Friday, June 3, 2011

सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग २

स्टेशनबाहेर बसच्या कार्यालयातला एक माणूस उभा होता. त्याने स्वागत पेय (मिनरल वॉटर) देऊन आमचे स्वागत केले, आणखी काही हवे आहे का असे विचारले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बस दिल्लीच्या ट्रॅफीक जॅममध्ये अडकलेली होती. बसला यायला उशीर होणार होता. आम्ही बाजूला जेमतेम सावली होती, तिथे उभे राहिलो. रेल्वेचा पोलिस आम्हांला तिथे उभे राहू नका म्हणून सांगायला लागला. त्याचे अधिकारी येणार होते आणि आमचं तिथे उभं राहणं त्याच्या सुरक्षाव्यवस्थेला अडथळा ठरत होतं. पण दुसरीकडे कुठेच सावली नव्हती आणि आम्ही उन्हाने बेजार झालो होतो. अखेर त्याने आम्हांला तिथे बस येईपर्यंत एका कोपर्‍यात उभं राहण्याची परवानगी दिली.

समोर दिल्लीतल्या हिरव्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षांची रांग लागली होती. महाराष्ट्रात काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षा बघायची सवय झालेल्या आम्हांला रिक्षांचा तो हिरवा-पिवळा रंग अजिबात आवडला नाही. त्याच रिक्षांमधून एखादी बस पुढे येऊन समोरच्या रस्त्याने वळून पुढे जात होती. आम्ही समोर दिसणारी प्रत्येक बस आपली असेल, अशी कल्पना करत होतो, पण आमचा अपेक्षाभंगच होत होता. दहा वाजत आले, तरी बसचा पत्ता नव्हता. एव्हाना दीड तास बसची वाट बघत आम्ही कंटाळून गेलो होतो. अखेर एकदाची बस आली, आम्ही बसकडे भरभर चालत निघालो. जवळ पार्किंगची सोय नसल्याने ड्रायव्हरने लांब अंतरावर बस उभी केली होती. बसमध्ये चढेपर्यंत आम्ही घामाने चिंब भिजलो होतो. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नॉन ए.सी. बस ठरवलेली होती. पण ड्रायव्हरने, ए.सी. चालू करतो असे सांगून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आणि आमचा सिमल्याच्या दिशेने प्रवास चालू झाला.

वाटेत जातांना लाल किल्ला दिसला, तो परतीच्या प्रवासात बघायचे ठरवून आम्ही दिल्लीच्या प्रशस्त रस्त्यांवरून पुढे निघालो. बसमध्ये ए.सी. चालू असूनही, कधी एकदा दिल्लीबाहेर पडतो असे झाले होते. थोड्या वेळाने दिल्ली शहरातल्या इमारती मागे पडून छोटी छोटी गावे दिसू लागली. मोहरी, सूर्यफुले इत्यादी पिकांनी फुललेली सपाट शेती दिसू लागली. तेवढ्यात ड्रायव्हरने आम्हांला, ’आम्ही व्हेज खाणार, की नॉनव्हेज? आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला आवडेल, की ढाब्यावर’ हे विचारून घेतले. आम्ही त्याला, ’व्हेज खाणार आणि दोन्हीपैकी जिथे चांगले जेवण मिळेल तिथे जेवणार,’ असे सांगून कुठे जेवायचे ते ठरवण्याचा निर्णय त्याच्यावरच सोपवला.

जेमतेम साडेअकरा वाजत असतांनाच ड्रायव्हरने गाडी एका ढाब्याजवळ उभी केली आणि, "इथे चांगले जेवण मिळते. जेवण्यासाठी ही थोडी आधीची वेळ आहे, पण चांगले जेवण मिळणारा दुसरा ढाबा वाटेत येईपर्यंत खूप वेळ होईल, म्हणून आपण इथेच जेवू या." असे सांगितले. आम्ही खाली उतरलो. त्यावेळी बहुधा आम्ही हरियाणात होतो. बाहेर ढाबा आणि आत प्रशस्त ए.सी. रेस्टॉरंट असणारे ते एक हॉटेल होते. आम्ही आतल्या ए.सी. रेस्टॉरंटमध्ये शिरलो. तिथे आत एक प्रशस्त कॉन्फरन्स रूमही होती आणि तिथे लोकांची मिटींग चालू होती. बाकी आत जेवण्यासाठी फारशी गर्दी नव्हती. आम्ही एका बाजूला असलेली दोन रिकामी टेबले बघून तिथे बसलो. बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी प्रशस्त सोफे होते. हात धुण्यासाठी वॉश बेसिनकडे गेलो. नळाचा टॅब फक्त दाबून चालू करायचा, हात धुतल्यानंतर थोड्या वेळाने आपोआप नळाचे पाणी बंद होते अशी सिस्टीम होती. तिथल्या टॉयलेटमध्येही हीच पद्धत होती. पण यात नळाचे फार पाणी वाया जात होते. भरपूर कालवे असलेल्या त्या प्रदेशाला पाण्याचे दुर्भिक्ष नव्हते, म्हणून उन्हाळ्यातही पाण्याची ही चैन तिथे चालू होती.  

हरियाणा आणि पंजाब मध्ये आपल्यापेक्षा तिखट जेवण मिळते असे ऐकले होते. त्यामुळे जेवण्यासाठी मलई कोफ्ता आणि पालक पनीर ह्या भाज्या आणि रोटी मागवली. जेवणाआधी टेबलावर लोणच्याची बरणी आली. मोहरीच्या तेलात केलेले, कैरी, लिंबू इत्यादी फळांच्या मोठ्यामोठ्या फोडी असलेले ते मिक्स लोणचे होते. जेवायला स्टीलच्या थाळ्या आणि स्टीलचे ग्लास दिले गेले. अजून तरी तिथे काचेचे ग्लास किंवा मेलॅमाईन डिशेस वापरण्याची पद्धत आलेली नसावी. नंतर भाज्या आणि रोट्या आल्या. मुंबईत कमी तेलातली पालक पनीरची भाजी खाणार्‍या आम्हांला इथल्या पालक पनीरच्या भाजीवरची मोहरीच्या तेलाची तिखट तर्री पाहून आश्चर्याचा धक्का बसला. पालक पनीरची भाजी तिखट होतीच, पण मलई कोफ्त्याची भाजीही किंचित तिखटच होती. त्यामुळे मलई कोफ्त्याची भाजी गोड असते हा आमचा एक गोड गैरसमज होता, हेही कळले. नंतर त्यांचा राईस आला, सुवासिक तांदूळाचा पण किंचित कमी शिजवलेला, मोकळ्या झालेल्या, मोठ्या शितांचा तो भात होता. इतके पोटभर जेवण झाल्यावरही पंजाबी लस्सी काय असते ते अनुभवण्याची काहीजणांना इच्छा होतीच. त्यामुळे लस्सी मागवली, लस्सी अगदी पंजाबी पद्धतीला साजेशी अशी दाट छान होती.

जेवण झाल्यावर पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. आता ड्रायव्हरने गाडीतल्या टी.व्ही.वर गोविंदाच्या कोणत्या तरी जुन्या सिनेमाची सी.डी. लावली. पण कोणीच तो सिनेमा बघण्याच्या मूडमध्ये नव्हते. सगळेजण मध्येच झोपेने पेंगळून डुलक्या घेत होते, मध्येच जागे होत होते. आता प्रवासात सोनपत, पानिपत, कुरूक्षेत्र, कर्नाल (कल्पना चावलाचे) इत्यादी गावे लागली. ड्रायव्हरला कुरूक्षेत्राविषयी विचारले असता, तिथली काही ठिकाणे परतीच्या प्रवासात दाखवण्याचे त्याने आश्वासन दिले. संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास एका ढाब्यावर चहा घेण्यासाठी थांबलो. तिथल्या नदीची बारीक पिवळी पांढरी वाळू वार्‍याने सगळीकडे उडत होती. आजूबाजूला दिसणारे दगड देखील भुसभुशीत वाळूचे बनलेले असल्याचे जाणवत होते. चहा घेतल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास चालू झाल अणि काही वेळातच आम्ही पिंजोर गार्डनपाशी येऊन पोहोचलो.

पिंजोर गार्डन हे यादविंद्र गार्डन या नावाने देखिल प्रसिद्ध आहे. हे मुघल गार्डन पद्धतीचे म्हणजे दोन्ही बाजूला समान रचना असलेले, टेरेसेस (अनेक मजली गच्ची) व पाण्याचा वाहता प्रवाह असलेले उद्यान आहे. उद्यानात प्रवेश केल्यानंतर मध्यभागी पाण्याचा वाहता प्रवाह, त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ व हिरवळीच्या पलिकडे लावलेली मोठी झाडे असलेली सपाट टेरेस (गच्ची) समोर दिसली. पाण्यात मध्यभागी कारंजे होते. या गच्चीतून पायर्‍या उतरून खाली जातांना समोर मोठे कारंजे दिसले. या कारंजातून उडणार्‍या पाण्याच्या तुषारांवर सूर्यप्रकाश पडून त्यातून इंद्रधनुष्य दिसत होते. हे इंद्रधनुष्य फोटोत टिपण्यासाठी खूप धडपड करावी लागली. कधी वार्‍याच्या झोताने पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलायची, तर कधी माणसे मध्ये येऊन उभी राहायची. अखेर एकदाचा त्याचा फोटो काढून आम्ही पायर्‍या उतरून खाली आलो. पुढेही पायर्‍या उतरून खाली जाणार्‍या पाचसहा गच्च्या होत्या. पण उद्यानाचे नवीन बांधकाम चालू असल्याने सर्व कारंजी चालू नव्हती. बाकी बाजूच्या हिरवळीत व झाडांमध्ये नवीन काही पाहण्यासारखे नव्हते. त्यामुळे बहुतेकजणांनी हिरवळीवर बसून विश्रांती घेतली. मी मात्र उद्यानाचा पुढचा भाग पाहून आले. थुजाच्या झाडाला कोन(फुलं) लागले होते, ते मला प्रथमच पाहायला मिळाले.




पिंजोर गार्डनमधून बाहेर पडून आम्ही बसमध्ये बसलो. आता ड्रायव्हरने गाडीच्या खिडक्या उघडून द्यायला सांगितल्या. प्रवास चालू झाल्याबरोबर आता चढाचा रस्ता चालू झाला. काही मिनिटांतच आम्ही हिमाचल प्रदेशाच्या सीमेवर आलो. "देवभूमी हिमाचल" मध्ये प्रवाशांचे स्वागत करणारा बोर्ड समोर लावला होता. हिमाचलमध्ये प्रवेश केल्याबरोबर चढाचा आणि वळणावळणांचा घाटाचा रस्ता लागला. आजूबाजूला पाईन, देवदार इत्यादी वृक्ष दिसू लागले आणि त्यातून येणार्‍या गार वार्‍याच्या झुळुका मनाला सुखावू लागल्या. पण आता वेगाने संध्याकाळ होत होती. अंधार पसरायला लागला होता. हळूहळू बाहेर फक्त अंधार दिसायला लागला, गारवा वाढला आणि समोरून येणार्‍या वाहनांचा प्रकाशच फक्त तेवढा जाणवत राहिला.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...