केरळमध्ये नुकतंच मान्सूनचं आगमन झालं आहे, आणि जागतिक पर्यावरणदिनाला (५ जून) थोडासाच अवधी उरलेला आहे; ही अचूक वेळ साधून श्री. योगेश बंग यांनी मला इमेल पाठवून "वृक्षारोपण" या विषयावर माहिती देणारी ब्लॉगपोस्ट लिहिण्याची विनंती केली. ब्लॉगपोस्ट लिहिण्यासाठी हा विषय सुचविल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते.
वाढत्या शहरीकरणासाठी होणार्या बांधकामामुळे दिवसेंदिवस कमी होणारी झाडांची संख्या, औद्योगिक प्रगतीमुळे उभारले गेलेले कारखाने, वाहने, आणि फ्रीज, एसी सारख्या उपकरणांमुळे होणार्या प्रदूषणामुळे हवेतले कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लुरोकार्बन, मिथेन इत्यादी उष्णाताशोषक वायूंचे वाढणारे प्रमाण आणि या वायूंमुळे पृथ्वीभोवती असणार्या ओझोनच्या संरक्षक कवचाला धोका निर्माण होऊन, विरळ झालेल्या ओझोनच्या थरामुळे सूर्याच्या घातक अतिनील किरणांचा पृथ्वीवरील वातावरणात होणारा अनिर्बंध प्रवेश या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन जागतिक तापमान वाढतच चालले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आणि ऋतुचक्राचा समतोल बिघडला आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे जगभरातील हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ जास्त प्रमाणात वितळू लागला आहे. हा बर्फ असाच वितळत राहिला तर समुद्राची पातळी वाढून प्रलय निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी मोकळ्या जमिनीवर अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन केले, तर ही झाडे कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतील आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यास मोठीच मदत होईल. म्हणून वृक्षारोपण / बीजारोपण आणि वृक्षसंवर्धनासारखे प्रकल्प हाती घेऊन आपण पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण आपल्या परिसरातल्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण / बीजारोपण करू शकतो, किंवा एखाद्या उजाड डोंगरावर किंवा माळरानावर पावसाळ्याच्या दिवसांत वृक्षारोपण / बीजारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेऊ शकतो, किंवा पावसाळी पर्यटनाला गेल्यावर तिथल्या डोंगर, माळरानावर वृक्षारोपण / बीजारोपण करू शकतो.
वृक्षारोपणासाठी / बीजारोपणासाठी बिया व रोपांची उपलब्धता
१. फळांच्या / झाडांच्या बिया - काही वृक्षांच्या बियांची पाकिटे रोपवाटिकांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्याशिवाय आपणही झाडांच्या बिया गोळा करून बीजारोपणासाठी वापरू शकतो. त्यासाठी आंब्याच्या कोयी, आणि चिकू, जांभूळ, फणस इत्यादी झाडांच्या बिया स्वच्छ धुवून घ्याव्या. शक्य असेल तर एखाद्या सौम्य बुरशीनाशकाचे पाण्यातील द्रावण तयार करून त्यात त्या बिया बुडवून घ्याव्या आणि मग नंतर सावलीतच त्या बिया वाळवून ठेवाव्या. या वाळलेल्या बिया येणार्या पावसाळ्यात बीजारोपण करण्यासाठी वापराव्या. याच पध्दतीने इतर झाडांच्याही बिया गोळा करून, बुरशीनाशकात बुडवून, वाळवून बीजारोपणासाठी वापरता येतील. (टीप - ज्या बियांना गर चिकटलेला आहे त्या धुवून घेणे आवश्यक आहे, पण बुरशीनाशक उपलब्ध नसेल, तर गर नसलेल्या कोरड्या बिया नुसत्याच सावलीत वाळवल्या तरी चालेल. तसेच बुरशीनाशकाच्या पाकीटावर जे प्रमाण दिलेले असेल त्या प्रमाणानुसारच बुरशीनाशकाचे पाण्यातील द्रावण तयार करावे. बुरशीनाशकाचे द्रावण वापरून झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.) मात्र बीजारोपण केल्यानंतर सगळ्याच बिया अंकुरतील याची खात्री नसते. तसेच अंकुरलेली सर्वच रोपे जगतील याची खात्री नसते.
२. रोपवाटिकेतील रोपे - रोपवाटिकांमधून वृक्षारोपणासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध होऊ शकतात. लहान वयाच्या रोपांपेक्षा थोडी मोठ्या वयाची - सहा ते आठ वर्षे वयाची झाडे पुनर्रोपणासाठी वापरल्यास ती जगण्याची शक्यता १००% असते.
३. वनविभागातर्फे किंवा स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध होणारी झाडे - वनविभागाच्या क्षेत्रात असणार्या मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी वनविभागाकडून रोपे उपलब्ध होऊ शकतात. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही वृक्षारोपण करण्यासाठी रोपे पुरवितात.
४. इमारतींवर उगवलेली झाडे - बर्याचदा जुने वाडे, किंवा इमारतींच्या दुर्लक्षित भागावर वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडे उगवलेली दिसतात. ही झाडे लहान असतांनाच, पावसाळ्याच्या सुरूवातीला काढून घ्यावी आणि मोकळ्या जागेवर पुनर्रोपणासाठी वापरावी.
५. वडाच्या फांद्या आणि नारळ - काहीजण वटपौर्णिमेसाठी बाजारातून वडाच्या फांद्या विकत आणतात. पूजा झाल्यानंतर ह्या वडाच्या फांद्या कुंडीत लावाव्यात. पारंब्या - मुळे फुटण्याच्या गुणधर्मामुळे वडाची बारीक फांदीही कुंडीत सहज रूजते. अशी रूजलेली वडाची फांदी पुढच्या पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी वापरावी. तसेच काही जण देवापुढे कलशात पाणी घालून त्यात नारळ उभा करून ठेवतात. कलशातले पाणी रोज बदलले जाते. दीड - दोन महिन्यांत तो नारळ अंकुरतो आणि त्याच्या डोळ्यांतून कोंब फुटून मूळ आणि पाने बाहेर पडतात. पावसाळ्यात असा अंकुरलेला नारळ समुद्रकिनार्यालगतच्या मोकळ्या जमिनीवर लावता येईल.
वृक्षारोपण / बीजारोपणासाठी लागणारे साहित्य
१. बिया किंवा रोपे.
२. माती खणण्यासाठी छोटी कुदळ आणि माती उचलण्यासाठी फावडे किंवा हॅंड रेक आणि शॉव्हेल. रोपाची प्लॅस्टीकची पिशवी कापण्यासाठी कात्री.
३. कंपोस्ट खत सौम्य प्रमाणात - ऐच्छिक.
४. दोन झाडांमध्ये दहा ते बारा फूटांचे अंतर ठेवण्यासाठी मेजरमेंट टेप किंवा दोरी - या दोरीवर दर दहा ते बारा फूट एकसमान अंतरावर खूणेची गाठ मारलेली असावी.
वृक्षारोपण / बीजारोपणासाठी कोणती झाडे निवडावीत?
आंबा, आवळा, बांबूचे विविध प्रकार (कळक, बांबू ग्रास, मानवेल, फ्लॉवरींग बांबू इत्यादी), चिंच, साग, निलगिरी, जट्रोपा, वड, पिंपळ, औदुंबर / उंबर, कडुनिंब, मोह, जांभूळ, करंज, हरडा, बेहडा, आपटा, अर्जुन, पळस, पांगारा, सावर, बहावा, फणस, बेल, कदंब, चिकू, डाळिंब, पेरू, बकुळ, तामण, सीताअशोक, पिचकारी, करमळ, सोनचाफा, बदाम, बिट्टी, शंकासूर, शिसम, सीताफळ, रामफळ, कवठ, शेवगा, विलायती चिंच, विलायती फणस, आकाशनीम, भेंडी, काशिद, रिठा, तिरूळ, चाफा, नारळ, बॉटल पाम, समुद्रफूल / समुद्रफळ इत्यादी झाडांमधली जी झाडे वृक्षारोपणासाठी निवडलेल्या जागेच्या भौगोलिक परिस्थितीत चांगली वाढतील तीच झाडे वृक्षारोपणासाठी / बीजारोपणासाठी निवडावीत.
हल्ली परकीय वंशाची झाडे लावण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण झटपट वाढणारी परकीय वंशाची झाडे लावल्यास त्या झाडांचा स्थानिक पक्षांना व कीटकांना काहीही उपयोग होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यामुळे निरूपयोगी पण निव्वळ आकर्षक दिसणारी गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष, सुबाभूळ, उंदीरमाठ, गुलाबी कॅशिया, सिल्व्हर ओक ही झाडे वृक्षारोपणासाठी वापरू नयेत. किंवा ही झाडे वृक्षारोपणासाठी वापरली तरी त्यांची संख्या देशी झाडांच्या एकूण संख्येच्या ५% पेक्षा जास्त नसावी. ९५ देशी झाडांमागे ५ परकीय वंशाची झाडे इतकेच प्रमाण ठेवल्यास ते स्थानिक जीवसृष्टीला हानिकारक ठरणार नाही.
महामार्गालगतच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण / बीजारोपण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?
महामार्गालगतच्या मोकळ्या जागेवर झाडे लावायची असल्यास महामार्गाला अगदी खेटून झाडे लावू नयेत. झाड रस्त्याला अगदी खेटून असेल, तर वळणावर चालकाला समोरच्या वाहनांचा नीट अंदाज येत नाही. कधीकधी गाड्या झाडावर धडकून अपघात होतात. तसेच मोठ्या वृक्षांची मुळे खोलवर शिरत असल्याने त्यामुळे बांधून काढलेल्या महामार्गाला हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावतांना ती महामार्गापासून २५ ते ३० फूट दूर अंतरावर लावावीत.
वृक्षारोपण / बीजारोपण कसे करावे?
१. लावलेली झाडे नंतर योग्य प्रकारे वाढून मोठी व्हावीत म्हणून झाडांमध्ये योग्य अंतर असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम मेजरमेंट टेपच्या किंवा एकसमान अंतरावर गाठी मारलेल्या दोरीच्या सहाय्याने जिथे झाडे लावायची आहेत अशा जागेवर दर दहा ते बारा फूट अंतरावर खुणा (छोटे खड्डे) करून घ्या.
२. बिया रोवण्यासाठी सहा ते नऊ इंच खोल खड्डा खणावा. छोटी रोपे लावण्यासाठी एक फूट खोल खड्डा खणावा. तर मोठ्या वयाच्या (६ ते ८ वर्षाच्या) झाडांचे पुनर्रोपण करण्याकरता तीन फूट खोल खड्डा खणावा.
३. वृक्षारोपण / बीजारोपण करतांना शेणखत किंवा रासायनिक खते वापरू नयेत. या रोपांना नंतर पुरेसे पाणी मिळाले नाही, तर शेणखताच्या उष्णतेने किंवा रासायनिक खतांमधून मुक्त होणार्या रसायनांमुळे ही रोपे करपण्याची / जळण्याची शक्यता असते. त्यामुळे खत वापरायचेच असेल, तर सौम्य कंपोस्ट खत वापरावे. बियांसाठी खणलेल्या मातीमध्ये एक मूठभर कंपोस्ट मिसळावे, छोट्या रोपांसाठी मातीत दोन मुठी भरून कंपोस्ट मिसळावे, तर मोठ्या वयाच्या झाडांसाठी मातीत अर्धा ते पाऊण किलो कंपोस्ट मिसळावे. खत उपलब्ध नसेल, तर वापरले नाही तरी चालेल.
४. वृक्षारोपण / बीजारोपण सकाळी लवकर करावे किंवा संध्याकाळी करावे, भर दुपारच्या उन्हात करू नये. खणलेल्या खड्ड्यात बी किंवा रोप लावावे आणि मग खणून बाहेर काढलेली माती अलगद त्या खड्ड्यात घालून रोप स्थिर उभे राहील अशा प्रकारे तो खड्डा मातीने भरून घ्यावा. (रोप प्लॅस्टीकच्या पिशवीतून काढून लावले असेल, तर अशा सर्व कापलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या काळजीपूर्वक गोळा करून नंतर एखाद्या कचराकुंडीत टाकाव्यात.)
५. माती घातल्यानंतर झाडाला झारीने किंवा बादलीच्या सहाय्याने हळूवारपणे पण पुरेसे पाणी घालावे.
वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी?
१. वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांनी ही रोपे खाऊ नये म्हणून शक्य असल्यास / निधी उपलब्ध असल्यास, वृक्षारोपण / बीजारोपण केलेल्या जागेभोवती तीनचार बांबूंच्या सहाय्याने संरक्षक कुंपण उभारावे.
२. पुरेसा पाऊस पडला नाही, तर या लावलेल्या झाडांना पाणी घालणे आवश्यक असते. त्यासाठी वृक्षारोपण / बीजारोपण करणार्यांनी छोटे छोटे गट बनवावेत आणि आवश्यकतेनुसार या गटांनी आठवड्यातून एकदा, दोनदा किंवा तीनदा वृक्षारोपण / बीजारोपण केलेल्या ठिकाणी जाऊन या झाडांना / बियांना पाणी घालावे. जर पुरेसा निधी उपलब्ध असेल तर झाडे लावतांना खड्ड्यात झाडाशेजारी झाकण असलेले मातीचे मडके त्याचे तोंड जमिनीवर राहील अशा प्रकारे पुरावे, म्हणजे या मडक्यात पाणी घालून त्याचे झाकण लावून ठेवले, की ते पाणी मडक्यातून झिरपून जास्त काळासाठी झाडांना उपलब्ध होऊ शकेल. अशा प्रकारे पावसाळा संपेपर्यंत जी झाडे तग धरतील, ती पुढे जगण्याची शक्यता वाढेल.
३. यातली जी झाडे पुढच्या वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत जगतील, त्यांना पावसाळा व्यवस्थित चालू झाल्यावर खत घालावे. म्हणजे त्यांची चांगली वाढ होईल. त्या परिसरात साठणारा पालापाचोळा, जीवनचक्र संपल्यावर त्याच जमिनीत गाडली जाणारी वर्षायू झाडे, त्याच जमिनीत पडणारी प्राण्यांची विष्ठा आणि मृत प्राण्यांचे अवशेष हे सगळे कुजून त्याचा ह्युमस नावाचा काळसर पोषक पदार्थ तयार होतो. आणि झाडे त्याच्यातूनच त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक शोषून घेतात. त्यामुळे एकदा अशा जागेवर झाडे व्यवस्थित रूजली, की नंतर त्यांना वारंवार खत घालण्याची आवश्यकता नसते.
अशा प्रकारे वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी घेतल्यास त्यातली काही झाडे निश्चित जगतील आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्याची मदत होईल.
"जागतिक पर्यावरणदिनाच्या" हार्दिक शुभेच्छ्या!!!
ReplyDeleteकंपोस्ट बद्द्ल अधिक माहिती खालील संकेतस्थळावर मिळु शकेल.
http://www.dailydump.org
योगेश,
ReplyDeleteतुम्हांलाही जागतिक पर्यावरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कंपोस्टसाठी सचित्र माहितीची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
वाचकांच्या माहितीसाठी -
ReplyDeleteसंपुर्ण बागकामाचे किट (५ मोजकी उपकरणे असलेले) रु. २००/- मध्ये मिळू शकेल.
देशी वृक्षांची रोपे (उदा. - वड, पिंपळ) पुण्याच्या कुठल्याही रोपवाटीकेत मिळणे दुरापास्त झाले आहे अगदी पुणे-विद्यापिठाच्या आवारातील रोपवाटीकेतसुद्धा ती नाहीत. इथेसुद्धा 'जागतिकीकरण' आले कि काय?
वड - पिंपळाच्या फांद्या लावल्या तरी रूजतात. त्यामुळे त्यांच्या छोट्या फांद्या लावून रोपे तयार करता येतील, किंवा इमारतींच्या दुर्लक्षित भागावर उगवलेली झाडे काढून पुनर्रोपणाकरता वापरता येतील. यासाठी वड - पिंपळाची रोपे तयार करणार्यांनी आपल्या परिसरातल्या गृहनिर्माण संस्थांशी संपर्क साधून, अशी इमारतीवर उगवलेली झाडे ते जेव्हा काढतील, तेव्हा त्याची सूचना देण्याची विनंती करावी आणि त्यांनी काढून टाकलेली झाडे गोळा करून तात्पुरती कुंडीत लावावी. ही झाडे वृक्षारोपणाच्या वेळी पुनर्रोपित करावी.
ReplyDeletepaavasaalyachyaa Nimittane Vruksharopanaachi,ropnaa nanatar tyanchi Niga kashi raakhavi ya vishayi atishay sundar mahiti Aapan dili aahe. Vachak Mitrana ya mahiticha nischit upayog hoil.
ReplyDeletehttp://savadhan.wordpress.com
NY-USA 7-7-10
Duparnanatar 15-09
धन्यवाद सावधान!
ReplyDeleteबातमी वाचा :-
ReplyDeleteएकाच प्रकारच्या झाडांचा पुणे परिसरात बहर
http://www.esakal.com/esakal/20100805/5509711406182795475.htm
योगेश,
ReplyDeleteमाहितीची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
कुठली झाडे कृत्रिमरित्या लावता येत नाहीत ? उदा.- पक्षांच्या विष्टेतुन उगवणारी झाडे.
ReplyDeleteजी झाडे पक्ष्यांच्या विष्ठेतून उगवतात, त्यांच्या बियांवरील आवरण खूप कठीण असते. पक्ष्यांच्या पोटातील आम्लयुक्त पाचकरसांमुळे ते आवरण बरेचसे विरघळते आणि नंतर अशा बिया विष्ठेतून बाहेर पडल्यावर सहज रूजू शकतात.
ReplyDeleteअशा कठीण आवरण असलेल्या बिया काही काळ विशिष्टस संहतीच्या आम्लात भिजवून ठेवल्या की त्यांचे कठीण आवरण विरघळते. मग ह्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून त्यांचे बीजारोपण केल्यास त्या सहज रूजतात.
महाराष्ट्रात जी झाडे वृक्षारोपणासाठी वापरली जातात, ती एकतर बिया लावल्यावर उगवतात किंवा त्यांच्या फांद्या छाटून लावता येतात. तसंच बांबूसारखी जी झाडे अनेक वर्षांनी एकदाच फुलतात त्यांची रोपे उती संवर्धन (टिश्यू कल्चर) तंत्राने तयार केली जातात.
जी झाडे सहज उगवत नाहीत किंवा दुसर्या प्रदेशात / देशात लावायची असतील ती झाडे सहज रूजविण्यासाठी टीश्यू कल्चर पद्धतीने किंवा जैवतंत्रज्ञानाचा वापर करून लावता यावीत म्हणून अनेक ठिकाणी संशोधन चालू आहे. त्यामुळे अजून काही वर्षांनी कृत्रिमरित्या लावता न येणार्या झाडांची यादी फारशी मोठी राहणार नाही, हे निश्चित!
धन्यवाद देवयानी,
ReplyDeleteआता पुढील प्रश्न : बरीचशी झाडे पावसाळा आला की बहरतात, इतरवेळी त्यांची वाढ नाहीच्या बराबर असते. उदा. पाउस पडताच 'काडीसमान' भासनारे पिंपळाचे रोपटे जोम धरायला लागते.म्हणजे प्रतिकुल परिस्थिती असेल तर ते रोपटे स्वत:ला कसेबसे तगुन ठेवते आणि योग्य परिस्थिती आली की पुन्हा वाढायला लागते. अशी रोपटी कशी शोधावी आणि हे रोपटे पुढील पावसाळ्यात जोमाने वाढेल हे कसे ओळखावे ?
मी आधीच ब्लॉगपोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे बर्याचदा जुने वाडे, किंवा इमारतींच्या दुर्लक्षित भागावर वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडे उगवलेली दिसतात. तसेच शहरांमध्ये पूर्ण वाढलेल्या एखाद्या झाडाच्या बिया आजूबाजूच्या परिसरात रुजून त्यापासून छोटी छोटी रोपे उगवलेली दिसतात. बर्याचदा ही रोपे तिथे नको असल्याने काढून टाकली जातात. अशी रोपे शोधून तात्पुरती कुंडीत किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत लावून ठेवावीत आणि पुढच्या पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी वापरावीत. त्याचप्रमाणे सहलीला गेल्यावरही अशी नको असलेली रोपे सहज सापडू शकतात. त्यासाठी शोधक नजरेने आजूबाजूला पाहण्याची आवश्यकता आहे.
ReplyDeleteसाधारणपणे दोन ते तीन महिने वयाची व किमान पाचसहा पाने असलेली ही वृक्षांची रोपटी मुळांना इजा न होता अलगदपणे काढून घेऊन कुंडीत लावली तर व्यवस्थित रुजतात. मात्र ते रोप काढतांना मुळे तुटणार असतील, तर ज्याचे खोड किमान पेन्सिलएवढ्या जाडीचे आहे, असे रोप काढले, तरी त्याला नवीन मुळे सहज येऊ शकतात. फक्त ह्या रोपांवर कीड किंवा बुरशी आली असेल, तर अशी रोपे निवडणे टाळावे.
ही रोपे कुंडीत लावतांना साध्या मातीत लावावी किंवा त्यात फक्त कंपोस्ट खत वापरावे. मातीत शेणखत किंवा रासायनिक खते घालू नयेत. जास्त प्रमाणात शेणखत घातले गेल्यास त्याच्या उष्णतेने किंवा रासायनिक खतांमधून मुक्त होणार्या रसायनांमुळे ही रोपे करपण्याची / जळण्याची शक्यता असते. तसेच कुंडीत झाड लावल्यावर त्याला रोज पाणी घालून त्याची देखभाल करावी. त्यावर कीड / बुरशी पडल्यास कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
ही कुंडीत लावलेली रोपे एक वर्ष वयाची किंवा त्याहून थोडी मोठी झाल्यावर मगच वृक्षारोपणाकरता वापरावीत म्हणजे ती जोमाने वाढतील. मात्र वृक्षारोपणाच्या जागी असलेली माती अति आम्लयुक्त किंवा अति क्षारयुक्त असेल, तर ती झाडे जोमाने वाढणे कठीण होते.
ह्यापेक्षा अधिक माहिती हवी असेल, तर त्यासाठी मात्र तुम्हांला एखाद्या तज्ज्ञाकडूनच माहिती घ्यावी लागेल. ज्यांना गार्डनिंगची प्राथमिक माहिती हवी आहे अशा हौशी लोकांसाठी "मुंबई विद्यापीठात", बहिःशाल विभागातर्फे "निसर्गप्रेमींसाठी वनस्पतिशास्त्र" हा अभ्यासक्रम राबविला जातो. यावर्षीचा हा अभ्यासक्रम सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यासाठी ६५९५२७६१, ६५२९६९६२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा अशी माहिती आजच्या नवाकाळ पेपरमध्ये आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्हांला हवी असलेली अधिक माहिती मिळू शकेल.
विक्रम येंदे आणि त्यांची टीम इमारतींवर वाढलेली झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण करण्याचे काम करतात. विक्रम येंदे यांनी इंग्रजीतून सांगितलेले काही मुद्दे त्यांच्याच शब्दांत मी इथे देत आहे.
ReplyDeleteVad, Pimple, Umber are plants with high air pollution tolerance index, supports biodiversity, got strong foundations and very rarely falls apart. gives max humidity, unfortunately all civic bodies do not plant this trees and rely on non-native trees like gulmohar, rain tree, peltroforum which are not useful for birds-insects, week foundation, falls apart in even small storm- wind.
there are 100 other native plant species available for plantation. which are also useful for indian enviornment.
We are Green umbrella Plant rescue team and would like to add some point in this nice informative blog.
When you are rescueing the plant. That is if a plant is removed from concrete strucutre or from wall ( removing from one place and planting on another place)
1. With great care and surgical precision you need to carefully remove the roots. with minimum damage to sapling.
2. If possible keep it in the solution of keradex ( rootex )
or simply deep the roots in water for 15-20 min.
3. plant the tree in proper size tree pot or plastic bag ( with water exit holes below)
use good quality soil.
4. Rescued plant may give up all its leaf when planted as it is suffered from removal shock, and it may take 3-4 weeks or more time to grow new leaf. So please have patience and don’t assume that plant is dead. Continue to take care of it ( pour water regularly,keep in shadow area where it will receive little sunlight).
After few months if you feel that tree pot or plastic bag in which it is planted is small enough for futher growth then shift the sapling in bigger pot or in bigger plastic bag carefully containing good quality soil.( remove the previous plastic bag first)
5. plant it in rainy days ( june) on safe,open location where it can see full growth. dont forget to dig water trenchs around and away from the sapling (in such a way that water-pond should not get created arund the roots, else sapling will die due to excess water, as roots continuously deeped in water.) This water trench will ensure supply of humidity,water to sapling in summer season.
विक्रम येंदे यांनी इमारतींवरील झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण कसे करावे याचे छायाचित्रांसहित पाठवलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशेन मी गुगल डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह केले आहे. ते आपण खालील लिंकवर पाहू शकता.
http://tinyurl.com/363cxfq
तसेच विक्रम येंदे यांच्याशी आपण 9967435681 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.
अरे वा. खूप सुरेख माहिती मिळाली या लेखातून. मी नेमकी ही गोष्ट शोधत होतो की अशी कुठली फळझाडं आहेत जी केवळ बिया पेरून उगवू शकतात. त्याबद्दल काही उपयोगी माहिती या लेखात मिळाली. डोंगर उतारावर ही फळझाडं उगवतात का? डोंगर उतारावर लावण्यासाठी योग्य झाडं कुठली? याबद्दल माहिती मिळू शकेल का?
ReplyDeleteधन्यवाद AJ!
ReplyDeleteपावसामध्ये डोंगर उतारावर लावलेल्या झाडांभोवतीच्या मातीची धूप होऊन ती वाहून जात असेल, तर अशी झाडं नीट रुजू शकत नाहीत. मात्र अशा मातीत जरा खोल खड्डा खणून त्यात झाड लावलं, तर ते रुजण्याची शक्यता वाढते. तसेच वृक्षारोपणानंतर पावसाळ्यात काही ठराविक काळाने लावलेल्या झाडांची पाहणी केली आणि झाडांची उघडी पडलेली मुळे मातीने झाकून टाकली, तर झाडं व्यवस्थित वाढतील. अशी नीट काळजी घेतली, तर डोंगर उतारावरही झाडं नीट वाढतात, अगदी फळझाडंसुद्धा नीट जगतात! मी माझ्या लेखात ज्या झाडांची नावं दिली आहेत, ती झाडं डोंगर उतारावर लावता येतात. फक्त तुम्ही झाडं कोकणात लावणार आहांत, की विदर्भात, की पश्चिम महाराष्ट्रात याचा विचार करून, त्या त्या परिसरात वाढणारी झाडे निवडा. तिथल्या वनविभागाकडूनही तुम्हांला ही माहिती मिळू शकेल. उदा. फणसाचे, नारळाचे झाड कोकणात लावायला निवडावे.
dilelya mahitibaddal dhanyawad aata aamhi javalach dongar utaravar vruksha ropan karnar aahot yasathi aamhi biya gola kelya asun tya dongar utravar kashya lavavya yabbadal mahiti dya,aani moh,hataga arjun he vruksha kuthe uplabdha hotil???he mala krupaya shantanukulkarni100@gmail.com var email karave dhanyawad
ReplyDeleteब्लॉगवरील प्रतिसादासाठी धन्यवाद shantanu kulkarni!
ReplyDeleteबीजारोपण करतांना दर दहा ते बारा फूट अंतरावर खुणा (छोटे खड्डे) करून घ्या. बिया रोवण्यासाठी सहा ते नऊ इंच खोल खड्डा खणावा. तो जास्त पावसाचा भाग असेल, तर पावसामुळे माती वाहून जाण्याची शक्यता असते, म्हणून नऊ इंच खोलीचा खड्डा खणून त्यात बी लावावी. ही सगळी माहिती मी ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे.
मोह, हातगा / हादगा, अर्जुन हे वृक्ष असल्याने ज्या नर्सरीत ऍव्हेन्यू ट्री किंवा फॉरेस्ट ट्री विकले जातात, तिथेच ते उपलब्ध होतील किंवा वनविभागातर्फे चालवल्या जाणार्या नर्सरीत मिळतील.
http://www.bizvine.in/Services/Plants-and-Trees/MM ह्या वेबसाईटवर काही नर्सरींची माहिती आहे, तिथे चौकशी करा.
शंतनू, तुम्हांला डोंगरउतारावर झाडांना लागणारे पाणी जिरवण्यासाठी चर खणायचे आहेत, हे एक चांगले काम तुम्ही हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन मग वृक्षारोपणाचे आणि चर खणण्याचे काम करा.
ReplyDeleteमी स्वतः कधी चर खणण्याच्या कामात सहभागी झालेले नाही, किंवा कोणाचे असे काम पाहिलेले नाही, पण मला यासंदर्भात जितकी माहिती आहे, तितकी मी तुम्हांला देत आहे.
पाणी अडवून जिरवण्यासाठी खोदलेले चर हे साधारणपणे १५ फूट लांब, २ फूट रुंद आणि १ फूट खोल असतात आणि ते डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत ठराविक अंतरावर खणतात. बीजारोपण / वृक्षारोपणासाठी दोन झाडांमध्ये दहा ते बारा फूट अंतर सोडावे लागते, तेवढेच अंतर वरच्या आणि खालच्या चरामध्ये सोडावे लागेल.
Sir Mi Nandurbar diatrict cha
ReplyDeleteAamchya kade aambyache jhad ka jagat nahi...plzzz kahi suggestions
नमस्कार,
Deleteमला जेवढी माहिती आहे, तेवढी मी या पोस्टमध्ये दिली आहे. त्यात दिलेल्या सूचना पाळूनही जर तुमची आंब्याची झाडे जगत नसतील, तर तुम्ही तुमच्या भागातल्या एखाद्या कृषितज्ज्ञाचा सल्ला घ्या. तेच तुम्हांला योग्यप्रकारे मार्गदर्शन करू शकतील. इथे मी या पोस्टमध्ये दिलेली माहिती आणि त्याखालच्या प्रतिक्रिया हे सर्व तुम्ही नीट वाचले असेल, असे मी गृहीत धरलेले आहे - गृहीतच धरावे लागले, कारण पोस्ट लिहिणारी व्यक्ती लेखक आहे, की लेखिका याची नेमकी दखलही तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांमध्ये घेतलेली दिसत नाही.
Sir ek madat pahije
ReplyDeleteमाझ्याकडून शक्य असलेली मदत मी केली आहे.
Deleteनमस्कार,
Deleteमला जेवढी माहिती आहे, तेवढी मी या पोस्टमध्ये दिली आहे. त्यात दिलेल्या सूचना पाळूनही जर तुमची आंब्याची झाडे जगत नसतील, तर तुम्ही तुमच्या भागातल्या एखाद्या कृषितज्ज्ञाचा सल्ला घ्या. तेच तुम्हांला योग्यप्रकारे मार्गदर्शन करू शकतील. इथे मी या पोस्टमध्ये दिलेली माहिती आणि त्याखालच्या प्रतिक्रिया हे सर्व तुम्ही नीट वाचले असेल, असे मी गृहीत धरलेले आहे - गृहीतच धरावे लागले, कारण पोस्ट लिहिणारी व्यक्ती लेखक आहे, की लेखिका याची नेमकी दखलही तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांमध्ये घेतलेली दिसत नाही.
Maz gav Nandurbar district madhe....aamba ka jagat nahi...plz help
ReplyDeleteनमस्कार,
Deleteमला जेवढी माहिती आहे, तेवढी मी या पोस्टमध्ये दिली आहे. त्यात दिलेल्या सूचना पाळूनही जर तुमची आंब्याची झाडे जगत नसतील, तर तुम्ही तुमच्या भागातल्या एखाद्या कृषितज्ज्ञाचा सल्ला घ्या. तेच तुम्हांला योग्यप्रकारे मार्गदर्शन करू शकतील.
धन्यवाद!