गेल्या काही वर्षांत काही अडचणींमुळे, नातेवाईकांकडे काही निमित्ताने जाणे झाल्याचे सोडले, तर इतर कोणत्याच ठिकाणी आमचे फिरणे झाले नव्हते. त्यातही महाराष्ट्राबाहेर आम्ही बर्याच वर्षांत गेलो नव्हतो. त्यामुळे यावर्षी ९ मे ते १८ मे अशी दहा दिवसांची सिमला, कुलू, मनाली ट्रीप ठरवल्यामुळे मनात एक कुतुहलमिश्रीत संमिश्र हूरहूर दाटली होती. आम्ही आणि आमचे नातेवाईक असे तीन कुटुंबातले सगळे मिळून एकून दहा जण ट्रीपला जाणार होतो.
ट्रीपला जातांना माझा दुखावलेला गुडघा साथ देईल की नाही याबद्दल मी साशंक होते, पण मला डॉक्टरांनी "नी कॅप" वापरून निर्धास्तपणे ट्रीपला जाण्याचा सल्ला दिला आणि आमची सर्वांची ट्रीपला जाण्याची तयारी चालू झाली. कपडे, स्वेटर, शाली आणि प्रथमोपचाराची औषधे सोबत घेऊन आम्ही आमच्या बॅगा भरल्या आणि ९ तारखेला दुपारी मुंबई सेंट्रल स्टेशन गाठले. दुपारी ४.३० ला सुटणार्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये आम्ही स्थानापन्न झालो.
ट्रीपला जातांना माझा दुखावलेला गुडघा साथ देईल की नाही याबद्दल मी साशंक होते, पण मला डॉक्टरांनी "नी कॅप" वापरून निर्धास्तपणे ट्रीपला जाण्याचा सल्ला दिला आणि आमची सर्वांची ट्रीपला जाण्याची तयारी चालू झाली. कपडे, स्वेटर, शाली आणि प्रथमोपचाराची औषधे सोबत घेऊन आम्ही आमच्या बॅगा भरल्या आणि ९ तारखेला दुपारी मुंबई सेंट्रल स्टेशन गाठले. दुपारी ४.३० ला सुटणार्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये आम्ही स्थानापन्न झालो.
राजधानी एक्स्प्रेस सुटल्यानंतर थोड्याच वेळात रेल्वेच्या कर्मचार्यांनी प्रत्येकाला मिनरल वॉटरची एक-एक बाटली दिली. त्यानंतर वाचायला पेपर मिळाला. मग प्रत्येकाला नॅपकीन मिळाले आणि लागोपाठ त्यांचा मधल्या वेळेचा नाश्ता आला. ब्रेड, बटर, जाम, सामोसा, टोमॅटो केचअप, सॉफ्ट ड्रिंक आणि सोबत मुखशुद्धी असा त्याचा पोटभर मेनू होता. त्यापैकी टोमॅटो केचअपचे पाकीट हाताने फोडता येईना, मग लगेच सामानातली कात्री बाहेर आली; गरज पडली तर, म्हणून बरोबर घेतलेल्या प्रत्येक बारीक-सारीक वस्तूचा आम्हांला पुढे उपयोग होणार होता, याची ही नांदीच होती.
नाश्ता संपल्यानंतर, मग लगेच चहा आला. त्यानंतर मध्ये थोडा वेळ जातो न जातो तोच रात्रीच्या जेवणापूर्वी दिले जाणारे संध्याकाळचे टोमॅटो सूप, बटर आणि ब्रेड स्टीक्स आल्या. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर थोड्याच वेळात साडेनऊला रात्रीचे जेवण दिले गेले. दाल फ्राय, जिरा राईस, मटार पनीर, रोटी, लोणचे, दही, सॅलड असे भरलेला ट्रे समोर आला, पण आता फार काही जेवण्याची इच्छा उरली नव्हती. जेवण झाल्यावर लगेच आईस्क्रीम आले.
या सगळ्यात वेळ कसा निघून गेला ते कळलेच नव्हते. वेळ जाण्यासाठी काही वेगळा टाईमपास करावा लागला नाही. जेवण झाल्यावर बहुतेक प्रवाशांनी त्यांचे बर्थ आडवे टाकून झोपण्याची तयारी केली होती. आमच्यापैकी सहा जणांचे मिळून एक स्वतंत्र कंपार्टमेंट आम्हांला मिळाल्यामुळे आम्ही मात्र थोडावेळ पत्ते खेळत बसलो होतो. पत्त्यांचे बरेचसे खेळ आता विस्मरणात गेले होते, ते आठ्वण्याचा प्रयत्न करत आम्ही खेळत होतो. अखेर अकरा वाजता आम्हीही झोपायची तयारी केली.
रात्री शांत झोप लागली नाही, तरीही बर्यापैकी झोप झाली. सकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळे उठले. तोंड धुवून झालंय तेवढ्यात सकाळचा चहा आला आणि पेपरही वाचायला मिळाला. त्यानंतर थोड्याच वेळात ब्रेड, बटर, जाम, कटलेट, टोमॅटो केचअप, सॉफ्ट ड्रिंक आणि सोबत मुखशुद्धी असा सकाळचा नाश्ता आला. नंतर पुन्हा एक चहा झाला. त्यानंतर मात्र रेल्वेच्या कर्मचार्यांची दिलेले नॅपकीन, उशा, चादरी, ब्लॅंकेट्स गोळा करण्याची घाई चालू झाली. आम्हीही आमचे सगळे आवरून बसलो.
आता सगळ्यांचे लक्ष खिडकीतून बाहेर दिसणार्या दृश्याकडे वेधले गेले होते. दूरपर्यंत पसरलेल्या सपाट जमिनीवर शेते पिकवलेली दिसत होती. शेतांमध्ये शेणाच्या गोवर्यांनी बनवलेली धान्य साठवण्याची पेवे मधूनच दिसत होती. एखादा कालवा वाहतांना दिसत होता. एका ठिकाणी कालव्याजवळ झाडावर बसलेले दोनतीन मोरही दिसले. गाव जवळ आलं की धाब्याची घरं दिसायची. तिकडे पाऊस कमी पडत असल्याने भितींना सिमेंटचा गिलावा केलेला नव्हता. घरांच्या भिंती नुसत्या विटांच्याच दिसत होत्या.
दिल्ली जवळ आल्यानंतर मात्र आजूबाजूला मोठ्या इमारती दिसायला लागल्या. दिल्लीची लोकल ट्रेनही दिसू लागली. अखेर एक एक स्टेशन पार करत शेवटी आमची राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला थांबली आणि साडेआठ वाजता आम्ही दिल्लीला उतरलो. दिल्लीपासून पुढचा प्रवास करण्यासाठी आम्ही एक बारा सीट्सची बस ठरवली होती. बसचा ड्रायव्हर बस घेऊन दिल्ली स्टेशनबाहेर थांबणार होता. त्याला तसा फोन केला होता. ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे आम्ही रेल्वेचा पूल उतरून दिल्ली स्टेशनबाहेर आलो आणि उन्हाचा तडाखा जाणवला.
सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग १

No comments:
Post a Comment