--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Thursday, June 11, 2009

याहू ३६०ला निरोप देतांना!

याहू ३६० वर मी आले, तेव्हा माझी नोकरी मी सोडलेली होती, शाळेतले किंवा कॉलेजमधले कोणीच मित्रमैत्रीणी माझ्या विशेष संपर्कात नव्हते. अशावेळी याहू ३६० सारख्या सोशल वेबसाईटचा मला मोठा आधार मिळाला होता, इंटरनेटच्या विश्वात माझी स्वतःची अशी एक जागा मला याहू ३६० ने निर्माण करून दिली होती.

या सार्‍याची सुरूवात झाली ती सुमारे तीन वर्षांपूर्वी. २००६ सालच्या जून किंवा जुलै महिन्यात माझ्या भावाने मला याहू क्वेश्चन्स ऍंड आन्सर्स ची ओळख करून दिली. याहूवर अकाऊंट असणारी कोणीही व्यक्ती तिथे आपल्या मनातले प्रश्न विचारू शकत होती, किंवा इतर कोणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत होती आणि हे करतांना तिथे टोपणनाव घेऊन प्रश्नोत्तरे लिहिण्याची सोयही होती. टोपणनावाने प्रश्न विचारण्याची सोय असल्याने अनेकजण अगदी मनमोकळेपणाने प्रश्न विचारत आणि तितक्याच मनमोकळेपणाने त्यांना उत्तरंही मिळत. तसंच तिथे प्रत्येकाचे टोपणानावाचे प्रोफाईल, त्या व्यक्तीने विचारलेले प्रश्न आणि इतरांना दिलेली उत्तरं बघायला मिळत असत. त्यातल्या काही जणांनी परवानगी दिलेली असेल, तर त्यांचे याहू ३६०चे प्रोफाईलही बघण्यासाठी लिंक दिलेली असायची.

अशीच कोणाचीतरी लिंक बघून माझ्या भावाने त्याचं याहू ३६०चं प्रोफ़ाईल तयार केलं होतं, आणि त्याने ते तयार केलं म्हणून मग मीही त्याचं पाहून माझं प्रोफाईल तयार केलं होतं. अर्थातच फ्रेंड म्हणून मी त्यालाच सगळ्यात आधी ऍड केलं होतं.

त्यावेळी ब्लॉग म्हणजे नक्की काय, ते मला माहिती नव्हतं. पण असंच एका प्रोफाईलवरून दुसर्‍या प्रोफाईलवर मी जात राहिले आणि माझ्या लक्षात आलं, की याहू ३६० ही अशी एक सोशल वेबसाईट आहे, की जिथे तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलला एखादी आकर्षक थीम देऊन सजवू शकता, याहूची थीम नको असेल, तर स्वतःकडचा एखादा आकर्षक फोटो वापरून तुमची स्वतःची थीम देऊ शकता, याशिवाय फ्रेंड्स जोडू शकता, त्यांना मेसेज पाठवू शकता, त्यांनी नियंत्रित केलेल्या सेटींग्जप्रमाणे त्यांच्या पेजवर कॉमेंट्स देऊ शकता, त्यांच्याशी चॅटींग करू शकता, त्याशिवाय स्वतःच्या प्रोफाईलवर फोटो ठेवू शकता, आणि ब्लॉग सुद्धा लिहू शकता, ब्लॉगमध्ये व्हिडीओ, फोटो ऍड करू शकता, प्रोफाईल थीमपेक्षा वेगळी अशी प्रत्येक ब्लॉग पोस्टला स्वतंत्र बॅकग्राऊंडही देऊ शकता. असं बरंच काही याहू ३६० वर होतं. तिथे अनेक देशांमधले लोक होते आणि बहुतेक सगळे जण टोपणनावानेच वावरत होते. मी सुद्धा एक टोपणनाव घेतलं होतं. एखाद्या सोशल वेबसाईटची ही माझी पहिलीच तोंडओळख होती.

मग माझ्या ओळखीचे अजून कोणी याहू ३६० वर आहेत का, हे पाहण्यासाठी मी माझ्या कॉलेजचे नाव आणि ठिकाण सर्चमध्ये दिलं. आणि "मृदुला-नेचर लव्हर"चं प्रोफ़ाईल माझ्या समोर आलं. ती माझ्याच कॉलेजमध्ये होती, पण माझी आणि तिची ओळख नव्हती. तिला बर्‍याच परदेशी आणि भारतीय भाषाही येत होत्या. तिने लिहिलेल्या विविध विषयांवरच्या ब्लॉगपोस्टस लोकांना अंतर्मुख करून विचार करायला लावणार्‍या होत्या. तिला भरपूर फ्रेंड्स होते आणि तिने फोटो लावून तिचं प्रोफाईल छान सजवलेलं होतं.

मी तिला मेसेज पाठवून तिच्या फोटोंबद्दल एक प्रश्न विचारला आणि हेही सांगितलं की मी तिच्याच कॉलेजमध्ये होते. त्यावर तिचं उत्तरही आलं, मग मी सरळ तिला फ्रेंड  इन्व्हाइट पाठवलं. ती माझं इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करेल का, याबाबत मी साशंक होते, पण तिने ते ऍक्सेप्ट केलं. सुरूवातीला मला ब्लॉग म्हणजे काय, हे नीट माहिती नसल्याने मी तिचंच बर्‍याच बाबतीत अनुकरण करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली. मी तिला माझ्या बारिकसारिक शंका विचारायचे आणि तीही मला उत्तरं द्यायची. मग मी मृदुलाच्या फ्रेंड्सच्या प्रोफाईलवर जाऊन त्यांना ऍड करायला सुरूवात केली आणि मृदुलाचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स झाले. नंतर इतर काहीजणंही मला फ्रेंड इन्व्हाइट पाठवायला लागले.

एकदा मी याहू क्वेश्चन्स ऍंड आन्सर्स वर "कोरफड जेल कशी तयार करायची?" असा प्रश्न विचारला असतांना "ब्लॅकी बी" नावाच्या व्यक्तीने मला उत्तर दिलं होतं, "केमिकल्स वापरुन कोरफड जेल तयार करण्यापेक्षा घराच्या अंगणातच कोरफड लावून, त्याच्या गराचा वापर केला तर जास्त चांगलं होईल." ब्लॅकी बीचे ३६० वर प्रोफाईल होते, मग मी त्यालाही ऍड केले.

अमेरिकन ब्लॅकी बी "दिपक चोप्रा" नावाच्या भारतीय माणसाच्या कंपनीत कामाला होता. माणसाच्या मेंदूच्या कार्याबाबत आणि रचनेबाबत संशोधन करून दिपक चोप्राने काही उपकरणे तयार केली होती. ब्लॅकीबीच्या ब्लॉगमध्ये एकतर ह्या उपकरणांची माहिती असायची किंवा त्याचे ज्या व्यक्तींशी पटत नाही त्यांच्याबद्दल त्याने ब्लॉगमध्ये लिहिलेले असायचे. पण तो माझ्याशी चांगला वागायचा आणि नेहमी मला विचारायचा, की "तू तुझ्या प्रोफाईलवर तुझा स्वतःचा फोटो का लावत नाहीस?" पण तेव्हाही तिथे माझा फोटो लावावा असे मला वाटले नाही आणि आता याहू ३६० बंद होत आहे, तरी आजतागायत मी माझा फोटो तिथे लावलेला नाही. फोटो  न लावता मिळणारी प्रायव्हसी मला हवीहवीशी वाटत होती. पण बरेचसे पाश्चिमात्य लोक याहूवर बिनधास्तपणे त्यांचे आणि त्यांच्या फॅमिलीचे फोटो  लावायचे, तसे त्यानेही त्याच्या प्रोफाईलवर लावले होते.

याहू ३६० वर बरेचजण वेगवेगळ्या देशांमधले होते. त्यामुळे माझ्या ब्लॉगच्या काही पोस्टवर मी भारतीय सणांची माहिती दिली होती, तर इतर बर्‍याच पोस्टवर तात्पर्यकथा लिहिल्या होत्या. ते वाचून "बटरफ्लाय" नावाच्या एशियन मुलीने माझ्याशी संपर्क साधून मला ऍड केले. तिला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी माझ्या याहू ३६० च्या ब्लॉग पोस्टचा वापर करायचा होता. मी तिला परवानगी दिली.

"हैदी हॉग" नावाच्या एका मध्यपूर्वेतील व्यक्तीने मला ऍड केले होते. ती व्यक्ती रेडीओ स्टेशन चालवायची. त्यावेळी याहू ३६० च्या प्रोफाईलवर, प्रोफाईल यूजर व्यक्ती स्त्री आहे, की पुरूष हे जाहीर करणे बंधनकारक नव्हते. हैदीचे ब्लॉग वाचून मला तो एखादा पुरूष असावा असे वाटायचे. नंतर एकाएकी याहूने यूजर व्यक्ती स्त्री आहे, की पुरूष हे डिस्प्ले करणे बंधनकारक केले. त्यावेळी हैदी ही एक स्त्री आहे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. तसंच माझंही एकारान्त टोपणनाव वाचून अनेकजणांचा मी एक पुरूष आहे असा गैरसमज झाला होता, हेही मला नंतर त्यांच्या कॉमेंट्समधून कळले. माझी ओळख झाल्यानंतर सुमारे दीड वर्षाने मला हैदीने विचारले, की माझे याहू ३६० चे पेज तिला एका कलाप्रदर्शनात डिस्प्ले करायचे आहे, त्यासाठी तिला माझी परवानगी हवी होती. तिलाही मी परवानगी दिली.

खरं म्हणजे मी निव्वळ मृदुलाचे अनुकरण करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. त्यावेळी मला ब्लॉग मराठीत कसा लिहायचा हे माहिती नव्हते, म्हणजे सक्तीने इंग्लिशमध्ये लिहावे लागणार होते. त्यात माझे इंग्लिश भलतेच दिव्य असल्याने मला माझे वैयक्तिक अनुभव किंवा खूप खोलवरचे वैचारिक मतप्रदर्शन करणारे ब्लॉगलेखन करणे सुरूवातीला शक्य नव्हते. म्हणून मी भारतीय सणांची माहिती आणि ऐकीव तात्पर्यकथा ब्लॉगमध्ये लिहायला सुरूवात केली होती. त्यातही भरपूर ग्रामर मिस्टेक्स असायच्या. हळूहळू लिखाण करून मी माझे इंग्लिश सुधारले. पण तरिही दोन व्यक्तींना माझ्या याहू पेजचे सिलेक्शन करावेसे वाटणे, ही माझ्यासाठी मोठीच गोष्ट होती.

याहू ३६० वर काही जण मुद्दाम ठरवून एखाद्या विषयावर ब्लॉग लिहायचे. मग त्या व्यक्तीचा ब्लॉग पाहून त्या व्यक्तीचे इतर फ्रेंड्स त्याच विषयावर ब्लॉग लिहायचे. असे एकाच विषयावरचे अनेकजणांनी लिहिलेले ब्लॉग वाचतांना भरपूर मजा यायची. ब्लॉगपोस्टवर कॉमेंट्स लिहितांना मग प्रत्येकजण मनमोकळेपणाने मतप्रदर्शन करायचा. त्या विषयावर भरपूर चर्चा व्हायची. ब्लॉगप्रमाणेच त्याच्या कॉमेंट्सही वाचनीय असायच्या.

माझे बरेचसे फ्रेंड्स अशा ठरवून लिहिलेल्या ब्लॉगचे लिखाण करण्यात सहभागी असायचे. एकदा मृदुलाने "परिचयातील लहान मूल आणि त्याच्या संस्मरणीय आठवणी" या विषयावर ब्लॉग लिहिला होता आणि मलाही मेसेज पाठवून या विषयावरचा ब्लॉग लिहायला सुचवले होते. माझी त्या विषयावर ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती, पण नेमकी त्या वेळी कोणतीही ओळखीतली लहान मुले माझ्या इतक्या जास्त संपर्कात नव्हती, की त्यांच्यावर मी एखादा ब्लॉग लिहू शकेन. हाच विषय तिने काही वर्षांपूर्वी सुचवला असता, तर माझ्या एका खोडकर आतेभावावर मी मोठा ब्लॉग लिहू शकले असते, पण तोही आता एवढा मोठा झाला होता, की त्याला "लहान मूल" म्हणणे धाडसाचेच ठरले असते. त्यामुळे मग मी त्या विषयावर काही लिहिलेच नाही.

याहू ३६० वर एचटीएमएल ग्राफिक्स वापरून फ्रेंड्सना मेसेज पाठवता यायचे. "श्रेडपेझ" नावाचा एकजण नेहमी मला आणि त्याच्या इतर फ्रेंड्सना "हॅव अ बीअर हग!!!" अशा अर्थाचे ग्रीटींग्ज पाठवायचा. कॉमेंट्समध्ये इमोशन आयकॉन देतांना सुद्धा तो सरसकट "हॅव अ हग!" या अर्थाचे आयकॉन्स सिलेक्ट करायचा. सुरूवातीला मला ते फार विचित्र वाटायचं. पण नंतर लक्षात आलं, की पाश्चात्य लोकांना उठसूट हग्ज देणे, किसिंग करणे याची सवयच असते, त्याप्रमाणे तसे मेसेज पाठवणे हा त्याच्या सवयीचा भागच होता. मी मात्र त्याला अर्थातच फक्त "थॅंक यू!" म्हणून रिप्लाय द्यायचे किंवा "स्माईल"ची कॉमेंट द्यायचे. नंतर त्याच्या लक्षात आले, की त्याला अपेक्षित आहे, तसा माझा प्रतिसाद येत नाही. मग त्याने मला त्याच्या फ्रेंडलिस्टमधून रिमूव्ह केलं, मलाही माझी सुटका झाल्यासारखं वाटलं. हा आमच्यामधला सांस्कृतिक फरक होता, पण त्याला "अशाप्रकारचे मेसेज पाठवू नकोस" असं सांगून दुखावण्यापेक्षा त्यानेच मला रिमूव्ह केल्याचं मला समाधान वाटलं.

श्रेडपेझशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मला ऑकवर्ड वाटेल अशा प्रकारचे मेसेज पाठवले नाहीत. त्यातही वेगवेगळ्या देशांतली एशियन माणसं अतिशय सभ्यतापूर्वक वागत असत. हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांची माणसं त्यांच्या संस्कृतीबद्दल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहित असत. पण इतर धर्मियांच्या ब्लॉगवर कॉमेंट करतांना त्यांच्या संस्कृतीबद्दल पूर्ण आदर बाळगून ते लिहित असत.

"लेडी टिकी" बाबत मला एक मजेदार अनुभव आला. ती ख्रिश्चन होती. ती नेहमी तिच्या सर्व फ्रेंड्सना ग्रीटींग्ज, मोरल स्टोरिज लिहून पाठवत असे. त्या सगळ्याच्या शेवटी नेहमी एक हायपरलिंक दिलेली असायची, जिच्यावर क्लिक केलं, की एक वेबसाईट यायची, जिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विनंती केलेली असायची. एकदा मी "दिवाळी सणाच्या विविध दिवसांच्या रूढी व त्यापाठीमागच्या कारणपरंपरा" सांगणारा लेख लिहिला होता. तो ब्लॉग वाचण्याचे आमंत्रण मी इतरांप्रमाणेच लेडी टिकीलाही पाठवले, त्यात धर्मप्रसारासारखा कोणताही छुपा हेतू नव्हता. इतरांना भारतीय संस्कृतीची तोंडओळख करुन देण्याचाच क्त उद्देश होता. तर लेडी टिकीने मला उत्तर पाठवले, "सध्या माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी तो कॉम्प्युटर वापरतो, त्यामुळे मला तुझा ब्लॉग वाचायला वेळ मिळणार नाही." मग मीही उत्तर दिले, "आज ना उद्या कधीही उशीरा तुला वेळ मिळेल तेव्हा माझा ब्लॉग वाचून कॉमेंट दे. उशीर झाला तरी हरकत नाही." मग मात्र तिने एकदाचा तो ब्लॉग वाचून तिची कॉमेंट दिली.

"कंडा पी" नावाची थायलंडची स्त्री त्यांच्या देशाबद्दल लिहित असे. तिच्या लिखाणावरून थायलंडच्या लोकांमध्येही त्यांची जुनी पौर्वात्य संस्कृती आणि वेगाने त्यांच्या जीवनशैलीवर आक्रमण करणारी पाश्चात्य संस्कृती याचा अंतर्विरोध जाणवत असे. "सनफ्लॉवर" नावाची एक विद्यार्थिनी व्हिएतनामी भाषेत ब्लॉग लिहायची. ती काय लिहायची ते मला समजत नव्हते, तरी तिच्या रिक्वेस्टमुळे मी तिला माझ्या फ्रेंलिस्टमध्ये ठेवले होते. अशीच एक फ्रें ग्रीक संस्कृतीबद्दल ग्रीक भाषेत लिहायची. "शाहिद" नावाचा पाकिस्तानी शेफ ब्लॉगवर मजकूर न लिहिता नुसतीच आकर्षक ग्रीटींग्ज लावून ठेवायचा. काहीजण ब्लॉग न लिहिता नुसतेच मला ऍड करायचे, ते बहुधा चॅटींगसाठी ऍड करत असावेत. पण मी चॅटींग करत नव्हते, तरी त्या सगळ्यांना मी नुसतेच माझ्या फ्रेंलिस्टमध्ये ठेवले होते.

सगळ्यांची भाषा सारखी नसल्याने आम्ही बर्‍याचदा एकमेकांना मेसेजमधून ग्रीटींग्ज पाठवायचो. एकदा मी असंच सगळ्यांना एकदा एक ग्रीटींग पाठवलं आणि होमपेजवर सगळ्यांच्या ब्लॉगचे अपडेट पाहत असतांना मला मृदुलाच्या नवीन ब्लॉगचा अपडेट दिसला. क्त तीन दिवसांपूर्वीच स्वर्गवासी झालेल्या तिच्या आईबद्दल तिने ब्लॉग लिहिला होता. ते वाचून मला धक्काच बसला. माझ्यापेक्षा क्त दीडच वर्षांनी मोठी असलेल्या मृदुलावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती तो ब्लॉग लिहित होती, तेव्हा मला तिच्या दुःखाची काही कल्पनाही नव्हती आणि तिचा ब्लॉग प्रकाशित होण्याच्या काही मिनिटेच आधी मी तिला ते ग्रीटींग पाठवले होते. तिचा गैरसमज होऊ नये म्हणून मग मी तिच्या ब्लॉगवर तिचे सांत्वन करणारी कॉमेंट लिहिली आणि सुदैवाने तिनेही गैरसमज करून घेतला नाही.

अशाप्रकारे ब्लॉगचे माध्यम वापरून अनेकांनी इंटरनेटवर आपले सुखदुःख इतरांशी शेअर केले होते. "शेरॉन" नावाची एक मूळची इंग्लंडमधली महिला माझ्या फ्रेंलिस्टवर होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या नवर्‍याचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस होता. युरोपमध्ये प्रवास करणार्‍या त्यांच्या ट्रॅव्हलर्सचे पासपोर्ट कुठे हरवले, तर सोयीसाठी म्हणून तिने त्यांच्या पासपोर्टच्या रंगीत झेरॉक्स आणि स्कॅन केलेल्या कॉपीज तिने जवळ ठेवल्या होत्या. स्पेनच्या पोलिसांनी तिची झडती घेऊन ते जप्त केले आणि ते कागदपत्र जवळ बाळगल्याबद्दल तिला स्थानबद्ध करून तुरूंगात ठेवले होते. तिची सुटका होईपर्यंत काही महिने लागणार होते आणि त्या मधल्या काळात ती तुरूंगातूनच याहू ३६० वर ब्लॉग लिहित होती. तिचेही ब्लॉग वाचनीय असायचे.

"शाय-नोमोअर" नावाची एक अमेरिकन घटस्फ़ोटीत महिला माझी फ्रें होती. ती एखाद्या पार्टनरच्या शोधात होती. एकदा तिने ब्लॉग लिहिला, की "ती एका पाकिस्तानी मुलाशी चॅटींग करताकरता त्याच्या प्रेमात पडली. आणि वयाने तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असणार्‍या त्या मुलाशी लग्न करून ती कायमची पाकिस्तानात जाणार होती. त्याबाबत तिने तिच्या सर्व फ्रेंड्सना त्यांचे मत विचारले होते." मी तिला सल्ला दिला, की "लग्नाआधी तिने एकदा पाकिस्तानात जाऊन तिथे महिनाभर राहून पाकिस्तानी संस्कृतीशी तोंडओळख करून घ्यावी आणि मगच लग्नाचा विचार करावा." तिला माझा सल्ला पटला नव्हता, पण सुदैवाने त्या पाकिस्तानी मुलाच्या घरूनच त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध झाल्याने तिचे लग्न आणि पर्यायाने ते प्रेमप्रकरणही मोडले. तिला त्याचे खूप दुःख झाले, पण मला मात्र तिची भविष्यातली ससेहोलपट वाचली याचा मनापासून आनंद झाला.

एकदा शाय-नोमोअरने मला मेसेज पाठवून तिची सर्व वैयक्तिक माहिती सांगितली आणि मलाही माझी वैयक्तिक माहिती विचारली. मीही तिला माझी माहिती सांगितली आणि सहजच तिला सांगितले, की मी सिंगल आहे. त्यानंतर दीडदोन वर्षांनी मला तिचा एक मेसेज आला. तो मेसेज वाचून मी उडालेच. तिने लिहिले होते, "तुला कदाचित माझा मेसेज विचित्र वाटेल, पण चॅटींग करतांना तुझ्याच शहरात नोकरीसाठी नव्याने रहायला आलेल्या एका सिंगल असलेल्या मुलाशी माझी ओळख झाली. तो वयाने तुझ्यापेक्षा लहान आहे, पण या नवीन शहरात एकटाच आहे. तू त्याचा रिलेशनशिपसाठी विचार करावास असे मला वाटते." तिने त्याच्या वेबपेजची लिंक दिली होती. भारतीय संस्कृतीची अजिबात ओळख नसलेल्या तिला, ज्याची मला कोणतीही वैयक्तिक, कौटुंबिक, सांस्कृतिक महिती नाही अशा मुलाचा मी विचार करावा हे वाटले, हे पाहून माझे डोके गरगरले. मी सिंगल आहे याचा अर्थ, मी कमिटेड आहे, किंवा एंगेज्ड आहे असाही असू शकतो, हे तिने लक्षातच घेतले नव्हते. मी तिला नम्रपणे माझा नकार कळवला. पाश्चात्य माणसं कोणाच्याही खाजगी भानगडीत नाक खूपसत नाहीत हा माझा गैरसमज होता, हे सिद्ध झाले. आणि ती एखाद्या चौकशी करणार्‍या भारतीय काकूबाईसारखीच वागली, याची मला गंमत वाटली.

"रिचर्ड" नावाचा माझा एक अमेरिकन फ्रेंड (रिटायर्ड म्हातारेबुवा) याहू आन्सर्सवर सगळ्यात जास्त आन्सर्स दिलेल्यांमध्ये टॉपलिस्टमध्ये होता. मला याहू क्वेश्चन्सवर जो प्रश्न विचारूनही त्याचे उत्तर मिळाले नव्हते, तो प्रश्न मी त्याला याहू ३६० वर मेसेज पाठवून विचारला, की "कासवं अंडी देण्याकरता पाण्यातून जमिनीवर येतात. पण विहिरीतली कासवं जी अंडी देण्याकरता जमिनीवर येऊ शकत नाहीत, ती पाण्यातच अंडी देतात का?" आश्चर्य म्हणजे काही तासातच रिचर्डने मला उत्तर पाठवले, "कासवं पाण्यात अंडी देऊ शकत नाहीत. ती अंडी देण्याकरता पाण्याबाहेर येऊ शकली नाहीत, तर ती अंडी त्यांच्या पोटातच साठून राहतात, त्यामुळे त्यांना त्यासंबंधित विकार होऊन त्यांचे आयुर्मान कमी होऊ शकते." मी रिचर्डचे आभार मानले, मला त्याच्या या उत्तरं देण्याच्या छंदाचं आजही फार कौतुक वाटतं.

याशिवाय "स्वेलियॉड" नावाचे एक दक्षिण भारतीय कलाकार याहू ३६० वरील माझे फ्रें होते. त्यांनी एकदा मुद्दाम ठरवलेल्या विषयावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला किस्सा लिहिला होता. पती-पत्नींमधले मतभेद आणि त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीतला फक त्यांनी छान अधोरेखित केला होता. पत्नीचं प्रेम जास्त भावनिक असतं, तर पतीचं प्रेम जास्त व्यावहारिक असतं हे दर्शवणारी त्यांची कथा हृदयस्पर्शी होती. ते आणि मृदुला दोघेही याहूवरचे टॉप ब्लॉगर होते.

याहू ३६० वर मी माझ्या एका वेबसाईटची लिंक दिली होती. काही दिवाळी अंक आणि साप्ताहिकात मराठीतून प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखांच्या इमेजेस मी त्या वेबसाईटवर ठेवल्या होत्या. महाराष्ट्रीयन असलेल्या आणि माझ्याच शहरात राहणार्‍या "सॅंक्स" ने त्या पाहिल्या होत्या. माझ्या फेरीट पुस्तकांच्या यादीत मी "मृत्युंजय" पुस्तकाचे नाव लिहिले होते. ते वाचून त्याने मला विचारले, "मला मृत्युंजय पुस्तक वाचायला मिळेल का?" माझ्या मनात एक विचार डोकावला, की "त्याला खरंच पुस्तक हवं आहे, की माझ्याशी ओळख वाढवायची आहे? म्हणून त्याने हे विचारलंय?" पण माझ्याकडे ते पुस्तक माझ्या संग्रहात नव्हतंच, तसं मी त्याला कळवलं. त्याला काय वाटलं, कोणास ठाऊक? पण नंतर त्याने मला कधीच कॉन्टॅक्ट केला नाही.

"टायगरकब" या सिंगापूरी चायनिज माणसाची आणि माझी ओळख झाली ती याहू आन्सर्सवर. पण आमची मैत्री वाढली ती याहू ३६० वर. टायगर स्वतः त्यांच्या संस्कृतीची, शहराची, देशाची माहिती देणारे ब्लॉग लिहायचाच, पण इतरांनी त्यांच्या ब्लॉगवर जी काही सांस्कृतिक माहिती दिलेली असेल, तिथे कॉमेंट्स लिहून त्यांच्या महितीत भर घालायचा. त्यानेही त्याचा ब्लॉग वेगवेगळ्या थीम्स, फोटो, व्हिडिओ वगैरे लावून छान सजवला होता. याहू ३६० वरच्या तांत्रिक बाबींमध्ये तो सर्वांना मार्गदर्शन करायचा. त्यासाठी त्याने खास ग्रुप तयार केला होता. ब्लॉगपोस्टला थीमपेक्षा वेगळी बॅकग्राऊंड, बॉर्डर कशी द्यायची, जीआयएफ इमेजेस, फोटो,  व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसे ऍड करायचे याचे तो न कंटाळता मार्गदर्शन करायचा. दिवसाच्या २४ तासांपैकी १८-२० तास तो ऑनलाईनच असायचा (अगदी कंपनीत काम करतांनाही), त्यामुळे केव्हाही याहू ३६० वर गेलं, तरी तो हाकेला धावून तांत्रिक बाबीत तत्परतेने मदत करायचा. असा हा तत्पर मित्र अचानकच काही कारणांमुळे याहू ३६० सोडून निघून गेला, तेव्हा फारच वाईट वाटले.

टायगरकबने त्याचा फोटो एम्बॉस करून प्रोफाईलवर लावला होता. त्याचा आणि नंतर माझाही फ्रेंड असलेला "लॅमिऑसिटी" ह्यानेही स्वतःचा फोटो काळपट करून लावला होता. मला कायम असे वाटायचे, की "लॅमिऑसिटी" आणि "टायगरकब" ह्या दोघांच्या चेहर्‍यात खूप साम्य आहे. बहुधा त्या दोन व्यक्ती नसून एकच व्यक्ती असावी. पण लॅमिऑसिटी नेहमी काळपट पार्श्वभूमीवर हिंस्त्र प्राणी, हाडांचे सांगाडे, भूतं, आग ह्यांच्या इमेजेस लावून ब्लॉग लिहायचा. त्याचे मेसेजही तसेच दचकवणारे असायचे. पण टायगर याहू ३६० सोडून गेल्यानंतर मी ह्या मनातल्या शंकेचा विचारही करणे सोडून दिले. आता बहुधा मला या शंकेचे उत्तर कधीच मिळणार नाही.

आता तर याहू ३६० बंद होणार असल्यामुळे बरेचजण याहू ३६० सोडून आधीच निघून गेलेत. परत त्यांची ऑनलाईन भेट होईल न होईल, पण याहू ३६०च्या सुखद आठवणी मात्र मनामध्ये रेंगाळत राहतील...