--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Saturday, December 8, 2018

वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक आणि शुभेच्छा!

     गेल्या पूर्ण वर्षात मला अनेकदा प्रवासासाठी रेल्वेचं किंवा बसचं तिकीट आरक्षित करायची वेळ आली, तसंच त्या प्रवासाच्या दरम्यान हॉटेलमध्ये राहण्यासाठीही जागा आरक्षित करावी लागली. हॉटेलमध्ये राहण्यासाठी ज्या कंपनीकडून आरक्षण केलं जात होतं, त्या कंपनीकडून मला प्रत्येक आरक्षणावर बोनस पॉईंट्स मिळत होते. असे पुष्कळ पॉईंट्स साठल्यानंतर त्या कंपनीकडून मला त्या पॉईंट्सच्या बदल्यात काही कूपन्स घेण्याबद्दल सुचवणी करण्यात आली.

        वारंवार पॉईंट्सच्या बदल्यात कूपन्स घेण्याबद्दल सुचवणी करण्यात आल्याने, मी उत्सुकतेने कोणती कूपन्स आहेत, ते पाहिलं आणि कूपन्स घेण्याचा विचार सोडून दिला, त्याला कारणंही तशीच होती. त्या कूपन्समध्ये पिझ्झा आणि तत्सम फास्ट फूडची मागणीनुसार थेट घरी येऊन सुपूर्तता करणाऱ्या काही दुकानांची कूपन्स होती, पण माझ्या परिसरात ती दुकानं सेवा देत नव्हती. त्याशिवाय ज्यांच्याकडून मी भाड्याने गाडी चालवायला नेणार नाही अशा किंवा ज्यांच्याकंडून निव्वळ चांगल्या दर्जाचे आहेत, म्हणून गरज नसतांना महागडे चष्मे आणि गॉगल्स विकत घेणार नाही अशा किंवा इतर काही सेवादाते ज्यांच्या कूपन्सचा मला विशेष उपयोग होणार नाही, अशा विविध सेवादात्यांची कूपन्स तिथे उपलब्ध होती. त्यातल्या त्यात एकच कूपन मला जरा उपयोगी वाटलं. 

        आपण नोंदणी केल्यास त्यानुसार आपल्या वतीने, वाढदिवस किंवा इतर काही विशेष दिवसाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला थेट तिच्या घरी पुष्पगुच्छ किंवा केक किंवा इतर भेटवस्तू पाठवणाऱ्या कंपनीचं ते कूपन होतं. कोणाला असा थेट घरी पुष्पगुच्छ किंवा केक पाठवण्याची कल्पनाच रम्य असल्याने मी उत्सुकतेने त्या कंपनीची सूची पाहिली. पण घरपोच सेवा देत असल्याने त्या कंपनीच्या तर्फे पाठवल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छ आणि केक इत्यादी वस्तूंसाठी मोजावं लागणारं शुल्कही तसंच जास्त होतं. ते पाहून त्या कंपनीचं कूपन घेण्याचा माझा विचार बारगळला. एकतर यापेक्षा कमी किंमतीत चांगले पुष्पगुच्छ किंवा केक मिळू शकतात, शिवाय आपण जेव्हा स्वतः कोणाच्या घरी जाऊन, स्वतः विकत घेतलेल्या पुष्पगुच्छ किंवा केकसहीत शुभेच्छा  देतो, त्याची सर या परस्पर घरपोच दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छ आणि केकला नाही. शिवाय पाठवायचेच झाले, तर असे पुष्पगुच्छ आणि केक पाठवायचे कोणाला, याचा विचार करण्यातच माझा वेळ निघून गेला आणि पॉईंट्सच्या बदल्यात कूपन्स घेण्यासाठीची मुदत टळून गेली. माझे तेव्हढे जास्तीचे पॉईंट्स वाया गेले, पण मला काही त्याची हळहळ वगैरे वाटली नाही.

        त्यानंतर परत माझे जास्तीचे पॉईंट्स साठले. आता मात्र त्या हॉटेलमध्ये आरक्षण करणाऱ्या कंपनीने मला काही सुचवणी वगैरे केली नाही, तर थेट दोन कूपन्स मला पाठवून दिली. त्यातलं एक अर्थातच ज्यांच्या सेवेचा मला काहीही उपयोग नाही, अशा एका सेवादात्याचं कूपन होतं आणि दुसरं कूपन होतं, ते थेट घरपोच पुष्पगुच्छ आणि केक पाठवणाऱ्या कंपनीचं. आता मिळालंच आहे, हे कूपन तर कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्ताने त्या व्यक्तिला पाठवावा एखादा पुष्पगुच्छ, असा विचार मी केला. पण जेव्हा ते कूपन वापरण्यासाठी दिलेल्या अटी पाहिल्या, तेव्हा मी विचारात पडले.

        कूपन वापरण्यासाठी कमीत कमी जितक्या रकमेची खरेदी करावी लागणार होती, ती रक्कम तशी जास्त होती आणि एकाच खरेदीसाठी ते कूपन वापरायचं होतं. ते कूपन वापरण्यासाठी जेवढी मुदत दिलेली होती, त्या मुदतीदरम्यान ज्यांचे कोणाचे वाढदिवस होते, त्यापैकी कोणालाही मी कूपन वापरून पुष्पगुच्छ आणि त्याबरोबर केक किंवा इतर काही भेटवस्तू पाठवल्या असत्या, तरी ते सगळं पाहिल्यावर ज्या व्यक्तिला ते पाठवलं आहे, त्या व्यक्तिला त्याने उगीचच कानकोंडं झालं असतं, कारण इतर वेळी शक्यतो शुभेच्छाच दिल्या जातात, क्वचित विशेष काही निमित्ताने पुष्पगुच्छ दिला जातो. आता अचानक कोणाला असं सगळं एकत्र घरपोच पाठवलं असतं, तर ते विचित्र वाटलं असतं. त्यामुळे इतर कोणासाठी ते कूपन वापरायचा विचार रद्द झाला. मग आता त्या कूपनचं करायचं काय?

        विचार करता करता मला आठवलं, की त्या मुदतीदरम्यान माझाही वाढदिवस आहे. कदाचित म्हणूनच त्या कंपनीने मला काही न विचारता, थेट ते कूपनच मला पाठवून दिलं असावं. आता मी ते असंही दुसऱ्या कोणाकरता वापरू शकत नाही, तर ते वाया न घालवता माझ्याकरता का वापरू नये. तसंही गेली काही वर्षे माझा वाढदिवस घरातच साजरा होत असतो, वाढदिवसाच्या दिवशी हल्ली ठरवूनही बाहेर फिरायला जाणं होत नाही किंवा हॉटेलमध्येही जाणं होत नाही आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा, नाटक बघणे हे गेल्या काही वर्षात अगदीच कमी झालं आहे, हल्ली सिनेमे घरीच पाहिले जातात. त्यामुळे आपणच आपल्या वाढदिवसाला हवा तो केक मागवावा आणि आपला वाढदिवस साजरा करावा, तसंही त्यानंतर लगेच पुढे असणाऱ्या एका लग्नाच्या निमित्ताने काही नातेवाईक घरी आलेले असतील, तर त्यांनाही त्या केकची चव बघायला मिळेल, असा विचार तर केला आहे. पुढे काय होतं ते बघू.

        एरवी रम्य वाटणाऱ्या कल्पना जेव्हा वास्तवात उतरतात त्या ह्या अशा वास्तवाचं खडबडीत लेणं लेवून!
           

Friday, October 5, 2018

दांभिकतेचे मेरूमणी

        मी शाळेत शिकत असतानांची गोष्ट, एक दिवस माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ओळखीचे एकजण आले. त्यांनी माझ्या वडिलांना एका संघटनेचं सदस्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. ही समाजोपयोगी उपक्रम चालवणारी संघटना मूळ पाश्चात्य देशात स्थापन झालेली होती आणि नंतर त्या संघटनेच्या शाखा जगभर पसरलेल्या होत्या. विविध क्षेत्रातल्या लोकांनी त्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन, परस्परांच्या सहकार्याने काही समाजोपयोगी उपक्रम राबवून, त्याद्वारे समाजसेवा करून सर्वांची उन्नती साधावी अशा काहीशा प्रकारची त्या संघटनेची तत्त्वं होती. माझ्या वडिलांनी त्या संघटनेविषयी काही प्राथमिक माहिती घेऊन, त्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारण्यासाठी अर्ज भरून दिला. पुढे यथावकाश त्यांना त्या संघटनेचं सदस्यत्व मिळालं. त्यांचं सदस्यत्व एका वर्षापुरतं होतं, ते वर्ष संपत आल्यावर वडिलांनी पुन्हा त्या संघटनेच्या सदस्यत्वासाठी अर्ज भरायचा नाही, असा निर्णय घेतला. कारण तिथे समाजसेवा, समाजोपयोगी उपक्रम ह्यापेक्षाही सगळ्यांपुढे आपला बडेजाव मिरवण्याला काही लोक जास्त महत्त्व देत होते. त्यामुळे त्यांना त्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारावंसं वाटत नव्हतं. त्यातून नकळत त्या संघटनेची एक वेगळीच बाजू माझ्या समोर आली होती.

        अर्थात अशा प्रकारचं काम करणारी काही ती एकमेव संघटना नव्हती. पाश्चात्य देशात मूळ असलेल्या आणि पूर्णपणे पाश्चात्य विचारप्रणालीचा प्रभाव असलेल्या, समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या अशा काही संघटना भारतात आपले पाय रोवून भक्कमपणे उभ्या आहेत. अशा संघटनांचं सदस्यत्व घेणं, ही पूर्वी एक प्रतिष्ठेची बाब मानली जात होती, हल्ली काय परिस्थिती आहे, हे मला माहिती नाही.

        आधी उल्लेख केलेल्या त्या घटनेनंतर साधारण तेराचौदा वर्षांनी मला अशाच एका संघटनेतर्फे त्यांच्या एका शाखेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा योग आला. अर्थात त्या संघटनेशी माझा थेट काहीच संबंध नव्हता. माझ्या एका मैत्रिणीला त्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, त्यांच्या मुख्य कार्यक्रमासोबत एक सादरीकरण करायचं होतं आणि त्यासाठी तिला माझी मदत हवी होती. त्या मैत्रिणीचाही त्या संघटनेशी थेट काहीच संबंध नव्हता. तिच्या नात्यातल्या कोणीतरी बाई त्या संघटनेच्या सदस्य होत्या आणि सादरीकरणाबद्दल त्या दोघींचं काही बोलणं झालेलं होतं. त्यावेळी मैत्रिणीला मदत करण्याच्या हेतूने मी तिथे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला तयार झाले. पण प्रत्यक्ष कार्यक्रमात आलेला अनुभव इतका निराशाजनक होता, की मला त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी असं वाटत राहिलं, की 'मी इथे यायला नको होतं. मी चुकीच्या ठिकाणी आलेले आहे.' संघटनेच्याच सभागृहात झालेला तो कार्यक्रम संपल्यावर  तिथल्या त्या तथाकथित सेवाभावी सदस्यांना घरी जाण्याची इतकी घाई झालेली होती, की आमचं सादरीकरणाचं साहित्य उचलून बाहेर न्यायच्या आत त्यांच्याकडून तिथले लाईट फटाफट बंद केले गेले आणि तिथे अंधार पसरला. तिथून ते साहित्य बाहेर आणून रिक्षात चढवता आलं, ते केवळ तिथे बाहेर बागेत असलेल्या एका माळ्याच्या मदतीमुळेच. पण आधीच्या त्या तिडीक येणाऱ्या एकंदर प्रसंगानंतर मला परत कधी अशा तथाकथित सेवाभावी संघटनांकडे फिरकण्याचीही इच्छा झाली नाही.

        आता पुन्हा इतक्या वर्षांनंतर या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे सोशल मिडियावर येणारे फ्रेंड सजेशन्स, पेज सजेशन्स इत्यादी. काही लोक आपल्या ओळखीचे असतात, आपण त्यांना पूर्वी प्रत्यक्ष भेटलेलो असतो, पण ते सोशल मिडियावर आपल्या मित्रयादीत असतातच असं नाही. तरीही त्यांचा फोननंबर, ईमेल आपल्या संपर्क यादीत साठवलेला असतो, कधीतरी आपण त्यांना फोन केलेला असतो, मेसेज पाठवलेला असतो, ईमेल किंवा मेसेंजरवर संपर्क साधलेला असतो. गुगल, फेसबुक इत्यादी सोशल वेबसाईटसाठी इतकी गोष्ट पुरेशी असते आणि मग आपल्या अकाऊंटवर त्या लोकांचे प्रोफाईल्स फ्रेंड सजेशन्स मध्ये दिसत राहतात. त्या लोकांनी लाईक केलेले पेज, ग्रुप्स इत्यादी आपल्या सजेशन्समध्ये दिसत राहतात. अशा लोकांनी वर उल्लेख केलेल्या तथाकथित सेवाभावी प्रतिष्ठित संघटनांचं सदस्यत्व घेतलेलं असतं. आणि त्यामुळे अशा संघटनांची पेजेस किंवा ग्रुप आपल्या सजेशन्स मध्ये दिसत राहतात. 

        त्या पेजवर आपल्या ओळखीचे नसणारे काही अतिउत्साही लोक रोज काहीतरी पोस्ट करत राहतात आणि त्यांनी काहीतरी नवीन पोस्ट टाकली, की ते पेज सारखं आपल्या सजेशन्सच्या यादीत दिसत राहतं. कधी तिथे नवीन फोटो टाकलेला असतो, तर कधी अजून काहीतरी लिहून पोस्ट केलेली असते. इतकंच करून ही अतिउत्साही मंडळी थांबत नाहीत, तर संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात ढीगभर फोटो घेणे, मग त्या ढीगभर फोटोंचे कोलाज बनवणे आणि ते सर्वच्या सर्व फोटो (मग त्यातले काही फोटो लहान केल्याने कितीही वाईट का दिसेनात आणि त्यात चिंटुकल्या दिसणाऱ्या व्यक्तिंचे चेहरे कितीही वेडेवाकडे का दिसेनात, तरीही ते सर्व फोटो) आणि व्हिडिओ त्यांच्या संघटनेच्या गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सर्व अकाऊंटवर, पेजवर, ग्रुपवर टाकणे आणि ते शेअर करणे, मग परत तिथे काहीतरी मजकूर लिहून ते पुन्हा शेअर करणे, मग संघटनेच्या सदस्यांना आणि इतर मित्रमंडळींना त्यात टॅग करून पुन्हा ती पोस्ट शेअर करणे आणि बघा आम्ही कशा पद्धतीने लोकांना मदत करतो हे मिरवणे इथपर्यंत ह्या लोकांचा उत्साह थांबत नाही. 

        हे 'उथळ पाण्याला खळखळाट फार' प्रकारचे लोक तेच फोटो पुन्हा आपल्या अकाऊंटवरून शेअर करून सर्व सदस्यांना त्यात टॅग करून, ती पोस्ट शेअर करून त्यांनी समाजासाठी किती योगदान दिलंय, किती लोकांना कशा प्रकारची मदत केलीये, ह्याचा टेंभा मिरवतातच, पण पुन्हा सहा महिन्यांनी तीच पोस्ट शेअर करून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी गरजू लोकांना कशी मदत केली होती, हे पुन्हा मिरवतात. पुन्हा मूळ घटनेला वर्ष झालं, की त्या घटनेची वर्षपूर्ती म्हणून पुन्हा तीच पोस्ट शेअर करून पुन्हा मिरवतात. पुन्हा दोन किंवा तीन किंवा पाच वर्षांनी तीच पोस्ट शेअर करून पुन्हा मिरवतात. अशा लोकांच्या प्रोफाईलवर तर अशा मिरवणाऱ्या पोस्ट्चा मारा दिसतोच, पण कधी चुकून आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर गेलो, तर तिथे त्या व्यक्तीने केलेल्या काही पोस्ट दिसतच नाहीत, मात्र अशाच 'उथळ पाण्याला खळखळाट फार' व्यक्तींनी त्यांना टॅग केलेल्या पोस्ट्स दिसत रहातात आणि त्या किती, तर एक, दोन, तीन, पाच, सात, दहा, अकरा, पंधरा.....  अशा एकामागोमाग एक दिसणाऱ्या पोस्ट्सची माळका संपतच नाही. एकपट करून दसपट मिरवणाऱ्या, एखाद्याला ओ येईल इतक्या संख्येने असलेल्या त्या पोस्ट्स पाहून तिरस्कार, घृणा, संताप यांनी मन भरून जातं. 

        ज्या गरजू माणसाने चुकून अशा मिरवणाऱ्यांकडून मदत घेतलेली असेल, त्याला हे मिरवणं पाहून काय वाटेल याचा विचारही हे लोक करतांना दिसत नाहीत. एखाद्या दानशूर माणसाने गरजू व्यक्तीला मदत दिली आणि एकदा, दोनदा नव्हे तर वारंवार त्याला, 'मी तुला मदत केली' असं बोलून दाखवलं, तर त्या माणसाचा आत्मसन्मान निश्चितच दुखावेल आणि त्याला नको ती मदत आणि उपकार, पण मिरवणं आवरा असं होऊन जाईल. तेच ह्या वारंवार शेअर केलेल्या पोस्ट्समधून होईल. जर मदत करणाऱ्यांच्या अशा दांभिक वागण्यामुळे त्यांनी केलेल्या मदतीचं समाधान गरजू व्यक्तीला मिळणार नसेल, तर त्या केलेल्या मदतीचा काय उपयोग आहे? 

        बरं, ज्या व्यक्ती अशा वारंवार मिरवत आहेत, त्यांना निव्वळ त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणून कधी मदतीची आवश्यकताच भासणार नाहीये असं वाटतं का? पण वेळ कधी कोणावर सांगून येत नाही. विशेष करून भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात ह्यांचा फटका कोणालाही बसू शकतो. पावसाच्या पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरतांना असा विचार करत नाही, की 'ह्या गरिबांच्या झोपड्या आहेत, इथे शिरावं, हे मध्यमवर्गीय आहेत, ह्यांना फारसा त्रास देऊ नये आणि हे उच्चभ्रू श्रीमंत लोक आहेत, ह्यांच्या तर वाटेलाही जाऊ नये.' असं होत नसतं. पुराचं पाणी पसरतांना सखल भागात सगळीकडे पसरतं, त्याला गरीब श्रीमंत भेद नसतो. तीच गोष्ट इतर नैसर्गिक आपत्ती आणि अपघातांची. मग हे मिरवणारे लोक कशाच्या जीवावर त्यांचा तथाकथित मोठेपणा वारंवार वारंवार मिरवत असतात? आणि जर चुकून कधी त्यांच्यावर कोणाची मदत घेण्याची वेळ आली आणि जर त्यांना मदत करणाऱ्यांनी ती मदत अशीच वारंवार वारंवार मिरवून दाखवली, तर ह्यांना त्या मिरवण्याचा आनंद वाटेल का? पण हा काहीएक विचार न करता, प्रत्येक गोष्ट दसपटीने मिरवून दाखवायची जणू ह्या लोकांना हौसच असते. 

        मिरवणारे तर मिरवतात, पण ते पाहून असं वाटतं, की आपल्या ओळखीचे असलेले लोक हा सगळा मूर्खपणा का सहन करतात? मुळात त्यांना गरज काय होती अशा तथाकथित सेवाभावी संघटनेचं सदस्यत्व घ्यायची? अशा संघटनेत होणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टी त्यांना पटतात का? आणि पटत नसतील, तरी त्याठिकाणी हाताची घडी घालून शांतपणे बसण्यात त्यांची अशी काय मजबुरी असते? का ते मिरवणाऱ्या 'उथळ पाण्याला खळखळाट फार' लोकांना तोंड उचकटून सांगत नाहीत, की 'मी या मिरवण्यात सहभागी नाही. त्यामुळे माझे सर्व फोटो या सर्व सोशल वेबसाईटवरून ताबडतोब डिलीट करा आणि मला कुठेही टॅग करू नका.' आणि ते अशा दांभिक संघटनेतून बाहेर पडत नाहीत? संघटनेतून बाहेर पडण्याने त्यांच्या तथाकथित प्रतिष्ठेला धक्का बसणार असतो, इतकी तकलादू असतात का ही माणसं? इतकी कशाने बदलतात माणसं, की त्यांना असं वाटत असतं, की अशाप्रकारे मिरवून ते पराकोटीची समाजसेवा करताहेत? स्वतःच्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेली माणसं आपल्या क्षमता अशा दांभिक ठिकाणी वाया का घालवतात? की त्यांनाही असं मिरवायलाच आवडत असतं?'

        उपकार करतात का ही एकपट करून दसपट मिरवणारी तथाकथित दानशूर मंडळी गरजू लोकांवर? उपकाराच्या भावनेने मिरवत केलेल्या दानापेक्षा, कोणतीही अपेक्षा न ठेवता या हाताने केलेलं त्या हाताला कळू न देता केलेलं दान कितीतरी श्रेष्ठ वाटतं मला, निदान ते कोणाच्या आत्मसन्मानाला तरी ठेच पोहोचवत नाही. अशा प्रकारे एक शब्दाचीही प्रसिद्धी न करता, अजिबात न मिरवता गरजू लोकांना मदत करणारेही अनेकजण असतात. त्यांनी ज्यांना मदत केलेली असते, त्यांच्या तोंडून इतरांना ह्या लोकांविषयी ऐकायला मिळतं, स्वतः त्या लोकांकडून नाही. त्यातल्या काही जणांच्या तर सोशल वेबसाईटवरच्या अकाऊंटवर त्यांचा एकही फोटो लावलेला नसतो किंवा दुसऱ्या कोणी शेअर केलेला नसतो, तरीही त्यांचं काहीही अडत नाही. त्यांचं काम त्यांच्या परिने चालू असतं.

        मदत करायचीच झाली, तर ती विशिष्ट संघटनांच्या माध्यमातूनच करता येते, असं काही नसतं. आपल्या ओळखीतल्या किंवा आपल्या ओळखीतल्या लोकांनी सुचवलेल्या गरजू लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांची अडचण जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना मदत करता येतेच की. त्यासाठी कुठल्या तरी तथाकथित सेवाभावी संघटनेचं सदस्यत्व घेऊन उठसूट मिरवत दांभिकतेचे मेरुमणी होण्यापेक्षा अज्ञातातला कृतार्थ सेवाभाव जपण्यात जास्त आनंद आहे.

Monday, April 16, 2018

पिचकारी - Spathodea campanulata

     मूळचा परदेशी असलेला पिचकारी नावाचा हा शोभिवंत वृक्ष भारतात चांगलाच स्थिरावलेला आहे. परदेशी झाडावर पक्षी फार वावरतांना दिसत नाहीत, मात्र मला या झाडावर कधीकधी पोपटांचा थवा येऊन बसलेला दिसला आहे. त्याशिवाय चिमण्या, कावळे, सूर्यपक्षी, बुलबुल इत्यादी पक्षीही कधीकधी या झाडावर आलेले दिसले आहेत. त्यामुळे या झाडाचं परदेशीपण आधी जाणवलंच नव्हतं; नजरेत भरली होती, ती त्याची लालकेशरी भडक रंगाची फुलं!

     ब्लॉगची साफसफाई करतांना काळानुसार संदर्भहीन झालेल्या जुन्या पोस्ट्स उडवतांना दिसलेले हे फोटो, पुन्हा नव्याने पोस्ट करत आहे. 
        

मराठी नाव - पिचकारी

Common name - African tulip tree, Fountaintree

Botanical name - Spathodea campanulata

Family - Bignoniaceae (Jacaranda family)


*********

***

Wednesday, February 15, 2017

बदल

     मी गेली काही वर्षं एकच मोबाईल क्रमांक वापरत होते, या काळात माझ्या मोबाईलची मॉडेल्स बदलली गेली, मात्र माझ्या मोबाईलचा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मोबाईलचा क्रमांक हे दोन्ही न बदलता, होते तेच कायम राहिले. बाकीच्या लोकांचे मोबाईल क्रमांक आणि मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर हे दोन्ही सारखे सारखे बदलत असतांना मी मात्र माझ्या आहे त्या मोबाईल क्रमांकावर आणि मोबाईल सर्व्हिसवर समाधान मानून त्यात कधी बदल करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नव्हता. पण नुकतंच मोबाईलचं नवीन मॉडेल घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की काही तांत्रिक अडचणींमुळे मला माझ्या मोबाईलचा क्रमांकच बदलावा लागणार आहे. 'आता नवीन मोबाईल क्रमांक घ्यायचा, तर त्याबरोबरच सर्व्हिस प्रोव्हायडर का बदलू नये? तो आता बदललाच पाहिजे,' असा आग्रहही मला केला गेला. शेवटी जो अगदी सुलभपणे उपलब्ध झाला, तो नवीन मोबाईल क्रमांक मी दुसऱ्या एक सर्व्हिस प्रोव्हायडरकडून घेतला. त्यामुळे आता माझा मोबाईल क्रमांक कायमचा बदलला गेला आहे. माझा आधीचा क्रमांक आता वापरात राहणार नाही.

     मी ज्यांच्याशी कायम संपर्कात असते ते आणि जे माझ्याशी संपर्क साधतात अशा बहुतेकांना मी माझा बदललेला मोबाईल क्रमांक कळवलेला आहे. पण त्याव्यतिरिक्त या ब्लॉगचे काही वाचक, काही ब्लॉगर आणि इतर काहीजण यांनाही मी माझा आधीचा मोबाईल क्रमांक दिलेला होता, त्यापैकी काहीजणांनी एखादा अपवाद वगळला, तर माझ्याशी मोबाईलवर कधीच संपर्क साधला नाही आणि मीही त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला नाही, अशा सर्व लोकांनी कृपया नोंद घ्यावी, की माझा मोबाईल क्रमांक आता बदलला आहे आणि माझा आधीचा मोबाईल क्रमांक आता वापरात राहणार नाही, तरी माझा आधीचा मोबाईल तुमच्या यादीतून काढून टाकावा. आवश्यकता भासल्यास माझ्या सोशल वेबसाईटवर असलेल्या प्रोफाईलचा उपयोग करून तुम्हांला माझ्याशी संपर्क साधता येईल.

     धन्यवाद!                  

Wednesday, December 21, 2016

स्पष्टीकरण

      मी या ब्लॉगवर आत्तापर्यंत जे काही लिहिलं आहे, त्यात काही प्रवासवर्णनांचाही समावेश आहे. त्यातलं अगदी अलीकडचं प्रवासवर्णन होतं अंदमानच्या ट्रीपचं. अंदमानच्या आधी मी ज्या एका जास्त कालावधीच्या ट्रीपला गेले होते, त्या केरळच्या ट्रीपमध्ये मनाला खिन्न करणारे काही अनुभव आल्यानंतर, त्या ट्रीपच्या पार्श्वभूमीवर अंदमानच्या सुरळीत ट्रीपचा अनुभव मला आनंददायी वाटणं साहजिकच होतं. शिवाय अंदमानचं नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता, तिथल्या पर्यावरणाची काळजी घेत तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आणि मुख्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी असणारा सेल्युलर जेल, रॉस बेट यांचा संबंध आणि तिथे देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेलं योगदान या कारणांमुळेही मी या ट्रीपचं विस्तृत प्रवासवर्णन लिहिलं आणि त्यासोबत अनेक फोटोही पोस्ट केले. माझी ही ट्रीप एका मोठ्या ग्रुपबरोबर झालेली असल्याने या ट्रीपच्या प्रवासवर्णनात त्यातल्या काही जणांचे किस्से येणं अपरिहार्य होतं. अशावेळी त्या सहप्रवाशांबद्दल लिहितांना, ही ट्रीप आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचा उल्लेखही न करता हे प्रवासवर्णन लिहिणं सर्वस्वी अनुचित ठरलं असतं, त्यामुळे साहजिकच त्या ट्रॅव्हल कंपनीचा आणि तिच्या संचालकांचाही मी आवश्यक तिथे, इतर सहप्रवाशांप्रमाणेच उल्लेख केला. (त्याआधीही अगदी मोजक्या लोकांसोबत केलेल्या माझ्या केरळ ट्रीपच्या प्रवासवर्णनात, केरळमध्ये आम्हांला ट्रीपची सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा मी उल्लेख केलाच होता, पण एक ड्रायव्हर सोडला, तर त्या कंपनीशी आमचा थेट संबंध आला नसल्याने, तो उल्लेख अगदी त्रोटक होता.) अंदमानच्या ट्रीपचं प्रवासवर्णन लिहितांना त्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या वाहतुकीच्या सोयी, राहण्याच्या सोयी, तिथल्या विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आणि इतर सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क, तिथे विकत मिळणाऱ्या काही विशेष गोष्टी, तसंच ट्रॅव्हल कंपनीच्या दिल्या जाणाऱ्या सोयी, इत्यादी गोष्टींचा या प्रवासवर्णनात उल्लेख करण्याचं एकमेव कारण हेच होतं, की तिथे ट्रीपला जाणार असलेल्या वाचकांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा. (माझ्या आधीच्या प्रवासवर्णनातही मी ठिकठिकाणी असे उल्लेख केलेले आहेत.) मात्र मी इथे हे स्पष्ट करते, की 'अंदमानच्या ट्रीपचे हे प्रवासवर्णन म्हणजे कोणाचीही जाहिरात नसून, माझं वैयक्तिक मत व्यक्त करणारं लेखन आहे आणि मी इथे हे प्रवासवर्णन लिहिल्याबद्दल अंदमानचा पर्यटन विभाग, अंदमानची ट्रीप आयोजित करणारी ट्रॅव्हल कंपनी आणि तिचे संचालक, प्रवासवर्णनात उल्लेख आलेली विमान कंपनी आणि तिचे व्यवस्थापन, हॉटेल्स आणि हॉटेल्सचे व्यवस्थापन, विक्रेते, पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन इत्यादींपैकी कोणीही मला वस्तू अथवा मूल्यस्वरूपात कोणतंही मानधन दिलेलं नाही, अथवा मी हे प्रवासवर्णन लिहावं अशी सूचनाही केलेली नाही. तसंच मी हे प्रवासवर्णन लिहिलेलं आहे, याची कल्पनाही मी उपरोल्लेखित व्यक्तींना दिलेली नाही. तरी सदर प्रवासवर्णन हे कोणाचीही जाहिरात म्हणून लिहिलेलं नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.'

     हे सर्व स्पष्ट करण्याचं कारण म्हणजे एका फेसबुक ग्रुपमधला मला आलेला अनुभव! मी फेसबुकवरच्या 'वाचा, लिहा.. वाचा.' या ग्रुपचं सदस्यत्व घेतलेलं होतं. तेव्हा या ग्रुपच्या पेजवर, या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत याबद्दल काहीही लिहिलेलं नव्हतं. ग्रुपमधल्या बऱ्याचशा पोस्ट्स ह्या पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल मतं व्यक्त करणाऱ्या होत्या, पण काही ब्लॉगलेखकांनी त्यांच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्सही तिथे दिलेल्या होत्या. ते पाहून, इतर ग्रुपप्रमाणे याही ग्रुपमध्ये ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स दिल्या तर चालतील, असा माझा समज झाला. त्यामुळे माझ्या अंदमानच्या ट्रीपबद्दलच्या ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक्स मी इतर ग्रुपबरोबर, त्याही ग्रुपमध्ये देत गेले. प्रवासवर्णनाचे मोठे लेख त्यांच्या फोटोसकट ग्रुपमध्ये टाकण्याऐवजी ब्लॉगची लिंक देणं मला जास्त सोयिस्कर होतं. 

     एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या कालावधीत मी त्या पोस्ट्स लिहिल्या आणि पोस्ट्स लिहिल्यावर त्यांच्या लिंक्स ग्रुपमध्ये दिल्या. त्या दरम्यान बहुधा त्याच ग्रुपमध्ये एका वाचकाने मला उपरोल्लेखित ट्रॅव्हल कंपनीच्या फोन नंबरची विचारणा केली आणि मी त्या वाचकाला त्या ट्रॅव्हल कंपनीच्या फेसबुक पेजची लिंक देऊन तिथे फोन नंबरची विचारणा करायला सांगितली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रवासवर्णनातली माझ्या शेवटच्या पोस्टची लिंक तिथे दिल्यानंतर, दुसऱ्या एका वाचकाने "या ग्रुपमध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट्स अपेक्षित आहेत?" अशी शंका विचारली.  ग्रुपच्या एक ऍडमिन 'प्रीति आपटे उमा निजसुरे' यांनी त्याचं उत्तर देतांना सांगितलं, की "इथे फक्त आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे. कथा, लेख चालतील. कविता नको." त्यावेळी त्यांनी त्याच पोस्टच्या खाली असलेल्या माझ्या ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट चालेल की नाही यावर कोणतंही भाष्य केलं नाही किंवा माझ्यासकट इतर कोणाचीही ब्लॉगची लिंक असलेली पोस्ट काढून टाकली नाही. त्यामुळे ब्लॉगची लिंक दिलेली पोस्ट ऍडमिननी 'लेख' या प्रकारात गृहीत धरली असावी, असा माझा समज झाला. त्यावेळी त्यांनी तशी काही सूचना केली असती, तर मी ताबडतोब माझ्या ब्लॉगच्या लिंक्स काढून टाकल्या असत्या.  
     
     नंतर अचानक चार महिन्यांपेक्षाही जास्त काळ उलटून गेल्यानंतर, २० डिसेंबरला दुसऱ्या एक ऍडमिन 'Yogini Nene' यांनी त्या वाचकाच्या शंकेचं उत्तर देत स्पष्ट केलं, की "इथे वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल लिहिणं अपेक्षित आहे." अचानक ती जुनी पोस्ट वर आलेली पाहून मी ग्रुपचं पेज ओपन केलं आणि सहज खाली स्क्रोल करत गेले, तेव्हा तिथे माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कथेच्या ब्लॉगपोस्टची लिंक सोडून इतर सर्व म्हणजे अंदमानच्या ट्रीपच्या ब्लॉगपोस्ट्स दिसेनाशा झालेल्या होत्या. सर्चमध्ये शब्द देऊनही त्या पोस्ट्स दिसेनात, तेव्हा त्या पोस्ट्स डिलीट केलेल्या असाव्यात, असा मी अंदाज बांधला. मात्र इतर ब्लॉगलेखकांच्या, लेख म्हणता येईल अशा ब्लॉगपोस्ट्सच्या लिंक ग्रुपमध्ये तशाच दिसत होत्या. मग ऍडमीननी ग्रुपचे नियम बदलले आहेत का, हे पाहण्यासाठी मी साईडबारमध्ये दिलेल्या ग्रुपच्या वर्णनावर नजर टाकली, तर तिथे काही बदल झालेले दिसले. ग्रुपच्या वर्णनात लिहिलेलं होतं, की "पुस्तकं वाचा, त्यांच्याबद्दल परिचयवजा पोस्टस् लिहा.. आणि इतरांच्या वाचा. (इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)"

     ऍडमिननी त्यांच्या अधिकारात ग्रुपचे नियम बदलून पोस्ट्स डिलीट करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता, परस्पर माझ्या पोस्ट्स डिलीट झाल्या, त्याचवेळी ग्रुपच्या नियमात खास कंसात सूचना दिली गेली, की "(इथे उत्तम साहित्याबद्दल गप्पा होणं अपेक्षित आहे. जाहिरातवजा पोस्टस् टाकू नयेत.)" हे पाहून ती कंसातली सूचना माझ्यासारख्यांसाठीच आहे, हे मला अगदी स्पष्ट जाणवलं. ऍडमिन 'Yogini Nene', "माझं लिखाण म्हणजे उत्तम साहित्य आहे, असा माझा दावा कधीच नव्हता, मात्र माझ्या प्रवासवर्णनाच्या लेखातला प्रवासवर्णन नावाचा साहित्यप्रकार साहित्य म्हणून तुम्हांला दिसूच नये आणि त्यात फक्त (मी एक पैसाही न घेतलेली) जाहिरात तुम्हांला दिसावी याचं मला सखेद आश्चर्य वाटतं. यावरून मी एक बोध घेतला, की मला साहित्यातलं ओ की ठो काही कळत नाही आणि साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी मला अजून बराच अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळे अपुऱ्या अभ्यासानिशी लिहिलेलय माझ्या 'नाळ' या कथेची लिंकही मी या अभ्यासू ग्रुपमधून डिलीट करत आहे, उगीच माझ्या या कथेचं ठिगळ तुमच्या उत्तम साहित्याविषयी गप्पा मारणाऱ्या ग्रुपमध्ये नको. तुम्ही मला कोणतीही पूर्वसूचना न देता माझ्या पोस्ट्स डिलीट केल्या, त्यामुळे मीही तुम्हांला कोणतीही पूर्वसूचना न देता, तुमच्या ग्रुपमधली महत्त्वाची जागा माझं फालतू मतप्रदर्शन करण्यासाठी वाया न घालवता, या ग्रुपमधून बाहेर पडले आहे आणि मला जे काही मत मांडायचं आहे, ते या ब्लॉगवर मांडलं आहे. आजपर्यंत माझा असा समज होता, की फक्त पेड पोस्टच्याच शेवटी ती जाहिरात आहे, असं स्पष्ट करायचं असतं, पण आता तुमच्यामुळे हेही नव्याने कळलं, की जाहिरात म्हणून जी पोस्ट लिहिलेली नाही, अशाही पोस्टच्या शेवटी, 'ही पोस्ट म्हणजे जाहिरात नाही' हे स्पष्ट लिहायचं असतं. माझ्या अपुऱ्या ज्ञानात ही अमूल्य भर घातल्याबद्दल धन्यवाद! याबद्दल तुमचे कसे आभार मानावे हेच कळत नाही."

- जाहिरात नसूनही जाहिरातवजा पोस्ट्स टाकणारी माजी सदस्य.