--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Tuesday, June 1, 2010

आला पावसाळा..., चला करूया वृक्षारोपण!

केरळमध्ये नुकतंच मान्सूनचं आगमन झालं आहे, आणि जागतिक पर्यावरणदिनाला (५ जून) थोडासाच अवधी उरलेला आहे; ही अचूक वेळ साधून श्री. योगेश बंग यांनी मला इमेल पाठवून "वृक्षारोपण" या विषयावर माहिती देणारी ब्लॉगपोस्ट लिहिण्याची विनंती केली. ब्लॉगपोस्ट लिहिण्यासाठी हा विषय सुचविल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते.

वाढत्या शहरीकरणासाठी होणार्‍या बांधकामामुळे दिवसेंदिवस कमी होणारी झाडांची संख्या, औद्योगिक प्रगतीमुळे उभारले गेलेले कारखाने, वाहने, आणि फ्रीज, एसी सारख्या उपकरणांमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे हवेतले कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लुरोकार्बन, मिथेन इत्यादी उष्णाताशोषक वायूंचे वाढणारे प्रमाण आणि या वायूंमुळे पृथ्वीभोवती असणार्‍या ओझोनच्या संरक्षक कवचाला धोका निर्माण होऊन, विरळ झालेल्या ओझोनच्या थरामुळे सूर्याच्या घातक अतिनील किरणांचा पृथ्वीवरील वातावरणात होणारा अनिर्बंध प्रवेश या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन जागतिक तापमान वाढतच चालले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आणि ऋतुचक्राचा समतोल बिघडला आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे जगभरातील हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ जास्त प्रमाणात वितळू लागला आहे. हा बर्फ असाच वितळत राहिला तर समुद्राची पातळी वाढून प्रलय निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी मोकळ्या जमिनीवर अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन केले, तर ही झाडे कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतील आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यास मोठीच मदत होईल. म्हणून वृक्षारोपण / बीजारोपण आणि वृक्षसंवर्धनासारखे प्रकल्प हाती घेऊन आपण पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण आपल्या परिसरातल्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण / बीजारोपण करू शकतो, किंवा एखाद्या उजाड डोंगरावर किंवा माळरानावर पावसाळ्याच्या दिवसांत वृक्षारोपण / बीजारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेऊ शकतो, किंवा पावसाळी पर्यटनाला गेल्यावर तिथल्या डोंगर, माळरानावर वृक्षारोपण / बीजारोपण करू शकतो.

वृक्षारोपणासाठी / बीजारोपणासाठी बिया व रोपांची उपलब्धता

१. फळांच्या / झाडांच्या बिया - काही वृक्षांच्या बियांची पाकिटे रोपवाटिकांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्याशिवाय आपणही झाडांच्या बिया गोळा करून बीजारोपणासाठी वापरू शकतो. त्यासाठी आंब्याच्या कोयी, आणि चिकू, जांभूळ, फणस इत्यादी झाडांच्या बिया स्वच्छ धुवून घ्याव्या. शक्य असेल तर एखाद्या सौम्य बुरशीनाशकाचे पाण्यातील द्रावण तयार करून त्यात त्या बिया बुडवून घ्याव्या आणि मग नंतर सावलीतच त्या बिया वाळवून ठेवाव्या. या वाळलेल्या बिया येणार्‍या पावसाळ्यात बीजारोपण करण्यासाठी वापराव्या. याच पध्दतीने इतर झाडांच्याही बिया गोळा करून, बुरशीनाशकात बुडवून, वाळवून बीजारोपणासाठी वापरता येतील. (टीप - ज्या बियांना गर चिकटलेला आहे त्या धुवून घेणे आवश्यक आहे, पण बुरशीनाशक उपलब्ध नसेल, तर गर नसलेल्या कोरड्या बिया नुसत्याच सावलीत वाळवल्या तरी चालेल. तसेच बुरशीनाशकाच्या पाकीटावर जे प्रमाण दिलेले असेल त्या प्रमाणानुसारच बुरशीनाशकाचे पाण्यातील द्रावण तयार करावे. बुरशीनाशकाचे द्रावण वापरून झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.) मात्र बीजारोपण केल्यानंतर सगळ्याच बिया अंकुरतील याची खात्री नसते. तसेच अंकुरलेली सर्वच रोपे जगतील याची खात्री नसते. 

२. रोपवाटिकेतील रोपे - रोपवाटिकांमधून वृक्षारोपणासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध होऊ शकतात. लहान वयाच्या रोपांपेक्षा थोडी मोठ्या वयाची - सहा ते आठ वर्षे वयाची झाडे पुनर्रोपणासाठी वापरल्यास ती जगण्याची शक्यता १००% असते. 

३. वनविभागातर्फे किंवा स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध होणारी झाडे - वनविभागाच्या क्षेत्रात असणार्‍या मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी वनविभागाकडून रोपे उपलब्ध होऊ शकतात. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही वृक्षारोपण करण्यासाठी रोपे पुरवितात.   

४. इमारतींवर उगवलेली झाडे - बर्‍याचदा जुने वाडे, किंवा इमारतींच्या दुर्लक्षित भागावर वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडे उगवलेली दिसतात. ही झाडे लहान असतांनाच, पावसाळ्याच्या सुरूवातीला काढून घ्यावी आणि मोकळ्या जागेवर पुनर्रोपणासाठी वापरावी.

५. वडाच्या फांद्या आणि नारळ - काहीजण वटपौर्णिमेसाठी बाजारातून वडाच्या फांद्या विकत आणतात. पूजा झाल्यानंतर ह्या वडाच्या फांद्या कुंडीत लावाव्यात. पारंब्या - मुळे फुटण्याच्या गुणधर्मामुळे वडाची बारीक फांदीही कुंडीत सहज रूजते. अशी रूजलेली वडाची फांदी पुढच्या पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी वापरावी. तसेच काही जण देवापुढे कलशात पाणी घालून त्यात नारळ उभा करून ठेवतात. कलशातले पाणी रोज बदलले जाते. दीड - दोन महिन्यांत तो नारळ अंकुरतो आणि त्याच्या डोळ्यांतून कोंब फुटून मूळ आणि पाने बाहेर पडतात. पावसाळ्यात असा अंकुरलेला नारळ समुद्रकिनार्‍यालगतच्या मोकळ्या जमिनीवर लावता येईल.

वृक्षारोपण / बीजारोपणासाठी लागणारे साहित्य
१. बिया किंवा रोपे.
२. माती खणण्यासाठी छोटी कुदळ आणि माती उचलण्यासाठी फावडे किंवा हॅंड रेक आणि शॉव्हेल. रोपाची प्लॅस्टीकची पिशवी कापण्यासाठी कात्री.
३. कंपोस्ट खत सौम्य प्रमाणात - ऐच्छिक.
४. दोन झाडांमध्ये दहा ते बारा फूटांचे अंतर ठेवण्यासाठी मेजरमेंट टेप किंवा दोरी - या दोरीवर दर दहा ते बारा फूट एकसमान अंतरावर खूणेची गाठ मारलेली असावी.
५. पाणी घालण्यासाठी झारी किंवा छोटी बादली.


शॉव्हेल आणि हॅंड रेक

वृक्षारोपण / बीजारोपणासाठी कोणती झाडे निवडावीत?
आंबा, आवळा, बांबूचे विविध प्रकार (कळक, बांबू ग्रास, मानवेल, फ्लॉवरींग बांबू इत्यादी), चिंच, साग, निलगिरी, जट्रोपा, वड, पिंपळ, औदुंबर / उंबर, कडुनिंब, मोह, जांभूळ, करंज, हरडा, बेहडा, आपटा, अर्जुन, पळस, पांगारा, सावर, बहावा, फणस, बेल, कदंब, चिकू, डाळिंब, पेरू, बकुळ, तामण, सीताअशोक, पिचकारी, करमळ, सोनचाफा, बदाम, बिट्टी, शंकासूर, शिसम, सीताफळ, रामफळ,  कवठ, शेवगा, विलायती चिंच, विलायती फणस, आकाशनीम, भेंडी, काशिद, रिठा, तिरूळ, चाफा, नारळ, बॉटल पाम, समुद्रफूल / समुद्रफळ इत्यादी झाडांमधली जी झाडे वृक्षारोपणासाठी निवडलेल्या जागेच्या भौगोलिक परिस्थितीत चांगली वाढतील तीच झाडे वृक्षारोपणासाठी / बीजारोपणासाठी निवडावीत.

हल्ली परकीय वंशाची झाडे लावण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण झटपट वाढणारी परकीय वंशाची झाडे लावल्यास त्या झाडांचा स्थानिक पक्षांना व कीटकांना काहीही उपयोग होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यामुळे निरूपयोगी पण निव्वळ आकर्षक दिसणारी गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष, सुबाभूळ, उंदीरमाठ, गुलाबी कॅशिया, सिल्व्हर ओक ही झाडे वृक्षारोपणासाठी वापरू नयेत. किंवा ही झाडे वृक्षारोपणासाठी वापरली तरी त्यांची संख्या देशी झाडांच्या एकूण संख्येच्या ५% पेक्षा  जास्त नसावी. ९५ देशी झाडांमागे ५ परकीय वंशाची झाडे इतकेच प्रमाण ठेवल्यास ते स्थानिक जीवसृष्टीला हानिकारक ठरणार नाही.

महामार्गालगतच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण / बीजारोपण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?
महामार्गालगतच्या मोकळ्या जागेवर झाडे लावायची असल्यास महामार्गाला अगदी खेटून झाडे लावू नयेत. झाड रस्त्याला अगदी खेटून असेल, तर वळणावर चालकाला समोरच्या वाहनांचा नीट अंदाज येत नाही. कधीकधी गाड्या झाडावर धडकून अपघात होतात. तसेच मोठ्या वृक्षांची मुळे खोलवर शिरत असल्याने त्यामुळे बांधून काढलेल्या महामार्गाला हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावतांना ती महामार्गापासून २५ ते ३० फूट दूर अंतरावर लावावीत.

वृक्षारोपण / बीजारोपण कसे करावे?
१. लावलेली झाडे नंतर योग्य प्रकारे वाढून मोठी व्हावीत म्हणून झाडांमध्ये योग्य अंतर असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम मेजरमेंट टेपच्या किंवा एकसमान अंतरावर गाठी मारलेल्या दोरीच्या सहाय्याने जिथे झाडे लावायची आहेत अशा जागेवर  दर दहा ते बारा फूट अंतरावर खुणा (छोटे खड्डे) करून घ्या.
२. बिया रोवण्यासाठी सहा ते नऊ इंच खोल खड्डा खणावा. छोटी रोपे लावण्यासाठी एक फूट खोल खड्डा खणावा. तर मोठ्या वयाच्या (६ ते ८ वर्षाच्या) झाडांचे पुनर्रोपण करण्याकरता तीन फूट खोल खड्डा खणावा.
३. वृक्षारोपण / बीजारोपण करतांना शेणखत किंवा रासायनिक खते वापरू नयेत. या रोपांना नंतर पुरेसे पाणी मिळाले नाही, तर शेणखताच्या उष्णतेने किंवा रासायनिक खतांमधून मुक्त होणार्‍या रसायनांमुळे ही रोपे करपण्याची / जळण्याची शक्यता असते. त्यामुळे खत वापरायचेच असेल, तर सौम्य कंपोस्ट खत वापरावे. बियांसाठी खणलेल्या मातीमध्ये एक मूठभर कंपोस्ट मिसळावे, छोट्या रोपांसाठी मातीत दोन मुठी भरून कंपोस्ट मिसळावे, तर मोठ्या वयाच्या झाडांसाठी मातीत अर्धा ते पाऊण किलो कंपोस्ट मिसळावे. खत उपलब्ध नसेल, तर वापरले नाही तरी चालेल.
. वृक्षारोपण / बीजारोपण सकाळी लवकर करावे किंवा संध्याकाळी करावे,  भर दुपारच्या उन्हात करू नये. खणलेल्या खड्ड्यात बी किंवा रोप लावावे आणि मग खणून बाहेर काढलेली माती अलगद त्या खड्ड्यात घालून रोप स्थिर उभे राहील अशा प्रकारे तो खड्डा मातीने भरून घ्यावा. (रोप प्लॅस्टीकच्या पिशवीतून काढून लावले असेल, तर अशा सर्व कापलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या काळजीपूर्वक गोळा करून नंतर एखाद्या कचराकुंडीत टाकाव्यात.)   
. माती घातल्यानंतर झाडाला झारीने किंवा बादलीच्या सहाय्याने हळूवारपणे पण पुरेसे पाणी घालावे.

वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी?
१. वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांनी ही रोपे खाऊ नये म्हणून शक्य असल्यास / निधी उपलब्ध असल्यास,  वृक्षारोपण / बीजारोपण केलेल्या जागेभोवती तीनचार बांबूंच्या सहाय्याने संरक्षक कुंपण उभारावे.
२. पुरेसा पाऊस पडला नाही, तर या लावलेल्या झाडांना पाणी घालणे आवश्यक असते. त्यासाठी वृक्षारोपण / बीजारोपण करणार्‍यांनी छोटे छोटे गट बनवावेत आणि आवश्यकतेनुसार या गटांनी  आठवड्यातून एकदा, दोनदा किंवा तीनदा वृक्षारोपण / बीजारोपण केलेल्या ठिकाणी जाऊन या झाडांना / बियांना पाणी घालावे. जर पुरेसा निधी उपलब्ध असेल तर झाडे लावतांना खड्ड्यात झाडाशेजारी झाकण असलेले मातीचे मडके त्याचे तोंड जमिनीवर राहील अशा प्रकारे पुरावे, म्हणजे या मडक्यात पाणी घालून त्याचे झाकण लावून ठेवले, की ते पाणी मडक्यातून झिरपून जास्त काळासाठी झाडांना उपलब्ध होऊ शकेल. अशा प्रकारे पावसाळा संपेपर्यंत जी झाडे तग धरतील, ती पुढे जगण्याची शक्यता वाढेल.
. यातली जी झाडे पुढच्या वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत जगतील, त्यांना पावसाळा व्यवस्थित चालू झाल्यावर खत घालावे. म्हणजे त्यांची चांगली वाढ होईल. त्या परिसरात साठणारा पालापाचोळा, जीवनचक्र संपल्यावर त्याच जमिनीत गाडली जाणारी वर्षायू झाडे, त्याच जमिनीत पडणारी प्राण्यांची विष्ठा आणि मृत प्राण्यांचे अवशेष हे सगळे कुजून त्याचा ह्युमस नावाचा काळसर पोषक पदार्थ तयार होतो. आणि झाडे त्याच्यातूनच त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक शोषून घेतात. त्यामुळे एकदा अशा जागेवर झाडे व्यवस्थित रूजली, की नंतर त्यांना वारंवार खत घालण्याची आवश्यकता नसते.

अशा प्रकारे वृक्षारोपण / बीजारोपण केल्यानंतर झाडांची काळजी घेतल्यास त्यातली काही झाडे निश्चित जगतील आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्याची मदत होईल.                  

Wednesday, March 31, 2010

अनाहूत पाहुणा...

शनिवारची सकाळची वेळ, दहा साडेदहा वाजले असतील. "तुला पक्ष्यांचे फोटो काढायचे होते ना? विहिरीच्या जाळीवर एक बगळा बसलाय." बाबा मला सांगत होते. "काही नको आता. काल मी फोटो काढण्यासाठी इतका वेळ घालवला, एक पक्षी फिरकला नाही. आता मी कॅमेरा खोक्यात घालून कपाटात ठेवून दिलाय, सेल पण परत चार्ज करावे लागतील, बहुतेक!" मी म्हणाले.

थोड्या वेळाने अकरा साडेअकराला परत बाबा त्या बगळ्याला बघून आले. "आता त्या बगळ्याने विहिरीत झेप घेतलीये, तो पोहोतोय मस्त! त्याचा एक पंख थोडा जखमी झाल्यासारखा दिसतोय, त्याला उडता येत नसेल नीट आणि त्यात त्याला बघायला रस्त्यावरच्या मुलांनी गर्दी केली म्हणून बहुतेक त्याने विहिरीत उडी घेतलेली दिसतेय." बाबा म्हणाले. त्या बगळ्याने आत झेप तर घेतली आहे, पण त्याला बाहेर येता येईल ना? हा प्रश्न आमच्या मनात येत होता. पण नंतर बाबा मिटींगला निघून गेले आणि मीही त्या बगळ्याला बघायला गेलेच नाही.

नंतर संध्याकाळी पाच वाजता मी बाहेर गेले आणि आमच्या इमारतीच्या आवारात असलेल्या त्या विहिरीकडे गेले. तो बगळा इतका वेळ त्या विहिरीत असेल का, याबद्दल मी साशंकच होते. पण विहिरीत डोकावून पाहिलं, तर तो बगळा अजूनही विहिरीतच होता. व्यवस्थितपणे दगडांनी बांधून काढलेल्या त्या विहिरीत माणसांना उतरण्यासाठी काही ठिकाणी भिंतीतून दगडाचे बाहेर आलेले चिरे ठेवलेले आहेत. त्यातला एक चिरा त्या बगळ्याच्या अगदी जवळ पाण्यापासून अर्ध्या पाऊण फुटांवरच होता, पण तो बगळा काही उडून त्या चिर्‍यावर बसला नव्हता. तो फक्त एक पंख कसाबसा पसरून पाण्यात पोहत होता. अधूनमधून भिंतीतल्या दगडांमध्ये जोर लावून चोच खुपसत होता, तर मधूनच पाण्यात चोच बुडवून तो पाणी पीत होता किंवा एखादा मासा खात असावा. पण तो पाण्यात दमल्यासारखा वाटत होता. त्याला पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता होती, हे माझ्या लक्षात आलं आणि याआधीच मी त्या बगळ्याला बघायला आले नाही, याबद्दल मला हळहळ वाटायला लागली.

मी घरात आले आणि कपाटातून एक दोरी बाहेर काढली. ती दोरी घेऊन मी विहिरीकडे गेले, विहिरीवर बारीक जाळी बसवलेली असली, तरी विहिरीवर पंप बसवलेला असल्याने, त्या पंपाचे पाईप जिथून विहिरीत गेले आहेत, तिथे नुसतेच लोखंडी गज लावलेले आहेत आणि तिथे बगळ्याला वरती येण्याइतपत मोकळी जागा आहे. तिथून मी दोरी आतमध्ये टाकून पाहिली, ती पाण्यापर्यंत पोचत होती, पण त्या बगळ्याने दोरीचा आधार घ्यायचा कोणताच प्रयत्न केला नाही.

आता दोरीला बादली जोडूनच बगळ्याला बाहेर काढावं लागेल म्हणून मी बादली आणायला जाणार, तितक्यात माझी आईच हातात बादली घेऊन आली. आवारातल्या (आम्ही त्यालाच बाग म्हणतो) झाडांना पाणी घालण्यासाठी तिने ती बादली आणली होती. तिनेही तो बगळा पाहिला. "आता बादली टाकून तो बगळा काढायचा म्हणजे, जाळीवरचा पत्रा काढावा लागेल." मी म्हणाले. 

विहिरीतलं पाणी काढण्यासाठी किंवा विहिरीत एखाद्या माणसाला उतरण्यासाठी त्या जाळीला चौकोनी दार होतं आणि त्यावर पत्रा ठेवून ते बंद केलं होतं. त्याशिवाय विहिरीत शिरण्यासाठी आमच्या विहिरीच्या कठड्याला एक दार आहे, त्या दाराच्या इथे विहिरीचा कठडा फक्त एक फूट उंचीचा आहे. आणि या दारातून आत शिरलं की कठड्याच्या आत जमिनीच्या पातळीवर विहिरीचा दुसरा कठडा आहे. हा बहुधा त्या विहिरीचा मूळ कठडा असावा आणि आमची इमारत बांधून झाल्यावर तिला बाहेरचा दुसरा उंच कठडा बांधला असावा. त्यात ही विहिर इमारतीच्या कुंपणाला अगदी लागून असल्याने त्या बाहेरच्या  उंच कठड्याचा अर्धा भाग म्हणजे कुंपणाच्या एकमेकांना काटकोनात मिळणार्‍या भिंती आहेत. महानगरपालिकेच्या कृपेने या भिंतीलगतचे पदपथ इतके उंच बांधले गेले आहेत, की कोणीही त्यावरून थेट विहिरीत डोकावून बघू शकतो. आत्ताही मी विहिरीत बघत असतांना रस्त्यावरून जाणार्‍या एकदोन बायकांनी काय करताय म्हणून चौकशी केलीच.

मी कठड्याजवळचं दार उघडायचा प्रयत्न केला, पण अलिकडे झालेल्या इमारत दुरूस्तीच्या वेळी कामगारांनी एक सिमेंटचं पोतं तिथे ठेवलं होतं, ते आता हलवलं असलं, तरी त्यातून सांडलेलं सिमेंट पावसाळ्यात पक्कं झालं होतं आणि दार त्याच्यात घट्ट अडकून बसलं होतं. आता एकच मार्ग होता, उंच कठड्यावरुन आत उडी मारायची आणि मग तो पत्रा काढायचा. मला काही त्या कठड्यावरून आत उडी मारणं शक्य नव्हतं. "कोणाला तरी बोलावून तो पत्रा काढावा लागेल. शेजारच्या खडपेकरांना शनिवारी सुट्टी असते, ते घरी असतील, त्यांना सांगूया पत्रा काढायला." मी आईला म्हणाले. आई त्यांच्याकडे जाऊन आली, ते घरी नव्हते. आता कोणीतरी आल्याशिवाय काहीच करता येणं शक्य नव्हतं. आई झाडांना पाणी घालत होती आणि मी त्या बगळ्याकडे पाहत होते. तेवढ्यात तो बगळा परत पोहायला लागला आणि विहिरीच्या दाराच्या थेट दुसर्‍या बाजूला गेला.

एकेकाळी आमच्या इमारतीत स्वयंपाकासाठी लागणारे आणि पिण्यासाठीचे पाणी सोडले, तर इतर सर्व कामांना या विहिरीचे पाणी वापरले जायचे. पण काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नवीन गटारं बांधली आणि सांडपाण्याचे नवीन पाईप बसवले; आता ते वर्ष-सहा महिन्यांतून एकदा तुंबतात आणि त्याचं पाणी विहिरीत झिरपतं. पाणी खराब झालं, की विहिरीच्या पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे आता विहिरीचं पाणी फक्त गाड्या धुण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी आणि स्वच्छतागृहात फ्लशसाठी वापरलं जातं. त्यात पाण्याचा वापर कमी झाल्याने त्या पाण्यात शेवाळं साचायला लागलंय. तीनचार महिन्यांपूर्वीच पाण्यातलं शेवाळं काढलं होतं, तरी आता परत त्यात नवीन शेवाळं साचलंय. अशा पाण्यात तो बगळा स्थिर बसला होता आणि अधूनमधून पाण्यात बुडालेल्या त्याच्या पंखांवरुन बारीकसे मासे फिरतांना दिसत होते.

आईचं झाडांना पाणी घालून होत आलं आणि मला खडपेकर बाहेरून येतांना दिसले. त्यांना बगळा पाण्यात पडलाय म्हणून सांगितलं, तर ते हातातलं सामान घरात ठेवून लगेच आले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अजिंक्य, आणि मुलाचा मित्र असे दोघेही आले. खडपेकर विहिरीच्या कठड्यावरुन उडी मारून आतल्या कठड्यावर उतरले आणि त्यांनी जाळीवरचा तो पत्रा बाजूला सरकवला आणि त्यांच्याकडची आणि आमच्याकडची मोठी काठी आणि अजून एक दोरी मागितली. त्यांनी त्या दोन्ही काठ्या दोरीने जोडल्या, मी तोपर्यंत बादलीला दोरी बांधली.

मग खडपेकरांनी काठीने ढोसत त्या बगळ्याला जाळीच्या छोट्या दरवाजाखाली आणले, आणि मी लगेच पाण्यात बादली सोडली. सुदैवाने त्यांनी परत काठीने ढोसल्यावर फारशी खळखळ न करता तो बगळा बादलीत आला आणि खडपेकरांनी लगेच बादली वर ओढून घेतली. बादली बाहेर काढून जमिनीवर ठेवली आणि कशीबशी त्या बगळ्याने बाहेर उडी मारली. त्याच्या दोन्ही पायांत शेवाळं अडकलं होतं, त्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. इकडे आम्ही त्या बगळ्याला बाहेर काढतोय हे पाहून वरती कावळ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी काही त्या बगळ्याला सोडलं नसतं. "त्या बगळ्याच्या पायातलं शेवाळं काढून टाकलं पाहिजे." असं मी सुचवल्यावर त्यांनी अजिंक्यला कात्री आणायला सांगितली.

अजिंक्यने कात्री आणली. मग खडपेकरांनी त्या बगळ्याचं तोंड धरलं आणि मी कात्री घेऊन ते शेवाळं कापायला लागले. "लवकर काप." ते मला घाई करत होते. पण त्या बगळ्याचे पाय असे काही त्यात गुंतले होते, की त्याच्या पायाची बोटं आणि नखंही त्यात वेगळी दिसून येत नव्हती. मला बर्‍याच वर्षांपूर्वी बारावीत असतांना शिकलेल्या पक्ष्यांच्या पायाच्या रचनेची आठवण झाली. बहुतेक पक्ष्यांच्या पायाची तीन बोटे पुढच्या बाजूला असतात, आणि एक बोट मागच्या बाजूला थोडे उंचावर असते. त्यामुळे ते घाणेरडा वास येणारं ते शेवाळं मी अगदी सावकाश अंदाज घेत कापत होते. चुकून त्या बगळ्याचं बोट कापलं जाईल याची मला धास्ती वाटत होती.

एकदाचं ते शेवाळं कापून मी त्या बगळ्याचे पाय मोकळे केले. बगळ्याला अशा प्रकारे हाताळण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यानेही मी शेवाळं कापत असतांना त्याची धारदार नखं मला लागू दिली नव्हती आणि शांतपणे ते सहन केलं होतं. आता खडपेकरांनी त्या बगळ्याला मोकळं सोडलं आणि आम्ही पहिल्यांदाच त्या बगळ्याला नीटपणे पाहिलं. सोनेरी डोकं आणि धारदार चोच असलेला तो बगळा फार छान दिसत होता. पण त्याचा एक पंख मोडल्यामुळे तो नीटसा उडू शकता नव्हता. मोकळा झाल्यावर परत तो बगळा विहिरीच्या दिशेने जायला लागला.

तो परत विहिरीत जाऊ नये म्हणून, खडपेकरांनी त्याला काठीने ढोसत ढोसत पंपाच्या खोलीजवळ आणलं, पण आता तो बगळा प्रतिकार करून काठीला चावे घेत होता. मग त्यांनी पंपाच्या खोलीचं दार उघडून त्याला आत ढकललं आणि खोलीला कुलूप लावलं. पंपाच्या खोलीतला बल्ब चालू करून ठेवला होता, कारण तो बगळा पाचसहा तास पाण्यात भिजला होता. "त्याला दोन तास इथे उबेत राहू दे, मग मी त्याला कुठेतरी लांब सोडून येतो," खडपेकरांनी सांगितलं.

घरात आल्यावर मी इंटरनेटवर शोध घेतला, तर मला डोंबिवलीच्या "प्लांट्स ऍंड ऍनिमल वेलफेअर सोसायटी"चा (पॉसचा) फोननंबर मिळाला. त्याचवेळी माझा आतेभाऊ घरी आला होता. त्याची एक मैत्रीणही वन्यजीव संवर्धनाचे काम करते, त्याने तिला फोन लावला तर तिनेही पॉसचाच फोननंबर दिला. मग पॉसवाल्यांना फोन लावला. त्यांनी थोड्याच वेळात कोणालातरी पाठवतो म्हणून सांगितलं. मग खडपेकरांना जाऊन सांगितलं, की पॉसवाले येऊन बगळ्याला घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्याकडून पंपाच्या खोलीची चावी घेतली.

तोपर्यंत बाबा घरी आले होते. मग त्यांना बगळा दाखवण्याच्या निमित्ताने परत बगळ्याला बघायला गेले. आता बगळ्याला खायला काय द्यायचे, हा आमच्यापुढचा मोठा प्रश्न होता. कारण आमच्या इमारतीत राहणारे सगळेच शाकाहारी आहेत. मग कदाचित तो फळं खाईल, म्हणून चार द्राक्षं, आवारातल्या औदुंबराची फळं आणि एक बिस्कीट एका प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणात घालून त्याच्या पुढयात ठेवलं आणि एका प्लास्टिकच्या डब्यात पाणी भरून शेजारी ठेवलं. अर्थात आम्हांला पाहिल्यावर तो बगळा बुजून पंपाच्या बाजूला जाऊन लपला.

थोड्या वेळाने पाहिलं, तर त्याने अजून काही खाल्लं नव्हतं, पण पंपाच्या मशिनवर उभा राहून तो त्याची मान विशिष्ट लकबीत वरखाली करत होता. म्हणजे त्याला थोडं स्थिरावल्यासारखं वाटत असावं. त्याच्या सुंदर सोनेरी डोळ्यांनी तो आमचं निरिक्षण करत होता, तेव्हा फारच गोंडस वाटत होता. असं वाटत होतं, की त्याला पाळून इथेच ठेवावं. पण ते शक्य नव्हतं.

थोड्या वेळाने पॉसची माणसं आली. अजिंक्य आणि मी कुतुहलाने ते काय करतात ते बघायला त्यांच्याबरोबर गेलो. बाबांनी पंपाच्या खोलीचं दार उघडलं, आणि त्या माणसांपैकी एकाने आत जाऊन अगदी सफाईने अलगद त्या बगळ्याला उचललं. मग मी त्या बगळ्याचा मोबाइलवर एक फोटो काढला. मग त्यांनी त्या बगळ्याला एका कापडात गुंडाळून घेतलं. तोही आता भरपूर दमलेला असल्याने काही विरोध न करता शांतपणे त्या माणसाच्या हातात बसला. मग त्या माणसाने त्या बगळ्याच्या डोक्यातून हात फिरवत त्याला गोंजारलं. ते पाहून आमचीही भीती चेपली आणि आम्हीपण त्या बगळ्याच्या रेशमासारख्या मुलायम सोनेरी डोक्यावरुन हात फिरवून घेतला.तो एक नुकताच उडायला शिकलेला नर बगळा होता. वयात आल्यावर त्याच्या सोनेरी डोक्यावर पांढरा तुरा येणार होता. आत्ता त्याचा जखमी पंख सोडल्यास तो बाकी सुस्थितीत होता. आम्ही त्याला जबरदस्तीने खायला प्यायला घालायचा प्रयत्न केला असता तर त्याची मान वाकडी असल्याने, त्याच्या नाकात ते गेलं असतं आणि मानेला इजा झाली असती. पण आम्ही तसं काही केलं नव्हतं.  आता ते लोक त्याला इथून घेऊन जाऊन त्यांच्याकडच्या पिंजर्‍यात ठेवणार होते आणि सकाळी प्राण्यांसाठी असलेल्या खास रूग्णवाहिकेतून त्याला परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेणार होते. हा बगळा बरा झाल्यावर ते त्याला आयुष्यभर तिथल्याच एका शेल्टरमध्ये ठेवणार होते, कारण एकदा माणसाचा स्पर्श त्याला झाला की बाकीचे बगळे अशा बगळ्याला त्यांच्यात येऊ देत नाहीत. त्याच्यावर हल्ले करून त्याला मारून टाकतात. असं आम्हांला पॉसच्या लोकांनी सांगितलं.

बगळा हा वन्यजीवांमध्ये येत असल्याने, कोणीही तो पाळू शकत नाही. पाळला तर तो गुन्हा होतो. पॉसच्या लोकांनाही हा बगळा रूग्णालयात नेतांना तो कुठून आणला ह्याची माहिती देणं बंधनकारक असतं. त्यामुळे त्यांनी आमच्या सोसायटीकडून तो जखमी अवस्थेतला बगळा ताब्यात घेण्यासंबंधीचे लेखी पत्र घेतले आणि त्या बगळ्यासहित ते निघून गेले. अशा रितीने अनपेक्षितपणे आलेला हा अनाहूत पाहुणा आम्हांला हूरहूर लावत निघून गेला. आता तो लवकर बरा व्हावा ह्या सदिच्छा फक्त मनात रेंगाळत राहिल्या आहेत.

आपणापैकी कोणाला पॉस डोंबिवली यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्याचे अध्यक्ष श्री. निलेश भणगे यांच्याशी ९८२०१६१११४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.

Wednesday, March 10, 2010

दु:स्वप्न / Nightmare

मराठी / English

दुःस्वप्न
मुसळधार पावसात
चिंब भिजण्यासाठी
काळ्या ढगांखाली
मी उभी राहिले.
पण ढगांतून बरसला
फक्त विजांचा कडकडाट.
समोर मी पाहत होते
एक निष्पर्ण झाड;
त्याच्या जळणार्‍या फांद्या
धुराने कोंदलेले श्वास
झाडाचे निश्वास.
फुटतील का नवे धुमारे
उद्याच्या पावसात?
उगीच वेडा विश्वास.
जरी मी जळाले नव्हते
मनाला चटके बसले होते,
जळणार्‍या झाडाचे
हुंदके मी देत होते.
***********************
Nightmare
To Drench
In heavy Rain
I stood up
Below the black Clouds.
But from clouds it bestowed
Only Roaring of Lightning
In front I was watching
A Leafless Tree;
It's Burning branches
Suffocated Breathing due to Smoke
Tree's Sighs.
Will it branch with new Sprouts
In tomorrows Rain?
Unnessary Passionate hope.
Though I was not burnt
My mind was Scorched,
I was Sobbing
For that Burning Tree.

***********************

Monday, February 15, 2010

भायखळ्याच्या फुले, फळे, भाज्यांच्या प्रदर्शनाचे फोटो

भायखळा येथील "वीरमाता जिजाबाई भोसले" उद्यानात भरलेल्या प्रदर्शनाला मी शुक्रवारी भेट दिली आणि प्रदर्शनातील झाडांचे आणि फुलांचे फोटो काढले. प्रदर्शनाला लोकांची खूप गर्दी होती. त्यात संध्याकाळची वेळ, सूर्य मावळतीकडे झुकलेला होता, थोड्याच वेळात सूर्य मावळून अंधार पडला आणि तो परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. गार वाराही वाहत होता. अशा या लोकांच्या गर्दीत कॅमेरा सांभाळत, प्रकाशाच्या बदललेल्या छटांशी कॅमेर्‌याचे सेटींग जुळवून घेत, वार्‌याने हलणार्‌या झाडांवर माझा कॅमेरा केंद्रीत करून फोटो काढायचा मी प्रयत्न केला. त्यात माझ्या कॅमेर्‌याला इमेज स्टॅबिलायझेशनची सोय नाही आणि अशाप्रकारे फोटो काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण नंतर फोटो पाहिल्यावर मला वाटलं की त्यातले काही फोटो चांगले आले आहेत. त्यामुळे ते फोटो मी इथे प्रकाशित करायचे ठरवले, म्हणजे ज्यांनी हे प्रदर्शन पाहिले नाही त्यांना त्याचा चित्रानुभव तरी मिळेल. मी खाली दिलेल्या तीन चलचित्रफीतींमध्ये (slideshow) असे एकूण ११९ फोटो ठेवलेले आहेत.

चलचित्रफीत १ -
चलचित्रफीत २ -चलचित्रफीत ३ -


          
*********************
*******
***

Tuesday, February 9, 2010

घरातली हिरवाई भाग २ - गुलाब

घरात फुलझाडं लावतांना फुलांचा राजा गुलाबाला नेहमीच प्रथम पसंती दिली जाते. गुलाबाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
१. हायब्रिड टी - गोड सुवासिक फुलांचे संकरित झाड.
२. हायब्रिड परपेच्युअल - भरपूर वाढणारे व मोठी फुले येणारे झाड.
३. टी रोझ - नाजूक झाड ज्याला भरपूर सुवासिक फुले येतात.
४. फ्लोरिबंडा - मोठ्या आकाराच्या फुलांचे छोटे गुच्छ येणारे झाड.
५. पॉलिऍंथा - छोट्या आकाराच्या फुलांचे भरपूर गुच्छ येणारे झाड.
६. मिनिएचर - बटणाच्या आकाराची छोटी फुले येणारे आणि छोट्या आकाराची पाने असणारे बुटके झाड.
७. क्लाइंबर - वेली गुलाब.
८. रॅंबलर
९. बुश रोझ - झुडुपी गुलाब.

गुलाबाच्या झाडाला तीन ते सहा तासांच्या सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. गुलाब, पाण्याचा निचरा होणार्‍या व भरपूर सेंद्रिय द्रव्ये असलेल्या मातीत चांगले वाढतात.

गुलाबाची झाडे फांदी लावून, डोळा भरून किंवा कलम करून लावता येतात.

गुलाबाची फांदी लावतांना, पेन्सिलएवढ्या जाडीची फांदी निवडावी. त्या फांदीला पाच ते सहा डोळे असावेत. फांदीची खालची बाजू केरेडिक्स पावडरमध्ये बुडवून घेऊन, मग ती मातीत तिरपी लावावी. केरेडिक्समुळे फांदीला लवकर मुळे फुटतात.गुलाबाचा डोळा भरतांना तो देशी गुलाबावर भरावा. ज्या झाडाचा डोळा भरायचा आहे, त्याचा डोळ्याचा भाग वरच्या पातळ सालीसकट चाकूने एकाच घावात अलगद काढून घ्यावा. ज्या झाडावर डोळा भरायचा आहे, त्यावर मातीपासून पाच ते सहा सें.मी. उंचीवर "टी" आकाराचा काप घ्यावा. या "टी" आकाराच्या कापाच्या दोन्ही उभ्या कडा उंचावून त्याच्या आत कापलेला डोळा बसवावा. मग डोळ्याचा फक्त फुटवा येणारा भाग मोकळा राहील, अशाप्रकारे या "टी" आकाराच्या  कापावर सेलोटेप घट्ट बांधावा. डोळा भरण्याचे काम संध्याकाळी करावे. या  झाडाला सावलीत ठेवावे व भरपूर पाणी घालावे. मात्र कापातील डोळ्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. सुमारे दहा ते एकवीस दिवसांनी डोळ्याची वाढ झाल्यावर, त्याच्या वरच्या व खालच्या बाजूच्या डोळ्यांमधील वाढ काढून टाकावी.

गुलाबाची काही बाबतीत काळजी घ्यावी लागते. जेव्हा गुलाबाला डोळा भरलेल्या जागेच्या खालून फांद्या फुटतात, तेव्हा त्याला "सकर" असे म्हणतात. या सकर्समुळे डोळा भरलेल्या जागेची वाढ खुंटते व कधी कधी डोळा जळून जातो. म्हणून असे नवीन सकर्स त्याच्या मूळ जागेपासून उपटून काढावेत.

गुलाबाच्या फांद्या वेळोवेळी छाटणे आवश्यक असते. छाटणीच्या वेळी जळालेल्या, रोग पडलेल्या, अशक्त व नाजूक राहिलेल्या, नको असलेल्या व फुले न येणार्‍या फांद्या छाटाव्यात. छाटणी केल्याने झाडाची वाढ चांगली होते व झाडाला भरपूर फुले येतात. गुलाबाची छाटणी जूनच्या सुरूवातीला व ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी करावी. गुलाबाच्या झाडाची उंची अर्ध्यापेक्षा थोडी जास्त राहील, अशा प्रकारे फांद्यांची छाटणी करावी.

गुलाबाला पाणी घालतांना कुंडीतील माती कोरडी झाल्यावर पाणी घालावे. साधारणपणे हिवाळ्यात एकदा व उन्हाळ्यात दोनदा पाणी घालावे. पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालावे. पाणी सकाळी किंवा संध्याकाळी घालावे, दुपारी घालू नये.

गुलाबाला महिन्यातून एकदा "सुफला" किंवा गुलाबासाठी असलेले खत सुमारे एक चमचा घालावे. त्याचबरोबर "बोनमिल" किंवा "स्टेरामिल" महिन्यातून एकदा अर्धा चमचा घालावे. तसेच "निंबोळी पेंड" महिन्यातून एकदा एक चमचा घालावी.

झाडाला खत घालण्यापूर्वी खुरप्याने कुंडीतील माती सैल करून घ्यावी. त्या मातीत झाडाच्या खोडापासून दूर, कुंडीच्या कडेला खत घालावे. खताला मातीने पुन्हा झाकून झाडाला पाणी घालावे.

गुलाबावर महिन्यातून एकदा सौम्य बुरशी-नाशकाची व सौम्य कीटकनाशकची फवारणी करावी. घरातल्या झाडांवर फवारण्यासाठी घरगुती कीटकनाशक तयार करावे. दोन चमचे तंबाखू एक लीटर पाण्यात चोवीस तास भिजत ठेवून, नंतर हे पाणी स्वच्छ फडके वापरून गाळून घ्यावे व त्यात एक चिमूटभर साबण पावडर घालावी. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे व कीटकनाशक म्हणून वापरावे.

गुलाबाच्या फुलांची छाटणी करतांना त्या फुलाबरोबरच त्याच्या खालचे दोन ते तीन डोळेही फुलाबरोबरच कापावे, म्हणजे नवीन फुले चांगली येतात. 
***********************
- १९ मे २००५ रोजी प्रकाशित झालेल्या "घटनाक्रम" या साप्ताहिकातील हा माझा लेख.

टीप - मुंबई व मुंबईच्या परिसराचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन या लेखातील सूर्यप्रकाश आणि झाडांचा परस्परसंबंध दर्शविणारी विधाने केली आहेत. इतर ठिकाणी भौगोलिक स्थानाप्रमाणे झाडांसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश कमीजास्त असू शकतो.

Wednesday, January 20, 2010

घरातली हिरवाई भाग १ - घरातली फुलझाडे

घरात झाडं लावतांना सर्वात प्रथम पसंती दिली जाते ती फुलझाडांनाच. रंगीबेरंगी, मनमोहक, सुवासिक फुले सर्वांची मने आकर्षित करून घेतात. म्हणूनच फुलझाडांची निगा कशी राखावी, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

फुलझाडांसाठी कुंडीची निवड करतांना सहा ते बारा इंच व्यासाची कुंडी निवडावी. कुंडीचा आकार झाडापेक्षा खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. झाडाच्या आकाराच्या प्रमाणात कुंडीचा आकार असावा. कुंडी झाडापेक्षा खूप मोठ्या आकाराची असेल, तर तिला पाणी घातल्यावर कुंडीच्या मातीतले क्षार पाण्यात विरघळतात व पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळे अशा मातीचा कस लवकर निघून जातो व ती झाडांच्या वाढीकरता निकामी ठरते. त्याचप्रमाणे खूप लहान आकाराच्या कुंडीत झाड लावल्यास लवकरच झाडाच्या मुळांनी सर्व कुंडी भरून जाते. काही दिवसांनी अशी कुंडी फुटण्याची शक्यता असते. म्हणून असे झाड लहान कुंडीतून काढून मोठ्या कुंडीत लावणे आवश्यक असते.

फुलझाडांसाठी कुंडी भरतांना सर्वसाधारणपणे ती पुढील प्रकारे भरावी -
साहित्य - एक कुंडी, मातीच्या फुटक्या कुंडीचे तुकडे (खापरं), विटांचे तुकडे, मॉस किंवा कोळसे, नदीची वाळू, कंपोस्ट, माती व रोपटे.
कृती - प्रथम कुंडी स्वच्छ करुन घ्यावी. मातीची कुंडी असल्यास ती पाण्यात भिजवून घ्यावी. कुंडीतील प्रत्येक छिद्रावरती खापराचा तुकडा ठेवावा. या खापराच्या तुकड्याची अंतर्वक्र बाजू कुंडीच्या तळाशी येईल, याची काळजी घ्यावी. ( खापराचे तुकडे नसल्यास माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक छिद्रावर नायलॉनच्या जाळीचा तुकडा ठेवावा. ) नंतर त्यावर कुंडीचा तळ पूर्णपणे झाकला जाईल अशा रीतीने विटांचे तुकडे पसरावेत. नंतर त्याच्यावर मॉस किंवा कोळशाचा थर घालावा. त्याच्यावर नदीच्या वाळूचा थर घालावा. आता त्याच्यावर पुढील प्रकारचे ’पॉटिंग मिक्श्चर’ तयार करून घालावे -
पॉटिंग मिक्श्चर - एक भाग कंपोस्ट + एक भाग वाळू + दोन भाग माती.
पॉटिंग मिक्श्चरने (रिकाम्या) कुंडीचा सुमारे एक तृतीयांश भाग भरल्यानंतर त्या कुंडीत रोपटे लावावे व पॉटिंग मिक्श्चरने उरलेली कुंडी भरावी. कुंडीत रोपटे लावल्यावर त्याला पाणी घालावे व एक दिवसभर कुंडी सावलीत ठेवावी.


  
कुंडीत झाड लावतांना ते संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी लवकर लावावे व सावलीत ठेवावे, म्हणजे दुसर्‍या दिवशी उन्हात ठेवेपर्यंत रोपटे चांगले तरारते.

त्याचप्रमाणे झाड दुसर्‍या कुंडीत लावण्यापूर्वी एक तास आधी त्याला पाणी घालून ठेवावे व त्या कुंडीच्या कडेची माती खुरप्याने सैल करून ठेवावी, म्हणजे झाडाच्या मुळांना इजा न होता झाड दुसर्‍या कुंडीत अलगद लावता येते.

झाडाच्या मुळांना पाण्याबरोबरच हवेची आवश्यकता असते. त्यासाठी दर आठवड्याला खुरप्याने कुंडीतली माती सैल करावी. बर्‍याचदा कुंडीमध्ये मुख्य झाडाबरोबरच अनावश्यक छोटी झाडे - तण उगवते. हे तण मुख्य झाडाबरोबर स्पर्धा करून मातीतील पोषकद्रव्ये व पाणी शोषून घेते. म्हणून असे तण वेळोवेळी कुंडीतून उपटून टाकावे.

घरात फुलझाडे लावतांना ज्या जागेत झाडे लावायची आहेत, तिथे उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश व जे झाड लावायचे आहे, त्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश याची माहिती असणे गरजेचे आहे.

गुलाब, मोगरा, कॅक्टस इत्यादी झाडांना तीन ते सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. म्हणून जास्त ऊन येणार्‍या जागेसाठी या झाडांची निवड करावी.

शेवंती, झेंडू, लिली, निशिगंध, जास्वंद इत्यादी झाडांना कमीत कमी दोन ते चार तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

ऍंथुरिअम, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड ही झाडे कमी सूर्यप्रकाशात किंवा जिथे मोठ्या झाडांची सावली पडते अशा ठिकाणी चांगली वाढू शकतात.

याचा विचार करून झाडांची निवड करावी. काही ठिकाणी उत्तरायण किंवा दक्षिणायनामुळे सूर्याच्या दिशेत बदल होऊन सहा महिन्यांकरता सूर्यप्रकाश येतो व सहा महिने सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून घर कोणत्या दिशेला अभिमुख आहे, याचासुद्धा झाड लावतांना विचार करणे आवश्यक आहे.
***************
- १२ मे २००५ रोजी प्रकाशित झालेल्या "घटनाक्रम" या साप्ताहिकातील हा माझा लेख.

टीप - मुंबई व मुंबईच्या परिसराचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन या लेखातील सूर्यप्रकाश आणि झाडांचा परस्परसंबंध दर्शविणारी विधाने केली आहेत. इतर ठिकाणी भौगोलिक स्थानाप्रमाणे  झाडांसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश कमीजास्त असू शकतो.