--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Thursday, December 10, 2009

पुष्परचना करतांना

घरातील सणसमारंभाच्या निमित्ताने एखादी पुष्परचना करून बैठकीत, टेबलावर किंवा एखाद्या कोपर्‍यात ठेवली असता, वातावरणात प्रसन्नपणा येतो. भारतात मुख्यतः आरास म्हणून किंवा एखाद्या समारंभात टेबल सजविण्यासाठी पुष्परचनेचा वापर होतो. पण जपानमध्ये पुष्परचनेचे शास्त्रच विकसित झाले आहे. जपानी पुष्परचनेला ’इकेबाना’ असे म्हटले जाते.

पुष्परचनेसाठी लागणारे साहित्य म्हणजे एकाच प्रकारची किंवा दोन-तीन विरूद्ध रंगछटांची फुले, त्याला पूरक म्हणून पानांच्या डहाळ्या किंवा गवत, पाणकणीस इत्यादी., तसेच पुष्परचना करण्यासाठी आकर्षक पुष्पपात्र, चिकनमेश, पिन होल्डर्स, ओऍसिस, कात्र्या इत्यादी आणि पाणी होय.

पुष्परचनेतील फुले व फांद्या पुष्पपात्रात व्यवस्थित बसावे म्हणून चिकनमेश, पिन होल्डर किंवा ओऍसिस यापैकी एक वापरावे. चिकनमेश ही तारेची मोठ्या आकाराची भोके असलेली जाळी असते. ही जाळी गोल गुंडाळून पुष्पपात्रात ठेवावी व त्यात फुले अडकवावीत. पिन होल्डरला खाली ऍल्युमिनीयमचा बेस असून त्यावर अणकुचीदार खिळ्यांसारखी टोके असतात. ह्या अणकुचीदार खिळ्यांवर फुलांची देठे अडकवली जातात. पिन होल्डर हा त्रिकोणी, चौकोनी, षट्कोनी, गोल किंवा लंबगोल आकाराचा मिळतो. पिन होल्डर विकत घेतांना मोठ्या आकाराचा विकत घ्यावा. लहान पिन होल्डर घेतल्यास, मोठ्या फुलांच्या वजनामुळे तो पुष्पपात्रात स्थिर उभा राहू शकत नाही. पिन होल्डर मुख्यतः सपाट दिसणार्‍या उथळ पुष्पपात्रात वापरला जातो. ओऍसिस हा स्पंजासारखा असतो. तो वापरण्यापूर्वी पाण्यात भिजवून घ्यावा लागतो. ओऍसिस पाणी शोषून घेतो, तेच पाणी पुष्परचनेतील फुले शोषून घेतात. त्यामुळे ओऍसिस वापरल्यावर पुष्परचनेत वेगळे पाणी टाकावे लागत नाही. मात्र ओऍसिस कोरडा पडू लागल्यास त्यावर लगेच पाणी घालावे. ओऍसिस लहानमोठ्या आकारात उपलब्ध असतो. तो चाकूने हव्या त्या आकारात कापता येतो. ओऍसिसमध्ये फुले खोवल्यावर तेथील ओऍसिसचा चुरा होतो. त्यामुळे एकच ओऍसिस वारंवार वापरता येत नाही. चिकनमेश व ओऍसिस हे फुलविक्रेत्यांकडे उपलब्ध असतात.

जपानी पुष्परचनेत सपाट तळ असलेली उथळ पुष्पपात्रे वापरली जातात. पण पुष्पपात्र म्हणून आपण फुलदाणी, तांब्याची कळशी, तांब्याचे घंगाळे (लहान आकाराचे), काचेचे किंवा चिनी मातीचे विविध आकारांचे बाऊल्स, काचेच्या नक्षीदार, सुबक बशा, संक्रांतीचे सुगड, वेताची परडी किंवा टोपली (आतमध्ये दुसरे पुष्पपात्र ठेवून), काचेचे सट, मोठ्या आकाराचे शंख शिंपले, परडी, ताम्हण, तांब्या-पितळेची भांडी इत्यादींचाही वापर पुष्परचनेत करू शकतो. प्रयोगशाळेतील चंचुपात्रे, काचेच्या बाटल्या, बांबूचे पोकळ तुकडे यांचाही पुष्पपात्र म्हणून वापर करून मनोवेधक पुष्परचना करता येते.

पुष्परचनेतील फुलांचे दांडे, फ़ांद्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे चाकू, कात्री इत्यादी धारदार असणे आवश्यक आहे. चाकू, कात्रीला नीट धार नसल्यास फुलांचे देठ नीट कापले जात नाहीत. असे नीट न कापलेले देठ पिनहोल्डरवर बसवायला त्रास होतो. फुलांचे देठ व फांद्या कापतांना त्यांचा तिरका छेद घ्यावा. त्यामुळे त्यातून जास्तीत जास्त पाणी शोषले जाते व असे देठ सहजपणे पिनहोल्डरवर बसवता येतात.

पुष्परचनेसाठी फुले निवडतांना पुढील काळजी घ्यावी. पुष्परचना तीन ते दहा दिवस एवढा काळ टिकवून ठेवायची असल्यास त्यासाठी नुकत्याच उमलायला सुरूवात होणार्‍या कळ्या निवडाव्यात. निशिगंध, ग्लॅडीओलस, ऑर्किड इत्यादींसाठी क्त तळाची एक किंवा दोन फुले उमललेली व वरती सर्व कळ्या असलेल्या प्रकरच्या दांड्या निवडाव्यात. एकच दिवसाकरता करावयाच्या पुष्परचनेत मात्र उमललेली फुले वापरावीत. जरबेराच्या फुलाचा फुलालगतचा देठ ताठ आहे, हे पाहूनच जरबेराचे फूल निवडावे. जरबेराचे देठ वाकण्याची किंवा मोडण्याची शक्यता जास्त असते. जरबेराचे फूल सूर्यफुलाप्रमाणे तोंड वळवते. जरबेराचे फूल चार-पाच दिवस चांगले टिकते. कार्नेशन, ऑर्किड ही फुले दहा-पंधरा दिवस सहज टिकतात. निशिगंध, ऍंथुरिअम ही फुले सात-आठ दिवस चांगली राहतात. ग्लॅडीओलसचे दांडे पाच-सहा दिवस चांगले राहतात, तर गुलाब, शेवंती ही फुले चार-पाच दिवस चांगली टिकतात.

ह्या फुलांशिवाय डेलिया, हेलिकोनिया, लिली, बर्ड ऑफ़ पॅराडाइज, ऍस्टर इत्यादी फुलेही पुष्परचनेत वापरली जातात. तसेच पूरक साहित्य म्हणून गोल्डन रॉड (पिवळे तुरे), स्टॅटिस, लेडीज लेस, कॅंडीटफ़्ट, गवताचे तुरे, पाणकणीस, सायकस व फर्नची पाने, मोठ्या मनीप्लांटची पाने, सॅंसीवेरिय़ा, शतावरीच्या डहाळ्या, पामची पाने, केवड्याची पाने, रबरप्लांट - मॉन्स्टेराची पाने, तसेच कण्हेर, चिकू, डाळींब, पेरू, अनंत, तगर यांच्या फांद्या,  पेडिलॅंथस इत्यादींचा वापर पुष्परचनेत करता येतो. याशिवाय आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या फुलांचा, पानांचा व डहाळ्यांचाही वापर कल्पकतेने करता येतो.

फुले व डहाळ्या घरी आणल्यानंतर लगेच पाण्यात घालून ठेवावीत. पुष्परचना करतांना पुष्पपात्रात पाणी घालून किंवा ओऍसिस भिजवून मगच त्यात पुष्परचना करायला घ्यावी. फुले टवटवीत राहण्यासाठी पुष्पपात्रातील पाण्यात चमचाभर साखर घालावी. तसेच पाण्यातील अशुद्ध पदार्थ शोषून घेण्यासाठी पाण्यात एक छोटा कोळशाचा तुकडा घालावा. ओऍसिस सच्छिद्र असल्याने त्यासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्यात साखर, कोळसा टाकण्याची आवश्यकता नाही. पुष्परचनेतील फुलांचे व फांद्यांचे दांडे पाण्यात दीर्घकाळ तसेच राहिल्यास कुजतात, म्हणून फुले व फांद्या यांचे देठ रोज खालच्या बाजूने थोडे थोडे कापावेत, म्हणजे फुले टवटवीत राहतील.

************

- नोव्हेंबर २००९ च्या "माऊली" त्रैमासिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख.

टीप - मुंबई व मुंबईच्या परिसरातील हवामान लक्षात घेऊन, ह्या लेखातील फुले टिकण्याचा कालावधी दिलेला आहे. इतर ठिकाणी उष्ण किंवा थंड हवामानाप्रमाणे फुले टिकण्याचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.

Wednesday, December 9, 2009

निषेध!

सन २००९ ह्या वर्षाची सुरूवातच माझ्यासाठी अत्यंत निराशादायक होती. नुसती सुरूवातच नव्हे, तर हे संपूर्ण वर्षच माझ्यासाठी अतिशय खडतर ठरले. पण या वर्षात मला ज्या काही कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले, त्यांची बीजे आधीच्या दोन वर्षांत घडलेल्या घटनांमध्ये दडलेली होती. आणि त्याला माझ्या चुका कारणीभूत नसून, इतरांच्या निष्काळजी, बेपर्वा वागण्यामुळे मला विनाकारणच हा त्रास सोसावा लागला, अजूनही सोसावा लागतोय. त्यामुळे साहजिकच त्याचे पडसाद माझ्या इंटरनेटवरील ऑर्कुट प्रोफाइलवरही उमटत होते, अजूनही कधीकधी उमटतात.

या काळात इंटरनेटवरील माझ्या एका तथाकथित मित्रमहोदयांनी माझ्या बाबतीत नेमके काय घडले आहे याची काहीही चौकशी न करता, परस्परच माझ्या पाठीमागे माझ्यावर काही आरोप केले आणि या धक्कादायक आरोपांवर मला माझी बाजू मांडण्याचीही संधी दिली नाही. अर्थात माझ्याबाबतीत जे काही घडले त्याच्याशी या महोदयांचा दूरान्वयानेही काही संबंध नव्हताच, शिवाय जे काही झाले ती माझी खाजगी व्यक्तिगत बाब होती. त्यामुळेच माझ्या या ब्लॉगचा वापर करून त्यांना जाहीर उत्तर देण्याचाही मी प्रयत्न केला नाही.

पण या तथाकथित मित्रमहोदयांनी ही जी काही वागणूक मला दिली, ती कोणत्याही प्रकारे समर्थनीय नव्हतीच आणि त्यांच्याकडून अपेक्षितही नव्हती याची त्यांना जाणीव करून देणे आवश्यक होते. म्हणून त्यांच्या या विचित्र वागणुकीचा निषेध करण्यासाठी मी जाणीवपूर्वक हा ब्लॉग गेले कित्येक दिवस बंद ठेवला होता.

आणि आज पुन्हा एकदा त्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करून मी माझा हा ब्लॉग चालू करत आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. 

Sunday, September 20, 2009

ब्लॉग लिहितांना... / While writing blog...

मराठी / English

ब्लॉग लिहितांना...
माझ्या ब्लॉगसाठी मी इंडीब्लॉगर या संस्थळाचे सदस्यत्व घेतले आहे. त्या संस्थळावर चर्चिलेल्या विषयांमधे "सेंन्सॉरशिप ऑन ब्लॉग्ज" या नावाच्या शीर्षकाखाली एका व्यक्तीने विषय मांडला होता, की "काही वेळा ब्लॉगलेखक ब्लॉग लिहितात, पण त्यांना गैरसोयीचे असणारे किंवा त्यांच्या विरोधात लिहिलेले अभिप्राय (टिप्पण्या) ते डिलीट करतात (गाळून टाकतात) किंवा प्रकाशित न करता अडवून धरतात. ब्लॉगवर कोणते अभिप्राय ठेवायचे हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा असतो. पण जेव्हा वाचक त्यांचा वेळ खर्च करून या वैचारिक चर्चेत सहभागी होऊन, लेखकाच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा किंवा विरोधी अभिप्राय देतात, तेव्हा लेखक तो अभिप्राय दाबून ठेवतो, त्यावेळी तो वाचकांना काय किंमत देतो? हे नैतिक आहे का? अखेरीस ब्लॉग हे वैचारिक आदानप्रदानाचे मुक्त व्यासपीठ आहे."

या चर्चेत आलेले काही मुद्दे असे होते, "काही वेळा स्पॅम किंवा असभ्य भाषेतील लैंगिकतायुक्त अभिप्राय येतात, किंवा त्या विषयाला धरून नसलेले असंबद्ध अभिप्राय येतात,  तेव्हा ते डिलीट करण्याबाबत कोणीच आक्षेप घेणार नाही.  त्याशिवाय कधीकधी लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारे अभिप्राय येतात, ते डिलीट करण्याचा लेखकाला अधिकार आहेच." पण कधीकधी यातले कोणतेही कारण नसतांनाही वाचकांचे अभिप्राय डिलीट केले जातात या मुख्य मुद्द्यावर तिथे फारशी चर्चा झालेली दिसली नाही. म्हणून मी माझे याबद्दलचे मत ब्लॉगवर मांडायचे ठरवले.

मला असे वाटते, की एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. त्यामुळे लेखकाने लिहिलेल्या लिखाणाशी काहीजण सहमत असू शकतील, किंवा असहमतही असू शकतील, किंवा फक्त काही मुद्द्यांबद्दल ते लेखकाशी सहमत असू शकतील, हे लेखकाने विसरू नये. जो अभिप्राय हा लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारा नाही किंवा समाजस्वास्थ्याला हानी पोहोचवणारा नाही, तो अभिप्राय लेखकाच्या विरूद्ध मताचा असला, गैरसोयीचा वाटला तरी तो लेखकाने न कचरता प्रकाशित करावा.

मात्र कोणता अभिप्राय हा लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारा आहे, किंवा समाजस्वास्थ्याला हानी पोहोचवणारा आहे हे लेखकाने स्वतःच्या सद्‍सद्‌विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहूनच ठरवायचे असते. ही संपूर्णतया लेखकाची जबाबदारी असते. आणि जेव्हा लेखक ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो, तेव्हा आपण याला बेजबाबदार ब्लॉगिंग असे म्हणू शकतो.
*************************

While writing blog...
I have taken membership of website Indiblogger for my blog. On that website's forum, a topic was discussed by a person under the heading of "Censorship on Blogs", that "Sometimes blog writers do write a blog, but they either delete or block the comments which are inconvenient to them, or the comments opposed to their stance. It's the writers right to determine which comments should be put on blog. Does the writer value the readers, when readers spend their time in this thoughtful discussion, and give comments having different or opposite viewpoint than the writer, and when writer blocks it? Is it ethical? After all blog is a platform for free exchange of thoughts and viewpoints."

These are some points in that discussion, that "No one will take objection to delete spam comments or indecent sex-friendly comments which are sometimes received. Besides the writer has right to delete the comments making personal attacks on that writer." But the main point was not discussed there, that sometimes comments are deleted when there is no such reason, so I decided to give my opinion about it on blog.

What I am feeling is, every person may have different viewpoint about any thing. So the writer must not have to forget that maybe some of them will be agree or be disagree with the writing of the writer, or maybe they will be agree with some points only in that writing. The writer should have to publish the comment without flinching, though it is of opposite opinion, seems inconvenient as log as that comment is not making personal attack on writer, or do not damage the health of society.

But the writer should have to determine whether the comment is a personal attack or it is damaging the health of society, while keeping honesty to his conscience. It's the sole responsiblity of witer. And when the writer fails in his responsibilty, then we can say it as a irresponsible bloging.
**********************************

Thursday, August 27, 2009

जळणार्‍या ज्योती आणि कोकणातली भुतं

जून महिना सुरू होत होता. पण जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती. या संततधार पावसातच आम्ही नऊ-दहा जण ट्रॅक्सने कोकणात जाणार होतो. हा प्रवास करण्याचे आधीच ठरलेले असल्याने आता अचानक आलेल्या पावसातही हा प्रवास रद्द न करता तसेच जायचे ठरले.

पावसाची रिमझिम रिमझिम चालू असतांनाच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. नुकताच पाऊस सुरू झाला असल्याने जमिनीवर ठिकठिकाणी हिरवळ उगवलेली दिसत होती. सकाळचा सुखद गारवा, मध्येच येणारे किंचितसे धुके आणि हळूवारपणाने पण सतत पडणारा पाऊस यामुळे एक वेगळेच उत्साहवर्धक वातावरण तयार झाले होते आणि जणू काही आपण पावसाळी सहलीलाच निघालो आहोत असे वाटत होते.

प्रवास बराच लांबचा होता. रात्रीच्या वेळेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे होते. त्यामुळे वाटेतील निसर्गरम्य ठिकाणे पाहून आम्ही पुढे जात होतो. पावसाळ्यातल्या निसर्गरम्य कोकणाचे सौंदर्य वेगळेच भासत होते. आम्ही कोकणातील प्रवास फ़ारसा केला नसल्याने या प्रवासाची रंगत जास्तच वाढली होती.

सूर्यास्ताची वेळ जवळ आल्यानंतर वातावरणात वेगाने बदल व्हायला लागला. सूर्यास्तानंतर एकदम काळोख पसरला. त्यातच रस्त्यावर दिवे नव्हते, आजूबाजूला पसरलेली दाट झाडी, त्यामुळे एकदम खूप रात्र झाल्यासारखे वाटत होते. मधूनच बेडकांचा आवाज ऐकू येत होता. पाऊस पडतच असल्याने ओरडणारे बेडूक त्यांच्या लपण्याच्या जागेतून बाहेर येत होते. हे बेडूक रस्त्यावर आले आणि गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश त्यांच्यावर पडला, की ते जागच्याजागी खिळून राहत. असे बेडूक गाडीखाली चिरडू नयेत म्हणून ड्रायव्हरही जपूनच गाडी चालवत होता. तरिही एखादा बेडूक गाडीखाली चिरडला जात होता. त्यावेळी सगळेजण हळहळायचे आणि वातावरण उगीचच गंभीर बनायचे. मधूनच वाटेत एखादं झाड काजव्यांनी भरलेलं दिसायचं. काजव्यांमुळे ते सगळं झाडच छोटे छोटे दिवे लावून सजवलेल्या ख्रिसमस ट्री सारखं वाटायचं. तेवढाच वातावरणातला तणाव कमी व्हायचा.

अशा दाट काळोखात, रिपरिपणार्‍या पावसात आमची गाडी वळणावळणाच्या रस्त्याने जात होती. अचानक एका वळणावरती, बरोबर रस्त्याच्या मध्यभागी काहीतरी जळत असतांना आम्हांला दिसलं आणि क्षणभर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. एखादा छोटा दिवा किंवा पणती असल्यासारखं ते भासत होतं, मात्र त्याची ज्योत हाताच्या वितीपेक्षाही लांब होती आणि भर पावसातही न विझता अधिकच उफाळून जळत होती. आजूबाजूला लोकांची वस्ती दिसत नव्हती. रस्ताही एकदम निर्मनुष्य दिसत होता. ‘मग भर पावसात बरोबर रस्त्याच्या मध्यभागी जळणारी ही ज्योत इथे आली कशी?’ पण फारसा विचार न करता ड्रायव्हरने ज्योतीच्या शेजारून वेगाने गाडी नेली.

पण इतरांचे मात्र तर्कवितर्क चालू झाले. "कोकणात भुताखेतांचं फारच प्रस्थ असतं. कोणीतरी उतारा म्हणून तर तो दिवा रस्त्यावर टाकला नसेल ना? भर पावसातही तो न विझता, उफाळून कसा काय जळत होता?" नाना शंकाकुशंका काढल्यानंतर अचानक कोणीतरी जाहीर केलं, "आपला काही भुताखेतांवर विश्वास नाही बुवा." तर दुसरं कोणीतरी म्हणालं, "भीती वाटत असेल, तर रामरक्षा म्हणा." आणि तो विषय तिथेच संपला. पण सर्वांच्या मनात त्या जळणार्‍या ज्योतीचं गूढ तसंच होतं. एक विचित्र तणाव सगळ्यांच्या मनावर जाणवत होता.

सुमारे अर्ध्या तासाने अचानक रस्त्यावरून जाणारी तीनचार माणसं दिसली. त्यांच्या हातात जळणारे पलिते होते. त्यांच्या हातातल्या इतर सामानावरुन ते खेकडे पकडायला निघाले असल्याचं दिसत होतं. एकाएकी एका माणसाच्या हातातल्या पलित्यातला जळणारा कापडाचा तुकडा खाली पडला आणि आमच्या मनातलं गूढ उलगडलं. मनातले संशयाचे कोपरे लख्ख धुवून निघाले होते; आणि परत वातावरण पहिल्यासारखं हलकंफुलकं झालं होतं.

झालं होतं क्त एवढंच, की भर पावसात रात्रीच्या वेळी खेकडे पकडायला असेच कुणीतरी निघाले होते. त्यांच्या पलित्यातलं जळणारं कापड मात्र अगदी बरोबर रस्त्याच्या मध्यभागी गळून पडलं होतं. पलिता पावसातही चांगला पेटता रहावा म्हणून त्याच्यावर भरपूर रॉकेल ओतलं असावं. रॉकेलमुळेच उफाळत्या ज्योतीने ते कापड जळत राहिलं. त्याच्याजवळून आमची गाडी वेगाने गेल्यामुळे जळणारी वस्तू नक्की काय आहे, हे आम्हांला नीट दिसलं नव्हतं, आणि उगीचच मनात शंकांचं काहूर निर्माण झालं होतं.

शेवटी डोंगर पोखरून उंदीर निघाला होता तर! म्हणजेच याहीवेळेला आम्ही कोकणात गेलो, पण कोकणातल्या कोणत्याच भुताखेताने आपल्या अस्तित्वाची साधी झलकही आम्हांला दाखवली नाही. निर्विघ्नपणे आमची कोकणातली सहल पार पडली. "तुम्ही एकदा तरी कोकणात याच, म्हणजे तुम्हांलाही कोकणातल्या भूतांचे अनुभव येतील," असं कितीतरी जणांनी ऐकवलं होतं. पण भूतांवर विश्वास नसलेले आम्ही सुखरूप प्रवास करून आणि ‘भूतांवर नसलेला विश्वास अभंग ठेवून’ परत आलो होतो.

- दिनांक ४ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झालेल्या "मुलुंड ब्रेकफ़ास्ट" या साप्ताहिकातील माझा लेख.

Monday, August 10, 2009

फुलपाखरु / Butterfly


**************************************
फुलपाखरु
शिणली गात्रे, पंखही थकले,
विसावले ते, निर्भर येथे,
फुलपंखी फुलपाखरु.
*************************************
BUTTERFLY
Exhausted all parts, weary wings too,
Taking excessive rest here,
That Butterfly having wings like Flower.
*************************************

Monday, July 27, 2009

"मी" / "ME"

"मी"
कोण आहे मी?
काय आहे माझा परिचय?
मी इथे कशी आले? कुठून आले? का आले?
या जन्माआधी कुठे होते मी?
काय होता माझा परिचय?
काहीच माहीत नाही.
मागे खूप काळोख दाटला आहे,
पुढेही अंधाराचे घोर साम्राज्य आहे,
तरी मला पुढे जायचंय
आणि.....
आणि मागे वळून बघायचंय!
पण मला जमत नाही मागोवा घेणे,
कारण पायाखालची वाटच झाली आहे अदृश्य!
मागचा मार्ग बंद झाला आहे
आता केवळ पुढचा मार्ग शोधायचा
धडपडत, ठेचकाळत,
अंधारातून मार्ग काढत!
माझं भवितव्य काय?
कशासाठी हे सारे करायचे?
पण विचार करायला देखील अवधी नाही मला
सदैव आहे पुढे पुढेच जायचे.
स्वतःलाच उजळून अंधारलेली वाट उजळायची
आणि दाखवायचा मार्ग सार्‍यांना!
हेच माझे ध्येय
ते मी साध्य करणार
मागोवा घेणे जमलेच नाही,
पण हे करण्यासाठी, मी पुढे पुढे जातच राहणार, जातच राहणार.

- "किर्ती" वार्षिकात मराठीत प्रसिद्ध झालेली माझी कविता.
****************************************************

"ME"
Who am I?
What is my introduction?
How I came here? From where? Why?
Where was I before my Birth?
What was my introduction?
Nothing known.
It's very dark on back,
Empire of dense dark ahead,
Still I have to go ahead
And.....
And have to see back!
But it's not possible for me to take a review,
Because the way below my feet has become invisible!
The way back is blocked
Now have to search way ahead
Struggling, stumbling,
Finding path in dark!
What is my future?
Why to do it?
But I have no time for thinking
Always have to go ahead and ahead.
Brightening the dark path by lighting up myself
And to show path to all
This is my aim
I will achieve it
Taking review was not possible
But for doing this I will go ahead and ahead, I will go.

- My Marathi poem published in Annual Magazine "Kirti"
*************************************************

Saturday, July 11, 2009

ब्लॉग टेम्प्लेट बदलतांना.....

ब्लॉगरवर मी जेव्हा माझं अकाऊंट ओपन करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली, तेव्हा ब्लॉगसाठी ब्लॉगरवाल्यांनी जी काही क्लासिक टेम्प्लेट्‌स ठेवली होती, ती मला फारशी आवडलेली नव्हतीच. पण मी नव्यानेच ब्लॉगर वापरायला सुरूवात केली असल्याने, ती ठराविक साच्याची टेम्प्लेट्‌स बदलता येतील का, याचीही मला माहिती नव्हती.

मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट लिहायला सुरूवात केली, तेव्हाच इतरांचे ब्लॉगही अधूनमधून वाचायला सुरूवात केली. जेव्हा मी नवीन ब्लॉग्जवर व्हिजीट द्यायला जायचे, तेव्हा माझ्या लक्षात आले, की काहीजणांचे ब्लॉग्ज हे ब्लॉगस्पॉटवर असूनही त्या ब्लॉगचे टेम्प्लेट नेहमीच्या क्लासिक टेम्प्लेटपेक्षा वेगळेच आहे. तेव्हा मला वाटले, की कदाचित प्रोफेशनल यूजसाठी त्यांनी पैसे भरून त्या ब्लॉगचे वेगळे अकाऊंट ओपन केले असावे, म्हणूनच त्यांचे टेम्प्लेट असे वेगळे असावे.

पण अजून काही असेच ब्लॉग्ज पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, की काही वेबसाइट्‌सवर ब्लॉगसाठी नवीन टेम्प्लेट्‍स तयार करून ती वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. पण या टेम्प्लेट्‌सच्या हेडरवर ठळकपणे त्या वेबसाइटचा लोगो दिलेला होता आणि त्या टेम्प्लेटच्या थीमचे नावही दिलेले होते. ते टेम्प्लेट कसं वापरायचं हेही मला माहिती नव्हतं. पण असा हेडरवरचा ठळक लोगो असलेले कोणतेही टेम्प्लेट वापरण्याची कल्पना मला फारशी आवडली नव्हतीच. म्हणून मग मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

पण काही दिवसांपूर्वी दोनतीन ब्लॉग्जवरती "टेम्प्लेट कसे बदलावे?" याच विषयावरच्या पोस्ट लागोपाठ वाचल्याने माझ्या मनातही त्याचे प्रात्याक्षिक करून पाहण्याचा विचार डोकावू लागला. पण माझ्या या मुख्य ब्लॉगवर मी अनेक गॅजेट्‌स ऍड केलेली असल्याने, मी या ब्लॉगवर प्रयोग करण्याचा विचार बाजूला सारला. शेवटी सरळ नवा ब्लॉग तयार करून त्याच्यावर पहिला प्रयोग करून बघायचा मी निर्णय घेतला.

मग मी टेम्प्लेट्‌सच्या वेगवेगळ्या वेबसाइट्‌स ओपन करून बघायला सुरूवात केली. मला अर्थातच लोगो असलेले टेम्प्लेट नको होते. मोठ्या पोस्ट लिहायची सवय असल्याने, पोस्टसाठी जास्त जागा हवी म्हणून क्त दोन कॉलमचेच टेम्प्लेट हवे होते. (आणि तिथे असलेली बहुतेक टेम्प्लेट्‌स तीन किंवा चार कॉलमची होती.) त्याशिवाय साइडबार उजव्या बाजूलाच हवा होता. मोठ्या प्रयत्नाने मी मला हवी तशी तीन टेम्प्लेट्‌स शोधून काढली आणि ती डाऊनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली.

नंतर त्यातले "देजा व्ह्यू" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या अपलोड होईना. मग दोन दिवसांनी पुन्हा "चॉकलेट" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर मला त्याची ती कलर थीम जरा जास्तच भडक वाटली. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.

नंतर मी "होम" या नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला. त्या टेम्प्लेट मध्ये मूळ टेम्प्लेटमध्ये नसलेले "रिसेंट कॉमेंट्‌स, रिसेंट पोस्ट्‌स, आणि लिंक्स" हे गॅजेट्‌स होते. त्यामुळे ते काही केल्या अपलोड होईना. मला एच्‌.टी.एम्‌.एल्‌. येत नसल्याने ती गॅजेट्‌स कशी काढून टाकावी हे माहित नव्हते. पण मला ते टेम्प्लेट फ़ार आवडल्याने तेच ठेवावेसे वाटत होते. मग मी त्याचे एच्‌.टी.एम्‌.एल्‌. स्क्रिप्ट वाचून अंदाजानेच ती तिन्ही गॅजेट्‌स डिलीट केली. आणि ते टेम्प्लेट व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर लक्षात आले, की त्याचा साईडबार इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये डिस्प्ले होत नव्हता. मोझिला आणि ऑपेरामध्ये तो व्यवस्थित दिसत होता. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.

मग मी नव्या वेबसाइटवर नवी टेम्प्लेट्‌स शोधू लागले आणि एका वेबसाइटवर मला मस्त टेम्प्लेट्‌स सापडली. त्यातले "मेपल ली" नावाचं टेम्प्लेट डाऊनलोड करून अपलोड केलं. पण त्यात मेख अशी होती की त्याच्या इमेजेस त्याच्याबरोबर अपलोड होत नव्हत्या, त्या आधी पिकासा किंवा फोटोबकेट अशा ऍप्लिकेशनवर अपलोड करून मग त्या इमेजेसच्या लिंक टेम्प्लेटच्या एच्‌.टी.एम्‌.एल्‌. स्क्रिप्टमध्ये जोडायच्या होत्या. ही सूचना त्यांनी वेबसाइटवर न ठेवता डाऊनलोड केलेल्या फाईलमध्ये ठेवलेली होती. ती मी आधी वाचली असती, तर ते टेम्प्लेट डाऊनलोड केलंच नसतं. त्यात ते काम भलतंच किचकट असल्याने ते सोडून मी पुन्हा एकदा नवीन टेम्प्लेट शोधायला लागले.

मग मी "नेचर" नावाचं छानसं टेम्प्लेट निवडून अपलोड केलं, ते छान दिसत होतं. पण त्याची फिक्स्ड्‌ विड्थ होती, ते अनेक छोट्या छोट्या इमेजेसनी बनलेलं होतं आणि त्याचे पिक्सल्स जास्त असल्याने ब्लॉगच्या स्क्रीनवर आडवा स्क्रॉल बार येत होता. त्यामुळे ब्लॉग वाचायला त्रासदायक होत होता. "त्या टेम्प्लेटचे पिक्सल्स कमी करून त्याची विड्थ कमी करता येईल का?" हा प्रश्न मी अनेकांना विचारला, पण छोट्या इमेजेसनी ते टेम्प्लेट तयार केले असल्याने ते शक्य होणार नाही, असंच उत्तर मला मिळालं. मग मी तेही टेम्प्लेट डिलीट केलं.

मग त्याच वेबसाइटवर मला "अजेंडा" नावाचं टेम्प्लेट मिळालं, ते मात्र व्यवस्थित लोड झालं. त्याचा ऍपीअरन्सही व्यवस्थित होता. मग मी ते माझ्या मुख्य ब्लॉगवर लोड करायचं ठरवलं. ते व्यवस्थित होईल की नाही, देवनागरी स्क्रिप्टचं लेखन ऍक्सेप्ट करेल की नाही, याची शंका होती, तसंच नव्याने मुख्य ब्लॉगवर ऍड केलेले गॅजेट्स त्याच्यावर डिस्प्ले होतील की नाही हेही माहिती नव्हतं. तरिही मी टेम्प्लेट बदलायचं ठरवलं. मग डिफॉल्ट गॅजेटशिवायचे इतर सर्व गॅजेट्स आधी नोटपॅडवर व्यवस्थित कॉपी करून घेतले, आणि मग हे नवीन टेम्प्लेट अपलोड केलं. ते व्यवस्थित अपलोड झालं, मग नोटपॅडवरची सर्व गॅजेट्स नव्याने ऍड केली आणि ती व्यवस्थित ऍड झाली. क्त एकच प्रश्न होता, कॉमेंट्सच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कॉमेंटचा ब्लॉक डिस्प्ले होत नव्हता. मग मी सेटींग्जमध्ये जाऊन आधी कॉमेंट्स डिसेबल केल्या, आणि नंतर कॉमेंट्स पॉपअप विंडो सेट केली. सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला. आणि अखेर एकदाची मी माझ्या ब्लॉगचे टेम्प्लेट बदलण्य़ात यशस्वी झाले.

Thursday, June 11, 2009

याहू ३६०ला निरोप देतांना!

याहू ३६० वर मी आले, तेव्हा माझी नोकरी मी सोडलेली होती, शाळेतले किंवा कॉलेजमधले कोणीच मित्रमैत्रीणी माझ्या विशेष संपर्कात नव्हते. अशावेळी याहू ३६० सारख्या सोशल वेबसाईटचा मला मोठा आधार मिळाला होता, इंटरनेटच्या विश्वात माझी स्वतःची अशी एक जागा मला याहू ३६० ने निर्माण करून दिली होती.

या सार्‍याची सुरूवात झाली ती सुमारे तीन वर्षांपूर्वी. २००६ सालच्या जून किंवा जुलै महिन्यात माझ्या भावाने मला याहू क्वेश्चन्स ऍंड आन्सर्स ची ओळख करून दिली. याहूवर अकाऊंट असणारी कोणीही व्यक्ती तिथे आपल्या मनातले प्रश्न विचारू शकत होती, किंवा इतर कोणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत होती आणि हे करतांना तिथे टोपणनाव घेऊन प्रश्नोत्तरे लिहिण्याची सोयही होती. टोपणनावाने प्रश्न विचारण्याची सोय असल्याने अनेकजण अगदी मनमोकळेपणाने प्रश्न विचारत आणि तितक्याच मनमोकळेपणाने त्यांना उत्तरंही मिळत. तसंच तिथे प्रत्येकाचे टोपणानावाचे प्रोफाईल, त्या व्यक्तीने विचारलेले प्रश्न आणि इतरांना दिलेली उत्तरं बघायला मिळत असत. त्यातल्या काही जणांनी परवानगी दिलेली असेल, तर त्यांचे याहू ३६०चे प्रोफाईलही बघण्यासाठी लिंक दिलेली असायची.

अशीच कोणाचीतरी लिंक बघून माझ्या भावाने त्याचं याहू ३६०चं प्रोफ़ाईल तयार केलं होतं, आणि त्याने ते तयार केलं म्हणून मग मीही त्याचं पाहून माझं प्रोफाईल तयार केलं होतं. अर्थातच फ्रेंड म्हणून मी त्यालाच सगळ्यात आधी ऍड केलं होतं.

त्यावेळी ब्लॉग म्हणजे नक्की काय, ते मला माहिती नव्हतं. पण असंच एका प्रोफाईलवरून दुसर्‍या प्रोफाईलवर मी जात राहिले आणि माझ्या लक्षात आलं, की याहू ३६० ही अशी एक सोशल वेबसाईट आहे, की जिथे तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलला एखादी आकर्षक थीम देऊन सजवू शकता, याहूची थीम नको असेल, तर स्वतःकडचा एखादा आकर्षक फोटो वापरून तुमची स्वतःची थीम देऊ शकता, याशिवाय फ्रेंड्स जोडू शकता, त्यांना मेसेज पाठवू शकता, त्यांनी नियंत्रित केलेल्या सेटींग्जप्रमाणे त्यांच्या पेजवर कॉमेंट्स देऊ शकता, त्यांच्याशी चॅटींग करू शकता, त्याशिवाय स्वतःच्या प्रोफाईलवर फोटो ठेवू शकता, आणि ब्लॉग सुद्धा लिहू शकता, ब्लॉगमध्ये व्हिडीओ, फोटो ऍड करू शकता, प्रोफाईल थीमपेक्षा वेगळी अशी प्रत्येक ब्लॉग पोस्टला स्वतंत्र बॅकग्राऊंडही देऊ शकता. असं बरंच काही याहू ३६० वर होतं. तिथे अनेक देशांमधले लोक होते आणि बहुतेक सगळे जण टोपणनावानेच वावरत होते. मी सुद्धा एक टोपणनाव घेतलं होतं. एखाद्या सोशल वेबसाईटची ही माझी पहिलीच तोंडओळख होती.

मग माझ्या ओळखीचे अजून कोणी याहू ३६० वर आहेत का, हे पाहण्यासाठी मी माझ्या कॉलेजचे नाव आणि ठिकाण सर्चमध्ये दिलं. आणि "मृदुला-नेचर लव्हर"चं प्रोफ़ाईल माझ्या समोर आलं. ती माझ्याच कॉलेजमध्ये होती, पण माझी आणि तिची ओळख नव्हती. तिला बर्‍याच परदेशी आणि भारतीय भाषाही येत होत्या. तिने लिहिलेल्या विविध विषयांवरच्या ब्लॉगपोस्टस लोकांना अंतर्मुख करून विचार करायला लावणार्‍या होत्या. तिला भरपूर फ्रेंड्स होते आणि तिने फोटो लावून तिचं प्रोफाईल छान सजवलेलं होतं.

मी तिला मेसेज पाठवून तिच्या फोटोंबद्दल एक प्रश्न विचारला आणि हेही सांगितलं की मी तिच्याच कॉलेजमध्ये होते. त्यावर तिचं उत्तरही आलं, मग मी सरळ तिला फ्रेंड  इन्व्हाइट पाठवलं. ती माझं इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करेल का, याबाबत मी साशंक होते, पण तिने ते ऍक्सेप्ट केलं. सुरूवातीला मला ब्लॉग म्हणजे काय, हे नीट माहिती नसल्याने मी तिचंच बर्‍याच बाबतीत अनुकरण करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली. मी तिला माझ्या बारिकसारिक शंका विचारायचे आणि तीही मला उत्तरं द्यायची. मग मी मृदुलाच्या फ्रेंड्सच्या प्रोफाईलवर जाऊन त्यांना ऍड करायला सुरूवात केली आणि मृदुलाचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स झाले. नंतर इतर काहीजणंही मला फ्रेंड इन्व्हाइट पाठवायला लागले.

एकदा मी याहू क्वेश्चन्स ऍंड आन्सर्स वर "कोरफड जेल कशी तयार करायची?" असा प्रश्न विचारला असतांना "ब्लॅकी बी" नावाच्या व्यक्तीने मला उत्तर दिलं होतं, "केमिकल्स वापरुन कोरफड जेल तयार करण्यापेक्षा घराच्या अंगणातच कोरफड लावून, त्याच्या गराचा वापर केला तर जास्त चांगलं होईल." ब्लॅकी बीचे ३६० वर प्रोफाईल होते, मग मी त्यालाही ऍड केले.

अमेरिकन ब्लॅकी बी "दिपक चोप्रा" नावाच्या भारतीय माणसाच्या कंपनीत कामाला होता. माणसाच्या मेंदूच्या कार्याबाबत आणि रचनेबाबत संशोधन करून दिपक चोप्राने काही उपकरणे तयार केली होती. ब्लॅकीबीच्या ब्लॉगमध्ये एकतर ह्या उपकरणांची माहिती असायची किंवा त्याचे ज्या व्यक्तींशी पटत नाही त्यांच्याबद्दल त्याने ब्लॉगमध्ये लिहिलेले असायचे. पण तो माझ्याशी चांगला वागायचा आणि नेहमी मला विचारायचा, की "तू तुझ्या प्रोफाईलवर तुझा स्वतःचा फोटो का लावत नाहीस?" पण तेव्हाही तिथे माझा फोटो लावावा असे मला वाटले नाही आणि आता याहू ३६० बंद होत आहे, तरी आजतागायत मी माझा फोटो तिथे लावलेला नाही. फोटो  न लावता मिळणारी प्रायव्हसी मला हवीहवीशी वाटत होती. पण बरेचसे पाश्चिमात्य लोक याहूवर बिनधास्तपणे त्यांचे आणि त्यांच्या फॅमिलीचे फोटो  लावायचे, तसे त्यानेही त्याच्या प्रोफाईलवर लावले होते.

याहू ३६० वर बरेचजण वेगवेगळ्या देशांमधले होते. त्यामुळे माझ्या ब्लॉगच्या काही पोस्टवर मी भारतीय सणांची माहिती दिली होती, तर इतर बर्‍याच पोस्टवर तात्पर्यकथा लिहिल्या होत्या. ते वाचून "बटरफ्लाय" नावाच्या एशियन मुलीने माझ्याशी संपर्क साधून मला ऍड केले. तिला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी माझ्या याहू ३६० च्या ब्लॉग पोस्टचा वापर करायचा होता. मी तिला परवानगी दिली.

"हैदी हॉग" नावाच्या एका मध्यपूर्वेतील व्यक्तीने मला ऍड केले होते. ती व्यक्ती रेडीओ स्टेशन चालवायची. त्यावेळी याहू ३६० च्या प्रोफाईलवर, प्रोफाईल यूजर व्यक्ती स्त्री आहे, की पुरूष हे जाहीर करणे बंधनकारक नव्हते. हैदीचे ब्लॉग वाचून मला तो एखादा पुरूष असावा असे वाटायचे. नंतर एकाएकी याहूने यूजर व्यक्ती स्त्री आहे, की पुरूष हे डिस्प्ले करणे बंधनकारक केले. त्यावेळी हैदी ही एक स्त्री आहे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. तसंच माझंही एकारान्त टोपणनाव वाचून अनेकजणांचा मी एक पुरूष आहे असा गैरसमज झाला होता, हेही मला नंतर त्यांच्या कॉमेंट्समधून कळले. माझी ओळख झाल्यानंतर सुमारे दीड वर्षाने मला हैदीने विचारले, की माझे याहू ३६० चे पेज तिला एका कलाप्रदर्शनात डिस्प्ले करायचे आहे, त्यासाठी तिला माझी परवानगी हवी होती. तिलाही मी परवानगी दिली.

खरं म्हणजे मी निव्वळ मृदुलाचे अनुकरण करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. त्यावेळी मला ब्लॉग मराठीत कसा लिहायचा हे माहिती नव्हते, म्हणजे सक्तीने इंग्लिशमध्ये लिहावे लागणार होते. त्यात माझे इंग्लिश भलतेच दिव्य असल्याने मला माझे वैयक्तिक अनुभव किंवा खूप खोलवरचे वैचारिक मतप्रदर्शन करणारे ब्लॉगलेखन करणे सुरूवातीला शक्य नव्हते. म्हणून मी भारतीय सणांची माहिती आणि ऐकीव तात्पर्यकथा ब्लॉगमध्ये लिहायला सुरूवात केली होती. त्यातही भरपूर ग्रामर मिस्टेक्स असायच्या. हळूहळू लिखाण करून मी माझे इंग्लिश सुधारले. पण तरिही दोन व्यक्तींना माझ्या याहू पेजचे सिलेक्शन करावेसे वाटणे, ही माझ्यासाठी मोठीच गोष्ट होती.

याहू ३६० वर काही जण मुद्दाम ठरवून एखाद्या विषयावर ब्लॉग लिहायचे. मग त्या व्यक्तीचा ब्लॉग पाहून त्या व्यक्तीचे इतर फ्रेंड्स त्याच विषयावर ब्लॉग लिहायचे. असे एकाच विषयावरचे अनेकजणांनी लिहिलेले ब्लॉग वाचतांना भरपूर मजा यायची. ब्लॉगपोस्टवर कॉमेंट्स लिहितांना मग प्रत्येकजण मनमोकळेपणाने मतप्रदर्शन करायचा. त्या विषयावर भरपूर चर्चा व्हायची. ब्लॉगप्रमाणेच त्याच्या कॉमेंट्सही वाचनीय असायच्या.

माझे बरेचसे फ्रेंड्स अशा ठरवून लिहिलेल्या ब्लॉगचे लिखाण करण्यात सहभागी असायचे. एकदा मृदुलाने "परिचयातील लहान मूल आणि त्याच्या संस्मरणीय आठवणी" या विषयावर ब्लॉग लिहिला होता आणि मलाही मेसेज पाठवून या विषयावरचा ब्लॉग लिहायला सुचवले होते. माझी त्या विषयावर ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती, पण नेमकी त्या वेळी कोणतीही ओळखीतली लहान मुले माझ्या इतक्या जास्त संपर्कात नव्हती, की त्यांच्यावर मी एखादा ब्लॉग लिहू शकेन. हाच विषय तिने काही वर्षांपूर्वी सुचवला असता, तर माझ्या एका खोडकर आतेभावावर मी मोठा ब्लॉग लिहू शकले असते, पण तोही आता एवढा मोठा झाला होता, की त्याला "लहान मूल" म्हणणे धाडसाचेच ठरले असते. त्यामुळे मग मी त्या विषयावर काही लिहिलेच नाही.

याहू ३६० वर एचटीएमएल ग्राफिक्स वापरून फ्रेंड्सना मेसेज पाठवता यायचे. "श्रेडपेझ" नावाचा एकजण नेहमी मला आणि त्याच्या इतर फ्रेंड्सना "हॅव अ बीअर हग!!!" अशा अर्थाचे ग्रीटींग्ज पाठवायचा. कॉमेंट्समध्ये इमोशन आयकॉन देतांना सुद्धा तो सरसकट "हॅव अ हग!" या अर्थाचे आयकॉन्स सिलेक्ट करायचा. सुरूवातीला मला ते फार विचित्र वाटायचं. पण नंतर लक्षात आलं, की पाश्चात्य लोकांना उठसूट हग्ज देणे, किसिंग करणे याची सवयच असते, त्याप्रमाणे तसे मेसेज पाठवणे हा त्याच्या सवयीचा भागच होता. मी मात्र त्याला अर्थातच फक्त "थॅंक यू!" म्हणून रिप्लाय द्यायचे किंवा "स्माईल"ची कॉमेंट द्यायचे. नंतर त्याच्या लक्षात आले, की त्याला अपेक्षित आहे, तसा माझा प्रतिसाद येत नाही. मग त्याने मला त्याच्या फ्रेंडलिस्टमधून रिमूव्ह केलं, मलाही माझी सुटका झाल्यासारखं वाटलं. हा आमच्यामधला सांस्कृतिक फरक होता, पण त्याला "अशाप्रकारचे मेसेज पाठवू नकोस" असं सांगून दुखावण्यापेक्षा त्यानेच मला रिमूव्ह केल्याचं मला समाधान वाटलं.

श्रेडपेझशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मला ऑकवर्ड वाटेल अशा प्रकारचे मेसेज पाठवले नाहीत. त्यातही वेगवेगळ्या देशांतली एशियन माणसं अतिशय सभ्यतापूर्वक वागत असत. हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांची माणसं त्यांच्या संस्कृतीबद्दल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहित असत. पण इतर धर्मियांच्या ब्लॉगवर कॉमेंट करतांना त्यांच्या संस्कृतीबद्दल पूर्ण आदर बाळगून ते लिहित असत.

"लेडी टिकी" बाबत मला एक मजेदार अनुभव आला. ती ख्रिश्चन होती. ती नेहमी तिच्या सर्व फ्रेंड्सना ग्रीटींग्ज, मोरल स्टोरिज लिहून पाठवत असे. त्या सगळ्याच्या शेवटी नेहमी एक हायपरलिंक दिलेली असायची, जिच्यावर क्लिक केलं, की एक वेबसाईट यायची, जिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विनंती केलेली असायची. एकदा मी "दिवाळी सणाच्या विविध दिवसांच्या रूढी व त्यापाठीमागच्या कारणपरंपरा" सांगणारा लेख लिहिला होता. तो ब्लॉग वाचण्याचे आमंत्रण मी इतरांप्रमाणेच लेडी टिकीलाही पाठवले, त्यात धर्मप्रसारासारखा कोणताही छुपा हेतू नव्हता. इतरांना भारतीय संस्कृतीची तोंडओळख करुन देण्याचाच क्त उद्देश होता. तर लेडी टिकीने मला उत्तर पाठवले, "सध्या माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी तो कॉम्प्युटर वापरतो, त्यामुळे मला तुझा ब्लॉग वाचायला वेळ मिळणार नाही." मग मीही उत्तर दिले, "आज ना उद्या कधीही उशीरा तुला वेळ मिळेल तेव्हा माझा ब्लॉग वाचून कॉमेंट दे. उशीर झाला तरी हरकत नाही." मग मात्र तिने एकदाचा तो ब्लॉग वाचून तिची कॉमेंट दिली.

"कंडा पी" नावाची थायलंडची स्त्री त्यांच्या देशाबद्दल लिहित असे. तिच्या लिखाणावरून थायलंडच्या लोकांमध्येही त्यांची जुनी पौर्वात्य संस्कृती आणि वेगाने त्यांच्या जीवनशैलीवर आक्रमण करणारी पाश्चात्य संस्कृती याचा अंतर्विरोध जाणवत असे. "सनफ्लॉवर" नावाची एक विद्यार्थिनी व्हिएतनामी भाषेत ब्लॉग लिहायची. ती काय लिहायची ते मला समजत नव्हते, तरी तिच्या रिक्वेस्टमुळे मी तिला माझ्या फ्रेंलिस्टमध्ये ठेवले होते. अशीच एक फ्रें ग्रीक संस्कृतीबद्दल ग्रीक भाषेत लिहायची. "शाहिद" नावाचा पाकिस्तानी शेफ ब्लॉगवर मजकूर न लिहिता नुसतीच आकर्षक ग्रीटींग्ज लावून ठेवायचा. काहीजण ब्लॉग न लिहिता नुसतेच मला ऍड करायचे, ते बहुधा चॅटींगसाठी ऍड करत असावेत. पण मी चॅटींग करत नव्हते, तरी त्या सगळ्यांना मी नुसतेच माझ्या फ्रेंलिस्टमध्ये ठेवले होते.

सगळ्यांची भाषा सारखी नसल्याने आम्ही बर्‍याचदा एकमेकांना मेसेजमधून ग्रीटींग्ज पाठवायचो. एकदा मी असंच सगळ्यांना एकदा एक ग्रीटींग पाठवलं आणि होमपेजवर सगळ्यांच्या ब्लॉगचे अपडेट पाहत असतांना मला मृदुलाच्या नवीन ब्लॉगचा अपडेट दिसला. क्त तीन दिवसांपूर्वीच स्वर्गवासी झालेल्या तिच्या आईबद्दल तिने ब्लॉग लिहिला होता. ते वाचून मला धक्काच बसला. माझ्यापेक्षा क्त दीडच वर्षांनी मोठी असलेल्या मृदुलावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती तो ब्लॉग लिहित होती, तेव्हा मला तिच्या दुःखाची काही कल्पनाही नव्हती आणि तिचा ब्लॉग प्रकाशित होण्याच्या काही मिनिटेच आधी मी तिला ते ग्रीटींग पाठवले होते. तिचा गैरसमज होऊ नये म्हणून मग मी तिच्या ब्लॉगवर तिचे सांत्वन करणारी कॉमेंट लिहिली आणि सुदैवाने तिनेही गैरसमज करून घेतला नाही.

अशाप्रकारे ब्लॉगचे माध्यम वापरून अनेकांनी इंटरनेटवर आपले सुखदुःख इतरांशी शेअर केले होते. "शेरॉन" नावाची एक मूळची इंग्लंडमधली महिला माझ्या फ्रेंलिस्टवर होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या नवर्‍याचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस होता. युरोपमध्ये प्रवास करणार्‍या त्यांच्या ट्रॅव्हलर्सचे पासपोर्ट कुठे हरवले, तर सोयीसाठी म्हणून तिने त्यांच्या पासपोर्टच्या रंगीत झेरॉक्स आणि स्कॅन केलेल्या कॉपीज तिने जवळ ठेवल्या होत्या. स्पेनच्या पोलिसांनी तिची झडती घेऊन ते जप्त केले आणि ते कागदपत्र जवळ बाळगल्याबद्दल तिला स्थानबद्ध करून तुरूंगात ठेवले होते. तिची सुटका होईपर्यंत काही महिने लागणार होते आणि त्या मधल्या काळात ती तुरूंगातूनच याहू ३६० वर ब्लॉग लिहित होती. तिचेही ब्लॉग वाचनीय असायचे.

"शाय-नोमोअर" नावाची एक अमेरिकन घटस्फ़ोटीत महिला माझी फ्रें होती. ती एखाद्या पार्टनरच्या शोधात होती. एकदा तिने ब्लॉग लिहिला, की "ती एका पाकिस्तानी मुलाशी चॅटींग करताकरता त्याच्या प्रेमात पडली. आणि वयाने तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असणार्‍या त्या मुलाशी लग्न करून ती कायमची पाकिस्तानात जाणार होती. त्याबाबत तिने तिच्या सर्व फ्रेंड्सना त्यांचे मत विचारले होते." मी तिला सल्ला दिला, की "लग्नाआधी तिने एकदा पाकिस्तानात जाऊन तिथे महिनाभर राहून पाकिस्तानी संस्कृतीशी तोंडओळख करून घ्यावी आणि मगच लग्नाचा विचार करावा." तिला माझा सल्ला पटला नव्हता, पण सुदैवाने त्या पाकिस्तानी मुलाच्या घरूनच त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध झाल्याने तिचे लग्न आणि पर्यायाने ते प्रेमप्रकरणही मोडले. तिला त्याचे खूप दुःख झाले, पण मला मात्र तिची भविष्यातली ससेहोलपट वाचली याचा मनापासून आनंद झाला.

एकदा शाय-नोमोअरने मला मेसेज पाठवून तिची सर्व वैयक्तिक माहिती सांगितली आणि मलाही माझी वैयक्तिक माहिती विचारली. मीही तिला माझी माहिती सांगितली आणि सहजच तिला सांगितले, की मी सिंगल आहे. त्यानंतर दीडदोन वर्षांनी मला तिचा एक मेसेज आला. तो मेसेज वाचून मी उडालेच. तिने लिहिले होते, "तुला कदाचित माझा मेसेज विचित्र वाटेल, पण चॅटींग करतांना तुझ्याच शहरात नोकरीसाठी नव्याने रहायला आलेल्या एका सिंगल असलेल्या मुलाशी माझी ओळख झाली. तो वयाने तुझ्यापेक्षा लहान आहे, पण या नवीन शहरात एकटाच आहे. तू त्याचा रिलेशनशिपसाठी विचार करावास असे मला वाटते." तिने त्याच्या वेबपेजची लिंक दिली होती. भारतीय संस्कृतीची अजिबात ओळख नसलेल्या तिला, ज्याची मला कोणतीही वैयक्तिक, कौटुंबिक, सांस्कृतिक महिती नाही अशा मुलाचा मी विचार करावा हे वाटले, हे पाहून माझे डोके गरगरले. मी सिंगल आहे याचा अर्थ, मी कमिटेड आहे, किंवा एंगेज्ड आहे असाही असू शकतो, हे तिने लक्षातच घेतले नव्हते. मी तिला नम्रपणे माझा नकार कळवला. पाश्चात्य माणसं कोणाच्याही खाजगी भानगडीत नाक खूपसत नाहीत हा माझा गैरसमज होता, हे सिद्ध झाले. आणि ती एखाद्या चौकशी करणार्‍या भारतीय काकूबाईसारखीच वागली, याची मला गंमत वाटली.

"रिचर्ड" नावाचा माझा एक अमेरिकन फ्रेंड (रिटायर्ड म्हातारेबुवा) याहू आन्सर्सवर सगळ्यात जास्त आन्सर्स दिलेल्यांमध्ये टॉपलिस्टमध्ये होता. मला याहू क्वेश्चन्सवर जो प्रश्न विचारूनही त्याचे उत्तर मिळाले नव्हते, तो प्रश्न मी त्याला याहू ३६० वर मेसेज पाठवून विचारला, की "कासवं अंडी देण्याकरता पाण्यातून जमिनीवर येतात. पण विहिरीतली कासवं जी अंडी देण्याकरता जमिनीवर येऊ शकत नाहीत, ती पाण्यातच अंडी देतात का?" आश्चर्य म्हणजे काही तासातच रिचर्डने मला उत्तर पाठवले, "कासवं पाण्यात अंडी देऊ शकत नाहीत. ती अंडी देण्याकरता पाण्याबाहेर येऊ शकली नाहीत, तर ती अंडी त्यांच्या पोटातच साठून राहतात, त्यामुळे त्यांना त्यासंबंधित विकार होऊन त्यांचे आयुर्मान कमी होऊ शकते." मी रिचर्डचे आभार मानले, मला त्याच्या या उत्तरं देण्याच्या छंदाचं आजही फार कौतुक वाटतं.

याशिवाय "स्वेलियॉड" नावाचे एक दक्षिण भारतीय कलाकार याहू ३६० वरील माझे फ्रें होते. त्यांनी एकदा मुद्दाम ठरवलेल्या विषयावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला किस्सा लिहिला होता. पती-पत्नींमधले मतभेद आणि त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीतला फक त्यांनी छान अधोरेखित केला होता. पत्नीचं प्रेम जास्त भावनिक असतं, तर पतीचं प्रेम जास्त व्यावहारिक असतं हे दर्शवणारी त्यांची कथा हृदयस्पर्शी होती. ते आणि मृदुला दोघेही याहूवरचे टॉप ब्लॉगर होते.

याहू ३६० वर मी माझ्या एका वेबसाईटची लिंक दिली होती. काही दिवाळी अंक आणि साप्ताहिकात मराठीतून प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखांच्या इमेजेस मी त्या वेबसाईटवर ठेवल्या होत्या. महाराष्ट्रीयन असलेल्या आणि माझ्याच शहरात राहणार्‍या "सॅंक्स" ने त्या पाहिल्या होत्या. माझ्या फेरीट पुस्तकांच्या यादीत मी "मृत्युंजय" पुस्तकाचे नाव लिहिले होते. ते वाचून त्याने मला विचारले, "मला मृत्युंजय पुस्तक वाचायला मिळेल का?" माझ्या मनात एक विचार डोकावला, की "त्याला खरंच पुस्तक हवं आहे, की माझ्याशी ओळख वाढवायची आहे? म्हणून त्याने हे विचारलंय?" पण माझ्याकडे ते पुस्तक माझ्या संग्रहात नव्हतंच, तसं मी त्याला कळवलं. त्याला काय वाटलं, कोणास ठाऊक? पण नंतर त्याने मला कधीच कॉन्टॅक्ट केला नाही.

"टायगरकब" या सिंगापूरी चायनिज माणसाची आणि माझी ओळख झाली ती याहू आन्सर्सवर. पण आमची मैत्री वाढली ती याहू ३६० वर. टायगर स्वतः त्यांच्या संस्कृतीची, शहराची, देशाची माहिती देणारे ब्लॉग लिहायचाच, पण इतरांनी त्यांच्या ब्लॉगवर जी काही सांस्कृतिक माहिती दिलेली असेल, तिथे कॉमेंट्स लिहून त्यांच्या महितीत भर घालायचा. त्यानेही त्याचा ब्लॉग वेगवेगळ्या थीम्स, फोटो, व्हिडिओ वगैरे लावून छान सजवला होता. याहू ३६० वरच्या तांत्रिक बाबींमध्ये तो सर्वांना मार्गदर्शन करायचा. त्यासाठी त्याने खास ग्रुप तयार केला होता. ब्लॉगपोस्टला थीमपेक्षा वेगळी बॅकग्राऊंड, बॉर्डर कशी द्यायची, जीआयएफ इमेजेस, फोटो,  व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसे ऍड करायचे याचे तो न कंटाळता मार्गदर्शन करायचा. दिवसाच्या २४ तासांपैकी १८-२० तास तो ऑनलाईनच असायचा (अगदी कंपनीत काम करतांनाही), त्यामुळे केव्हाही याहू ३६० वर गेलं, तरी तो हाकेला धावून तांत्रिक बाबीत तत्परतेने मदत करायचा. असा हा तत्पर मित्र अचानकच काही कारणांमुळे याहू ३६० सोडून निघून गेला, तेव्हा फारच वाईट वाटले.

टायगरकबने त्याचा फोटो एम्बॉस करून प्रोफाईलवर लावला होता. त्याचा आणि नंतर माझाही फ्रेंड असलेला "लॅमिऑसिटी" ह्यानेही स्वतःचा फोटो काळपट करून लावला होता. मला कायम असे वाटायचे, की "लॅमिऑसिटी" आणि "टायगरकब" ह्या दोघांच्या चेहर्‍यात खूप साम्य आहे. बहुधा त्या दोन व्यक्ती नसून एकच व्यक्ती असावी. पण लॅमिऑसिटी नेहमी काळपट पार्श्वभूमीवर हिंस्त्र प्राणी, हाडांचे सांगाडे, भूतं, आग ह्यांच्या इमेजेस लावून ब्लॉग लिहायचा. त्याचे मेसेजही तसेच दचकवणारे असायचे. पण टायगर याहू ३६० सोडून गेल्यानंतर मी ह्या मनातल्या शंकेचा विचारही करणे सोडून दिले. आता बहुधा मला या शंकेचे उत्तर कधीच मिळणार नाही.

आता तर याहू ३६० बंद होणार असल्यामुळे बरेचजण याहू ३६० सोडून आधीच निघून गेलेत. परत त्यांची ऑनलाईन भेट होईल न होईल, पण याहू ३६०च्या सुखद आठवणी मात्र मनामध्ये रेंगाळत राहतील...

Saturday, May 30, 2009

आकांक्षा

झाकोळूनी आवर्त मनी व्यापले,
व्याकुळले मन क्षणी तापले,
भावनांच्या प्रपाती वाहोनीया हे,
दुःख आले मनी दाटुनी माझिया,

ओंजळीत अश्रुफुले साचोनिया,
नयनांतुनी वर्षाव पावसाचा!

दुःखास माझ्या कधी अंत नाही,
अभिशाप मज हा कधी लाभला?
क्षण जे सुखाचे क्त स्वप्नात का?
हरपून जाई आनंदचि सारा!
मनमोकळे बोलण्यास हे कोणी,
यावे हितगुज ते करून जावे!

आस ही मनाची राहील मनी का?
येऊनी कोणी थांबवेल आवर्त?
अधिर्‍या असोशीने मी वाट पाही,
खुली करून ही मनाची कवाडे,
मनीचे गुज पुरे हे व्हावे, हीच
एक आकांक्षा मनी धरोनी आहे!
- D D

Friday, May 15, 2009

वागावे कसे?

लहानपणी पुस्तकात वाचलं होतं, "माणसाने गर्विष्ठ असू नये, इतरांशी विनम्रतेने वागावे." त्या काळात ते वाक्य वाचायला छान वाटलं होतं. तसं वागायचा मी प्रयत्नही केला. पण मला एकंदरीत आलेला अनुभव इतका विपरीत होता, की लवकरच माझ्या लक्षात आलं, की "काही ठिकाणी विनाकारण नम्रता दाखवली, की माणसं आपल्याला कमी लेखून तुच्छता दर्शवतात. खरं तर अशा व्यक्तींशी रोखठोकच वागलं पाहिजे. अतिनम्रता आपल्यालाच त्रासदायक ठरते."

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे स्वभिमुखता वाढत चालली आहे, पण समाजभिमुखता कमी होत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे "कोणत्याही व्यक्तीने आपलं स्वातंत्र्य जरूर उपभोगावं, पण समाजातील इतर घटकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालून नव्हे," हे तत्वच लोक विसरू लागले आहेत. ते आपले अधिकार अगदी आठवणीने बजावतात, पण कर्तव्य मात्र विसरून जातात. आत्मविश्वास दाखवणे, म्हणजे उर्मटपणाने वागणे असाच काहीजणांचा समज होत चाललेला आहे.

टीनएजर्सच्या वागण्यात हे अगदी विशेषत्वाने जाणवते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते दिसून येते, तेव्हा खंत वाटते. माझ्या परिचयातील एक व्यक्ती बोलतांना म्हणाली, की "अमुक एक व्यक्ती तिचं काम खात्रीने करेल, कारण त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल पैसे दिले जाणार आहेत. मग ती व्यक्ती काम न करायला काय झालं?" तेव्हा त्या व्यक्तीला हे समजावून सांगावे लागले, की "ते काम करणं हा काही त्या अमुक एक व्यक्तीचा व्यवसाय नाही, तिची इच्छा असेल तर ती तुम्हांला मदत करेल. पण तुम्ही काम केल्याबद्दल पैसे देणार, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या व्यक्तीला खुशाल गृहीत धरावे."

क्त आर्थिक बाबतीतच नव्हे, तर रोजच्या दैनंदिन वागणुकीतूनही हे दिसून येते. भर गर्दीतल्या लोकल ट्रेनमध्ये खुशाल एका पायावर दुसरा पाय टाकून, हवेत तो पाय तरंगत ठेवून बसणारे टीनएजर्स महाभाग काही कमी नाहीत. गर्दीत उभ्या असलेल्या इतर लोकांना आपला पाय आणि पायातली चप्पलही लागत आहे, याची त्यांना अजिबात पर्वा नसते. त्यांच्याशी सौजन्याने बोललं, तर ते फ़क्त इकडचा पाय तिकडच्या दिशेला किंचित हलवतात, पण मग दुसर्‍या व्यक्तीला त्यांचा पाय आणि पायातली चप्पल लागत राहते. अशावेळी अशा व्यक्तींशी रोखठोकपणेच बोलावे लागते.

सध्या विविध सोशल वेबसाईट्सचे पेवच फ़ुटले आहे. या सोशल वेबसाईट्सचा जबाबदारीने वापर करण्याची मानसिकता अजून बर्‍याच टीनएजर्समध्ये निर्माण झालेली नाही. माकडाच्या हातात कोलीत मिळावे, तसं त्यांच्या हातात सोशल वेबसाईट्सचं अस्त्र मिळालं आहे आणि मनमुक्तपणे ते त्याचा वापर करत आहेत. एका सोशल वेबसाईटवर, माझे परिचित राहत असलेल्या एका मोठ्या सोसायटीची कम्युनिटी मी पाहिली. त्या कम्युनिटीत त्या सोसायटीत राहणार्‍या काही कुटुंबांची नावे दिली होती आणि प्रश्न विचारला होता, की त्या कुटुंबांपैकी कोणते कुटुंब सर्वात जास्त लो स्टॅंडर्ड, चीप, इलिटरेट, सोसायटीत राहण्याची लायकी नसलेले आहे? त्या यादीत माझ्या परिचितांचे नाव नाही हे पाहून समाधान वाटले, पण ज्यांची नावे दिली होती, त्यांची जाहीर बदनामी होते म्हणून त्यांनी कायदेशीर कारवाई केली असती, तर त्या प्रश्नकर्त्याचे काय झाले असते?

सोशल वेबसाईटवर एखाद्या व्यक्तीच्या नावाने कम्युनिटी, ग्रुप बनवणारेही टीनएजर्सही आहेत. जेव्हा ती व्यक्ती काही कोणी अभिनयपटू, खेळाडू, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक किंवा राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती नसून, फक्त प्रभावी व्यक्तिमत्व असणारी, पण सामान्यपणे समाजात वावरणारी व्यक्ती असते, आणि त्या व्यक्तीची प्रशंसा करण्याच्या नादात ते त्या व्यक्तीच्या खाजगी जीवनावर आक्रमण करतात. कधीकधी त्या व्यक्तीबद्दल बदनामीकारक विधानंही करतात. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून किंवा निकटवर्तीयांकडून त्यांच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आल्या, की त्या व्यक्तीवर भाष्य करण्याचा त्यांना अधिकारच आहे असे बजावत, ते त्या कुटुंबियांविरूद्धच कायदेशीर कारवाईचे शस्त्र उगारतात. पण कायदा त्या कुटुंबियांच्या बाजूने आहे, हे लक्षात आल्यावर, कायदेशीर कारवाईचा अधिकार असणार्‍यांनाच या टीन एजर्सची दया येते आणि ते त्या कुटुंबियांकडे त्या वाट चुकलेल्या टीन एजर्सची रदबदली करून ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांचे पालकही मुलांना समज देण्याऐवजी, त्यांना पाठीशी घालत राहतात. स्वतःच ओढवून आणलेले हे प्रकरण मिटल्यावर ही मुले परत बेपर्वाईने वागायला सुरूवात करतात आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मानसिक त्रास होईल अशाप्रकारे वागायला सुरूवात करतात.

एकंदरीतच व्यक्तीस्वातंत्र्याचे वादळी वारे वाहू लागले, एकत्रित कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली, कामाच्या निमित्ताने आईवडील दोघेही घराबाहेर राहू लागले, आणि या टीनएजर्सना समाजात वागावे कसे हयाचे मार्गदर्शन करणारेच कोणी राहिले नाहीत. त्यातच व्यक्तीस्वातंत्र्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली वाढती आत्मकेंद्रीत वृत्ती यामुळे अशा टीनएजर्सची दिशाच भरकटत चालली आहे. त्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांच्यातली सळसळती उर्जा विधायक कार्यासाठी वापरली जाईल.

काही वर्षांपूर्वी मी पेपरमध्ये वाचले होते, की बदलत्या काळात लहान मुलांना मॅनर्स शिकवण्यासाठी, लंडनमध्ये स्पेशल क्लासेस चालू केले गेले. पालकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आता गरज आहे, ती भारतातही तरूण पिढीला "समाजात वागावे कसे?" याचे शिक्षण देण्याची. महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण हा विषय शिकवला जातो, त्यात ह्या विषयाचाही समावेश केला गेला तर फारच छान होईल. पण पालकांचेही समुपदेशन करण्य़ाची आवश्यकता आहे, म्हणजे पालक चुकीच्या बाबतीत त्यांच्या मुलांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना योग्य ती समज देतील. आणि सुसंस्कृत समाजाच्या दिशेने सर्वांची वाटचाल सुरू होईल.

Wednesday, April 22, 2009

माझे "मी"पण हरवले

मला अजूनही हे कळत नाही, की हे सत्य आहे, की आभास? की मी एखादे स्वप्न बघतेय जागेपणी? की ज्यांना मी माझ्या भूतकाळातील स्मृती समजत होते, त्या माझ्या भूतकाळातल्या स्मृती नसून, तेच एक मोठे दुःस्वप्न होते? नेमके काय खरे आहे? माझ्या भावना खर्‍या आहेत, की बुद्धीला जे जाणवतं आहे ते खरं आहे? माझी बुद्धी वापरून मी माझ्याच भावनांचा खरेखोटेपणा तपासायला हवाय! पण सरळमार्गाने जाऊन काहीही साधणार नाही, उलट हया चक्रव्यूहात मी जास्तच गुंतत जाईन. पण कृष्णनीतीने वागून सत्य शोधायला गेले, तर त्यासाठी मला माझ्या तत्वांना मुरड घालावी लागेल. "मोडेन पण वाकणार नाही", की "वाकेन पण मोडणार नाही", ह्यातले नेमके काय निवडायचे? की कधी थोडे वाकल्यासारखे दाखवायचे, कधी थोडे मोडल्यासारखे दाखवायचे आणि योग्य वेळ आल्यावर वाकणारही नाही आणि मोडणारही नाही असेच ठणकावून सांगायचे? पण ह्या सार्‍यातून नेमके सत्य शोधतांना माझ्या 'मी'पणाच्या मात्र पार चिंधड्या चिंधड्या झालेल्या असतील, एवढे मात्र निश्चित! अजूनही एक मार्ग आहेच, की सत्याचा कधीच शोध घ्यायचा नाही, ज्या गोष्टीमागचे सत्य मी शोधू पाहतेय, तिचाच त्याग करायचा. पण मग मनाची होणारी तगमग? तिचे काय करायचे? काहीही केले तरी या सार्‍यात माझी मनःशांती हरपणार हे निश्चित!

पण मुळात माझ्याच वाट्याला हे का यावे? मला माहिती आहे, या प्रश्नाला काहीही अर्थ नसतो. प्रत्येकाच्या वाट्याला असे काही ना काहीतरी येतच असते. पण ज्या अतर्क्य शक्यतांचा मी 
फारसा विचार केला नव्हता त्याच आता एखाद्या भेसूर राक्षसासारख्या माझ्यापुढे मोठा बागुलबुवा करून उभ्या राहिल्या आहेत. ह्या सार्‍या एखाद्या चित्रपटात किंवा कथा कादंबरीतच शोभाव्या अशा घटना माझ्याबाबतीत घडतील अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. पण आता त्या घडत आहेत आणि त्यांचा शेवट कसा होणार आहे याबाबत मी कोणतेही अंदाज करू शकत नाहीये. आधी मला असे वाटायचे, की 'चित्रपटात फाच अतिरंजित घटना दाखवतात. या चित्रपटात दाखवल्या जाणार्‍या किंवा कादंबर्‍यात रसभरीतपणे वर्णन केलेल्या घटना प्रत्यक्षात कधीतरी घडणे शक्य आहे का?' पण आता मी ठामपणे सांगू शकते, की ह्यापेक्षाही अतर्क्य गोष्टी आपल्या जीवनात घडू शकतात.

मला हेही माहिती आहे, की मी माझ्या आयुष्यात घडणार्‍या या अतर्क्य गोष्टी मी माझ्या आत्मचरित्रात लिहिल्या तर त्याएवढे वैचित्र्यपूर्ण असे दुसरे आत्मचरित्र असणार नाही. पण मी हेही प्रांजळपणे सांगू इच्छिते, की मी माझे आत्मचरित्र लिहीणार नाही आणि ते लिहावे असेही आत्ता मला वाटत नाही. कदाचित अजून काही वर्षांनी मनाला आलेल्या प्रगल्भतेमुळे मी आत्मचरित्र लिहेनही, पण आत्ता मला भेडसावत असलेल्या समस्येचा त्यात कितपत उल्लेख असेल, कोणास ठाऊक? असे नाही, की मी माझ्या जीवनाकडे तटस्थपणे बघू शकत नाही. पण कदाचित त्यामुळेच मी आत्मचरित्र लिहू इच्छित नसेन. एक शक्यता मात्र आहे, माझ्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटना आणि काही कल्पना याचे मिश्रण करुन मी एक सुरस कादंबरी लिहेन कदाचित. पण या सार्‍या शक्यताच!

आणि हे सारे कशामुळे घडले? मला असे वाटत होते, की एखाद्या कल्पित घटनेला खोट्या वास्तवाची जोड देऊन, त्यासाठी कल्पित, खोटे पुरावे देऊन, ती नसलेली गोष्ट आहे असे भासवले जात आहे. पण आता अचानक एक अशी गोष्ट उजेडात आली आहे, की त्यावरून वाटते, योगायोगाने आणि अनपेक्षितपणे प्रत्यक्ष हाती लागलेल्या एका महत्त्वाच्या खोट्या पुराव्याला, कल्पित घटनांचा आधार देऊन, आणि मग इतर खोट्या गोष्टींची जोड देऊन हा सारा बागुलबुवा उभा केला गेला आहे. मला सिद्ध करायचे आहे, ते म्हणजे तो महत्त्वाचा पुरावाच खोटा असल्याचे. हे सारे एखाद्या वकिलाचे काम असल्यासारखे वाटते. पण आता मला जाणवतेय, जर मी त्या आणिबाणीच्या क्षणी वकिलाची मदत घेतली असती, आणि काय पुरावा आहे या तुम्ही उभ्या केलेल्या बागुलबुव्याचा म्हणून ठणकावून विचारले असते, तर तत्क्षणी तो पुरावा माझ्या तोंडावर 
फेकून मला तोंडघशी पाडले गेले असते.

तो पुरावा हा खोटाच पुरावा आहे, असे मला वाटतेय, ते मला सिद्ध करावेच लागेल. पण जर तो पुरावा १००% खरा असल्याचे सिद्ध झाले तर.. तर.. तर............मी माझ्या आयुष्याच्या लढाईत अगदी जाणवण्याइतपत परिणामकारकरित्या इतकी मागे 
फेकली जाईन, की पुन्हा ते अंतर तेवढ्याच वेळात पार करून माझे ध्येय साधणे मला परत कधीही शक्य होणार नाहीये. शिवाय माझ्या भावनांनी माझ्या बुद्धीवर मात केल्याचे शल्य मला आयुष्यभर जाणवत राहील ते वेगळेच. त्यामुळे माझ्या आयुष्याची ही लढाई (होय लढाईच) मला जिंकावीच लागणार आहे. मी इतके सारे लिहिले, तरिही स्पष्टपणे तुम्हांला काहीच समजले नाही, हे मला माहित आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या गुंत्याबाबत मला मोकळेपणी काहीच लिहिता येणार नव्हतेच. पण मग तरिही मी इतके सारे अनाकलनीय लेखन का केले? त्याचे उत्तर एकच, मन मोकळे झाले. आता मी निदान नीट विचार करून नव्याने शोध घेऊ पाहत आहे, माझ्या हरवलेल्या "मी"पणाचा! जे हरवले ते कधी गवसेल का कधी मला, मन माझे हे विचारत आहे!!!!

Wednesday, March 11, 2009

बांडगूळ

एखाद्या बांडगुळाप्रमाणे पसरत गेली
ती माझ्या जीवनवृक्षाच्या फांद्यांवर
शोषून घेत माझा जीवनरस सारा
गळा घोटताहेत तिची विषारी मुळे.
कारण फक्त एकच, तिच्यामाझ्यातील समान दुवा
नको होते तिला त्याचे एकत्र सांधणे दोघींनाही,
फक्त स्वतःशीच सांधून घेत त्याला
ती तोडू पाहत होती आमच्यातला दुवा
नष्ट करायचे होते तिला अस्तित्व माझे
निखळवून आमच्यातला एकसंध धागा.
माझ्या दुर्दैवानेही तिलाच साथ दिली,
अन नाकारून मोकळी झाली ती अस्तित्व माझे.
भयव्याकूळ मन माझे वाट 'त्याची' पाहत होते,
पुन्हा सारे सांधण्यासाठी आतुरलेले डोळे होते.
फक्त त्याचीच वाट पाहणार्‍या माझ्या व्याकुळलेल्या डोळ्यांशी,
स्पर्धा करत होते, तिचे कधीचेच सरलेले निरागस बालपण...
मलाच फक्त ठाऊक होता, त्या मोहक चेहर्‍यामागचा विखार,
इतरांना दिसणारे निरागस शैशव तिने कधीचे मागे टाकले होते.
जेव्हा मी व्यक्त केल्या माझ्या भावना ब्लॉगवरील,
सुंदर गुलाबी पार्श्वभूमीवर हळूवारपणे....
तेव्हा ती म्हणाली तिच्या मैत्रिणीला कुत्सितपणे,
"पिंक कलर इज टूऽऽऽ गर्लिश!!!"
जेव्हा केली कोणी माझ्या डिजिटल कॅमेर्‍याची चौकशी, माझ्या स्क्रॅपबुकवर,
तेव्हा तिने लगेच लावून ठेवले तिच्या मोबाईल कॅमेर्‍याचे फो
टो तिच्या अकाऊंटवर.
माझ्या अभिव्यक्तीवर घाला घालून ती, माझ्यावर नजर ठेवत होती,
इंटरनेटवरून माझ्या प्रत्येक गोष्टीशी नकळत स्पर्धा ती करत होती.
झाले तरीही यशस्वी मी त्याच्यापर्यंत पोचण्यात जाहीरपणे
तेव्हा आमचा मौल्यवान ठेवा घेऊन ती पळून गेली अचानकच.
चोरीचा तो ठेवा तिने मिरवला एखाद्या सुवर्णचषकासारखा,
कालांतराने त्या चोरीचा तिने वाढदिवसही साजरा केला.
तेव्हा कचाट्यात पकडले तिला, पण आली 'त्याला' दया
सुटलीही ती तिच्या निरागसतेचे भांडवल करत...
पण तिची सुटका आणि तिने दिलेला जीवघेणा त्रास,
सलतोय आजही मला काट्याप्रमाणे कोंडून माझा श्वास.
मला सलणार्‍या काट्यावर जणू काही ठोकला आहे,
धारदार लोखंडी खिळा त्याने तिच्या सोडवणूकीने...
मला वाईट याचेच वाटतेय, तिला अजून कळलेच नाही,
तिने काय गुन्हा केला, नी त्याचा पश्चातापही झालाच नाही,
काहीही न झाल्यासारखा तिचा अदृश्य वावर माझ्याभोवती,
ह्ळूहळू पाश आवळत आहे असह्य क्लेशाचे मनाभोवती,
काहीही चूक नसतांना गुन्हेगार मी ठरले,
हे कळेल तिला, तेव्हाच असेल सारे संपले.
पण सध्या तरी एखाद्या बांडगुळाप्रमाणेच
ती पसरत आहे माझ्या जीवनवृक्षावर,
शोषून घेत माझा जीवनरस सारा,
तिच्या विखारीपणाने नासवत आनंद माझा!

-D D

Friday, February 20, 2009

"भेट"

ऐकलं होतं तुझ्याबद्दल,
बरंच काही बाही!

तू आहेस घमेंडी नी गर्विष्ठ,
वागण्यात फा
रच शिष्ट

आवडतं तुला नेहमीच
दुसर्‍यांना ओरखडे काढायला

आणि तुझ्या विषारी बोलांनी
दुसर्‍यांना डंख मारायला

स्वतःच्या संपत्तीची घमेंड
निथळते तुझ्या वागण्यातून

तुझ्या रुपाचा गर्व
जाणवतो तुझ्या पोषाखातून

तुला नेहमीच आवडतं,
इतरांना दुखवायला बोलण्यातून

इतरांबद्दलची तुच्छता
जाणवते सतत तुझ्या नजरेतून

एकंदरीत फ़ारशी लोकप्रिय
व्यक्ती नाहीस तू लोकांच्या दृष्टीतून

आजपर्यंत फक्त ऐकलं होतं...
आता प्रत्यक्ष अनुभवलंय...

म्हणूनच ही सदिच्छा भेट देतेय...
हा एक छोटासा आरसा...
ज्यात तुला दिसेल,
इतरांच्या मनाचा कवडसा...

- D D

Wednesday, February 18, 2009

माझ्या काही प्रकाशित कविता

"आम्ही मराठी"च्या दिवाळी २००८ च्या अंकात प्रसिध्द झालेल्या या माझ्या तीन कविता....

"जळीत कांड"

दुपारच्या त्या स्तब्ध शांततेत,
उसळले आगीचे लोट,
त्या गाडीच्या छतावरून
अचानक वेधत लक्ष!

बघेही गांगरले क्षणभर,
दंगलग्रस्त तो परिसर,
तरिही काहीसे अनपेक्षितच
हे सुशिक्षित सुसंस्कृत समाजात!

जराजर्जर भंगार ती गाडी
वर्षानुवर्षे तिथे विसावलेली
भटक्या कुत्र्यांचे निवासस्थान ती
कुणी बरे जाळली असावी?

मग सार्‍यांनी आग विझवली
तोवर आली पोलिसांची स्वारी...
आणि अग्निशमन दलाची गाडी...
अन सुरू झाली रितसर कारवाई

या बंद पडलेल्या गाडीतून
निघाले पेट्रोल टाकी भरून

सार्‍यांचे डोळे विस्फा
रलेले
या गाडीला कधी चालवलेले
एवढ्यात कोणीच नव्हते पाहिलेले
मग गाडीत पेट्रोल का होते भरलेले?

चौकशी झाली अन झाला पंचनामा
लक्षात आला गाडी - मालकाचा कावा
चालू गाडी जळाल्याचे दाखवून विम्याचा दावा करायचा होता
पोलिसांचा अन साक्षीदारांचा सुध्दा त्यात थोडा थोडा शेर होता

दंगल करणार्‍यांचे घेतले फक्त नाव होते
गाडी - मालकाने त्याचे हित त्यात साधले होते.
- D D
*************************************

"कॉल सेंटरच्या विश्वात"

कॉल सेंटरच्या विश्वात मी रमतो
कॉम्प्युटरच्या जगात मी जगतो.

वेळीअवेळी कधीही मी झोपतो
कामाची वेळ झाल्यावर उठतो.

ऑफिसला जायला मी निघतो
धावत धावत बस पकडतो.

माझ्या ग्राहकांशी रोज मी बोलतो
त्यांचे शंकासमाधान मी करतो.

कधी त्यांच्या शिव्याही मी खातो
बोलून बोलून घसा माझा दुखतो.

तरिही सगळ्यांशी गोड मी बोलतो
मधूनच चहाचा ब्रेक मी घेतो.

तेवढीच घशाला विश्रांती मी देतो
पुन्हा कामाला सुरूवात मी करतो.

वेळीअवेळी कधीतरी मी जेवतो
तेव्हा थोडा टाईमपास मी करतो.

घाईत जेवून कामाला मी लागतो
त्यातच बॉसची बोलणी मी खातो.

कधी ग्राहकांचे मनोरंजन मी करतो
घरी जायच्या वेळेची वाट मी बघतो.

जातांना ट्रॅफीक जॅममध्ये मी अडकतो
आठवड्याच्या सुट्टीची वाट मी बघतो.

- D D

*************************************

"शोध"

शोधिले मी तुला कुठे कुठे?
शोधिले मी तुला इथे तिथे...

कमळाच्या पाकळ्यांत,
फुलपाखरांच्या रंगात,

पारिजातकाच्या फु
लात,
पहाटेच्या दवबिंदूत,

सोनचाफ्याच्या सुवासात,
मोरपिसाच्या स्पर्शात,

कोकीळेच्या कूजनात,
निरांजनाच्या ज्योतीत,

गहिर्‍या झाल्या आठवणी
भासासंगे लवे पापणी

ऊनपावसाचा खेळ
चालू झाला हृदयात

अन प्रगटले जाणिवेचे इंद्रधनुष्य
तू माझ्या शोधात अन मी तुझ्या शोधात

आपल्यासाठी खुलले
क्षितिजापलिकडले

मोकळे निळे आकाश!
संपले शोधाचे पाश!

- D D

**********************

Tuesday, February 3, 2009

पुरावा

एकवेळ माणूस खोटं बोलेल,
आणि दडवू पाहिल सत्य, सांगून काहीबाही
पण खोटं बोलणार नाहीत कधीच,
माणसाचे एक्सरेज्‌, ब्लड आणि सोनोग्राफी रिपोर्टस्‌.

जेव्हा 'तो' करतो खोटे आरोप 'तिच्यावर',
लपवून स्वतःचा खोटेपणा जगासमोर,
लिहून घेतो तिच्याकडून कागदावर,
आणि नाकारतो तिचा झालेला छळ जगासमोर.

तो बंद करू पाहतोय तिचा बंडखोर आवाज,
पण एक गोष्ट तो विसरतोय सोयिस्करपणे,
काहीतरी ओरडून सांगत आहेत जगाला
तिचे एक्सरेज्‌, ब्लड आणि सोनोग्राफी रिपोर्टस्‌.

दिवसेंदिवस वाढतच जाणारं त्याचं क्रौर्य,
आणि तिच्या शरीरावर उमटलेल्या त्याच्या अप्रत्यक्ष खुणा,
बनतील अधिकच गंभीर; मग जे फक्त सांगू शकतील जगाला
ते तिचे एक्सरेज्‌, ब्लड आणि सोनोग्राफी रिपोर्टस्‌.

कदाचित ती मरेलही, किंवा रिचवून त्या छळाचे कडूजहर घोट,
राहिल जिवंतच, बनून अधिकाधिक असहाय्य नी विकलांग
पण खोटं बोलणार नाहीत कधीच,
तिचे एक्सरेज्‌, ब्लड आणि सोनोग्राफी रिपोर्टस्‌!!!


-D D