पुढे ड्रायव्हरने गाडी एका शाल-स्वेटरच्या फॅक्टरीजवळ थांबवली. आम्ही ती फॅक्टरी बघायला आत शिरलो. तिथे पाचसहा हातमाग ठेवले होते. त्यातल्या दोन हातमागांवर अर्धवट विणलेल्या शाली होत्या आणि फक्त एकाच हातमागावर एक माणूस बसून शाली कशा विणतात ते दाखवत होता. बाजूलाच त्यांचं स्वेटर शाली वगैरे विकण्याचं दुकान दिसत होतं. बाकी कुठे कामगार काम करतांना दिसत नव्हते आणि त्या चारपाच हातमागांवर मिळून दुकानात ठेवण्याइतका प्रचंड माल निश्चितच तयार होत नव्हता. थोडक्यात फॅक्टरीच्या नावाखाली इथे वस्तू विकल्या जात होत्या. प्रत्यक्ष फॅक्टरी दुसरीकडेच कुठेतरी असावी. मग आम्ही दुकानात शिरलो. दुकानातल्या वस्तूंच्या किंमती मुंबईतल्या त्यांच्या बाजारभावाएवढ्याच होत्या. प्रत्यक्ष फॅक्टरीतच खरेदी केल्यावर त्या वस्तूंची किंमत थोडी तरी कमी व्हायला हवी होती, पण सिमल्यातल्या बाजारातही यापेक्षा स्वस्तात वस्तू मिळत होत्या. शेवटी आम्ही निराश मनाने, रिकाम्या हातांनी बाहेर पडलो. बाहेर दिसणारे पर्वतशिखरांचे दृश्य खूपच सुंदर होते. तिथेच संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही पुढे निघालो.
आता आम्ही व्यास नदीच्या काठाने कुलूमार्गे निघालो होतो. वाटेत वैष्णवीदेवीच्या मंदिरासमोर ड्रायव्हरने गाडी थांबवली. काश्मीरमधल्या वैष्णवीदेवीच्या मूळ मंदिराची इथे प्रतिकृती उभारली आहे. मंदिराच्या समोरच व्यास नदीचा सुंदर प्रवाह वाहत होता. पहिल्यांदा तिथे फोटोसेशन करून मगच आम्ही मंदिरात आलो. हे चार मजली मंदिरही सुंदर बांधले आहे. तिथून पुढे निघालो, तर वाटेत एका हिमाचली मुलाच्या लग्नाची वरात जातांना दिसली. वरातीतल्या सर्व स्त्री-पुरूषांनी विशेष पद्धतीने सजवलेल्या हिमाचली टोप्या आणि शाली परिधान केल्या होत्या. थोडे अजून पुढे गेल्यावर व्यास नदीच्या प्रवाहातच एक टेबल आणि पाच खुर्च्या मांडलेल्या दिसल्या. तिथे थोडे पुढे एक सॉफ्ट ड्रिंकचा क्रेटही ठेवला होता. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तिथल्या हॉटेलवाल्याने ते मुद्दाम तिथे ठेवले होते. ड्रायव्हरने तिथेही गाडी थांबवली. आम्ही एकामागोमाग एक त्या प्रवाहात उतरलो. पाणी बर्फासारखे थंडगार असल्याने फार वेळ त्या पाण्यात उभे राहवत नव्हते. तरी आम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसून हौशीने फोटो काढून घेतले आणि पुढे निघालो.
पुढचा प्रवास फार सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सफरचंदाच्या बागा होत्या. सफरचंदाच्या झाडाला छोटी हिरवी सफरचंदे लागलेली दिसत होती. ह्या बागांमधूनच लहान मुलांचे समर कॅंपचे रंगीबेरंगी तंबू उभारलेले दिसत होते. काही ठिकाणी मुले खेळत होती. मधूनच वाटेत छोटी छोटी टुमदार घरे लागत होती. प्रत्येक घराच्या बागेत गुलाबाची झाडे लावलेली दिसत होती. त्या प्रत्येक गुलाबाच्या झाडावर गुच्छांनी गुलाबाची फुले उमललेली होती. इतके रंगीबेरंगी गुलाब उमलेले होते आणि ते न तोडता झाडावर तसेच ठेवलेले होते, हे दृश्य अपूर्व होते. काही गुलाबाची झाडे म्हणजे एखादा गुलाबाच्या फुलांचा बुकेच असल्याचा भास होत होता. निळेभोर आकाश, बर्फाच्छादित हिमशिखरे यांच्या पार्श्वभूमीवर दिसणारे, ते रंगीबेरंगी गुच्छांनी उमललेले गुलाब केवळ अविस्मरणीय होते. ते दृश्य नजरेत साठवत आम्ही मनालीच्या दिशेने निघालो.
मनाली जवळ आली, तशी आजूबाजूच्या हिमशिखरांची संख्या वाढू लागली. इथे आमच्या दोन्ही ग्रुपची हॉटेल्स जवळजवळ होती. आमचे हॉटेल टेकडीवर वसलेले होते. ड्रायव्हरने त्या अरूंद रस्त्याने गाडी वरती आणली, पण गाडी पार्क केल्यानंतर इतर गाड्या तिथून काढणे अडचणीचे होते. गाडी खाली आणणेही खूप कसरतीचे होते. शेवटी ड्रायव्हरने दुसर्या दिवशी शेजारच्याच पण खालच्या बाजूला असलेल्या मोठ्या हॉटेलच्या आवारात गाडी पार्क करण्याचे ठरवले. आम्ही आमच्या खोलीवर आलो. खोलीच्या खिडकीतून समोरची हिमशिखरे दिसत होती. या हॉटेलची सर्व्हिस जलद आणि व्यवस्थित होती. इथे कपडे धुवू नये असा काही नियम नव्हता, पण लॉंड्रीची व्यवस्था होती. खाली असलेल्या डायनिंग रूमच्या शेजारी एक डिस्कोथेकही होता. इथेही जेवणासाठी सेल्फ सर्व्हिसच होती. मेनूकार्डावर जरी व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारच्या पदार्थांची यादी दिलेली होती, तरी टेबलावर फक्त शाकाहारीच पदार्थ मांडलेले होते. त्याव्यतिरिक्त काही हवे असल्यास त्याची वेगळी ऑर्डर द्यावी लागत होती. आम्ही लवकर जेवून घेतले. दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता रोहतांग पासला निघायचे होते. हॉटेलवाले आम्हांला नाश्त्यासाठी सॅंडविच पॅक करून देणार होते.
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता निघण्यासाठी सगळे तयार होते. मी आदल्या दिवसाचा अनुभव लक्षात घेऊन, बसमध्ये मळमळू नये म्हणून गोळी घेतली होती. नाश्ताही पॅक करून तयार होता. पण त्या अरूंद रस्त्यावरून कसरत करून गाडी खाली काढायला ड्रायव्हरला सव्वासहा वाजले. जवळच्याच हॉटेलमधल्या आमच्या सहप्रवाशांना सोबत घेऊन आम्ही निघालो. गाडी रोहतांग पासच्या रस्त्याला नुकतीच लागतेय, तो दोन्ही बाजूंनी विक्रेते "आमच्याकडचा संरक्षक पोषाख घ्या" म्हणून मागे लागत होते. थोडे पुढे आल्यावर ड्रायव्हरने एका दुकानासमोर गाडी थांबवली आणि तिथून सर्वांना जास्त वेळ न घालवता, छातीला थंडी लागू नये म्हणून वन पीसच ड्रेस घ्यायला सांगितले. प्रत्येक ड्रेसचे दोनशे रुपये भाडे ठरले. प्रत्येकजण दुकानदाराने दिलेला ड्रेस बरोबर होतो आहे का ते पाहत होता. मला आधी टाईट फिटींगचा ड्रेस मिळाला, नंतरचा केशरी ड्रेस जरा जास्तच मोठा पण उबदार होता. त्यामुळे जास्त उशीर व्हायला नको म्हणून मी तोच ड्रेस घेतला.
ड्रेस नंतर मोजे आणि बूटही घेतले. इथे बुटांचे तळ व्यवस्थित आहेत, की नाहीत ते नीट बघून घ्यावे लागते. नाहीतर चालतांना बुटात बर्फ जाऊन पायाला त्रास होण्याची शक्यता असते. हे सगळे घेतल्यावर त्यावर त्यांनी हातमोजे घालायला फ्री दिले (अर्थात ते नंतर त्यांना परत करायचे होते). बर्फात खेळतांना हातमोजे निसटून हरवतात, म्हणून हल्ली हातमोजे भाड्याने देत नाहीत. हा सगळा जामानिमा झाल्यावर एका विक्रेत्याकडून गॉगल्स विकत घेतले. (या गॉगल्सचा नंतर दिल्लीत चांगला उपयोग झाला.) अशा प्रकारे सगळेजण तयार झाल्यावर ड्रायव्हरने बस पुढे काढली. ह्याच रस्त्यावरून पुढे गेल्यावर भारतीय सेनेचा तळ आहे. या तळाला रसद पुरवठा ह्याच रस्त्याने होतो. हिवाळ्याच्या दिवसात बर्फ पडल्यानंतर रोहतांग पासचा हा रस्ता काही महिन्यांसाठी बंद होतो. म्हणून सैन्याला या कालावधीत पुरेल एवढी रसद आधीच पाठवली जाते.
वळणावळणाच्या घाट रस्त्याने ड्रायव्हर गाडी वरती नेत होता. बहुधा हवाही थोडी थोडी विरळ झाली असावी. त्यामुळे बसमधल्या अर्ध्या मेंबर्सना मळमळण्याचा त्रास व्हायला लागला. सुदैवाने मी गोळी घेतली होती, त्यामुळे मला कसलाच त्रास झाला नाही. ड्रायव्हरने एका स्टॉलच्या समोर गाडी थांबवली. तिथे ज्यांना चहा घ्यायचा होता, त्यांनी चहा घेतला. ज्यांना भूक लागली होती, त्यांनी सॅंडविचेस खाऊन घेतली. ज्यांना त्रास होत होता, ते काही न खाता शांत बसले. चहा येईपर्यंत तिथेही आमचं एक फोटोसेशन झालं. चहा झाल्यावर आम्ही तिथून निघालो. बस वरती चढत होती आणि अचानक एका बाजूला मातीवर अर्धवट वितळलेला बर्फाचा थर दिसला. आम्हांला जवळून झालेलं ते बर्फाचं पहिलं दर्शन होतं. मग आम्ही अजून बर्फ दिसतोय का, ते पाहायला लागलो आणि दोन्ही बाजूंना कमीअधिक प्रमाणात बर्फ दिसायला लागला. थोड्या वेळाने बाजूच्या डोंगराच्या भिंती पूर्ण बर्फाच्छादित दिसायला लागल्या. एके ठिकाणी माणसं डोंगरातला बर्फ फोडून काढतांनाही दिसली.
ड्रायव्हरने स्नो पॉईंटच्या जितकी जवळ नेता येईल तितकी जवळ गाडी नेली. तरीही पुढे आम्हांला एकदीड किलोमीटर चालून जायचे होते. कुफ्रीच्या अनुभवाने शहाणे होऊन आम्ही घोड्यावरून किंवा मोटारबाईकवरून जाण्याऐवजी, पायीच चालत निघालो आणि बर्फात पोहोचलो. तिथे बर्फातून चालण्यासाठी भाड्याने काठ्य़ा घेतल्या. काठ्यांमुळे बर्फात चढ-उतार करतांना चांगला आधार मिळत होता. सुरूवातीला आम्ही बर्फात नुसतेच बसलो आणि फोटो काढले. इथेही हिमाचली ड्रेस घालून आणि पांढर्या याकवर बसून फोटो काढण्याची सोय होती. आमच्यापैकी काहीजण रबर ट्यूबची स्लाईड, स्कीईंग करायला गेले, तर काहीजण स्लेज गाडीवाले खूपच मागे लागल्याने त्या गाडीतून फिरून आले. सगळेजण दूरवर विखुरले गेले होते. तेवढयात एका पॅराग्लायडिंगवाल्याने आम्हांला गाठले. (सुरूवातीला हजार रूपये असणारा त्याचा रेट दीडदोन तासांनी पाचशे रुपयांपर्यंत खाली आला.) मला पॅराग्लायडिंग करण्याची इच्छा होती. पण माझ्याबरोबर जे होते, त्यांना मळमळण्याचा त्रास होत होता, त्यामुळे ते कोणी पॅराग्लायडिंग करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. एकटीने इतके पैसे खर्च करून पॅराग्लायडिंग करण्याऐवजी रबर ट्यूब स्लायडींग करण्याचा मी विचार करत होते. पण आमच्यापैकी अजून एक जण तयार झाल्याने मी पॅराग्लायडिंगला जायला तयार झाले.
नोंद - ट्रीपचे सर्व फोटो इथे पाहता येतील.
No comments:
Post a Comment