Wednesday, January 20, 2010

घरातली हिरवाई भाग १ - घरातली फ़ुलझाडे

घरात झाडं लावतांना सर्वात प्रथम पसंती दिली जाते ती फ़ुलझाडांनाच. रंगीबेरंगी, मनमोहक, सुवासिक फ़ुले सर्वांची मने आकर्षित करून घेतात. म्हणूनच फ़ुलझाडांची निगा कशी राखावी, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

फ़ुलझाडांसाठी कुंडीची निवड करतांना सहा ते बारा इंच व्यासाची कुंडी निवडावी. कुंडीचा आकार झाडापेक्षा खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. झाडाच्या आकाराच्या प्रमाणात कुंडीचा आकार असावा. कुंडी झाडापेक्षा खूप मोठ्या आकाराची असेल, तर तिला पाणी घातल्यावर कुंडीच्या मातीतले क्षार पाण्यात विरघळतात व पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळे अशा मातीचा कस लवकर निघून जातो व ती झाडांच्या वाढीकरता निकामी ठरते. त्याचप्रमाणे खूप लहान आकाराच्या कुंडीत झाड लावल्यास लवकरच झाडाच्या मुळांनी सर्व कुंडी भरून जाते. काही दिवसांनी अशी कुंडी फ़ुटण्याची शक्यता असते. म्हणून असे झाड लहान कुंडीतून काढून मोठ्या कुंडीत लावणे आवश्यक असते.

फ़ुलझाडांसाठी कुंडी भरतांना सर्वसाधारणपणे ती पुढील प्रकारे भरावी -
साहित्य - एक कुंडी, मातीच्या फ़ुटक्या कुंडीचे तुकडे (खापरं), विटांचे तुकडे, मॉस किंवा कोळसे, नदीची वाळू, कंपोस्ट, माती व रोपटे.
कृती - प्रथम कुंडी स्वच्छ करुन घ्यावी. मातीची कुंडी असल्यास ती पाण्यात भिजवून घ्यावी. कुंडीतील प्रत्येक छिद्रावरती खापराचा तुकडा ठेवावा. या खापराच्या तुकड्याची अंतर्वक्र बाजू कुंडीच्या तळाशी येईल, याची काळजी घ्यावी. ( खापराचे तुकडे नसल्यास माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक छिद्रावर नायलॉनच्या जाळीचा तुकडा ठेवावा. ) नंतर त्यावर कुंडीचा तळ पूर्णपणे झाकला जाईल अशा रीतीने विटांचे तुकडे पसरावेत. नंतर त्याच्यावर मॉस किंवा कोळशाचा थर घालावा. त्याच्यावर नदीच्या वाळूचा थर घालावा. आता त्याच्यावर पुढील प्रकारचे ’पॉटिंग मिक्श्चर’ तयार करून घालावे -
पॉटिंग मिक्श्चर - एक भाग कंपोस्ट + एक भाग वाळू + दोन भाग माती.
पॉटिंग मिक्श्चरने (रिकाम्या) कुंडीचा सुमारे एक तृतीयांश भाग भरल्यानंतर त्या कुंडीत रोपटे लावावे व पॉटिंग मिक्श्चरने उरलेली कुंडी भरावी. कुंडीत रोपटे लावल्यावर त्याला पाणी घालावे व एक दिवसभर कुंडी सावलीत ठेवावी.



कुंडीत झाड लावतांना ते संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी लवकर लावावे व सावलीत ठेवावे, म्हणजे दुसर्‍या दिवशी उन्हात ठेवेपर्यंत रोपटे चांगले तरारते.

त्याचप्रमाणे झाड दुसर्‍या कुंडीत लावण्यापूर्वी एक तास आधी त्याला पाणी घालून ठेवावे व त्या कुंडीच्या कडेची माती खुरप्याने सैल करून ठेवावी, म्हणजे झाडाच्या मुळांना इजा न होता झाड दुसर्‍या कुंडीत अलगद लावता येते.

झाडाच्या मुळांना पाण्याबरोबरच हवेची आवश्यकता असते. त्यासाठी दर आठवड्याला खुरप्याने कुंडीतली माती सैल करावी. बर्‍याचदा कुंडीमध्ये मुख्य झाडाबरोबरच अनावश्यक छोटी झाडे - तण उगवते. हे तण मुख्य झाडाबरोबर स्पर्धा करून मातीतील पोषकद्रव्ये व पाणी शोषून घेते. म्हणून असे तण वेळोवेळी कुंडीतून उपटून टाकावे.

घरात फ़ुलझाडे लावतांना ज्या जागेत झाडे लावायची आहेत, तिथे उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश व जे झाड लावायचे आहे, त्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश याची माहिती असणे गरजेचे आहे.

गुलाब, मोगरा, कॅक्टस इत्यादी झाडांना तीन ते सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. म्हणून जास्त ऊन येणार्‍या जागेसाठी या झाडांची निवड करावी.

शेवंती, झेंडू, लिली, निशिगंध, जास्वंद इत्यादी झाडांना कमीत कमी दोन ते चार तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

ऍंथुरिअम, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड ही झाडे कमी सूर्यप्रकाशात किंवा जिथे मोठ्या झाडांची सावली पडते अशा ठिकाणी चांगली वाढू शकतात.

याचा विचार करून झाडांची निवड करावी. काही ठिकाणी उत्तरायण किंवा दक्षिणायनामुळे सूर्याच्या दिशेत बदल होऊन सहा महिन्यांकरता सूर्यप्रकाश येतो व सहा महिने सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून घर कोणत्या दिशेला अभिमुख आहे, याचासुद्धा झाड लावतांना विचार करणे आवश्यक आहे.
***************
- १२ मे २००५ रोजी प्रकाशित झालेल्या "घटनाक्रम" या साप्ताहिकातील हा माझा लेख.

टीप - मुंबई व मुंबईच्या परिसराचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन या लेखातील सूर्यप्रकाश आणि झाडांचा परस्परसंबंध दर्शविणारी विधाने केली आहेत. इतर ठिकाणी भौगोलिक स्थानाप्रमाणे  झाडांसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश कमीजास्त असू शकतो. 

2 comments:

Gouri said...

माझ्यासारख्या शिकाऊ बागवाल्यांसाठी फारच उपयुक्त माहिती. या विषयावर अजून वाचायला आवडेल.

D D said...

धन्यवाद गौरी!
या लेखाचा दुसरा आणि शेवटचा भाग मी नंतर इथे देणार आहे. त्याचाही तुम्हांला उपयोग होईल अशी आशा करते.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...