घरात फुलझाडं लावतांना फुलांचा राजा गुलाबाला नेहमीच प्रथम पसंती दिली जाते. गुलाबाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
१. हायब्रिड टी - गोड सुवासिक फुलांचे संकरित झाड.
२. हायब्रिड परपेच्युअल - भरपूर वाढणारे व मोठी फुले येणारे झाड.
३. टी रोझ - नाजूक झाड ज्याला भरपूर सुवासिक फुले येतात.
४. फ्लोरिबंडा - मोठ्या आकाराच्या फुलांचे छोटे गुच्छ येणारे झाड.
५. पॉलिऍंथा - छोट्या आकाराच्या फुलांचे भरपूर गुच्छ येणारे झाड.
६. मिनिएचर - बटणाच्या आकाराची छोटी फुले येणारे आणि छोट्या आकाराची पाने असणारे बुटके झाड.
७. क्लाइंबर - वेली गुलाब.
८. रॅंबलर
९. बुश रोझ - झुडुपी गुलाब.
गुलाबाच्या झाडाला तीन ते सहा तासांच्या सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. गुलाब, पाण्याचा निचरा होणार्या व भरपूर सेंद्रिय द्रव्ये असलेल्या मातीत चांगले वाढतात.
गुलाबाची झाडे फांदी लावून, डोळा भरून किंवा कलम करून लावता येतात.
गुलाबाची फांदी लावतांना, पेन्सिलएवढ्या जाडीची फांदी निवडावी. त्या फांदीला पाच ते सहा डोळे असावेत. फांदीची खालची बाजू केरेडिक्स पावडरमध्ये बुडवून घेऊन, मग ती मातीत तिरपी लावावी. केरेडिक्समुळे फांदीला लवकर मुळे फुटतात.
गुलाबाचा डोळा भरतांना तो देशी गुलाबावर भरावा. ज्या झाडाचा डोळा भरायचा आहे, त्याचा डोळ्याचा भाग वरच्या पातळ सालीसकट चाकूने एकाच घावात अलगद काढून घ्यावा. ज्या झाडावर डोळा भरायचा आहे, त्यावर मातीपासून पाच ते सहा सें.मी. उंचीवर "टी" आकाराचा काप घ्यावा. या "टी" आकाराच्या कापाच्या दोन्ही उभ्या कडा उंचावून त्याच्या आत कापलेला डोळा बसवावा. मग डोळ्याचा फक्त फुटवा येणारा भाग मोकळा राहील, अशाप्रकारे या "टी" आकाराच्या कापावर सेलोटेप घट्ट बांधावा. डोळा भरण्याचे काम संध्याकाळी करावे. या झाडाला सावलीत ठेवावे व भरपूर पाणी घालावे. मात्र कापातील डोळ्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. सुमारे दहा ते एकवीस दिवसांनी डोळ्याची वाढ झाल्यावर, त्याच्या वरच्या व खालच्या बाजूच्या डोळ्यांमधील वाढ काढून टाकावी.
गुलाबाची काही बाबतीत काळजी घ्यावी लागते. जेव्हा गुलाबाला डोळा भरलेल्या जागेच्या खालून फांद्या फुटतात, तेव्हा त्याला "सकर" असे म्हणतात. या सकर्समुळे डोळा भरलेल्या जागेची वाढ खुंटते व कधी कधी डोळा जळून जातो. म्हणून असे नवीन सकर्स त्याच्या मूळ जागेपासून उपटून काढावेत.
गुलाबाच्या फांद्या वेळोवेळी छाटणे आवश्यक असते. छाटणीच्या वेळी जळालेल्या, रोग पडलेल्या, अशक्त व नाजूक राहिलेल्या, नको असलेल्या व फुले न येणार्या फांद्या छाटाव्यात. छाटणी केल्याने झाडाची वाढ चांगली होते व झाडाला भरपूर फुले येतात. गुलाबाची छाटणी जूनच्या सुरूवातीला व ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी करावी. गुलाबाच्या झाडाची उंची अर्ध्यापेक्षा थोडी जास्त राहील, अशा प्रकारे फांद्यांची छाटणी करावी.
गुलाबाला पाणी घालतांना कुंडीतील माती कोरडी झाल्यावर पाणी घालावे. साधारणपणे हिवाळ्यात एकदा व उन्हाळ्यात दोनदा पाणी घालावे. पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालावे. पाणी सकाळी किंवा संध्याकाळी घालावे, दुपारी घालू नये.
गुलाबाला महिन्यातून एकदा "सुफला" किंवा गुलाबासाठी असलेले खत सुमारे एक चमचा घालावे. त्याचबरोबर "बोनमिल" किंवा "स्टेरामिल" महिन्यातून एकदा अर्धा चमचा घालावे. तसेच "निंबोळी पेंड" महिन्यातून एकदा एक चमचा घालावी.
झाडाला खत घालण्यापूर्वी खुरप्याने कुंडीतील माती सैल करून घ्यावी. त्या मातीत झाडाच्या खोडापासून दूर, कुंडीच्या कडेला खत घालावे. खताला मातीने पुन्हा झाकून झाडाला पाणी घालावे.
गुलाबावर महिन्यातून एकदा सौम्य बुरशी-नाशकाची व सौम्य कीटकनाशकची फवारणी करावी. घरातल्या झाडांवर फवारण्यासाठी घरगुती कीटकनाशक तयार करावे. दोन चमचे तंबाखू एक लीटर पाण्यात चोवीस तास भिजत ठेवून, नंतर हे पाणी स्वच्छ फडके वापरून गाळून घ्यावे व त्यात एक चिमूटभर साबण पावडर घालावी. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे व कीटकनाशक म्हणून वापरावे.
गुलाबाच्या फुलांची छाटणी करतांना त्या फुलाबरोबरच त्याच्या खालचे दोन ते तीन डोळेही फुलाबरोबरच कापावे, म्हणजे नवीन फुले चांगली येतात.
***********************
- १९ मे २००५ रोजी प्रकाशित झालेल्या "घटनाक्रम" या साप्ताहिकातील हा माझा लेख.
टीप - मुंबई व मुंबईच्या परिसराचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन या लेखातील सूर्यप्रकाश आणि झाडांचा परस्परसंबंध दर्शविणारी विधाने केली आहेत. इतर ठिकाणी भौगोलिक स्थानाप्रमाणे झाडांसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश कमीजास्त असू शकतो.
उपयुक्त माहिती.धन्यवाद. माझ्याकडे गुलाब आहेत परंतु मला दोन-तीन वेगवेगळे गुलाबांचे रंग मिसळून एक वेगळाच रंग आणायचा आहे. काय करावे? का असे करता येणार नाही. एका देशी-वेली गुलाबाच्या फांदीवर हे निरनिराळे डोळे भरून पाहू का?
ReplyDeleteभाग्यश्री,
ReplyDeleteसंकरित गुलाब दोन प्रकारे तयार करतात.
पहिल्या प्रकारात संकरित गुलाब परागसिंचन पद्धतीने तयार करतात. पण आपण मुंबईत राहत असाल, तर येथील वातावरणात गुलाबाला बी धरणे आणि ते बी रूजणे शक्य होईलच असे नाही.
दुसर्या प्रकारात डोळे भरून संकरित गुलाब तयार करता येतात. ह्यात ज्या झाडावर डोळा भरला जातो त्याला "स्टॉक" असे म्हणतात, तर ज्या झाडाचा डोळा बसवला जातो त्याला "सायन" असे म्हणतात. ह्या संकरणात स्टॉक झाडाकडून उंची आणि रोगप्रतिकारक क्षमतेसारखे गुणधर्म संकरित गुलाबात येतात, तर सायन झाडाकडून गुलाबाचा रंग आणि पाकळ्यांचा प्रकार असे गुणधर्म संकरित गुलाबात येतात.
तुम्ही देशी गुलाबाच्या फ़ांदीवर जरूर वेगवेगळे डोळे भरून पहा. पण त्यातून तुम्हांला हव्या असलेल्या रंगछटेचा गुलाब मिळेलच असे निश्चित सांगता येणार नाही.
मी इथे काही वेबसाईटसची नावे देत आहे. त्यावर गुलाबाच्या फ़ुलांचे फ़ोटो आणि त्यांची नावेही आहेत. त्यात तुम्हांला हव्या असलेल्या रंगछटेचा गुलाब असेल, तर त्याचे नाव सांगून तो नर्सरीतून विकत आणता येईल.
http://www.robertbaker.com/medford_roses.htm
http://www.wallingfordfarm.com/roseselection.htm
किंवा तुम्ही रोझ सोसायटीशी संपर्क साधलात तर कदाचित तुम्हांला हव्या असलेल्या रंगछटेचा गुलाब तेथील कॅटलॉगमध्ये असेल, तर त्याचे नाव सांगून तो नर्सरीतून विकत आणता येईल.
उपक्रम या संस्थळावर प्रियाली यांनी मला गुलाबाविषयी विचारलेले प्रश्न आणि त्यांना मी दिलेली उत्तरे इथे खाली देत आहे.
ReplyDeleteनवीन रोपटे लावायचे असल्यास फांदी केरेडिक्स पावडरमध्ये बुडवून घ्यावी असे लिहिले आहे. केरेडिक्स पावडर म्हणजे काय आणि ती कोठे मिळेल?
केरेडिक्स (सेरेडिक्स) पावडर हे एक रूट हार्मोन आहे, जे मुळांच्या वाढीला चालना देते. ही पावडर मोठ्या प्रमाणात विक्री होणार्या झाडांच्या नर्सरीत उपलब्ध असते.
या पावडरमध्ये फांदी बुडवून लगेच काढावी की काही काळ त्यात ठेवण्याची गरज आहे?
या पावडरमध्ये फांदी बुडवून ती लगेच काढावी.
गुलाबाचा डोळा कापताना त्याची खोली किती ठेवावी? म्हणजे फांदीतील आतला पांढरट गरही हवा की बाहेरची पातळ साल आल्यास पुरेसे आहे?
गुलाबाचा डोळा कापतांना तो आतल्या थोड्या हार्डवूड (कठीण उतींसकट) कापा व नंतर हा डोळा उलटा करून त्यातला कठीण उतींचा (हार्डवूडचा) भाग चाकूने काढून टाकावा.
तसेच ज्या झाडावर (दोन डोळ्यांच्या मधल्या भागात) टी आकाराचा काप घ्याल तो काप सालीच्या आतील फिकट हिरव्या रंगाचा भाग दिसेल इतकाच खोल कापावा. ह्या फिकट हिरव्या रंगाच्या भागात कॅंबियम नावाच्या उती असतात. टी कापातील फिकट हिरवा भाग आणि डोळ्याच्या मागच्या भागातील फिकट हिरवा भाग यांचा एकमेकांना स्पर्श झाला पाहिजे म्हणजे ते दोन्ही एकत्र वाढून गुलाबाचे कलम यशस्वीरित्या तयार होते.
यासाठी खालील व्हिडिओचा दुवा देत आहे-
http://youtu.be/9FKM-s8XXh8
अजून एक दुवा - http://www.love-of-roses.com/budding-roses.html
शाळेत असताना कलम करण्याची कृती मी पाहिली होती पण ती नेमकी आठवत नव्हती ती या ब्लॉगवरून पुन्हा नजरेस पडली. मी पाहिलेल्या कृतीत खोचलेल्या डोळ्याभोवती माती लिंपून तिला टेपने बंद केले होते. तसे करण्याची आवश्यकता आहे का?
गुलाबाच्या डोळ्या्वर नुसता सेलोटेप लावला तरी ते पुरेसे आहे. माती लावण्याची गरज नाही. मात्र डोळ्याला पाणी लागणर नाही याची काळजी घ्यावी.
गुलाबाची छाटणी करताना ती एका विशिष्ट जागी (पुन्हा डोळ्यावर) करणे आवश्यक आहे का?
गुलाबाचा डोळा जिथे भरला आहे, त्याच्या खालचे सगळे डोळे छाटून काढून टाकावे. तसेच आवश्यकता असल्यास त्या डोळ्याच्या वरच्या डोळ्यांवर फुटलेल्या फांद्याची छाटणी करावी. मात्र भरलेल्या डोळ्याच्या जागी व्यवस्थित फांद्या फुटल्या आणि त्यांची छाटणी केल्यावरही तो डोळा जळणार नाही इतपत मोठ्या फांद्या झाल्या, की मगच त्या फांद्यांची छाटणी करावी.
2. उपक्रम या संस्थळावर प्रियाली यांनी मला गुलाबाविषयी विचारलेले प्रश्न आणि त्यांना मी दिलेली उत्तरे-
ReplyDeleteतुम्ही दिलेला यू ट्युबचा दुवा गुलाबाच्या काट्यालाच गुलाबाचा डोळा म्हणत आहे असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. मला वाटत होते की गुलाबाला जेथून कोंब फुटतो तो गुलाबाचा डोळा. नेमका फरक सांगाल का?
कलम करताना कोणता डोळा कुठल्या झाडावर कलम केला त्याचा फरक पडतो का?
उदा. पिवळ्या गुलाबावर लाल गुलाबाचा डोळा लावला किंवा लाल गुलाबावर पिवळ्या गुलाबाचा डोळा लावला तर येणार्या रंगांच्या शेड्समध्ये कसा फरक पडतो ते सांगता येईल का?
गुलाबाला जेथून कोंब फुटतो तोच गुलाबाचा डोळा असतो. यू ट्यूबच्या व्हिडिओत दिसणारा गुलाबाचा डोळाच आहे. गुलाबाचा काटा हा त्याच्या डोळ्यापेक्षा जास्त गडद रंगाचा आणि जास्त अणकुचीदार असतो.
ज्या झाडावर डोळा भरला जातो त्याला "स्टॉक" असे म्हणतात, तर ज्या झाडाचा डोळा बसवला जातो त्याला "सायन" असे म्हणतात. ह्या संकरणात स्टॉक झाडाकडून उंची आणि रोगप्रतिकारक क्षमतेसारखे गुणधर्म संकरित गुलाबात येतात, तर सायन झाडाकडून गुलाबाचा रंग आणि पाकळ्यांचा प्रकार असे गुणधर्म संकरित गुलाबात येतात.
कलम करतांना ज्या झाडाची व्हिगर (वाढण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी) जास्त असते अशा झाडावर (स्टॉकवर) कमी व्हिगर असलेला पण आकर्षक रंगाचा, किंवा पाकळ्यांचा गुलाबाचा डोळा (सायन) बसवतात. जर डोळ्याची (सायनची) व्हिगर जास्त असेल, तर कमी व्हिगरच्या स्टॉकवर तो नीट वाढणार नाही.
पिवळ्या गुलाबावर लाल गुलाबाचा डोळा लावला तर त्या डोळ्यावर येणारे गुलाब लाल रंगछटेचे असतील आणि स्टॉकच्या इतर फांद्यांवर येणारे गुलाब पिवळे असतील. सायन लाल गुलाबांच्या रंगछटेत त्यांच्या मूळ रंगछटेपेक्षा खूप जास्त फरक असणार नाही, पण थोडा फरक पडू शकतो. पण सायन गुलाब हे केशरी किंवा अबोली किंवा आंबारंग किंवा मिश्ररंग अशा रंगाचे असणार नाहीत. हाच प्रकार इतर रंगछटांच्या बाबतीतही असतो.
जर तुम्हांला लाल आणि पिवळा गुलाब वापरून केशरी किंवा अबोली किंवा आंबारंग किंवा मिश्ररंग अशा रंगाचे गुलाब मिळवायचे असतील तर त्यासाठी परागसिंचनाची पद्धत वापरून प्रयोग करून बघावे लागतील आणि त्या परागीभवनातून झाडाला धरलेल्या फळातील बिया रूजवून पहाव्या लागतील.