्ड्रॉन्स, पेलिओनिआ, पेलारगोनिअम (पिलारगोनिअम) प्रजाती, कॅलिसिआ (स्ट्राइप्ड इंच प्लांट), ट्रेड्स्कॅन्शिआ इत्यादी झाडे काचपात्रातल्या बगिच्यासाठी वापरली जातात. तसेच कॅक्टस व मांसल, जाड, पण रसदार खोडाची झाडे (सक्युलंट) या दोन प्रकारांमधली सिला (स्किला), सेडम, हॅवॉर्थिया, कॅलन्कोई (कॅलन्चोई), क्लोरोफायटम (स्पायडर प्लांट), बर्ड नेस्ट सॅन्सिव्हिएरिआ ही झाडे काचपात्रातल्या बगिचासाठी वापरली जातात.
जमिनीलगत वाढणारी किंवा कमी उंच वाढणारी झाडे उदा. नेचे (फर्न), पिलिआ (पायलिआ), पेप्रोमिआ, बिगोनिआ, ऑक्झॅलिस, स्पायडर प्लांट, फिटोनिया, अरॅलिआ, अल्टर्नन्थेराच्या लाल आणि पांढर्या रंगाच्या प्रजाती, सिलॅजिनेला, छोटा मनी प्लांट, इंग्लिश आयव्ही, कॅलिसिआ (स्ट्राइप्ड इंच प्लांट), जॅपॅनीज स्वीट फ्लॅग, इत्यादी झाडे छोट्या आकाराच्या काचपात्रांसाठी वापरली जातात. तर क्रोटन्स, ड्रॅसीना, डिफेनबॅकीया, अॅग्लोनिमा, मरांटा (प्रेअर प्लांट), फिलोडेन्ड्रॉन्स, पामचे प्रकार इत्यादी झाडे केंद्रवस्तू (सेंटरपीस) म्हणून मोठ्या आकाराच्या काचपात्रांमध्ये (उदा. २५ लिटरची बरणी) वापरली जातात.
काचपात्रे -
काचपात्रातल्या बगिचासाठी वापरली जाणारी पात्रे पारदर्शक काचेची बनलेली असतात. ही काचपात्रे भिन्न आकाराची असतात, हे पात्र म्हणजे एखाद्या छोट्या विजेच्या बल्बपासून ते एखाद्या मोठ्या ५० लिटर आकाराच्या काचेच्या बरणीसारखे कोणतेही पारदर्शक काचपात्र असू शकते. ही पात्रं रूंद तोंडाची किंवा अरूंद तोंडाची पण झाकण असलेली असतात. नवखे लोक काचपात्रातला बगिचा तयार करण्यासाठी बहुधा रूंद तोंडाच्या बरण्या, मोठी काचपात्रे, मत्स्यालयाची टाकी (फिश टॅंक) किंवा ५ -१० लिटरचे मत्स्यपात्र / हंडी (फिश बाऊल) वापरतात. जेव्हा ते काचपात्रातला बगिचा बनवण्यात निपुण होतात, तेव्हा ते त्यासाठी अरूंद तोंडाच्या काचेच्या बरण्या / काचपात्रे वापरायला सुरूवात करतात. तज्ज्ञ लोक फक्त काचपात्रातला बगिचाच बनवत नाहीत, तर त्याला वाळू, रंगीत दगड इत्यादी वस्तूंनी सजवून भूदृश्य (लॅंडस्केप) तयार करतात. तसेच ते त्या बगिचात रंगीत कीटक, सरडे इत्यादीही ठेवतात.
उपकरणे -
जेव्हा अरूंद तोंडाच्या पात्रात काचपात्रातला बगिचा बनवला जातो, तेव्हा त्यात झाडे लावण्यासाठी काही विशेष उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे म्हणजे नरसाळं (फनेल) जे विटांचे तुकडे, कोळशाचे तुकडे, माती इत्यादी पात्रात ओतण्यासाठी वापरलं जातं, लांब तारेच्या एका बाजूला तयार केलेला फासा (लूप) जो झाडं लावण्यासाठी वापरला जातो, लांब तारेच्या एका बाजूला जोडलेले रबराचे बूच जे माती पाहिजे त्या आकारात पसरवण्यासाठी वापरले जाते, झाडांची जागा निश्चित करण्यासाठी लांब काठी, लांब प्लॅस्टीकचा चमचा, कात्री, पाणी फवारण्यासाठी स्प्रेयर किंवा लांब नळीची तेलाची बाटली, लांब चिमटा (फोरसेप), ब्लेड, कापूस, दोरा, विटांचे तुकडे करण्यासाठी हातोडी इत्यादी.
झाडं लावण्यासाठी आवश्यक असलेले मातीचे मिश्रण पुढील घटक वापरून तयार केले जाते -
१) दगड किंवा नदीतले गोटे किंवा विटांचे तुकडे - ह्याचा पाण्याचा निचरा करणारा थर म्हणून वापर होतो.
२) नदीतली वाळू - पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरली जाते.
३) कोळशाचे तुकडे किंवा स्फॅग्नम मॉस - ह्याचा थर अशुद्धी शोषून घेतो आणि रोधक थर (बफर) म्हणून काम करतो.
४) कंपोस्ट मिश्रित माती (१ भाग माती + १ भाग शेणखत किंवा कुजलेल्या पानांचे खत).
५) बुरशीनाशक "बाविस्टीन" - ५ ग्रॅम बाविस्टीन (१ टीस्पून) पावडर घेऊन १ लीटर पाण्यात मिसळलेले.
६) कीटकनाशक - ५ मि.ली. द्रावण माती किंवा वाळूत मिसळावे. (ऐच्छिक).
काचपात्रातला बगिचा (टेरॅरियम) तयार करण्याची कृती व त्याचे व्यवस्थापन -
१) सुरूवातीला एक मोठ्या तोंडाचे, मध्यम आकाराचे (५ लिटर), झाकणासहित असलेले पारदर्शक काचपात्र निवडावे.
२) काचपात्रात सहज मावतील अशा आकाराची व ज्यांना सारख्या तीव्रतेचा प्रकाश लागतो अशीच झाडे निवडावीत.
३) काचपात्रात कशा प्रकारे झाडे लावायची आहेत, हे ठरवून त्याप्रमाणे त्याचे कागदावर आरेखन तयार करावे. उंच झाडे मध्यभागी लावावीत, त्यामुळे लहान झाडे दिसण्यात बाधा येणार नाही.
४) काचपात्रात झाडे लावण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे व इतर साहित्य घ्यावे.
५) काचपात्राच्या बगिच्यामध्ये खूप आर्द्र स्थिती निर्माण होत असल्याने, त्याला बुरशी लागण्याचा धोका संभवतो. म्हणून बगिच्यासाठी लागणारे सर्व साहित्य आधी निर्जंतुक करून घ्यावे. काचपात्राच्या निर्जंतुकीकरणासाठी काचपात्र साबण व गरम पाण्याने धुवून स्वच्छ करावे व हवेत वाळू द्यावे.
६) निर्जंतुकीकरणासाठी सर्व दगड / नदीतले गोटे / विटांचे तुकडे आणि कोळशाचे तुकडे बुरशीनाशकाच्या मिश्रणात (५ ग्रॅम किंवा १ टीस्पून बाविस्टीन पावडर घेऊन १ लीटर पाण्यात मिसळलेले) बुडवून घ्यावेत. तसेच प्रत्येकी ५ ते १० मि.ली. बुरशीनाशकाचे मिश्रण घेऊन ते वाळूमध्ये आणि माती व कंपोस्ट (१:१) यांच्या मिश्रणामध्ये घालावे आणि ते नीट मिसळून घ्यावे म्हणजे ते वाळूत आणि खतमातीच्या मिश्रणात सगळीकडे सारखे पसरले जाईल. जर बुरशीनाशक उपलब्ध नसेल, तर सरळ प्रेशर कूकर घेऊन त्यात दगड / गोटे / विटांचे तुकडे आणि कोळशाचे तुकडे, वाळू व खत-मातीचे मिश्रण हे वेगवेगळ्या भांड्यात ठेवून, वाफेवरती वाफवून निर्जंतुक करून घ्यावे.
७) जर तुम्हांला कीटकनाशक वापरायचे असेल, तर वाळू आणि खत-मातीच्या मिश्रणात प्रत्येकी ५ मि.ली. कीटकनाशकाचे द्रावण घालून ते वाळू व मातीत नीट मिसळून घ्यावे. जर तुम्हांला काचपात्राच्या बगिच्यात कीटक किंवा प्राणी ठेवायचे असतील, तर कीटकनाशक वापरू नये.
८) काचपात्रात मातीचे मिश्रण भरण्यासाठी त्याच्या अरूंद तोंडावर नरसाळे (फनेल) ठेवावे. रूंद तोंडाच्या काचपात्रात हाताने हे मिश्रण भरता येते, पण नरसाळे (फनेल) वापरल्याने काचपात्राच्या भिंती स्वच्छ राहतात. म्हणून काचपात्र स्वच्छ राहण्यासाठी नरसाळे (फनेल) वापरावे. जर नरसाळे (फनेल) उपलब्ध नसेल, तर कार्डबोर्ड पेपर किंवा पातळ प्लॅस्टीकचा कागद वापरून ते तयार करावे आणि वापरावे.
९) नरसाळ्यातून दगड / गोटे / विटांचे तुकडे काचपात्रात सोडावेत. मग नरसाळे काढून, तारेला लावलेले रबरी बूच आत घालावे व दगड / गोटे /विटांचे तुकडे त्याने हवे तसे रचून घ्यावेत. हा थर कमीत कमी १ इंच उंचीचा तरी असावा.
१०) नंतर नरसाळ्यातून वाळू ओतून ती काचपात्रात भरावी आणि रबरी बूचाने सगळीकडे पसरवून घ्यावी. आधीचा विटांच्या तुकड्यांचा थर आणि वाळू असे दोन्ही मिळून सुमारे १ ते २ इंच उंचीचा किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचा थर तयार करावा.
११) त्यानंतर नरसाळ्यातून कोळशाचे तुकडे किंवा स्फॅग्नम मॉस घालावे व रबरी बूचाने ते सगळीकडे पसरवून घ्यावे. हा थर सुद्धा सुमारे १ इंच उंचीचा किंवा त्यापेक्षा जास्त उंच असावा.
१२) त्यानंतर नरसाळ्यातून माती व खताचे मिश्रण (१ भाग माती : १ भाग शेणखत) काचपात्रात घालावे. रबरी बूचाने हा थर हवा तसा पसरवून घ्यावा. हा थर काचपात्राच्या उंचीच्या प्रमाणात अनेक इंच उंचीचा असू शकतो. हा थर सुमारे काचपात्राच्या १/३ (एक तृतीयांश) भागाइतका तरी असावा. मात्र हा थर काचपात्राच्या १/२ (अर्ध्या) भागापेक्षा जास्त असू नये.
१३) आता सगळ्यात मोठे असलेले झाड त्याच्या कुंडीच्या बाहेर काढावे आणि हळूवारपणे त्याच्या मुळांवरची माती काढून टाकावी. झाडाला एकापेक्षा जास्त खोडे असतील, तर ती वेगळी करावी. उदा. पार्लर पाम. झाडांच्या पानांचा पसारा खूप मोठा किंवा जास्त पसरट असेल, तर पाने कात्रीने कापून घ्यावीत, म्हणजे ते झाड काचपात्रात नीट मावू शकेल. झाडाला वाळकी पाने असतील, तर ती काढून टाकावीत.
१४) लांब काठी वापरून मातीत छिद्र तयार करावे. झाड हातात घेऊन त्याची मुळे गोलाकार गुंडाळून घ्यावी आणि तारेच्या फाशावर (लूपवर) ठेवावी. झाड लावण्यासाठी, झाडाचा शेंडा एका हाताने धरून दुसर्या हाताने तो तारेचा फासा काचपात्रात सरकवावा. त्यानंतर लांब काठी किंवा चिमटा (फोरसेप) वापरून ते झाड त्या छिद्रात काळजीपूर्वक सरळ उभे करावे आणि फाशाची तार बाहेर काढून घ्यावी. झाड मातीत नीट रोवले जाईल अशा प्रकारे रबरी बूचाच्या सहाय्याने मुळांवर माती घालावी.
१५) त्यानंतर दुसरे लहान आकाराचे झाड घेऊन ते काचपात्रात अशाच प्रकारे लावावे. सर्वात कमी उंचीचे झाड अगदी शेवटी लावावे.
१६) चिमटा वापरून (फोरसेप) सजावटीचे साहित्य काचपात्रात ठेवावे.
१७) एका सहजपणे वाकणार्या तारेच्या टोकाला दोर्याने कापूस बांधून घ्यावा आणि तो पाण्याने ओला करून घ्यावा. काचपात्राच्या भिंतीवरची घाण काढण्यासाठी हा कापसाचा ओला बोळा पात्रात घालून त्याने पात्राच्या भिंती पुसून घ्याव्या.
१८) त्यानंतर स्प्रेयर घेऊन त्याने हळूवारपणे काचपात्राच्या भिंतींवर पाणी फवारावे, म्हणजे माती थोडी ओली होईल. झाडांच्या पानांवर मात्र पाणी फवारू नये.
१९) त्यानंतर ते काचपात्र एकदोन दिवस सावलीमध्ये उघडेच ठेवावे. या काळात काचपात्रातल्या बगिच्याचे नीट निरिक्षण करावे. जर काचपात्राच्या भिंती व आतील भाग पाण्याने थबथबलेला असेल, तर जास्तीच्या पाण्याची वाफ होऊ द्यावी आणि पाने कोरडी होऊ द्यावी आणि जेव्हा काचपात्राच्या भिंतीवर वाफेचा पातळ थर फक्त दिसायला लागेल, तेव्हाच ते काचपात्र झाकण लावून नीट बंद करून घ्यावे.
२०) काचपात्र थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये, नाहीतर काचेमुळे आत निर्माण झालेल्या उष्णतेने झाडे जळून जातील. तसंच खूप सावलीही झाडांच्या वाढीवर परिणाम करते आणि त्यांच्या पानांचे रंग बदलतात. काचपात्र नेहमी अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशात म्हणजेच उजेडात ठेवावे. पडद्यातून गाळून आलेला सूर्यप्रकाश काचपात्रातल्या झाडांना चालतो. भरपूर उजेड किंवा कवडसेयुक्त छायाप्रकाश हा काचपात्रातल्या बगिच्यासाठी उत्तम आहे. काचपात्राची दिशा अधूनमधून बदलत रहावी, म्हणजे काचपात्रातल्या सर्व झाडांना पुरेसा उजेड मिळेल.
२१) काचपात्राची बाहेरची बाजू नेहमी स्वच्छ ठेवावी कारण आतल्या झाडांचा तोच प्रकाशाचा एकमेव स्त्रोत आहे.
२२) जर काचपात्रातल्या बगिच्यात बुरशीची लागण झाली, तर त्याचे झाकण काढावे, आतील लागण झालेला भाग तारेला जोडलेल्या ब्लेडने कापावा व काढून टाकावा आणि बुरशीनाशक टाकून, पात्राचे झाकण लावून घ्यावे. वर्षातून एकदा थोडे बुरशीनाशक काचपात्रात घालावे.
२३) जर काचपात्रातल्या बगिच्याला कीड लागली, तर त्याचे झाकण काढावे, आतील लागण झालेला भाग तारेला जोडलेल्या ब्लेडने कापावा व काढून टाकावा आणि थोडेसे कीटकनाशक टाकून, पात्राचे झाकण लावून घ्यावे. काचपात्र बंदिस्त असल्याने त्यात सुरूवातीला एकदा कीटकनाशक घातल्यावर, दरवर्षी कीटकनाशक घालण्याची आवश्यकता नाही.
२४) एकदा काचपात्रातला बगिचा नीट स्थिरावला की मग पुढचे कित्येक महिने त्याला पाणी घालण्याची गरज नसते. जर काचपात्राच्या भिंतींवर पाण्याच्या वाफेचा पातळ थर न दिसता त्या कोरड्या दिसायला लागल्या तर त्यातले पाणी कमी झालेले असते. मग स्प्रेच्या सहाय्याने काचपात्राच्या भिंतींवर थोडेसेच पाणी फवारावे कारण त्यातल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याला छिद्र नसते. त्यानंतर पुन्हा काचपात्राचे झाकण लावून घ्यावे.
२५) गरज भासल्यास वर्षातून एकदा काचपात्रात थोडेसे कंपोस्ट खत (शेणखत) घालावे. काचपात्रातल्या झाडांना कधीही रासायनिक खत घालू नये. कारण जास्त प्रमाणात घातले गेल्यास रासायनिक खत झाडांसाठी धोकादायक ठरू शकते किंवा पात्रातील झाडांची खतामुळे अतिरिक्त वाढ होऊ शकते.
२६) काचपात्रातली झाडे जास्त वाढली, तर त्याचे झाकण काढावे, आतील झाडे कापावी, आवश्यकता असल्यास स्प्रेच्या सहाय्याने काचपात्राच्या भिंतींवर थोडेसे पाणी फवारावे आणि पात्राचे झाकण लावून घ्यावे.
अशी संपूर्ण काळजी घेतल्यावर एक नीट सुस्थापित असा काचपात्रातला बगिचा आजूबाजूच्या परिसरातल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तयार होतो.
नोंद - खुल्या काचपात्रातले बगिचेही अशाच प्रकारे बनविले जातात, पण त्यावर झाकण लावलेले नसते. त्यांची काचपात्रे उघडी (बिनझाकणाची) असून, त्यात हवा मोकळेपणाने खेळते व त्या खुल्या काचपात्रात झाडे लावलेली असतात. त्यामुळे बंदिस्त काचपात्रात वापरली जाणारी सर्व झाडे खुल्या काचपात्रातल्या बगिच्यात वापरली जातातच, पण त्याचबरोबर विविध प्रकारचे कॅक्टस आणि मांसल, जाड, पण रसदार खोडाची झाडेही (सक्युलंट) यात अधिक वापरली जातात. बशितला बगिचा हाही एक प्रकाराचा खुल्या काचपात्रातलाच बगिचा आहे आणि तो छिद्र नसलेल्या उथळ बशिपात्रात बनविला जातो. बशितले बगिचे हे मुख्यत्वे कॅक्टस आणि मांसल, जाड, पण रसदार खोडाची झाडे (सक्युलंट) वाढविण्याकरता वापरले जातात. बशितल्या बगिच्यात झाडे लावण्यासाठी मिश्रण म्हणून फक्त दगड आणि वाळू वापरली जाते आणि त्यात कॅक्टस आणि मांसल, जाड, पण रसदार खोडाची झाडे (सक्युलंट) वाढवली जातात. खुल्या काचपात्रातले बगिचे आणि बशितले बगिचे यांना झाकण नसल्याने त्यांची प्रकाशाची गरज भिन्न असते आणि म्हणून ते सूर्यप्रकाशात ठेवता येतात. तसेच त्यात हवा मोकळेपणाने खेळत असल्याने, खुल्या बगिच्याला गरजेनुसार वारंवार पाणी घालता येते. पण त्या पात्राच्या खालच्या भागात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर कॅक्टससारखी झाडे त्यामध्ये कुजून जातील. बंदिस्त काचपात्रातल्या बगिच्याच्या संकल्पनेपेक्षा, खुल्या काचपात्रातले बगिचे आणि बशितले बगिचे हे दोघेही वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहेत. म्हणूनच बंदिस्त काचपात्रातले बगिचे, खुल्या काचपात्रातले बगिचे आणि बशितले बगिचे यांचा एकमेकांमध्ये गोंधळ न करता ते त्यांच्या स्वतःच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या वातावरणात वाढवले पाहिजेत.
खूप माहितीपूर्ण पोस्ट ... टेरॅरियमविषयी मराठीतून सविस्तर माहिती मी पहिल्यांदाच बघितली. मराठीमध्ये बागकामाविषयी एकही अभ्यासपूर्ण ब्लॉग मला अजून तरी दिसला नाहीये. अजून वेगवेगळ्या विषयांवर लिहिणार का?
ReplyDeleteगौरी,
ReplyDeleteधन्यवाद!
झाडांविषयी लिहितांना त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, किंवा जी झाडे प्रत्यक्ष वाढवून पाहिलेली आहेत त्यांच्याबद्दलच लिहिते. बोन्साय मी प्रत्यक्ष केला नाही, पण वड आणि पिंपळाची झाडं कुंडीत वाढवून पाहिली आहेत, बोन्सायचे दोनवेळा प्रॅक्टीकल्स पाहिले आहेत आणि माझ्या नातेवाईकांनी तयार केलेले बोन्सायही मी स्वतः पाहिले असल्याने मी त्याच्याविषयी इतके सविस्तर लिहू शकले.
सध्या आमच्या परिसरात उंच इमारती उभ्या झाल्याने सूर्यप्रकाश अडला जातो, त्यामुळे झाडं लावण्यावरही मर्यादा आली आहे. म्हणूनच मी या विषयावर फारसं काही लिहिलेलं नाही. एखादं विशिष्ट झाड नजरेसमोर ठेवून लिहितांना ते कोणत्या प्रकारच्या मातीत वाढतं, त्याची पाण्याची आणि सूर्यप्रकाशाची गरज, त्याला खत कशा प्रकारे घालायचं, त्याला होणारे रोग आणि त्यावरच्या उपाययोजना ह्याबद्दल लिहिलं जातं. मराठीत ह्या विषयावर अनेक माहितीपूर्ण पुस्तकं उपलब्ध आहेत.पुण्याला दरवर्षी कृषी प्रदर्शन भरतं तिथल्या स्टॉलवर ही पुस्तकं उपलब्ध असतात. तसंच मुंबईतही दरवर्षी झाडांची प्रदर्शनं भरतात, तिथेही ही पुस्तकं उपलब्ध असतात.
जे पुस्तकात आहे, तेच ब्लॉगवर टाकण्यात विशेष अर्थ नाही. माझ्याजवळची माहिती आणि माझा प्रत्यक्ष अनुभव ह्यावर आधारलेला लेख लिहायला मला आवडेल. मात्र तुम्हांला एखाद्या विशिष्ट झाडाविषयी माहिती हवी असेल किंवा झाडांविषयी काही शंका असतील, तर जरूर मला इमेल पाठवा, मी मला जितकी माहिती आहे, तितकी तुम्हांला निश्चित देईन. कदाचित तुमच्या शंकेतून मला एखादा विषय सुचला, तर त्याबद्दल मी ब्लॉगवर लिहिन.