मंगळवार, २७ सप्टेंबर २०११ चा दिवस, सकाळची वेळ... बहुधा ९ वाजले होते, आई गॅलरीत काहीतरी करत होती. अचानक तिने मला हाक मारली आणि म्हणाली, की "लिलीच्या पानावर कसलीतरी वेगळीच कीड पडली आहे, ती काढायची का? बघ जरा." म्हणून मी गॅलरीत गेले आणि पाहिलं, तर लिलीचं एक पान ग्रीलच्या बाहेर डोकावत होतं, आणि त्या पानाच्या खालच्या बाजूने एक लांबट कोळ्याचं जाळं पसरलं होतं.... त्या जाळ्यावर बारीक बारीक पांढरे ठिपके दिसत होते, काही ठिपके पानाच्या खालच्या बाजूवरही होते... ते ठिपके चक्क हलत होते. मी ते नीट निरखून पाहिलं आणि आईला म्हणाले, "अगं, ही कोळ्याची पिल्लं आहेत. नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली असणार, कारण सकाळी सात वाजता मी लिलीच्या शेजारच्या झाडाची वाळकी पानं काढून टाकली, तेव्हा मला तिथे जाळ्याशिवाय काही दिसलं नव्हतं."
मी परत एकदा त्या जाळ्याकडे नीट पाहिलं, पण मला तिथे कोळ्याची मादी दिसली नाही. ती पिल्लं मात्र भरपूर म्हणजे सुमारे अडीचशे ते तीनशेपेक्षाही जास्त होती. पांढरट रंगाची ती पिल्ले आकाराने अगदी लहान म्हणजे १ मि.मी. पेक्षाही कमी व्यासाची होती. त्या जाळ्यावरून दूर जाण्यासाठी त्या पिल्लांची लगबग चालू होती. थोड्याच वेळात ती पिल्ले जाळ्यावरून दिसेनाशी झाली असती. अर्थात इतक्या पिल्लांपैकी जेमतेम दोनतीनच पिल्लांची शेवटी पूर्ण वाढ होऊन त्यांचे प्रौढावस्थेत रूपांतर होते, बाकीची पिल्ले भक्षकांचे भक्ष्य बनून अकालीच मरतात.
अंड्यातून बाहेर पडलेली कोळ्याची पिल्लं आणि तीही इतकी, मी पहिल्यांदाच पाहत होते. म्हणून पिल्लांचा फोटो काढायला मोबाईल घेऊन आले, पण मोबाईलमध्ये नीट फोटो येत नव्हता. माझा डिजीटल कॅमेरा बर्याच दिवसांत न वापरल्याने त्याचेही सेल चार्ज केलेले नव्हते. पण कमी व्होल्टेजचे दुसरे सेल नुकतेच चार्ज केलेले होते, ते कॅमेर्यात टाकून बघितले आणि कॅमेरा चालू झाला. मग मॅक्रो लेन्स वापरून मी त्या पिल्लांचे फोटो काढले. ती पिल्लं भरभर इकडून तिकडे जात असल्याने फोटो माझ्या अपेक्षेइतके सुस्पष्ट आले नाहीत, पण माझ्या कॅमेर्यात ह्या जैविक घटनेची नोंद मात्र झाली.

ह्यानंतर तीनच दिवसांनी ३० तारखेला दुपारी, अचानक माझे लक्ष खिडकीबाहेर गेले. चिमणीपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा, हिरव्या पाठीचा, डोक्यावर तांबडा ठिपका असलेला एक पक्षी समोरच झाडाच्या फांदीवर बसून झाडाच्या ढोलीतली साल खात होता. तो पक्षी मी पहिल्यांदाच पाहत होते. यावेळी कॅमेरा माझ्या शेजारीच होता आणि त्याचे सेलही चार्ज करून कॅमेर्यात टाकलेले होते. मी कॅमेरा घेतला आणि हळूच खिडकीजवळ गेले. अजूनही तो पक्षी तिथे आरामात बसला होता. माझ्या कॅमेर्याला टेलिफोटो लेन्स नसल्यामुळे, मी कॅमेर्यावर लॅंडस्केपचे सेटींग केले आणि खिडकीच्या जाळीच्या आतून त्या पक्ष्याचे फोटो काढले. फोटोमध्ये एक्स्पोजर जरा जास्तच आले, पण पक्षी स्पष्ट दिसतोय. मला तो तांबट (Megalaima haemacephala indica) पक्षी असावा असे वाटत होते, नंतर इंटरनेटवर शोध घेतल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा पक्षी आमच्या इथे औदुंबराच्या (Ficus racemosa) झाडावर नेहमी येतो, पण खूप उंचावरच्या फांद्यांच्या आडून तो कधीच नीट दिसला नाही; फक्त त्याच्या छातीवरचा लाल ठिपका दिसायचा आणि मग तो कदाचित लाल बुडाचा बुलबुल असेल असा माझा समज व्हायचा. इतके दिवस ओझरते दर्शन देणार्या तांबटाशी अशी माझी पहिली ओळख झाली.
आता मी रोजच तांबट पक्षी परत दिसतोय का ते पाहत असते, पण २ ऑक्टोबरला संध्याकाळी असंच खिडकीतून बाहेर पाहत असतांना एक पक्षी उडत आला आणि कर्दळीच्या फुलावर बसला. तो पक्षी आकाराने चिमणीपेक्षा किंचित बारीक आणि जास्त लांबट होता. वाकड्या चोचीचा, काळ्या जांभळ्या पाठीचा आणि पिवळट - पांढरट छातीचा तो पक्षी म्हणजे सनबर्ड (Leptocoma zeylonica) होता आणि तो कर्दळीच्या फुलातला मध खात होता. सुदैवाने त्याचाही एक फोटो मला माझ्या कॅमेर्यात घेता आला. सनबर्डही आमच्या इथे प्रथमच आला होता.
काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेतर्फे आमच्या परिसरातल्या रस्त्यांच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आलं होतं. ती झाडं आता चांगली वाढली आहेत. त्या झाडांमुळे आमच्या परिसरातल्या पक्ष्यांची संख्या तर वाढलीच आहे, पण आता तांबट, सनबर्ड यासारखे पक्षीही आम्हांला दर्शन द्यायला लागले आहेत. तांबट पक्ष्याने आता समोरच्या फांदीच्या ढोलीतच मुक्काम ठोकला आहे. नुकताच पावसाळा संपला आहे; वातावरणातला उकाडा वाढला आहे. फुलपाखरं, चतुर इत्यादी कीटक भरपूर प्रमाणात दिसायला लागले आहेत. आता ह्या सगळ्यांबरोबर अजून कोणी नवीन पक्षी दिसतो आहे का, ह्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.
निसर्ग वैभव

No comments:
Post a Comment