शनिवारची सकाळची वेळ, दहा साडेदहा वाजले असतील. "तुला पक्ष्यांचे फोटो काढायचे होते ना? विहिरीच्या जाळीवर एक बगळा बसलाय." बाबा मला सांगत होते. "काही नको आता. काल मी फोटो काढण्यासाठी इतका वेळ घालवला, एक पक्षी फिरकला नाही. आता मी कॅमेरा खोक्यात घालून कपाटात ठेवून दिलाय, सेल पण परत चार्ज करावे लागतील, बहुतेक!" मी म्हणाले.
थोड्या वेळाने अकरा साडेअकराला परत बाबा त्या बगळ्याला बघून आले. "आता त्या बगळ्याने विहिरीत झेप घेतलीये, तो पोहोतोय मस्त! त्याचा एक पंख थोडा जखमी झाल्यासारखा दिसतोय, त्याला उडता येत नसेल नीट आणि त्यात त्याला बघायला रस्त्यावरच्या मुलांनी गर्दी केली म्हणून बहुतेक त्याने विहिरीत उडी घेतलेली दिसतेय." बाबा म्हणाले. त्या बगळ्याने आत झेप तर घेतली आहे, पण त्याला बाहेर येता येईल ना? हा प्रश्न आमच्या मनात येत होता. पण नंतर बाबा मिटींगला निघून गेले आणि मीही त्या बगळ्याला बघायला गेलेच नाही.
नंतर संध्याकाळी पाच वाजता मी बाहेर गेले आणि आमच्या इमारतीच्या आवारात असलेल्या त्या विहिरीकडे गेले. तो बगळा इतका वेळ त्या विहिरीत असेल का, याबद्दल मी साशंकच होते. पण विहिरीत डोकावून पाहिलं, तर तो बगळा अजूनही विहिरीतच होता. व्यवस्थितपणे दगडांनी बांधून काढलेल्या त्या विहिरीत माणसांना उतरण्यासाठी काही ठिकाणी भिंतीतून दगडाचे बाहेर आलेले चिरे ठेवलेले आहेत. त्यातला एक चिरा त्या बगळ्याच्या अगदी जवळ पाण्यापासून अर्ध्या पाऊण फुटांवरच होता, पण तो बगळा काही उडून त्या चिर्यावर बसला नव्हता. तो फक्त एक पंख कसाबसा पसरून पाण्यात पोहत होता. अधूनमधून भिंतीतल्या दगडांमध्ये जोर लावून चोच खुपसत होता, तर मधूनच पाण्यात चोच बुडवून तो पाणी पीत होता किंवा एखादा मासा खात असावा. पण तो पाण्यात दमल्यासारखा वाटत होता. त्याला पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता होती, हे माझ्या लक्षात आलं आणि याआधीच मी त्या बगळ्याला बघायला आले नाही, याबद्दल मला हळहळ वाटायला लागली.
मी घरात आले आणि कपाटातून एक दोरी बाहेर काढली. ती दोरी घेऊन मी विहिरीकडे गेले, विहिरीवर बारीक जाळी बसवलेली असली, तरी विहिरीवर पंप बसवलेला असल्याने, त्या पंपाचे पाईप जिथून विहिरीत गेले आहेत, तिथे नुसतेच लोखंडी गज लावलेले आहेत आणि तिथे बगळ्याला वरती येण्याइतपत मोकळी जागा आहे. तिथून मी दोरी आतमध्ये टाकून पाहिली, ती पाण्यापर्यंत पोचत होती, पण त्या बगळ्याने दोरीचा आधार घ्यायचा कोणताच प्रयत्न केला नाही.
आता दोरीला बादली जोडूनच बगळ्याला बाहेर काढावं लागेल म्हणून मी बादली आणायला जाणार, तितक्यात माझी आईच हातात बादली घेऊन आली. आवारातल्या (आम्ही त्यालाच बाग म्हणतो) झाडांना पाणी घालण्यासाठी तिने ती बादली आणली होती. तिनेही तो बगळा पाहिला. "आता बादली टाकून तो बगळा काढायचा म्हणजे, जाळीवरचा पत्रा काढावा लागेल." मी म्हणाले.
विहिरीतलं पाणी काढण्यासाठी किंवा विहिरीत एखाद्या माणसाला उतरण्यासाठी त्या जाळीला चौकोनी दार होतं आणि त्यावर पत्रा ठेवून ते बंद केलं होतं. त्याशिवाय विहिरीत शिरण्यासाठी आमच्या विहिरीच्या कठड्याला एक दार आहे, त्या दाराच्या इथे विहिरीचा कठडा फक्त एक फूट उंचीचा आहे. आणि या दारातून आत शिरलं की कठड्याच्या आत जमिनीच्या पातळीवर विहिरीचा दुसरा कठडा आहे. हा बहुधा त्या विहिरीचा मूळ कठडा असावा आणि आमची इमारत बांधून झाल्यावर तिला बाहेरचा दुसरा उंच कठडा बांधला असावा. त्यात ही विहिर इमारतीच्या कुंपणाला अगदी लागून असल्याने त्या बाहेरच्या उंच कठड्याचा अर्धा भाग म्हणजे कुंपणाच्या एकमेकांना काटकोनात मिळणार्या भिंती आहेत. महानगरपालिकेच्या कृपेने या भिंतीलगतचे पदपथ इतके उंच बांधले गेले आहेत, की कोणीही त्यावरून थेट विहिरीत डोकावून बघू शकतो. आत्ताही मी विहिरीत बघत असतांना रस्त्यावरून जाणार्या एकदोन बायकांनी काय करताय म्हणून चौकशी केलीच.
मी कठड्याजवळचं दार उघडायचा प्रयत्न केला, पण अलिकडे झालेल्या इमारत दुरूस्तीच्या वेळी कामगारांनी एक सिमेंटचं पोतं तिथे ठेवलं होतं, ते आता हलवलं असलं, तरी त्यातून सांडलेलं सिमेंट पावसाळ्यात पक्कं झालं होतं आणि दार त्याच्यात घट्ट अडकून बसलं होतं. आता एकच मार्ग होता, उंच कठड्यावरुन आत उडी मारायची आणि मग तो पत्रा काढायचा. मला काही त्या कठड्यावरून आत उडी मारणं शक्य नव्हतं. "कोणाला तरी बोलावून तो पत्रा काढावा लागेल. शेजारच्या खडपेकरांना शनिवारी सुट्टी असते, ते घरी असतील, त्यांना सांगूया पत्रा काढायला." मी आईला म्हणाले. आई त्यांच्याकडे जाऊन आली, ते घरी नव्हते. आता कोणीतरी आल्याशिवाय काहीच करता येणं शक्य नव्हतं. आई झाडांना पाणी घालत होती आणि मी त्या बगळ्याकडे पाहत होते. तेवढ्यात तो बगळा परत पोहायला लागला आणि विहिरीच्या दाराच्या थेट दुसर्या बाजूला गेला.
एकेकाळी आमच्या इमारतीत स्वयंपाकासाठी लागणारे आणि पिण्यासाठीचे पाणी सोडले, तर इतर सर्व कामांना या विहिरीचे पाणी वापरले जायचे. पण काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नवीन गटारं बांधली आणि सांडपाण्याचे नवीन पाईप बसवले; आता ते वर्ष-सहा महिन्यांतून एकदा तुंबतात आणि त्याचं पाणी विहिरीत झिरपतं. पाणी खराब झालं, की विहिरीच्या पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे आता विहिरीचं पाणी फक्त गाड्या धुण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी आणि स्वच्छतागृहात फ्लशसाठी वापरलं जातं. त्यात पाण्याचा वापर कमी झाल्याने त्या पाण्यात शेवाळं साचायला लागलंय. तीनचार महिन्यांपूर्वीच पाण्यातलं शेवाळं काढलं होतं, तरी आता परत त्यात नवीन शेवाळं साचलंय. अशा पाण्यात तो बगळा स्थिर बसला होता आणि अधूनमधून पाण्यात बुडालेल्या त्याच्या पंखांवरुन बारीकसे मासे फिरतांना दिसत होते.
आईचं झाडांना पाणी घालून होत आलं आणि मला खडपेकर बाहेरून येतांना दिसले. त्यांना बगळा पाण्यात पडलाय म्हणून सांगितलं, तर ते हातातलं सामान घरात ठेवून लगेच आले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अजिंक्य, आणि मुलाचा मित्र असे दोघेही आले. खडपेकर विहिरीच्या कठड्यावरुन उडी मारून आतल्या कठड्यावर उतरले आणि त्यांनी जाळीवरचा तो पत्रा बाजूला सरकवला आणि त्यांच्याकडची आणि आमच्याकडची मोठी काठी आणि अजून एक दोरी मागितली. त्यांनी त्या दोन्ही काठ्या दोरीने जोडल्या, मी तोपर्यंत बादलीला दोरी बांधली.
मग खडपेकरांनी काठीने ढोसत त्या बगळ्याला जाळीच्या छोट्या दरवाजाखाली आणले, आणि मी लगेच पाण्यात बादली सोडली. सुदैवाने त्यांनी परत काठीने ढोसल्यावर फारशी खळखळ न करता तो बगळा बादलीत आला आणि खडपेकरांनी लगेच बादली वर ओढून घेतली. बादली बाहेर काढून जमिनीवर ठेवली आणि कशीबशी त्या बगळ्याने बाहेर उडी मारली. त्याच्या दोन्ही पायांत शेवाळं अडकलं होतं, त्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. इकडे आम्ही त्या बगळ्याला बाहेर काढतोय हे पाहून वरती कावळ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी काही त्या बगळ्याला सोडलं नसतं. "त्या बगळ्याच्या पायातलं शेवाळं काढून टाकलं पाहिजे." असं मी सुचवल्यावर त्यांनी अजिंक्यला कात्री आणायला सांगितली.
अजिंक्यने कात्री आणली. मग खडपेकरांनी त्या बगळ्याचं तोंड धरलं आणि मी कात्री घेऊन ते शेवाळं कापायला लागले. "लवकर काप." ते मला घाई करत होते. पण त्या बगळ्याचे पाय असे काही त्यात गुंतले होते, की त्याच्या पायाची बोटं आणि नखंही त्यात वेगळी दिसून येत नव्हती. मला बर्याच वर्षांपूर्वी बारावीत असतांना शिकलेल्या पक्ष्यांच्या पायाच्या रचनेची आठवण झाली. बहुतेक पक्ष्यांच्या पायाची तीन बोटे पुढच्या बाजूला असतात, आणि एक बोट मागच्या बाजूला थोडे उंचावर असते. त्यामुळे ते घाणेरडा वास येणारं ते शेवाळं मी अगदी सावकाश अंदाज घेत कापत होते. चुकून त्या बगळ्याचं बोट कापलं जाईल याची मला धास्ती वाटत होती.
एकदाचं ते शेवाळं कापून मी त्या बगळ्याचे पाय मोकळे केले. बगळ्याला अशा प्रकारे हाताळण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यानेही मी शेवाळं कापत असतांना त्याची धारदार नखं मला लागू दिली नव्हती आणि शांतपणे ते सहन केलं होतं. आता खडपेकरांनी त्या बगळ्याला मोकळं सोडलं आणि आम्ही पहिल्यांदाच त्या बगळ्याला नीटपणे पाहिलं. सोनेरी डोकं आणि धारदार चोच असलेला तो बगळा फार छान दिसत होता. पण त्याचा एक पंख मोडल्यामुळे तो नीटसा उडू शकता नव्हता. मोकळा झाल्यावर परत तो बगळा विहिरीच्या दिशेने जायला लागला.
तो परत विहिरीत जाऊ नये म्हणून, खडपेकरांनी त्याला काठीने ढोसत ढोसत पंपाच्या खोलीजवळ आणलं, पण आता तो बगळा प्रतिकार करून काठीला चावे घेत होता. मग त्यांनी पंपाच्या खोलीचं दार उघडून त्याला आत ढकललं आणि खोलीला कुलूप लावलं. पंपाच्या खोलीतला बल्ब चालू करून ठेवला होता, कारण तो बगळा पाचसहा तास पाण्यात भिजला होता. "त्याला दोन तास इथे उबेत राहू दे, मग मी त्याला कुठेतरी लांब सोडून येतो," खडपेकरांनी सांगितलं.
घरात आल्यावर मी इंटरनेटवर शोध घेतला, तर मला डोंबिवलीच्या "प्लांट्स ऍंड ऍनिमल वेलफेअर सोसायटी"चा (पॉसचा) फोननंबर मिळाला. त्याचवेळी माझा आतेभाऊ घरी आला होता. त्याची एक मैत्रीणही वन्यजीव संवर्धनाचे काम करते, त्याने तिला फोन लावला तर तिनेही पॉसचाच फोननंबर दिला. मग पॉसवाल्यांना फोन लावला. त्यांनी थोड्याच वेळात कोणालातरी पाठवतो म्हणून सांगितलं. मग खडपेकरांना जाऊन सांगितलं, की पॉसवाले येऊन बगळ्याला घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्याकडून पंपाच्या खोलीची चावी घेतली.
तोपर्यंत बाबा घरी आले होते. मग त्यांना बगळा दाखवण्याच्या निमित्ताने परत बगळ्याला बघायला गेले. आता बगळ्याला खायला काय द्यायचे, हा आमच्यापुढचा मोठा प्रश्न होता. कारण आमच्या इमारतीत राहणारे सगळेच शाकाहारी आहेत. मग कदाचित तो फळं खाईल, म्हणून चार द्राक्षं, आवारातल्या औदुंबराची फळं आणि एक बिस्कीट एका प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणात घालून त्याच्या पुढयात ठेवलं आणि एका प्लास्टिकच्या डब्यात पाणी भरून शेजारी ठेवलं. अर्थात आम्हांला पाहिल्यावर तो बगळा बुजून पंपाच्या बाजूला जाऊन लपला.
थोड्या वेळाने पाहिलं, तर त्याने अजून काही खाल्लं नव्हतं, पण पंपाच्या मशिनवर उभा राहून तो त्याची मान विशिष्ट लकबीत वरखाली करत होता. म्हणजे त्याला थोडं स्थिरावल्यासारखं वाटत असावं. त्याच्या सुंदर सोनेरी डोळ्यांनी तो आमचं निरिक्षण करत होता, तेव्हा फारच गोंडस वाटत होता. असं वाटत होतं, की त्याला पाळून इथेच ठेवावं. पण ते शक्य नव्हतं.
थोड्या वेळाने पॉसची माणसं आली. अजिंक्य आणि मी कुतुहलाने ते काय करतात ते बघायला त्यांच्याबरोबर गेलो. बाबांनी पंपाच्या खोलीचं दार उघडलं, आणि त्या माणसांपैकी एकाने आत जाऊन अगदी सफाईने अलगद त्या बगळ्याला उचललं. मग मी त्या बगळ्याचा मोबाइलवर एक फोटो काढला. मग त्यांनी त्या बगळ्याला एका कापडात गुंडाळून घेतलं. तोही आता भरपूर दमलेला असल्याने काही विरोध न करता शांतपणे त्या माणसाच्या हातात बसला. मग त्या माणसाने त्या बगळ्याच्या डोक्यातून हात फिरवत त्याला गोंजारलं. ते पाहून आमचीही भीती चेपली आणि आम्हीपण त्या बगळ्याच्या रेशमासारख्या मुलायम सोनेरी डोक्यावरुन हात फिरवून घेतला.
तो एक नुकताच उडायला शिकलेला नर बगळा होता. वयात आल्यावर त्याच्या सोनेरी डोक्यावर पांढरा तुरा येणार होता. आत्ता त्याचा जखमी पंख सोडल्यास तो बाकी सुस्थितीत होता. आम्ही त्याला जबरदस्तीने खायला प्यायला घालायचा प्रयत्न केला असता तर त्याची मान वाकडी असल्याने, त्याच्या नाकात ते गेलं असतं आणि मानेला इजा झाली असती. पण आम्ही तसं काही केलं नव्हतं. आता ते लोक त्याला इथून घेऊन जाऊन त्यांच्याकडच्या पिंजर्यात ठेवणार होते आणि सकाळी प्राण्यांसाठी असलेल्या खास रूग्णवाहिकेतून त्याला परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेणार होते. हा बगळा बरा झाल्यावर ते त्याला आयुष्यभर तिथल्याच एका शेल्टरमध्ये ठेवणार होते, कारण एकदा माणसाचा स्पर्श त्याला झाला की बाकीचे बगळे अशा बगळ्याला त्यांच्यात येऊ देत नाहीत. त्याच्यावर हल्ले करून त्याला मारून टाकतात. असं आम्हांला पॉसच्या लोकांनी सांगितलं.
बगळा हा वन्यजीवांमध्ये येत असल्याने, कोणीही तो पाळू शकत नाही. पाळला तर तो गुन्हा होतो. पॉसच्या लोकांनाही हा बगळा रूग्णालयात नेतांना तो कुठून आणला ह्याची माहिती देणं बंधनकारक असतं. त्यामुळे त्यांनी आमच्या सोसायटीकडून तो जखमी अवस्थेतला बगळा ताब्यात घेण्यासंबंधीचे लेखी पत्र घेतले आणि त्या बगळ्यासहित ते निघून गेले. अशा रितीने अनपेक्षितपणे आलेला हा अनाहूत पाहुणा आम्हांला हूरहूर लावत निघून गेला. आता तो लवकर बरा व्हावा ह्या सदिच्छा फक्त मनात रेंगाळत राहिल्या आहेत.
आपणापैकी कोणाला पॉस डोंबिवली यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्याचे अध्यक्ष श्री. निलेश भणगे यांच्याशी ९८२०१६१११४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.
इंग्रजीत असे म्हटले जाते "Save a life, save the world". याचे वेगवेगळे अर्थ 'संदर्भानुसार' घेतले जातात. पण हे कार्य जग वाचवण्याइतके महत्व ठेवते. एका जखमी बगळ्याला आपल्यामुळे जीवदान मिळाले. या सृष्टीचा समतोल राखण्यात त्याचा सहभाग कुठे आणि काय असू शकतो हे तो सृष्टीकर्ताच जाणो पण जर सृष्टी वाचली तरच त्यातील जीव वाचतील. आपण उचललेला खारीचा वाटा सृष्टी वाचवण्याचा सेतू बांधायला प्रेरणा देवो हिच शुभेच्छा !!!
ReplyDeleteधन्यवाद योगेश!
ReplyDeleteही पोस्ट लिहितांना, प्राणीमित्र संघटनांचे काम कशा प्रकारे चालते आणि त्यांच्या मदतीने आपण एखाद्या प्राण्याचा जीव कसा वाचवू शकतो ह्याची माहिती लोकांना देणे हाही माझा एक उद्देश होता.
बगळ्याची दिलेली विस्तृत माहीती , त्याचा जीव वाचण्यासाठी केलेली धडपड, आणि पॉस केलेली सर्व काही कौतुकास्प्द आहे.
ReplyDeleteधन्यवाद पेठेकाका!
ReplyDeleteबलळ्याला वचव्ण्याचि केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.शगळ्यानीच यात हात्भार लावला आणी पुन्हा योग्य ती कारवाई पण केली. तुमचे अभिनन्दन.
ReplyDeleteधन्यवाद अरूणा!
ReplyDeleteआज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग पाहण्यात आला IndiBlogger मुळे. तुम्ही खूप साध्या भाषेत छान वर्णन केल आहे. आता सवडीने तुमच्या जुन्या पोस्ट्स पण वाचेन.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteIndiBlogger मुळे मलाही तुमचा इंग्लीश ब्लॉग वाचायला मिळाला.