0-------- Now the blog "Swings of Mind - स्पंदन" is not added in the list of 'Marathi Blog Vishva', so if you want to read new posts on the blog, then please subscribe this blog by saving the url http://swingsofmind.blogspot.in/ or follow this blog by email. --------0 + 0-------- "Swings of Mind - स्पंदन" हा ब्लॉग आता ’मराठी ब्लॉग विश्व’च्या यादीत समाविष्ट नाही, त्यामुळे जर आपल्याला ब्लॉगवरील नवीन नोंदी वाचायच्या असतील तर त्यासाठी कृपया http://swingsofmind.blogspot.in/ हा यूआरएल पत्ता साठवून हा ब्लॉग सबस्क्राईब करा किंवा आपल्या ईमेलद्वारे ब्लॉगचा मागोवा घ्या. --------0

Thursday, June 23, 2011

सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग ७

वशिष्ठ मंदिरासमोर आधी एक शंकराचे मंदिर आहे, आणि ही दोन्ही मंदिरे कोरीव काम केलेल्या लाकडाने बांधली आहेत. थोडे वरती रामाचे एक जुने देऊळ आहे, त्याचा अर्धा जुना भाग दगडांनी बांधलेला आहे, तर अर्धा नवीन भाग लाकडात कोरीवकाम करून बांधला आहे. आम्ही प्रथम शंकराचे दर्शन घेऊन, मग वशिष्ठांच्या मंदिरात गेलो. वशिष्ठमुनींच्या मूर्तीला फक्त मिशी आहे, दाढी नाही. याच वशिष्ठमंदिराच्या आवारात गरम पाण्याचे कुंड आहे. त्यावर बांधकाम करून स्त्रिया आणि पुरूष यांच्यासाठी तिथे स्वतंत्र स्नानागारे बांधली आहेत. त्याच कुंडाचे पाणी तिथल्या बेसिनच्या नळाला येते. मी त्या पाण्याने हात धुतले. पाणी एकदम कढत होतं. तिथून आम्ही वरच्या रामाच्या मंदिरात गेलो. त्याचे बांधकाम प्राचीन काळचे आहे. मंदिरातल्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती सोन्याच्या आहेत.




तिथून खाली येतांना विक्रेते मागे लागल्याने आम्हांला दुकानात डोकवावेच लागले. चिंगु म्हणजे एक प्रकारचे ब्लॅंकेट असते. हे ऐकल्यावर, चिंगूचा मुंबईत फारसा उपयोग होणार नाही असा विचार करून आम्ही त्या दुकानातून बाहेर पडलो. मी एका दुकानातून माझ्यासाठी स्वेटर घेतला. इथे आम्हांला कळले, की प्रत्यक्ष हिमाचलमध्ये तयार होणार्‍या चांगल्या शाली अतिशय महाग असतात. बाकीचा सारा माल इथे बाहेरून म्हणजे काश्मीरमधून येतो. आजूबाजूच्या दुकानातून विकला जाणारा बहुतेक माल काश्मीरमधूनच आलेला होता.

तिथून आम्ही हिडिंबा मंदिरात गेलो. तिथे दर्शनासाठी पुष्कळ मोठी रांग लागली होती. या हिडिंबा मंदिराच्या आजूबाजूला पाईन, देवदार असे वृक्ष लावून उपवन तयार केले आहे. या वृक्षांच्या सावलीतल्या या मंदिराच्या परिसरात खूप शांत वाटते. हे मंदिरही लाकडाचे बनलेले आहे. या मंदिरावर सांबर, हरीण इत्यादी प्राण्यांच्या शिंगासकट असलेल्या कवट्या लावलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिरतांना जवळजवळ दीडदोन फूट उंचीचा लाकडी उंबरठा आहे. गाभार्‍यात खोल गुहेसारख्या छोट्या भागात हिडिंबेचं प्रतिक असलेली मोठ्या आकाराची रेखीव पदचिन्हं आहेत. त्याशिवाय देवीची एक छोटी मूर्ती बाजूला आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला हिंडिंबापुत्र घटोत्कचाचे मंदिर आहे आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरिक याचेही मंदिर आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर आजूबाजूला जत्रेतल्यासारखी छोटी दुकाने दिसली. इथेही हिमाचली ड्रेसमध्ये आणि काळ्यापांढर्‍या मिश्र रंगाच्या याकवर बसून फोटो काढून मिळत होते. शिवाय मोठ्या कानांचे पांढरेशुभ्र ससे हातात घेऊनही, फोटो काढता येत होते.




तिथून निघाल्यावर ड्रायव्हरने क्लब हाऊसच्या जवळ गाडी उभी केली. इथून मनूच्या मंदिरात जायचे होते. मनूचे निवासस्थान - मनू आलय या अर्थानेच या परिसराला मनाली हे नाव मिळाले आहे. मनूचे मंदिर खूप चढ असलेल्या टेकडीवर आहे. तिथे बस जात नाही. रस्त्याचे काम चालू असल्याने फक्त अर्ध्या रस्त्यापर्यंतच रिक्षा जात होत्या. मनू मंदिर किंवा क्लब  हाऊस असे दोन पर्याय ड्रायव्हरने दिले होते. इथे पुन्हा दोन गट पडले. काहीजण मनू मंदिरात जायला निघाले, तर उरलेले क्लब हाऊसकडे निघाले. मनू मंदिराच्या शेजारी शाळा भरली होती. तिथल्या शाळांना उन्हाळ्यात सुट्टी नसते, पावसाळ्यात सुट्टी असते. क्लब हाऊसमध्ये जायला तिकीट काढावे लागले. पुढे गेल्यावर तिकीटाचे वेगळे चेकींग झाले. क्लब हाऊसमध्ये दुकाने, हॉटेल्स, गेमिंग झोन, बोटींग झोन आहेत. तिथे थोडा वेळ टाईमपास करून ठरलेल्या वेळी बसकडे परत आलो.




तिथून चालतच जेवायला एका हॉटेलमध्ये गेलो. हे गुजराती हॉटेल होते. तिथे गुजराती थाळी मागवली. हॉटेलच्या भिंतीवर "कृपया थाळीत हात धुवू नका." अशी सूचना चक्क गुजरातीतून लिहिली होती. जेवण झाल्यावर बाजारात थोडेफार हिंडलो आणि तिथे असलेल्या वनविहारात बसून विश्रांती घेतली. नंतर पुन्हा चालत बस उभी होती तिथे गेलो. तिथेही जवळच एक वन-विहार तयार केला होता. तिथे हिमाचलमधला मोरासारखा पक्षी "मोनाल" आणि इतर काही पक्षी पिंजर्‍यात ठेवले होते. त्या पक्ष्यांचे आणि फुलांचे फोटो काढून आम्ही तिथून निघालो. तिथून वशिष्ठ नदीचे कुंडही जवळ होते. पण आम्ही हॉटेलवर निघालो. त्या दिवशी हॉटेलमध्ये लवकर पोहोचूनही, डायनिंग रूममध्ये जेवायला भरपूर गर्दी असल्याने आम्ही बाजूला थांबलो आणि सर्वात शेवटी जेवलो. दुसर्‍या दिवशी मनालीहून निघायचे होते.




सकाळी नाश्ता करून निघाल्यावर आमचा प्रवास चालू झाला. आम्ही कुलूमार्गे चंदिगडला जाणार होतो. वाटेत एका ठिकाणी रिव्हर राफ्टिंगचा बोर्ड पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली. तिथे त्या लोकांनी रिव्हर राफ्टिंग करणार्‍यांची नावे लिहून घेतली (प्रत्येकी चारशे रूपये). प्रत्यक्ष रिव्हर राफ्टिंग करण्याची जागा लांब होती. तिथे आमची बस त्यांच्या गाडीमागे निघाली. आम्ही आठजण रिव्हर राफ्टिंग करणार होतो. आम्हांला भिजू नये म्हणून वरून घालायला, त्यांचा प्लॅस्टीकचा पोषाख देण्यात आला. त्यावर घालायला लाइफ जॅकेट आणि हेल्मेट देण्यात आलं. त्याचे बेल्ट व्यवस्थित बांधण्यात आले. आणि आम्ही राफ्टिंग करण्यासाठी सज्ज झालो. त्यांच्या रबरी बोटीवर पुढच्या सीटवर चारजण, मध्ये आम्ही दोघे आणि पाठीमागे अजून दोघे असे आम्ही सारे बसलो. आम्हांला फक्त दोन्ही हातांनी बोटीतली दोरी घट्ट धरून बसायचे होते. पुढच्यांनी इशारा मिळाला, तर त्या वेळी पुढे झुकायचे होते. बाकी बोट वल्हवायचे काम राफ्टिंगवाली माणसे करणार होती.




पाठीमागे इशारा देणारा त्यांचा एक माणूस बसला. दोघाजणांनी दोन बाजूंनी बोट पाण्यात नेली आणि ते मधल्या भागात आमच्या बाहेरच्या बाजूला बसून इशार्‍यानुसार बोट वल्हवू लागले. मधूनच पाण्याचा जोराचा प्रवाह आला की त्याचे पाणी थेट अंगावर उडून भिजायला होत होते. पाणी एकदम बर्फासारखे थंडगार होते. पाणी उसळून सारखे डोळ्यात जात होते. त्यामुळे सुरूवातीला थोडा वेळ, मी डोळे घट्ट बंद करून घेतले होते. पाणी कमी उडायला लागल्यावर डोळे उघडले, पण आता बोट सतत दिशा बदलत होती. प्रत्येक वेळी बोटीने दिशा बदलली, की माझ्या डाव्या कानात जोरात पाणी जात होते. मध्येच बोट प्रवाहाच्या एका बाजूला आली. वल्हवणार्‍यांनी इशारा देणार्‍याच्या इशार्‍यानुसार पाण्यात उतरून परत बोटीला दिशा दिली. आता आम्ही राफ्टिंगला जरा सरावलो होतो आणि राफ्टिंगची मजा घेत होतो, तेवढ्यात उतरण्याची जागा आली. नदीच्या प्रवाहाला समांतर जाणार्‍या रस्त्याने त्यांची जीप आणि आमची बस तिथे येऊन पोहोचली होती. आम्ही सात किलोमीटरचे अंतर पार केले होते. पुढचे दोघेजण आणि मी असे आम्ही तिघे खूप भिजलो होतो. तिथे जवळच कामचलाऊ चेंजिंग रूमही होती. त्याच्या शेजारच्या एका खोलीत आमच्या राफ्टिंगची काढलेली व्हिडिओ चित्रफीत दाखवण्यात येत होती. दोनशे रूपये घेऊन ते लोक त्याची सी.डी. बनवून देणार होते.

सी.डी. घेऊन आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. हिमाचलमधली गुळगुळीत आणि स्वच्छ रस्त्यांवरची सफर संपवून आम्ही पंजाबमध्ये आलो. चंदीगडला जातांना वाटेत फक्त दुपारच्या जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. या परतीच्या प्रवासात तिथली मक्याची रोटी आणि सरसोची (मोहरीची) भाजी खायची असं आधी ठरवलं होतं. पण आता अर्ध्याच लोकांनी साधे जेवण मागवले आणि उरलेल्यांनी फक्त लस्सी घेतली. पुढच्या प्रवासात दुपारी चार वाजता ड्रायव्हरने बसचा ए.सी. चालू केला. हिमाचलमधून पंजाबमध्ये आल्यावर वातावरणातला उकाडा कमालीचा वाढलेला जाणवत होता. हिमाचलमध्ये दिसणारं निरभ्र निळं आकाश आता पंजाबमध्ये धुरकट, प्रदूषणयुक्त दिसायला लागलं होतं. नंतरच्या प्रवासात संध्याकाळी चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. तिथेच मी सूर्यास्ताचं सुंदर दृश्य माझ्या कॅमेर्‍यात टिपलं. बाकी त्या संपूर्ण प्रवासात काहीच पाहिलं नाही. चंदीगड जवळ आल्यावर बसचे पडदे वरती बांधून टाकले. चंदीगडमध्ये गाड्यांना आतून पडदे लावायला परवानगी नाही. चंदीगड हे एक आखीवरेखीव शहर आहे. संध्याकाळी सात वाजता आम्ही सगळे एकाच हॉटेलमध्ये आलो. इथे सगळीकडे पार्किंगला जागा सोडलेली असल्याने, बसचे पार्किंग कुठे करायचे हा यक्षप्रश्न उभा राहिला नव्हता.


No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...